तुंबाड - धारप व तत्सम गूढ जगाचे रूपेरी पदार्पण (आता स्पॉयलर्स सहीत चर्चा)

Submitted by किरणुद्दीन on 12 October, 2018 - 16:19

1063423_6880936_48.jpg

दोन बहुचर्चित सिनेमे समोर असताना कुठला निवडावा हे अवघड काम होतं. बायकोचा कल अंदाधून कडे होता. मात्र तुंबाड नेफ्लिवर पाहून होणार नाही याची खात्री होती. सुदैवाने अंधाधूनचा लास्ट शो सुरू होऊन अर्धा तास झालेला होता आणि आता फक्त तुंबाड शिल्लक होता...

मी सिनेक्षेत्राशी निगडीत नाही. संबंध असेल तर प्रेक्षक म्हणून. तो ही जाणता नव्हे. पण हा सिनेमा पाहून इतरांना सांगावेसे वाटावे हे या सिनेमाचे यश आहे असे वाटते. गेल्या अनेक वर्षात असे वाटलेले नाही. अगदी सैराटच्या वेळीही नाही. इथे मी कुठलेही सस्पेन्स लीक करत नाही अथवा कथेबद्दलही बोलणार नाही. ती प्रत्येकाने सिनेमाहॉल मधेच एंजॉय करावी.

कारण हा सिनेमा एक ब्रिलियंट सिनेमा आहे. पाहताना जर काही जाणवत असेल तर मेहनत आणि फक्त मेहनत. (दिग्दर्शकाने घेतलेली मेहनत याहीपेक्षा प्रचंड आहे, तो इथे आपला विषय नाही). पहिल्या फ्रेमपासून सिनेमा आपले वेगळेपण ठसवत राहतो. कोकणातले हे गाव आपल्यासमोर पावसाच्या रूपाने जिवंत होते. पण त्याचा फक्त गूढ वातावरणनिर्मितीपुरताच वापर करून घेतला आहे. वायफळ फ्रेम्सला इथे जागा नाही. सिनेमा पहिल्या फ्रेमपासून वेगळ्या धाटणीची गोष्ट सांगायला लागतो.

ही शैली थोडीशी धारपांशी जुळणारी. श्रेयनामावलीत त्यांचे नाव कुठेच नाही. मात्र दिग्दर्शकाने त्यांच्या कथांचा प्रभाव असल्याचे मान्य केले आहे. धारपांच्या कथा वाचताना पहिल्यापासून जाणवलेली गोष्ट म्हणजे याचे व्हिजुअल्स अत्यंत अवघड आहे. प्रत्येकाच्या डोक्यात जे चित्र तयार होते त्याला न्याय देणारे चित्रण अत्यंत अवघड किंबहुना अशक्य आहे असे वाटायचे. मात्र या सिनेमात धारपांची कादंबरी समोर उलगडतेय असे वाटणे हे सर्वात मोठे यश आहे.

दुसरे म्हणजे ही पीरीयड फिल्म आहे. त्या दृष्टीनेही घेतलेली मेहनत दाद देण्यासारखी आहे. नायक लहान असतानाच्या काळ हा स्वातंत्र्यापूर्वी साधारण ३० वर्षांपूर्वीचा आहे. त्या वेळची वाहने, गैरसोयी आणि त्या काळच्या पुण्याचे दर्शन हे सर्व दाद घेऊन जातात. जुनी भांडी, फिरकीचा तांब्या, जुन्या पद्धतीचे घट्ट झाकणांचे डबे, पत्र्याची ट्रंक हे बारीकसारीक तपशील लक्ष वेधून घेतात. सुरूवातीला नायक आजीसाठी ज्या ताटलीत जेवण वाढतो ती नीट पाहिली नाही. बहुधा ती चुकीची घेतली असे नंतर वाटले. खात्री नाही. पुणे दाखवताना पुणेरी पाट्या दाखवण्याचा मोह दिग्दर्शकाला आवरलेला नाही. अगदी सनातन पाट्या असाव्यात या.

कोकणातला पाऊस सतत सोबत करतो. तो वातावरण निर्मिती करतोच. मात्र कॅमेरा प्रकाश आणि छायांचा खेळ टिपत व्हिज्युअल अत्यंत प्रभावी करतो. एका दृश्यात सावकार भुयाराचे दार उघडून खाली पाहतो तेव्हां खालून येणारा उजेड आणि तिथे नेणा-या बोळकांडातला भेसूर अंधार हे दृश्य अक्षरशः मेंदूत कोरलं जातं.

भुयारातून खाली रंवरंव नरक उभा केला आहे. धारपांच्या अनेक कथांत जसा डोळ्यासमोर यावा तसाच. कदाचित बर्वेंना जसा दिसला तसा त्यांनी उभा केल्याने तो इतरांनाही अपील झालेला दिसतो.

सिनेमा कसा आहे ?
खरं म्हणजे कसा आहे हे सांगता येत नाही. सांगूही नये. हा नेहमीचा हॉरर सिनेमा नाही. गूढ कथा आहे. प्रासंगिक विनोदाच्या जागा आहेत. वडलांच्या अंगवस्त्राला लाच देऊन तुझ्याशी लग्न करीन म्हणणारं पोरगं अफलातून. बाप पोराला मोठा झालास की लग्न लावून देईन म्हणतो तेव्हां पोरगं तोपर्यंत काय असा प्रश्न विचारतं.. इथे अक्षरशः फुटायची पाळी आली होती. हा सीन सुचला कसा याचंच नवल जास्त होतं.

दचकवणारे सीन्स नाहीत. फूटेज खाणारे स्वप्नातले शॉट्स नाहीत. नेहमीच्या युक्त्या नाहीत. घाबरा, घाऊक घाबरा असला मामला नाही. प्राचीन किंवा त्याही आधीची अस्तित्त्वं, त्यांच्या सुप्त इच्छा आकांक्षा आणि मानवी स्वभावाचे खेळ यांची सांगड घालून पाहीले तर हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा आहे हे मान्य करावे लागेल. महेश भट किंवा त्यांचे पूर्वज रामसे यांच्या सिनेमांच्या कल्पना डोक्यात असतील तर सिनेमा आवडण्याची शक्यता नाही.

माणसाच्या मनातले भय, लालसा अशा नकारात्मक भावनांची एकमेकांवर कशी मात होते. शाप वगैरे गोष्टी मान्य करून पुढे पाहिलं तर अशा मार्गाने मिळालेलं धन आणि त्यामुळे जीवनात प्रवेश करणा-या काही टाळता येण्यासारख्या गोष्टी. हाती काहीच लागणार नाही अशा मार्गावरचा हा प्रवास यावर एक शब्द न बोलता सिनेमा बोलतो. गानूआजीसारखी एक आजी आहे (हा स्पॉयलर नव्हे). ती बघवत नाही. धारपांच्या वर्णनांप्रमाणे गिळगिळीत, चिकट असे काही बीभत्स रूप आहे तिचे. अशा दृश्यातून भीती दाटून राहते.

या आजीचा संदर्भ पुढे लागतो म्हणून लक्ष द्यायचे.

स्पॉयलर अ‍ॅलर्ट
पिशवीतला खामरा नावाची कथा वाचली असेल तर ती आठवल्याशिवाय राहणार नाही. खामरा वगैरे टिपीकल धारपांची नावे. हा खामरा जीवनात आल्यापासून नायकाला वेगवेगळ्या बायकांची भूक जाणवत असते. ती तो रोज भागवत असतो. अशा रात्री जस जशा जातील तस तसा हा खामरा मोठा आणि शक्तिशाली होत असतो. अशा कथा ज्या वळणाने जातात त्याच वळणाने ही कथाही वाटचाल करते.

राही अनिल बर्वे यांनी पाहीलेल्या या भयानक स्वप्नासाठी त्यांना सलाम !
(सिनेमाची गोष्ट तर सांगितलीच नाही. गोष्टीत जीवच कितीसा ? ऐसा नही चलता क्या ? इनबॉक्स मे आ जाओ फिर )

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पहीला.
झक्कास किरणुद्दिन. चित्रपटाची चौकट छान उभी केलीत. तुम्ही परीक्षण छान लिहीतात. पु.प.(रीक्षणाच्या) प्र.

अगदीच पटले.
पिरीयड आणि हिंदीतल्या मराठी वातावरणाच्या सिनेमात दिसणारे मराठीपण या बाबतीत इतर अनेक सो कॉल्ड सन्माननिय सिनेमांच्या खूप जास्त वरती जातो तुंबाड. अगदीच कुठे तुम्ही म्हणता तसं ताटली किंवा तत्सम गोष्टी आहेत. संवादांमधले एकदोन ठिकाणचे फिलर टाइपचे काही संदर्भ मला पिरियड सोडून वाटले. पण त्याने काहीच बिघडत नाही. मूळ टेक्श्चर इतकं घट्ट आणि थेट आहे. दृश्य टेक्श्चर्सवरही खूप मेहनत घेतलेली आहे.
पुणेरी पाट्या हा प्रकार थोडा इंडल्जंट आहे त्यात पण अति केले नाहीये हे एक आणि जो असह्य ताण निर्माण झालेला असतो त्यात रिलीफ मिळतो त्याने.

त्या पाट्या आल्यावर काहीतरी उगाच ब्रिलियंट बोलले पाहिजे अशी हौस असलेल्या एका इंडस्ट्री ज्येष्ठाने "बघा हे तेव्हापासून आहे." असा विनोद करायचा निष्फळ प्रयत्न केला. त्याच्या बरोबर आलेले कुटुंबियही हसले नाहीत त्यावर. ते पुरेसे मोठ्याने बोलल्याने मागच्या ओळीतही मला ऐकू आले. मग मी मनातल्या मनात कपालबडवती करून घेतली तीन सेकंद आणि सिनेमा पाहू लागले.

>> बाप पोराला मोठा झालास की लग्न लावून देईन म्हणतो तेव्हां पोरगं तोपर्यंत काय असा प्रश्न विचारतं.. इथे अक्षरशः फुटायची पाळी आली होती. हा सीन सुचला कसा याचंच नवल जास्त होतं.<<
तो स्पेशल राही टच आहे. Happy

बादवे दिग्दर्शकाचे नाव राही अनिल बर्वे आहे. अनिल राही बर्वे नाही. Happy

वा वा! छान लिहिलंय. अगदी नेमकं.
तुंबाड बघाणार. माझ्या जवळ्च्या थेटरात मॅटीनी पासुन संध्याकाळ पर्यंत तीनही शो लवयात्री चेच Sad
अंधाधुन बघायचाच म्हणुन लास्ट शो ला गेलो. सगळ्या थेटरात अंधाधुन एकच लास्ट शो.
तुंबाडचं तर नाव पण नाही.

लिहिलय भारी. चित्रपट पहात नाही फारसे पण हा पहाणार.
(नाही आवडला तर दिग्दर्शकाला नाही, तर तुम्हाला जबाबदार धरणार. Lol )

तुंबाड मला बघायचाय. १९-२० वर्षाच्या मुला बरोबर बघू शकतो का?

ऑकवर्ड होण्यसारखे सीन वगैरे आहेत का?

खुपच भारी लिहलय ... रहस्य मुठीत बंद ठेवूनही वाचकांना सिनेमाच्या कहाणीतल्या गुढार्थाने झपाटून टाकण्यात लेखकाला छान यश आलंय.

स्पॉयलर नाही हे ठळकपणे लिहल्यामुळे पुर्ण लेख शांतीत वाचला.तशी थोडीफार कथा माहितच आहे.
मस्त लिहलय हे ही.

पाथफाइंडर, मी अनु, मानव, भुईकमळ, सस्मित आभारी आहे.

नीधप
अनवधानाने माझ्याकडून नाव अशा पद्धतीने लिहीले गेले. माफ करा. हो , पाट्यांमुळे विरंगुळा निर्माण होतो हे अगदी खरं आहे.

विनीता झक्कास
पाहू शकता नक्की.

शाली..
आवडेल कि नाही हे सांगणे अवघड आहे. वेगळा अनुभव नक्की मिळेल याची खात्री आहे. भयपट समजून जाऊ नये म्हणजे निराशा हाती लागणार नाही. सिनेमा भयावर आहे मात्र भयपट नाही.

छान.
ट्रेलर मुद्दाम पाहिला नाही. काहीच वाचले नाहीये अजुन. पण प्लिज एका विनोदी प्रश्नाचे उत्तर द्या. हा सिनेमा मराठी आहे की हिंदी?

हिंदी आहे??? ऑ??? Lol

मी तर तुंबाड मराठी सिनेमा आहे असं समजत होते Uhoh

लेख/परीक्षण छान..
धारपांबद्दलच्या सर्व मतांशी संपूर्ण पणे सहमत..

<<सिनेमा भयावर आहे मात्र भयपट नाही.>>
हे मस्त... अतिशय मस्त वाक्य..
बर्याचशा लोकांना हा फरक माहिती नसतो..
निदान रामसे वगैरेंना कळला असता तर....

ही शैली थोडीशी धारपांशी जुळणारी. श्रेयनामावलीत त्यांचे नाव कुठेच नाही. >>> धारपांचं नाव आहे श्रेयनामावलीत.

छान लिहिलं आहे. 'भय' ज्या पद्धतीने आणि निरनिराळ्या माध्यमांतून समोर येतं- त्याबद्दलही लिहिलं असतं, तर आणखी परिपूर्ण रसग्रहण झालं असतं.

दृश्य टेक्श्चर्सवरही खूप मेहनत >>> अगदी अगदी! इतकी जबरदस्त आणि जीवघेणी व्हिज्युअल्स क्वचितच बघायला मिळतात.
शीर्षकापासूनच सिनेम्याचं वेगळेपण सुरू होतं. राही ग्रेट आहे खरंच..

मै भी मराठीच समझा!
हिंदी है तो हैद्राबादमदे नजीकच किधर लगा होगा, देखता हूं।

'भय' ज्या पद्धतीने आणि निरनिराळ्या माध्यमांतून समोर येतं >>>

@ साजिरा - अनेक गोष्टी लिहीताना टाळल्या. कारण पहिलाच दिवस होता. कथेचा जीव अगदी थोडा आहे. जे काही खिळवून ठेवतं ते गोष्ट सांगण्याची पद्धत आहे. ट्रेलर पाहताना त्यांनीही ब-याच गोष्टी टाळल्यात हे जाणवलं. याउलट स्त्री मधे मोजकीच भयदृश्ये आहेत, ती सर्वच्या सर्व प्रोमोमधे वापरल्याने सिनेमा पाहताना मिठाचा खडा लागल्याप्रमाणे होतं. हा विचार करून आवरतं घेतलं.

यावर बहुतांचा सिनेमा पाहून झाल्यावर चर्चेला खरी रंगत येऊ शकेल असे वाटते. प्रतिसादात ते वाचणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अगदी का आवडला नाही हे सुद्धा ...

हो, तेही खरंच..
(जोवर तुम्ही 'हा रिव्ह्यु आहे' असं जाहीर करत नाही, तोवर सारं ओके :फिदी:)

चांगलं लिहिलंयत.
लहान मुलांना घेऊन जावे का? (आमच्यासाठी प्रमुख प्रश्न.) लेख वाचून उत्तर ‘नाही’ असावे असे वाटतेय, पण तरी विचारतोय.

तुंबाड हा राही बर्वेचा ड्रीम प्रोजेक्ट आहे ही माहिती वाचनात आली होती. आज सकाळी इंग्लीश वर्तमानपत्रांमधे (पोर्टल्सवर) रिव्हू वाचले तेव्हां कुणी निर्माता / अभिनेता सोहम शहाला श्रेय दिले आहे, कुणी वितरक कम निर्माता मुकुंद शर्माला दिले आहे. त्यात राहीचे नाव नाही. हे धक्कादायक आहे.
https://indianexpress.com/article/entertainment/bollywood/rajkumar-hiran...

बऱ्याच ठिकाणी राही ना श्रेय दिले आहे.सोहम अभिनेता आणि आनंद राय आधीचे पिक्चर यामुळे ते जास्त माहितीतले असून त्यांचाच उल्लेख होणं साहजिक आहे.पण जे अनुभवी रिव्ह्यूअर्स आहेत त्यांनी राही ना श्रेय दिले आहे.(मी आजच बरेच तुंबाड रिव्ह्यू व्हिडिओ पाहिले म्हणून आठवले)

किरणुद्दीन जी तुमचा परीक्षणात्मक लेख चित्रपटाचे दिग्दर्शक राही बर्वे याना खूप आवडला आहे . आपला सम्पर्क क्रमांक कॄपया मला पाठविणे

Pages