तंदुरुस्त की नादुरुस्त : भाग ५ ( वय ५० +)

Submitted by कुमार१ on 25 March, 2018 - 23:51

(आरोग्य रक्षण आणि चाळणी चाचण्या)
(भाग ४ :
https://www.maayboli.com/node/65597)

वय ५० चे पुढे : आयुष्यावर बोलू काही !

आपण पन्नाशीच्या उंबरठ्यावर असतो तेव्हा अर्धशतक पूर्ण केल्याची एक सुखद भावना मनात असते खरी. पण त्याचबरोबर अजून किती काळ ‘नाबाद’ राहू याचीही हुरहूर लागते. समाजात आजारांचे प्रमाण एकूणच वाढलेले आहे. त्यात अनेक आजार प्रत्येक पिढीगणिक अलीकडच्या वयात होताना दिसत आहेत. सध्या ५०+ वयोगटात एकही व्याधी अथवा औषध चालू नसलेली व्यक्ती दुर्मिळ झाली आहे. बऱ्याच जणांच्या बाबतीत काही चाळणी चाचण्या चाळीशीच्या दरम्यानच पार पडलेल्या असतात.

या वयांत शिफारस केलेल्या मुख्य चाचण्या खालील आजारांसाठी आहेत:

मोठ्या आतड्याचा कर्करोग
स्तनांचा कर्करोग
गर्भाशयाच्या cervix चा कर्करोग आणि
मधुमेह

मोठ्या आतड्याच्या कर्करोग :

याचे प्रमाण पुरुषांमध्ये स्त्रियांच्या तुलनेत जास्त आहे. काही चाचण्यांच्या मदतीने जर आपल्याला या रोगाची चाहूल लवकर लागली तर त्याचा प्रतिबंध करता येतो तसेच उपचारही प्रभावी ठरतात. या रोगाची पूर्वसूचना देणारा एक विकार म्हणजे आतड्यात polyp होणे. हा विकार ५०+ वयांत होत असल्याने या गटातील सर्वांचीच चाचणी करावी असे तज्ञांचे मत आहे.
आता या आजाराची अधिक जोखीम कोणाकोणाला असते ते पाहू. अशांचे परत दोन गटात वर्गीकरण केले आहे:

उच्च जोखीम असणारे :
यात आतड्याचे खालील आजार झालेल्या व्यक्ती मोडतात:
* दीर्घकालीन ulcerative colitis
* Crohn disease
* अनुवांशिक polyposis चा आजार
(ulcerative colitis आणि Crohn disease हे मुळात आतड्याचे दाहविकार आहेत. त्यांत जुलाब होणे आणि त्यात रक्त व आव पडते).


मध्यम जोखीम असणारे
:

* गट १ मध्ये उल्लेखिलेले आजार आई वडील वा भावंडे यांना असणाऱ्या व्यक्ती
* आहारात भाज्या व फळांचे प्रमाण कमी असणे
* भरपूर मेदयुक्त आहाराची सवय
* मद्यपान व धूम्रपान

आतड्याच्या कर्करोगाच्या चाळणी चाचण्या:
मुख्यत्वे ५०-७५ या वयोगटासाठी यांची शिफारस केलेली आहे. त्या दोन प्रकारच्या आहेत:

इमेजिंग’चे प्रकार: यात दुर्बिणीच्या सहाय्याने (scopy) आतडे पाहणे आणि CTscan च्या मदतीने केलेल्या अत्याधुनिक चाचण्यांचा समावेश आहे. त्या दर ५ वर्षांनी कराव्यात. पण उच्च जोखीम असल्यास दर २ वर्षांनी. या चाचण्यांमुळे कर्करोग पूर्व-प्राथमिक अवस्थेत ओळखता येतो. हे अत्यंत महत्वाचे आहे.

शौच प्रयोगशाळा-तपासणी : यात शौचात दडलेले रक्त आहे का ते पाहतात. पण जेव्हा ते सापडते तेव्हा प्रत्यक्ष कर्करोग झालेला असतो. त्यामुळे ही खऱ्या अर्थाने चाळणी चाचणी ठरत नाही.
ज्या व्यक्ती लठ्ठ आहेत आणि अतिरीक्त मद्यपान व धूम्रपानाच्या आहारी गेल्या आहेत त्यांनी या चाचण्या ४५ व्या वर्षीच सुरु कराव्यात. सर्वांनी ७५ व्या वर्षांनंतर मात्र या चाचण्यांच्या फंदात पडू नये.

स्तनांचा कर्करोग:
याचे विवेचन याआधीच्या वयोगटात झालेले आहे. इथे खालील मुद्दे लागू असल्यास रोगाची जोखीम अजून वाढते:
* स्वतःला यापूर्वी हाच कर्करोग झालेला असणे
* एकही मूल न होणे
* पहिले मूळ पस्तीशी ओलांडल्यावर होणे
* मासिक पाळी खूप उशीराच्या वयात बंद होणे
* पाळी बंद झाल्यानंतर हॉर्मोन्सचे उपचार घेणे
* लठ्ठपणा आणि अतिरीक्त मद्यपान टिकून असणे.

अशा जोखीमवाल्यांनी दरवर्षी mammography आणि स्तनांची MRI तपासणी करावी.
इथे एक मुद्दा लक्षात घ्यावा. स्त्रीच्या आयुष्यात जेव्हा मासिक पाळीची प्रथम सुरवात ते पूर्ण समाप्ती हा कालखंड खूप मोठा असतो तेव्हा एकूण cycles ची संख्याही वाढते. तसेच मूल न होणे, अथवा होऊन त्याला अंगावर न पाजणे या सर्वांमुळे cycles ची संख्या वाढते. परिणामी अशा स्त्रीला दीर्घकाळ इस्ट्रोजेनच्या प्रभावाखाली राहावे लागते. हा घटक या कर्करोगाची जोखीम वाढवतो.

Cervix चा कर्करोग :
याचेही विवेचन याआधीच्या वयोगटात झालेले आहे. तेव्हा अशा चाचण्या झाल्या नसल्यास आता जरूर कराव्यात. किमानपक्षी दरवर्षी स्त्रीरोगतज्ञाकडून जननेंद्रियाची तपासणी करून घ्यावी.

मधुमेह:
याचेही विवेचन पूर्वीच्या गटाप्रमाणेच. बऱ्याचदा या रोगाचे कुठलेही लक्षण नसेल तर चाचणी करणे टाळण्याकडे लोकांचा कल असतो. “मला काय धाड भरलीय, चांगला टूणटूणीत आहे मी”, अशा भ्रमात न राहता दर ३ वर्षांनी ग्लुकोज-पातळी,इ. तपासून घ्यावे.यातून जर मधुमेह उघडकीस आला तर मग कोलेस्टेरॉल व इतर मेदांचे प्रमाणही तपासून घ्यावे.
** ** ** **

काही बहुचर्चित पण शिफारस न केलेल्या चाचण्या :

अशा काही चाचण्यांबद्द्ल अनेकांच्या मनात शंकाकुशंका असतात. मुळात त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर शिफारस केलेली नसते. पण काही देशांत, विशिष्ट समूहांत किंवा ठराविक डॉक्टरांच्या मतानुसार त्या सांगितल्या जातात. त्यातून एकूणच रुग्णांचा गोंधळ वाढतो. अशा फक्त ३ चाचण्यांची दखल घेतो:

१. ‘ड’-जीवनसत्वाची रक्तपातळी :
या जीवनसत्वाचे शरीरात दोन प्रकार(forms) असतात( ड-२ व ड-३). त्यापैकी कुठला मोजायचा यावर एकमत नाही. हे मोजण्याच्या ज्या प्रयोगशाळा-पद्धती आहेत त्यांच्यात एकवाक्यता नाही. ‘नॉर्मल पातळी’ कशाला म्हणायचे याबाबतीतही गोंधळ आहे. एकाच रक्तनमुन्याची दोन ठिकाणी केलेली मोजणी बरीच जुळणारी नसते. अशा अनेक गुंतागुंतीत ही चाचणी अडकलेली आहे. तेव्हा संबंधित आजार रुग्णात थोडाफार दिसू लागला असेल तरच तिचा विचार व्हावा; सरसकट चाळणीसाठी नको.

२. ‘ब १२’-जीवनसत्वाची रक्तपातळी :
’ड’ प्रमाणेच त्यातील काही मुद्दे इथेही लागू होतात. चाचणीचे निष्कर्ष बऱ्याचदा विश्वासार्ह नसतात. समजा पातळी ‘नॉर्मल’ पेक्षा कमी असेल तरीही त्या व्यक्तीत संबंधित आजाराची लक्षणे बिलकूल नसतात. म्हणून काही त्रास (रक्तक्षय वगैरे) नसेल तर उठसूठ याच्या फंदात पडू नये. कधीकधी अशी टूम निघते की सर्व शाकाहारीनी हे प्रमाण बघून घ्यावे. पण अशा सरसकटीकरणाला तसा अर्थ नाही.

३. प्रोस्टेट-कर्करोगाची PSA चाचणी:
प्रगत देशांत हिचा खूप बोलबाला आहे. पण निव्वळ एक चाचणी करून काही साध्य होत नाही. त्यावरून निष्कर्ष काढणे अवघड असते.

म्हातारपण आणि काही चाचण्यांचे निष्कर्ष :
आपण जेव्हा रक्तावर एखादी रासायनिक चाचणी करतो तेव्हा तिची ‘नॉर्मल’ पातळी दोन अंकांच्या मध्ये दाखवतात. उदा. युरीआची पातळी ही २० – ४० mg/dL असते. साधारण प्रयोगशाळा-रिपोर्ट्समध्ये दाखवलेली ही पातळी ही प्रौढ व्यक्तीची असते. लहान मुले आणि वृद्ध यांचे बाबतीत या पातळीत काही चाचण्यांसाठी फरक असतो. ६५ वयानंतर काही चाचण्यांच्या बाबतीत जो फरक पडतो तो ध्यानात घेणे महत्वाचे आहे. अशा ३ महत्वाच्या चाचण्या या आहेत:

१. युरिआ (मूत्राविकारांसाठी)
२. क्रिअ‍ॅटीनिन ( ,, )
३. TSH (थायरॉइड साठी)
या सर्वांच्या पातळीची ‘वरची’ मर्यादा (upper limit) ही प्रौढांपेक्षा जास्त असते. तेव्हा रिपोर्टवरून निष्कर्ष काढताना हे लक्षात घेतले पाहिजे.

याबरोबर वयोगटानुसार चाचण्यांचे विवेचन संपत आहे. पुढचा आणि अंतिम भाग हा ‘खास स्त्री विभाग’ आहे आणि त्यात विवेचन असेल ते गरोदरपणातील चाचण्यांचे.
*********************
भाग ६ इथे आहे: https://www.maayboli.com/node/65714
(क्रमशः)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Submitted by suruchi13 on 1 April, 2018 - 11:59
सुरुची,
फक्त एका रिपोर्ट वरून काळजी नको. काही मुद्दे ध्यानात घ्या:

१. तुमच्या lab ने Serum Creatinine ची जी रेंज दिली आहे (वरचे १.४) ती पुरुष व स्त्री या दोघांसाठी वेगळी दाखवली आहे का? नसल्यास ती पुरुषाची समजा. स्त्रीची वरची पातळी ही पुरुषापेक्षा सुमारे ०.३ ने कमी असते.
- लॅब ने एकच रेंज दाखविली आहे.

२. तुमची युरिआ किती आहे? त्याची Serum Creatinine शी सांगड घालता येईल.
- Urea 23 आहे. (15-45). म्हणजे urea आणि creatinine या दोन्ही values वरून ठरवावं लागेल तर.

३. तुमचा रक्तदाब व लघवीची रुटीन तपासणी नॉर्मल आहे ना तेही बघा.
- हो, नॉर्मल आहे.

४. सध्या कोणतेही रोग-लक्षण नसल्यास काळजी नको.
- प्रतिसादाबद्दल आभार. माझ्या मनात अजून एक प्रश्न आहे. Auto immune diseases आनुवंशिक असतात का?
- सुरुचि

Auto immune diseases आनुवंशिक असतात का? >>>>

होय, बर्‍यापैकी. काहींच्या बाबतीत विशिष्ट 'जीन्स' चा शोध लागलेला आहे. काही आजार दोन्ही जुळ्या भावंडांना होतात, तर काही प्रथम दर्जाच्या नात्यात दिसून येतातच.

थायरॉइड आजारात अनुवांशिकतेचा वाटा मोठा आहे. जर आईची थाय- कमतरता ही Hashimoto thyroiditis मुळे असेल तर तिच्या मुलीला ती होण्याची शक्यता सामान्य मुलींपेक्षा ९ पट जास्त आहे. हा एक Auto immune diseaseच आहे.

Crohn disease .. मला आहे हा आजार Happy
कधीच बरा होणार नाही. फक्त कंट्रोल करू शकतो.
कोलोनोस्कोपी केल्यावर सापडला. आतापर्यंत दोन कोलोनोस्कोपी झाल्या आहेत. बहुधा पुढेही होतील कित्येक. त्याआधी हा ओळखणे कठीण असल्याने हालही बरेच झालेत. आतड्याच्या क्षयरोगाची (टीबीची) 9 महिन्यांची ट्रीटमेंट कम्प्लीट करून झाली आहे. दोघांची म्हणे लक्षणे सेम असतात. पण नंतर मात्र Crohn disease. कन्फर्म झाला हे नशीब. खरे तर तेव्हा डॉक्टर म्हणालेले टीबी असल्यास नशीब समज आणि पेढे वाट. कारण हा त्यापेक्षा डेंजर आहे. पण बहुधा हाच नशीबात होता. आता आहे तर आहे आयुष्यभराचा सोबती. चांगली गोष्ट एकच आहे, तुर्तास तरी यामुळे मी मरणार नाही..

येनीवेज.. आधी मी या ग्रूपात जॉईन नसल्याने हे लेख वाचण्यात आले नव्हते. दोनेक वरवर चाळले त्यात हे ओळखीचे सापडले. आणि त्यामुळे अचानक ही लेखमाला फार उपयुक्त वाटू लागली आहे. हळूहळू वाचतो सारे लेख. या लेखमालेबद्दल धन्यवाद Happy

या जीवनाच्या टप्प्यावर अनेक ताणतणावाचे रोग होण्याची शक्यता असते, उदा. रक्तदाब, हृदयविकार, मानसिक ताणामुळे होणारे विकार,
स्थूलता व त्यामुळे होणारे विकार इ. त्यांचे नियंत्रण होणे खूप महत्त्वाचे अहे. बिघडणा-या जीवनशैलीतील बदल फार मोठा परिणाम करतात.
जगात यामुळे दीड कोटी व्यक्ती प्रतिवर्षी मृत्युमुखी पडतात.

रक्तदाब 120/८० च्या पर्यंत असणे आवश्यक आहे. १३०/९० असेल किंवा १४०/८० किंवा ९० असेल तर जीवनशैलीत बदल कारणे जरुरी आहे,
अशा वेळेस औषधांची सहसा योजना करावी लागत नाही. त्यानंतर मात्र लागते. अलीकडे वयानुसार ३० ते ३५ वयोगटामध्ये सर्व चाचण्या
करून घेणे महत्त्वाचे आहे. रक्तदाबाची लक्षणे लक्षात येत नाहीत किंवा काहीही नसण्याची शक्यता असते. रक्तदाब असणाऱ्या १२.५% व्यक्तींमध्ये
निदान होण्याची संभावना असते.

व्यायामही प्रमाणात व योग्य प्रकारचा असणे ही या काळामध्ये एक आवश्यक बाब आहे. चालणे, पळणे, श्वसनाचे, तसेच शक्तीसामार्थ्य
वाढविण्याचे अशा गोष्टी जीवनाचा अतिशय अविभाज्य अंग आहे. दररोज करण्यासारखी जरुरीची आहे. बहुतेक(९० ते ९५ %) विकार त्यामुळे
टाळता येतात, जीवनाची गुणवत्ता वाढते तसेच दीर्घायुष्याचे वरदानही मिळण्याची शक्यता वाढते. केवळ वेळ मिळत नाही, कंटाळा किंवा आळस
यामुळे बहुतेक व्यक्ती व्यायाम करण्याचे टाळतात. नुसते चालणे किंवा नुसती योगासने कारणे यांच्यावर अवलंबून राहणे हे पूर्णपणे शास्त्रीय नव्हे.
तज्ज्ञ-सल्ला घेऊनच व्यायाम करायला हवा. आहाराच्या बाबतीतसुद्धा तसेच म्हणावे लागेल. किती आहार घ्यावा, कोणता घ्यावा, कसा घ्यावा ,
काय खावे इ. बाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घेणे फार आवश्यक आहे. डाएटीशियन योग्य सल्ला देऊ शकतात.

व्यायामही प्रमाणात व योग्य प्रकारचा असणे ही या काळामध्ये एक आवश्यक बाब आहे. चालणे, पळणे, श्वसनाचे, तसेच शक्तीसामार्थ्य वाढविण्याचे अशा गोष्टी जीवनाचा अतिशय अविभाज्य अंग आहे. दररोज करण्यासारखी जरुरीची आहे. बहुतेक(९० ते ९५ %) विकार त्यामुळे टाळता येतात, जीवनाची गुणवत्ता वाढते तसेच दीर्घायुष्याचे वरदानही मिळण्याची शक्यता वाढते. केवळ वेळ मिळत नाही, कंटाळा किंवा आळस यामुळे बहुतेक व्यक्ती व्यायाम करण्याचे टाळतात. नुसते चालणे किंवा नुसती योगासने कारणे यांच्यावर अवलंबून राहणे हे पूर्णपणे शास्त्रीय नव्हे.तज्ज्ञ-सल्ला घेऊनच व्यायाम करायला हवा. आहाराच्या बाबतीतसुद्धा तसेच म्हणावे लागेल. किती आहार घ्यावा, कोणता घ्यावा, कसा घ्यावा ,काय खावे इ. बाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घेणे फार आवश्यक आहे. डाएटीशियन योग्य सल्ला देऊ शकतात.

Pages