तुंबाड - धारप व तत्सम गूढ जगाचे रूपेरी पदार्पण (आता स्पॉयलर्स सहीत चर्चा)

Submitted by किरणुद्दीन on 12 October, 2018 - 16:19

1063423_6880936_48.jpg

दोन बहुचर्चित सिनेमे समोर असताना कुठला निवडावा हे अवघड काम होतं. बायकोचा कल अंदाधून कडे होता. मात्र तुंबाड नेफ्लिवर पाहून होणार नाही याची खात्री होती. सुदैवाने अंधाधूनचा लास्ट शो सुरू होऊन अर्धा तास झालेला होता आणि आता फक्त तुंबाड शिल्लक होता...

मी सिनेक्षेत्राशी निगडीत नाही. संबंध असेल तर प्रेक्षक म्हणून. तो ही जाणता नव्हे. पण हा सिनेमा पाहून इतरांना सांगावेसे वाटावे हे या सिनेमाचे यश आहे असे वाटते. गेल्या अनेक वर्षात असे वाटलेले नाही. अगदी सैराटच्या वेळीही नाही. इथे मी कुठलेही सस्पेन्स लीक करत नाही अथवा कथेबद्दलही बोलणार नाही. ती प्रत्येकाने सिनेमाहॉल मधेच एंजॉय करावी.

कारण हा सिनेमा एक ब्रिलियंट सिनेमा आहे. पाहताना जर काही जाणवत असेल तर मेहनत आणि फक्त मेहनत. (दिग्दर्शकाने घेतलेली मेहनत याहीपेक्षा प्रचंड आहे, तो इथे आपला विषय नाही). पहिल्या फ्रेमपासून सिनेमा आपले वेगळेपण ठसवत राहतो. कोकणातले हे गाव आपल्यासमोर पावसाच्या रूपाने जिवंत होते. पण त्याचा फक्त गूढ वातावरणनिर्मितीपुरताच वापर करून घेतला आहे. वायफळ फ्रेम्सला इथे जागा नाही. सिनेमा पहिल्या फ्रेमपासून वेगळ्या धाटणीची गोष्ट सांगायला लागतो.

ही शैली थोडीशी धारपांशी जुळणारी. श्रेयनामावलीत त्यांचे नाव कुठेच नाही. मात्र दिग्दर्शकाने त्यांच्या कथांचा प्रभाव असल्याचे मान्य केले आहे. धारपांच्या कथा वाचताना पहिल्यापासून जाणवलेली गोष्ट म्हणजे याचे व्हिजुअल्स अत्यंत अवघड आहे. प्रत्येकाच्या डोक्यात जे चित्र तयार होते त्याला न्याय देणारे चित्रण अत्यंत अवघड किंबहुना अशक्य आहे असे वाटायचे. मात्र या सिनेमात धारपांची कादंबरी समोर उलगडतेय असे वाटणे हे सर्वात मोठे यश आहे.

दुसरे म्हणजे ही पीरीयड फिल्म आहे. त्या दृष्टीनेही घेतलेली मेहनत दाद देण्यासारखी आहे. नायक लहान असतानाच्या काळ हा स्वातंत्र्यापूर्वी साधारण ३० वर्षांपूर्वीचा आहे. त्या वेळची वाहने, गैरसोयी आणि त्या काळच्या पुण्याचे दर्शन हे सर्व दाद घेऊन जातात. जुनी भांडी, फिरकीचा तांब्या, जुन्या पद्धतीचे घट्ट झाकणांचे डबे, पत्र्याची ट्रंक हे बारीकसारीक तपशील लक्ष वेधून घेतात. सुरूवातीला नायक आजीसाठी ज्या ताटलीत जेवण वाढतो ती नीट पाहिली नाही. बहुधा ती चुकीची घेतली असे नंतर वाटले. खात्री नाही. पुणे दाखवताना पुणेरी पाट्या दाखवण्याचा मोह दिग्दर्शकाला आवरलेला नाही. अगदी सनातन पाट्या असाव्यात या.

कोकणातला पाऊस सतत सोबत करतो. तो वातावरण निर्मिती करतोच. मात्र कॅमेरा प्रकाश आणि छायांचा खेळ टिपत व्हिज्युअल अत्यंत प्रभावी करतो. एका दृश्यात सावकार भुयाराचे दार उघडून खाली पाहतो तेव्हां खालून येणारा उजेड आणि तिथे नेणा-या बोळकांडातला भेसूर अंधार हे दृश्य अक्षरशः मेंदूत कोरलं जातं.

भुयारातून खाली रंवरंव नरक उभा केला आहे. धारपांच्या अनेक कथांत जसा डोळ्यासमोर यावा तसाच. कदाचित बर्वेंना जसा दिसला तसा त्यांनी उभा केल्याने तो इतरांनाही अपील झालेला दिसतो.

सिनेमा कसा आहे ?
खरं म्हणजे कसा आहे हे सांगता येत नाही. सांगूही नये. हा नेहमीचा हॉरर सिनेमा नाही. गूढ कथा आहे. प्रासंगिक विनोदाच्या जागा आहेत. वडलांच्या अंगवस्त्राला लाच देऊन तुझ्याशी लग्न करीन म्हणणारं पोरगं अफलातून. बाप पोराला मोठा झालास की लग्न लावून देईन म्हणतो तेव्हां पोरगं तोपर्यंत काय असा प्रश्न विचारतं.. इथे अक्षरशः फुटायची पाळी आली होती. हा सीन सुचला कसा याचंच नवल जास्त होतं.

दचकवणारे सीन्स नाहीत. फूटेज खाणारे स्वप्नातले शॉट्स नाहीत. नेहमीच्या युक्त्या नाहीत. घाबरा, घाऊक घाबरा असला मामला नाही. प्राचीन किंवा त्याही आधीची अस्तित्त्वं, त्यांच्या सुप्त इच्छा आकांक्षा आणि मानवी स्वभावाचे खेळ यांची सांगड घालून पाहीले तर हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा आहे हे मान्य करावे लागेल. महेश भट किंवा त्यांचे पूर्वज रामसे यांच्या सिनेमांच्या कल्पना डोक्यात असतील तर सिनेमा आवडण्याची शक्यता नाही.

माणसाच्या मनातले भय, लालसा अशा नकारात्मक भावनांची एकमेकांवर कशी मात होते. शाप वगैरे गोष्टी मान्य करून पुढे पाहिलं तर अशा मार्गाने मिळालेलं धन आणि त्यामुळे जीवनात प्रवेश करणा-या काही टाळता येण्यासारख्या गोष्टी. हाती काहीच लागणार नाही अशा मार्गावरचा हा प्रवास यावर एक शब्द न बोलता सिनेमा बोलतो. गानूआजीसारखी एक आजी आहे (हा स्पॉयलर नव्हे). ती बघवत नाही. धारपांच्या वर्णनांप्रमाणे गिळगिळीत, चिकट असे काही बीभत्स रूप आहे तिचे. अशा दृश्यातून भीती दाटून राहते.

या आजीचा संदर्भ पुढे लागतो म्हणून लक्ष द्यायचे.

स्पॉयलर अ‍ॅलर्ट
पिशवीतला खामरा नावाची कथा वाचली असेल तर ती आठवल्याशिवाय राहणार नाही. खामरा वगैरे टिपीकल धारपांची नावे. हा खामरा जीवनात आल्यापासून नायकाला वेगवेगळ्या बायकांची भूक जाणवत असते. ती तो रोज भागवत असतो. अशा रात्री जस जशा जातील तस तसा हा खामरा मोठा आणि शक्तिशाली होत असतो. अशा कथा ज्या वळणाने जातात त्याच वळणाने ही कथाही वाटचाल करते.

राही अनिल बर्वे यांनी पाहीलेल्या या भयानक स्वप्नासाठी त्यांना सलाम !
(सिनेमाची गोष्ट तर सांगितलीच नाही. गोष्टीत जीवच कितीसा ? ऐसा नही चलता क्या ? इनबॉक्स मे आ जाओ फिर )

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान परीक्षण !

एक प्रश्न - भितीदायक आहे का? म्हणजे रात्री काही भयावह स्वप्ने वगैरे यावीत या कॅटेगरीतील. ट्रेलर पाहून तसे वाटले थोडेफार. मी त्या रामगोपाल वर्माच्या भूत नंतर भयावह सिनेमे बघणे सोडले आहे म्हणून विचारतोय..

जस्ट आता बघून आलो तुंबाड....

प्रचंड अंगावर येणारा आहे आणि तो थिएटरमध्येच बघण्यासारखा आहे. पायरेेटेड कॉपी मिळवून मोबाईल किंवा लॅपटॉप वर बघणाऱ्यांनी तसदीही घेऊ नये. आणि ह्या इतकाही भारी वाटला नाही तस्सम प्रतिक्रीया देऊ नये.

काही प्रसंगात संपूर्ण थिएटर चिडीचूप असते तेव्हाचा अंधार, शांतता नको वाटते इतपत जबराट फिलींग आहे

हमकु मालुम, नै बज्जे लैच सस्ते मे रहता है टिकट. पर फिलिम बी आधीच दिखाते है उसका क्या ?

तिकीट स्वस्त आहे.120 रु रिकलायनर आणि 100 गोल्ड 80 सिल्व्हर.
आम्ही सदा परांजपे पण असाच पाहिला होता.

किरणुद्दीन जी तुमचा परीक्षणात्मक लेख चित्रपटाचे दिग्दर्शक राही बर्वे याना खूप आवडला आहे .>>> अरे व्वा, चक्क दिग्दर्शकांकडून शाबासकी मिळाली, अभिनंदन किरणुद्दीन.

थिएटरमध्येच बघण्यासारखा आहे. पायरेेटेड कॉपी मिळवून मोबाईल किंवा लॅपटॉप वर बघणाऱ्यांनी तसदीही घेऊ नये. आणि ह्या इतकाही भारी वाटला नाही तस्सम प्रतिक्रीया देऊ नये.
>>>>
+७८६
आणि हे जवळपास सर्वच चित्रपटांना लागू.
चित्रपट हा मुळात मोठ्या पडद्यावरच बघायचाच प्रकार आहे. मी वर्षाला मोजकेच चित्रपट बघतो. पण अगदीच नाईलाज झाला नाही तर जे बघतो ते थिएटरातच बघतो. आयुष्यातील अडीच तीन तास वेळ जर खर्च करत आहोत तर त्या वेळेला पुर्ण न्याय द्यावा.

हो पण सगळे चित्रपट पडद्यावर येत नाहीत. ते मग डीव्हीडी आणून किंवा प्राईम वर वगैरे बघावे लागतात.
उदा. अमेरिका सोडून अन्य देशातले चित्रपट. फिल्म फेस्टिव्हल ला सगळे बघून होतातच असे नाही.

पाहिला.
वातावरण निर्मिती, व्हिज्युअल्स अफलातून आहेत. नेमके डायलॉग्ज - प्रेक्षकांना सगळं काही कसं उलगडून सांगावं लागतं म्हणून "अच्छा! तो इसका मतलब........... " टाइप स्वगतं / संवाद नाहीत. एक गूढकथा तिच्या काळासकट किती प्रभावीपणे पडद्यावर उभी करावी याचा उत्कृष्ट नमुना.

कथा महत्वाची नाही, त्यामुळे या चित्रपटाला काही स्पॉईलर आहे असे मला वाटत नाही.

आशुचँप +१

मानव पृथ्वीकर - सहमत. मात्र हा अनुभव अगदी वेगळा आहे. म्हणून किमान रविवार तरी जाऊ द्यावा असं वाटलं.

स्पॉयलर अ‍ॅलर्ट
सिनेमाचा शेवट अनेकांना नीट समजला नाही असे बोलून दाखवलेय. धारपांच्या कथा वाचल्या असतील तर मात्र समजण्यास मदत होते. सिनेमा आपल्याला दचकवत नाही. मात्र ज्या प्राचीन गोष्टींचे भय वाटते त्या जगात नेऊन सोडतो. धारपांच्या कथा वाचून सरावलेल्या प्रेक्षकाला ते ओळखीचे आहे. आपण जे वाचले अगदी तसेच समोर दिसतेय हा आनंद त्याला आहे. भयावर मात लालसा करते. जोपर्यंत विनायक एका वेळेला मिळेल तेव्हढेच पैसे आणत होता तोपर्यंत सगळे ठीक होते. तेव्हढे पैसे आणण्यासाठी सुद्धा तो भयाचा सामना करत होता. त्याचं भय वेगवेगळ्या पद्धतीचं आहे.
कफल्लक होण्याचं भय आहे. ऐय्याशीला मुकण्याचे भय आहे. हे भय त्याला जिवावर उदार व्हायला भाग पाडतेय. त्यासाठी पैसा हवा आणि तो वाड्यात आहे. सरकारला तो सापडला नाही. मात्र आजीची जी अवस्था झाली होती ते पाहता तिने हस्तरला पाहीले होते. याचाच अर्थ ती तिथे गेली होती. तिच्यात लोभीपणा होता. तो नातवात आलेला आहे. हस्तरचा स्पर्श झालेल्या माणसाचे जिणे नरक होऊन जाते. पण तिला त्यात एक गोष्ट समजली होती. जी तिने नातवाला सांगितली. नातवाने तिच्याशी सौदा केला. तिला अग्नी देऊन मुक्ती देण्याच्या बदल्यात त्याने रहस्य जाणून घेतलेले आहे.

सुरक्षेचे उपाय त्याला ठाऊक होते आणि काय खेळ खेळावा लागणार याची त्याला आगाऊ कल्पना होती. जसजसा तो तरबेज होत गेला तस तसे त्याला अधिक वेळ मिळण्यासाठी काय करावे याचे ज्ञान होऊ लागले. म्हणून तो खाण्यात दगड मिसळू लागला. मात्र एकच बाहुली बनवून आणत असल्याने ते संपण्याच्या आत जेव्हढ्या मुद्रा मिळतील तेव्हढ्यावर त्याचे भागत होते.

हस्तर हा अत्यंत लोभी आहे हे सुरूवातीसच सांगितलेले आहे. त्याला प्रचंड भूक आहे. ज्याप्रमाणे विनायक आणि त्याच्या मुलाला अधिक धनाची लालसा निर्माण झाली आणि त्यांनी विनाशकाले न्यायाने अनेक बाहुल्या आणल्या त्याच पद्धतीने हस्तरची ही लालसा त्याच पटीत जागृत झाली आणि अनेक हस्तर एकाच वेळी अवतरले. त्याच पटीत हस्तरचे अस्तित्त्व ही लालसा विरुद्ध लालसा अशी प्रतिमा आहे.

हा सामना थोडा अजून रंगायला हवा होता. अजून थोड्या कल्पकतेला वाव होता. चढत्या भाजणीप्रमाणे क्लायमॅक्स रंगतदार असायला हवा होता. मात्र निर्दयी एडीटरच्या बुद्धीने कथा आटोपती घेतली आहे.

मस्त किरणूद्दीन.शेवट अजून थोडा रंगवता आला असता हे खरं.पिक्चर संपला पण भूक भागली नाही.
(छोटा स्पॉईलर)
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
हस्तर ची आधीची मंदिरातली इमेज आणि नंतरचे खरे रूप पाहता हस्तर ने जबरा इंटरमिटांट किंवा दीक्षित फास्टिंग करून किमान 35 किलो वेट लॉस केल्याचे भासते.

#भागवत
#भागवतविरोधी
वरची कमेण्ट वाचा.

साजिरा... आभारी आहे. Happy

स्पॉयलर उत्तर

अनु
अगदी अगदि हेच डोक्यात आले हस्तरला पाहिले तेव्हा. कादाचित आधी मिळत असेल खायला आणि नंतर कमी मिळत असेल.

अनेक बाहुल्या नेणे अंगाशी येणार याचा अंदाज होता पण कशा प्रकारे ते बघणे एकदम भारी होते.

आणि मला तर वाटले बाप मुलाला सोडून एकटाच चालला आहे आणि अत्यंत कणव दाटून आली

चला, काहीजणांना पण चित्रपट मराठी की हिंदी हा प्रश्न होता म्हणुन बरे वाटले.
मी जिथे पाहिला तिथले संवाद तरी हिंदीतच होते >>> Proud Proud Proud

हस्तरची मंदिरातली इमेज ज्यांनी त्याला पाहिला नाही त्यांनी बनवलीय. आजी ही बहुतेक पहिली व्यक्ती असावी त्याला प्रत्यक्ष पाहणारी. मंदिर त्याआधीपासून होते.

माणसाची भूक जितकी भागते तितकी ती वाढते, कमी कधी होतच नाही . सरकार लोभी होता पण त्याला फारसे काही करता आले नाही किंवा आईची अवस्था पाहून भयाने लालसा दाबली गेली. शरीरसुखाची लालसा मात्र शेवटपर्यंत कमी झाली नाही.

विनायकाची लालसा भयावर मात करून जाते. पण त्याच्यात तरीही थोडा माणुसपणा शिल्लक राहतो. पैशामुळे त्याची शरीरसुखाची लालसा वाढते व तशी भागवलीही जाते. धनाची लालसा कमी होत नाही पण जेवढे मिळते तेवढ्यात समाधानी राहतो.

त्याचा मुलगा मात्र दोन्ही लालसेत त्याच्या पुढे जातो. आयुष्यभर पुरेल इतके सोने आपल्याकडे आहे हे पाहूनही त्याची भूक मिटत नाही, उलट पूर्ण खजिनाच उचलून आणायची स्वप्ने पडतात. शरीरसुखाच्या लालसेतही तो बापापेक्षा पुढे जातो.

शेवटचे दृश्य पाहून त्याची लालसा विझते असे वाटले. बाप सोन्याची पुरचुंडी देत असूनही तो घेण्यासाठी हात पुढे करत नाही. बापाने जो मृत्यू पत्करला तो पाहून लालसा विझते असे मला वाटले.

साधना, हे पटलं. तसंही देवी दैवतांची रुपं कोण त्या मुर्ती बनवतो त्याच्या परसेप्शन नुसार बनतात.
स्पॉयलरः
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मला शेवट कळला नाही. सुरुवातीचे संदर्भ लक्षात घेता हस्तर विनायक वर चढेपर्यंत दोरीवरुन त्याच्या मागे येत असतो (आणि तो वर येण्यापूर्वी विनायक दरवाजा बंद करतो.) म्हणजे हस्तर वर रिंगणाचा फरक पडत नाही.मग शेवटी विनायक वर चढताना बाहुल्या बांधून सर्व हस्तर प्रतिमांना आकर्षित करुन वर चढतो तेव्हा त्यांची राख कशी होते? जर रिंगण प्रोटेक्टेड सर्कल असेल तर काम खूपच सोपे होते ना. बाहुली टाकायची, पटकन नाणी काठीने आत सर्कल मध्ये ओढायची आणि हस्तर ला टुक टुक करुन वेचून निघून जायचे.
पिक्चर परत पहायला हवाय.
ज्या दुर्दैवी लोकांनी स्पॉइलर पिक्चर बघण्यापूर्वी नीट वाचला त्यांनी पिक्चर पाहून माझे डाऊट क्लिअर करा.

त्या पिठाच्या वर्तुळाची काही शक्ती असते, ती त्यांच्या भोवताली शक्तीचा घुमट बनवते,
शेवटच्या प्रसंगात वरतून पडणारे हस्तर त्या डोम वर पडून जळून जातात,
त्यामुळे दोरीवर चढल्यावर ते रिंगण काम करत नाही.

शेवटी तो वर चढताना हस्तर त्याला चिकटतात, तो दोरी वरून खाली पडतो तेव्हा बरेच जळून जातात, जे काही बाहेत निसटतात तर वर काढलेल्या वर्तुळामुळे जलुन जातात,

तेव्हड्यात हा पोरगा कसेबसे चढून वर येतो.

रच्याक,
1) हा पोरगा थोडा मोठा दाखवला असता, एक 16-17 वर्षाचा,
आणि शेवटी तोच बापाला धक्का देऊन रिंगणाबाहेर पाडतो, आणि स्वतः बाहेर पडतो (आणि पैसे, बापाची रखेल जिच्यावर याचा डोळा असतो त्यांचा उपभोग घेतो हे अध्याहृत)असे दाखवले असते तर

2) किंवा बाप पोराचा बळी देऊन निसटतो, आणि भौतिक सुखे भोगतो
या पैकी एक शेवट जास्त अंगावर आला असता.

सिंबा, आता उलगडले सर्व नीट. तो दोरीवरुन पडतो वाला पार्ट मी मिस केला असावा.

मलाही बाप पोराचा बळी देऊन निसटतो वाले अपेक्षित होते. जेव्हा मुलगा पहिल्यांदा जात असतो तेव्हा तो त्याला काहीतरी विचारतो ना, बहुत सारा सोना है और बहुत सारे साल एकही जगह रहना है, तुम्हे चलेगा? आणी नंतर पण 'वापस लौटते वक्त मै अकेलाही जाऊंगा' म्हणतो त्यावरुन. पण तो बहुतेक 'तू गड्या लै घोळ घालतोस.बहुतेक गोत्यात येशील आणी मग मला एकट्याला जावे लागेल' या अर्थाने म्हणत असेल.

मलाही वाटलेलं पोराचा बळी देणार म्हणून आणि मग शेवटी वारस नाही म्हणून आयुष्यभर तडफडत राहणार असे काहीसे असेल.
पण शेवटी थोडातरी चांगुलपणा शिल्लक आहे जगात हे दाखवायचे असेल. ब्लॅक अँड व्हाईट पेक्षा ग्रे शेड्स आहेत सगळया ते जास्त वास्तव वाटले.

My Take on तुंबाड,
माझी पहिली ५-७ मिनिटे मिस झाली, हस्तर काय प्रकार आहे हे प्रोमो पाहून कळले होते म्हणून लिंक लागली पण बायको was क्लुलेस.
त्याच्या चित्र भाषेशी जुळवून घ्यायला त्रास झाला, विशेषतः सुरवातीला बर्याच गोष्टींचे tight क्लोज अप आहेत, अगदी नाक (आतल्या केसांसकट) (मला ते नाक वाटले, ते नाक नसेल तर it ओन्ली प्रुवस माय पोइंत ).
ते मुलांचे बोळकान्डीतून ताट घेऊन जाणे वगैरे प्रकार चांगलेच टेन्शन वाढवतो. पण तेव्हाच डोक्यात अरे, हे तर गानू आजी ... असा track वाजत असल्याने फार काही वाटले नाही. पण ती म्हातारी, जिला खजिन्याचा पत्ता माहित असतो, ती वाडा सोडून यांच्या घरी काय करत असते ते कळले नाही. तिच्या संवादात येते कि मी चपळ होते, विहिरीत सराईतपणे उतरू शकायचे , म्हणून त्यांना माझी गरज होती , हे ते म्हणजे कोण कळले नाही, सरकार चा बाप?? पण मग सरकारला खजिन्याचा पत्ता माहिती हवा.

long शॉट मध्ये दिसणाऱ्या चित्र चौकटी अप्रतिम आहेत. विशेषतः पाउस दाटून आला असताना घरी येणारी बाई, तुंबाड कडे पहिल्यांदी येणारा हिरो, car मधून तुंबाड कडे निघालेले बाप लेक, हे लोकेशन कोणते आहे हे शोधायला पाहिजे Happy

राधिकेच्या नशिबी इकडेही मानबा Sad

तुम्बाड कडे पहिल्यांदा पोराला घेऊन जाताना दूर बसलेला मुलगा, परत प्रवासात त्याच्या जवळ सरकून बसलेला दिसतो, मला तरी ते दृश्य एक गुपित शेअर केल्याने वाढलेली कम्फर्ट level अशा अर्थाने वाटले.

खरे सांगायचे तर बरेच सारे संवाद कळायला त्रास झाला , त्यात बर्याच गोष्टी संवादा ऐवजी , दृश्य स्वरुपात दाखवल्या आहेत त्यामुळे बर्याच ठीकाणी गाळलेल्या जागा भरा करावे लागते,
कधी कधी एका दृश्याचा संदर्भ पार अर्ध्या तासाने लागतो (त्या शेठ ला खालती पिठाची बाहुली मिळण्याचे रहस्य ) BTW या शेठ चा गेम सही वाजवला आहे .
आजीचे संवाद तर काही शब्द सोडता सगळे डोक्यावरून गेले , कदाचित त्यांना तेच अपेक्षित असेल, त्या मुलाला जसे ऐकू येते तसेच आपण ऐकतो वगैरे,

शेवटच्या दृश्यात खूप सारे हस्तर पाहून "ओह shit " असे फिलिंग येते Happy

मला वाटते म्हातारी ला सरकार च्या बापाने (म्हणजे बहुतेक तिच्याच नवर्‍याने) वाड्यात पाठवले असेल.आणि मग तिला ऑन ड्युटी इंज्युरी झाल्यावर जुन्या पुराण्या झोपडीत डंप केले असेल.म्हातारी चे हस्तर च्या संपर्कात काय झाले हे पाहून धसका घेऊन पुढच्या पिढीला मुद्दाम हे सर्व नॉलेज ट्रान्सफर केले नसेल. तिच्या गालात खिळे का आणि कोणी खुपसले हे कळले नाही.
हस्तर ने चावलेल्या राक्षसांना जेवायला घालायचे नियम काय आहेत?ते लोक आजीला सोडून पुण्यात जातात ना?
विनायक ने वर जाताना मित्राला आग लावून मुक्ती दिली मानलं तर मुलगा पहिल्यांदा खाली उतरल्यावर काहीतरी विचारतो तेव्हा हा 'मित्र है मेरे' म्हणून काय सांगत असतो?
भरपूर हस्तर बद्दल सेम सेम. मी पण 'ओह शिट' म्हटल्याचे आठवते.
किरण, हेडिंग बदलून 'भरपूर स्पॉयलर्स, नको असलेल्यांनी वाचू नका' असे काही करता येईल का? Happy

स्पॉइलर अ‍ॅलर्टः
माझ्या समजुतीप्रमाणे विहिरीत देवतेचा जिवंत गर्भ आहे. जेव्हा कुणीही(पुर्वी आजी व नंतर विनायक) कणकेची हस्तरची प्रतिमा घेऊन गर्भाच्या जवळ जातो तेव्हाच हस्तर आपले अंश ती बाहुली खाण्यासाठी पाठवतो. जे येते ते हस्तर नाही. आठवा: हस्तरची मुर्ती. तर हस्तरचा अंश आहे.
आजीचे हस्तरच्या स्पर्षामुळे, ओरबडल्यामुळे जे काही झाले आहे ते तिला जाग आले की अ‍ॅक्टिव्हेट होते, त्यावेळी तिचा आवाज वेगळा असतो व इतर वेळे वेगळा. माझी एक शंका आहे: आजीला साखळदंडाने बांधून ठेवले आहे तर जेव्हा विनायक त्या रात्री तिच्या खोलीचे दार उघडतो तेव्हा ती मोकळी कशी काय असते? शिवाय ती त्याला मारू शकली असती का? किंवा तिला विनायकला मारायचे होते का? हस्तरच्या ओरबाडण्यामुळे शापित झालेल्या व्यक्तिंचा मोटिव्ह माणसांना मारणे असतो का?
१४ वर्षांनंतर तेव्हा विनायक परत घरी येतो तेव्हा आजीचे शरीर एक आख्खी इकोसिस्टीम झालेली असते, तिच्या मुळ्या सर्वत्र पसरलेल्या असतात, हृदय त्यात कुठे तरी धडधडत पडलेले असते, म्हणजे ती आधीपासूनच असे झाड होत होती का? जर तसे असेल तर तिनेच तर सदाशिवला झाडावरून खाली पाडले नाही?
आणि एक खूप खूप मोठी शंका: पांडूरंग जेव्हा त्याला मिळालेली पहिली मोहोर आईला दाखवायला आणतो, तेव्हा तो तिला ती मोहोर उघडून काही तरी खायला देतो, तेव्हा ती विचारते की तुझ्या बापाला हे आवडत नाही का. पांडूरंग म्हणतो की बाबाला काहीच आवडत नाही. तर मोहोरेच्या आत काय असते नेमके?
शिवाय नेमके शेवटच्या वेळेसच विनायकला वरच्या पेटीच्या भोवती पिठाचे वर्तूळ काढायचे कसे सुचते? एरव्ही तर त्याने कधीच ते काढलेले नसते. कणकेची बाहुली जोपर्यंत बाहेर काढलेली नसते तोपर्यंत ती हस्तरची लालसा जागृत करत नसते. हस्तरच्या मनात धान्याबद्दल लालसा आहे कारण आईकडून वारश्याने मिळालेले धान्य त्याला हस्तगत करता आलेले नाही, मात्र त्या लालसेमुळेच तो जवळजवळ मरायच्या गतीला आला होता त्यामुळे त्याच्या मनात धान्याबद्दल अतिव भितीदेखिल निर्माण झालेली आहे. पिठाचा कणमात्र त्याला संपवून टाकू शकतो. मात्र ती भिती फक्त पिठाबद्दल वाटते. पिठात पाणी मिसळून त्याची प्रतिकृती निर्मिली तर स्वत:ची भूक भागवू शकतो. हस्तरला बाहेर यायचे आहे ते धान्याची भूक भागवायला मात्र तो ती भागवणार कशी हे कळत नाही. जर विनायक व पांडूरंग अंगाला पिठ फासू गेले असते तर हस्तरचे अंश त्यांना टरकून राहिले असते असे एकदा मला वाटले मात्र तसे असते तर त्यांना मोहरा मिळाल्या नसत्या कारण हस्तरचे अंश त्यांच्या स्पर्षमात्रे मरून गेले असते.
आजीच्या पुर्वजांपैकी कुणाला तरी हे कळले होते, विधवा आजी हे काम करत असे मात्र लालसेमुळे ती पछाडली गेली आणि त्या पश्चातापातून ती विनायकला सांगते की 'खजिन्याची लालसा तुझ्या मृत्यूस कारणीभूत ठरेल'. आजी, विनायक, पांडूरंग अश्या तीन पिढ्यात ही लालसा क्रमाक्रमाने वाढत गेली आहे. विनायक हे वर्तूळ तोडण्यासाठी आपले बलिदान देतो. मात्र मोहरांचे अमिश दाखवत पांडूरंगला जवळ बोलावतो तेव्हा त्याला पांडूरंगला ठार मारायचे असते का?
आणखी एक शंका: जर सबंध पृथ्वीच त्या आदीम मातृदेवतेचा गर्भ आहे तर मग फक्त तुंबाडच्या वाड्यातच हस्तर कसा आला? त्या वाड्यातल्या कूण्या पुर्वजाने त्याची आठवण काढली व खजिन्यासाठी त्याची पुजा सुरू केली म्हणून? ज्या तळघरात विनायक जात असतो ती जागेच्या भोवती लाल रंगाचे मांस, धमन्या आदींनी युक्त असा गर्भ आहे, तिथे हस्तरला देवतेने लपवून ठेवले आहे. पिठाच्या बाहुलीच्या अमिषाने बाहेर येतो तो केवळ त्याचा अंश तो स्वतः नाही. कारण देवतेने गर्भातून बाहेर न पडण्याच्या अटीवरच त्याला लपवून ठेवले आहे.

हस्तरला भूक आहे ती धान्याची. ती तो आपल्या अंशांकरवी पूर्ण करून घेतो. सोन्याच्या मोहोरा त्यांनी अमिष म्हणून आपणाजवळ बाळगलेल्या आहेत, जोपर्यंत तो बाहुली खाण्यात मग्न असतो तोपर्यंत त्याच्या अंगात असलेल्या मोहोरा घेतल्या तरी चालतात. हीच युक्ती आजी करत होती, विनायक करत होती. मात्र पांडूरंगचा लोभ या आधीच्या दोन पिढ्यांच्या लोभाला वरचढ ठरला. विनायकला जो लोभ आपला सर्वात मोठा गूण वाटला होता तोच अतिरेकी झाल्यामुळे त्याचा नाश ओढवला. 'वारश्यात मिळालेल्या प्रत्येक गोष्टीवर आपला हक्क साम्गायला जाऊ नये' हे या लोभाबद्दल, लालसेबद्दलदेखिल आहे.

एक बारकुशी शंका: हस्तर हे नाव विनायकला माहित नाही त्यामुळे म्हातारी त्याला सोडत नाही. पण म्हातारी असे चिडवते की 'काय? तुला नाव आठवत नाही?' म्हणजे तिला ह्स्तर माहितीय मात्र केवळ विनायक ते नाव घेत नाही म्हणून ती अ‍ॅक्टिव्ह आहे? केवल एक वाक्य बोलून तिच्यावरचा तो प्रभाव गायब होतो. हे जरा अतर्क्य वाटले.

<पण ती म्हातारी, जिला खजिन्याचा पत्ता माहित असतो, ती वाडा सोडून यांच्या घरी काय करत असते ते कळले नाही. >

सरकारला तिची उस्तवार जमेना म्हणून त्याने तिला त्याच्या ठेवलेल्या बाईच्या घरी पाठवले आहे, ती ह्या थेरडीला केवळ मोहरेच्या आशेवर सांभाळत आहे असे मला वाटले.

शिवाय सरकारला खजिन्याचा पत्ता माहित असेल मात्र ती हस्तरला कसे बोलावते व त्याच्याकडून मोहरा कश्या मिळवते हे त्याला माहित नाहे. केटी देण्याआधीच त्या बाईला शाप मिळाला. शिवाय सती जान्यापासूण ती वाचली होती ती केवळ ह्या नॉलेजच्या बळावर, ते स्किल उगाच शिकवून आपली डिपेंडन्सी घालवायची नाही हे तिला माहित होते. कदाचित सरकारला तिने शापित अवस्थेत हे रहस्य सांगितलेदेखिल असते मात्र हस्तरच्या भितीने तिला सतत झोपी घातले गेले त्यामूले जागृत अवस्थेत ती कधी सरकारशी बोललीच नसेल.

पांडूरंग म्हणतो की बाबाला काहीच आवडत नाही. तर मोहोरेच्या आत काय असते नेमके?
>>>>>>>>>>>>> ते साधे चोकलेट होते,

Pages