तुंबाड - धारप व तत्सम गूढ जगाचे रूपेरी पदार्पण (आता स्पॉयलर्स सहीत चर्चा)

Submitted by किरणुद्दीन on 12 October, 2018 - 16:19

1063423_6880936_48.jpg

दोन बहुचर्चित सिनेमे समोर असताना कुठला निवडावा हे अवघड काम होतं. बायकोचा कल अंदाधून कडे होता. मात्र तुंबाड नेफ्लिवर पाहून होणार नाही याची खात्री होती. सुदैवाने अंधाधूनचा लास्ट शो सुरू होऊन अर्धा तास झालेला होता आणि आता फक्त तुंबाड शिल्लक होता...

मी सिनेक्षेत्राशी निगडीत नाही. संबंध असेल तर प्रेक्षक म्हणून. तो ही जाणता नव्हे. पण हा सिनेमा पाहून इतरांना सांगावेसे वाटावे हे या सिनेमाचे यश आहे असे वाटते. गेल्या अनेक वर्षात असे वाटलेले नाही. अगदी सैराटच्या वेळीही नाही. इथे मी कुठलेही सस्पेन्स लीक करत नाही अथवा कथेबद्दलही बोलणार नाही. ती प्रत्येकाने सिनेमाहॉल मधेच एंजॉय करावी.

कारण हा सिनेमा एक ब्रिलियंट सिनेमा आहे. पाहताना जर काही जाणवत असेल तर मेहनत आणि फक्त मेहनत. (दिग्दर्शकाने घेतलेली मेहनत याहीपेक्षा प्रचंड आहे, तो इथे आपला विषय नाही). पहिल्या फ्रेमपासून सिनेमा आपले वेगळेपण ठसवत राहतो. कोकणातले हे गाव आपल्यासमोर पावसाच्या रूपाने जिवंत होते. पण त्याचा फक्त गूढ वातावरणनिर्मितीपुरताच वापर करून घेतला आहे. वायफळ फ्रेम्सला इथे जागा नाही. सिनेमा पहिल्या फ्रेमपासून वेगळ्या धाटणीची गोष्ट सांगायला लागतो.

ही शैली थोडीशी धारपांशी जुळणारी. श्रेयनामावलीत त्यांचे नाव कुठेच नाही. मात्र दिग्दर्शकाने त्यांच्या कथांचा प्रभाव असल्याचे मान्य केले आहे. धारपांच्या कथा वाचताना पहिल्यापासून जाणवलेली गोष्ट म्हणजे याचे व्हिजुअल्स अत्यंत अवघड आहे. प्रत्येकाच्या डोक्यात जे चित्र तयार होते त्याला न्याय देणारे चित्रण अत्यंत अवघड किंबहुना अशक्य आहे असे वाटायचे. मात्र या सिनेमात धारपांची कादंबरी समोर उलगडतेय असे वाटणे हे सर्वात मोठे यश आहे.

दुसरे म्हणजे ही पीरीयड फिल्म आहे. त्या दृष्टीनेही घेतलेली मेहनत दाद देण्यासारखी आहे. नायक लहान असतानाच्या काळ हा स्वातंत्र्यापूर्वी साधारण ३० वर्षांपूर्वीचा आहे. त्या वेळची वाहने, गैरसोयी आणि त्या काळच्या पुण्याचे दर्शन हे सर्व दाद घेऊन जातात. जुनी भांडी, फिरकीचा तांब्या, जुन्या पद्धतीचे घट्ट झाकणांचे डबे, पत्र्याची ट्रंक हे बारीकसारीक तपशील लक्ष वेधून घेतात. सुरूवातीला नायक आजीसाठी ज्या ताटलीत जेवण वाढतो ती नीट पाहिली नाही. बहुधा ती चुकीची घेतली असे नंतर वाटले. खात्री नाही. पुणे दाखवताना पुणेरी पाट्या दाखवण्याचा मोह दिग्दर्शकाला आवरलेला नाही. अगदी सनातन पाट्या असाव्यात या.

कोकणातला पाऊस सतत सोबत करतो. तो वातावरण निर्मिती करतोच. मात्र कॅमेरा प्रकाश आणि छायांचा खेळ टिपत व्हिज्युअल अत्यंत प्रभावी करतो. एका दृश्यात सावकार भुयाराचे दार उघडून खाली पाहतो तेव्हां खालून येणारा उजेड आणि तिथे नेणा-या बोळकांडातला भेसूर अंधार हे दृश्य अक्षरशः मेंदूत कोरलं जातं.

भुयारातून खाली रंवरंव नरक उभा केला आहे. धारपांच्या अनेक कथांत जसा डोळ्यासमोर यावा तसाच. कदाचित बर्वेंना जसा दिसला तसा त्यांनी उभा केल्याने तो इतरांनाही अपील झालेला दिसतो.

सिनेमा कसा आहे ?
खरं म्हणजे कसा आहे हे सांगता येत नाही. सांगूही नये. हा नेहमीचा हॉरर सिनेमा नाही. गूढ कथा आहे. प्रासंगिक विनोदाच्या जागा आहेत. वडलांच्या अंगवस्त्राला लाच देऊन तुझ्याशी लग्न करीन म्हणणारं पोरगं अफलातून. बाप पोराला मोठा झालास की लग्न लावून देईन म्हणतो तेव्हां पोरगं तोपर्यंत काय असा प्रश्न विचारतं.. इथे अक्षरशः फुटायची पाळी आली होती. हा सीन सुचला कसा याचंच नवल जास्त होतं.

दचकवणारे सीन्स नाहीत. फूटेज खाणारे स्वप्नातले शॉट्स नाहीत. नेहमीच्या युक्त्या नाहीत. घाबरा, घाऊक घाबरा असला मामला नाही. प्राचीन किंवा त्याही आधीची अस्तित्त्वं, त्यांच्या सुप्त इच्छा आकांक्षा आणि मानवी स्वभावाचे खेळ यांची सांगड घालून पाहीले तर हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा आहे हे मान्य करावे लागेल. महेश भट किंवा त्यांचे पूर्वज रामसे यांच्या सिनेमांच्या कल्पना डोक्यात असतील तर सिनेमा आवडण्याची शक्यता नाही.

माणसाच्या मनातले भय, लालसा अशा नकारात्मक भावनांची एकमेकांवर कशी मात होते. शाप वगैरे गोष्टी मान्य करून पुढे पाहिलं तर अशा मार्गाने मिळालेलं धन आणि त्यामुळे जीवनात प्रवेश करणा-या काही टाळता येण्यासारख्या गोष्टी. हाती काहीच लागणार नाही अशा मार्गावरचा हा प्रवास यावर एक शब्द न बोलता सिनेमा बोलतो. गानूआजीसारखी एक आजी आहे (हा स्पॉयलर नव्हे). ती बघवत नाही. धारपांच्या वर्णनांप्रमाणे गिळगिळीत, चिकट असे काही बीभत्स रूप आहे तिचे. अशा दृश्यातून भीती दाटून राहते.

या आजीचा संदर्भ पुढे लागतो म्हणून लक्ष द्यायचे.

स्पॉयलर अ‍ॅलर्ट
पिशवीतला खामरा नावाची कथा वाचली असेल तर ती आठवल्याशिवाय राहणार नाही. खामरा वगैरे टिपीकल धारपांची नावे. हा खामरा जीवनात आल्यापासून नायकाला वेगवेगळ्या बायकांची भूक जाणवत असते. ती तो रोज भागवत असतो. अशा रात्री जस जशा जातील तस तसा हा खामरा मोठा आणि शक्तिशाली होत असतो. अशा कथा ज्या वळणाने जातात त्याच वळणाने ही कथाही वाटचाल करते.

राही अनिल बर्वे यांनी पाहीलेल्या या भयानक स्वप्नासाठी त्यांना सलाम !
(सिनेमाची गोष्ट तर सांगितलीच नाही. गोष्टीत जीवच कितीसा ? ऐसा नही चलता क्या ? इनबॉक्स मे आ जाओ फिर )

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याच्या बाबानी एव्हढ्या कष्टाने मिळवलेल्या सोन्याच्या मोहरा त्याने सोबत न्यायला हव्या होत्या असं मला वाटतंय .

आज मायबोली मैत्रिणीबरोबर तुंबाड पुन्हा पाहिला.(आणि तिने मुद्दाम स्पॉईलर वाला धागा वाचला नसल्याने तिला माझी रनिंग कमेंटरी मध्ये मध्ये सहन करावी लागली.
दुसऱ्यादा पाहिल्यावर मला जास्त कळला.एक म्हणजे पहिल्यांदा मी घाबरायच्या कल्पनेने डोळे मिटून घेतल्याने बरेच डिटेल मिस केले होते.ते आता नीट पाहिले.काही विचार:
1. हस्तर चा लंगोट (यावर तो नाणी वाला पंचा शेल्यासारखा बांधलेला आहे.) हायडिझाईन च्या मसाई कलेक्शन च्या रेड लेदर शेड सारखा आहे.(हस्तर ला प्रचंड गरम होत असेल.फ्रेंड्स मधली रॉस ची लेदर पॅन्ट आठवली.)
2. सावकार मित्राला हूल देऊन खाली पाठवले.त्याने डबा उघडला आणि पिठाचे वर्तुळ नसल्याने हस्तर ने डायरेक्ट हल्ला केला.आता परत खाली येताना विनायक ची खात्री कशी असेल की सावकाराला आणि हातात बाहुली पाहून बाहेर आलेला हस्तर परत आत गेलाय.(तो बाहेरच थांबला असेल तर विनायक ला पिठाचं वर्तुळ आखायला अवधी मिळणारच नाही.)की हस्तर बाहुली खाऊन काही ठराविक वेळाने परत आत जातो?तसं असेल तर शेवटी बाप लेक सर्व हस्तर च्या बाहुल्या खाऊन ते आत जाईपर्यंत घोरत पडले असते ना वर्तुळात.
3. मुलगा बापाला न सांगता शर्ट मध्ये लपवून बाहुली घेऊन आलेला असतो तेव्हा वर्तुळ आखण्यापूर्वी हस्तर का येत नाही?हस्तर बाहुलीच्या वासाने येतो का बाहुली बघून?
4. हस्तर ला मेमरी नाही का? तसं असतं तर पहिल्यांदा त्याला खाण्यात गुंतवून नाणी चोरली कळल्यावर दुसऱ्यादा त्याने नाणी हातात घेऊन दुसऱ्या हाताने बाहुली खाल्ली असती.
5. एकंदर नाणी वेचणं हा रिस्क वाला काळ, कारण वर्तुळाच्या बाहेर येऊन वेचावी लागतात.आंबे पाडायला काठी असते ना, वर ब्लेड आणि जाळीची पिशवी, तशी काठी वापरून वर्तुळात उभं राहून काठीने पंचातली नाणी जाळीच्या पिशवीत पाडता येतील का?
6.हस्तर च्या मुकुटावर हॉल्स च्या किंवा हाजमोला कैरी च्या गोळ्या लावल्या आहेत हिऱ्या ऐवजी असं मी सोडून आणि कोणाला वाटतंय का?
7. मुलगा हस्तर चे सिम्युलेटेड ढु बनवून नाणी वेचायचा सराव करत असतो.हे घरात सर्वांसमोरच.विनायक च्या अंगवस्त्राला नाणी घ्यायचं सर्व टेक्निक माहीत असतं का?
8. मी मैत्रिणीला म्हटले की पांडुरंग च्या मुलाने परत यायचे ठरवले तर तो असं दोरीने खाली उतरण्याऐवजी लिफ्ट बनवेल.लिफ्ट मध्ये पिठाचा जाड थर वगैरे असे काही करता येईल.(आपणही मोह आणि लालसेतून सुटलो नाही.विनायक ने परत त्या जागी कधीही जाऊ नये, पैसे कमावण्याचे इतर धंदे करावे असं न वाटता आपण त्याला सोपेपणी हस्तर चा पोपट कसा करता येईल याची टेक्निक पाहतो.)
8. विनायक चा मुलगा हाच विनायक ची सुरुवातीची आजी आहे असं वाचलं.मग ती 2 मुलं(लहानपणी चा विनायक आणि त्याचा भाऊ) खरी पात्रं कोण आहेत?imdb वर त्यांचे क्रेडिट नाही बहुतेक.
9. हस्तर वर पीठ ओतले तर हस्तर नाण्यांसहित जळेल का नाणी वाला पंचा खाली पडेल?
10. मोठा एकच बाहुला नेला असता तर पूर्ण गर्भगृहाच्या उंचीचा एकच हस्तर आला असता का?

मी पण हहपुवा.
@अनु पारच हस्तरविच्छेदन (पक्षी पोस्ट माॅर्टेम) केलय तुम्ही.

तुंबाड पाहिला एकदाचा. प्रचंड आवडला.
बरेच दिवसांनी एखादा चित्रपट संपल्यावरही मनात दबा धरून बसला होता. + ११११११

बरेच दिवसांनी रात्री डोळे मिटायची भिती वाटली Lol
पटकन डोळे उघडून भिंती पाहिल्या. मग पांघरुण घेवून कटाक्षाने तुंबाडचा विचार न करण्याचा प्रयत्न करत झोपले. Happy

खूप छान सिनेमा, परत बघणार

तुंबाड बघितला आज. रात्री 11.30 चा पिंपरी इ स्क्वेअरचा शो हाऊसफुल्ल होता. प्रचंड आवडला. अफलातून छायाचित्रण. त्या पंचतंत्रातल्या गोष्टीची आठवण झाली ज्यात ते काटेरी चक्र लोभी माणसाच्या डोक्यावर जात असते.

जेंव्हा विनायक आणि मुलगा पहिल्यांदा वाड्यात जातात तेंव्हा मुलाच्या पायात व्यंग दाखवलं आहे. दोन तीन सीन मध्ये तो चवड्यावर चालताना पण दाखवला आहे आणि क्लोज अप शॉट आहेत हे. काय लॉजिक आहे ?? आणि तो मुलगा गर्भाशयातून बाहेर कसा पडतो?

अनु सर्व पोष्टी भारी☺️☺️

२ आठवड्यापूर्वी तुंबाड पाहिला. तेव्हांपासून यावर आजच्या वर्तमानातील साम्याविषयी लिहण्याचे मनात होते.
एकविसाव्या शतकातील साम्य शोधताना मला माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्र लगेच डोळ्यासमोर आले.
या क्षेत्रातील कर्मचारी आपल्याला इतरांपेक्षा अधिक मौजमजा करताना आढळतील (२००८ पूर्वी आजच्यापेक्षाही अधिक) जसेकी विनायक.
परंतु हे धन मिळवतांना त्यांना साक्षात हस्तरशीच सामना करावा लागतो. आता सुवर्ण मुद्रा प्राप्त करण्याची तुलना आपण Yearly Appraisal शी करू शकतो.
जो अधिक कार्यकुशलता दाखवतो तो जास्त सुवर्ण मुद्रा (CTC) मिळवतो, कधीकधी अपेक्षित इच्छाप्राप्ती होत नाही, कधी होते किंवा कधीतर रिकाम्या हाताणीशी वर्षभर वाट पाहणे नशिबी येते. बाहुली म्हणजे skill, जोवर एका वेळी एकच skill दाखवतो तोपर्यंत सर्वकाही सुरळीत चालू राहते, पण जेंव्हा लोभीपणाने जास्त बाहुल्या (Many skills), व्यवस्थापकासमोर (Manager or Management) उघड होतात तेंव्हा मग अनेक हस्तर (मॅनेजर किंवा कामे) निर्माण होऊन आणखी जास्त कामाला जुंपल्या जाते.
आता हस्तरबाधित म्हणजे अशा व्यक्ती ज्यांनी स्वतः ला कंपनीसाठी वाहून घेतलेले आहे आणि त्या व्यक्ती कंपनी सोडून कोठेही जाऊ शकत नाही. आपल्या आयुष्यातील निवृत्तीपर्यंत (retirement) एकाच कंपनीत काम करत राहतात. इतकंच नाही तर निवृत्तीनंतरही काही वर्षे तरी कार्यकाळ वाढवून (Extension) घेऊन काम करत राहतात.
वरील उदाहरणात इतर शेत्रातीलही साम्य शोधता येईल. आपणास अजून काही कल्पना सुचतील तर त्याप्रमाणे पोस्ट करावे हि विनंती.

सच्च्या

आजची शिक्षणपद्धती म्हणजे फक्त एकसारखे काम करण्यासाठी मुलांना तयार करणे. जसे विनायक पांडुरंगसाठी दोरी बांधून नाणी गोळा करण्याचा सराव करायला लावतो त्याप्रमाणे आजचे शिक्षणही फक्त चांगली नौकरी मिळवण्यासाठीचा उद्देश ठेऊन मुलांना तयार करण्याचे कारखाने बनत आहेत.

पाहिला आज amazon prime वर. काहीतरी वेगळ केलाय पण काहीतरी सुटून गेलाय हे पण वाटतंय.
हा सामना थोडा अजून रंगायला हवा होता. अजून थोड्या कल्पकतेला वाव होता. चढत्या भाजणीप्रमाणे क्लायमॅक्स रंगतदार असायला हवा होता ह्या मताशी सहमत.

Hastur या नावाने गूगल केलं की हस्तर हे नाव मूळ कुठून आलं आहे ते लक्षात येईल. धारपांनी पाश्चात्य साहित्यात येणाऱ्या अशा काही व्यक्तिरेखा, त्यांची नावे हवे तसे बदल करून किंवा आहे तशाच वापरल्या आहेत. उदा: हस्तर शी संबंधित कथुलू पण 'स्वप्नांचा राजा कथुलू' म्हणून एका गोष्टीत येतो
बर्वेनी हस्तर हे नाव कायम ठेवून प्राचीन, विशेषतः ग्रीक, मिथककथा डोळ्यासमोर ठेवून नव्याने मिथक रचले आहे. ते इतके उत्तम व विश्वसनीय उतरले आहे की लोक भारतीय मिथककथांमध्ये व इतरत्र त्याचा शोध घेत आहेत Happy

हो खरंय
हस्तर आणि अन्नपूर्णा देवी ची कथा अगदी परफेक्ट गुंफलीय.

हस्तर, प्लिज आमच्या मांजरांकडे जा.
ते झोपले की मगच ऑफिस मध्ये झोपता येईल ☺️☺️☺️
आणि खिसा पाकीट सांभाळा.

काल प्राईम वर पाहिला...मस्त चित्रपट...
शेवटी अनेक हस्तर बघुन...ओह शिट असं झालं...भीती, राग, असहाय्यता....बर्याच भावना एकदम आल्या मनात..
ईतकं सोनं असताना काय गरज आहे अजुन अजुन अजुन ची...असं झालं..
आणि आपण पण एक प्रकारचे "पांडुरंग" च बनत चाललो आहोत असं पण वाटुन गेलं ..
Great Job राही अनिल बर्वे .... __/\__

बघितला तुंबाड एकदाचा. आजी आणि हस्तर चावलेला राघवचे किळसवाणे सीन वगळता बर्यापैकी आवडला. संवाद कळत नसल्याने इंग्रजी सबटायटल लावून पहावा लागला.

Pages