फुकटात विनासायास वेटलॉस

Submitted by शाम भागवत on 3 July, 2018 - 03:17

वाढलेला पोटाचा घेर व वाढलेले वजन, सोबतीला कोलेस्टेरॉल सापडल्यामुळे नशिबी आलेल्या गोळ्या आणि आता या आयुष्यभर घ्यावयाच्या आहेत अस डॉ. नि सांगितल्यावर मनाला बसलेला हबका. काही जणांचा वाढलेला रक्तदाब व त्यावरच्या गोळ्या , मधुमेह पूर्व स्थिती लक्षात आल्यावर उडालेली घाबरगुंडी तर मधुमेह झाल्याचे निदान झाल्यावर घरातल्या सर्वांच्या चेहऱ्यावर अवतरलेली काळजी. आणि या सगळ्यातून हे खा व हे खाऊ नका ची भली मोठी यादी. शिवाय गुडगेदुखी, ऍसिडिटी , .. , .., .. असच बरच काही यांच्यासाठी हे लिहितोय.

ह्या सगळ्या त्रासातून कस मुक्त व्हायच?, एक पैसा जास्त खर्च न करता हे कस साधायच? श्रीमंत असो की गरीब दोघांनाही जमू शकेल,तसेच स्त्री पुरूषात अजिबात भेदभाव न करता दोघांनाही एकच पद्धत कशी वापरता येईल, तसेच त्यामागे विज्ञानाचा भक्कम पाठिंबा असला पाहिजे. वगैरे वगैरे .......
थोडक्यात आखूड शिंगी, बहुदुधी, गरीब, दूध काढताना लाथा न मारणाऱ्या बहुगुणी गायीबद्दल हे लिहितोय.

कै. डॉ.श्रीकांत जिचकार एक अवलिया माणूस. एमबीबीएस, एमडी झाल्यावर आयपीएस त्यानंतर चक्क आयएएस. पण चारच महिन्यात नोकरीचा राजीनामा देऊन आमदार, मग मंत्री, राज्यसभेचे खासदार. या माणसाने प्रगती तरी किती वेगाने करावी? पण हे सगळं ४९ वर्षांच्या आयुष्यात साधायच म्हणजे एवढा वेग हवाच की हो!

घरातल्या ग्रंथालयात बावन्न हजार पुस्तक. विद्वत्ता दाखविण्यासाठी जाहिरात म्हणून नक्कीच जमवलेली नसणार. उलट सगळी वाचलेली असण्याची शक्यता जास्त. कारण ४२ विद्यापीठातून मिळवलेल्या २० पदव्या. बहुतेक सगळ्या प्रथम श्रेणीतून मिळालेल्या. २८ सुवर्णपदक मिळवलेला माणूस हा. नक्कीच पुस्तके वाचलेली असणार.

तर असा हा माणूस. भरपूर परदेश वाऱ्या केलेला असूनही त्याची भारताशी जुळलेली नाळ तुटली नव्हती. साधारण अशी माणसे थोडीशी भारतीय संस्कृतीशी फटकून वागतात. पण इथेही आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. भारतीय संस्कृती व प्राचीन इतिहास, तत्त्वज्ञान व संस्कृत यात एमए केलेय. हे मी आपल वानगीदाखल सांगतोय कारण तस पाहिल तर त्यांनी १० विषयात एमए केलेय. इतकच काय मानाची डी. लिट. पदवी मिळालीय त्यांना संस्कृतामध्ये.

तर सांगायच म्हणजे अशा माणसाने १९९७ साली एक नवीन विचार भारताला दिला. त्यावेळी ते राज्यसभेचे सभासद होते. पुणे महानगर पालिकेत मा. शशिकांत सुतार नावाच एक मोठ्ठ प्रस्थ होत. त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरात जिचकारांना भाषणासाठी बोलावल. त्यासाठी सगळी व्यवस्था जातीने केली. आपोआपच बरेच मान्यवरांनी रंगमंदिर भरून गेल.

त्यांनी सांगितल की, "शरीरात तयार होणारे अतिरिक्त इन्शूलीन बऱ्याच रोगांचे कारण आहे." स्थूलता, त्यातून मधुमेह, वाढलेला रक्तदाब, त्यातून मग अंजोग्राफीची तपासणी, त्यात नक्की काहीतरी सापडतच. मग अंजोप्लास्टी. सगळाच प्रकार खर्चिक. पण मरणाची भीती वाटायला लागली की माणूस करतो खर्च. त्याला वाटतं की झाल सगळ करून. आता काही आपल्याला होणार नाही. पण कसच काय. पाच सहा वर्षात आणखी खर्चिक बायपाससाठी हॉस्पिटलची वारी ठरलेली.

मग यावर सोपा उपाय काय? दिवसातून फक्त दोनदाच जेवा. काहीही खा. भूक भागेपर्यंत कितीही खा. तूप लोणी बिनधास्त खा. मांसाहारही चालेल. फक्त हे जेवण ५५ मिनिटांत संपवले पाहिजे. आणि दिवसातून ४५ मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. महागड्या जिम नको की, आहारतज्ञांना पैसे द्यायला नको. दवाखान्याची पायरी चढायची कधी वेळही येणार नाही. किती सोपे आहे ना? पण अवघड बाब पुढे आहे. ते पुढे सांगतात की, "दोन जेवणामध्ये काहीही खाऊ नका." याकाळात तोंड उघडायचे ते फक्त बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी. बस्स. औषधांच्या याद्या विसरून जा. हे खा व हे खाऊ नका याची प्रत्येक डॉक्टर व आहारतज्ञांप्रमाणे बदलणारी यादी व त्यातून उडणारे गोंधळ संपवून टाका.

सगळ वैज्ञानिक नियमावर आधारलेले भाषण. समोर अनेक मान्यवर बसलेले. त्यामुळे बऱ्याच वेळेस अशी भाषणे इंग्रजीत चालतात आणि जिचकार तर इंग्लिश लिटरेचर मध्येपण एमए केलेले. पण तरीही हा विचार सर्वसामान्य माणसाला कळला पाहिजे यासाठी हे भाषण त्यांनी मराठीतून दिले आहे. समोर नुसते मान्यवर नाही तर पुण्याचे मान्यवर बसणार आहेत म्हणून त्यांनी अनेक इंग्रजी संज्ञांना पूरक मराठी संज्ञा शोधून काढल्या होत्या व त्या संज्ञा पाठ करून मगच ते व्याख्यान द्यायला आले होते. (या मराठीतील संज्ञा शोधणे व पाठ करणे हे कामही त्यांना सोपेच गेलेले असणार. कारण ते महाराष्ट्राच्या विश्वकोश निर्मिती मंडळाचे सभासद होते!!!) एखाद्या माणसाला बेंबीच्या देठापासून कळकळ असते म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर त्यासाठीही हे व्याख्यान ऐकायला हरकत नाही.

आपल्या या कार्याचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी "नागपूर फिटनेस मुव्हमेंट" आणि "पुणे फिटनेस मुव्हमेंट" अशा दोन संस्था सुरू केल्या. पण त्या काळात फेसबुक किंवा व्हॉटऍपस वगैरे काहीच नव्हत. नाहीतर याचा प्रसार फार वेगाने झाला असता. मनोगत, मायबोली किंवा मिसळपाव सारखा एखादा संकेतस्थळ तयार करता अल्लाही असत कदाचित. पण वाचणार कोण? इंटरनेट फार महाग होत त्यावेळेस. टाटा कंपनीच्या व्हीसएनएल ला वर्षाकाठी पाच सहा हजार भरल्यावर कनेक्शन मिळायच. शिवाय घरात फोन असला पाहिजे ही पूर्वअट. आणि नेट वापराला सुरवात झाली की दर मिनिटाला एक टेलीफोनचा कॉल एवढे पैसे टेलिफोनच्या बिलात यायचे तो खर्च वेगळाच. नेट वापरणे हे सामान्यांच्या कुवती बाहेरची गोष्ट होती. अपवाद फक्त आयटी मधल्या लोकांचा!

तरीपण राज्यसभेच्या सदस्याला बऱ्याच सोयी सुविधा असतात. ओळख पाळख असते. त्यामुळे प्रसाराचे काम चालू होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. दोनच वर्षांनी म्हणजे १९९९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी काँग्रेसकडून त्यांना तिकिट मिळाल पण फक्त ३०००+ मतांनी पडले. इतकेच नव्हे तर राज्यातले आणि त्याचबरोबर केंद्रातले काँग्रेसचे सरकार पडले. प्रसारावर फारच मर्यादा आल्या.सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे २००४ साली जेव्हा कॉग्रेसचे सरकार राज्यात व केंद्रात आले त्यानंतर दोनच आठवड्यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मला वाटते या नवीन विचारांचे फक्त बी लावायचे काम नियतीने त्यांच्यावर सोपवले होते.

त्यांचा या भाषणाचा एक ऑडिओ यूट्यूबवर होता. पण दोन तास तीन मिनिटांचा ऑडिओ म्हटल्यावर बरेच जण तो उघडून सुद्धा बघत नसत. आणि यदाकदाचित कोणी उघडलाच तर बरेच जण पहिले प्रास्ताविक संपेपर्यंतही कळ काढू शकत नसत. त्यामुळे मूळ भाषण सुरू होण्याआधीच तो बंद केला जायचा. एवढा वेळ असल काही ऐकायला तो थोडाच वपू किंवा पुल चा व्हिडिओ होता की व्यायाम/प्रवास करताना ऐकायचा गाण्याचा अल्बम होता? ही राजकारणी लोक ही अशीच. समोर माइक आला की यांना वेळेच भानच राहत नाही. अशी कॉमेंटपण कोणीतरी केली असेल असा मला दाट संशय आहे.

बरीच वर्षे निघून गेली. जिचकारांनी लावलेले बी रूजण्यासाठी अनुकूलतेची वाट पाहत युट्युबवर पडून होत. ही अनुकुलता लाभणे फार अवघड होत. त्याला वेळ लागणार हे त्या बियाणाला माहीत होत. आणि सहा वर्षापूर्वी ते एकाच्या हृदयात रूजल. हा माणूस एमबीबीएस, एमडी होता. पण रोग पाहून औषध देणारा नव्हता. तर रोग होऊच नये यासाठी काय करता येईल यातला तज्ञ होता. प्रामाणिक होता. पैशासाठी काम करणारा नव्हता. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची इच्छा असणारा असा होता. मुख्य म्हणजे माहिती वाचून चर्चा करणारा नव्हता तर त्यासाठी स्वतःवर प्रयोग करायला तयार असणारा व त्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करायला तयार असणारा होता. नियतीने अगदी अचूकरीत्या लातूरच्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची निवड केली होती.

डॉ. दीक्षित सध्या ते लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभाग प्रमुख आहेत व गेली सत्तावीस वर्षे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन करत आहेत. "स्थूलत्व निवारण आणि मधुमेह प्रतिबंध" या विषयावर त्यांनी संशोधन केले.यात त्यांनी प्रथम स्वतःवर प्रयोग केले. नातेवाइकांवर प्रयोग केले. जवळच्या मित्रांवर प्रयोग केले. या सगळ्याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या. मग मात्र त्यांनी लातूर व औरंगाबाद येथील हजारो लोकांवर प्रयोग केले. वैज्ञानिक नियतकालिकात प्रबंध लिहिण्यासाठी या प्रयोगाचे योग्य दस्तावेजीकरण केले व अनेक प्रबंध प्रकाशीतही केलेले आहेत.

पण प्रसारासाठी नुसते प्रबंध लिहून भागत नाही यासाठी त्यांनी व्याख्याने द्यायला सुरवात केली. पुण्याच्याच बालगंधर्व रंगमंदिरात कै. डॉ. श्रीकांत जिचकारांच्या स्मृतीला अभिवादन करून सुरवात झालेले त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी खाली लिंक देत आहे. हेही व्याख्यान खूप मोठे आहे. पहिले प्रास्ताविक ३० मिनिटे चालते. त्यामुळे व्याख्यानासाठी आतुर झालेले बरेच जण कंटाळून पहिल्या काही मिनिटांनंतर व्याख्यान बंद करून टाकतात. हे प्रास्ताविक पाहू नये म्हणून मी हे सांगत नाहीये. तर थोडा धीर धरावा असे सुचवत आहे. या प्रास्ताविकातूनही तुम्हाला काही मुद्दे मिळू शकतात.

२०० च्या वर व्हॉटऍपस ग्रुप स्थापन करून व फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ अठ्ठावीस हजार माणसांपर्यंत पोहोचली आहे. अनेक देशातील माणसे यात आहेत. पण हे सगळे सांभाळणे आता अवघड होत चाललेय. कार्यकर्त्या डॉक्टरांना यासाठी वेळ देणे अवघड होत चाललेय. यासाठी आता एक वेबसाईटच उघडायचे प्रयत्न चालू आहेत. तस झाल की एकाच ठिकाणी सगळी माहिती एकत्रित होईल. वेळ वाचेल. एक कोटी लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचायचे उद्दिष्ट समोर ठेवून आता काम सुरू होणार आहे.

खर म्हणजे ह्या व्याख्यानाचा सारांश देण्याचा माझा विचार होता. पण मी मुद्दामहून तस करत नाहीये. कारण तस केले तर लोक मूल व्याख्यान न ऐकताच चर्चा करायला सुरवात करतात. हे व्याख्यान ऐकल्यावर फारशा शंका उरत नाहीत. शिवाय त्यांनी काही फोन नंबरही दिलेले आहेत. त्यावर तुम्ही व्हॉटऍपवर प्रश्न किंवा शंका विचारू शकता.

डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाची लिंक खाली देत आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=edKaI5gxaNQ

ही डॉ. दीक्षित यांची फेसबुक पेजची लिंक आहे. त्यात लाभार्थींची नावे, अनुभव व मोबाईल नंबर दिले आहेत.हे तुम्ही केव्हाही पाहू शकता! https://www.facebook.com/weightlosseffortlessly/

डॉ. जिचकार यांनी याच व्याख्यानात बी पेरण्याचे काम केले. हा ऑडिओ आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=8-kw3hGUwW4

मी स्वतः या विषयातला तज्ञ नाही. पण या संकेतस्थळावर या विषयातले बरेच तज्ञ असल्याने साधक बाधक चर्चा होऊन हा विषय आणखी स्पष्ट होईल याहेतूने हे लेखन केले आहे.

एक महत्त्वाची सूचना :
ज्यांना मधुमेह आहे अशांनी HbA1c आणि fasting insuline या दोन तपासण्या करून त्याचे अहवाल डॉ. दीक्षित यांना पाठवावेत. या दोन तपासण्या म्हणजे रक्तातल्या शर्करेचे प्रमाण दाखवणाऱ्या तपासण्या नव्हेत. त्यानंतर त्यांच्याच सल्ल्यानेच पुढील आहारयोजना सुरू करावी. परस्पर आहारयोजना सुरु करू नये.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मी त्यांचे पुस्तक वाचले आहे,
सब्जेक्ट (m/f , वय, डायबेटिक/प्री डाय/नॉन डाय) --खाद्य पदार्थ-- पदार्थ खाल्ल्या नंतर शून्य मिनिटं/ 10 मिन/60 मिन ला असणाऱ्या इन्सुलिन लेवल
आशा स्वरूपाचा तक्ता त्यात दिला आहे (2 3 पाने भरेल इराक मोठा) हा सगळा डेटा क्रावूड सोर्स आहे,
विवध बॅकग्राउंड चे लोक (कष्टकरी- बैठे काम करणारे- खेळाडू) , प्रत्येक लॅब च्या reagent किट चा फरक, खाल्लेल्या पदार्थ बनवण्याचा फरक आणि प्रत्यक्ष रिपोर्टइंग करताना दाखवलेला प्रामाणिक पण हा सगळा वेरीअबल भागाचा विचार करता, कोणती ही सायंटिफिक सोस या डेटा ला मान्यता देईल याची शंका वाटते.

एखादी कल्पना मांडण्यासाठी हा डेटा कदाचित पुरेसा असेल, पण पेपर पब्लिश करण्याइतका ओथेनतीक निश्चित नाही

इतके वेळा टेस्टिंग करायचं म्हणजे लोक सेल्फ टेस्टिंग करत असतील. नाहीतर लॅबशेजारी घर घ्यावं लागेल किंवा जेवायला तिथे जावं लागेल.

हा डेटा क्राऊड सोर्स च आहे, पण इन्सुलिन लेवल इतक्या सोप्या पद्धतीने ( ग्लुकोज सारखे) घरच्या घरी चेक करता येतात का? हे माहीत नाही
त्यांनी म्हणताना तरी डबा घेऊन लॅब ला जा, आणि पदार्थ खाल्लेली वेळ शून्य मिनिटे धरून, पुढच्या 3 लेव्हल्स घ्या असे सांगितले आहे

म्हणूनच म्हणतोय मी क्लिनिकल ट्रायल करायला हवीय. त्यात महाराष्ट्र सरकारने कसलातरी ब्रँड अँबेसेडर बनवलेय त्यामुळं अजून प्रसार व्हायचा.

त्यांच्या फेसबुक पेजवर दिवसागणिक नवनव्या सक्सेस स्टोरीज येत असतात. हे सगळे लोकं आजारी झालेत तर लय बेक्कार.

समर्थक तर विश्वास ठेवून आहेत, ते कशाला पडतील या भानगडीत?
<<

"विश्वास" हा प्रकार वैद्यक शास्त्रात चालत नाही.

चालला, तर तो फक्त प्लासेबो मधे चालतो.

"सामान्य" लोकांनी केलेल्या टेस्टिंगचे रिपोर्ट पुस्तकात छापून त्याला रिसर्च म्हणणे गमतीदार आहे. ५५ मिन्टं कुठून आली त्याचं कोणतंही स्पष्टीकरण नाही.

पुस्तकात पाहिलं, तर नुसती काकडी खाऊन जास्त इन्शुलिन स्त्राव झालेला आहे.

एकंदर गमती आहेत.

टिप्पीकल वैदिक सायन्स. आम्ही थेरी मांडून मोकळे होवू. योग्य पुराव्याने प्रूव्ह करायची जबाबदारी आमची नाही. Lol

सगळ्यात मोठी गंमत म्हणजे "समर्थक" ही "विश्वास ठेवून आहेत".

जेव्हा बाकी डॉक्टर्स या डाएटमुळे डायबेटिक लोकांना त्रास होतो हे सांगत आहेत, तेव्हा "त्यांना चुकीचं शिकवलं गेलंय" "त्यांचा धंदा डुबतोय" इ. बाबींवर ही "समर्थक" "विश्वास ठेवून आहेत".

या सो कॉल्ड "रिसर्च पेपर" मधेच 'गरीब व अज्ञानी सामान्य लोकांना लुटले जाते' असा डायलॉग दिक्षीत साहेबांनी मारलेला आहे, हे विशेष!

//Quote
The weight loss activities have taken a form of exploitative business for many. Poor and ignorant people are being looted.
//Unquote

यांच्या पद्धतीने अज्ञानी मूर्ख डायबेटीक फुकटात विनासायास स्वतःस अधीक नुकसान करीत आहेत, ह्या वास्तवाकडे "समर्थक" भक्तांनी लक्ष द्यावे ही अपेक्षा व्यर्थ आहे.

असो.

आमच्याकडून सर्वांना फुकट अन विनासायास हार्दिक नववर्ष शुभेच्छा!

***
त्या सो कॉल्ड रिसर्च पेपर बद्दल :
ही त्या https://www.ijclinicaltrials.com/index.php/ijct जर्नलची वेबसाईट,
अन ही, https://www.medipacademy.com/ ते जर्नल पब्लिश करणार्‍या "कंपनी"ची.
कुणाला कुठला फुट्कळ "रिसर्च" इंटरनॅशनल पब्लिश करायचा असेल, तर इथे तात्काळ करून मिळेल. Lol

Ok. इतका राग का ते आले लक्षात. एक डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरांचा धंदा बसवतोय.....

Rofl

अशीच चिकित्सा झीरो बजेट शेतीचीही व्हायला हवी. तिथेही आम्ही म्हणतो ते सोडून बाकी सगळे चूक, आमचं संशोधन प्रयोग आहेत, इ.इ सेम विधानं दिसताहेत.

एक डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरांचा धंदा बसवतोय.....

<<

Rofl

तुम्ही क्लासिक भाजपेयी भक्त आहात, हे ठाऊक आहे. प्रत्येक वेळी सिद्ध करायलाच हवे असे नाही.

अशीच चिकित्सा झीरो बजेट शेतीचीही व्हायला हवी>> 'झीरो (दबक्या आवाजात) बजेट' म्हणजे इंग्लिश मध्ये 'फुकटात विनासायास' असेच ना Biggrin

आरारा

त्या झेक बयेन पब्लिश केलेल्या रीपोर्टवरही मत जाणायाला आवडेल. शेवटी मला काय कळत नाहि अन फेस्बुकी युट्युबी व्हिडिओवर काय ठरवत नाहि.

आतातर एकभुक्त योगी द्विभुक्त भोगी अन इतर सर्व रोगी असले कॅची डायलॉग्सपण येताहेत ऐकु व्हॉट्सप वर!

मला एक साधा अन बाळबोध प्रश्न पडतो पण तो गंभीर आहे. इंडियन मेडिकल असोसियेशन व आरोग्य मंत्रालयासारख्या यंत्रणाची या टेस्टिंग मध्ये काहीच भूमिका नाही का ?

तुम्ही क्लासिक भाजपेयी भक्त आहात, हे ठाऊक आहे. प्रत्येक वेळी सिद्ध करायलाच हवे असे नाही.>>>>

मी जे आहे ते मी तुमच्यासाठी का सिद्ध करू?

दीक्षित समर्थक दीक्षित खरे हे तुमच्यासाठी का सिद्ध करतील?

झिरो बजेट समर्थक झीरो बजेट बेस्ट हे का सिद्ध करतील?

समर्थकांच्या मते हे सगळे आधीच सिद्ध झलेय. ज्यांनी सिद्ध केले म्हणताहेत त्या लोकांवर समर्थकांनी विश्वास ठेवलाय. विषय संपला. समर्थक आता गुरूने दाखवलेल्या वाटेवर चालतील आणि कुणी गरजू सापडलेच तर त्यांना स्वतःच्या गटात ओढतील.

विश्वास तुमचा नाहीय. तुम्ही सिद्ध करा हे सगळे खोटे आहे म्हणून. ज्या गरजूंना समर्थक स्वतःच्या गटात ओढताहेत त्यांना समर्थकांचे गुरू खोटे हे सिद्ध करून दाखवा. समर्थक आपोआप थंड पडतील.

तुमच्यासारखे भाजपेयी अंधभक्त, कितीही डेटा दिला तरी थंड पडत नाहीत, हे वरचा प्रतिसाद वाचून व माझ्या लिंकदान केलेल्या प्रतिसादानंतर तुम्ही दिलेल्या (दु:)उत्तरांवरून सिद्ध होते, वेगळे सांगायची गरजच नाही.

रिसर्च, त्यातले शास्त्रीय सत्य वगैरे.

तुमच्या त्या झीरो बजेट शेतीच्या धाग्यातही 'देशी गायीचेच शेण' हवेबद्दल जे काय यक्सलंट डेटा अन सायंटिफिक वैदिक ट्रुथ्स आहेत, त्या जरा जाऊन बघा पुन्हा.

आता पुन्हा एक दिशाभूल करणारा मद्दड व खोटारडा प्रतिसाद येऊ च द्या.

आरारा +१.
साधना, समर्थकांच्या मते आधीच सिद्ध झालं आहे या वाक्याला काही अर्थ आहे का? सिद्ध कसोटीवर होतं. समर्थकांच्या किंवा विरोधकांच्या मताला काही किंमत नसते. विश्वासाला तर अजिबातच नाही.
गुरुने दाखवलेल्या वाटेवर फक्त भक्त चालतात. ज्यांना काहीही सिद्ध होण्याची कसलीही गरज नसते. श्रद्धा आली की प्रश्न पडतच नाहीत, आणि पडले तरी थातुरमातुर उत्तरे समाधान करतात, त्यांना वर आरारा अंधभक्त म्हणत आहेत.

दीक्षित मेथड ही इंटरमिटंट फास्टिंगच्या भाषेत १६:८ मेथड होते.
म्हणजे १६ तास उपास आणि ८ तासात २ वेळा जेवण.
ते रात्री ८ आणि दुपारी १२ अशा वेळा देतात.
म्हणजेच १६ तास फास्टिंग होते.
>>>>>>

सई, तुझा ह्या धाग्यावरचा अगदी पहिला प्रतिसाद आहे. ह्या नंतरच्या काही पोस्टींमध्येही तू दिक्षित डायट हा IF चाच कसा उपप्रकार आहे हे म्हटल्याचं आठवतं. तसं असेल IF मध्ये जर डाएबिटीक लोकांनी मनाने गोळ्या बंद केल्या किंवा काही तत्सम प्रकार केले तर त्यांना चक्कर किंवा बाकी काही साईड इफेक्ट होतीलच ना ? धोडक्यात तू लिहिलेले प्रॉब्लेम्स हे सरसकट डाएट प्लॅनचे नसून लोकांनी तज्ज्ञांना सल्ला न घेता मनानेच औषधे वगैरेंमध्ये बदल केल्याने झाले आहेत असं मला वाटतं.

पराग +१
काल लिहीता लिहीता थांबले.

सरसकट डाएट प्लॅनचे नसून

आधी डायट प्लान हा शब्द मूळापासून अर्थासकट समजून घेणे महत्त्वाचे. "दिवसातून दोनच वेळा खा" - ह्याला डायटप्लान म्हणत नसतात. ज्यांना काही आजार आहे त्यांच्यासाठी तर अजिबातच नाही. गोळ्या-बिळ्या आपणहून बंद करणे ही फार दूरची गोष्ट आहे...

सुरूवातीचे काही प्रतिसाद आणि आताचे शेवटचे काही प्रतिसाद. मधे काय काय झाले हे कळायला मार्ग नाही.
दीक्षितांनी रिसर्च पेपर पब्लिश केले तेव्हां त्यांचा प्रोग्राम मधुमेहींसाठी नाही हे ते सांगत होते. असे इथेच मायबोलीवर कुठेतरी आहे वाचलेले (याच धाग्यावर पण असू शकेल).
नंतरच्या व्याख्यानात मधुमेहींसाठी आम्ही लवकरच कार्यक्रम घेऊन येणार आहोत असे म्हटले होते.
अलिकडच्या व्याख्यानात ते मधुमेहींसाठी सुद्धा असे सरळ सांगतात. त्यासाठीचा रिसर्च पेपर वेगळा आहे. मायबोलीवर लिंक दिलेली आहे. इच्छुकांनी शोधून घ्यावी.

दीक्षितांचे कदाचित चुकतही असेल. पण अशा पद्धतीने जुने दावे सोयीस्कररित्या घेऊन आपले म्हणणे मांडणे कितपत योग्य आहे हे माझ्यासारख्याला नाही कळत. त्यांच्या रिसर्च पेपरमधल्या चुका दाखवून द्यायला आणि लोकांना सावध करायला कुणाचीही ना नाही.

"दिवसातून दोनच वेळा खा" - ह्याला डायटप्लान म्हणत नसतात. >>>>> ठिक आहे, नका म्हणू. IF ला जे काय म्हणतात ते म्हणा. (मुद्दा वेगळा आहे पण..)

लोकांनी दीक्षित पद्धतीचा चुकीचा अर्थ लावला असे सरसकट म्हणता येणार नाही.
आयएफ असले तरी "५५ मिनिटात काहीही खा" हा सल्ला चुकीचाच आहे. यावर वरती मी खूप काही लिहिले आहे.
त्यांच्या एका एबीपी वरच्या मुलाखतीत त्यांनी "तुम्हाला रोज पिझ्झा खायची सवय असेल तर ५५ मिनिटात पिझ्झा बर्गर खा" असे म्हणून पुढे "पण ते चांगले नाही अर्थात" असे सांगितले आहे.
ऋजुता दिवेकर सुद्धा अशा मुलाखतींमध्ये "डायबेटिक लोकांनी आंबा खायला हरकत नाही. पण कधी थांबायचं ते तुमचं शरीर तुम्हाला सांगू द्या", अशा प्रकारचे क्लिकबेट्स देते.

अशा लूझ स्टेटमेंट्सचे अर्थातच लोक त्यांना हवे ते इंटरप्रिटेशन करतात. जेव्हा तुम्ही एखाद्या डाएटिशियन किंवा डॉक्टरकडे जाता, तेव्हा काही खाद्यपदार्थ जसे की साखर, साखर असलेली फळे, भात वगैरे सरसकट बंद होतात याचे कारण ते १००% वर्ज्य असावेत असे नसले, तरी जेव्हा अजिबात खाऊ नका असे डॉक्टर सांगतो, तेव्हा त्यांचा सगळ्यात कंप्लायंट पेशंट भात अजिबात खाणार नाही पण त्यांचा सगळ्यात नॉन कंप्लायंट पेशंट आधीपेक्षा कमी भात खाईल. परिणामी, दोघांनाही त्यांच्या त्यांच्या परीने फायदा होईल.

टीव्हीवरील मुलाखतीत तरी त्यांनी खाण्याच्या कन्टेन्टवर भर द्यायला हवा होता असे मला वाटते.
दुसरी गोष्ट अशी की "दर दोन तासांनी खाणे चुकीचे आहे" हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर नाही. तिथेही तुम्ही दर दोन तासांनी जर अगदी थोडा आणि लो कार्ब्स आहार घेतला तर वजन आणि साखर दोन्हीवर त्याचे चांगले परिणाम होतात. फक्त ते जमायला अवघड आहे. पण डायबेटीस तज्ञ ही पद्धत पेशंट्सना रिकमेण्ड करतात आणि डायबेटीसच्या दृष्टिकोनातून ती चुकीची नाही. फक्त त्या पद्धतीत कम्प्लायन्स अवघड आहे कारण प्रत्येक जेवणात ३०० कॅलरीज, त्याही कमी कार्ब्स आणि फायबररिच घेणे आणि त्याचे प्लॅनिंग करणे अवघड आहे. पण टाईप २ मध्ये २ वेळा नुसती १ पोळी आणि भात एकत्र असा चौरस आहार घेतला तरी साखर प्रचंड वाढू शकते. समजा ५५ मिनिटात तुम्ही असा आहार घेतला आणि २ तासांनी तुमची साखर २०० च्या वर असेल तर ती परत १४० च्या आत यायला अजून एक-दीड तास गेला असे गृहीत धरले तर तुमच्या २ जेवणांमधल्या ८ तासाच्या फास्टिंग मधले ४ तास इथेच वाया गेले. कारण जोवर तुमची साखर नॉर्मल रेंज मध्ये येत नाही तोवर तुम्हाला फास्टिंगचा काहीही उपयोग होणार नाही. मग ४ तास ती साखर आटोक्यात येते तोवर तुम्ही पुन्हा ५५ मिनिटात मोठे जेवण घेणार. हे जेवण तुम्ही रात्री जितक्या उशिरा घेणार तितका त्याचा परिणाम तुमच्या सकाळच्या फास्टिंग साखरेवर होणार. त्यात, टाईप २ मध्ये "डॉन फेनॉमेनॉन" मुळे संपूर्ण फास्टिंग जरी असले तरी सकाळची साखर वाढलेली असते. डॉन फेनॉमेनॉन काय आहे ते गूगल करा. इथे खूप लांब प्रतिसाद होईल.

तिसरी सगळ्यात कन्फ्युजिंग बाब अशी आहे की ते म्हणतात ५५ मिनिटात तुम्ही कितीही खा, तेवढेच इन्सुलिन तयार होते.
ज्यांच्या शरीरात अजिबात इन्सुलिन तयार होत नाही (टाईप १) त्यांना मूठभर बदाम खाल्ल्यावर लागणारे इन्सुलिन आणि एक वाटी पांढरा भात किंवा पोहे खाल्ल्यावर लागणारे इन्सुलिन यात जमीन आसमानाचा फरक आहे. भात, साखर, भाकरी, पोळ्या, आंबे खाल्ल्यावर अर्थातच जास्त इन्सुलिन लागते. यावरून इन्सुलिन रिलीज स्बस्ट्रेट डिपेंडेंट आहे एवढे तरी आपल्याला मान्य करायला हवे.

पण टाईप २ साठी वरील स्टेटमेंट आणखीनच धोकादायक आहे. कारण तुम्ही किती इन्सुलिन रेझिस्टंट आहात, हे संपूर्णपणे प्रकृतीसापेक्ष आहे. एखाद्याची साखर आंबा खाऊन २ तासांनी १५० च्या आत असेल आणि एखाद्याची तेवढाच आंबा खाऊन ३००च्या वर जाईल. आणि ३०० साखर असलेल्या व्यक्तीमध्ये कदाचित १५० वाल्यापेक्षा जास्त इन्सुलिन तयार झाले असेल. आणि नेमका यासाठीच प्रत्येक रिसर्च पेपरमध्ये कंट्रोल ग्रुप असतो.
आणि म्हणूनच ऋजुता काय किंवा दीक्षित काय, ज्या लोकांना ते पर्सनली भेटू शकत नाहीत, त्यांना त्यांनी टीव्ही, फेसबुक व्हिडियो वगैरे वरून असे सल्ले देऊन गोंधळात पाडू नये. आणि ज्यांना टाईप २ आहे, त्यांनी असे व्हिडियो वगैरे फेस व्हॅल्यूवर एक्सेप्ट करण्यापेक्षा एक ग्लुकोमीटर घेऊन, प्रत्येक जेवणानंतर २ तासांनी स्वतःची साखर मोजावी. ती बिघडली असेल तर आहार बदलावा आणि ज्या आहाराने ती लाईनवर येईल तो आहार कायम घ्यावा.

हल्ली फास्टिंग उपयुक्त आहे हे मान्य करणारे कितीतरी डॉक्टर पुण्यात आहेत. तसेच धान्य कमी खावीत आणि लो कार्ब्स आहार असावा असे पेशंटना सांगणारे डॉक्टरसुद्धा आहेत. डॉक्टर लुटायला बसलेत वगैरे समज शेवटी तुमच्याच आरोग्याला हानिकारक आहेत.

सई, हे मी सगळं मी तुझ्याकडून आधी वाचलेलं आहे आणि ते पटण्याजोगं आहे. माझा त्याबद्दल काहीच आक्षेप नाही. Happy
पण मग ते सांगतात त्याप्रमाणे डायबेटीस वगैरे आजार नसलेल्यांनी दिवसातून २ वेळा लो कार्ब / हाय प्रोटीन (किंवा जो काही योग्य / संतुलीत आहार असतो तो) घेतला तरीही पद्धत पूर्णपणे निकालात काढण्याजोगी आहे की नाही हे तुझ्या लेटेस्ट पोस्टींमधून स्पष्ट होत नाहीये. त्यामुळे जेव्हा हा लेख आला तेव्हा तुझी "अरे, हे तर (आमचं) IF च की" अशी प्रतिक्रीया होती, पण दुष्परीणाम दाखवल्यावर "+१ हे वाईट आहे!" अशी प्रतिक्रिया दिसली. शिवाय डायबिटीस असलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला न घेता गोळ्या बिळ्या बंद केल्या तर ह्यात दिक्षित किंवा दिवेकरांचा काय दोष हे ही मला कळलं नाही. त्यांनी त्यांच्या फुकट असलेल्या व्याख्यानांमध्ये जेनेरीक स्टेटमेंट करणं टाळलं पाहिजे हे पूर्णपणे मान्य आहेच!

तर, मी वर लिहिल्याप्रमाणे डायबेटीस वगैरे आजार नसलेल्यांनी दिवसातून २ वेळा लो कार्ब / हाय प्रोटीन (किंवा जो काही योग्य / संतुलीत आहार असतो तो) घेतला तर ही पद्धत योग्य आहे का?

तर, मी वर लिहिल्याप्रमाणे डायबेटीस वगैरे आजार नसलेल्यांनी दिवसातून २ वेळा लो कार्ब / हाय प्रोटीन (किंवा जो काही योग्य / संतुलीत आहार असतो तो) घेतला तर ही पद्धत योग्य आहे का?
सई, खरंच आवडेल ऐकायला. तसंच या दोन वेळांसाठी योग्य व संतुलित आहार पण समजला तर बरं होईल

मला जे कळलं ते
१. १६-८ ची गॅप म्हणजे आय एफ हे वरकरणी बरोबर असलं तरी दोहोंचं बेसिक प्रिमायसेस वेगळं आहे.
वरचा सई यांचा प्रतिसाद आणि पान १ वरचा भागवतांचा पुढे दिलेला प्रतिसाद एकत्र वाचावा लागेल.

{कुठलंही यशस्वी डाएट (वेट वॉचर्स, ऍटकिन, केटोजेनीक) कर्बोदकांचे प्रमाण कमी करूनच यशस्वी झालेले असते. कारण कर्बोदकांना इन्सुलिनचा सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळतो. त्यामुळे जेवणात ब्रेड, पास्ता, पोळी, भात, साखर याचे प्रमाण जितके जास्त तितके जास्त इन्सुलिन बनते. आणि दिवसातून जितक्यावेळा यांचे सेवन केले जाईल तितक्या वेळा इन्सुलिनची मात्रा वर जाईल. यातच दर दोन तासाने थोडं थोडं खाण्याच्या पद्धतीचा पराभव लिहिला आहे. जेव्हा आपण कुठल्याही व्यावसायिक मदतीविना डाएट करतो तेव्हा नकळत हळू हळू प्रत्येक छोट्या जेवणात कर्बोदकांचे प्रमाण वाढू लागते. आणि ऋजुता दिवेकर प्रणालीने दिवसातून ७-८ वेळा खाल्लं तर जास्त कर्बोदके खाल्ली जातात. त्यात हाताशी मदतीला कोणी नसेल तर मोठ्या मोठ्या चुका होतात. परिणामी वजन कमी होत नाही."
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

याबाबत डॉ. जिचकारांनी प्रथम जो क्रांतिकारक विचार मांडला तो असा की, आपण जेव्हा काही खातो ते पचविण्यासाठी खालेल्या पदार्थाच्या प्रमाणात शरीरात पाचक द्रव तयार होतात. मात्र इन्शूलीन त्याला अपवाद आहे. पदार्थाचे प्रमाणात स्वादुपिंड इन्शुलीन तयार करत नाही. तर जेव्हा जेव्हा आपण खातो तेव्हा तेव्हा एका ठरावीक प्रमाणातच नेहमी इन्शूलीन तयार केले जाते. जितक्या वेळा खातो तितक्या वेळा इन्शूलीन तयार केले जाते."}

यात दोन भाग येतात.
१. दीक्षितांच्या म्हणण्यानुसार तोंडात अन्नाचा कण पडला ते पडला की इन्सुलिनचं एक ठरावीक माप पडतं. हे अन्नाच्या प्रकारावर अवलंबून नाही. सईंचं म्हणणं वर आहे.
२. दीक्षितांच्या म्हणण्यानुसार आहाराचं कम्पोझिशन आणि टोटल कॅलरी/कार्ब इन्टेक कमी न करताही तेच सगळं दोन जेवणांत विभागून खाल्लं तरी वजन कमी होणारच. सई यांचं म्हणणं कार्ब /कॅलरी इन्टेक कमी झाला नाही तर उपयोग नाही.
त्यांच्या एबीपी माझावरच्या मुलाखतीत वडापावच्या जेवणाचा उल्लेख होता. अर्थात त्यात पुढे त्यांनी असंही म्हटलेलं की पुढे त्या व्यक्तीलाच अधिक हेल्थफुल खाणं खावंसं वाटू लागेल.

<डायबेटीस वगैरे आजार नसलेल्यांनी दिवसातून २ वेळा लो कार्ब / हाय प्रोटीन (किंवा जो काही योग्य / संतुलीत आहार असतो तो) घेतला तर ही पद्धत योग्य आहे का?>
संतुलित/लो कार्ब/हाय प्रोटीन आहार ही दीक्षित पद्धतीची अट नाही; असंच मत त्यांची मुलाखत पाहून आणि या धाग्यावर त्यांच्या स्वघोषित प्रवक्त्यांकडून लिहिलेलं वाचून झालेलं आहे. पुन्हा त्यांच्या रिसर्चपेपरमधला लिमिटेशनचा भाग ज्याबद्दल मी आधी लिहिलंय - प्रयोगकर्त्यांचं वजन फक्त दोन वेळा जेवल्यानेच कमी झालेले असेल असे नाही, तर त्यांचा कॅलरी इन्टेकही कमी केलेला असू शकतो (एका वेळी अमुक इतकंच खाल्लं गेल्याने). म्हणजे त्यांच्या प्रयोगात कॅलरी/कार्ब इन्टेक हा क्न्ट्रोल व्हेरिएबल आहे. तो आधीइतकाच कायम ठेवायचा आहे.

याचाच व्यत्यास - कॅलरी /कार्ब इन्टेक कमी केलेला आहार दिवसातून पाचसहा वेळा विभागून घेतला तरी दीक्षितांच्या म्हणण्यानुसार वजन कमी होणार नाही. कारण प्रत्येक वेळी इन्सुलिनचं तेवढंच माप पडणार.

दुष्परिणाम दिसायच्या आधी माझ्या खूप प्रतिक्रिया आहेत जिथे काहीही खा हे चुकीचे आहे असे मी म्हंटले आहे.
आय एफ असले तरी काहीही खा हे चुकीचे असे मी सुरुवातीपासून म्हंटले आहे.

>>>म्हणून, पुन्हा एकदा, टाईप २ असेल तर फक्त ५५ मिनिटांच्या २ विंडो आहेत म्हणून काहीही खाता येत नाही. आपण त्या २ वेळांमध्ये काय खातो हेदेखील महत्वाचे आहे. २९ ऑगस्ट

>>>मला सुद्धा "डॉक्टर या डाएटला घाबरले", "डॉक्टरांना माहिती नव्हते", "डॉक्टर लागणार नाही" ही विधाने खटकतात.
डायबेटिसचा कुठलाही चांगला डॉक्टर कधीही "५५ मिनिटात वाट्टेल ते खा" असा सल्ला देणार नाही. जेव्हा तुम्हाला डॉक्टर शुगरसाठी मेटफोर्मीन देतात, तेव्हा ती पथ्याच्या खाण्याबरोबरच घ्यायची असते. मेटफोर्मीन घेऊन तुम्ही वाट्टेल ते आणि वाट्टेल तसं खाऊ लागलात तर तुम्हाला अजून औषध लागेल. (आणि हे ५५ मिनिटात खाल्ले तरीही लागेल) २३ ऑगस्ट

>>>टाईप २ साठी तुम्ही हे डाएट करत असलात, तर जेवणाच्या कन्टेन्टबद्दल जागृक असणे जास्त महत्वाचे आहे. कारण टाईप २ मध्ये शरीरातील पेशी इन्सुलिनला हवा तसा प्रतिसाद देत नाहीत. आणि फास्टिंगमुळे आणि कर्बोदके कमी केल्यामुळे, पेशींची प्रतिसाद द्यायची ताकद सुधारते. म्हणूनच असा आहार घेणाऱ्या बऱ्याच जणांचे मॅफॉर्मिनचे प्रमाण हळू हळू कमी होऊ लागते. २३ ऑगस्ट (https://www.maayboli.com/node/67243)

हे माझे आधीचे काही प्रतिसाद आहे. दुष्परिणाम वाली न्यूज मागच्या आठवड्यात सगळीकडे आली आहे.

>>>त्यांनी त्यांच्या फुकट असलेल्या व्याख्यानांमध्ये जेनेरीक स्टेटमेंट करणं टाळलं पाहिजे हे पूर्णपणे मान्य आहेच!

तेवढीच अपेक्षा आहे की मग! अजून काहीच नाही. ते ज्यांच्याकडून बारीक/निरोगी होण्यासाठी पैसे घेतात त्यांना त्यांनी काहीही करायला लावावे. फक्त जेनेरिक स्टेटमेंट्स करून सामान्य माणसांना गोंधळात टाकू नये.

ज्यांना टाईप २ नाही त्यांना अशा खाण्याचा (फास्टिंग नीट केल्यास) फायदा होतो यात कुठेच वाद नाही. पण तिथेही समजा तुमचे वजन "काहीही खाऊन" कमी झाले, तरी तुम्हाला सगळ्या डाएट्स सारखा वेटलॉस प्लॅटू येणारच कधी ना कधी. आणि डायबेटीस नसेल तर हे फॉलो करण्याचे धोकेही कमी असतात कारण औषधे नसतात. फास्टिंग केल्यानी वजन कमी होते यात काहीच वाद नाही.

आहार कसा असावा?

पोळी आणि भाताचे प्रमाण कमी असावे. व्हेजिटेरियन असाल तर सलाड, डाळ, भाजी, पनीर जास्त आणि पोळी, भात कमी. प्युअर साखर वर्ज्य. गोड पदार्थ आठवड्यातून एखाद्या वेळी. बिस्कीट, ब्रेड, बेकरी पदार्थ बंद. नॉनव्हेज असाल तर तुम्हाला पोळी, भात संपूर्ण बंद सुद्धा करता येऊ शकते. २ जेवणांपैकी एकात फक्त ऑम्लेट आणि भाज्या असे घेतल्यास एका जेवणातील कर्बोदके संपूर्णपणे बंद होतात.

असा आहार असेल तर निरोगी आणि टाईप २ दोघांनाही दीक्षित पद्धतीचा सारखाच उपयोग होईल.

आयएफ करून एचबीए१सी नॉन डायबेटिक रेंजमध्ये नुकत्याच एका मायबोलीकरांनी आणले आहे. त्यांना मी इथे लिहायला सांगीन.
आणि आहार कसा असावा याचे बस्केचे काही फोटो आहेत जे तिने इथे किंवा आणखीन कुठेतरी पोस्ट केले होते. तिच्या ताटलीचे फोटो हा आयडियल आहार आहे असे म्हणता येईल.

<ज्यांना टाईप २ नाही त्यांना अशा खाण्याचा (फास्टिंग नीट केल्यास) फायदा होतो यात कुठेच वाद नाही. पण तिथेही समजा तुमचे वजन "काहीही खाऊन" कमी झाले, तरी तुम्हाला सगळ्या डाएट्स सारखा वेटलॉस प्लॅटू येणारच कधी ना कधी.>

हो, हे त्यांनी त्यांच्या मुलाखतीत म्ह्टलं होतं. आणि मग त्या व्यक्तीला संतुलित आहार करावा लागेल, हेही.

म्हणजे या सगळ्या *अटी लागू , खाली सूक्ष्म अक्षरांत छापलेल्या असतात, तसं.

ज्यांना टाईप २ नाही त्यांना अशा खाण्याचा (फास्टिंग नीट केल्यास) फायदा होतो यात कुठेच वाद नाही. >>>>> हे एव्हड्या स्पष्ट शब्दांत लिहिल्याबद्दल धन्यवाद. आधी कुठे आलेलं असेल तर माझ्या वाचनात आलं नसेल.
गोळ्या बंद करून चकरा वगैरे येण्यात दिक्षित / दिवेकरांपेक्षा जास्त (किंवा निदान त्यांच्या एव्हडाच) दोष अंधळेपणाने स्वतः गोळ्या बंद करणार्‍यांचा होता हे ही तुला मान्य असेलच. Happy

पुढचा "पण" आणि मयेकरांनी लिहिलेलं << *अटी लागू , खाली सूक्ष्म अक्षरांत छापलेल्या असतात, तसं >> हे आहेच.

>>>गोळ्या बंद करून चकरा वगैरे येण्यात दिक्षित / दिवेकरांपेक्षा जास्त (किंवा निदान त्यांच्या एव्हडाच) दोष अंधळेपणाने स्वतः गोळ्या बंद करणार्‍यांचा होता हे ही तुला मान्य असेलच.

बिलकुल नाही.
दिवेकर आणि दीक्षित अधिकाराच्या पोझिशनमध्ये आहेत. त्यात दीक्षित तर डॉक्टर आहेत.
बाकीचे डॉक्टर आंबे खाऊ नका सांगतात त्यामध्ये मी वर म्हंटले तसे सगळ्या प्रकारचा कम्प्लायन्स गृहीत धरलेला असतो. पेशंट सगळ्या प्रकारचे असतात आणि ते आपल्या बोलण्याचा विपर्यास करणार हे गृहीत धरून मुद्दे मांडले पाहिजेत. कारण शेवटी लोकांची हानी होऊ नये हा पहिला गोल असलापाहिजे.
त्यामुळे याचा जास्त दोष दीक्षित दिवेकरांना आहे. त्यात पुढे डॉक्टर लुटतात वगैरे स्टेटमेंट्स आणखीन हानिकारक आहेत.

आंधळे किंवा डोळस कसेही असले तरी लोक आपल्याला फॉलो करतात या जाणिवेतून सल्ला आला पाहिजे.

Pages