तंदुरुस्त की नादुरुस्त : भाग ५ ( वय ५० +)

Submitted by कुमार१ on 25 March, 2018 - 23:51

(आरोग्य रक्षण आणि चाळणी चाचण्या)
(भाग ४ :
https://www.maayboli.com/node/65597)

वय ५० चे पुढे : आयुष्यावर बोलू काही !

आपण पन्नाशीच्या उंबरठ्यावर असतो तेव्हा अर्धशतक पूर्ण केल्याची एक सुखद भावना मनात असते खरी. पण त्याचबरोबर अजून किती काळ ‘नाबाद’ राहू याचीही हुरहूर लागते. समाजात आजारांचे प्रमाण एकूणच वाढलेले आहे. त्यात अनेक आजार प्रत्येक पिढीगणिक अलीकडच्या वयात होताना दिसत आहेत. सध्या ५०+ वयोगटात एकही व्याधी अथवा औषध चालू नसलेली व्यक्ती दुर्मिळ झाली आहे. बऱ्याच जणांच्या बाबतीत काही चाळणी चाचण्या चाळीशीच्या दरम्यानच पार पडलेल्या असतात.

या वयांत शिफारस केलेल्या मुख्य चाचण्या खालील आजारांसाठी आहेत:

मोठ्या आतड्याचा कर्करोग
स्तनांचा कर्करोग
गर्भाशयाच्या cervix चा कर्करोग आणि
मधुमेह

मोठ्या आतड्याच्या कर्करोग :

याचे प्रमाण पुरुषांमध्ये स्त्रियांच्या तुलनेत जास्त आहे. काही चाचण्यांच्या मदतीने जर आपल्याला या रोगाची चाहूल लवकर लागली तर त्याचा प्रतिबंध करता येतो तसेच उपचारही प्रभावी ठरतात. या रोगाची पूर्वसूचना देणारा एक विकार म्हणजे आतड्यात polyp होणे. हा विकार ५०+ वयांत होत असल्याने या गटातील सर्वांचीच चाचणी करावी असे तज्ञांचे मत आहे.
आता या आजाराची अधिक जोखीम कोणाकोणाला असते ते पाहू. अशांचे परत दोन गटात वर्गीकरण केले आहे:

उच्च जोखीम असणारे :
यात आतड्याचे खालील आजार झालेल्या व्यक्ती मोडतात:
* दीर्घकालीन ulcerative colitis
* Crohn disease
* अनुवांशिक polyposis चा आजार
(ulcerative colitis आणि Crohn disease हे मुळात आतड्याचे दाहविकार आहेत. त्यांत जुलाब होणे आणि त्यात रक्त व आव पडते).


मध्यम जोखीम असणारे
:

* गट १ मध्ये उल्लेखिलेले आजार आई वडील वा भावंडे यांना असणाऱ्या व्यक्ती
* आहारात भाज्या व फळांचे प्रमाण कमी असणे
* भरपूर मेदयुक्त आहाराची सवय
* मद्यपान व धूम्रपान

आतड्याच्या कर्करोगाच्या चाळणी चाचण्या:
मुख्यत्वे ५०-७५ या वयोगटासाठी यांची शिफारस केलेली आहे. त्या दोन प्रकारच्या आहेत:

इमेजिंग’चे प्रकार: यात दुर्बिणीच्या सहाय्याने (scopy) आतडे पाहणे आणि CTscan च्या मदतीने केलेल्या अत्याधुनिक चाचण्यांचा समावेश आहे. त्या दर ५ वर्षांनी कराव्यात. पण उच्च जोखीम असल्यास दर २ वर्षांनी. या चाचण्यांमुळे कर्करोग पूर्व-प्राथमिक अवस्थेत ओळखता येतो. हे अत्यंत महत्वाचे आहे.

शौच प्रयोगशाळा-तपासणी : यात शौचात दडलेले रक्त आहे का ते पाहतात. पण जेव्हा ते सापडते तेव्हा प्रत्यक्ष कर्करोग झालेला असतो. त्यामुळे ही खऱ्या अर्थाने चाळणी चाचणी ठरत नाही.
ज्या व्यक्ती लठ्ठ आहेत आणि अतिरीक्त मद्यपान व धूम्रपानाच्या आहारी गेल्या आहेत त्यांनी या चाचण्या ४५ व्या वर्षीच सुरु कराव्यात. सर्वांनी ७५ व्या वर्षांनंतर मात्र या चाचण्यांच्या फंदात पडू नये.

स्तनांचा कर्करोग:
याचे विवेचन याआधीच्या वयोगटात झालेले आहे. इथे खालील मुद्दे लागू असल्यास रोगाची जोखीम अजून वाढते:
* स्वतःला यापूर्वी हाच कर्करोग झालेला असणे
* एकही मूल न होणे
* पहिले मूळ पस्तीशी ओलांडल्यावर होणे
* मासिक पाळी खूप उशीराच्या वयात बंद होणे
* पाळी बंद झाल्यानंतर हॉर्मोन्सचे उपचार घेणे
* लठ्ठपणा आणि अतिरीक्त मद्यपान टिकून असणे.

अशा जोखीमवाल्यांनी दरवर्षी mammography आणि स्तनांची MRI तपासणी करावी.
इथे एक मुद्दा लक्षात घ्यावा. स्त्रीच्या आयुष्यात जेव्हा मासिक पाळीची प्रथम सुरवात ते पूर्ण समाप्ती हा कालखंड खूप मोठा असतो तेव्हा एकूण cycles ची संख्याही वाढते. तसेच मूल न होणे, अथवा होऊन त्याला अंगावर न पाजणे या सर्वांमुळे cycles ची संख्या वाढते. परिणामी अशा स्त्रीला दीर्घकाळ इस्ट्रोजेनच्या प्रभावाखाली राहावे लागते. हा घटक या कर्करोगाची जोखीम वाढवतो.

Cervix चा कर्करोग :
याचेही विवेचन याआधीच्या वयोगटात झालेले आहे. तेव्हा अशा चाचण्या झाल्या नसल्यास आता जरूर कराव्यात. किमानपक्षी दरवर्षी स्त्रीरोगतज्ञाकडून जननेंद्रियाची तपासणी करून घ्यावी.

मधुमेह:
याचेही विवेचन पूर्वीच्या गटाप्रमाणेच. बऱ्याचदा या रोगाचे कुठलेही लक्षण नसेल तर चाचणी करणे टाळण्याकडे लोकांचा कल असतो. “मला काय धाड भरलीय, चांगला टूणटूणीत आहे मी”, अशा भ्रमात न राहता दर ३ वर्षांनी ग्लुकोज-पातळी,इ. तपासून घ्यावे.यातून जर मधुमेह उघडकीस आला तर मग कोलेस्टेरॉल व इतर मेदांचे प्रमाणही तपासून घ्यावे.
** ** ** **

काही बहुचर्चित पण शिफारस न केलेल्या चाचण्या :

अशा काही चाचण्यांबद्द्ल अनेकांच्या मनात शंकाकुशंका असतात. मुळात त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर शिफारस केलेली नसते. पण काही देशांत, विशिष्ट समूहांत किंवा ठराविक डॉक्टरांच्या मतानुसार त्या सांगितल्या जातात. त्यातून एकूणच रुग्णांचा गोंधळ वाढतो. अशा फक्त ३ चाचण्यांची दखल घेतो:

१. ‘ड’-जीवनसत्वाची रक्तपातळी :
या जीवनसत्वाचे शरीरात दोन प्रकार(forms) असतात( ड-२ व ड-३). त्यापैकी कुठला मोजायचा यावर एकमत नाही. हे मोजण्याच्या ज्या प्रयोगशाळा-पद्धती आहेत त्यांच्यात एकवाक्यता नाही. ‘नॉर्मल पातळी’ कशाला म्हणायचे याबाबतीतही गोंधळ आहे. एकाच रक्तनमुन्याची दोन ठिकाणी केलेली मोजणी बरीच जुळणारी नसते. अशा अनेक गुंतागुंतीत ही चाचणी अडकलेली आहे. तेव्हा संबंधित आजार रुग्णात थोडाफार दिसू लागला असेल तरच तिचा विचार व्हावा; सरसकट चाळणीसाठी नको.

२. ‘ब १२’-जीवनसत्वाची रक्तपातळी :
’ड’ प्रमाणेच त्यातील काही मुद्दे इथेही लागू होतात. चाचणीचे निष्कर्ष बऱ्याचदा विश्वासार्ह नसतात. समजा पातळी ‘नॉर्मल’ पेक्षा कमी असेल तरीही त्या व्यक्तीत संबंधित आजाराची लक्षणे बिलकूल नसतात. म्हणून काही त्रास (रक्तक्षय वगैरे) नसेल तर उठसूठ याच्या फंदात पडू नये. कधीकधी अशी टूम निघते की सर्व शाकाहारीनी हे प्रमाण बघून घ्यावे. पण अशा सरसकटीकरणाला तसा अर्थ नाही.

३. प्रोस्टेट-कर्करोगाची PSA चाचणी:
प्रगत देशांत हिचा खूप बोलबाला आहे. पण निव्वळ एक चाचणी करून काही साध्य होत नाही. त्यावरून निष्कर्ष काढणे अवघड असते.

म्हातारपण आणि काही चाचण्यांचे निष्कर्ष :
आपण जेव्हा रक्तावर एखादी रासायनिक चाचणी करतो तेव्हा तिची ‘नॉर्मल’ पातळी दोन अंकांच्या मध्ये दाखवतात. उदा. युरीआची पातळी ही २० – ४० mg/dL असते. साधारण प्रयोगशाळा-रिपोर्ट्समध्ये दाखवलेली ही पातळी ही प्रौढ व्यक्तीची असते. लहान मुले आणि वृद्ध यांचे बाबतीत या पातळीत काही चाचण्यांसाठी फरक असतो. ६५ वयानंतर काही चाचण्यांच्या बाबतीत जो फरक पडतो तो ध्यानात घेणे महत्वाचे आहे. अशा ३ महत्वाच्या चाचण्या या आहेत:

१. युरिआ (मूत्राविकारांसाठी)
२. क्रिअ‍ॅटीनिन ( ,, )
३. TSH (थायरॉइड साठी)
या सर्वांच्या पातळीची ‘वरची’ मर्यादा (upper limit) ही प्रौढांपेक्षा जास्त असते. तेव्हा रिपोर्टवरून निष्कर्ष काढताना हे लक्षात घेतले पाहिजे.

याबरोबर वयोगटानुसार चाचण्यांचे विवेचन संपत आहे. पुढचा आणि अंतिम भाग हा ‘खास स्त्री विभाग’ आहे आणि त्यात विवेचन असेल ते गरोदरपणातील चाचण्यांचे.
*********************
भाग ६ इथे आहे: https://www.maayboli.com/node/65714
(क्रमशः)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्तन- कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर बऱ्याच महिलांना काखेत सूज आल्याने (Lymphedema) दुखण्याची वेदना खूप असते.
यावर उपाय म्हणून अशा महिलांना ढोल ताशा वादनाचे रीतसर प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रकारच्या व्यायामाने त्यांच्या वेदना शेमल्या आणि हाताचे काम चांगलेच सुधारले.
सदर प्रशिक्षण पुणे विद्यापीठातील एका मंडळाने दिले.

( बातमी: सकाळ पुणे टुडे ८ ऑगस्ट, २०२२ )

स्तन- कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर बऱ्याच महिलांना काखेत सूज आल्याने (Lymphedema) दुखण्याची वेदना खूप असते.
यावर उपाय म्हणून अशा महिलांना ढोल ताशा वादनाचे रीतसर प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रकारच्या व्यायामाने त्यांच्या वेदना शेमल्या आणि हाताचे काम चांगलेच सुधारले.
सदर प्रशिक्षण पुणे विद्यापीठातील एका मंडळाने दिले.>> ह्याला काही व्हेरिफिकेशन आहे का मेडिकल टीम तर्फे, स्कॅन वगैरे. नाहीतर विनोदी बातमीच वाटत आहे.

इथे विविध व्यायाम उपचार पद्धतींची माहिती आहे
https://www.physio-pedia.com/Breast_Cancer_Related_Lymphedema
त्यातून सूज कमी होते.

अनुभवानुसार वेगवेगळे व्यायाम प्रकार उपयुक्त ठरू शकतात.
बातमीत विनोदी वाटण्यासारखे काहीही नाही

स्तन-कर्करोग शस्त्रक्रियेत गाठीच्या ठिकाणी भूल दिल्यास रोग पुन्हा होण्याची शक्यता कमी ; टाटा मेमोरियलचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांचे संशोधन जागतिक परिषदेत सादर

https://www.loksatta.com/mumbai/anesthetic-techniques-reduce-cancer-recu...

अभिनंदन !

टेस्ट कराव्यात .हे मान्य .पण टेस्ट चे रिझल्ट बघून स्वतः निष्कर्ष काढण्याचा उद्योग कोणी करी नये.
इंटरनेट वरील माहिती किंवा वरील प्रकारचे लेख वाचून स्वतः डॉक्टर होवू नका.
नाहीतर विनाकारण चुकीचा भ्रम निर्माण होवून काही आजार नसेल तरी स्ट्रेस मुळे तो होईल.
मानवी शरीर खूप किचकट आहे.
एक दोन टेस्ट वरून कॅन्सर असू किंवा कोणताही गंभीर आजार ह्याचे निदान होत नाही.

फॅमिली डॉक्टर नी सांगितलेली खरी कथा आहे.
त्यांच्या मित्रांनी
Heart attack पासून वाचावे म्हणून सर्व टेस्ट ज्या काही उपलब्ध आहेत त्या सर्व केल्या होत्या.
सर्व रिपोर्ट नॉर्मल.
आणि तो माणूस अटॅक नीच गेला.

ह्याचे कारण फक्त स्ट्रेस घेणे विनाकारण आणि स्वतःच्या शरीरावर अविश्वास दाखवणे हेच आहे.


** कोलनोस्कोपी या सध्याच्या चाचणी परिक्षेच्या पद्धतीत, रुग्णाच्या दृष्टीकोनातुन काहि सोयीचे बदल आणण्यासारखे आहेत का?

>>>
या संदर्भातील चालू संशोधन :

प्रत्यक्ष स्कोप आतड्यांमध्ये सरकवण्याऐवजी त्याला पर्याय म्हणून soft robots विकसित केले जात आहेत. हे तुलनेने नरम असतील. त्यामुळे ते आतमध्ये सरकवणे रुग्णास अधिक आरामदायी असेल.
तसेच त्यांच्या वापरामुळे भूल/ गुंगीचे औषध द्यावे लागणार नाही असा अंदाज आहे.

कानपूर येथील GSVM वैद्यकीय महविद्यालयात स्तन कर्करोगाच्या सुरवातीच्या अवस्थेत केली जाणारी onco mammoplasty ही शस्त्रक्रिया अवघ्या एक रुपया शुल्कात केली जाते.

https://medicaldialogues-in.cdn.ampproject.org/v/s/medicaldialogues.in/a...

कर्क रोग उपचार हे खूप त्रास दायक आणि खर्चिक आहेतं
अब्जावधी रुपयांचे हे मार्केट आहे .
त्या वर लक्ष केंद्रित करण्या पेक्षा..
कर्क रोग होण्याची कारणे आणि ती कारणे समूळ नष्ट करणे.
हा एकमेव उपाय आहे.

स्तन कर्करोगासंबंधी जागरूक असणे खूप महत्त्वाचे आहे. नियमित चाचपणी आणि प्रतिबंधात्मक चाळणी चाचण्यांचे महत्त्व अधोरेखित करणारा एक अनुभव :

https://i.stuff.co.nz/life-style/news/130318422/i-was-diagnosed-with-bre...

संबंधित स्त्रीला वयाच्या 36 व्या वर्षी स्तन कर्करोग झाला. त्यानंतर काही काळाने तिच्या आईला देखील तो आजार झाला.

<< तिच्या आईला देखील तो आजार झाला. >>
आईमुळे पुढील पिढीत हा कर्करोग संक्रमित होण्याची शक्यता असते का? अँजेलिना जोली या नटीने रिस्क नको म्हणून ऑपरेशन करून, दोन्ही स्तन काढल्याचे वाचले होते.

अँजेलिना जोली
>>>
तिच्या शरीरात mutation of the BRCA1 gene होते म्हणून तिने दोन्ही स्तन काढले.
(https://www.plasticsurgery.org/news/blog/inside-the-angelina-jolie-effec....)
हे महत्त्वाचे जनुकीय कारण आहे एखाद्या स्त्रीच्या आई, बहीण किंवा मुलीला हा आजार झाला असेल तर त्या स्त्रीच्या दृष्टीने हा सर्वात महत्त्वाचा धोकादायक घटक ठरतो. अशा वेळेस कुटुंबीयांचीही जनुकीय तपासणी करतात.

Angelina Jolie decided to have surgery to remove her breasts, ovaries, and fallopian tubes because she inherited a mutated BRCA1 gene. After losing her mother, grandmother, and aunt to cancer, she opted for preventative surgery to reduce her cancer risk
(https://drjayanam.com/videos/angelina-jolies-inspirational-story-of-brea....)

तिच्या आईला स्तनांचा कर्करोगच होता.

Pages