पालकाची सुकी भाजी - ज्वारीचं पीठ वापरून

Submitted by योकु on 30 July, 2018 - 09:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- पालकाची एक जुडी (साधारणपणे २५० ग्रॅम)
- दोन मध्यम टोमॅटो
- ८-९ लसूणपाकळ्या
- सुक्या लाल मिरच्या ३/४
- हळद
- मोहोरी
- हवं असेल तर लाल तिखट
- मीठ
- तेल
- चिमटीभर'च' साखर
- लागेल तसं ज्वारीचं पीठ (तरी प्रमाण म्हणून २-३ मोठे चमचे लागेल)

1_0.jpg

क्रमवार पाककृती: 

- पालक धुवून ओबडधोबड चिरून घ्यावा
- टोमॅटो ही धुवून मध्यम आकारात चौकोनी चिरावा
- लसणी सोलून ठेचून घ्याव्यात. याचा लगदा करायचा नाही, एका पाकळीला एक दणका या पद्धतीनं
भाजीत पाकळ्या सुट्या दिसायला हव्यात, म्हणजे नाकार्डे तो खरपूस लसूण बाजुला काढतात आणि परमानंदास मुकतात न आपण आवड असणारे
चापू शकतो
- सुक्या मिरच्यांचे तुकडे करून घ्यावेत
- लोखंडी कढई सणसणून तापू द्यावी आणि मग जरासं तेल घालून ते तापलं की मोहोरीची फोडणी करावी
- आता आच जरा मंद करून लसूण लालसर परतावा आणि मग त्यात टोमॅटो, सुक्या मिरच्या घालून परतावं
- मिनिटभरानंतर चिरलेला पालक घालून नीट हलवावी भाजी. याला आता लगेचच पाणी सुटायला सुरुवात होईल आणि पालक आकारमानानं कमी होईल, तसा तो झाला की मगच मीठ घालावं (आधीच घातलं तर आकारमान, हो भाजीचंच; जास्त असल्यानी मीठ जास्त पडण्याची शक्यता असते); चिमटीभर साखर घालावी आणिक झाकण घालून अगदी मंद आचेवर एक वाफ येऊ द्यावी.
- ५ मिनिटांनंतर यात हळद, वापरणार असाल तर लाल तिखट आणि ज्वारीचं पीठ पसरून घालावं आणि गुठळ्या न होऊ देता भाजीत मिसळावं.
- सगळी भाजी नीट गोळा झाली की अजून एक ५-७ मिनिटं वाफ काढावी म्हणजे पीठ शिजेल.
- गरमगरम (ऊनऊन!) भाजी तयार आहे. फुलके, ज्वारीची/बाजरीची भाकरी यांबरोबर गट्टम करावी.
- आवडत असेल तर वरून जिवंत फोडणीही घेता येईल (यांत मोहोरी, जीरं आणि आजून लसूण हवा असेल तर तोही असं सगळं घालता येईल)

ही माझ्याकडची लोखंडी कढई... तापतेय, तापतेय...
2.jpg

या मस्तपैकी जेवायला (आज पोळ्याच पण, ताटही ज्यात टोमॅटो ठेवले होते तेच आहे. बाजूला मदर्स रेसीपीज चं मद्रास थोक्कू आहे - कैरीच्या किसाचं आंबट आणि झणझणीत लोणचं; हा तक्कू नाही)
3.jpg

वाढणी/प्रमाण: 
भाजीप्रमाणे
अधिक टिपा: 

- लसूण जरा जास्तच घ्यावा, त्यानी चव मस्त खुलते
- साखर जस्ट चव खुलवायला वापरायचीय (नाही घातली तरीही चालेल) या भाजीत साखर मीठ तिखट बरोबरीनं नाही वापरायचं...
- मीठ आधीच घालायचं नाही, पालक जरा खाली बसला की मगच अंदाजाने घालायचं. (कुठेही मीठ जास्त पडलं तर काही करता येत नाही, पण कमी झालं तर वरून घेता नक्कीच येतं)
- ही भाजी ताजी-ताजी करावी अन लगेच संपवून टाकावी. लोखंडी कढई, पालक आणि टोमॅटो असल्यानं नंतर ती कळकेल, चवही एखाद वेळी बिघडू शकेल
- चव अजून एनहान्स करण्याकरता वरून फोडणी अवश्य घ्यावी

माहितीचा स्रोत: 
कुणी नै, नेहेमी चण्याच्या डाळीचं पीठ लावून केली जाते, आज ते मला काही केल्या सापडलं नाही, कुठे ठेवल्या गेलंय ते, सो समोर ज्वारीचं पीठ होतं तेच लावलं... खूप सुरेख चव जमली... :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टेम्प्टिंग दिसतय ताट.. मस्तच पाकृ..
आम्ही पालकाचं बेसन करतो तयार .. ज्वारीच पिठ पेरुन नाही केलं कधी.. आता करावं म्हणते.

योकु, ह्या पद्धतीने आज भाजी करुन बघितली. एकदम बेश झाली. मी आधी म्हटल्याप्रमाणे तूरडाळ+ तांदूळ+ मेथीदाणे असं वेगळं शिजवून घेतलं होतं पण भाजी तयार होता होता अजिबात त्याची गरज नाही हे लक्षात आलं पण वाया जाईल म्हणून उगाच दोन चमचे घातलं. बरोबर मिश्र्र धान्याच्या भाकरी केल्या.

आली आली .. या रेसिप्यांची महाराणी लोखंडी कढई (फोटो)
मस्तच वर्णन.. मी सेम अशीच करते ज्वारीचे पिठ लावून फक्त टॉमेटोचे अ‍ॅडीशन करून पाहते नेक्स्ट टाईम.

योकु, कढई खरच खुप छान आहे. मला या अशा हँडल नसलेल्या कढई जास्त आवडतात. हँडल मुळ घासायला खुप अवघड पडत.

मी आणि बायडी गेलो होतो आठवडी बाजारात ही कढई घ्यायला. तो दुकानदार म्हणे, कान वाली नका घेऊ. यात सांडशीनं पकड घेऊन कढई गोल गोल फिरवत पदार्थ अवसडता येतो म्हणून. ट्रिक आवडली आवडली आम्हाला म्हणून मग हीच घेतल्या गेली. आधी कान वालीच पसंत केलेली होती.
लई कवतिकाची आहे ही आमच्याकडे. आज आजून एक रेस्पी येतेय; यात केलेली. डकवतो फोटूसकट जरावेळात.

Pages