तुंबाड - धारप व तत्सम गूढ जगाचे रूपेरी पदार्पण (आता स्पॉयलर्स सहीत चर्चा)

Submitted by किरणुद्दीन on 12 October, 2018 - 16:19

1063423_6880936_48.jpg

दोन बहुचर्चित सिनेमे समोर असताना कुठला निवडावा हे अवघड काम होतं. बायकोचा कल अंदाधून कडे होता. मात्र तुंबाड नेफ्लिवर पाहून होणार नाही याची खात्री होती. सुदैवाने अंधाधूनचा लास्ट शो सुरू होऊन अर्धा तास झालेला होता आणि आता फक्त तुंबाड शिल्लक होता...

मी सिनेक्षेत्राशी निगडीत नाही. संबंध असेल तर प्रेक्षक म्हणून. तो ही जाणता नव्हे. पण हा सिनेमा पाहून इतरांना सांगावेसे वाटावे हे या सिनेमाचे यश आहे असे वाटते. गेल्या अनेक वर्षात असे वाटलेले नाही. अगदी सैराटच्या वेळीही नाही. इथे मी कुठलेही सस्पेन्स लीक करत नाही अथवा कथेबद्दलही बोलणार नाही. ती प्रत्येकाने सिनेमाहॉल मधेच एंजॉय करावी.

कारण हा सिनेमा एक ब्रिलियंट सिनेमा आहे. पाहताना जर काही जाणवत असेल तर मेहनत आणि फक्त मेहनत. (दिग्दर्शकाने घेतलेली मेहनत याहीपेक्षा प्रचंड आहे, तो इथे आपला विषय नाही). पहिल्या फ्रेमपासून सिनेमा आपले वेगळेपण ठसवत राहतो. कोकणातले हे गाव आपल्यासमोर पावसाच्या रूपाने जिवंत होते. पण त्याचा फक्त गूढ वातावरणनिर्मितीपुरताच वापर करून घेतला आहे. वायफळ फ्रेम्सला इथे जागा नाही. सिनेमा पहिल्या फ्रेमपासून वेगळ्या धाटणीची गोष्ट सांगायला लागतो.

ही शैली थोडीशी धारपांशी जुळणारी. श्रेयनामावलीत त्यांचे नाव कुठेच नाही. मात्र दिग्दर्शकाने त्यांच्या कथांचा प्रभाव असल्याचे मान्य केले आहे. धारपांच्या कथा वाचताना पहिल्यापासून जाणवलेली गोष्ट म्हणजे याचे व्हिजुअल्स अत्यंत अवघड आहे. प्रत्येकाच्या डोक्यात जे चित्र तयार होते त्याला न्याय देणारे चित्रण अत्यंत अवघड किंबहुना अशक्य आहे असे वाटायचे. मात्र या सिनेमात धारपांची कादंबरी समोर उलगडतेय असे वाटणे हे सर्वात मोठे यश आहे.

दुसरे म्हणजे ही पीरीयड फिल्म आहे. त्या दृष्टीनेही घेतलेली मेहनत दाद देण्यासारखी आहे. नायक लहान असतानाच्या काळ हा स्वातंत्र्यापूर्वी साधारण ३० वर्षांपूर्वीचा आहे. त्या वेळची वाहने, गैरसोयी आणि त्या काळच्या पुण्याचे दर्शन हे सर्व दाद घेऊन जातात. जुनी भांडी, फिरकीचा तांब्या, जुन्या पद्धतीचे घट्ट झाकणांचे डबे, पत्र्याची ट्रंक हे बारीकसारीक तपशील लक्ष वेधून घेतात. सुरूवातीला नायक आजीसाठी ज्या ताटलीत जेवण वाढतो ती नीट पाहिली नाही. बहुधा ती चुकीची घेतली असे नंतर वाटले. खात्री नाही. पुणे दाखवताना पुणेरी पाट्या दाखवण्याचा मोह दिग्दर्शकाला आवरलेला नाही. अगदी सनातन पाट्या असाव्यात या.

कोकणातला पाऊस सतत सोबत करतो. तो वातावरण निर्मिती करतोच. मात्र कॅमेरा प्रकाश आणि छायांचा खेळ टिपत व्हिज्युअल अत्यंत प्रभावी करतो. एका दृश्यात सावकार भुयाराचे दार उघडून खाली पाहतो तेव्हां खालून येणारा उजेड आणि तिथे नेणा-या बोळकांडातला भेसूर अंधार हे दृश्य अक्षरशः मेंदूत कोरलं जातं.

भुयारातून खाली रंवरंव नरक उभा केला आहे. धारपांच्या अनेक कथांत जसा डोळ्यासमोर यावा तसाच. कदाचित बर्वेंना जसा दिसला तसा त्यांनी उभा केल्याने तो इतरांनाही अपील झालेला दिसतो.

सिनेमा कसा आहे ?
खरं म्हणजे कसा आहे हे सांगता येत नाही. सांगूही नये. हा नेहमीचा हॉरर सिनेमा नाही. गूढ कथा आहे. प्रासंगिक विनोदाच्या जागा आहेत. वडलांच्या अंगवस्त्राला लाच देऊन तुझ्याशी लग्न करीन म्हणणारं पोरगं अफलातून. बाप पोराला मोठा झालास की लग्न लावून देईन म्हणतो तेव्हां पोरगं तोपर्यंत काय असा प्रश्न विचारतं.. इथे अक्षरशः फुटायची पाळी आली होती. हा सीन सुचला कसा याचंच नवल जास्त होतं.

दचकवणारे सीन्स नाहीत. फूटेज खाणारे स्वप्नातले शॉट्स नाहीत. नेहमीच्या युक्त्या नाहीत. घाबरा, घाऊक घाबरा असला मामला नाही. प्राचीन किंवा त्याही आधीची अस्तित्त्वं, त्यांच्या सुप्त इच्छा आकांक्षा आणि मानवी स्वभावाचे खेळ यांची सांगड घालून पाहीले तर हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा आहे हे मान्य करावे लागेल. महेश भट किंवा त्यांचे पूर्वज रामसे यांच्या सिनेमांच्या कल्पना डोक्यात असतील तर सिनेमा आवडण्याची शक्यता नाही.

माणसाच्या मनातले भय, लालसा अशा नकारात्मक भावनांची एकमेकांवर कशी मात होते. शाप वगैरे गोष्टी मान्य करून पुढे पाहिलं तर अशा मार्गाने मिळालेलं धन आणि त्यामुळे जीवनात प्रवेश करणा-या काही टाळता येण्यासारख्या गोष्टी. हाती काहीच लागणार नाही अशा मार्गावरचा हा प्रवास यावर एक शब्द न बोलता सिनेमा बोलतो. गानूआजीसारखी एक आजी आहे (हा स्पॉयलर नव्हे). ती बघवत नाही. धारपांच्या वर्णनांप्रमाणे गिळगिळीत, चिकट असे काही बीभत्स रूप आहे तिचे. अशा दृश्यातून भीती दाटून राहते.

या आजीचा संदर्भ पुढे लागतो म्हणून लक्ष द्यायचे.

स्पॉयलर अ‍ॅलर्ट
पिशवीतला खामरा नावाची कथा वाचली असेल तर ती आठवल्याशिवाय राहणार नाही. खामरा वगैरे टिपीकल धारपांची नावे. हा खामरा जीवनात आल्यापासून नायकाला वेगवेगळ्या बायकांची भूक जाणवत असते. ती तो रोज भागवत असतो. अशा रात्री जस जशा जातील तस तसा हा खामरा मोठा आणि शक्तिशाली होत असतो. अशा कथा ज्या वळणाने जातात त्याच वळणाने ही कथाही वाटचाल करते.

राही अनिल बर्वे यांनी पाहीलेल्या या भयानक स्वप्नासाठी त्यांना सलाम !
(सिनेमाची गोष्ट तर सांगितलीच नाही. गोष्टीत जीवच कितीसा ? ऐसा नही चलता क्या ? इनबॉक्स मे आ जाओ फिर )

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्स अनु आणि सिम्बा _/ \_
पूर्ण चित्रपट परत रिवाईंड करत करत आणि हेडफोन्स लावून बघावा लागेल.

सर्वांनी खूप चांगले लिहीलेले आहे. पुंबा, मी अनु, सिंबा आणि इतर सर्वांनी बारकाईने अर्थ लावलेले आहेत. इथून पुढे असेच प्रतिमांच्या भाषेत बोलणारे सिनेमे येत राहतील. इथे व्यक्त झालेल्या काही शंकांची उत्तरे दिली गेली आहेत. मला वाटते तो अर्थ असा...

विनायक सरकारचा (अनौरस?) मुलगा आहे. सरकारने त्यांना आश्रय दिलेला आहे. त्याबदल्यात सरकारच्या आईला विनायकची आई सांभाळते. ही आजी जीवन आणि मरण याच्या सीमारेषेवर कुठेतरी अडकलेली आहे. हस्तरच्या शापामुळेच अर्थात. तिने बहुधा सरकारला रहस्य न सांगितल्याने सरकार तिच्यावर नाराज होता. पण म्हातारीला ही परंपरा तोडायची इच्छा होती.

सुरूवातीलाच सांगितल्याप्रमाणे पूर्तीची देवी ( Godess of Harvest / Plenty) ही ब्रह्मांड निर्माण होण्याच्या आधीपासून आहे. ब्रह्मांड निर्माण होताना तिने सोळा कोटी देवतांना जन्म दिला. त्यातलं आवडतं हस्तर. जो कित्येक वर्षे तिच्या गर्भाशयातच झोपून राहिला. बाहेर आल्याबरोबर त्याने देवीची संपत्ती आणि धान्य (खाणे) याकडे मोर्चा वळवला. संपत्ती हडप करून झाली पण जसा त्याने धानधान्याकडे आपली हाव दर्शवली , देवतांनी त्याच्यावर हल्ले करून त्याचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला. देवीने त्याला पुन्हा गर्भात लपवला.

वाड्यात देवीची मूर्ती आहे. पूर्तीची देवी असल्यानेच जात्यावर दळणाचे चित्र आहे (समृद्धीची प्रतिमा आहे ही). याची लालसा हस्तरला आहे. त्याच्याकडे संपत्ती आहे जिचा त्याला उपयोग नाही. त्याची लालसा धान्यात अडकलेली आहे. पूर्तीची देवी हीच धान्याची देवी असल्याने धान्याचे पीठ सुरक्षाचक्र म्हणून काम करते. वाड्यातल्या लोकांना हे परंपरेने ठाऊक आहे. शेवटचे ज्ञान म्हातारीला आहे.

या प्रतिमा अशा पद्धतीने वापरल्या आहेत.

हे हस्तर प्रकरण भारतिय आहे कि imported? (vampire ही imported concept बर्याच भारतिय कथांमधे वाचली म्हणून हस्तर बद्दल पण विचारतेय. )

हस्तर काल्पनिक आहे. व्हँपायर ही कल्पना तुंबाड मधे नाही. धारपांनी पण नाही वापरली कधी. हे वेगळे प्रकरण आहे.

राहींच्या पोस्टवर करतो कमेंट. त्यांचं १८- २० वर्षांचे ध्यासपर्व, १००० पानाच्या आसपास नुसता स्टोरीबोर्ड, माझ्या फुटकळ कल्पनेच्या हजारपट विचार त्यांनी केलाच असेल. >>>>> पुंबा, माझी सिक्वेलची कल्पना सुद्दा राही अनिल बर्वेन्ना पोस्ट करा.

सिक्वेल २०२० मध्ये घडेल. 'काळ बदलला तरी माणसाची लालसा बदलत नाही' ही थीम असेल त्याची. आता पान्डूरन्गचा नातू/ नात किव्वा खापर पणतू / नात नायक/ नायिका असेल. तो/ ती केटी वापरुन सोने मिळवण्याचा प्रयत्न करेल. कशी वाटते ही आयडिया?

होहो
किरणूद्दीन चे विवेचन बरोबर आहे.
याचा सिक्वेल बनू शकेल चांगला.पांडुरंग चा मुलगा परत हस्तर चे मंदिर बांधतो आणि शेवटी पांडुरंग ला त्याचा बळी जाताना पाहून मंदिर उध्वस्त करून हे दुष्टचक्र संपवून आत्महत्या करावी लागते असे काही.
बळी कथेत आत लाल गुलाल (मांस आणि रक्त प्रतीक) भरलेला कणकेचा बाहुला अर्पण करावा लागतो.हा बाहुला हे नरबळीचे प्रतीक.ही संकल्पना ज्याला नीट माहीत नाही तो वारसाला गंडवून डायरीत नोंदी वाचून नुसता कणिक आणि गुलाल घेऊन बळदात वाट बघतो आणि बळदातले अदृश्य दार उघडून जे बाहेर येते ते बाहुला नसल्याने त्याचाच बळी घेऊन त्याने नुसते आणलेले कणिक आणि गुलाल त्याच्या मृत शरीरावर फासते.तुंबाड मधला सुरुवातीचा अंगावर पीठ सांडलेला लहान विनायक याच्यावरन इंस्पायर्ड असू शकतो.

धारपांनी पण नाही वापरली कधी. हे वेगळे प्रकरण आहे>>>>>>>
त्यांच्या "लुचाई "कादंबरीत" दंडी" व्हिलन आहे, ती कादंबरी व्हामपायर प्रकारावरून इंस्पायर्ड आहे

लुचाई सालेम्स लॉट वरून आणि सालेम्स लॉट ब्रॅम स्टोकर च्या ओरिजिनल ड्रॅकुला वरून प्रेरित आहे.स्टीफन किंग ने प्रस्तावनेत क्रेडिट दिले आहे.
ड्रॅकुला ब्रॅम स्टोकर ने हंगेरीत ऐकलेल्या रक्त शोषणाऱ्या वटवाघूळांच्या लोककथांवर भरपूर कल्पना विस्तार करून आधारित आहे.ड्रॅकुला इतकी सुंदर बनली की जगातल्या बऱ्याच हॉरर कथा त्यानेच प्रेरित आहेत.

आजच बघून आले. एकतर सिनेमा सुरू झाल्या झाल्या मला धक्का बसला. कारण मी हा मराठी सिनेमा आहे असं समजत होते.

मी अनु, तू केटी केटी म्हणतीयेस त्याचा अर्थ काय?

वर पुंबांना पडलेले प्रश्न मलाही पडले. अतुल पाटील यांच्याशीही सहमत.

मुद्रा पंचातूनच पडत असतात. म्हणूनच तो मुलगा प्रॅक्टिस करत असताना त्या हस्तरच्या पार्श्वभागाची प्रतिकृती करून त्यातून मुद्रा पडतील अशी कल्पना करून प्रॅक्टिस करत असतो.

मी देखिल खूप अपेक्षा घेऊन गेले होते. पण बरीच निराशा झाली. काहीतरी सॉलिड मिसिंग आहे असं वाटत राहिलं.

मुख्य म्हणजे तो हस्तरचा अंश आल्यावर ' याला कुठेतरी पाहिलंय' अशी जाणीव होत राहिली. मग लक्षात आलं की हा तर ममी च्या सैन्यदलातील एक सैनिक! तो वाळवंटातून डायरेक्ट गर्भाशयात पोचला वाटतं. असा डिजिटल हस्तर न करता नुसतीच भिती निर्माण केली असती तर जास्त परिणामकारक वाटलं असतं. कारण त्या हस्तरपेक्षाही बाहेरचं पावसाचं गूढ वातावरण अधिक भिती निर्माण करतं.

मी वडिलांबरोबर अ‍ॅट्रियाच्या आयनॉक्समध्ये पाहिला. बाबांना तिकीटाचा दर सांगितला नाही नाहीतर ते हस्तरपेक्षा जास्त खवळले असते.

ममी मला अजिबात आठवत नाही.

त्यातही तळघर, दोरी खजिना होता का ? असेल तर बघायला हवा पुन्हा.

मामी, केटी म्हणजे नॉलेज ट्रान्सफर.
हस्तर भीतीदायक वाटला नाही, कार्टून सारखा वाटला हे बऱ्याच जणांचं मत.पण ओरिजिनल हेवी वाला हस्तर एखाद्या कडे वेगाने येऊन चावतोय असंही दाखवता आलं नसतं त्यामुळे हा असा हस्तर अंश घेतला असेल.
भीती अशी वाटत नाहीच.इंटर्व्हल नंतर लगेच आपल्याला तिथे नक्की काय आहे ते कळतं.
या पिक्चर मधली मुख्य भीती ही की आजीची अवस्था बघून, त्या ठिकाणी नक्की काय होतं, धोका मृत्यू पेक्षाही वाईट अवस्था होण्याचा आहे हे बघूनही पुढची पिढी परत परत तिथे जाते.इतकंच नाही तर आहे त्या एक्स्पर्ताइज वर समाधानी न राहता अजून जास्त धोका घेऊन मोठे डाकू डाव खेळायला जाते.ही ग्रीड, त्याने पुढे काय होणार आहे ही कल्पना येऊन प्रचंड अस्वस्थ आणि दुःखी करते.
अर्थात हा धारप शैलीतील हॉरर जॉनर ची ओळख असणे आवड असणे आणि नसणे यातलाही फरक असावा.(पिक्चर बघताना पुस्तक वाचले किंवा नाही, तो आवडणे किंवा नावडणे सहाजिक आहे.राही यांची ही स्वतंत्र कथा आहे.
मला पिक्चर खूप अंधारात आहे असं वाटलं.थोडा लाईट चालला असता.बऱ्याच ठिकाणी गेस करून भीती वाटवून घ्यावी लागतेय.
(या रिव्ह्यू चा गुलाबजाम धागा बनतोय ☺️☺️☺️)

एवढे वाचुन आता चित्रपट पहायची इच्छाच मेली.
( आतला आवाज: xxxxx वाच वाच अजुन स्पाॅईलर्स वाच. तरी सांगत होतो नको वाचूस)

त्यातही तळघर, दोरी खजिना होता का ? असेल तर बघायला हवा पुन्हा. >> नाय नाय. म्हणजे तळघर, खजिना वगैरे होतं. पण त्यासाठी नाही. जो हस्तरचा अंश दाखवलाय ना, तो त्या ममीच्या सैनिकांसारखा दिसतो.

इथे आहेत. तसंच काहीसं शिरस्त्राण घातलेले :
http://www.movie-roulette.com/photos_big/the-mummy-returns-5-1.jpeg

नाही.दोघांच्या पासपोर्ट आणि व्हिसा मध्ये फरक आहे ☺️☺️☺️☺️☺️व्हाम्पायर कडे शेंगान व्हिसा आहे.वेतळाकडे फक्त इंडियन फॉरेस्ट वर्क परमिट.

हस्तर कधी कधी काॅमिकही वाटतो. नंतर वाटलं- हे लोक आपल्याला रोज आणि सतत वाटत असलेल्या कसल्या तरी निरंतर भितीची खिल्ली उडवताहेत की काय.

हस्तरपेक्षाही भयानक ती आज्जी आणि सावकार दिसतो, हे बघितलं ना? ही दोन्ही ‘माणसं’ आहेत. हस्तर भयानक असला असता तर सिनेम्यांचं प्रयोजनच संपलं असतं. राही ग्रेट आहे- हे म्हणालो ते यासाठी. त्याला हाॅरर च्या नावाखाली सिनेमा हाॅलात बोलवून खरं काय ते दाखवायचंय इतकंच.

अनु Lol Lol

झॉम्बी जाऊदेत पण मला 'ट्वायलाइट' मधले व्हॅम्पायर आवडतात Proud

<<दोघांच्या पासपोर्ट आणि व्हिसा मध्ये फरक आहे ☺️☺️☺️☺️☺️व्हाम्पायर कडे शेंगान व्हिसा आहे.वेतळाकडे फक्त इंडियन फॉरेस्ट वर्क परमिट.>> अनु, माझा साष्टांग नमस्कार स्वीकारावा _/\_

राहीचा स्टोरीबोर्ड मी ८-९ वर्षांपूर्वी त्याच्याच घरी, त्याच्याच बरोबर बसून तपशिलात वाचला/ बघितला होता. त्या जुन्या स्टोरीबोर्डमधे अजून एक कथा होती. त्यात आजीचा फ्लॅशबॅक होता. काही कारणांमुळे तो सगळा बिट उडवून टाकलाय या फिल्ममधे.

पिक्चर चे कॅपिटल वसूल झाले का?
मी बुकिंग बघत होते.वीकेंड ला चांगले होते, विकडे रात्री ला पण 50% भरले होते.बहुधा झाले असेल.
पिक्चर अजून मोठा पण आवडला असता.

किरण, मी जवळच्या चित्रपटगृृहातच हा चित्रपट बघितला Happy परत बघेन नीट मोबाईलवर आल्यावर.

हा धागा आल्यापासून follow krt आहे... मूवी मस्तच आहे...
राही अनिल बर्वे यांच्या फेसबुक वरील सगळ्या पोस्ट वाचल्या तुंबाड बद्दलच्या... खरच खूप मेहनत आणी चिकाटीने हा चित्रपट पूर्ण झाला आहे .. लोकांनी खूप भरभरून प्रतिसाद द्यायला हवा असे वाटते...

बाबांना तिकीटाचा दर सांगितला नाही नाहीतर ते हस्तरपेक्षा जास्त खवळले असते. >>> Lol

नाही.दोघांच्या पासपोर्ट आणि व्हिसा मध्ये फरक आहे ☺️☺️☺️☺️☺️व्हाम्पायर कडे शेंगान व्हिसा आहे.वेतळाकडे फक्त इंडियन फॉरेस्ट वर्क परमिट. >>> लय भारी Lol

राहीचा स्टोरीबोर्ड मी ८-९ वर्षांपूर्वी त्याच्याच घरी, त्याच्याच बरोबर बसून तपशिलात वाचला/ बघितला होता. >>> वाह मस्त.

त्या जुन्या स्टोरीबोर्डमधे अजून एक कथा होती. त्यात आजीचा फ्लॅशबॅक होता. काही कारणांमुळे तो सगळा बिट उडवून टाकलाय या फिल्ममधे. >>> अच्छा ओके.

राही अनिल बर्वे यांच्या फेसबुक वरील सगळ्या पोस्ट वाचल्या तुंबाड बद्दलच्या... खरच खूप मेहनत आणी चिकाटीने हा चित्रपट पूर्ण झाला आहे .. >>> वाचायला हव्यात.

>> ड्रॅकुला ब्रॅम स्टोकर ने हंगेरीत ऐकलेल्या रक्त शोषणाऱ्या वटवाघूळांच्या लोककथांवर भरपूर कल्पना विस्तार करून आधारित आहे.
>> Submitted by mi_anu on 17 October, 2018 - 19:44

ब्रॅम स्टोकरने Vlad the impaler ह्या रोमानियन हुकुमशहाच्या व्यक्तिरेखेवरून ड्रॅकुला या पात्राची निर्मिती केली. Vlad the impaler किंवा Vlad Dracula हा आजवरच्या मानवी इतिहासात क्रूरतेची निचोत्तम परिसीमा गाठलेला हुकुमशहा मानला जातो. तो अत्यंत विकृत होता. इतका विकृत कि त्याच्या छळ करण्याच्या पद्धती माबोवर चर्चा करण्याच्या पलीकडच्या आहेत. शत्रूचा छळ होत मृत्यू होत असताना पाहणे त्याला आनंददायी वाटत असे. कित्येक हजारो लोकांना त्याने ज्या पद्धतीने छळ करून मारले त्यावरूनच त्याला impaler म्हंटले गेले.

Pages