साहित्य आणि दृकश्राव्य माध्यम - पुस्तके आणि चित्रपट

Submitted by हायझेनबर्ग on 21 August, 2018 - 10:24

'रोमिओ ज्युलिएट' पासून 'ब्युटी अँड द बीस्ट' पर्यंत
'गॉडफादर' पासून 'सेक्रेड गेम्स' पर्यंत,
'सिंहासन' पासून 'गेम ऑफ थ्रोन्स' पर्यंत
'लॉर्ड ऑफ द फ्लाईज' पासून 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज' पर्यंत आणि
'शायनिंग थ्रू' पासून 'राझी' पर्यंत

ह्या सगळ्या चित्रपटांना जोडणारा समान धागा कुठला असे विचारले तर पटकन लक्षात येते की हे सगळे चित्रपट लिखित स्वरूपातील साहित्यकृतीवर आधारलेले आहेत.
आपण दरवर्षी शेकडो चित्रपट/नाटके/वेबसिरिज/डॉक्युंमेंट्री बघतो पण दरवेळी त्या कलाकृतीचा मूळ ऊगम तिचा जन्मदाता आपल्याला अनभिज्ञ असतो.थोडा प्रयत्न केल्यास आपण साहित्यकृतीवर आधारित चित्रपट/नाटके/वेबसिरिज/डॉक्युंमेंट्री ची जंत्री ईथे बनवू शकतो. सगळ्यांना ह्या माहितीचा निश्चितच ऊपयोगी होईल.
साहित्य आणि सिनेमाचे भाषेचे बंधन नाही. साहित्य आणि चित्रपटाची जुजबी माहिती (उदा. साल, लेखक वगैरे) आणि दोहोंची लिंक जोडणारा एकतरी दुवा (ऊदा. विकी लिंक) प्रतिसादात दिल्यास अधिक माहिती मिळवू ईच्छिणार्‍याला सुरूवात करण्यास सोपे जाईल.
डॉक्युमेंट्री आणि नाटकांसाठी यू-ट्यूब वा तत्सम विडिओज चालतील, पण घटना/भाषणे/गाणी/फॅनमेड विडिओज टाळल्यास बरे होईल.

पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे पुस्तक आणि चित्रपटाबद्दल तुमची मते, अभ्यास, संशोधन, माहिती प्रतिसादात नक्की लिहा.

लिखित कलाकृती आधी आणि त्यावर बेतलेले चित्रपट/नाटक/ वेबसिरिज हे महत्व अधोरेखीत करण्यासाठी धागा चित्रपट सदरात न ऊघडता 'वाचू आनंदे' ह्या सदरात ऊघडला आहे.
जुना (सध्या बंद पडलेला) धागा असल्यास त्या धाग्याची लिंक ईथे टाकून हा धागा पुढे चालवू शकतो.

टीप - प्रतिसाद देतांना पुस्तकाचे/सिनेमाचे नाव बोल्ड टाईपमध्ये लिहाल्यास चाळतांना सोपे जाईल एखादे नाव सापडायला.

'द गॉडफादर'

धाग्यात गॉडफादरचे नाव आले आहे तर सुरूवात गॉडफादरनेच करतो.
१९६९ साली आलेल्या मारिओ पुझोच्या 'द गॉडफादर' ह्या कादंबरीवरच बेतलेला पहिला सिनेमा 'द गॉडफादर' १९७२ साली आला आणि त्यानंतर ऊरलेले दोन भाग १९७४ आणि १९९० साली आले. 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज' आणि नंतर 'हॅरी पॉटर पुस्तकांना' लोकाश्रय मिळण्याआधी बायबल खालोखाल सर्वात जास्तं वाचली/विकली गेलेली कादंबरी होती गॉडफादर (ऐकीव माहिती).
ईटलीतल्या सिसिली (जिथले योद्धे प्राचीन काळी शूरवीर म्हणून प्रसिद्धं होते) मधून सावकारापासून जीव वाचवून पळालेला एक लाजरा मुलगा अमेरिकेत येऊन सात घराण्यांनी व्यापलेल्या गुन्हेगारी जगताचा सगळ्यांना पुरून ऊरणारा अनभिशिक्त सम्राट कसा होतो त्याची आणि त्याच्या पुढच्या दोन पिढ्यांची कहानी म्हणजे 'गॉडफादर'
पुस्तक आणि चित्रपट दोन्हीही आपापल्या क्षेत्रात यश आणि गुणवत्तेचे मापदंड आहेत. चित्रपटाने, पुझो बरोबरच कपोला (डिरेक्टर), ब्रँडो, डी नीरो आणि अल पचिनोला अनंत काळासाठी यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले.
मराठीतल्या सिंहासन आणि सामनासारखेच कधीही बघितले तरी आजिबात आऊटडेटेड न वाटणारे सिनेमे आहेत गॉडफादर. ह्या नंतर गुन्हेगारांना ग्लोरिफाय करणार्‍या सिनेमांची लाटच आली. रामूची 'सरकार' मालिकाही ह्यावरच बेतलेली आहे.

https://en.wikipedia.org/wiki/The_Godfather_(novel)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या अगदीच आऊट ऑफ फॅशन असले तरी पुस्तका इतकेच प्रभावी सिने रूपांतर म्हणून श्यामची आई आठवले.

जैत रे जैत कादंबरी जास्त भावते, चित्रपटात साक्षात स्मिता पाटील असली तरी चिंधी व्यक्तिरेखा कादंबरीत ज्या प्रमाणे वर्णिली त्याच्या विपरीत शरीरयष्टीची असलेली आहे

बनगरवाडी ही पुस्तकच जास्त आवडले

मला " पॉपीलॉन" कादंबरी वर आधारलेल्या,त्याच नावाच्या चित्रपटापेक्षा, पुस्तक जास्त आवडले आहे. अर्थात चित्रपटाच्या वेळेच्या मर्यादा लक्षात घेता,सर्वच कादंबरीतील घटना,चित्रपटात सामिल करणे शक्य नसते.

भुवन शोम बंगाली लेखक बोनोफूल यांची अत्यंत छोटेखानी कादंबरी (नॉवेलेट).
भुवन शोम हा एक रेल्वेमधला अफसर बंगाली बाबू, विधुर, पन्नाशीच्या आसपासचा. अतिशय कडक, दोषी माणसाला लगेच शासन करणारा म्हणुन प्रसिद्ध. तो एकदा सुट्टीवर खेडेगावात शिकारीसाठी जातो. भुवन बाबुंना फक्त पुस्तकी शिकार माहिती असते. तिथे एक पंधरा एक वर्षाची आयुष्यभर खेड्यातच राहिलेली 'गावठी' मुलगी त्याला शिकारीत मदत करते. या व्यतिरिक्त एक सब प्लॉट. बस इतकेच.

पुस्तक सुंदर आहेच व सिनेमाही तितकाच अप्रतिम. उत्पल दत्तनी भुवन शोमची भुमिका केली आहे तर सुहासिनी मुळेंनी गावाकडच्या मुलीची. मृणाल सेन दिग्दर्शक.

जीएंच्या 'कैरी' कथेवरचा हिंदी सिनेमा पाहिल्याचं आठवतंय, चांगला होता.

प्रभातचा कंकू हा अतिशय सुंदर सिनेमा ह.ना. आपट्यांच्या 'न पटणारी गोष्ट' कादंबरीवर आधारित होता.

पुस्तकाहून किंवा निदान पुस्तकाइतकाच त्यावर आधारित असणारा सिनेमा आवडला असं फार क्वचित होतं, जेन ऑस्टिनच्या 'सेन्स अ‍ॅन्ड सेन्सिबिलिटी'चं एमा थॉम्पसनने केलेलं अडॉप्टेशन सुंदर होतं. त्याला 'बेस्ट अडॉप्टेड स्क्रीनप्ले'चं वेल डिझर्व्ड ऑस्करही मिळालं होतं.

आयन रॅन्डच्या फाउंटनहेड कादंबरीवर सिनेमा निघालेला माहीत आहे, पण बघायची हिंमत झालेली नाही, होणार नाही. Happy

आणखी आठवतील तसे लिहिते.

कुंकू 'पण लक्षात कोण घेतो' वर आधारित नाहीये नक्कीच (ती संपूर्णपणे वेगळी गोष्ट आहे). बहुदा ह नांच्याच 'न पटणारी गोष्ट' वर आधारित आहे.

छान धागा! अंडर द टस्कन सन हा
त्याच नावाच्या पुस्तकावर आधारित सिनेमा आहे. पुस्तकात एका अमेरिकन लेखिकेचे टस्कनी इटली येथे घेतलेल्या व्हिलामध्ये रहायला जाताना आलेल्या अनुभवांचे कथन केले आहे. एकदम खुसखुशीत भाषा आहे. आणि शंभर एक पानं तर मस्त मस्त रेसिपीज आहेत (असे दुसरे पुस्तक नसावे!)
अंडर द टस्कन चित्रपटात कथानक थोडे बदलले आहे. माझ्या मते पुस्तक आणि सिनेमा दोन्ही आपापल्या जागी उत्तम झाले आहेत.

१. पंखांना ओढ पावलांची - शांता निसळ = उंबरठा
२. सिंहासन, मुंबई दिनांक - अरुण साधू = सिंहासन
३. श्यामची आई - साने गुरुजी = श्यामची आई
४. बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर = बनगरवाडी (अमोल पालेकरने माती खाल्लीये मुख्य पात्र उभे करताना)

५. सूरज का सातवां घोडा - धर्मवीर भारती = सूरज का सातवा घोडा
६. पथेर पांचाली - विभूतीभूषण बंदोपाध्याय = पथेर पांचाली, अपराजित, अपूर संसार
७. नष्टनीड - रवीन्द्रनाथ टागोर = चारुलता
८. शतरंज के खिलाडी - प्रेमचंद = शतरंज के खिलाडी
९. सद्गती - प्रेमचंद = सद्नती
१०. सूर्य की अंतिम किरणसे सूर्य के पहले किरणतक - सुरेंद्र वर्मा = अनाहत
११. अग्नि मत्तु मले - गिरिश कर्नाड = अग्निवर्षा
१२. नागमंडल - गिरिश कर्नाड = नागमंडल (कन्नड चित्रपट)
१३. डिस्कवरी ऑफ इंडिया - नेहरू = भारत एक खोज (अनेको जुन्या हिंदी मालिका साहित्यावर आधारित होत्या)

इंग्लिशमध्ये शेकड्याने हजारोने आहेत. इतर जण लिहितीलच.

आयन रॅन्डच्या फाउंटनहेड कादंबरीवर सिनेमा निघालेला माहीत आहे, पण बघायची हिंमत झालेली नाही, होणार नाही. Happy >> फाऊंटन हेडचे माहित नाही पण 'अ‍ॅटलास श्रग्ड' वर तीन भागांचा सिनेमा निघाला होता. चाळीस दशके ह्या कादंबरीवर सिनेमा बनवण्याचे अर्धा डझन तरी प्रयत्न झाले पण एकही प्रयत्न पूर्ण्त्वास जाऊ शकला नाही. शेवटी २०१० साली पहिला भाग आला. पण तीन भागांची ही मालिका ईतकी लो बजेट आणि तिसर्‍य किंवा चौथ्या फळीतल्या कलाकारांना घेऊन बनवली होती की पहिल्या भागाच्या पहिल्या पंधरा मिनिटातच सगळ्या ऊत्साहावर विरझन पडले.

रॅंडच्या एवढ्या ईंपॅक्टफुल कादंबर्‍यांवर सिनेमे न बनवता येण्यामागचे कारण काय असावे? त्यात ठासून भरलेल्या सांगण्यास/समजावण्यास कठीण अश्या फिलॉसॉफी चा ओवरडोस का?

https://en.wikipedia.org/wiki/Atlas_Shrugged

स्वाती तू 'लॉर्ड ऑफ द फ्लाईज' पुस्तकावर लिहिलेलेस ना... त्याची लिंक देणार का कृपया? आयताच दस्तावेज होऊन जाईल ईथे.

कृपया.. पुस्तकाचे/सिनेमाचे नाव बोल्ड टाईपमध्ये लिहाल का सगळे प्रतिसादात.
चाळतांना सोपे जाईल सापडायला.

वरदा यादी बेष्टंच...

चोखेर बाली - याच नावाची रवींद्रनाथांची कादंबरी
देवदास - शरच्चंद्र चट्टोपाध्याय
पहेली - विजयदन देठांची 'दुविधा'

अरे झक्कास... मस्त धागा... बर्‍याच कलाकृती बघायला मिळेल अन लिश्टित टाकून ठेवता येईल आता... धन्यवाद..

>>> रॅंडच्या एवढ्या ईंपॅक्टफुल कादंबर्‍यांवर सिनेमे न बनवता येण्यामागचे कारण काय असावे
कादंबर्‍यांचा आवाका आणि लार्जर दॅन लाइफ पात्रं! Happy

'लॉर्ड ऑफ द फ्लाइज' पुस्तकावरचा माझा लेख

>>> रॅंडच्या एवढ्या ईंपॅक्टफुल कादंबर्‍यांवर सिनेमे न बनवता येण्यामागचे कारण काय असावे
कादंबर्‍यांचा आवाका आणि लार्जर दॅन लाइफ पात्रं! Happy >> हं पटलेच.
आता नेटफ्लिक्स आणि प्राईमच्या जमान्यात तरी वेबसिरिजच्या माध्यमातून त्या प्रयत्नांना यश येवो.... थोडी फार सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन बनवल्यास रँडच्या कादंबर्‍या आणि विषय आजच्या काळातही रिलेवंट वाटतील.

लिंक साठी धन्यवाद स्वाती.

रॅंडच्या एवढ्या ईंपॅक्टफुल कादंबर्‍यांवर सिनेमे न बनवता येण्यामागचे कारण काय असावे
>>>
त्या एका विशिष्ट वयातच आवडतात. एव्हड्या छोट्या डेमोग्राफिकसाठी महागडा सिनेमा बनवणे परवडत नसेल Wink

१. काबुलीवाला - लेखक रर्विद्रनाथ टागोर . ए मेरे प्यारे वतन .... हे अप्रतिम गाणे असलेला चित्रपट
२. डे ऑफ जॅकल- लेखक - फ्रेडरिक फोरसिथ ,अधिक माहीती.>>> http://www.esakal.com/saptarang/marathi-news-sakal-saptranga-esakal-prav...

अरे चित्रपट व कादंबर्‍यांबद्दल पण लिहा. नुसती यादी नको. >> हो हो! एका प्रतिसादात एकच कादंबरी-सिनेमा लिंक आली तरी चालेल.
नुसता यादीप्रपंच कंटाळवाणा होईल.
मी सांगत असलेली कादंबरी आणि त्यावरचा सिनेमा ह्यापैकी किमान एकतरी मीच पहिल्यांदा वाचली/पाहिला आहे आणि आता त्याचे काही ओळीत Synopsis लिहित आहे असे समजून लिहा. Happy जसे टण्याने 'भुवन शोम' बद्दल लिहिले आहे.

सध्या क्रिस्टिन हॅना चे २०१५ चे बर्‍यापैकी गाजलेले 'The Nightingale' वाचत आहे.

दुसर्‍या महायुद्धात दोन वेगवेगळे (१. जे जे होईल ते ते पहावे आणि २. क्रांती) रस्ते निवडलेल्या आईविना वाढलेल्या दोन फ्रेंच बहिणींची,
वडिलांशी युद्धाच्या पार्श्वभुमीवर बदलणार्‍या त्यांच्या नातेसबंधांची,
त्यांच्यावर होणार्‍या जर्मन सैनिकांच्या अत्याचाराची
आणि एकाच्या बलिदानावर युद्धाचा अंत पाहून पुढे जीवन जगण्याची संधी मिळालेल्या दुसर्‍याची (एक मोठे गुपित लपवलेली) जीवनयात्रा
ह्यावर बेतलेली ही हलवून सोडणारी, विचार करायला भाग पाडणारी अशी कादंबरी आहे.

कादंबरीत, क्रांतीच्या वाटेवर चालणार्‍या एका बहिणीचे पात्र महायुद्धातल्याच एका अनसंग हीरो च्या व्यक्तीमत्वावर बेतलेले आहे.

ह्या कादंबरीवर त्याच नावाचा सिनेमा पुढच्या वर्षी जानेवारीत येत आहे. ज्याचे दिग्दर्शन 'ब्रेकिंग बॅड' आणि 'गेम ऑफ थ्रोन्स' चे एपिसोड दिग्दर्शित करणार्‍या मिशेल मॅक्लारेन करणार आहेत. स्टारकास्ट अजून कळालेली नाही.

अरेच्चा साधारण असाच धागा काढायचा माझा कधीपासून विचार होता. आता गणपतीनंतरच काढू म्हणून शांत बसलेले. पण बरं झालं मी आळशीपणा केला ते Lol

===
> आयन रॅन्डच्या फाउंटनहेड कादंबरीवर सिनेमा निघालेला माहीत आहे, पण बघायची हिंमत झालेली नाही, होणार नाही.
कादंबर्यांचा आवाका आणि लार्जर दॅन लाइफ पात्रं! >
हो फारच लार्जर दॅन लाईफ पात्र आहेत आणि ती खऱ्या आयुष्यातदेखील अस्तित्वात असू शकतात अशा प्रकारे कथा लिहिलेली आहे. म्हणजे सुपरहिरो वगैरेंसारखं सगळ्यांनाच माहितीये हे काल्पनिक आहे तसं नाही Lol
मला पुस्तक, चित्रपट दोन्ही ठीकच वाटलेले.

===
'पुस्तक कि चित्रपट/मालिका: कोणते जास्त चांगले?' असा धागा मी काढणार होते. त्यावर थोडाफार विचारदेखील केलेला. त्यामुळे मी जे लिहीन ते साधारण त्याच पद्धतीचे असेल.

===
तर सुरुवात (अर्थातच!) श्वशांक रिडम्पशनने:

स्टीफन किंगच्या Rita Hayworth And The Shawshank Redemption पुस्तकावर बेतलेला The Shawshank Redemption हा चित्रपट.

बायको आणि तिच्या प्रियकराचा खुन केल्याच्या चुकीच्या आरोपावरून तुरुंगवास झालेला बँक कर्मचारी. पांढरपेशा नोकरी, आयुष्यातून एकदम तुरुंगात, गुन्हेगारांमधे जाऊन रहावे लागल्यास काय होईल? पण आपला हिरो तिथे राहतो, survive करतो, तालुनसुखवून तिथून बाहेर पडतो. कथानायकची भूमिका टीम रॉबिन्सने केली आहे आणि narrator दुसरा एक कैदी मॉर्गन फ्रीमन आहे. चित्रपट तिकीटखिडकीवर फारसा चालला नव्हता पण आता तो मास्टरपीस गणला जातो.

मला चित्रपटापेक्षा पुस्तक जास्त आवडले. कारण (स्पॉइलर अलर्ट - तुरुंगाधिकार्याने कैद्यांना राबवून, बेकायदेशीररित्या मिळावलेला पैसा घेऊन अँडी पळून जातो असे चित्रपटात दाखवले आहे. पण पुस्तकात तसे नाही. तुरुंगात येण्याआधीची आपली थोडीफार जमापुंजी विश्वासू मित्राकडे सोपवून, त्याची नीट गुंतवणूक करायला सांगूनच अँडी इकडे आलेला असतो. या फरकामुळे चित्रपटातील अँडी पुस्तकातील अँडीपेक्षा थोडा खालच्या पातळीवर जातो. दुसरा फरक म्हणजे चित्रपटातील अँडी कधीच खचत नाही. पुस्तकातमात्र तो एकदा पूर्ण खचलेला, निराश झालेला दाखवला आहे.)

चिं. त्र्यं. खानोलकरांच्या चानी या कादंबरीवरून त्याच नावाचा व्ही शांताराम यांचा चित्रपट.

खानोलकरांच्या कालाय तस्मै नम: या नाटकावरून अमोल पालेकर यांचा अनकही हा चित्रपट. जयदेव यांचं संगीत आणि पं.भीमसेन जोशींनी गायलेली दोन गाणी.

अर्धसत्यचा उल्लेख आलाय का वर?
पानवलकरांची कथा, तेंडुलकरांचा अप्रतिम स्क्रीनप्ले...
मूळ कथेचं नाव लक्षात आहे का कुणाच्या? सूर्य होतं बहुतेक नावात असं आठवतंय.

बाकी नाटकांना साहित्यकृती मानायचे असेल तर
शेक्सपिअरची समस्त नाटके. प्रत्येकावर विविध भाषांमधे विविध प्रकारे चित्रपट झाले आहेत. नुकतेच पाह्यलेले थोडेसे अपरिचित उदाहरण म्हणजे 'टायटस अ‍ॅण्ड्रोनिकस' वर केलेला हिंदी सिनेमा. द हंग्री. मला तरी जाम आवडला. अ‍ॅमेझॉनवर आहे. हिंदीतही मॅकबेथ वर मकबूल, ऑथेल्लोवर ओंकारा, हॅम्लेटवर हैदर हे भारद्वाजी सिनेमे आहेतच. त्यातला बेस्ट माझ्या दृष्टीने हैदर.
आय होप कुणाला मिडसमर वर हिंदी सिनेमा करण्याची अवदसा न सुचो. Proud

नाटकांमधेच तेंडुलकरांच्या कमला वर त्याच नावाचा तेवढाच परिणामकारक सिनेमा आणि तितकीच गचाळ घाणेरडी सिरीयल झालेली आहे.
घाशीरामवरचा सिनेमा पूर्ण गंडला होता.

नीधप, कथेचं आणि कथासंग्रहाचं नाव सूर्य.
कथा साधारण चित्रपट जिथे मध्यांतर आहे तिथवर संपते. त्याचा बाप त्याच्या अंगावर चादर पांघरतो असा कथेचा शेवट आहे बहुदा. तेंडुलकरांनी पटकथा बहुतेक पुढे वाढवली असावी. तेंडुलकर आणि पानवलकर चांगले मित्र होते तेव्हा पटकथेत विशेष करून वाढवलेल्या भागात पानवलकरांचाही हात असण्याची शक्यता आहे
प्रिया तेंडुलकरांनी विजय तेंडुलकर व पानवलकरांच्या मैत्रीवर फार सुंदर लेख लिहिला आहे.

Pages