तंदुरुस्त की नादुरुस्त : भाग ५ ( वय ५० +)

Submitted by कुमार१ on 25 March, 2018 - 23:51

(आरोग्य रक्षण आणि चाळणी चाचण्या)
(भाग ४ :
https://www.maayboli.com/node/65597)

वय ५० चे पुढे : आयुष्यावर बोलू काही !

आपण पन्नाशीच्या उंबरठ्यावर असतो तेव्हा अर्धशतक पूर्ण केल्याची एक सुखद भावना मनात असते खरी. पण त्याचबरोबर अजून किती काळ ‘नाबाद’ राहू याचीही हुरहूर लागते. समाजात आजारांचे प्रमाण एकूणच वाढलेले आहे. त्यात अनेक आजार प्रत्येक पिढीगणिक अलीकडच्या वयात होताना दिसत आहेत. सध्या ५०+ वयोगटात एकही व्याधी अथवा औषध चालू नसलेली व्यक्ती दुर्मिळ झाली आहे. बऱ्याच जणांच्या बाबतीत काही चाळणी चाचण्या चाळीशीच्या दरम्यानच पार पडलेल्या असतात.

या वयांत शिफारस केलेल्या मुख्य चाचण्या खालील आजारांसाठी आहेत:

मोठ्या आतड्याचा कर्करोग
स्तनांचा कर्करोग
गर्भाशयाच्या cervix चा कर्करोग आणि
मधुमेह

मोठ्या आतड्याच्या कर्करोग :

याचे प्रमाण पुरुषांमध्ये स्त्रियांच्या तुलनेत जास्त आहे. काही चाचण्यांच्या मदतीने जर आपल्याला या रोगाची चाहूल लवकर लागली तर त्याचा प्रतिबंध करता येतो तसेच उपचारही प्रभावी ठरतात. या रोगाची पूर्वसूचना देणारा एक विकार म्हणजे आतड्यात polyp होणे. हा विकार ५०+ वयांत होत असल्याने या गटातील सर्वांचीच चाचणी करावी असे तज्ञांचे मत आहे.
आता या आजाराची अधिक जोखीम कोणाकोणाला असते ते पाहू. अशांचे परत दोन गटात वर्गीकरण केले आहे:

उच्च जोखीम असणारे :
यात आतड्याचे खालील आजार झालेल्या व्यक्ती मोडतात:
* दीर्घकालीन ulcerative colitis
* Crohn disease
* अनुवांशिक polyposis चा आजार
(ulcerative colitis आणि Crohn disease हे मुळात आतड्याचे दाहविकार आहेत. त्यांत जुलाब होणे आणि त्यात रक्त व आव पडते).


मध्यम जोखीम असणारे
:

* गट १ मध्ये उल्लेखिलेले आजार आई वडील वा भावंडे यांना असणाऱ्या व्यक्ती
* आहारात भाज्या व फळांचे प्रमाण कमी असणे
* भरपूर मेदयुक्त आहाराची सवय
* मद्यपान व धूम्रपान

आतड्याच्या कर्करोगाच्या चाळणी चाचण्या:
मुख्यत्वे ५०-७५ या वयोगटासाठी यांची शिफारस केलेली आहे. त्या दोन प्रकारच्या आहेत:

इमेजिंग’चे प्रकार: यात दुर्बिणीच्या सहाय्याने (scopy) आतडे पाहणे आणि CTscan च्या मदतीने केलेल्या अत्याधुनिक चाचण्यांचा समावेश आहे. त्या दर ५ वर्षांनी कराव्यात. पण उच्च जोखीम असल्यास दर २ वर्षांनी. या चाचण्यांमुळे कर्करोग पूर्व-प्राथमिक अवस्थेत ओळखता येतो. हे अत्यंत महत्वाचे आहे.

शौच प्रयोगशाळा-तपासणी : यात शौचात दडलेले रक्त आहे का ते पाहतात. पण जेव्हा ते सापडते तेव्हा प्रत्यक्ष कर्करोग झालेला असतो. त्यामुळे ही खऱ्या अर्थाने चाळणी चाचणी ठरत नाही.
ज्या व्यक्ती लठ्ठ आहेत आणि अतिरीक्त मद्यपान व धूम्रपानाच्या आहारी गेल्या आहेत त्यांनी या चाचण्या ४५ व्या वर्षीच सुरु कराव्यात. सर्वांनी ७५ व्या वर्षांनंतर मात्र या चाचण्यांच्या फंदात पडू नये.

स्तनांचा कर्करोग:
याचे विवेचन याआधीच्या वयोगटात झालेले आहे. इथे खालील मुद्दे लागू असल्यास रोगाची जोखीम अजून वाढते:
* स्वतःला यापूर्वी हाच कर्करोग झालेला असणे
* एकही मूल न होणे
* पहिले मूळ पस्तीशी ओलांडल्यावर होणे
* मासिक पाळी खूप उशीराच्या वयात बंद होणे
* पाळी बंद झाल्यानंतर हॉर्मोन्सचे उपचार घेणे
* लठ्ठपणा आणि अतिरीक्त मद्यपान टिकून असणे.

अशा जोखीमवाल्यांनी दरवर्षी mammography आणि स्तनांची MRI तपासणी करावी.
इथे एक मुद्दा लक्षात घ्यावा. स्त्रीच्या आयुष्यात जेव्हा मासिक पाळीची प्रथम सुरवात ते पूर्ण समाप्ती हा कालखंड खूप मोठा असतो तेव्हा एकूण cycles ची संख्याही वाढते. तसेच मूल न होणे, अथवा होऊन त्याला अंगावर न पाजणे या सर्वांमुळे cycles ची संख्या वाढते. परिणामी अशा स्त्रीला दीर्घकाळ इस्ट्रोजेनच्या प्रभावाखाली राहावे लागते. हा घटक या कर्करोगाची जोखीम वाढवतो.

Cervix चा कर्करोग :
याचेही विवेचन याआधीच्या वयोगटात झालेले आहे. तेव्हा अशा चाचण्या झाल्या नसल्यास आता जरूर कराव्यात. किमानपक्षी दरवर्षी स्त्रीरोगतज्ञाकडून जननेंद्रियाची तपासणी करून घ्यावी.

मधुमेह:
याचेही विवेचन पूर्वीच्या गटाप्रमाणेच. बऱ्याचदा या रोगाचे कुठलेही लक्षण नसेल तर चाचणी करणे टाळण्याकडे लोकांचा कल असतो. “मला काय धाड भरलीय, चांगला टूणटूणीत आहे मी”, अशा भ्रमात न राहता दर ३ वर्षांनी ग्लुकोज-पातळी,इ. तपासून घ्यावे.यातून जर मधुमेह उघडकीस आला तर मग कोलेस्टेरॉल व इतर मेदांचे प्रमाणही तपासून घ्यावे.
** ** ** **

काही बहुचर्चित पण शिफारस न केलेल्या चाचण्या :

अशा काही चाचण्यांबद्द्ल अनेकांच्या मनात शंकाकुशंका असतात. मुळात त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर शिफारस केलेली नसते. पण काही देशांत, विशिष्ट समूहांत किंवा ठराविक डॉक्टरांच्या मतानुसार त्या सांगितल्या जातात. त्यातून एकूणच रुग्णांचा गोंधळ वाढतो. अशा फक्त ३ चाचण्यांची दखल घेतो:

१. ‘ड’-जीवनसत्वाची रक्तपातळी :
या जीवनसत्वाचे शरीरात दोन प्रकार(forms) असतात( ड-२ व ड-३). त्यापैकी कुठला मोजायचा यावर एकमत नाही. हे मोजण्याच्या ज्या प्रयोगशाळा-पद्धती आहेत त्यांच्यात एकवाक्यता नाही. ‘नॉर्मल पातळी’ कशाला म्हणायचे याबाबतीतही गोंधळ आहे. एकाच रक्तनमुन्याची दोन ठिकाणी केलेली मोजणी बरीच जुळणारी नसते. अशा अनेक गुंतागुंतीत ही चाचणी अडकलेली आहे. तेव्हा संबंधित आजार रुग्णात थोडाफार दिसू लागला असेल तरच तिचा विचार व्हावा; सरसकट चाळणीसाठी नको.

२. ‘ब १२’-जीवनसत्वाची रक्तपातळी :
’ड’ प्रमाणेच त्यातील काही मुद्दे इथेही लागू होतात. चाचणीचे निष्कर्ष बऱ्याचदा विश्वासार्ह नसतात. समजा पातळी ‘नॉर्मल’ पेक्षा कमी असेल तरीही त्या व्यक्तीत संबंधित आजाराची लक्षणे बिलकूल नसतात. म्हणून काही त्रास (रक्तक्षय वगैरे) नसेल तर उठसूठ याच्या फंदात पडू नये. कधीकधी अशी टूम निघते की सर्व शाकाहारीनी हे प्रमाण बघून घ्यावे. पण अशा सरसकटीकरणाला तसा अर्थ नाही.

३. प्रोस्टेट-कर्करोगाची PSA चाचणी:
प्रगत देशांत हिचा खूप बोलबाला आहे. पण निव्वळ एक चाचणी करून काही साध्य होत नाही. त्यावरून निष्कर्ष काढणे अवघड असते.

म्हातारपण आणि काही चाचण्यांचे निष्कर्ष :
आपण जेव्हा रक्तावर एखादी रासायनिक चाचणी करतो तेव्हा तिची ‘नॉर्मल’ पातळी दोन अंकांच्या मध्ये दाखवतात. उदा. युरीआची पातळी ही २० – ४० mg/dL असते. साधारण प्रयोगशाळा-रिपोर्ट्समध्ये दाखवलेली ही पातळी ही प्रौढ व्यक्तीची असते. लहान मुले आणि वृद्ध यांचे बाबतीत या पातळीत काही चाचण्यांसाठी फरक असतो. ६५ वयानंतर काही चाचण्यांच्या बाबतीत जो फरक पडतो तो ध्यानात घेणे महत्वाचे आहे. अशा ३ महत्वाच्या चाचण्या या आहेत:

१. युरिआ (मूत्राविकारांसाठी)
२. क्रिअ‍ॅटीनिन ( ,, )
३. TSH (थायरॉइड साठी)
या सर्वांच्या पातळीची ‘वरची’ मर्यादा (upper limit) ही प्रौढांपेक्षा जास्त असते. तेव्हा रिपोर्टवरून निष्कर्ष काढताना हे लक्षात घेतले पाहिजे.

याबरोबर वयोगटानुसार चाचण्यांचे विवेचन संपत आहे. पुढचा आणि अंतिम भाग हा ‘खास स्त्री विभाग’ आहे आणि त्यात विवेचन असेल ते गरोदरपणातील चाचण्यांचे.
*********************
भाग ६ इथे आहे: https://www.maayboli.com/node/65714
(क्रमशः)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली माहिती.

ह्या सगळ्या परीक्षा रोग झालाय किंवा नाही हे सांगणार ना? अशा टेस्टस आहेत का ज्या अमुक तमुक रोगाची शक्यता आहे हे सांगू शकतात? म्हणजे मी नियमित पॅप स्मियर करून घेत आहे तर असे होऊ शकते ना की मागच्या वेळी माझी टेस्ट निगेटिव्ह आली होती पण यावेळेस पोसिटीव्ह आली? डायबेटीस, कोलेस्टेरॉल या सगळ्या बाबतीत असे घडू शकते.

अशा वेळी प्रेव्हेंटिव्ह टेस्टस आहेत का ज्या सांगू शकतील की आज जरी सगळे पॅरॅमिटर्स नॉर्मल असले तरी पुढे जाऊन अमुक तमुक होऊ शकते?

देवकी व साधना, आभार !
या सगळ्या परीक्षा रोग झालाय किंवा नाही हे सांगणार ना? >>>>>
नाही, अगदी हो / नाही असेच नेहमी असणार नाही. एखाद्या चाचणींने आपण निरोगी व रोगाच्या सीमारेषेवर आहोत का तेही कळेल.
उदा: जर एखाद्यची F -Glucose १०५ आली तर तो आज मधुमेही नाही पण त्या आजाराच्या पूर्व अवस्थेत आहे. आता तो काळजी घेऊन पुन्हा निरोगी होऊ शकतो.

साधना,
आता कर्करोगाचे उदा. देतो.
या आजाराची सुरवात अशी असते:
निरोगी >> परिवर्तन स्थिती >> चाहूल >> पक्का रोग.
चाळणी चाचणीने त्या मधल्या 2 अवस्था कळू शकतात. तेव्हाच प्रभावी उपचार केले तर रोगप्रतिबंधक होतो.
या चाचण्यांचा प्रभावी उपयोग हा ‘कुंपणावरील लोक’ शोधताना होतो.

उपयुक्त माहिती,सोपी करून सांगण्यात येत आहे.>> +१
आतड्याचा कर्करोग आणि मांसाहार याचा कितपत संबंध आहे ?

साद ,
संबंध बऱ्यापैकी आहे. लाल मांसाचे अतिरेकी सेवन केल्यास तो धोका बराच वाढतो. त्याच्या जोडीला जर आहारात प्राणिज मेद जास्त, चोथ्याचे कमी प्रमाण, लठ्ठपणा ,मद्यपान या गोष्टी असतील तर धोका खूप वाढतो.

डॉक्टरसाहेब, कोलनास्कपी आणि प्रोस्टेट्स चेकपच्या सध्याच्या चाचणी परिक्षेच्या पद्धतीत, रुग्णाच्या दृष्टीकोनातुन काहि सोयीचे बदल (हाय्स्पीड एमआरआय, अल्ट्रासोनोग्राफि इ.) आणण्यासारखे आहेत का? करंट प्रोसिजर्स मेक यु फिल वायोलेटेड... Proud

सचिन मेघा व राज, आभार! तुमच्यसारख्या चोखंदळ वाचकांच्या पाठबळावरच ही लेखमाला चालू आहे.

राज, तुमच्याशी सहमत. त्या प्रश्नाचे उत्तर मी अधिक वाचन करून व जमल्यास संबंधित तज्ञांशी चर्चा करून देइन. ‘इमेजिंग’ हा थेट माझा प्रांत नाही.

>डॉक्टरसाहेब, कोलनास्कपी आणि प्रोस्टेट्स चेकपच्या सध्याच्या चाचणी परिक्षेच्या पद्धतीत, रुग्णाच्या दृष्टीकोनातुन काहि सोयीचे बदल (हाय्स्पीड एमआरआय, अल्ट्रासोनोग्राफि इ.) आणण्यासारखे आहेत का? करंट प्रोसिजर्स मेक यु फिल वायोलेटेड.

आजकाल बर्‍याच ठिकाणी कोलनास्कपी साठी रुग्णाला संपूर्ण भूल देतात त्यामुळे झोपेत काय होते ते अजिबात कळत नाही.

राज,
ज्यांना colonoscopy हा ‘अत्याचार’ वाटतो त्यांच्यासाठी खालील 2 पर्याय निघाले आहेत:
१. CT colonography

२. Capsule colonoscopy - यात रुग्ण एक pill camera गिळतो आणि मग व्हिडीओ घेतात. पण हे तंत्र दुय्यम मानले जाते.

रुग्णांस कमीतकमी त्रास व्हावा या दृष्टीने सतत संशोधन चालू असते.

धन्यवाद डॉक्टर!

अजय, भूल दिल्याशिवाय कोलनास्कपीची कल्पनाच भयावह आहे. Happy त्या प्रोसीजर नंतर बर्‍याच जणांना थोड्याफार प्रमाणात कष्ट जाणवतात, जे नविन तंत्रज्ञानाने टाळता येऊ शकतील. अ‍ॅन्युअल फिजिकल मध्ये केल्या जाणार्‍या प्रोस्टेट्स चेक्सबाबत तर बोलायलाच नको; ते तर भूल दिल्याशिवाय केले जातात...

>>राज, तुमच्याकडे चाळणी म्हणून PSA चे कितपत प्रस्थ आहे ?<<

एक सामान्य व्यक्ती म्हणुन सांगणं कठीण आहे. पण रुटीन ब्लडवर्क मध्ये रक्तातलं प्रोटीन तपासलं जातं. ते नॉर्मल रेंजच्या बाहेर असेल तर पुढची टेस्ट ऑर्डर करत असतील, हा माझा अंदाज...

@राज आपण त्याकडे कसे पाहतो यावरही ते थोडेफार अवलंबून आहे. या सगळ्या प्रकाराकडे मजेनेही पाहता येते. माझ्या कोलनोस्कोपीला दोन शिकाऊ डॉक्टर होत्या. त्यांना माझी कोलनोस्कोपी पहायची लेखी परवानगी हवी होती. मी सरळ या भाषेत सांगितले माझ्या xxx चा सिनेमा पहायचा असेल तर मी १ डॉलर तिकिट लावले आहे. ते तिकिट काढले तरच तुम्हाला सिनेमा पाहता येईल. फुकट नाही. त्यावर त्या म्हणाल्या बाकी ठिकाणी त्याना असलाच सिनेमा फुकट पाहता येतो तर मला त्यांनी पैसे का द्यावे. मी म्हटले "यू गेट व्हॉट यू पे. कोलनोस्कोपी नुसती बघायला पैसे मागणारा पेशंट तुम्हाला परत कधी दिसणार आहे का? यू आर पार्ट ऑफ ए हिस्टॉरीकल इवेंट टुडे"
त्यांना असे कुणिच कधी सांगितले नव्हते. पण त्यांनी हसत हसत १+१= २ डॉलर दिले, मी त्यांच्या लेखी परवानगीवर सही केली आणि मगच भूल द्यायची संमती दिली आणि झोपून गेलो.

अजय यांच्या किस्सा वाचून एक सुचवतो:

जेव्हा प्रोस्टेट वाढू लागते तेव्हा लघवीची धार हळू गतीने पडते. या रुग्णांची Uro flowmetry चाचणी करतात. त्यात पडद्याच्या एका बाजूस रुग्ण लघवी करत असतो आणि तेव्हाच पलीकडील बाजूस डॉ संगणकावर ती गती मोजतात.

या संदर्भात कोणाचा मजेदार अनुभव असल्यास जरूर लिहा ! ☺

म्हातारपणी युरिआ व क्रिअ‍ॅटीनिनची पातळी वाढते त्याचे कारण काय? स्नायूंशी त्याचा संबंध असतो का ?

साद,
तरुणपणी मूत्रपिंडाची चाळण क्षमता व्यवस्थित असते म्हणून युरिआ व क्रि. च्या रक्तपातळी कमी राहतात.
म्हातारपणी ही क्षमता कमी होते. म्हणून त्या वाढतात.

प्रत्येक लॅब चे निकष वेगळे असतात का?.. आईच्या थायरॉईड च्या टेस्ट दोन वेगळ्या लॅब मधून केल्या. डॉक्टरांनी एकाच लॅब मधून टेस्ट करा असे सांगितले आहे.

अंतरा,
होय डॉ चे बरोबर आहे. त्यात दोन मुद्दे आहेत:

१. हॉर्मोन्स ची पातळी मोजण्याच्या पद्धती लॅबनुसार वेगळ्या असू शकतात. जरी पद्धत एक असली तरी दोन वेगळ्या कंपनीची kits वापरात असू शकतात. त्यामुळे प्रत्येक लॅब ची संदर्भ पातळी ( Ref range) वेगळी असते.

२. या मोजणीसाठी अतिसूक्ष्म तंत्र वापरले जाते. त्यामुळे दोन भिन्न व्यक्तींनी ती चाचणी केली तर errors मध्ये बराच फरक पडतो.

मी दरवर्षी माझी kidney function test करून घेते कारण माझी आई किडनी failure ची patient होती. माझं सध्या वय 36 आहे. माझे आत्तापर्यंत सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले आहेत. या वर्षी केलेल्या ब्लड टेस्ट मध्ये माझं Serum Creatinine नॉर्मल रेंज मध्ये आलं पण upper limit च्या जवळ आलं आहे. 1.12 आहे (रेंज 0.5-1.4) यात काळजी करण्या सारखं काही आहे का? तुम्ही सांगू शकाल का?
धन्यवाद.
-सुरुचि

सुरुची,
फक्त एका रिपोर्ट वरून काळजी नको. काही मुद्दे ध्यानात घ्या:

१. तुमच्या lab ने Serum Creatinine ची जी रेंज दिली आहे (वरचे १.४) ती पुरुष व स्त्री या दोघांसाठी वेगळी दाखवली आहे का? नसल्यास ती पुरुषाची समजा. स्त्रीची वरची पातळी ही पुरुषापेक्षा सुमारे ०.३ ने कमी असते.

२. तुमची युरिआ किती आहे? त्याची Serum Creatinine शी सांगड घालता येईल.

३. तुमचा रक्तदाब व लघवीची रुटीन तपासणी नॉर्मल आहे ना तेही बघा.
४. सध्या कोणतेही रोग-लक्षण नसल्यास काळजी नको.

Pages