फुकटात विनासायास वेटलॉस

Submitted by शाम भागवत on 3 July, 2018 - 03:17

वाढलेला पोटाचा घेर व वाढलेले वजन, सोबतीला कोलेस्टेरॉल सापडल्यामुळे नशिबी आलेल्या गोळ्या आणि आता या आयुष्यभर घ्यावयाच्या आहेत अस डॉ. नि सांगितल्यावर मनाला बसलेला हबका. काही जणांचा वाढलेला रक्तदाब व त्यावरच्या गोळ्या , मधुमेह पूर्व स्थिती लक्षात आल्यावर उडालेली घाबरगुंडी तर मधुमेह झाल्याचे निदान झाल्यावर घरातल्या सर्वांच्या चेहऱ्यावर अवतरलेली काळजी. आणि या सगळ्यातून हे खा व हे खाऊ नका ची भली मोठी यादी. शिवाय गुडगेदुखी, ऍसिडिटी , .. , .., .. असच बरच काही यांच्यासाठी हे लिहितोय.

ह्या सगळ्या त्रासातून कस मुक्त व्हायच?, एक पैसा जास्त खर्च न करता हे कस साधायच? श्रीमंत असो की गरीब दोघांनाही जमू शकेल,तसेच स्त्री पुरूषात अजिबात भेदभाव न करता दोघांनाही एकच पद्धत कशी वापरता येईल, तसेच त्यामागे विज्ञानाचा भक्कम पाठिंबा असला पाहिजे. वगैरे वगैरे .......
थोडक्यात आखूड शिंगी, बहुदुधी, गरीब, दूध काढताना लाथा न मारणाऱ्या बहुगुणी गायीबद्दल हे लिहितोय.

कै. डॉ.श्रीकांत जिचकार एक अवलिया माणूस. एमबीबीएस, एमडी झाल्यावर आयपीएस त्यानंतर चक्क आयएएस. पण चारच महिन्यात नोकरीचा राजीनामा देऊन आमदार, मग मंत्री, राज्यसभेचे खासदार. या माणसाने प्रगती तरी किती वेगाने करावी? पण हे सगळं ४९ वर्षांच्या आयुष्यात साधायच म्हणजे एवढा वेग हवाच की हो!

घरातल्या ग्रंथालयात बावन्न हजार पुस्तक. विद्वत्ता दाखविण्यासाठी जाहिरात म्हणून नक्कीच जमवलेली नसणार. उलट सगळी वाचलेली असण्याची शक्यता जास्त. कारण ४२ विद्यापीठातून मिळवलेल्या २० पदव्या. बहुतेक सगळ्या प्रथम श्रेणीतून मिळालेल्या. २८ सुवर्णपदक मिळवलेला माणूस हा. नक्कीच पुस्तके वाचलेली असणार.

तर असा हा माणूस. भरपूर परदेश वाऱ्या केलेला असूनही त्याची भारताशी जुळलेली नाळ तुटली नव्हती. साधारण अशी माणसे थोडीशी भारतीय संस्कृतीशी फटकून वागतात. पण इथेही आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. भारतीय संस्कृती व प्राचीन इतिहास, तत्त्वज्ञान व संस्कृत यात एमए केलेय. हे मी आपल वानगीदाखल सांगतोय कारण तस पाहिल तर त्यांनी १० विषयात एमए केलेय. इतकच काय मानाची डी. लिट. पदवी मिळालीय त्यांना संस्कृतामध्ये.

तर सांगायच म्हणजे अशा माणसाने १९९७ साली एक नवीन विचार भारताला दिला. त्यावेळी ते राज्यसभेचे सभासद होते. पुणे महानगर पालिकेत मा. शशिकांत सुतार नावाच एक मोठ्ठ प्रस्थ होत. त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरात जिचकारांना भाषणासाठी बोलावल. त्यासाठी सगळी व्यवस्था जातीने केली. आपोआपच बरेच मान्यवरांनी रंगमंदिर भरून गेल.

त्यांनी सांगितल की, "शरीरात तयार होणारे अतिरिक्त इन्शूलीन बऱ्याच रोगांचे कारण आहे." स्थूलता, त्यातून मधुमेह, वाढलेला रक्तदाब, त्यातून मग अंजोग्राफीची तपासणी, त्यात नक्की काहीतरी सापडतच. मग अंजोप्लास्टी. सगळाच प्रकार खर्चिक. पण मरणाची भीती वाटायला लागली की माणूस करतो खर्च. त्याला वाटतं की झाल सगळ करून. आता काही आपल्याला होणार नाही. पण कसच काय. पाच सहा वर्षात आणखी खर्चिक बायपाससाठी हॉस्पिटलची वारी ठरलेली.

मग यावर सोपा उपाय काय? दिवसातून फक्त दोनदाच जेवा. काहीही खा. भूक भागेपर्यंत कितीही खा. तूप लोणी बिनधास्त खा. मांसाहारही चालेल. फक्त हे जेवण ५५ मिनिटांत संपवले पाहिजे. आणि दिवसातून ४५ मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. महागड्या जिम नको की, आहारतज्ञांना पैसे द्यायला नको. दवाखान्याची पायरी चढायची कधी वेळही येणार नाही. किती सोपे आहे ना? पण अवघड बाब पुढे आहे. ते पुढे सांगतात की, "दोन जेवणामध्ये काहीही खाऊ नका." याकाळात तोंड उघडायचे ते फक्त बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी. बस्स. औषधांच्या याद्या विसरून जा. हे खा व हे खाऊ नका याची प्रत्येक डॉक्टर व आहारतज्ञांप्रमाणे बदलणारी यादी व त्यातून उडणारे गोंधळ संपवून टाका.

सगळ वैज्ञानिक नियमावर आधारलेले भाषण. समोर अनेक मान्यवर बसलेले. त्यामुळे बऱ्याच वेळेस अशी भाषणे इंग्रजीत चालतात आणि जिचकार तर इंग्लिश लिटरेचर मध्येपण एमए केलेले. पण तरीही हा विचार सर्वसामान्य माणसाला कळला पाहिजे यासाठी हे भाषण त्यांनी मराठीतून दिले आहे. समोर नुसते मान्यवर नाही तर पुण्याचे मान्यवर बसणार आहेत म्हणून त्यांनी अनेक इंग्रजी संज्ञांना पूरक मराठी संज्ञा शोधून काढल्या होत्या व त्या संज्ञा पाठ करून मगच ते व्याख्यान द्यायला आले होते. (या मराठीतील संज्ञा शोधणे व पाठ करणे हे कामही त्यांना सोपेच गेलेले असणार. कारण ते महाराष्ट्राच्या विश्वकोश निर्मिती मंडळाचे सभासद होते!!!) एखाद्या माणसाला बेंबीच्या देठापासून कळकळ असते म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर त्यासाठीही हे व्याख्यान ऐकायला हरकत नाही.

आपल्या या कार्याचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी "नागपूर फिटनेस मुव्हमेंट" आणि "पुणे फिटनेस मुव्हमेंट" अशा दोन संस्था सुरू केल्या. पण त्या काळात फेसबुक किंवा व्हॉटऍपस वगैरे काहीच नव्हत. नाहीतर याचा प्रसार फार वेगाने झाला असता. मनोगत, मायबोली किंवा मिसळपाव सारखा एखादा संकेतस्थळ तयार करता अल्लाही असत कदाचित. पण वाचणार कोण? इंटरनेट फार महाग होत त्यावेळेस. टाटा कंपनीच्या व्हीसएनएल ला वर्षाकाठी पाच सहा हजार भरल्यावर कनेक्शन मिळायच. शिवाय घरात फोन असला पाहिजे ही पूर्वअट. आणि नेट वापराला सुरवात झाली की दर मिनिटाला एक टेलीफोनचा कॉल एवढे पैसे टेलिफोनच्या बिलात यायचे तो खर्च वेगळाच. नेट वापरणे हे सामान्यांच्या कुवती बाहेरची गोष्ट होती. अपवाद फक्त आयटी मधल्या लोकांचा!

तरीपण राज्यसभेच्या सदस्याला बऱ्याच सोयी सुविधा असतात. ओळख पाळख असते. त्यामुळे प्रसाराचे काम चालू होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. दोनच वर्षांनी म्हणजे १९९९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी काँग्रेसकडून त्यांना तिकिट मिळाल पण फक्त ३०००+ मतांनी पडले. इतकेच नव्हे तर राज्यातले आणि त्याचबरोबर केंद्रातले काँग्रेसचे सरकार पडले. प्रसारावर फारच मर्यादा आल्या.सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे २००४ साली जेव्हा कॉग्रेसचे सरकार राज्यात व केंद्रात आले त्यानंतर दोनच आठवड्यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मला वाटते या नवीन विचारांचे फक्त बी लावायचे काम नियतीने त्यांच्यावर सोपवले होते.

त्यांचा या भाषणाचा एक ऑडिओ यूट्यूबवर होता. पण दोन तास तीन मिनिटांचा ऑडिओ म्हटल्यावर बरेच जण तो उघडून सुद्धा बघत नसत. आणि यदाकदाचित कोणी उघडलाच तर बरेच जण पहिले प्रास्ताविक संपेपर्यंतही कळ काढू शकत नसत. त्यामुळे मूळ भाषण सुरू होण्याआधीच तो बंद केला जायचा. एवढा वेळ असल काही ऐकायला तो थोडाच वपू किंवा पुल चा व्हिडिओ होता की व्यायाम/प्रवास करताना ऐकायचा गाण्याचा अल्बम होता? ही राजकारणी लोक ही अशीच. समोर माइक आला की यांना वेळेच भानच राहत नाही. अशी कॉमेंटपण कोणीतरी केली असेल असा मला दाट संशय आहे.

बरीच वर्षे निघून गेली. जिचकारांनी लावलेले बी रूजण्यासाठी अनुकूलतेची वाट पाहत युट्युबवर पडून होत. ही अनुकुलता लाभणे फार अवघड होत. त्याला वेळ लागणार हे त्या बियाणाला माहीत होत. आणि सहा वर्षापूर्वी ते एकाच्या हृदयात रूजल. हा माणूस एमबीबीएस, एमडी होता. पण रोग पाहून औषध देणारा नव्हता. तर रोग होऊच नये यासाठी काय करता येईल यातला तज्ञ होता. प्रामाणिक होता. पैशासाठी काम करणारा नव्हता. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची इच्छा असणारा असा होता. मुख्य म्हणजे माहिती वाचून चर्चा करणारा नव्हता तर त्यासाठी स्वतःवर प्रयोग करायला तयार असणारा व त्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करायला तयार असणारा होता. नियतीने अगदी अचूकरीत्या लातूरच्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची निवड केली होती.

डॉ. दीक्षित सध्या ते लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभाग प्रमुख आहेत व गेली सत्तावीस वर्षे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन करत आहेत. "स्थूलत्व निवारण आणि मधुमेह प्रतिबंध" या विषयावर त्यांनी संशोधन केले.यात त्यांनी प्रथम स्वतःवर प्रयोग केले. नातेवाइकांवर प्रयोग केले. जवळच्या मित्रांवर प्रयोग केले. या सगळ्याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या. मग मात्र त्यांनी लातूर व औरंगाबाद येथील हजारो लोकांवर प्रयोग केले. वैज्ञानिक नियतकालिकात प्रबंध लिहिण्यासाठी या प्रयोगाचे योग्य दस्तावेजीकरण केले व अनेक प्रबंध प्रकाशीतही केलेले आहेत.

पण प्रसारासाठी नुसते प्रबंध लिहून भागत नाही यासाठी त्यांनी व्याख्याने द्यायला सुरवात केली. पुण्याच्याच बालगंधर्व रंगमंदिरात कै. डॉ. श्रीकांत जिचकारांच्या स्मृतीला अभिवादन करून सुरवात झालेले त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी खाली लिंक देत आहे. हेही व्याख्यान खूप मोठे आहे. पहिले प्रास्ताविक ३० मिनिटे चालते. त्यामुळे व्याख्यानासाठी आतुर झालेले बरेच जण कंटाळून पहिल्या काही मिनिटांनंतर व्याख्यान बंद करून टाकतात. हे प्रास्ताविक पाहू नये म्हणून मी हे सांगत नाहीये. तर थोडा धीर धरावा असे सुचवत आहे. या प्रास्ताविकातूनही तुम्हाला काही मुद्दे मिळू शकतात.

२०० च्या वर व्हॉटऍपस ग्रुप स्थापन करून व फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ अठ्ठावीस हजार माणसांपर्यंत पोहोचली आहे. अनेक देशातील माणसे यात आहेत. पण हे सगळे सांभाळणे आता अवघड होत चाललेय. कार्यकर्त्या डॉक्टरांना यासाठी वेळ देणे अवघड होत चाललेय. यासाठी आता एक वेबसाईटच उघडायचे प्रयत्न चालू आहेत. तस झाल की एकाच ठिकाणी सगळी माहिती एकत्रित होईल. वेळ वाचेल. एक कोटी लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचायचे उद्दिष्ट समोर ठेवून आता काम सुरू होणार आहे.

खर म्हणजे ह्या व्याख्यानाचा सारांश देण्याचा माझा विचार होता. पण मी मुद्दामहून तस करत नाहीये. कारण तस केले तर लोक मूल व्याख्यान न ऐकताच चर्चा करायला सुरवात करतात. हे व्याख्यान ऐकल्यावर फारशा शंका उरत नाहीत. शिवाय त्यांनी काही फोन नंबरही दिलेले आहेत. त्यावर तुम्ही व्हॉटऍपवर प्रश्न किंवा शंका विचारू शकता.

डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाची लिंक खाली देत आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=edKaI5gxaNQ

ही डॉ. दीक्षित यांची फेसबुक पेजची लिंक आहे. त्यात लाभार्थींची नावे, अनुभव व मोबाईल नंबर दिले आहेत.हे तुम्ही केव्हाही पाहू शकता! https://www.facebook.com/weightlosseffortlessly/

डॉ. जिचकार यांनी याच व्याख्यानात बी पेरण्याचे काम केले. हा ऑडिओ आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=8-kw3hGUwW4

मी स्वतः या विषयातला तज्ञ नाही. पण या संकेतस्थळावर या विषयातले बरेच तज्ञ असल्याने साधक बाधक चर्चा होऊन हा विषय आणखी स्पष्ट होईल याहेतूने हे लेखन केले आहे.

एक महत्त्वाची सूचना :
ज्यांना मधुमेह आहे अशांनी HbA1c आणि fasting insuline या दोन तपासण्या करून त्याचे अहवाल डॉ. दीक्षित यांना पाठवावेत. या दोन तपासण्या म्हणजे रक्तातल्या शर्करेचे प्रमाण दाखवणाऱ्या तपासण्या नव्हेत. त्यानंतर त्यांच्याच सल्ल्यानेच पुढील आहारयोजना सुरू करावी. परस्पर आहारयोजना सुरु करू नये.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आमचा खड्डा,
एक गम्मत म्हणून तुम्ही तुमच्या प्रतिसादाचे शेवटचे वाक्य आणि पाठोपाठ पहिले वाक्य वाचून बघा ना, जमत असल्यासच तसदी घ्या... आग्रह नाही.

@बस्के,
मी व्हिडीओ पाहिले आहेत. आणि ते पाहून माझा या.लेखावर जास्त आक्षेप आहे.

व्हिडिओ मध्ये क्लिअरली असे सांगितले आहे की प्रथिने वाढवा, गोड टाळा, अंड्यातले पिवळे टाकू नका. कार्ब्स देखिल कमी खा असे सांगितले आहे.
त्याचे "काहीही खा" मध्ये रुपांतर कसे होते? निदान आपण काय ऐकले आहे त्याचे व्हरबँटिम रिप्रोडक्शन जमू नये का?
मी पाहिलेले काही दीक्षितवाले 55 मिनिटात आंबे, बुफे मधली सगळी स्वीट्स टाईप 2 असून खातात. जर हा लेख पुढे मायबोली बाहेर गेला तर व्हिडिओ बघायचा कंटाळा असलेल्या लोकांचा त्या वाक्याने गैरसमज होणार नाही का? तेव्हडी लेखकाची जबाबदारी नाही का?
तसेच इतर डाएट ने गालफड बसतात वगैरे क्लेम बरोबर आहेत का?
कित्येक लोक इतर मार्गाने वजन कमी करतात!

हाब, अरे मी वाचल्या आहेत तुझ्या प्रतिक्रिया. मी तुला सिरिअसली विचारत होते की तू पाहिले आहेस का व्हिडीओज. चिडून विचारत नव्हते. बर असो.

सई, तुझं म्हणणं पटतंय.. पण काहीही खाणार्‍या लोकांच्या चुकांचे थापर ह्या लेखावर कसे येते हे कळत नाहीये मला. म्हणाजे तसे कळतेय, पण इतकाऽ काळ तोच मुद्दा लावून धरण्याइतके आक्षेपार्ह काही वाटत नाही. जनरल लेख आहे. बाकीची काहीही खाणारी लोकं हे त्यांच्या विचारप्रक्रिया चुकीची (किंवा अजुन बरोबर जागी न आलेली) असल्याने किंवा सवयीने तसे खात असतील. पण ह्याचबरोबर मला एक मुद्दा पण लिहायचा आहे की, स्नॅकिंग बंद केल्याने व दोन जेवणाच्या मध्ये काही न खाल्ल्यास, जर जेवणात भरपेट जेवलात (अका: काहीही खाल्ले) तरी सुरवातीला वजन कमी होते. पण एका ठराविक पॉईंटपुढे कायमच जर तुम्ही नीट विचारपूर्वक प्रोटीन्स, कार्ब्स, फॅट इत्यादी बघून खाल्ले तर अर्थातच फरक पडणार. चांगला.

एनीवे.. मला वाटते माझे झाले लिहून जे लिहायचे होते. मला तुमचे पॉईंट्स पटतात पण हे कसे होतेय ना.. सुरवातीलाच एक्स्ट्रीम अ‍ॅप्रोच ठेऊन काम होत नाही. (म्हणजे दोन वेळाच खा, त्यात सॅलड घ्या, अंडी घ्या, प्रोटीनफॅट घ्या, कार्ब कमी करा अमुक तमुक.. ) ह्या सगळ्यांनी ओव्हव्हेल्म व्हायला होते. त्यापेक्षा दोन वेळाच जेवा. भुकेच्या वेळा शोधा. ५५ मिनिटाच्या आत खा. हे सोपे जाते फॉलो करायला. मग त्यापुढे जाऊन जेवणात चांगल्याच गोष्टी घ्या हे ठरवणे त्या त्या व्यक्तीकडून हळूहळू होतच जाणार. आणि एखाद दोन वेळेस नाहीच झाले तरी चालू शकते कारण बिगर पिक्चर मध्ये चांगले बदल होत असतात. असो. आपण डोळे बांधून हत्तीकडे बघतोय चार दिशांनी. तुम्हाला जे वाटतंय ते बहुधा मला कधीच वाटणार नाही. त्यामुळे आता बास करते.

अ‍ॅडमिन / वेमा - विषयाचे महत्व्व पाहता अनावश्यक प्रतिसाद काढून टाकले तर सुटसुटीत होईल धागा.>>
माझ्यासारखे बरेच जण दिक्षित बद्धतीवरची चालु असलेली चर्चा वाचायला येत आहेत इथे जेणेकरुन बाकीच्यांचे अनुभव, शंका आणि त्यावरची मते कळतील पण इथे मात्र काहिही चालु आहे. जर लेख वाचुन लोक फुकट आहे म्हणुन डॉक्टरला न विचारता हे सगळे करणार असतील तर तीच लेख वाचणारी लोकं त्या खालच्या या पध्दती बद्दलची चर्चाही वाचु शकतातच की.

~सई, तुझं म्हणणं पटतंय.. पण काहीही खाणार्‍या लोकांच्या चुकांचे थापर ह्या लेखावर कसे येते हे कळत नाहीये मला.

8th paragraph in this write up 2nd line.
मग यावर सोपा उपाय काय? दिवसातून फक्त दोनदाच जेवा. काहीही खा. भूक भागेपर्यंत कितीही खा.

सई, हाब,
तुमच्या भावना पटतायत.लेख लिहिण्या मागची प्रेरणा खरी असली तरी त्याचा पुढे 'विठ्ठलनाम जप करा येणारा हार्ट ऍटॅक टाळा' वाली धोकादायक फॉरवर्ड बनतील अशी तुमची भीती आहे.
पण सध्या ही भीती कोणत्याही प्रिंट मीडिया कंटेंट बद्दल आहे.व्हॉटसप वर येणारं म्हणजे ब्रह्मवाक्य या माईंडसेट वाले इव्हन वाचलेल्या योग्य फॉरवर्ड चा सुद्धा आपल्याला पाहिजे तोच अर्थ घेतात.'रामदेव बाबा कंपनीचं' म्हणून अप्पल ज्यूस पिणारी,बिन साखरेचा चहा घेऊन आमटी भाजीत सढळ हस्ते गूळ घालणारी डायबेटिक मंडळी पाहिली आहेत.
भागवत यांनी लेखात 5 वाक्य ऍड करून या पद्धतीच्या रिस्क/जनरीक स्टेटमेंट काढून परफेक्ट सेन्टेन्स टाकली तर हाब/सई/सिंबा यांचे रास्त आक्षेप अड्रेस होतील आणि मग इथले 'तुम्ही जाहिरात' 'मी जाहिरात नाही' इतकेच मुद्दे असलेले डायव्हर्जन प्रतिसाद काढून टाकता येतील असे काहीतरी वाटले.

आणि तू म्हणतेस तशी सुरूवातीला लिबर्टी घ्यायची असेल तर ते थेट दीक्षितांकडूनच यायला हवे. तसे त्यांनी सांगितले असते मग. पहिल्या फेज मधे काहिही दोनवेळा खा. मग प्रोटीन वाढवा. असे ते सांगत नाहीत कारण त्यांना तसे सांगण्यातील धोका कळतो.

सई तू दाखवलेले काहीही खा हे आक्षेपाचे वाक्य आणि इंटरमिटंट फास्टिंगवाल्या लोकांकडून येणारे २४ तास काही खाउ नका/ ५ दिवस खा-२ दिवस काही खाउ नका ह्यात मला काडिचाही फरक वाटत नाही. दोन्हीठिकाणी एंड युझरने तारतम्य वापरावे हे अलिखित आहे.

>>>>सई तू दाखवलेले काहीही खा हे आक्षेपाचे वाक्य आणि इंटरमिटंट फास्टिंगवाल्या लोकांकडून येणारे २४ तास काही खाउ नका/ ५ दिवस खा-२ दिवस काही खाउ नका ह्यात मला काडिचाही फरक वाटत नाही.
@बस्के

दीक्षित जेव्हा २ वेळा खा. दोन जेवणांच्या मध्ये खाऊ नका सांगतात त्याचा अर्थ काय होतो?
समजा १२ ते १ पहिले जेवण केले आणि ८-९ दुसरे केले.
२ जेवणांमध्ये ७ तासाचे फास्टिंग होते.

पुन्हा आदल्या दिवशीचे ९ ते दुसऱ्या दिवशीचे १२. यात किती तासाचे फास्टिंग होते? १५.

म्हणजे दीक्षित पद्धतीत २४ तासात १५ तासाचे आणि ८ तासाचे असे २ वेळा फास्टिंग आहे.
मग तुम्ही २४ तासांच्यामध्ये नक्की किती तास न खाता राहता? २२.

२२ तास तुम्ही काहीही न खाता राहता.
हे आय एफ नाही असे कसे म्हणायचे? कारण आयएफचे सगळे नियम इथे व्यवस्थित लागू आहेत.

आणि या २२ तासात लोक तारतम्य बाळगतात म्हणजे नक्की काय करतात?
२ वेळा काहीही खाऊन आणि मधेही फास्टिंगला घाबरून पुन्हा खातात का?
आणि असे असेल तर त्यांच्यासाठी ते चांगले आहे का?

तुम्ही जर न खाण्याचे नियम व्यवस्थित पाळत असाल तरच तुमच्या ५५ X २ विंडोला अर्थ आहे.
आणि जर तुम्ही दोन्हीकडे लिबरली तारतम्य बाळगून डॉक्टरला वेड्यात काढत असाल तर त्याची शिक्षा तुम्हालाच होणार आहे.

पण माझा सांगण्याचा मुद्दा हा नव्हता.
जो सोर्स घेऊन हा लेख लिहिला आहे त्या सोर्समध्ये जे म्हंटले नाहीये ते इथे "काहीही खा" असे लिहिणे चुकीचे आहे.
आणि मला दीक्षित विरुद्ध आयएफ असे कधीच वाटले नाहीये कारण दीक्षित इज १००% आयएफ. ज्यांना असे मानसिक भेद करायचे आहेत त्यांनी जरूर करावे. मी आयएफ प्रोमोट करत नाही. आणि मला असेही वाटत नाही की ते विनासायास आहे.
तसेच वजन कमी करण्याचा कुठलाही सोपा मार्ग आहे असेही मला वाटत नाही.

इनफॅक्ट या सगळ्या डाएट्समध्ये फक्त एकच गोष्ट कॉमन आहे: डिसिप्लिन.

सई अगं मला माहितीय आयएफ कसे वर्क होते. आपण “त्या लोकांबद्दल“ बोलतोय ना जे काहीही खा हे चुकीचे इम्प्लिमेंट करत आहेत. किंवा हाब म्हणतो तसे काय झाले तर? हीच सेम भिती तिथे पण आहे.

दीक्षितांच्या व्हिडियो बघून लोक काहीही खायला लागले तर ती नक्कीच त्यांची चूक आहे.
कारण तिथे ते क्लिअरली सांगत आहेत की साखर बंद करा. डायबेटिक नसाल तरी साखर खाऊ नका कारण आता मेडिकल प्रोफेशन मध्ये हे मानतात की साखर हे टॉक्सिन आहे.
ही त्यांची वाक्य आहेत.
एवढे ऐकून कुणी मनानी काहीही खायला सुरु केले तर त्यांची चूक आहे.
पण भागवतांचा लेख कुणी व्हाट्सअप फॉरवर्ड केला, आणि लोकांनी व्हिडियो बघायची तसदी घेतली नाही तर हे असे काहीही खा म्हणणे बरोबर आहे का? लेखी? तुम्ही ज्यांना एवढे आयडोलाइझ करता त्यांचे शब्द जसेच्या तसे उतरवायला काय हरकत आहे?

माझ्या लेखांमध्ये मी क्लिअरली टाईप २ असेल तर डॉक्टरना भेटा, ब्रेस्टफीडिंगमध्ये आयएफ करू नका अशा सूचना दिल्या आहेत. आणि मी स्वतः सुद्धा ते पाळते. माझ्या डॉक्टरला मी आयएफ वाली आहे हे माहिती आहे. आणि पुण्यात असे कित्येक अनुभवी डॉक्टर आहेत जे दीक्षित डाएट अगदी चांगल्या प्रकारे रेकमेंड करतात. तसेच आयएफसुद्धा करतात. कारण त्यात काहीच इललॉजिकल नाहीये. मग उगीच डॉक्टर चूक वगैरे मतं का मांडावीत?

मला इतक्या वेळ इथे माझे "स्वतः चे अनुभव" देऊन उगाच anecdotal उदाहरण तयार करायचे नव्हते पण आता ती वेळ आली आहे.

मी गेले कित्येक वर्षं वेगवेगळ्या पद्धतीने आयएफ करते आहे. मी तिन्ही त्रिकाळ खाल्ले तर मी प्रिडायबेटिक असते (म्हणजे माझी फास्टिंग शुगर १००च्या वर असते). पण मी २ वेळा जेवले अँड साधारण पाऊण तास रोज कार्डियो केले, तर माझा एचबीए १ नॉर्मल असतो. पण जर मी २ वेळेच्या जेवणात कार्ब्स जास्त खाल्ले. म्हणजे २ पोळ्या, भात, (गोड नाही) तरी माझी फास्टिंग साखर १००च्या वर जाते. याचा अर्थ काय होतो? की मला २ वेळा चौरस आहार झेपत नाही. माझ्या शरीराला ते सोसत नाही.
पण हे मला का कळतं? कारण मी फास्टिंग शुगर मोजते. एचबीए१ मोजते. किती टाईप २ वाले रोज फास्टिंग मोजतात? आणि त्यांनी जर काहीही खाल्ले तर त्यांची साखर (फास्टिंगसुद्धा आणि पीपी सुद्धा) वाढणार आहे. तुम्ही १ वेळा जेव्हा, २ वेळा जेव्हा किंवा ५ वेळा जेव्हा. तुम्हाला शेवटी पथ्याचेच जेवायचे आहे.

आणि हे लावून धरायचे कारण काय?
कारण रोज असे काही ना काही फॉरवड येत असतात.
वरती कुणीतरी म्हटलंय की माझ्या आईला दीक्षित जास्त पटले. का पटले? कारण ते २२ तास खाऊ नका असं सांगत नाहीयेत. ते दोन वेळा खा असं सांगतायत. यात फरक फक्त सेमँटिक आहे. पण त्यातही लोकांनी मनाचे "काहीही खा" घालू नये ही माझी कळकळ आहे.
डायबेटिक लोकांनी काहीही खावे, आंबे खावे, फणस खावा कारण ते भारतीय आहेत वगैरे सुडोसायंटिफिक क्लेम्ससुद्धा चालू असतात.
डायबेटिक लोकांनी तेच खावे ज्याने त्यांची फास्टिंग १२० च्या आत आणि पीपी १५०च्या आत येईल. मग तुम्ही तशी ती येईपर्यंत रोज आहार बदला आणि कशामुळे तशी येते ते आपले आपण शोधून काढा. तुम्ही असे अवेअर झालात तर तुमचे डॉक्टर तुम्हाला धन्यवाद देतील. कारण चांगल्या डॉक्टरांना आपला पेशंट बारा होत नाही यात काहीही आनंद वाटत नाही.

सई, प्रतिसाद एकदम पटला.
स्पेशली हे वाक्य. "डायबेटिक लोकांनी काहीही खावे, आंबे खावे, फणस खावा कारण ते भारतीय आहेत वगैरे सुडोसायंटिफिक क्लेम्ससुद्धा चालू असतात."

पण तरीही इथे जे भागवत बॅशिंग चालू आहे ते पटत नाहीये.आणि भागवतही मुद्दा प्रॉडक्टिव्हली पुढे सरकेल अश्या काही अ‍ॅक्शन्स घेत नाहीयेत. (प्रश्नांना उत्तर देणे/मूळ लेखाचा कंटेंट बदलणे/'ही जाहीरात म्हणून इंटेंडेड नव्हती, माझ्या लिहीण्यातून तसे वाटले असेल तर हामालेदो' वगैरे वगैरे.)

एकंदर रिझल्ट मुद्दे पुढे न सरकणे, मूळ माहिती कंटेंट्/थोडक्यात शंका हा फॉर्मॅट बदलून 'ही जाहीरात आहे पुरावा१: ब्ला, ही जाहीरात आहे पुरावा २: ब्ला', 'मूळ व्हिडिओ बघा: ब्ला,मूळ व्हिडिओ बघा: ब्ला ब्ला' असा रिकर्सिव्ह व्हाईल लूप मध्ये गेलाय.

हायला.. इथे भागवतांची बाजू घेणार्‍यांना काय वाटतंय की आम्ही व्हिडिओ न बघताच टिका करतोय? अरं हुड. सगळं कोळुन पिऊन करुन सवरुन बसलोय. शेवटी हे सांगावं लागतं ही वेळ आली हे दुर्दैव.

असो बाप्पा! हम्कु क्या.. ! Happy

१. भागवतांनी आपण तज्ज्ञ नसल्याने काहीही (म्हणजे वाटेल ते नव्हे, तर तांत्रिक/शास्त्रीय इ.काहीच) लिहिणार नाही, हे स्पष्ट केले असतानाही त्यांना तसं लिहायला भरीस घातलं याबद्दल : मला आठवतंय त्यानुसार या धाग्यावर त्यांनी आलेल्या आक्षेपांना फक्त Happy एवढंच उत्तर दिलं होतं आणि त्यांचा तो बाणा लोकांना आवडलाही होता. तांत्रिक/शास्त्रीय मुद्दे त्यांनी प्रथम सईंच्या धाग्यावर लिहिलेत; तेही स्वतःहून. इथे लिहिलेत, तेही त्यांच्या समर्थनार्थ आलेल्या किंवा तसे भासणार्‍या प्रतिसादांना उत्तर म्हणून.

२.साधक बाधक चर्चा : जर आपण तज्ज्ञ नाही (म्हणून लिहिणार नाही, हा स्टँड असेल) तर साधकबाधक चर्चेतून समजून घ्यायला हवं होतं (जसं ईबांनी म्हटलंच आहे), पण त्यातले स्वतःच्या सोयीचे प्रतिसाद तेवढे त्यांनी अ‍ॅक्नॉलेज केलेत. आपण मांडलेल्या किंवा दीक्षितांच्या म्हणण्यातली एखादी गोष्ट चूक आहे, असं दाखवून देणार्‍या प्रतिसादांची दखल कशी घेतलीय, तेही पाहण्याजोगं आहे.
चटकन आठवलेली दोन उदाहरणं : अ) इन्सुलिन स्रवण्याबद्दल (हे सईंच्या धाग्यावर आहे. इथेही हेलांनी स्क्रीनशॉट टाकलाय.) यातलं गांभीर्य किती जणांच्या लक्षात आलंय? या पद्धतीचा मूळ पाया तोच नाही का?
अ१.) इन्सुलिन हे लठ्ठपणाचं कारण... (नेमके शब्द आणि संज्ञा आता शोधत नाही. पण तिथेही स्पष्टीकरणात आपलं आधीचं म्हणणं चूक होतं, हे कबूल करता आलं असतं. )
आ) वैद्यकक्षेत्र आणि संशोधनाबद्दल फारेंण्ड यांच्या प्रतिसादासंबंधी सई यांनी आणखी काही मुद्दे मांडले. ते अदखलपात्र ठरले. फारेण्ड यांना उत्तर - प्रिव्हेण्टिव्ह केअरला कोणी वाली नाही आणि डॉ दीक्षित यांच्या भाषणातला स्वतःसंबंधीचा भाग .
आपण साधक बाधक चर्चेबद्दल बोलतोय.

३. फुकट आणि विनासायास बद्दल आधी लिहिलं होतं. त्याचा स्वातींनी पटेल असा अर्थ लिहिलाय. पण भागवतांनी त्याचा व्यत्यासही केलाय. दीक्षित पद्धत फुकट आणि विनासायास म्हणून चांगली, इतकं म्हणून ते थांबू शकले असते. पण वजन कमी करायची चांगली पद्धत कोणती? तर जीत पैसे मोजावे लागत नाही, तज्ज्ञाकडे जावे लागत नाही. असे म्हणून अशा पद्धती वाईट असे लेबलही त्यांनी लावले. (मला बाबा रामदेव्/पतंजलीच्या जाहिराती आठवल्या. पण त्यांचेही भक्त आहेतच.) अशीच अन्य डाएट मेथड्सना , डॉक्टरांना लावलेली लेबलं.

४. असे व्हिडियो पाहून स्वतःवर प्रयोग करण्यातल्या धोक्यांबद्दल : अमक्याला प्रॉब्लेम झाला म्हटल्यावर, त्यांनी संपूर्ण व्हिडियो पाहिला होता का? असा प्रश्न तोंडावर मारला जातो. संपूर्ण भाषण पाहिले, तर तुम्हाला काहीही नुकसान होणार नाही असा अर्थ निघतो.
अ) आता संपूर्ण भाषण अनेक वेळा पाहून, पुस्तकवाचून लिहिलेल्या लेखात : मग यावर सोपा उपाय काय? दिवसातून फक्त दोनदाच जेवा. काहीही खा. भूक भागेपर्यंत कितीही खा. तूप लोणी बिनधास्त खा. मांसाहारही चालेल. फक्त हे जेवण ५५ मिनिटांत संपवले पाहिजे. आणि दिवसातून ४५ मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. हे वाक्य आलेलं आहे. यातून कोणता अनर्थ निघू शकतो, ते वेगळं सांगायला हवं का? भूक भागल्याचं मेंदूला कळण्याबाबतही लिहिलं गेलं आहेच.
हेला यांनी त्यांचं मिसळपाववरचं एक विधान उद्धृत केलं आहे. त्यावर त्यांना स्पष्टीकरणही द्यावं लागलंय - "कितीही खा हे शब्द मिताहार या शब्दासाठी वापरले होते.
पण ते लक्षात न घेतल्यास कितीही खा याने वेगळाच संदेश जातो आहे हे लक्षात आले नाही. त्यामुळे ती शब्द योजना चुकीचीच म्हटली पाहिजे
डॉ. दिक्षितांच्या म्हणण्या प्रमाणे भूक भागे पर्यंत खा. अर्धा भाग अन्न, पाव भाग पाणी व पाव भाग हवा असाही उल्लेख त्यांनी केलेला आहे.
असो."
भाषण ऐकून अनुसरणार्‍याला या सगळ्या खाचाखोचा कळतीलच याची शाश्वती काय? शेवटी आपल्याला रुचेल, पचेल तेच करण्याकडे बहुतेकांचा कल असतो.

आ) लेखाच्या शेवटची सूचना -" ज्यांना मधुमेह आहे अशांनी HbA1c आणि fasting insuline या दोन तपासण्या करून त्याचे अहवाल डॉ. दीक्षित यांना पाठवावेत. या दोन तपासण्या म्हणजे रक्तातल्या शर्करेचे प्रमाण दाखवणाऱ्या तपासण्या नव्हेत. त्यानंतर त्यांच्याच सल्ल्यानेच पुढील आहारयोजना सुरू करावी. परस्पर आहारयोजना सुरु करू नये."
आणि पहिल्याच पानावर भागवतांच्या प्रतिसादातलं एक वाक्य : बर्‍याच जणांना मधुमेह झाल्यावरच लक्षात येते. तुमच्या त्या परिचितांनी दिक्षितांची पध्दत चालू करण्यापूर्वी मधुमेह नसल्याची खात्री करून घेतली होती का?
आतातरी धोके कळताहेत?

५) हायझेनबर्ग यांनी अगदी सुरुवातीला लिहिलेला आणि सिंबाच्या कथनातून अधोरेखित झालेला एक मुद्दा पुन्हा लिहितोय. मी त्याबद्दल आधीही लिहिलंय. आरोग्य आणि त्यासाठीचा आहार यांबद्दलची चर्चा भावनिक आवाहनाच्या मार्गाने जावी हे उचित आहे का? सामान्य भोळीभाबडी जनता फसतेच. पण अशा चर्चेतूनही काहींचे तेच ग्रह पक्के होतात, हे धोकादायक आहे. ही पद्धत अशी अशी आहे; हा तिचा शास्स्त्रीय पाया; ही कारणमीमांसा असं सांगून निवड करणं खरंच कठीण आहे का? सई यांचा आय एफ बद्दलचा आणि केदार जाधव यांचा आणखी एक धागा वाचून प्रेरणा घेतलेल्या लोकांची संख्या लक्षणीय आहे, हे एक समाधान.

हा प्रतिसाद लिहायला सुरुवात करताना आणखीही मुद्दे डोक्यात होते. पण या विषयावर लिहायला आता मी आणखी वेळ देणार नाही. वाचनमात्र असेन.

डॉ दिक्षित मायबोलीवर सदस्यत्व घेऊन याबाबत लिहू शकतील का?
दिक्षीत यांचे ब्रिफ लेखन्/त्यावर वाचकांच्या मोजक्या मुद्द्यात शंका/दिक्षीत यांचे शंका समाधान असा काहीतरी धागा काढता येईल.

mi_anu..
आक्षेप भागवतांच्या भक्तभजनाबद्दल आहे. त्यात देवाचा धावा करुन त्याला कशाला संकटात पाडताय... उद्या इथे येऊन तेहि म्हणतील की "भागवतांनी इथे काय साण्गितले त्याच्याशी माझा काही संबंध नाही. तुमच्या प्रश्नांसाठी माझे विडिओ बघा आणि पुस्तके वाचा, नाहीतर व्याख्यानाला या. संपला विषय."

आक्षेप भक्तांबद्दल असेल. नक्कीच.पण तो आक्षेप प्रूव्ह करण्याच्या लांब लांब प्रतिसादामध्ये धाग्याचा मूळ कंटेक्स्ट बराच लांब जातोय. (अर्थात धागा हळूहळू ऑफ द ट्रॅक जाणे ही मायबोली परंपरा आहेच.) दोन्ही पार्टी मागे हटत नाहीत.जाहीरात सिद्धता प्रतिसाद येत राहतात आणि (व्हिडीओ पाहिला असेल तरी)'व्हिडीओ बघा..आधी व्हिडीओ बघा' वाले पण.
कुठेतरी हा लांबलचक डिबेट ऑफलाईन नेता येईल का?
कुठेतरी भागवतांना मूळ धागा बदलून त्यात थोडा साऊंडपणा आणता येईल का?

(जाऊदे..चालूद्यात.)

सई केसकर
अतिशय सुंदर विवेचन. तुझा दुस-या पानावरचा प्रतिसाद मला इतके दिवस फोनवर दिसत नव्हता. लॅपटॉपवर मात्र दिसला. खरे म्हणजे तुझ्या त्या प्रतिसादानंतर रणकंदन व्हायला नको होते.

याच धाग्यावर उष्मांकाबद्दल लिहीले होते. ते आता आठवले. डॉ. अभय बंग यांच्या "माझा साक्षात्कारी हृदयरोग " या पुस्तकात तक्ते दिलेले आहेत. ते सुद्धा उपयोगी आहे.
मी दीक्षितांच्या पद्धतीने जाणार आहे. पण आहारात काही पथ्ये पाळणार आहे.

निदान माझ्यातर्फे तरी हा विषय सई यांनी धागा काढल्याक्षणीच संपला होता. परंतु तरीही साराभाईमधल्या मधुफुफाप्रमाणे प्रमाणे भागवतांचे वर्तन व भक्तभजन सुरुच राहिल्याचे, फक्त पॉइंट आउट करतोय.

मला खालील जोक whatsapp वर fwd आलाय. जोक आहे, आपापल्या जबाबदारी वर वाचा. कोणतीही pre-exhisting medical condition असेल तर वाचू नका.

काल एक पोस्ट वाचनात आली.

त्या पोस्टबद्दल थोडक्यात सांगायचं तर लेखिकेच्या मते सध्या आपला समाज दोन गटात विभागला गेला आहे;

पहिला गट आहे डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे "दिवसातून फक्त दोन वेळाच ते देखील पंचावन्न मिनिटात (त्या पोस्टमध्ये चाळीस मिनिटात म्हंटले होते) मनसोक्त जेवण करणे" हे डाएट फॉलो करणारा आणि दुसरा गट आहे ऋजुता दिवेकर यांचे "दर दोन तासांनी थोडे थोडे खात रहावे" हे डाएट फॉलो करणारा!

तर दीक्षित आणि दिवेकर या दोन मराठी माणसांमुळेच मराठी समाजात पडलेली उभी फूट पाहून आमच्या मध्यममार्गी मराठी मनाला मनस्वी (हा शब्द वापरणे अलीकडे बंधनकारक झाले आहे) क्लेश आणि वेदना आणि दुःख आणि पीडा जाहली आहे ....

तर यावर उपाय म्हणून आमच्या मध्यमवर्गीय, मध्यममार्गी मराठी बाण्याला अनुसरून दीक्षित आणि दिवेकर यांच्या डाएटची मोट बांधत सादर करत आहोत "समन्वयवादी डाएट":-

"दर दोन तासांनी पंचावन्न मिनिटे मनसोक्त खाऊन घ्यावे!"

चला, आता पंचावन्न मिनिटांनी भेटू!

 ऋजुता दिवेकर --बद्दल चर्चा समोपचारांनी आधीच झाली आहे. कदाचित इलेक्शन इयर आणि भाजपा सरकार जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी तेव्हा नसेल त्यामुळे घमासान झालं नसावं.

आताच माझ्या हातात विनासायास वेटलॉस हे पुस्तक आले. ते वरवर चाळले. भरपूर उपयुक्त माहिती आहे. व्याख्यानात दीक्षित हे पुस्तक घ्या असे सुचवतात. मात्र या पुस्तकाशिवाय हा उपक्रम चालू करू नये असे त्यांनी स्पष्टपणे सांगायला हवे.
ज्यांना हा प्लान फॉलो करायचा आहे त्यांनी निव्वळ व्याखानावर अवलंबून राहू नये.

ठिक आहे. मग एक कोटी पुस्तकविक्रिचा संकल्प सोडूयात... हाय काय नाय काय.

का हो इतके कुजकट प्रतिसाद देताय ?
तुम्हाला मी डॉ. जगन्नाथ दीक्षित आहे असे वाटतेय का ? मला जर कमिशन मिळाले तर तुम्हाला नक्कीच पाठवून देईन.

का हो इतके कुजकट प्रतिसाद देताय ?
- मी? अजिबात नाही. पुस्तक विक्री झाल्यास जास्त चांगली व अचूक जनजागृती होईल. नि:शुल्क जनजागृतीचा संकल्प असल्याने हे पुस्तक छापून विकलं का जात आहे हा मला प्रश्न पडला होता. तसेच ह्या पुस्तकाची पंधरावी आवृत्ती सगळ्या पानांसकट ऑनलाइन फ्री डाउनलोडेबल पिडीएफस्वरुपात मिळेल का याची मी भागवतांकडे विचारणा करणार होतो, पण ते परत विकट हास्य करुन आम्हा पामरांना भस्मसात करुन टाकणारे सुप्रसिद्ध स्माईली टाकतील ह्या भीतीने विचारण्याची हिंमत झाली नाही.

तुम्हाला मी डॉ. जगन्नाथ दीक्षित आहे असे वाटतेय का ?
-मोहतरमा.. आप कौन? मान न मान मै तेरा मेहमान?

मला जर कमिशन मिळाले तर तुम्हाला नक्कीच पाठवून देईन.
-प्रेतांच्या टाळूवरचे लोणी खायची आमच्यावर संस्कार नाहीत. तुमचे तुम्हालाच लखलाभ असो. धन्यवाद.

Pages