तंदुरुस्त की नादुरुस्त ? : भाग ६ (गरोदरपण)

Submitted by कुमार१ on 1 April, 2018 - 22:07

(आरोग्यरक्षण आणि चाळणी चाचण्या)
(भाग ५ इथे आहे: https://www.maayboli.com/node/65663 )
****************************************

भाग ६ (अंतिम) : गर्भवतीच्या चाचण्या

गरोदरपण ही स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत संवेदनशील बाब. आपण आई होणार याची चाहूल लागल्यापासून ते प्रत्यक्ष बाळाचा जन्म होईपर्यंत ती कशा अवस्थांतून जाते ते बघा. आनंद, हुरहूर, काळजी, घालमेल, ‘त्या’ वेदना आणि अखेर परमानंद ! पण हा गोड शेवट तेव्हाच होऊ शकतो जेव्हा एक निरोगी मूल जन्मास येते. जर या प्रक्रियेत काही बिघाड झाला आणि एखादा गंभीर विकार अथवा विकृती असलेले मूल निपजले तर? तर तिच्या वाट्याला येते फक्त दुःख आणि दुःखच. किंबहुना त्या सगळ्या कुटुंबासाठीच ती शोकांतिका ठरते.

त्यामुळे सुदृढ बालक जन्मास येण्यासाठी गरोदरपणात स्त्रीची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी नियमित वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे. याबाबतीत संबंधित डॉक्टरवर दुहेरी जबाबदारी असते ती म्हणजे स्त्री आणि तिचा गर्भ या दोघांचीही तब्बेत सांभाळणे. त्यासाठी डॉक्टरला शारीरिक तपासणीबरोबरच काही चाचण्यांची मदत घ्यावी लागते. या चाचण्यांची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

आपण ढोबळ मानाने या चाचण्यांचे वर्गीकरण दोन गटात करतो:
१. प्राथमिक चाचण्या: यांचा हेतू मुख्यतः गर्भवतीची तब्बेत तपासण्याचा असतो. अर्थात तिच्या तब्बेतीचा परिणाम शेवटी गर्भावर होतोच.
२. विशिष्ट चाचण्या: यांचा हेतू गर्भाची वाढ पाहणे आणि त्यात काही गंभीर विकृती आहेत का हे पाहण्यासाठी असतो.
आता दोन्हीचे विवेचन करतो.

गर्भवतीच्या प्राथमिक चाचण्या:
या खालीलप्रमाणे आहेत:
१. हिमोग्राम : यात हिमोग्लोबिनचे प्रमाण आणि लालपेशीचा विशेष अभ्यास केला जातो. रक्तक्षय होऊ न देणे हे अत्यंत महत्वाचे आहे. तसेच रक्तगट (ए बी ओ आणि आर एच) ही पाहिला जातो.
२. लघवीची तपासणी : यात ग्लुकोज, प्रथिन हे लघवीतून जात नाहीयेना हे पाहणे तसेच जंतूसंसर्ग तपासणे, हे महत्वाचे.
३. ग्लुकोजची रक्तपातळी : बऱ्याच गर्भवतीना ‘गर्भावस्थेतील मधुमेह’ होऊ शकतो. त्याचे विपरीत परिणाम टाळण्यासाठी ही आवश्यक.
४. रक्तदाब तपासणी ; ही पण तितकीच महत्वाची. जर या अवस्थेत उच्च-रक्तदाब मागे लागला तर त्याचा गर्भाचे वाढीवर गंभीर परिणाम होतो.
५. शरीराचे वजन पाहणे.

विशिष्ट चाचण्या : यांचे आजारानुसार ४ गटात वर्गीकरण होईल:

१. गर्भावस्थेत Down syndrome(DS) चे निदान
२. सोनोग्राफीने गर्भातील विकृती शोधणे
३. जंतूसंसर्ग आजारांच्या चाचण्या : यांत HIV, हिपटायटीस-बी, सिफिलीस आणि रुबेला हे येतात
४. थायरॉइडची TSH चाचणी

अतिविशिष्ट चाचण्या : यात काही तंत्र वापरून गर्भजल काढले जाते आणि खुद्द गर्भाच्या पेशींची जनुकीय तपासणी करतात.
आता DS बद्दल विस्ताराने पाहू.

Down syndrome(DS) :

हा एक जन्मजात गंभीर आजार आहे. मुळात तो गुणसूत्रांचा आजार आहे. जर असे मूल जन्मास आले तर ते मतिमंद असते तसेच त्याला हृदयाचे गंभीर आजार असतात. म्हणून या आजाराचे गर्भावस्थेतच निदान करणे व त्यानुसार निर्णय घेणे हे हितावह असते. हे निदान करण्यासाठी प्रयोगशाळा चाचण्या आणि सोनोग्राफीचा वापर होतो.
या चाचण्या प्रत्येक गर्भवतीने कराव्यात अशी शिफारस आहे पण, त्याची सक्ती नाही. त्याचे निष्कर्ष १००% विश्वासार्ह नसतात. या आजाराचा धोका गर्भवतीच्या वयानुसार वाढत जातो. ३५ वयानंतर हा धोका बराच वाढतो.

इथे आपण DSच्या फक्त प्रयोगशाळा चाचण्यांचाच विचार करणार आहोत. गरोदरपणाची एकूण ३ तिमाहीत विभागणी केली जाते. त्यापैकी पहिल्या दोनमध्ये(शक्यतो पहिल्याच) या चाचण्या करतात.

पहिल्या तिमाहीतील चाचण्या :
यात गर्भवतीच्या रक्तावर २ चाचण्या केल्या जातात:
१. free β CG ची मोजणी: CG हे हॉर्मोन गर्भाच्या भोवती जो placenta असतो त्यात तयार होते.
२. PAPP-A ची मोजणी: हे एक एन्झाईम आहे.

निष्कर्ष
: जर गर्भ DS झालेला असेल तर CG चे प्रमाण नॉर्मलच्या दुप्पट होते आणि PAPP-A चे प्रमाण नॉर्मलच्या निम्म्यावर येते.
नंतर या चाचण्यांचे आणि सोनोग्राफीचे निष्कर्ष यांचा एकत्रित अभ्यास करून DS ची जोखीम (कमी/जास्त) ठरवली जाते. जिथे ही जोखीम खूप असते त्या रुग्णांना थेट गर्भावरील निदान चाचण्या कराव्या लागतात. त्या बऱ्यापैकी तापदायक असतात.

३. थायरॉइडची TSH चाचणी : गर्भवतीस थायरॉइड-कमतरता नाही ना हे पाहणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण, पहिल्या तिमाहीत गर्भाच्या मेंदूचे वाढीसाठी जे थायरॉइड हॉर्मोन लागते ते आईकडूनच पुरवले जाते. आता ही चाचणी बहुतेक ठिकाणी केली जाते पण, सरसकट करायची का यावर तज्ञांचे एकमत नाही. काहींच्या मते ती अधिक जोखीम असणाऱ्यांमध्येच करावी. जोखीम वाढवणारे घटक असे:
• वय ३० चे वर
• पूर्वी गर्भपात झालेले
• थायरॉइड आजाराचा कौटुंबिक इतिहास
• लठ्ठपणा

दुसऱ्या तिमाहीतील चाचण्या :
जर DS च्या चाचण्या पहिल्या तिमाहीत झाल्या असतील तर आता त्याची गरज नाही. परंतु, जर काही कारणाने तसे झाले नसेल तरच आता खालील रक्तचाचण्या कराव्यात:
१. AFP : हे प्रथिन गर्भाच्या यकृतात तयार होते व नंतर मातेच्या रक्तात उतरते.
२. CG : या हॉर्मोनचा उल्लेख वर आला आहे.
३. UE३ : हे हॉर्मोन इस्ट्रोजेन गटातील असून ते placenta मध्ये तयार होते.
४. Inhibin A : हे एक प्रथिन आहे.

निष्कर्ष: जर गर्भ DS झालेला असेल तर CG आणि Inhibin A चे प्रमाण नॉर्मलच्या दुप्पट होते आणि AFP व UE३ चे प्रमाण नॉर्मलच्या ३/४ इतके कमी होते.
वरील ४ पैकी जर पहिल्या तीन एकत्र केल्या तर त्याला ‘तिहेरी चाचणी’ तर चारही केल्या तर त्याला ‘चौपदरी चाचणी’ म्हणतात.
जर वरील चाचण्यांतून DS ची जोखीम खूप असल्याचे कळले तर त्या रुग्णांना थेट गर्भावरील निदान चाचण्या कराव्या लागतात.
AFP चाचणीचा उपयोग DS व्यतिरिक्त अन्य आजारासाठीही होतो. जर गर्भाला पाठीच्या कण्याचा एक गंभीर विकार असेल तर याचे प्रमाण बरेच वाढते.
वरील सर्व चाचण्यांचे निष्कर्ष हे गर्भवतीचे वय, वजन आणि वंश या पार्श्वभूमीवर तपासूनच मग DS व इतर आजारांची जोखीम नक्की केली जाते.

गर्भपेशींच्या अतिविशिष्ट चाचण्या :
जेव्हा चाळणी चाचण्यांचे निष्कर्ष खूप जोखीम दर्शवतात अथवा काही आजारांचा कौटुंबिक इतिहास असतो तेव्हाच या करतात. संबंधित आजारांमध्ये DS व तत्सम आजार, सिकल सेलचा आजार आणि थॅलसिमीया यांचा समावेश आहे. किंबहुना या चाचण्या या चाळणी / रोगनिदान यांच्या सीमेवरील आहेत.

गरोदर होण्यापूर्वीच्या चाचण्या :
हे ऐकायला काहीसे विचित्र वाटेल पण विशिष्ट परिस्थितीत नक्की उपयुक्त आहे. इथे आपण हिमोग्लोबिनच्या सिकलसेल आणि थॅलसिमिया या दोन आजारांचे उदाहरण घेऊ. हे आजार आशिया व आफ्रिकेत बरेच आढळतात. ज्या जोडप्याचे बाबतीत कोणाही एकाचा या आजारांचा मोठा कौटुंबिक इतिहास असेल तर अशा वेळेस या चाचण्यांचा उपयोग होतो. जरी संबंधिताला प्रत्यक्ष आजार नसला तरी त्याची ‘carrier’ अवस्था आहे की नाही ते त्यातून समजते. तेव्हा अशा जोडप्यांनी जनुकीय समुपदेशकाचा सल्ला जरूर घ्यावा.

अजून एक मुद्दा. आता गर्भवतीची TSH चाचणी करण्याचे प्रमाण वाढते आहे. ती गरोदरपणात पहिल्या महिन्यात लवकरात लवकर करायची असते. काही तज्ञ असे सुचवतात की मग ती गरोदरपूर्व अवस्थेतच करावी म्हणजे त्याचा जास्तीत जास्त लाभ मिळेल. हा मुद्दा विचार करण्याजोगा आहे.
तसेच जर त्या स्त्रीस आधीच मधुमेह वा उच्च-रक्तदाब असेल तर तेही आजार गरोदरपूर्व अवस्थेत नियंत्रणात असले पाहिजेत. त्यासाठी संबंधित चाचण्या जरूर कराव्यात.
...
या लेखाबरोबरच ही लेखमाला समाप्त होत आहे. येथील नियमित वाचकांना ती उपयुक्त वाटली याचे समाधान आहे. सर्व वाचक, प्रतिसादक आणि प्रशासक यांचे मनापासून आभार !
**************************************************** ***********************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉक्टर, गर्भवती स्त्री आणि होणारे मूल यांच्या रक्तगटाची आणि त्यात असणार्‍या द्वंद्वामुळे प्रसूतीनंतर होणार्‍या गुंतागुंतीशी संबंधीत चाचण्या (Rh and ABO incompatibility) या रूटीन चाचण्यात नसतात का?

डॉक, ह्या मालिकेत एक विषय अजून हवा होता असे वाटते :- 'विवाहपूर्व चाचण्या' असा.

विवाहपूर्व शारीरिक-मानसिक आरोग्य चाचण्या, अनुवांशिक व्यंग, वंध्यत्व या विषयांवर फारसे बोलले जात नाही, विशेषतः 'ठरवून' केल्या जाणाऱ्या विवाहात. तुम्हां डॉक्टर मंडळीनी अश्या 'विवाहपूर्व चाचण्या' सुचविण्याची फॅशन लवकर येवो ही सदिच्छा Happy

मी सहज केलेल्या सूचनेवरून सोप्या-सरळ भाषेत ही अभ्यासपूर्ण मालिका लिहिल्याबद्दल तुमचे आभार.

अनिंद्य

मी सहज केलेल्या सूचनेवरून >>>>
@ अनिंद्य
“विषय सुचणे” हेच खरे लेखनातील ‘मेंदू’चे काम आहे ! पुढचे श्रम ही निव्वळ कारकुनी असते – इति वपु.

तेव्हा मी काय केले हे वेगळे सांगायची गरज नाही ! Bw
‘विवाहपूर्व चाचण्या’ या मुद्द्याची नोंद घेत आहे.

असो, सातत्यपूर्ण प्रतिसादाबद्दल आणि उत्साह वर्धनाबद्दल आभार

अनिंद्य यांच्या पोस्टला +१
विवाहपूर्व चाचण्या' >>>>>यावर सवडीने लिहायचे डॉक्टरांनी मनावर घ्यावे ही विनंती

पुढचे श्रम ही निव्वळ कारकुनी असते....... तेव्हा मी काय केले हे वेगळे सांगायची गरज नाही.....

हा तुमचा विनय आहे हे मी जाणतो Happy

छान मालिका झाली. त्याकरिता आपण घेतलेल्या मेहनतीकरिता धन्यवाद. संदर्भाकरीता ह्या मालिकेचा फार उपयोग होणार आहे.

भारतासारख्या गरीब देशात एच आय व्ही ची चाचणी करून घेणेही महत्त्वाचे आहे. लेख नेहेमीप्रमाणे उत्कृष्ट आहे. गरोदर स्त्रियांत त्याचे प्रमाण ०.३% आहे.

कुमार१, तुम्ही दिलेली माहिती नेहेमीप्रमाणे अतिशय उपयुक्त तर आहेच, पण त्याचबरोबर तुमच्यातील अनुभव व परिपक्वतेचेही दर्शन घडवते.

गरोदारकाळात आहाराबरोबर व्यायाम, विश्रांती व स्वच्छता फार महत्त्वाची आहे. रोज दुपारी
दीड दोन तास विश्रांती घेतल्यामुळे बाळाचे वजन वाढू शकते याला शास्त्रीय आधार आहे.

डॉ. रवी,
आभार ! तुमच्यासारखे अभ्यासू वाचक लाभल्यामुळे लेखन करण्यास हुरूप येतो.

आज जागतिक आरोग्य दिन !
त्यानिमित्ताने आपणा सर्वांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभण्यासाठी शुभेच्छा .

जगात माता-मृत्युचे प्रमाण फार भयावह आहे. दरवर्षी सुमारे ३ लाख माता मृत्युमुखी पडतात. दर वर्षी अनेक मुले मातृविहीन होतात.
त्यातील ५ मुख्य कारणे आहेत रक्तस्त्राव, जंतुसंसर्ग, अयोग्य गर्भपात, मूल आडवे असणे व उच्च रक्तदाब.
त्यासाठी अनेक पातळयांवर प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. भारतासारख्या देशातही त्याचे प्रमाण खूप जास्ती आहे.
ह्या घटना अतिशय दुःखद, शोचनीय व विचार करण्यासारख्या आहेत.

>>आज जागतिक आरोग्य दिन !
त्यानिमित्ताने आपणा सर्वांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभण्यासाठी शुभेच्छा .<<

धन्यवाद डॉक्टरसाहेब! तुम्हालाहि दीर्घ, निरामय आयुष्यासाठी शुभेच्छा. तुमच्या सारखे डॉक्टर दीर्घायुषी झाले तर आमच्यासारखे सामान्यजन आपोआप दीर्घायुषी होतील...

राज, आभार !
तुमच्या सारखे डॉक्टर दीर्घायुषी झाले तर आमच्यासारखे सामान्यजन आपोआप दीर्घायुषी होतील... >>>>
हा एक भाग झाला पण प्रत्येकाची जनुकीय पार्श्वभूमी अधिक महत्त्वाची !