तुंबाड - धारप व तत्सम गूढ जगाचे रूपेरी पदार्पण (आता स्पॉयलर्स सहीत चर्चा)

Submitted by किरणुद्दीन on 12 October, 2018 - 16:19

1063423_6880936_48.jpg

दोन बहुचर्चित सिनेमे समोर असताना कुठला निवडावा हे अवघड काम होतं. बायकोचा कल अंदाधून कडे होता. मात्र तुंबाड नेफ्लिवर पाहून होणार नाही याची खात्री होती. सुदैवाने अंधाधूनचा लास्ट शो सुरू होऊन अर्धा तास झालेला होता आणि आता फक्त तुंबाड शिल्लक होता...

मी सिनेक्षेत्राशी निगडीत नाही. संबंध असेल तर प्रेक्षक म्हणून. तो ही जाणता नव्हे. पण हा सिनेमा पाहून इतरांना सांगावेसे वाटावे हे या सिनेमाचे यश आहे असे वाटते. गेल्या अनेक वर्षात असे वाटलेले नाही. अगदी सैराटच्या वेळीही नाही. इथे मी कुठलेही सस्पेन्स लीक करत नाही अथवा कथेबद्दलही बोलणार नाही. ती प्रत्येकाने सिनेमाहॉल मधेच एंजॉय करावी.

कारण हा सिनेमा एक ब्रिलियंट सिनेमा आहे. पाहताना जर काही जाणवत असेल तर मेहनत आणि फक्त मेहनत. (दिग्दर्शकाने घेतलेली मेहनत याहीपेक्षा प्रचंड आहे, तो इथे आपला विषय नाही). पहिल्या फ्रेमपासून सिनेमा आपले वेगळेपण ठसवत राहतो. कोकणातले हे गाव आपल्यासमोर पावसाच्या रूपाने जिवंत होते. पण त्याचा फक्त गूढ वातावरणनिर्मितीपुरताच वापर करून घेतला आहे. वायफळ फ्रेम्सला इथे जागा नाही. सिनेमा पहिल्या फ्रेमपासून वेगळ्या धाटणीची गोष्ट सांगायला लागतो.

ही शैली थोडीशी धारपांशी जुळणारी. श्रेयनामावलीत त्यांचे नाव कुठेच नाही. मात्र दिग्दर्शकाने त्यांच्या कथांचा प्रभाव असल्याचे मान्य केले आहे. धारपांच्या कथा वाचताना पहिल्यापासून जाणवलेली गोष्ट म्हणजे याचे व्हिजुअल्स अत्यंत अवघड आहे. प्रत्येकाच्या डोक्यात जे चित्र तयार होते त्याला न्याय देणारे चित्रण अत्यंत अवघड किंबहुना अशक्य आहे असे वाटायचे. मात्र या सिनेमात धारपांची कादंबरी समोर उलगडतेय असे वाटणे हे सर्वात मोठे यश आहे.

दुसरे म्हणजे ही पीरीयड फिल्म आहे. त्या दृष्टीनेही घेतलेली मेहनत दाद देण्यासारखी आहे. नायक लहान असतानाच्या काळ हा स्वातंत्र्यापूर्वी साधारण ३० वर्षांपूर्वीचा आहे. त्या वेळची वाहने, गैरसोयी आणि त्या काळच्या पुण्याचे दर्शन हे सर्व दाद घेऊन जातात. जुनी भांडी, फिरकीचा तांब्या, जुन्या पद्धतीचे घट्ट झाकणांचे डबे, पत्र्याची ट्रंक हे बारीकसारीक तपशील लक्ष वेधून घेतात. सुरूवातीला नायक आजीसाठी ज्या ताटलीत जेवण वाढतो ती नीट पाहिली नाही. बहुधा ती चुकीची घेतली असे नंतर वाटले. खात्री नाही. पुणे दाखवताना पुणेरी पाट्या दाखवण्याचा मोह दिग्दर्शकाला आवरलेला नाही. अगदी सनातन पाट्या असाव्यात या.

कोकणातला पाऊस सतत सोबत करतो. तो वातावरण निर्मिती करतोच. मात्र कॅमेरा प्रकाश आणि छायांचा खेळ टिपत व्हिज्युअल अत्यंत प्रभावी करतो. एका दृश्यात सावकार भुयाराचे दार उघडून खाली पाहतो तेव्हां खालून येणारा उजेड आणि तिथे नेणा-या बोळकांडातला भेसूर अंधार हे दृश्य अक्षरशः मेंदूत कोरलं जातं.

भुयारातून खाली रंवरंव नरक उभा केला आहे. धारपांच्या अनेक कथांत जसा डोळ्यासमोर यावा तसाच. कदाचित बर्वेंना जसा दिसला तसा त्यांनी उभा केल्याने तो इतरांनाही अपील झालेला दिसतो.

सिनेमा कसा आहे ?
खरं म्हणजे कसा आहे हे सांगता येत नाही. सांगूही नये. हा नेहमीचा हॉरर सिनेमा नाही. गूढ कथा आहे. प्रासंगिक विनोदाच्या जागा आहेत. वडलांच्या अंगवस्त्राला लाच देऊन तुझ्याशी लग्न करीन म्हणणारं पोरगं अफलातून. बाप पोराला मोठा झालास की लग्न लावून देईन म्हणतो तेव्हां पोरगं तोपर्यंत काय असा प्रश्न विचारतं.. इथे अक्षरशः फुटायची पाळी आली होती. हा सीन सुचला कसा याचंच नवल जास्त होतं.

दचकवणारे सीन्स नाहीत. फूटेज खाणारे स्वप्नातले शॉट्स नाहीत. नेहमीच्या युक्त्या नाहीत. घाबरा, घाऊक घाबरा असला मामला नाही. प्राचीन किंवा त्याही आधीची अस्तित्त्वं, त्यांच्या सुप्त इच्छा आकांक्षा आणि मानवी स्वभावाचे खेळ यांची सांगड घालून पाहीले तर हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा आहे हे मान्य करावे लागेल. महेश भट किंवा त्यांचे पूर्वज रामसे यांच्या सिनेमांच्या कल्पना डोक्यात असतील तर सिनेमा आवडण्याची शक्यता नाही.

माणसाच्या मनातले भय, लालसा अशा नकारात्मक भावनांची एकमेकांवर कशी मात होते. शाप वगैरे गोष्टी मान्य करून पुढे पाहिलं तर अशा मार्गाने मिळालेलं धन आणि त्यामुळे जीवनात प्रवेश करणा-या काही टाळता येण्यासारख्या गोष्टी. हाती काहीच लागणार नाही अशा मार्गावरचा हा प्रवास यावर एक शब्द न बोलता सिनेमा बोलतो. गानूआजीसारखी एक आजी आहे (हा स्पॉयलर नव्हे). ती बघवत नाही. धारपांच्या वर्णनांप्रमाणे गिळगिळीत, चिकट असे काही बीभत्स रूप आहे तिचे. अशा दृश्यातून भीती दाटून राहते.

या आजीचा संदर्भ पुढे लागतो म्हणून लक्ष द्यायचे.

स्पॉयलर अ‍ॅलर्ट
पिशवीतला खामरा नावाची कथा वाचली असेल तर ती आठवल्याशिवाय राहणार नाही. खामरा वगैरे टिपीकल धारपांची नावे. हा खामरा जीवनात आल्यापासून नायकाला वेगवेगळ्या बायकांची भूक जाणवत असते. ती तो रोज भागवत असतो. अशा रात्री जस जशा जातील तस तसा हा खामरा मोठा आणि शक्तिशाली होत असतो. अशा कथा ज्या वळणाने जातात त्याच वळणाने ही कथाही वाटचाल करते.

राही अनिल बर्वे यांनी पाहीलेल्या या भयानक स्वप्नासाठी त्यांना सलाम !
(सिनेमाची गोष्ट तर सांगितलीच नाही. गोष्टीत जीवच कितीसा ? ऐसा नही चलता क्या ? इनबॉक्स मे आ जाओ फिर )

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<नाही.दोघांच्या पासपोर्ट आणि व्हिसा मध्ये फरक आहे ☺️☺️☺️☺️☺️व्हाम्पायर कडे शेंगान व्हिसा आहे.वेतळाकडे फक्त इंडियन फॉरेस्ट वर्क परमिट.>
हाहाहाहा..

आज जायचे ठरिवले होते पण सकाळी नौचा शो!!! हस्त रच्या वेगाने गेले असते तरी जमणे अवघड होते . साधारण पिक्चर बघायला गेलो की गरमागरम डोबॉल्स, बटर व पेस्तो मग पोलो फोर्झा पिझा खातो. पण क्क्काय कणकेचे गोळे!!! खायचे ह्या विचारा नेच कसे तरी झाले.
आता शनिवार रविवार प्रयत्न करेन.

काहीही म्हणा पण ती गानू आजीच होती, त्या पोराला शेवटच्या क्षणी नाव आठवणं, आजीने त्याला विचारणं विसरलास का नाव, सेम टू सेम.

ते सगळे हस्तरचा अंश नसून खुद्द हस्तरच असतात. सुरवातीला तो हिरो सांगतो हस्तरने सोना मन मर्जीसे उठा लिया और जैसेही अनाज की और बढा बाकी देवताओने उसपर वार करना शुरू किया और वो तीनको तीनको में बिखर गया, त्यामुळे हस्तर एक नसून अनेक असतात, मला वाटतय शेवटी त्यांनी अचानक एवढ्या बाहुल्या नेण्याऐवजी ट्रायल बेसिस वर दोन बाहुल्या न्यायला हव्या होत्या.

मुळात राक्षसाला खाण्यात गुंतवून त्याच्या पंचाला हात घालून नाणी चोरायची आयडिया अत्यंत रिस्की आहे
उद्या राक्षस मल्टी टास्क करून बाहुली खिश्यात ठेवून आधी चावायला लागला तर?
(माझ्या डोक्यात अनेक स्पूफ आणि जाहिराती येतायत.पंचाला हात घातला आणि त्यातून फक्त व्हिसा क्रेडिट कार्ड किंवा मण पप्पूरं गोल्ड बॉण्ड चा कागद निघाला तर ☺️☺️☺️☺️हस्तर गोज डिजिटल)
किंवा पंचात सॅमसोनाईट चा ट्रिपल डिजिटल लॉक वाला अँटी थेफ्ट पाऊच.

मला वाटतय शेवटी त्यांनी अचानक एवढ्या बाहुल्या नेण्याऐवजी ट्रायल बेसिस वर दोन बाहुल्या न्यायला हव्या होत्या.>>>>

तेच तर दाखवायचे आहे. आयुष्यभर आरामात पुरेल इतके सोने आपल्याकडे आहे हे माहीत असूनही धनाचा लोभ पडावा व त्यापायी सारासारविवेकबुद्धी नष्ट व्हावी हीच अधोगती दाखवायची आहे दिग्दर्शकाला. हस्तर तरी काय वेगळा आहे? त्याला ज्याची अजिबात गरज नाही, जे त्याला खाता येणार नाही ते त्याने आधी उचलले.

सावकाराने सून म्हणून बाजारातली बाई उचलुन विनायकला पेश केली. इंग्रज सुनेचे सोंग ओळखतो व म्हणून जोरात हसतो. विनायकही मनातून ओळखत असणार पण त्याचे प्रयोजन तेव्हा लक्षात येत नाही. जेव्हा लक्षात येते तेव्हा त्याचा ज्वर धाडकन उतरतो.

एवढे वाचुन आता चित्रपट पहायची इच्छाच मेली.>>>>

असे करू नका. इथे काहीही लिहिले तरी मोठ्या पडद्यावर पाहायची मजा वेगळी आहे. तुम्ही नंतर छोट्या पडद्यावर पाहिला तर वाईट वाटेल चुकवल्याबद्दल. तो वाडा, ते मोडके घर ज्याच्या दारामागे काही नसेल असे वाटत राहते, कंदिलाचा लालसर प्रकाश, सततचा पाऊस, त्याचा आवाज, विशाल माळरान व त्यावरन प्रवास करणारा, दरवेळी वेगळ्या आर्थिक स्थितीत असणारा विनायक , जुने पुणे , सगळे पाहण्यासारखे आहे.

स्वीगी वरील जाहिरात:
ऑर्डर 4 लार्ज फ्लोअर डो डॉल्स अँड गेट 2 फ्री !!! युज कोड HASTARSBARGAIN
डॉमिनो वाले लगेच एजन्सी घेऊन टाकतील.

एका भय/थरारपटाला एक महान संदेश देणारा चित्रपट बनवू नका हो.
नाहीतर टायटॅनिक हा जुगारात जिंकलेले शेवटी पचनी पडत नाही असा संदेश देणारा चित्रपट म्हणावा लागेल.

काल मुलीने पुण्यात पाहिला. तिला पण तो मराठीत हवा होता असे वाट ले. मी काळजीवाहू पालका प्रमाणे सोबत कोणीतरी घेउन जा. धारप वगैरे पार्श्वभूमि एक दोन वाक्ये मेसेज केलेली. व्हिजुअल्स ग्रेट आहेत असा रिपोर्ट आला. साडेबाराला ती घाबरली नाहीएना ते चेक केले रात्रीतून.

मी अनू वेगळा धागा काढून स्फूफ झालेच पाहिजे नाहीतर मी आंदोलन करेन मग मला डो बॉल्स व पोलोफोर्झा पिझाचा नैवेद्य दाखवावा लागेल.

त्या राही अनिल बर्वे ना ओळख असेल तर सांगा कोणीतरी. युट्युब वर पब्लिक बिनधास्त तुंबाडचे खोत वर पिक्चर आहे असं सांगून तद्दन खोटी स्टोरी वाले व्हिडीओ बनवतायत.त्यांनी पोस्टर वर 'नॉट बेस्ड ऑन तुंबाडचे खोत' असा मोठा ठसठशीत संदेश लिहावा.
ज्यांना माहीत नाही ते लोक एखाद्या अभ्यासकांच्या अविर्भावात पेंडसे कादंबरीवर पिक्चर आहे अशी माहिती परदेशी आणि देशी परप्रांतीय रिव्ह्यूअर्स ना देतायत,माझा हस्तर झालाय.

गणेश मतकरीनी योग्यच लिहिलंय. काय गरज होती कळत नाही "तुंबाड" नाव द्यायची, जेंव्हा त्या नावाचा उल्लेख असलेली दुसरी प्रसिद्ध साहित्यकृती आधीच अस्तित्वात असते.

mee aaj paahila
Kori patee gheun gelele.
AfaaT! Absolutely brilliant.
Multiple hastar yetat to scene kharya arthane climax hota. Our multiplied greed.. And multiplied impact.
I could very well relate it to environmental issues and our current actions and what lies ahead.

Shevat positive kela he pan far changal vatal.
To darwaja lavun gheto - so closure.

It was mindblowing experience. I didnt speak for 15 mins after coming out. Very rare for me. Happy

Ganu aajji was sinister.
This aaji was greedy and is victim now.
But she herself is not sinister.

सुचेता, पुण्यात सर्व ठिकाणी आहे.मी आता सिटी प्राईड राहाटणी, औंध वेस्ट एन्ड आणि अभिरुची चेक केले
तुम्ही एखादे पाहिले असेल ज्या ठिकाणी हा आलेलाच नाही.

I could very well relate it to environmental issues and our current actions and what lies ahead.

+10000000

Shevat positive kela he pan far changal vatal.
To darwaja lavun gheto - so closure.

+1000000

Pages