साहित्य आणि दृकश्राव्य माध्यम - पुस्तके आणि चित्रपट

Submitted by हायझेनबर्ग on 21 August, 2018 - 10:24

'रोमिओ ज्युलिएट' पासून 'ब्युटी अँड द बीस्ट' पर्यंत
'गॉडफादर' पासून 'सेक्रेड गेम्स' पर्यंत,
'सिंहासन' पासून 'गेम ऑफ थ्रोन्स' पर्यंत
'लॉर्ड ऑफ द फ्लाईज' पासून 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज' पर्यंत आणि
'शायनिंग थ्रू' पासून 'राझी' पर्यंत

ह्या सगळ्या चित्रपटांना जोडणारा समान धागा कुठला असे विचारले तर पटकन लक्षात येते की हे सगळे चित्रपट लिखित स्वरूपातील साहित्यकृतीवर आधारलेले आहेत.
आपण दरवर्षी शेकडो चित्रपट/नाटके/वेबसिरिज/डॉक्युंमेंट्री बघतो पण दरवेळी त्या कलाकृतीचा मूळ ऊगम तिचा जन्मदाता आपल्याला अनभिज्ञ असतो.थोडा प्रयत्न केल्यास आपण साहित्यकृतीवर आधारित चित्रपट/नाटके/वेबसिरिज/डॉक्युंमेंट्री ची जंत्री ईथे बनवू शकतो. सगळ्यांना ह्या माहितीचा निश्चितच ऊपयोगी होईल.
साहित्य आणि सिनेमाचे भाषेचे बंधन नाही. साहित्य आणि चित्रपटाची जुजबी माहिती (उदा. साल, लेखक वगैरे) आणि दोहोंची लिंक जोडणारा एकतरी दुवा (ऊदा. विकी लिंक) प्रतिसादात दिल्यास अधिक माहिती मिळवू ईच्छिणार्‍याला सुरूवात करण्यास सोपे जाईल.
डॉक्युमेंट्री आणि नाटकांसाठी यू-ट्यूब वा तत्सम विडिओज चालतील, पण घटना/भाषणे/गाणी/फॅनमेड विडिओज टाळल्यास बरे होईल.

पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे पुस्तक आणि चित्रपटाबद्दल तुमची मते, अभ्यास, संशोधन, माहिती प्रतिसादात नक्की लिहा.

लिखित कलाकृती आधी आणि त्यावर बेतलेले चित्रपट/नाटक/ वेबसिरिज हे महत्व अधोरेखीत करण्यासाठी धागा चित्रपट सदरात न ऊघडता 'वाचू आनंदे' ह्या सदरात ऊघडला आहे.
जुना (सध्या बंद पडलेला) धागा असल्यास त्या धाग्याची लिंक ईथे टाकून हा धागा पुढे चालवू शकतो.

टीप - प्रतिसाद देतांना पुस्तकाचे/सिनेमाचे नाव बोल्ड टाईपमध्ये लिहाल्यास चाळतांना सोपे जाईल एखादे नाव सापडायला.

'द गॉडफादर'

धाग्यात गॉडफादरचे नाव आले आहे तर सुरूवात गॉडफादरनेच करतो.
१९६९ साली आलेल्या मारिओ पुझोच्या 'द गॉडफादर' ह्या कादंबरीवरच बेतलेला पहिला सिनेमा 'द गॉडफादर' १९७२ साली आला आणि त्यानंतर ऊरलेले दोन भाग १९७४ आणि १९९० साली आले. 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज' आणि नंतर 'हॅरी पॉटर पुस्तकांना' लोकाश्रय मिळण्याआधी बायबल खालोखाल सर्वात जास्तं वाचली/विकली गेलेली कादंबरी होती गॉडफादर (ऐकीव माहिती).
ईटलीतल्या सिसिली (जिथले योद्धे प्राचीन काळी शूरवीर म्हणून प्रसिद्धं होते) मधून सावकारापासून जीव वाचवून पळालेला एक लाजरा मुलगा अमेरिकेत येऊन सात घराण्यांनी व्यापलेल्या गुन्हेगारी जगताचा सगळ्यांना पुरून ऊरणारा अनभिशिक्त सम्राट कसा होतो त्याची आणि त्याच्या पुढच्या दोन पिढ्यांची कहानी म्हणजे 'गॉडफादर'
पुस्तक आणि चित्रपट दोन्हीही आपापल्या क्षेत्रात यश आणि गुणवत्तेचे मापदंड आहेत. चित्रपटाने, पुझो बरोबरच कपोला (डिरेक्टर), ब्रँडो, डी नीरो आणि अल पचिनोला अनंत काळासाठी यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले.
मराठीतल्या सिंहासन आणि सामनासारखेच कधीही बघितले तरी आजिबात आऊटडेटेड न वाटणारे सिनेमे आहेत गॉडफादर. ह्या नंतर गुन्हेगारांना ग्लोरिफाय करणार्‍या सिनेमांची लाटच आली. रामूची 'सरकार' मालिकाही ह्यावरच बेतलेली आहे.

https://en.wikipedia.org/wiki/The_Godfather_(novel)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो वावे अनेकदा आवडलेले चित्रपट हे एका अगदीच सामान्य साहित्यवस्तूवरही आधारलेले असू शकतात.

मी बर्‍याच वाचल्यात त्यांच्या. फार कमी नावे लक्षात आहेत.
आता लायब्ररीत गेले की सगळ्या शोधून एकेक पान तरी वाचून काढेन म्हणजे मला आठवेल वाचलीये की नाही आणि कशावर आहे ते.

धाग्याची गरजच उरत नाही मग.. >> अहो धागा नाही उरला तर तुमची लिंक कशी उरेल? Lol शेखचिल्लीची गोष्ट वाचली/पाहिली आहे का लिहा पाहू इथे summary.

> Submitted by नीधप on 31 August, 2018 - 22:08 > प्रतिसाद आवडला. थोडंफार याच अर्थाचं मी टंकून ठेवलेलं ते तसेच पेस्टतेय.

===
निकोल किडमन आणि शैलीन वूडले यांचा उल्लेख केल्यानंतर लियान मोरीआर्टीच्या Big Little Lies या पुस्तकावरून बनलेली त्याच नावाची मिनीसिरीज आठवणे साहजिक आहे.

शब्द, पानांची मर्यादा नसल्यामुळे पुस्तकात पात्रं नीट-सविस्तर develop केलेली असतात, भरपूर घटना- त्याबद्दल वेगवेगळ्या पात्रांचा दृष्टिकोन अगदी डिटेलमधे लिहिलेला असतो. हे सगळं दोन तासांच्या चित्रपटात बसवणे जवळपास अशक्य असतं. वेळ, बजेटच्या मर्यादा येतात. काही घटना, पात्रं यांची काटछाट करावी लागते. आणि मग चित्रपट कितीही चांगला बनवला तरी पुस्तकाचे लॉयल फॅन समाधानी होऊ शकत नाहीत, ते तक्रार करत राहतात. यावर एक चांगला उपाय म्हणजे मिनिसिरीज बनवणे. ७-८ तासांचा चित्रपट. यांचं शक्यतो बिन्ज करायचं. एनिवे तर

निकोल, शैलीन सोबत रिज वेदरस्पून, लॉरा डर्न, झोइ क्रवित्झ अशा सगळ्या सुंदर बायकांची गर्दी असलेली ही ७ भागांची मालिका जीन-मार्क वॅलीने दिग्दर्शित केली आहे.
समुद्रकिनार्यावरील एका श्रीमंत, सुशेगाद गावात जेन ही एकल पालक रहायला येते. मुलाच्या शाळेतील पहिल्याच दिवशी तिची ओळख मॅडलीन आणि सेलेस्ट यांच्याशी होते. एकेकाळी स्वतःदेखील एकल पालक असल्याने सहानुभुती वाटून मॅडी लगेच जेनला आपल्या पंखाखाली घेते. पहिल्याच दिवशी अशी काहीतरी घटना घडते की नोकरी न करणारी, अर्धवेळ नोकरी करणारी आणि अतिशय यशस्वी करीअर असणारी असे 'आई'चे वेगवेगळे गट तयार होतात आणि त्यांच्यात शीतयुद्धला सुरवात होते, ते वाढत जाते. प्रत्येकजण आपल्या भूत/वर्तमानकाळातले ओझे घेऊन वावरत आहे, प्रतिक्रिया देत आहे. हे इतके वाढत जाते की एक खून होतो. कोणाचा खून झाला, कोणी आणि का केला याचा फ्लॅशबॅक हे कथानक. बाहेरून चकाचक दिसणाऱ्या घरात, लग्नात, पालकांत दडलेले सांगाडे दाखवणारी हि मालिका नक्की पहा.

मला परत एकदा पुस्तकापेक्षा सिरीज आवडली कारण:
• दिग्दर्शन
• अभिनय
• भरपूर ऐमी नामांकन आणि विजेते आहेत या मालिकेला.
• २०१९ मध्ये दुसरा सिझन येईल ज्यात मेरीला स्ट्रीप आहे.

जिलियन फ्लीनचे मला सर्वात जास्त आवडलेले पुस्तक Sharp Objects आणि त्याच नावाची जीन-मार्क व्हॅलीने (तोचतो Big Little Lies वाला. याचे जुने काम बघायला हवे आणि पुढे कोणता प्रोजेक्ट घेतो त्यावर लक्ष ठेवायला हवे) दिग्दर्शीत केलेली ८ भागांची मिनीसिरीज.

३३ वर्षांची अविवाहित कमील प्रिकर 'शिकागो डेली पोस्ट' मधे गुन्हेवार्ताहर म्हणून काम करतेय. तिच्या जन्मगावी गेल्या वर्षी एका ९ वर्षांच्या मुलीचा (ऍन) खून झाला होता आणि आता दुसरीएक १० वर्षांची मुलगी (नताली) हरवली आहे. याचे वार्तांकन करायला कमील घरी येते. पुढच्या १५ दिवसात काय घडते त्याबद्दलची ही गोष्ट.

पुस्तक आणि सिरीज दोन्ही समप्रमाणात चांगले आहेत कारण:
• लेखिका, दिग्दर्शक दोघे आपापल्या क्षेत्रात माहीर आहेत.
• पुस्तक वाचले नसल्यास काही गोष्टी (खासकरून शेवट) समजण्यास अवघड वाटू शकतो असे सोमिवरच्या काही पोस्ट्स वाचून वाटले. पण दिग्दर्शकाने चमच्याने भरवणे केले नाही एवढेच त्याबद्दल म्हणता येईल.
• मालिकेत जो काही बदल केला आहे व्यक्तिरेखेत, घटनांत, त्या कधी घडतात यात तो improvementच आहे.
• संगीत थोर आहे.
• सगळ्यांचा अभिनय झकास झालाय. खासकरून कमीलचे काम करणारी एमी अॅडम्स जबरदस्त. एमीला एमी मिळालेच पायजे! खरंतर बक्षिसांच्याबाबतीत हे 'नेक्स्ट बिग लिटल लाईज'च असणार आहे Wink
• यात एक 'गर्ल पॉवर'बद्दलचा सिन आहे आणि दुसरा 'कन्सेन्ट म्हणजे काय' याबद्दलचा. त्यावर घमासान चर्चा होऊ शकते :-|
• सगळ्यात शेवटी imdb वरच्या एकाचे शब्द उसने घेऊन हेच म्हणेन की हे बघून/वाचून झाल्यावर If you want to restore your faith in humanity then watch something else.

===
सहज उत्सुकता म्हणून: BLL आणि SO वाचलेल/बघितलेल कोणीच नाहीय का माबोवर?

<< अपने पराए (उत्पल दत्त, अमोल पालेकर, आशालता, भारती आचरेकर, शबाना, बहुतेक गिरीश कर्नाड सुद्धा) पाहिलाय. >>

माझ्या मते शबाना आजमी चा अभिनय या चित्रपटात सर्वोत्तम झाला आहे.

चित्रपट समजून बघायच्या वयात पाहिलेला अत्यंत आवडता चित्रपट म्हणजे अल पचिनो चा "सेंट ऑफ अ वुमन". मूळ इटालियन कादंबरी आणि इटालियन चित्रपटावर बेतलेला हा चित्रपट बॉलीवूड मध्ये कॉपी झाला नाही त्याचे अतीव दु:ख!

मी तर स्टार कास्ट ही ठरवली होती. हिंदी त नसीरुद्दीन शाह अल पचिनो च्या भुमिकेत चपखल बसला असता. मराठीत नाना!

अप इन द एअरः
जॉर्ज क्लुनी आणि वेरा फार्मिगा यांच्या प्रमुख भुमिका असलेला हा सिनेमा याच नावाच्या वॅल्टर किमच्या कादंबरीवर आधारीत आहे. मला कादंबरी एव्हडी खास आवडली नाही, पण चित्रपट आवडतो.
जॉर्ज क्लुनीने स्मगनेस आणि आत्मविश्वासू रायन बिंघमचे व्यक्तिमत्व सुंदर उभे केले आहे. त्याचबरोबर तो नुसता कोरडा, लोकांना नोकरीवरून काढायला घेतलेला भाडोत्री 'गुंड' न वाटता स्वतःचे काम करणारा, एकटा राहणारा, स्वतःच्या जीवनशैलीत गुरफटून गेलेला आणि ती जीवनशैली 'आवडणे' मान्य केलेला रायन बिंघम तुमच्या-आमच्या सारखा सामान्य माणूस वाटतो. वेरा फार्मिगा मला आवडते. ती स्कॉर्ससीच्या डिपार्टेडमध्ये आहे.

मस्त ओळख अ‍ॅमी आणि टवणे.
अनुभवी क्लूनीपुढे नवख्या अ‍ॅना केंड्रिकचे आधी ऊत्साहात असलेले आणि नंतर डिप्रेशनमध्ये जाणारे पात्रही सही अ‍ॅडिशन होती.

छान आहे पण मला गॉन गर्ल जास्त आवडते, >> मॅगी, गॉन गर्ल बद्दल लिहिणार का?

सिनेमातले रोझामंड पाईकचे विक्षिप्तं वागणे आठवून अजूनही तौबा तौबा काय बाई आहे असे म्हणावेसे वाटते.
म्हणजे रोझामंड पाईक विदाऊट गॉन गर्लच्या रेफरंस ने आठवली तरी तसेच म्हणावेसे वाटते पण ते आपले प्रेमाने. Proud

'गर्ल विथ द ड्रॅगन टॅटू' आणि त्या सिरीज बद्दल लिहितो वेळ मिळाला की, रूनी मारा आणि डॅनिअल क्रेग ला घेऊन हॉलिवुड वाले एकाच पुस्तकावर सिनेमा बनवून थांबले पण स्वीडीश आणि फ्रेंचांनी लार्सनच्या सगळ्या पुस्तकांवर सिनेमे आणि वेबसिर्रिज बनवले आहेत. दुर्दैवाने हे बघायला लार्सन जिवंत नाही.

अ‍ॅमी यांची पुस्तके व चित्रपटांची यादी पाहिल्यास मी यातले फारसे वाचलेले वा पाहिलेले नाही असे लक्षात येतय. या धाग्यामुळे बघू यातले काही वाचले जाते का ते.

> छान आहे पण मला गॉन गर्ल जास्त आवडते, > गॉन गर्लमुळेच मला जिलियन फ्लिन माहित झाली. आणि ते पुस्तक भन्नाटच आहे. पण मला शार्प ऑब्जेक्टस जास्त आवडले त्यानंतर गॉन गर्ल आणि मग डार्क प्लेसेस.

बादवे Dark Places वरपण चित्रपट बनला आहे. चार्लीझ थेरन आहे त्यात. मी पाहिला नाही.

===
> मॅगी, गॉन गर्ल बद्दल लिहिणार का? > गॉन गर्ल पुस्तकाबद्दल मी https://www.maayboli.com/node/61384 इथे लिहिले होते. तेच कॉपी पेस्ट करते:

निक आणि एमी यांच्या लग्नाचा ५वा वाढदिवस आहे. नेहमीप्रमाणे न्याहरी करुन निक कामाला (बहिणीसोबत चालू केलेला बार) जातो. थोड्या वेळाने घरासमोर राहणार्याचा फोन येतो की तुमच्या घराचं दार सताड उघडं आहे. निक घरी येऊन पाहतो तर हॉलमधलं सामान विखुरलं आहे आणि एमी गायब झालीय. मग पोलीसतपास, खून/अपहरणची शक्यता, आसपासच्या भागात एमीचा शोध, मिडीया सर्कस इ. चालू होतं आणि सांगाडे कपाटातून बाहेर पडू लागतात. निकला बायको गायब झाल्याचं दुःख, काळजी वाटत नाही. तिचे मित्रमैत्रीण कोण, तिचं घरातलं रुटीन काय अशा साध्या प्रश्नांची उत्तरं त्याला देता येत नाहीत. एवढंच काय तिचा रक्तगटदेखील त्याला आठवत नसतो. अधिक तपासात नुकताच एमीचा जीवनविमा दुप्पट केल्याचं कळतं. आणि अर्थातच संशयाची सुई त्याच्याकडे वळते. पुढे काय होतं ते जाणून घेण्यासाठी पुस्तक नक्की वाचा किंवा चित्रपट बघा.

> सिनेमातले रोझामंड पाईकचे विक्षिप्तं वागणे आठवून अजूनही तौबा तौबा काय बाई आहे असे म्हणावेसे वाटते > आपल्यालातर फार आवडली. माझे यूजरनाव तिच्यावरूनच घेतले आहे Wink

> म्हणजे रोझामंड पाईक विदाऊट गॉन गर्लच्या रेफरंस ने आठवली तरी तसेच म्हणावेसे वाटते पण ते आपले प्रेमाने. Proud > २००५ सालीचा किएरा नाईटलेचा Pride and Prejudice बघितला आहे का? त्यात आहे रोजमण्ड पाईक Proud

===
टवणे सर, वाचा वाचा आणि आवडली तर सांगा Happy

प्राईड अॅंड प्रेजुडिसचं मराठी भाषांतर वाचायला घेतलं होतं ते महाबोअर होतं. पण टेक देऊन वाचून काढलं एकदा आणि कादंबरी आवडली. सिनेमाही बघितला तर आवडला.
The four women ( की little women) ही कादंबरी पण जेन ऑस्टिनचीच आहे का? शांता शेळक्यांनी ' चौघीजणी' नावाने अनुवाद केला आहे. तीही छान आहे. चित्रपट त्याच नावाने आहे की नाही ते माहीत नाही. थोडा पाहिला आहे.

यावरून आठवलं, मी प्राईड अँड प्रेज्युडिस पुस्तक कध्धीचं विकत घेऊन ठेवलंय; पण अजून वाचलं नाहीये. Proud

त्यावरची बीबीसीची सहा (?) भागांची मालिका आणि कॉलिन फर्थ-जेनिफर एहल ही जोडी आपली फेव्हरिट!
त्या तुलनेत किएरा नाईट्लेचा सिनेमा फारसा आवडला नाही; म्हणजे त्याचं कास्टिंग अजिबातच आवडलं नाही.

बचपन की सुनहरी यादें क्याटेग्रीत यावरची दूरदर्शन मालिका 'तृष्णा', दर रविवारी सकाळी १०-११ असायची; आम्ही ९वी-१०वीत असताना त्या मालिकेसाठी रविवारी सकाळचा ८-१० क्लास आटोपून धावतपळत घर गाठायचो. तेव्हा त्यातले सगळे कलाकार आवडले होते. आता परत पाहताना कसं वाटेल माहिती नाही.

अ‍ॅमीच्या पोस्टी आवडल्या.

Little women वर अमोल पालेकरांची मालिका होती की.. कच्ची धूप
आशुतोष गोवारीकर होता त्यात

२००५ सालीचा किएरा नाईटलेचा Pride and Prejudice बघितला आहे का? त्यात आहे रोजमण्ड पाईक >> हो हो.. रोझामंड मोठी अ‍ॅक्ट्रेस नसतांना ती पॉरोच्या एका एपिसोडमध्ये दुय्यम भुमिकेत होती तेव्हापासून आवडतेच... टिपिकल ईंंग्लिश रोझ फेस यु नो Proud
Pride and Prejudice ही बघितला आहे.

फ्लिनला वाचकांची नस चांगली सापडली आहे.. पण मला फ्लिनची पुस्तकं तेवढी आवडत नाही... कारण तेच कॅरॅक्टर बिल्डिंगपेक्षा नाट्ट्यावर जास्त भर...त्यामुळे मला स्टेफानी मायर्सही आजिबात आवडत नाही. डार्क प्लेसेस सिनेमा थ्रेऑन (ती स्वतः असाच ऊच्चार करते) मुळे तरून गेला... अन्यथा काही खास नव्हता... फ्लिनचे फक्त गॉन गर्ल वाचले आहे.

Little women वर अमोल पालेकरांची मालिका होती की.. कच्ची धूप
आशुतोष गोवारीकर होता त्यात>> अच्छा. हे माहिती नव्हतं.

आहाहा कच्ची धूप.. दर रविवारी सकाळी ११ वाजता लागायची बहुतेक.
सोमवारी शाळेत सगळ्या जणी कधी एकदा मधली सुट्टी होतेय आणि कालच्या एपिसोडबद्दल बोलतोय आपण या मोडमधे असायचो आम्ही.
तेव्हा आशुतोष गोवारीकर क्रश वगैरे होता.

>>देवदासची कल्पना ज्याच्यावरून उचलली (असे कुठेतरी वाचले होते) ते The Idiot पुस्तक वाचले आहे. अतिशय आवडले.
देवदास ही मुळात शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांची बंगाली कादंबरी आहे आणि चित्रपट त्यावर आहे. इंग्रजी पुस्तकावरून कसा बेतला असेल ?

> अॅमीच्या पोस्टी आवडल्या. > धन्यवाद ललिताप्रीति.
'तृष्णा' मालिकेबद्दल काहीच माहित नाही. तेव्हा आम्ही फार लहान होतो. बहुतेक आमच्या घरी टीव्हीपण नसेल Lol

===
> The four women ( की little women) ही कादंबरी पण जेन ऑस्टिनचीच आहे का? > नाही याची लेखिका Louisa May Alcott. मी पुस्तक वाचले नाही आणि सिनेमा/मालिका पाहिली नाही.

===
> रोझामंड मोठी अॅक्ट्रेस नसतांना ती पॉरोच्या एका एपिसोडमध्ये दुय्यम भुमिकेत होती तेव्हापासून आवडतेच... टिपिकल ईंंग्लिश रोझ फेस यु नो Proud > पॉरो मालिका अजून बघायची आहे. ख्रिस्तीची सगळी पुस्तकं वाचून नाही झालीत (लाज वाटली पाहीजे :राग:)

> फ्लिनला वाचकांची नस चांगली सापडली आहे.. पण मला फ्लिनची पुस्तकं तेवढी आवडत नाही... कारण तेच कॅरॅक्टर बिल्डिंगपेक्षा नाट्ट्यावर जास्त भर...त्यामुळे मला स्टेफानी मायर्सही आजिबात आवडत नाही. डार्क प्लेसेस सिनेमा थ्रेऑन (ती स्वतः असाच ऊच्चार करते) मुळे तरून गेला... अन्यथा काही खास नव्हता... फ्लिनचे फक्त गॉन गर्ल वाचले आहे. > हम्म

===
> देवदास ही मुळात शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांची बंगाली कादंबरी आहे आणि चित्रपट त्यावर आहे. इंग्रजी पुस्तकावरून कसा बेतला असेल ? > देवदास या कादंबरीची कल्पना/थीम दोस्तोएव्हस्कीच्या The Idiot पुस्तकवरून मिळालेली/उचललेली/बेतलेली आहे.

हो आणि स्टेफानी मायर्स वाचतो ही चार चौघात सांगण्यासारखी गोष्ट नाही.. लोकांना आपलं पॅकेज कळतं. ती शिक्रेट मध्ये वाचावीत.. ट्रेन मध्ये वगैरे वाचणार असाल पुस्तकाला दुसरे एखादे कवर घालून घेऊन जावे. Proud

रॉबर्ट गलब्राइथ aka J.K. Rowlingने लिहिलेली Cormoran Strike या खाजगी गुप्तेहेरची आतापर्यंत ३ पुस्तक आली आहेत The Cuckoo’s Calling, The Silkworm आणि Career of Evil. चौथे आजच आले Lethal White नाव आहे.

तर या तीन पुस्तकांवर बनलेली अनुक्रमे ३+२+२ असे एकेक तासचे भाग असलेली Strike किंवा C.B. Strike नावाची मालिका बघितली.

२५० पानांच्या पुस्तकाला ८ तास दिले कि Sharp Objects बनते आणि ४५०च्या आसपास पानं असलेल्या पुस्तकाला ३/२ तासात कोंबल कि Strike बनते. पुस्तकं बर्यापैकी आवडली होती मला. मालिकामात्र गंडली आहे. नाही बघितली तरी चालेल.

> हो आणि स्टेफानी मायर्स वाचतो ही चार चौघात सांगण्यासारखी गोष्ट नाही.. लोकांना आपलं पॅकेज कळतं. ती शिक्रेट मध्ये वाचावीत.. ट्रेन मध्ये वगैरे वाचणार असाल पुस्तकाला दुसरे एखादे कवर घालून घेऊन जावे. P > हा हा Lol मला मजा आलेली ट्वायलाइट पुस्तकं वाचायला. त्याचे फॅनफिक Fifty Shades मात्र कव्हर घालून वाचावे Proud

रडायला लावणाऱ्या प्रेमकथा आवडत असतील तर जोजो मोएसने लिहिलेली Me before you वाचा.

खळ्या पडणारा सॅम क्लॅफ्लीन किंवा सुबक ठेंगणी एमिलिया क्लार्क आवडत असेल तर त्याच नावाचा चित्रपट बघा. पण चित्रपटात बरेच काही हरवले आहे.

इंग्लंडमधल्या एका छोट्याश्या खेड्यातील कॅफेमधे वेट्रेसचे काम करून घर चालवणारी २६ वर्षांची लुइजा क्लार्क. अचानक नोकरी जाते आणि पैशांची गरज असल्याने तिला एका राजपुत्राची paid companion बनावे लागते. काहीजण चांदीचा चमचा घेऊनच जन्माला येतात. सौंदर्य, मेंदू, पैसा, आयुष्य भरभरून जगायची जिगर असलेला हा एकेकाळचा उमदा तरुण एका तद्दन फालतू अपघातामुळे मानेपासून खाली पॅरालाईज झाला आहे. या दोघांमधले ह्ळुवार नाते आणि त्याचा दुखद शेवट....

Pages