पालकाची सुकी भाजी - ज्वारीचं पीठ वापरून

Submitted by योकु on 30 July, 2018 - 09:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- पालकाची एक जुडी (साधारणपणे २५० ग्रॅम)
- दोन मध्यम टोमॅटो
- ८-९ लसूणपाकळ्या
- सुक्या लाल मिरच्या ३/४
- हळद
- मोहोरी
- हवं असेल तर लाल तिखट
- मीठ
- तेल
- चिमटीभर'च' साखर
- लागेल तसं ज्वारीचं पीठ (तरी प्रमाण म्हणून २-३ मोठे चमचे लागेल)

1_0.jpg

क्रमवार पाककृती: 

- पालक धुवून ओबडधोबड चिरून घ्यावा
- टोमॅटो ही धुवून मध्यम आकारात चौकोनी चिरावा
- लसणी सोलून ठेचून घ्याव्यात. याचा लगदा करायचा नाही, एका पाकळीला एक दणका या पद्धतीनं
भाजीत पाकळ्या सुट्या दिसायला हव्यात, म्हणजे नाकार्डे तो खरपूस लसूण बाजुला काढतात आणि परमानंदास मुकतात न आपण आवड असणारे
चापू शकतो
- सुक्या मिरच्यांचे तुकडे करून घ्यावेत
- लोखंडी कढई सणसणून तापू द्यावी आणि मग जरासं तेल घालून ते तापलं की मोहोरीची फोडणी करावी
- आता आच जरा मंद करून लसूण लालसर परतावा आणि मग त्यात टोमॅटो, सुक्या मिरच्या घालून परतावं
- मिनिटभरानंतर चिरलेला पालक घालून नीट हलवावी भाजी. याला आता लगेचच पाणी सुटायला सुरुवात होईल आणि पालक आकारमानानं कमी होईल, तसा तो झाला की मगच मीठ घालावं (आधीच घातलं तर आकारमान, हो भाजीचंच; जास्त असल्यानी मीठ जास्त पडण्याची शक्यता असते); चिमटीभर साखर घालावी आणिक झाकण घालून अगदी मंद आचेवर एक वाफ येऊ द्यावी.
- ५ मिनिटांनंतर यात हळद, वापरणार असाल तर लाल तिखट आणि ज्वारीचं पीठ पसरून घालावं आणि गुठळ्या न होऊ देता भाजीत मिसळावं.
- सगळी भाजी नीट गोळा झाली की अजून एक ५-७ मिनिटं वाफ काढावी म्हणजे पीठ शिजेल.
- गरमगरम (ऊनऊन!) भाजी तयार आहे. फुलके, ज्वारीची/बाजरीची भाकरी यांबरोबर गट्टम करावी.
- आवडत असेल तर वरून जिवंत फोडणीही घेता येईल (यांत मोहोरी, जीरं आणि आजून लसूण हवा असेल तर तोही असं सगळं घालता येईल)

ही माझ्याकडची लोखंडी कढई... तापतेय, तापतेय...
2.jpg

या मस्तपैकी जेवायला (आज पोळ्याच पण, ताटही ज्यात टोमॅटो ठेवले होते तेच आहे. बाजूला मदर्स रेसीपीज चं मद्रास थोक्कू आहे - कैरीच्या किसाचं आंबट आणि झणझणीत लोणचं; हा तक्कू नाही)
3.jpg

वाढणी/प्रमाण: 
भाजीप्रमाणे
अधिक टिपा: 

- लसूण जरा जास्तच घ्यावा, त्यानी चव मस्त खुलते
- साखर जस्ट चव खुलवायला वापरायचीय (नाही घातली तरीही चालेल) या भाजीत साखर मीठ तिखट बरोबरीनं नाही वापरायचं...
- मीठ आधीच घालायचं नाही, पालक जरा खाली बसला की मगच अंदाजाने घालायचं. (कुठेही मीठ जास्त पडलं तर काही करता येत नाही, पण कमी झालं तर वरून घेता नक्कीच येतं)
- ही भाजी ताजी-ताजी करावी अन लगेच संपवून टाकावी. लोखंडी कढई, पालक आणि टोमॅटो असल्यानं नंतर ती कळकेल, चवही एखाद वेळी बिघडू शकेल
- चव अजून एनहान्स करण्याकरता वरून फोडणी अवश्य घ्यावी

माहितीचा स्रोत: 
कुणी नै, नेहेमी चण्याच्या डाळीचं पीठ लावून केली जाते, आज ते मला काही केल्या सापडलं नाही, कुठे ठेवल्या गेलंय ते, सो समोर ज्वारीचं पीठ होतं तेच लावलं... खूप सुरेख चव जमली... :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Super Hungry
--
ती चिमुटभर साखर भाजीत घालण्यामागे काय लॉजिक आहे ?

योकु, आमच्याकडे बर्‍याच भाज्यांमध्ये बेसना ऐवजी ज्वारीच पीठ वापरल जात. तुझी कृती मस्तच आहे. नेहमी तिखट वापरते आता अशी टोमॅटो आणि मिरच्या घालून बघते.
ज्वारीच पातळ पिठलं , हळद आणि हिरव्या मिरच्या,कडीपत्ता घालून करून बघ. फार छान लागते.

ज्वारीचे पिठ पेरून केली नाहीये कधी भाजी. ही ट्राय करेन नक्की. आमच्याकडे पालक ही सर्वांची 'लीस्ट ऑब्जक्शनेबल' भाजी असल्यामुळे बरेचदा होतो पालक. टोमॅटो असला तरी तुझी भाजी लाल नाही दिसत आहे. चवीला कितपत आंबट असते ही भाजी?

सीमा, अ‍ॅक्च्युअली आयडीया त्या ज्वारीच्या पिठाच्या पिठल्यापासूनच आली. मागे एकदा तुम्ही दिलेल्या कृतीनं करून पाहीलं होतं. तो प्रकार सुपर झाला होता. पुन्हा एखादवेळेला तसलं पिठलं करायला हवंच आहे आता.
नॉर्मली बेसन घरात असतंच सो वेगळं असं एखादं पीठ वापरायचं कधी लक्षातच नाही राहात.

मैत्रेयी, फार अशी आंबट झाली नव्हती; मे बी इकडले हायब्रीड टोमॅटो कारणीभूत असावेत.
गावरान टोमॅटो (भेद्रं) असतील तर नक्कीच एखाद्यात काम होईल कारण ते बर्‍यापैकी आंबट असतात...

बेसन नसेल तर पालकची ज्वारीचे पीठ लावून भाजी खूपदा केली आहे. आई थालीपीठाची भाजणी लावून पण करत असे. तीही खूप छान लागते.
पण या भाजीत टोमॅटो मात्र कधी घातला नाहीये. आता करुन बघणं आलं.
योकु छान रेसिपी आणि लिहीलंय पण छान.
एका पाकळीला एक दणका या पद्धतीनं >> Bw

वा वा, ज्वारी पीठ पेरून भाजी, ज्वारीच्या पीठाचं पिठलं, नवनवीन प्रकार कळताहेत. याच आठवड्यात करून पाहीन.

वा ! भाजीचा फोटो झकास दिसतोय! (नाहीतर आतापर्यंत ह्यात काय असं वेगळं आहे ज्याची रेसिपी लिहावी असा मनातल्या मनात विचार करत होते Wink )

(अवांतर Wink
>> ज्वारीचे पिठ पेरून
मै च्या भाषेत " पीठ पेरून" वाचून छान वाटलं. नाहीतर काही लोक पीठ "मारून" भाज्यांनां लावतात तेव्हा मला भाजी टांगून तिला चाबकाने फटके द्यावेत तसे पीठ मारतात असं चित्र दिसतं )

हे छान आहे. चण्याशिवाय कोणतीही पीठ पेरुन (आम्ही पेरुनच म्हणतो, मारुन ऐकल नव्हतं कधी) भाजी केली नाहिये कधी, अशी करुन बघणार..

वाह फार सुंदर.

ताट फोटोही सुरेख. असं जेवायला बसावसं वाटतंय बघून Happy .

आमच्याकडे मोस्टली बेसन, तांदूळ पीठ किंवा भाजणी पेरून करतात भाज्या.

मस्त दिसतंय एंड प्रॉडक्ट. ज्वारीचं पीठ पेरुन कधी करुन बघितली नाहीये. आता करेन. मी एरवी किंचीत तांदूळ, तूरडाळ आणि मेथीचे दाणेही घालते. तसेच घालून करुन बघतेच.

देशातून नेहमी हौसेनी ज्वारी पीठआणलं जात आणि मग दोन / चारदा भाकऱ्या करून झाल्या कि मग उरलेल असच पडुन राहतं सो आता उपाय सापडला आहे. थॅंक्स

योकु,
छान झाली भाजी, ज्वारीच्या पिठाची चव आवडली !
40F3C9A6-F733-44DA-8BE2-EC84FEDDE7ED.jpeg
इग्नोअर माय नाचणीची भाकरी स्किल्स Proud

ज्वारीच्या पीठाच्या पिठाल्याची रेसिपी कुठे आहे? माबोवर शोधून सापडली नाही.

चला दिनेशजींनंतर कुणी तरी आपलेपणाने खाऊ घालणारं आलयं.

फर्मास !! कृती पण मस्त आणी फोटो पाहुन तोंडाला पाणी सुटले. सारखे बेसन घालुन पण तीच तीच चव येत होती, आता नवीन प्रयोग, धन्यवाद योकु.

मस्त ! मला पीठ पेरुन भाज्या फारच आवडतात. ही करुन बघेन नक्कीच. पालेभाजीला बेसन / भाजणी/ मूगडाळ पीठ लावणं आणि भाकरीसोबत खाणं म्हणजे कार्ब्ज-प्रोटीन बॅलन्स होतो तसा ह्यात होणार नाही एवढंच एक वाटलं.

डीजे, ताट तुळशीबागेतून का ? माझ्याकडे सेम आहे. मस्त जमलाय बेत Happy

Pages