साहित्य आणि दृकश्राव्य माध्यम - पुस्तके आणि चित्रपट

Submitted by हायझेनबर्ग on 21 August, 2018 - 10:24

'रोमिओ ज्युलिएट' पासून 'ब्युटी अँड द बीस्ट' पर्यंत
'गॉडफादर' पासून 'सेक्रेड गेम्स' पर्यंत,
'सिंहासन' पासून 'गेम ऑफ थ्रोन्स' पर्यंत
'लॉर्ड ऑफ द फ्लाईज' पासून 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज' पर्यंत आणि
'शायनिंग थ्रू' पासून 'राझी' पर्यंत

ह्या सगळ्या चित्रपटांना जोडणारा समान धागा कुठला असे विचारले तर पटकन लक्षात येते की हे सगळे चित्रपट लिखित स्वरूपातील साहित्यकृतीवर आधारलेले आहेत.
आपण दरवर्षी शेकडो चित्रपट/नाटके/वेबसिरिज/डॉक्युंमेंट्री बघतो पण दरवेळी त्या कलाकृतीचा मूळ ऊगम तिचा जन्मदाता आपल्याला अनभिज्ञ असतो.थोडा प्रयत्न केल्यास आपण साहित्यकृतीवर आधारित चित्रपट/नाटके/वेबसिरिज/डॉक्युंमेंट्री ची जंत्री ईथे बनवू शकतो. सगळ्यांना ह्या माहितीचा निश्चितच ऊपयोगी होईल.
साहित्य आणि सिनेमाचे भाषेचे बंधन नाही. साहित्य आणि चित्रपटाची जुजबी माहिती (उदा. साल, लेखक वगैरे) आणि दोहोंची लिंक जोडणारा एकतरी दुवा (ऊदा. विकी लिंक) प्रतिसादात दिल्यास अधिक माहिती मिळवू ईच्छिणार्‍याला सुरूवात करण्यास सोपे जाईल.
डॉक्युमेंट्री आणि नाटकांसाठी यू-ट्यूब वा तत्सम विडिओज चालतील, पण घटना/भाषणे/गाणी/फॅनमेड विडिओज टाळल्यास बरे होईल.

पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे पुस्तक आणि चित्रपटाबद्दल तुमची मते, अभ्यास, संशोधन, माहिती प्रतिसादात नक्की लिहा.

लिखित कलाकृती आधी आणि त्यावर बेतलेले चित्रपट/नाटक/ वेबसिरिज हे महत्व अधोरेखीत करण्यासाठी धागा चित्रपट सदरात न ऊघडता 'वाचू आनंदे' ह्या सदरात ऊघडला आहे.
जुना (सध्या बंद पडलेला) धागा असल्यास त्या धाग्याची लिंक ईथे टाकून हा धागा पुढे चालवू शकतो.

टीप - प्रतिसाद देतांना पुस्तकाचे/सिनेमाचे नाव बोल्ड टाईपमध्ये लिहाल्यास चाळतांना सोपे जाईल एखादे नाव सापडायला.

'द गॉडफादर'

धाग्यात गॉडफादरचे नाव आले आहे तर सुरूवात गॉडफादरनेच करतो.
१९६९ साली आलेल्या मारिओ पुझोच्या 'द गॉडफादर' ह्या कादंबरीवरच बेतलेला पहिला सिनेमा 'द गॉडफादर' १९७२ साली आला आणि त्यानंतर ऊरलेले दोन भाग १९७४ आणि १९९० साली आले. 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज' आणि नंतर 'हॅरी पॉटर पुस्तकांना' लोकाश्रय मिळण्याआधी बायबल खालोखाल सर्वात जास्तं वाचली/विकली गेलेली कादंबरी होती गॉडफादर (ऐकीव माहिती).
ईटलीतल्या सिसिली (जिथले योद्धे प्राचीन काळी शूरवीर म्हणून प्रसिद्धं होते) मधून सावकारापासून जीव वाचवून पळालेला एक लाजरा मुलगा अमेरिकेत येऊन सात घराण्यांनी व्यापलेल्या गुन्हेगारी जगताचा सगळ्यांना पुरून ऊरणारा अनभिशिक्त सम्राट कसा होतो त्याची आणि त्याच्या पुढच्या दोन पिढ्यांची कहानी म्हणजे 'गॉडफादर'
पुस्तक आणि चित्रपट दोन्हीही आपापल्या क्षेत्रात यश आणि गुणवत्तेचे मापदंड आहेत. चित्रपटाने, पुझो बरोबरच कपोला (डिरेक्टर), ब्रँडो, डी नीरो आणि अल पचिनोला अनंत काळासाठी यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले.
मराठीतल्या सिंहासन आणि सामनासारखेच कधीही बघितले तरी आजिबात आऊटडेटेड न वाटणारे सिनेमे आहेत गॉडफादर. ह्या नंतर गुन्हेगारांना ग्लोरिफाय करणार्‍या सिनेमांची लाटच आली. रामूची 'सरकार' मालिकाही ह्यावरच बेतलेली आहे.

https://en.wikipedia.org/wiki/The_Godfather_(novel)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तसं नसावं हाब. वांग लुंगचं जमिनीवरचं प्रेम कधीच आटत नाही. ओ-लानवर त्याचं प्रेम असतं का? हो आणि नाही. त्याला ती काम करण्यासाठी हवी असते. त्याला ती आवडतही असते. पण त्या काळातल्या चिनी मनोधारणेनुसार स्त्री म्हणजे बटीक. मुलगी जन्माला आली हेही ' a slave is born' असं सांगितलं जातं.
जमीन मात्र त्याची लाडकी. हातात पैसा आल्यावर रोज शेतात काम करायची गरज नाही म्हणून तो जात नाही. पण त्याचं प्रेम कमी होत नाही.
रिकामं डोकं सैतानाचं घर. त्यामुळे तो वेश्येकडे जाऊ लागतो. अफू ओढू लागतो. सुंदर स्त्रिया within reach आल्यावर त्याला ओ-लान कुरूप आहे असा साक्षात्कार होतो. Happy

जैत रे जैत हा चित्रपट गोनीदांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. त्याबद्दल वेगळं लिहायची गरज नसावी.

शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांचं नाव आलंय का? देवदास, परिणीता हे चित्रपट सगळ्यांना माहीत आहेतच. श्रीकांत ही मालिका . खात्री करून घेण्यासाठी शोधाशोध केली तेव्हा शरदबाबूंच्या लेखनावर आधारित चित्रपट असं एक विकीपेज आहे, असं दिसलं.
खुशबू (गुलजार-जितेंद्र-हेमा) हा चित्रपट पाहिलाय. अपने पराए (उत्पल दत्त, अमोल पालेकर, आशालता, भारती आचरेकर, शबाना, बहुतेक गिरीश कर्नाड सुद्धा) पाहिलाय. स्वामी पाहिलाय (कर्नाड, शबाना) , छोटी बहु (राजेश खन्ना, शर्मिला टागोर) पाहिलाय. बिराज बहु आणि मंझली दीदी पाहिलेले नाहीत.
जे पाहिलेत त्यांबद्दल आठवून लिहितो.

मुन्शी प्रेमचंद यांच्या गोदानवर त्याच नावाचा चित्रपट आहे. वाचलेलं किंवा पाहिलेलं नाही. फक्त गोदानचं पं.रविशंकर यांचं संगीत लक्षात आहे. खई के पान बनारसवाला लिहिणार्‍या अंजान यांनीच या चित्रपटातली उत्तर प्रदेशातल्या लोकगीतांच्या शैलीतली गाणी लिहिलीत.

श्वास हा चित्रपत माधवी घारपुरे यांच्या एका कथेवर आधारित आहे. चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर लेखिकाही प्रकाशात आल्या. दूरदर्शनवरच्या डायल इन कार्यक्रमात त्यांना बोलावलं गेलं होतं. नक्की आठवत नाही. पण वर्तमानपत्रात सदरलेखनही केलं असावं.

इथले वाचून आठवले की आपल्याला चानी बघायचाय. युट्युबवर शोधला.
१० व्या मिनिटाला बंद केला. एकतर वाईट डिजिटलायझेशन आणि बाकीही सगळे अराराच.
रंजनाला प्रत्येक गोष्टीवर खिदळणे कंपलसरी होते बहुतेक.
त्या चानीची आई हिंदीतल्या गाव की गोरी टाइप गुडघ्याच्या वर अशी लांबी असणारा स्कर्ट आणि गाठीची चोळी घालून कोकणात लाकडे जमा करत असते. आणि मुलीला जन्म दिल्यावर तिला साडी फुटते.
कोकणात सर्वच्या सर्व लोक सतत डोक्याला टॉवेल बांधून फिरत असतात. नुसते सदरेच नाही तर जॅकेटसही घालत असतात. वगैरे मज्जा टायटल्स सुरू व्हायच्या आधीच दिसली. मग बुडबुड्याच्या घाणेरड्या आवाजावर पीळ टायटल्स. आणि मग गोवा म्हणल्यावर एक कंपलसरी पाश्चिमात्य घाटणीची मांडो टाइपची ट्यून असते शिट्टीवर वगैरे वाजवलेली त्या ट्युनेवर ती चानी रंगीबेरंगी स्कर्ट (गुडघ्याच्या वर एवढीच लांबी आणि गावकीगोरी कट कंपलसरी) आणि ब्लाऊज घालून बागडत असते. मग मास्तराशी फ्लर्ट करते शाळेत जाऊन. तिथे मी थांबवली.
धाडस गोळा करून रोज १० मिनिटे बघत संपवेन मी एक ना एक दिवस.

व्हि शांतारामांनी ही फिल्म करताना प्रचंड पाट्या टाकल्या असणार. त्यांचे अजिबात लक्ष तरी नव्हते किंवा त्यांना पडलेली तरी नव्हती असे काहीतरी असावे. अन्यथा इतके वाईट कसे करतील ते?

'गणूराया आणी चानी' हे पुस्तक खूप पुर्वी वाचले होते आता फार काही आठवत नाही.
चानी हा रंजनाचा पहिला चित्रपट ना. मलाही पहायचाय म्हणजे पहायचा होता पण आता नाही पाहणार. Proud

वंशवृक्ष
मूळ कन्नड लेखक - एस एल भैरप्पा, मराठी अनुवाद उमा कुलकर्णी
कन्नड चित्रपट - वंशवृक्ष - दिग्दर्शक आणि प्रमुख भूमिका- गिरीश कर्नाड

ही एक अत्यंत गुंतागुंतीची कादंबरी. श्रीनिवास श्रोत्री हे मध्यवर्ती पात्र. म्हैसूरजवळच्या एका लहान गावात राहणारी एक व्यासंगी, सत्शील, कणखर अशी व्यक्ती. त्यांचा एकुलता एक तरुण मुलगा पुरात वाहून जातो. मागे पत्नी कात्यायनी आणि लहान मुलाला ठेवून. हळूहळू या दु:खातून सावरल्यावर कात्यायनीला वाटतं की आपण पुढे शिकावं, कॉलेजला जावं. सासूला फारसं पसंत नसतानाही सासर्यांच्या पाठिंब्यावर कात्यायनी म्हैसूरच्या कॉलेजला जाऊ लागते. पुढे ती सदानंद राव या विद्वान संशोधकाच्या धाकट्या भावाच्या ( जो इंग्लिशचा प्राध्यापक असतो) प्रेमात पडते आणि विरोध पत्करून लग्नही करते. पुढे बर्याच वळणांमधून कथानक पुढे जातं.

श्रोत्री, त्यांची पत्नी, कात्यायनी, राज, सदानंद राव, त्यांची पहिली कन्नड पत्नी, दुसरी श्रीलंकन पत्नी ही सगळी पात्रं फार ताकदीने उभी केलेली आहेत. त्यांची एकमेकांमधली गुंतागुंत प्रचंड आहे. वाचायला घेतली की खिळवून ठेवणारी कादंबरी आहे.

कन्नड चित्रपट यूट्यूबवर थोडासा पाहिला होता. गिरीश कर्नाडांनी राजला ( कात्यायनीचा दुसरा नवरा) नायक केले आहे आणि ती भूमिका स्वत: केली आहे. पण मला तरी श्रीनिवास श्रोत्री हे या कादंबरीचे नायक वाटतात. त्यामुळे हा बदल रुचला नाही.

चानीमधली गाणी वेगळी हटके आहेत. वाद्ये बहुतेक नाहीतच, घरातलीच भांडी कुंडी वापरून संगीत दिले आहे बाळासाहेबांनी असे ऐकले होते.
तो एक राजपुत्र, मी ही एक रानफुल
आम्ही रे दोन, दोन माणसं

चानी लहान असताना पाहिला होता.
तेव्हा जास्त डोकं नव्हतं तरी अचाटच वाट्ला होता.
रण्जनाचे कपडे, तिची (ओवर) अ‍ॅक्टींग वैगेरे न झेपणारं आहे.

भैरप्पांची वंशवृक्ष आणि पर्व सोडून इतर सर्वच कादंबर्‍या इतक्या कर्मठपणाचे उदात्तीकरण करणार्‍या आहेत की डोक्यातच जातात. आणि तरीही लिखाण रसाळ (जे अनुवादातही येते) त्यामुळे आपण वाचत राहतो.
वंशवृक्ष करण्याबद्दल कार्नाडांनी त्यांच्या आत्मचरीत्रामधे (की अजून कुठेतरी) एक लेख लिहिला आहे.

पारखा, तडा इत्यादी भैरप्पांच्या कादंबर्या आहेत सनातनी ( प्रभात नाही Wink ) मानसिकतेचं समर्थन करणार्या. पण सार्थ, तंतू , काठ , आवरण या नक्कीच तशा नाहीत.

वंशवृक्ष, पारखा, तडा (महाभयानक वाईट होती ही) आणि अजून मी वाचलेल्या एकदोनतरी त्याच वळणाच्या वाटल्या होत्या.
सार्थ वाचली होती. अजिबातच आवडली नव्हती. रंजक नक्की पण अहाहा किती रम्य तो भूतकाळ हा टोन तिथेही होता हे आठवतंय.
तंतू आणि काठ वाचल्यात का ते आठवत नाहीये. वाचून बघेन

स्टीफन किंगच्या अजरामर 'श्वाशांक'चा उल्लेख आधी झाला आहेच. त्याच्या इतर अनेक कादंबर्‍यांवरही सिनेमे निघाले आणि ते त्यांच्या परीने प्रभावी आहेत.
'द ग्रीन माईल' - जन्म आणि मृत्यू, पाप-पुण्याचा झगडा किंवा त्यांचे सतत बदलणारे स्वरुप हा किंगच्या कादंबर्‍यांचा किंवा चिंतनाचा विषय. याही सिनेमात ते आहेच. ताकदवान शेवट न करता येणे हा किंगचा दोष मानला जातो, पण हा मात्र त्याला अपवाद.
'कॅरी' - याची बरीच व्हर्जन्स झाली, मी सगळ्यात जुने आणि नवे पाहिले आहे. कादंबरीला बरेच सुसंगत वाटले
'पेट सिमेटरी' - पुस्तक आणि सिनेमा दोन्ही कंटाळवाणे
'१४०८' - सिनेमा पुस्तकापेक्षा जबरदस्त
'इट' - कादंबरीतील व्यामीश्रता शक्य तितकी पडद्यावर आणण्याचा प्रयत्न झाला आहे, पण कादंबरीची मजा औरच
आणि अर्थातच 'द शायनिंग' - सिनेमा कादंबरीपेक्षा स्वतंत्र कलाकृती आहे अशा दृष्टीने पाहीला तरच आवडेल. सिनेमा आवडला नाही तरी चालेल (किंगला स्वतःला नाही आवडला) पण एकदातरी पहाच!
बघायचे आणि वाचायचे राहिलेले अनेक आहेत पण हे दोन मस्ट, इतर कोणी पाहिले आणि वाचले असतील तर सांगा - द मिस्ट आणि द डार्क टॉवर

मी 'द शायनिंग' वाचलेली नाही. सिनेमा आवडता आहे. माझ्या प्रॉडक्शन डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांना बघायला लावते मी तो सिनेमा.

द नेम ऑफ द रोझ - अम्बर्तो एको
मध्ययुगीन चर्चेसच्या पार्श्वभूमीवर होणारी खुनांची मालिका एक प्रवासी भिक्षु (मंक) कसा यशस्वीरीत्या उलगडतो त्याची थरारक गोष्ट. चित्रपट याभोवतीच गुंफला गेलेला आहे. पण मूळ कादंबरी त्याहीपेक्षा कितीतरी मोठा गुंतागुंतीचा पट उभी करणारी आहे. फिलॉसॉफिकल हू-डन-इट म्हणता येईल. मध्ययुगातील तेराव्या शतकातील युरोप, रेनेसाँची आणि आधुनिकयुगाची चाहूल लागण्याच्या उंबरठ्यावर उभा असलेला समाज्/चर्च/ धर्मगुरु. ज्ञानावर, ज्ञानसाधनांवर असलेली चर्चची पकड, त्याचा 'सिलेक्टिव अ‍ॅक्सेस', हळूहळू यातून उभे राहणारे वैचारिक्/तात्विक संघर्ष अशा पार्श्वभूमीवर सगळ्या घटना घडतात. लेखक स्वतः खूप नामवंत तत्वज्ञानाचे प्राध्यापक आहेत. मूळ पुस्तक आवर्जून वाचावे असेच आहे कारण माध्यमबदल होताना चित्रपट हा मध्ययुगीन चर्चमधील खुनांचे रहस्य असाच झालाय....
मध्यवर्ती भूमिका शॉन कॉनरी

हर्पेन, प्लीज पहा म्हणजे निदान हे असं मलाच वाटलंय की खरंच तसं आहे यावर आपण बोलू शकू. Happy >>>

प्रयत्न करतो. Happy

मग बुडबुड्याच्या घाणेरड्या आवाजावर पीळ टायटल्स. >>> या वाक्याने कुतूहल निर्माण झाल्याने ५-१० मिनीटे पाहिला. पुढे बोअर झाला. बुडबुडा बेस्ड टायटल्स कहर आहेत Lol

२००८ च्या अमेरिकन प्रेसिडेन्शियल निवडणुकीच्या कॅम्पेन बद्दल - डेमोक्रॅटिक्/रिपब्लिकन प्रायमरी लढ्याबद्दल - मुख्यतः ओबामा आणि हिलरी, आणि नंतरच्या ओबामा-मॅकेन लढ्याबद्दल 'गेम चेंज' हे पुस्तक एक दोन वर्षांनी आले - ते प्रचंड लोकप्रिय झाले. त्यावरच याच नावाचा चित्रपट आहे. तो ही चांगला आहे. अ‍ॅमेझॉन प्राइम वर आहे बहुधा. फक्त पुस्तकाचा आवाका मोठा आहे - पहिला भाग बराचसा प्रायमरीज वर आहे. डेमोक्रॅट्स चे प्रतिनिधित्व हिलरीच्या हातून कसे निसटले वगैरे ची माहिती. नंतरचा भाग मुख्य निवडणुकीच्या कॅम्पेन बद्दल आहे. चित्रपटात बराचसा तो नंतरचा भागच आहे. तरीही चांगला आहे चित्रपट.

या पुस्तकामुळे जॉन मॅकेन बद्दल माझे मत पूर्ण बदलले. आधी तो केवळ ओबामाचा विरोधी व त्यावेळच्या रिपब्लिकन र्‍हेटॉरिक लाच पुढे रेटणारा म्हणून समोर येइ. त्याच्या कॅम्पेन बद्दल, आधीच्या २००० च्या इलेक्शन मधे बुश ग्रूप ने त्याला कसे हरवले ते वाचले की त्याच्याबद्दल खूप आदर वाटतो.

ज्या दोन लेखकांनी हे लिहीले त्यांनी ओबामाची कॅम्पेन जवळून पाहिली होती. त्यामुळे बरीच माहिती आतल्या गोटातून दिल्यासारखी आहे. याच दोघांनी नंतर २०१२ च्या निवडणुकी बद्दल 'डबल डाउन' हे पुस्तकही लिहीले. ते ही चांगले आहे पण ती निवडणुक मुळातच इतकी सनसनाटी नसल्याने त्यात मसाला कमी आहे.

बुडबुडा बेस्ड टायटल्स कहर आहेत<< हो की नाही?
त्या लेटर्सना थेंबही फुटलेत. एमरेल्ड ग्रीन लेटर्सना पांढरे थेंब.

' दि सायलेंस ऑफ लँम्बस '
हा हॉरर चित्रपट थॉमस हॅरिस यांच्या कादंबरीवर आधारित आहे. एक एफ. बी. आय, प्रशिक्षणार्थी क्लेरीस स्टार्लिंग आपल्या पश्चिम व्हर्जिनियाची असल्याचे लपऊन, कारकीर्दीत प्रगती करण्यासाठी कठोर परिश्रम करत असते. तीची पदवी मिळाल्यानंतर, जेक क्रॉफर्ड यांच्या नेतृत्वाखाली एजन्सीच्या वर्तणुक विज्ञान युनिटमध्ये काम करण्याची तिला इच्छा असते. एका सिरीयल किलरचा शोध घेण्यासाठी हनिबेल लेक्टर, एक उत्कृष्ट मनोचिकित्सक आणि नरसंहारक सिरीयल किलरचा सल्ला घेण्याचा प्रयत्न करते.पहिल्यांदा लेक्चरला बोलल्यानंतर, तीला हे जाणवते की त्याच्याबरोबर बोलणे, वागणे सर्वकाही एक मानसिक खेळ असेल, कारण त्याच्या बोलण्यामघुन अप्रत्यक्ष सूचना समजुन घ्याव्या लागतील. स्टार्लिंगला अँथनी हॉफकीन्स अट घालतो की, त्याचाशी बोलण्याच्या बदल्यात ती अँथनीला तीच्या वौयक्तिक गोष्टी त्याला सांगेल..........
१९९१चे सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट पटकथा असे सर्व मह्त्वाचे पुरस्कार या चित्रपटाने मिळवले. अँथनी हॉफकीन्सच्या अतिशय उत्तम अभिनयासाठी तरी हा चित्रपट पहावाच.

टॉमस हॅरिसची या आधीची कादंबरी रेड ड्रॅगनवर पण दोन चित्रपट आले आहेत. मला सायलेन्स पेक्षा रेड ड्रॅगन आवडली आहे. यात हनिबाल लेक्टरचा थोडक्यात उल्लेख आहे
पहिला मॅन हंटर नावाने आहे चित्रपट आणि दुसरा रेड ड्रॅगन याच नावाने आहे. मला स्वतःला मॅनहंटर जास्त आवडतो.

टॉमस हॅरिसची या आधीची कादंबरी रेड ड्रॅगनवर पण दोन चित्रपट आले आहेत. मला सायलेन्स पेक्षा रेड ड्रॅगन आवडली आहे. >> सिनेमाचे म्हणाल तर सायलेंस ऑफ द लँब्स सर्वच बाबतीत रेड ड्रॅगनपेक्षा कैक पटींनी ऊजवा आहे.

यात हनिबाल लेक्टरचा थोडक्यात उल्लेख आहे >> रेड ड्रॅगन सिनेमात तर हनिबाल लेक्टरचे मध्यवर्ती नसल तरी महत्वाचे पात्रच आहे... म्हणजे सिनेमाने पुस्तकापासुन फारकत घेतली का?

रेड ड्रॅगन (राल्फ फाएन्झ - एडवर्ड नॉर्टन) हा सायलेन्स नंतर आलेला सिनेमा असल्याने त्यात लेक्टरला जरा जास्त महत्व दिलं आहे असं मला वाटतं. लेक्टरच्या हल्ल्यातून वाचून विल ग्रॅहॅम निवृत्त झाल्यासारखा आहे, आणि टूथ फेअरी कोण यासाठी तो लेक्टरला एकदा भेटतो हे दोन्ही प्रसंग पुस्तकात आहेतच पण त्यापलिकडे फार महत्वाचं पात्र नाही (असं वाचक म्हणून मला वाटलं. मी पुस्तक आधी वाचलं, मग रेड ड्रॅगन बघितला मग नंतर मॅनहंटर)

हो मलाही लेक्टर लायब्ररीत ग्रॅहॅम वर बाणाच्या टोकाने की कशाने हल्ला करतो तो प्रसंग आठवतो आहे आणि नंतर ग्रॅहम त्याला टूथ फेअरी संदर्भात भेटायला येतो तो, असे दोनच प्रसंग आठवत आहेत.
कदाचित ते लक्षात राहिल्याने लेक्टरचे पात्र महत्वाचेच असावे असा समज झाला असावा.

मॅनहंटर जुना आहे ना. मागे जुलिआने मूर, हॉपकिन्स, ओल्डमन आणि लिओटाचा एक बघितला होता त्यात लेक्टर पात्र फार हीरोलाईक आणि सहृदयी वगैरे दाखवलं होतं. सिनेमाचे नाव आठवत नाही पण डिझगस्टींग सीन्स होते.

हो, मॅनहंटर सायलेन्स.. चित्रपट यायच्या आधीचा आहे.
ज्युलियन मूरचा म्हणजे हनिबाल असेल. सायलेन्सचा सीक्वल.

> आणि अर्थातच 'द शायनिंग' - सिनेमा कादंबरीपेक्षा स्वतंत्र कलाकृती आहे अशा दृष्टीने पाहीला तरच आवडेल. सिनेमा आवडला नाही तरी चालेल (किंगला स्वतःला नाही आवडला) पण एकदातरी पहाच! > अतिशय सहमत!

===
रेड ड्रॅगन > सायलेन्स ऑफ द लॅम्बज >हनिबल > हनिबल रायजिंग
∆ पुस्तकं आणि चित्रपट याच क्रमाने आवडतात.
मॅनहंटर ठीकठाक होता. पार्श्वसंगीत कैच्याकै होतं. पण मला वाटतं त्याकाळी तोच ट्रेंड होता. डर्टी हॅरी आणि टर्मिनेटरमध्येपण असंच झालेले.

हनिबल सिरीज अजून पाहिली नाही.

===
मीनाकुमारीचा परिनिता आणि दिलीपकुमारचा देवदास आवडलेला. पुस्तकं वाचली नाहीत.
देवदासची कल्पना ज्याच्यावरून उचलली (असे कुठेतरी वाचले होते) ते The Idiot पुस्तक वाचले आहे. अतिशय आवडले.

खरं सांगायचे तर मूळ साहित्य भारी की सिनेमा भारी ही तुलना मला पूर्णपणे अस्थानी वाटते.
अर्धेअधिक लोक साहित्यकृतीला एका मखरात ठेवून मग सिनेमाकडे बघतात असेच जाणवत राहते बहुतेक तुलनांमधे.
पण ३००-४००-५०० किंवा अधिक पानांचा ऐवज असलेली कादंबरी त्याच्या पूर्ण अनुभवासकट २ तासांच्या सिनेमात येईल याची अपेक्षा करणेच चूक आहे.

आणि अजून एक म्हणजे आपण वाचत असताना आपल्या मनात एक काहीतरी चित्र तयार करत जातो. आपली त्या त्यावेळची मनस्थिती, आपले एकूण व्यक्तिमत्व, वय वगैरे सगळ्याच गोष्टी आपल्याला ती साहित्यकृती कशी पोचते यासाठी कारणीभूत ठरतात. हेच पटकथा लेखक वा दिग्दर्शक वा ज्याने या साहित्यकृतीवर सिनेमा व्हावा असे कल्पिले त्याचे झालेले असते. त्यालाही त्याचे एक चित्र दिसलेले असते. एक अनुभव मिळालेला असतो आणि तो अनुभव किंवा ते चित्र याच गोष्टी मुख्य बनून सिनेमामधे येतात किंवा अधोरेखित झालेल्या दिसतात. तस्मात सिनेमा हा साहित्यकृतीवर आधारित असला तरी ती एक स्वतंत्र कलाकृती असते. ती अतिप्रचंड भारी किंवा तद्दन टुकार असू शकते. पण 'वाचताना जो अनुभव आला तो नाही आला बुवा' हे काही त्या कलाकृतीचे मूल्यमापन होऊ शकत नाही.

नीधप+१
माझं नेहमी होतं असंच.
अपवाद म्हणता येईल तो थ्री इडियट्सचा. अर्थात तो काही फाइव्ह पॉइंट समवन या पुस्तकावर जसाच्या तसा बेतलेला नाही. पण पुस्तक फारसं आवडलं नव्हतं आणि चित्रपट खूप आवडला होता.
नीधप, तुम्ही भैरप्पांची ' मंद्र' वाचलीय का? ख्यातकीर्त गायकाच्या आयुष्यावर आहे. मला तरी आवडते.

Pages