आजकालच्या मुलांना मॅनर्सचा ओवरडोस पाजला जातोय का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2018 - 12:55

कालचा किस्सा - बसस्टॉपवर गर्लफ्रेंडची वाट बघत उभा होतो. शेजारी एक अख्खे मराठी कुटुंब उभे होते. बसची वाट बघत होते की शेजारच्या गार्डनमध्ये खेळून दमून नुसते विसाव्यासाठी तिथे थांबले होते कल्पना नाही. एक चार वर्षांचा मुलगा, त्याचे आई-बाबा आणि आज्जी होती. मुलगा बसस्टॉपभोवती नुसता पळत होता. मग दमला. तहान लागली. आईकडे पाणी मागितले. तसे त्याच्या आजीने तत्परतेने त्याला पाणी दिले. दमलेला मुलगा ती छोटीशी बाटली तोंडाला लावून घटाघटा पाणी प्यायला. बाटली आजीला परत करून पुन्हा मस्ती करायला पळणार तोच त्याची आई म्हणाली, "रोहू, आजीला थॅन्क्स म्हणालास का?" .... मी शॉकड् ! आज्जीला कसले थॅंन्क्स..??

आजी ओशाळली. रोहूने भाव खाल्ला. आई चिडली. आजी आणखी ओशाळली. रोहूला राहू दे म्हणाली. आई आज्जीला म्हणाली, "नाही हा आई, या वयातच सवयी लागायला हव्यात" रोहूच्या बाबांनी यावर नंदीसारखी मान हलवली. मग रोहू औपचारीकता दाखवत थॅंन्क्यू आज्जी बोलत पसार झाला.

चार दिवसांपूर्वीचा किस्सा - त्या दिवशी आम्ही बागेत बाकड्यावर बसून गप्पा मारत होतो. शेजारी दोन कुटुंबांची भेट झाली. म्हणजे दोन आया आणि त्यांची गार्डनमध्ये खेळायला आलेली मुले. वयोगट हाच. चार ते पाच. त्या आयांनी आधी मुलांना प्रथेप्रमाणे एकमेकांशी शेकहॅण्ड करायला लावले. त्यानंतर ती दोन्ही मुले अनुक्रमे जे वेफर्स आणि बिस्कीट खात होती ते त्यांना एकमेकांशी शेअर करायला सांगण्यात आले. बिस्कीट खाण्यार्‍या मुलाने लाडाने एक बिस्कीट समोरच्याला ऑफर केले. पण वेफर खाणार्‍या मुलाने ईच्छा असूनही ते घेतले नाही कारण त्याबदल्यात त्याला आपली वेफर्स शेअर करायची नव्हती. झाले, त्या वेफर्सवाल्या मुलाच्या आईला ईतके लाजिरवाणे वाटले की तिचे दुसर्‍या बाईला सॉरीही म्हणून झाले. आणि मग ती बाई दूर जाताच आपल्या मुलाला रागावूनही झाले. मुलगा आधी चिडला, मग रडला, आणि मग खेळायला निघून गेला. झाल्या घटनेनंतर त्या बाईला बहुतेक आमच्यासमोर थांबणेही लाजिरवाणे वाटले असावे, त्यामुळे ती सुद्धा दोन बाक सोडून दुसरीकडे बसायला गेली.

तर मुलांनी आपला खाऊ आणि खेळणी एकमेकांशी शेअर करावेत हे संस्कार चांगलेच आहेत. पण काही बाबतीत त्यांना ते जमेलच असे नसते. शेवटी लहान मुलेच ती, कुठे जीव अडकेल त्यांनाच माहीत. पण आपल्या मुलांना खाऊ शेअर करायचे साधे मॅनर्स नाहीत याचा एवढा प्रेस्टीज ईश्यू करायची खरंच गरज असते का?

माझी या दोन्ही किस्स्यांमध्ये तशी तक्रार नाही. कारण पॅरेंटींग हा एका मर्यादेपर्यंत ज्याचा त्याचा पर्सनल विषय आहे. आणि हे वरचे दोन्ही किस्से कदाचित त्या मर्यादेतच येत असावेत. त्यामुळे हे चूक आहे वा मुलांशी असे वागू नये वगैरे मला सांगायचे नाहीये, माझा तो अधिकारही नसावा. फक्त मला पर्सनली हे फारसे पटत नाही ईतकेच. ईतरांची मते जाणून घ्यायला आवडतील. अनुभवाचे बोल, पुढे भविष्यात कामाला येतील Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही चांगले संस्कार मुलांवर जरूर करावेत..जसे की वरती लिहल्याप्रमाणे खाऊ व खेळणी शेअर करणं वैगेरे..

पण मुलांवर रागावून किंवा ते संस्कार त्यांच्यावर जबरजस्ती लादता कामा नये..

प्रेमाने सांगून,समजावून किंवा गोष्टीच्या रूपाने संस्कारचं महत्व त्यांना पटवून द्यावं...त्यांच्याप्रमाणे त्यांना समजावलं की मुले ते संस्कार राजीखुशी आत्मसात करतात..

बाकी आजीला थॅन्क्यू म्हणणं हे जरा ओवर वाटलं..

आपल्यापणात औपचारिकता नसावी असं मला तरी वाटतं...

बाय द वे ऋन्मेष..खुप चांगला विषय आहे धाग्याचा...

रोहूच्या बाबांनी यावर नंदीसारखी मान हलवली.
>>> असली जमात वाढायला लागली आहे समाजात.

हा संस्कारांचा भाग आहे. ज्याला नाही करायचे त्याने नका करु, पण तेच कसं बरोबर सांगणे अनाकलनीय आहे.

आई/वडील/ आजी का थर्ड पार्टी कोणीही असो आपल्याला जो मदत करेल त्याच्या प्रति आपल्या भावना शब्दात व्यक्त करता आल्याच पाहिजेत. शब्द वापरत नसतील तर स्पर्शातून व्यक्त करा. नुसते हसणे इज नॉट इनफ. ते ही न करणे इज सिंपली रूड.
मोठ्यांना नमस्कार करा हे जसे आपल्या पिढीला संस्कार म्हणून शिकवत तेच संस्कार आज थॅक्यू/ प्लीज/ सॉरी या शब्दातून पुढच्या पिढीला शिकवा. त्याच बरोबर कोणी थॅक्यू म्हणालं तर बावळट सारखं थॅक्यू कशाला! राहुदे. किंवा आपल्या माणसांना कसलं थॅक्यू! असलं काही लेक्चर ऐकवू नका. किंवा भिडस्थ ही होउ नका.
थॅक्यू ग्रेसफुली घ्यायला शिका. . तुम्ही पण थॅक्यू म्हणा, अरे कधीपण (एनिटाईम) किंवा शुअर किंवा मराठी तडका देऊन काही तरी म्हणा. कमित कमी थ्म्प्स अप दाखवा.

पोरांना त्यावरुन ओरडू ऑफकोर्स नका, पण कुणाला थॅक्यू किंवा सॉरी म्हणण्यात कमीपणा नाही. ग्रेस आहे हे बिंबवत रहा. हे परकीय अंधानुकरण नाही. एक उत्तम संस्कार आहे.

आज्जीला थॅंक्स ..कठीण आहे. यातुन संस्कार कमी आणि व्यावहारीकता जास्त दिसते. मुलांना असे उठसुठ सांगण्यापेक्षा कधीतरी निवांत समजावुन सांगावे जास्त लक्षात राहते.

मोठ्यांच्या कृतींतूनच लहान मुले शिकतात, म्हणून मोठ्यांनीच आपले वागणे, बोलणे सुसंस्कृत केले पाहिजे. अर्थात काही गोष्टी मुलांना शिकवणे गरजेचे असते. मात्र संस्काराच्या नावाखाली आपण मुलांना काय शिकवतोय याचं भान असावं

थॅन्क यू, प्लीज, सॉरी हे शिकवणे व ते उद्गारण्यात कमीपणा न वाटणे हे अगदी बरोबर! विशेषतः, सॉरी आणि प्लीज नक्कीच म्हणावे. पण कितीही झाले तरी अगदी लहानसहान बाबींमध्ये आपल्याकडे थँक यू म्हणण्याची पद्धत नाही. म्हणजे, वरच्याच उदाहरणात, आजीने पाणी दिले की नातवाने थँक यू म्हणणे अशी पद्धत आपल्याकडे आधीपासून नव्हती. ती पद्धत नव्हती म्हणजे अगदी काही नातवंडे उद्धट, बेदरकार ठरली किंवा आजीची मानहानी झाली असे कोणीही मानत नाही. नात्यातील प्रेमामुळे व आपुलकीमुळे होणार्‍या अतिशय किरकोळ गोष्टींमधील काव्य हे असले थँक यू म्हणण्याने निघून जाते. आता हे काव्यच थोतांड आहे आणि परदेशातील चांगल्या गोष्टी तुम्हाला घ्यायच्याच नाहीत असे कोणाला म्हणायचे असेल तर म्हणा. सॉरी आणि प्लीज ह्या दोन शब्दांचे महत्व वेगळे का आहे तर सॉरी म्हणण्यात अपराधी भावना व प्लीज म्हणण्यात नम्रता आहे व त्या शब्दांमुळे माणसात काहीतरी सौम्यपणा टिकून आहे हे दिसून येते. त्यामुळे ते शब्द अगदी जवळच्या, मायेच्या नात्यातही उच्चारावेतच. पण केवळ जिभेला सवय म्हणून आईला वगैरेही थँक यू म्हणणे, तेही आईने जेवायला वगैरेही वाढले तर हे म्हणजे नात्यांची मजा घालवण्यासारखे वाटते. व्यावसायिक जगात किंवा अशा नात्यांच्या बाहेर मात्र थँक यू म्हणायलाच हवे. (मी तर सरळ धन्यवाद म्हणतो).

संस्कार व्हायलाच पाहिजेत. आईवडील करू लागले स्वत: की मुलांना आपोआपच कळतात. चानेलवर (झी/सोनी) नाच /गाण्यांची ओडिशन्स होतात तेव्हा लगेच फरक लक्षात येतो. काही मुले छानछान उत्तरं देतात.

मला यात इतके बिग डिल काय आहे कळले नाही.
आजीला, आईला थँक यु म्हटलेच पाहिजे असे नाही पण म्हटले तर त्यामुळे चांगले वाटले पाहिजे, ओफेंडेड नाही.
सेम वे विथ दुसरे उदाहरण.
हल्ली मुलं एकेकटी असतात.त्यांच्याभोवती सगळे जग नकळत फिरत असते. अश्या वेळी थोडी ओव्हर मॅनर्स ची सवय लावत असतील तर त्या आयांचे मला कौतुक वाटेल.

नात्यातील प्रेमामुळे व आपुलकीमुळे होणार्‍या अतिशय किरकोळ गोष्टींमधील काव्य हे असले थँक यू म्हणण्याने निघून जाते.
+१

Sorry आणि thank you चा अर्थ असणारे शब्द मराठीत नाहीत,
कृतज्ञा किंवा किंचीत अपराधी असण्याची भावना आपण मोठा शब्द समुच्चय , टोन मधील बदल किंवा हावभावातून दाखवतो.
आजच्या काळात, जिथे शब्द संपत्ती आणि बोलायला वेळ दोन्ही खूप मर्यादित झाले आहेत तिकडे या दोन्ही भावना व्यक्त करायचा सॉरी किंवा थँक्यू म्हणणे एक अतिशय सोपा मार्ग आहे आणि तो जोपासायला पाहिजे.

मराठी माणसाच्या डोक्यात सॉरी म्हणणे, म्हणजे डोळ्यात पाणी आणून दया याचना करणे, प्लिज म्हणणे म्हणजे "आजतक तुमसे कुछ नही मांगा" च्या स्टाईल मध्ये मागणे मागणे, आणि थँक्यू म्हणणे म्हणजे air india च्या महाराजा सारखे लऊन नमस्कार करणे अशा प्रतिमा बसल्या आहेत की काय न कळे,

अर्थात, हे शब्द उच्चारताना काया, वाचा आणि मन अलाईन असले पाहिजे, नाहीतर त्यातला खोटेपणा समोरच्याला लगेच कळतो.

माझा मुलगा त्याची खेळणी त्याच्या मित्र-मैत्रीणी आहेत चार जण, त्यांच्या व्यतिरीक्त अजिबात कुणाला देत नाही, शेअर करत नाही.
किती समजावुन सांगितलं तरी ऐकत नाही. समोरच्या घरातल्या एका मुलाला तर अजिबात हात लावुन देत आही कशाला.
मी बरंच समजावलं पण नाही म्हणजे नाही देत तो. रडतो खुप. पण त्याला दे म्हणलं की नाहीच.
मी पण मग आता जास्त लोड न घेता सोडुन देते. आपल्यालाही काही माणसं आवडत नसतात. पण आपण मोठी माणसं पक्की बनेल असल्यामुळे कितीही आवडत नसला तरी समोर आलेल्याशी खोटं वागुन वेळ मारुन नेतो. पण लहान मुलं तसं करत नाही. अगदी निरागसपणे तो मला नाही आवडत तर नाही आवडत, माझी वस्तु नाही देणार तर नाही देणार अशी खरी वागतात Happy जशी आपल्याला काही माणसं आवडत नसतात लहान मुलाम्चं ही असु शकतंच ना असा विचार करते.
आणि त्याची खेळणी त्यालाही आवडतीच आहेत ना. मग एखादवेळी नाही द्यावं वाटलं त्याला तर ठीके.

थॅन्कु बोलतात. मला स्वतःला बरेचदा थॅन्क्यु बोलायची सवय असल्याने घरीही सहज तोंडातुन निघतं. त्यामुळे मुलंही थॅन्क्यु बोलतात बरेचदा.
पण आजीला पाणी खाउ दिला म्हणुन वैगेरे नाही हं.
पण सॉरी बोलणं हा एक मोठाच इश्यु आहे. अगदीच इन्सल्टिंग वाटतं मुलांना सॉरी बोलणं .

अर्थात, हे शब्द उच्चारताना काया, वाचा आणि मन अलाईन असले पाहिजे, नाहीतर त्यातला खोटेपणा समोरच्याला लगेच कळतो >> अगदी अगदी. पण काया वाचा मन एकाग्र न करता मानेगिरी दाखवत हे कधी आणि कसं बोलायचं हे समजलं की काय ती सार्वजनिक पुणेकरांची पहिली पायरी पास होते.
मग समोरच्याला दटावून आपणच प्लीज आणि थँक यू जोराने म्हणणे, समोरचा Thank you म्हणायचं विसरला की आपणच 'यु आर वेलकम' म्हणणे अस जमू लागलं की तुम्ही अगदी लंडनकर नाही पण किमान न्यूयॉर्क/ टोरांटोकर ची तरी होतच जाता Wink

थॅन्कु बोलतात. मला स्वतःला बरेचदा थॅन्क्यु बोलायची सवय असल्याने घरीही सहज तोंडातुन निघतं. त्यामुळे मुलंही थॅन्क्यु बोलतात बरेचदा.
पण आजीला पाणी खाउ दिला म्हणुन वैगेरे नाही हं.
पण सॉरी बोलणं हा एक मोठाच इश्यु आहे. अगदीच इन्सल्टिंग वाटतं मुलांना सॉरी बोलणं . >>>> + १००००
माझा लेकाची पण हीच केस . थॅन्क्यु सहज निघतं तोंडातून पण सॉरी महत्प्रयासाने.

गेल्या आठवड्यातलीच गोष्ट ...
माझा लेक आणि बिल्डीन्ग मधली त्याच्या वयाची एक मुलगी बॅड्मिन्टन खेळत होते .
शटल कॉक , वर लाईटच्या ईथे जाउन अडकलं .
वॉचमन काकानी खूर्चीवर चढून , मोठ्या काठीने ढकलून प्रयत्नाने ते काढून दिलं . मी सवयीप्रमाणे थॅन्क्यु म्हटलं.
लेकाला आठवण करून दिली आणि तो ही मनापासून बोलला .
त्या मुलीलाही मी सहज म्हटलं , से थॅन्क्स डीअर .
ती माझ्या तोंडाकडे बघतच राहिली आणि कसनुसं हसली आणि परत खेळायला लागली .

माझ्यासाठी मॅनर्सपेक्शा हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा मार्ग आहे .
नात्यांमध्ये थॅन्क्यु वगैरे म्हणायलाच पाहिजे असं नाही पण म्हटलं तर लगेच औपचारिकता होते असं नाही .
मी ही बरेचदा , थॅन्क्यु बेटा असं लाडाने म्हटल्यावर चिरंजीव गळ्याला प्रेमाने मिठी वगैरे मारतात आणि स्वत: आजीने आवडता पदार्थ करून खायला घातल्यावर , पापी देउन , आजी ...थॅन्क्यु म्हणतात . यात मॅनर्स , फॉरमॅलिटी , दिखाऊपणा काही नसतं . फक्त प्रेम असतं .

नात्यांमध्ये थॅन्क्यु वगैरे म्हणायलाच पाहिजे असं नाही पण म्हटलं तर लगेच औपचारिकता होते असं नाही .
मी ही बरेचदा , थॅन्क्यु बेटा असं लाडाने म्हटल्यावर चिरंजीव गळ्याला प्रेमाने मिठी वगैरे मारतात आणि स्वत: आजीने आवडता पदार्थ करून खायला घातल्यावर , पापी देउन , आजी ...थॅन्क्यु म्हणतात . यात मॅनर्स , फॉरमॅलिटी , दिखाऊपणा काही नसतं . फक्त प्रेम असतं .> +१
माझी मुलंही अगदी काही खेळणं काढुन दिलं. वर ठेवले ली सायकल काढुन दिली की लग्गेच थॅन्कु मम्मा म्हणतो Happy

माझ्या पाहण्यात असे चार वर्षाच्या पोराला आई / आजीला थँक्यु म्हण म्हणणारे खूपच कमी आहेत. केव्हातरी एकदा असं कोणी म्हणताना ऐकलंय असं पुसटसं आठवतं.
पण एकंदरीत मोठी मुलं ते तरुण ते वयस्क - मॅनर्सची कमतरता बर्‍याच प्रमाणात जाणवते याचे कारण लहानपणा पासून योग्य मॅनर्स शिकवले गेले नाही - सरळ मुसंड्या मारुन घुसणे, रांगेत पुढच्या व्यक्तीला आपली ढेरी स्पर्श करुन उभे रहाणे, प्रत्येक ठिकाणी आपले आपले पहाणे आपले (जास्त असले तरी) सामान नीट बर्थ खाली गेले पाहीजे / विमानात वरच्या लॉकर मध्ये गेले पाहिजे - बाकीच्यांचे काय होईल याबद्दल विचार न करणे, या साठी आधी चढण्याकरता झुंबड करणे, रिक्लाईनींग सिट्स भसकिनी मागे रिक्लाईन करणे, कचरा / डिस्पोजेबल कप्स / प्ला.पि. रस्ता / रुळ / बाग या ठिकाणी टाकून देणे, वाहन चालवताना पायी रस्ता ओलांडणार्‍यांकडे लक्ष न देणे ते त्यांच्या कडे त्रस्त नजरेने बघणे इत्यादि, इत्यादि, इत्यादि.

मला वाटते लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत चांगले मॅनर्स शिकवण्याचा भरपूर स्कोप आहे.

रांगेत पुढच्या व्यक्तीला आपली ढेरी स्पर्श करुन उभे रहाणे

यावर हसले खूप

रिक्लायनिंग सीट तर किती मागे कराव्या याला मर्यादाच नसते.मागच्या माणसाचा चॉइस रिक्लाईन न करता अपराईट बसण्याचा असेल तर एखादा रिक्लाइन केलेला महम्मद घोर्‍या किंवा घोरी त्याच्या माण्डीवर विसावलाच म्हणून समजा.

थँक्यु सवयीने म्हटलं जातं.आणि ऐकणार्‍याला कसनुसं वगैरे वाटत नाही.परत एकदा, म्हणायची गरज नाही पण म्हटलं तर नॉट अ बिग डील.

थँक यू म्हणणे हा उत्तम संस्कारच आहे. इंग्रजी फार औपचारिक वाटत असेल तर आभारी आहे म्हणायचे संस्कार करावे. मात्र कृतज्ञ राहण्याची सवय लावणे म्हणजे मुलाचे रोबोकरण नाही असे वाटते. आजकालच्या मुलांमध्ये आपण एनटायटल्ड आहोत अशी भावना फार दिसते त्यासाठी कृतज्ञता अन करूणा मुद्दामहून रूजवावी लागेल.

रिक्लायनिंग सीट तर किती मागे कराव्या याला मर्यादाच नसते.>>>
मागच्याला त्रास होणार नाही इतपतच रिक्लाईन सीटमध्ये डिझाईन केलेला असतो. हे पुढच्याने सीट रिक्लाईन केला म्हणून कुरकुरणारे म्हणजे आपल्या समोरची हवासुद्धा आपल्या मालकीची आहे असे समजणारे व्हाईनी प्रिन्सेसेस असतात. (कुणाला व्यक्तिगत उद्देशून म्हणत नाही)

मागच्याला त्रास होणार नाही इतपतच रिक्लाईन सीटमध्ये डिझाईन केलेला असतो. <<<<

असहमत! आपण विमान प्रवासाबद्दल बोलत असाल तर हे असे असण्याची शक्यता आहे. (खरे तर विमान प्रवासातही खुर्च्या बर्‍याच अधिक रिक्लाईन होताना आढळतात). पण लक्झरी बसेसमध्ये (विशेषतः खासगी) असलेल्या सीट्स प्रचंड रिक्लाईन होतात व मागच्या प्रवाश्याच्या गुडघ्यावर आदळतात.

रोहूच्या बाबांनी यावर नंदीसारखी मान हलवली.
>>> असली जमात वाढायला लागली आहे समाजात.
>>>>>

हो खरंय..
हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे. नोंद करून ठेवतो.

परकीय अंधानुकरन ही एक मजेशीर टर्म आहे. थॅंक्यू सॉरी प्लीज हे निव्वळ ईंग्लिश शब्द आहेत म्हणून त्यावर आपण परकीयांची मक्तेदारी समजतो ईतकेच. आभार मानणे आणि दिलगिरी व्यक्त करणे हे आपल्या संस्कृतीतही आहेच. तर ईथे कुठल्याही परकीय अनुकरणाचा आरोप नाहीयेच. पण शब्दांपेक्षा भावना जास्त महत्वाच्या नाहीत का? मुलांना औपचारीक थॅंक्यू बोलायला शिकवण्यात काय मजा आहे? शेजारच्या काकींनी डेअरीमिल्क दिले त्यांना थॅंक्यू, आजीने प्रेमाने थालीपीठ करून खाउ घातले तिलाही सेम थॅंक्यू? ईथे मग त्या मुलाच्या आईनेही आपल्या सासूला छोट्या छोट्या गोष्टींसाठी थॅंक्यू बोलणे गरजेचे आहे. अर्थात बोलतही असतील. पण मग यात ते थॅंक्यू फार उथळ नाही का होत? एखाद्याच दिवशी आज्जीने आवडीचा खाऊ दिला आणि वॉव आज्जी थॅंक्यू आज्जी असे उत्स्फुर्तपणे जे निघेल त्यातील मजा मग गेलीच. मुळात मजेचे आणि भावनांचे सोडा. हे औपचारीक थॅंक्यू म्हणने मुलांवर लादल्यासारखे नाही झाले का? मुलांनी मॅनर्स आपल्याकडे बघून स्वत:च्या ईच्छा आणि आवडीनुसार आत्मसात केले पाहिजेत. त्यासाठी मुलांना दटावण्यात काही अर्थ नाही. आपल्या मुलाला कोणी चॉकलेट दिले, त्याने ते घेतले, पण रिटर्न थॅंक्यू नाही म्हटले, आपण सांगूनही नाही म्हटले, आपल्याकडचा खाऊ-खेळणी शेअर नाही केले, हे सारे एक पालक म्हणून आपल्यालाच आधी स्पोर्टींगली घेता यायला पाहिजे. संस्कार व शिस्त लावताना आणि आपले मूल आपल्याला हवे तसे घडवताना, आपण त्याचा स्वत:च्या विचारांनी वागायचा आणि स्वत:च्या मनाप्रमाणे जगायचा हक्क मारत तर नाही ना हा विचार नेहमी केला गेला पाहिजे.

पण सॉरी बोलणं हा एक मोठाच इश्यु आहे. अगदीच इन्सल्टिंग वाटतं मुलांना सॉरी बोलणं.
>>>>
याला +७८६ सस्मित,
एकवेळ ती थॅक्यूची जबरदस्ती परवडली. पण सॉरीबाबत चुकूनही तसे नको. त्यापेक्षा मुलाला चूक समजावून द्यावी. आणि आपली चूक समजून घ्यायला त्याला त्याचा वेळ घेऊ द्यावा. त्याच्यावतीने त्याच्यासमोर आपण सॉरी बोलावे. पण त्यानंतर ‘बघ तुझ्यामुळे मला सॉरी बोलावे लागले’ असे टोमणे नसावेत.

आजीला, आईला थँक यु म्हटलेच पाहिजे असे नाही पण म्हटले तर त्यामुळे चांगले वाटले पाहिजे, ओफेंडेड नाही.
>>>
नक्की कोणाला चांगले वाटले पाहिजे?
मी पाहिलेल्या घटनेत ना आजीला चांगले वाटले, ना त्या मुलाला चांगले वाटले. बघणार्‍या मलाही चांगले नाही वाटले. फक्त त्या मुलाच्या आईला कसलेसे खोटे समाधान मिळाले असेल. माझ्या मुलाला थॅंक्यू बोलायचे मॅनर्स आहेत याचे..

@ मानव पृथ्वीकर, आपण मोठ्यांच्या मॅनर्सलेस वागणूकीची फार मजेशीर उदाहरणे दिलीत. आणि विश्वास ठेवा ही सारी विमानप्रवास करणारी मंडळी प्लीज, थॅंक्यूचा आपल्या व्यावहारीक जीवनात उत्तम वापर करणारी असणार. त्यामुळे थॅंक्यू, प्लीज बोलता येणे हे खरेच मॅनर्समध्ये मोजायचे का हा एक प्रश्नच आहे Happy

>>>>>>
मी पाहिलेल्या घटनेत ना आजीला चांगले वाटले, ना त्या मुलाला चांगले वाटले. बघणार्‍या मलाही चांगले नाही वाटले. फक्त त्या मुलाच्या आईला कसलेसे खोटे समाधान मिळाले असेल. >>>>
वर अमित म्हणाला तसे ते आजीला पण मॅनर्स शिकवणे होते, ग्रेसफुली थँक्यू ऍक्सेप्ट करण्याचे .

मुलाला तर बोलून चालून सवय लावली जात होती, सो त्याला चांगले वाटणे अपेक्षित नाहीये,
तुला काय वाटावे यावर त्या आई चा कंट्रोल नाही, पण उद्या याच मुलाने तू त्याचा कम्पाउंड बाहेर आलेला बॉल आत टाकल्यावर तुला "थँक्यू अंकल" म्हंटलेले तुला चांगले वाटणार आहे. सो उद्या साठी आज थोडे वाईट वाटू दे,

आई बिचारी वन डे /इनसिडन्स at a time पद्धतीने सवय लावत असेल. एक दिवस पार पडल्याचे तिला समाधान.

ग्रेसफुली थँक्स स्वीकारणे वगैरे संकल्पनाच अनुकरण आहेत। त्या चांगल्या की वाईट हा विषय वेगळा। कुटुंब संस्था नामक जो प्रचंड प्रभावी घटक भारतात आहे तो कैक देशात नाही। ह्या घटकाअंतर्गत काही गोष्टी निव्वळ प्रेम / कर्तव्य म्हणून केल्या जातात व त्यासाठी खास आभार न मानणे हेही स्वीकारले जाते। हेही चांगले की वाईट ह्यावर दुमत असू शकेल। पण आहे हे असे आहे।

पण आपला मुलगा वर्तनात, सादरीकरणात कमी पडू नये म्हणून असे प्रयत्न केले जातात। पण मग त्यावेळी एक पायरी पुढे जाऊन हेही सांगावे की आजी आपलीच आहे, तू आजीचाच आहेस, पण जिभेला सवय लागावी म्हणून आपल्या आजीलाही थँक्स द्यायची सवय ठेव। म्हणजे मग बाहेरच्या जगात सुरळीतपणे वागशील

लहानपणी सॉरी म्हणायला शिकवले गेले नाही तर पुढे फार उद्धट होतात, अपराध करून, इतरांना वाईट शब्द बोलल्यावर त्यांची क्षमा मागणे हे वेळेवर शिकवायला हवे उद्धट बोलणे, अपशब्द वापरने, अडचणीत आल्यावर अचानक रडून दाखवणे अशा सवयी काही मुलांच्या जात नाही.
मोठे झाल्यावर अशी मुलं फार हट्टी आणि निगरगट्ट होतात. त्यामुळे इतरांना फार त्रास होतो

कुटुंब संस्था नामक जो प्रचंड प्रभावी घटक भारतात आहे तो कैक देशात नाही। ह्या घटकाअंतर्गत काही गोष्टी निव्वळ प्रेम / कर्तव्य म्हणून केल्या जातात व त्यासाठी खास आभार न मानणे हेही स्वीकारले जाते। >>>>>> हो, हे बरोबर आहे, पण फक्त याच्या पुढे "आत्तापर्यंत" असे लावा, आज 6 -7 वर्षाचे एकुलते एक मूल 30 वर्षाचे होईल तेव्हा कुटुंब संस्था कश्या स्वरूपात असेल माहीत नाही, कदाचित तेव्हा त्याला एक्सटेंडेड फॅमिली वर अवलंबून राहायला लागेल , तेव्हा आत्ता पासून सवय असलेली बरी Happy त्याला थँक्स म्हणण्याची, आणि आपल्याला कानकोंडे न होता थँक्यू स्वीकारण्याची Happy

>>>>>>आजी आपलीच आहे, तू आजीचाच आहेस, पण जिभेला सवय लागावी म्हणून आपल्या आजीलाही थँक्स द्यायची सवय ठेव। म्हणजे मग बाहेरच्या जगात सुरळीतपणे वागशील>>>>
अहो हे सांगितले असेल त्यांनी घरी, एकदा नाही 10 वेळ सांगितले असेल, पण बस स्टॉप वर एकदा आजीला थँक्यू म्हणायला लावले म्हणून आपण अस्वस्थ का व्हायचं?

आपल्या माणसांना धन्यवाद का नाही द्यायचे पण?
आणि धन्यवाद म्हणण्याने माणूस परका होते हे काही नवीनच!
सिम्बा +१ लहान मुलाने चूक केली तर त्याला सॉरी म्हणायला "लावलं" तर लोकं अहो जाऊ दे लहान आहे. किती क्युट आहे असुदे. असलं काही बाही बोलतात. त्यावर तो/ ती आणखी १० वर्षे मोठे झाली आणि त्याने/ तिने तसेच केले आणि सॉरी म्हटले नाही तर तुम्हाला चालेल का? असा प्रश्न मी विचारतो. भविष्यात ते होऊ नये म्हणून आज पासूनच ती सवय लावलीच पाहिजे.

शाळेतल्या शिक्षकांना धन्यवाद म्हणायचं का नाही? का त्याने ही त्यांचा त्याग/ प्रेम कमी होतं, शब्दांत मोजलं जातं असं काही भारतीय लॉजिक आहे?
मी पोराच्या शाळेत आठवड्यात एक दिवस मदत करायला जातो तर त्याच्या टीचरने मला हॉलिडेज मध्ये एक स्टार बक्सचं गिफ्ट कार्ड विथ थँक्यू नोट पाठवलं. मला भारी मस्त वाटलं. आम्ही पण तिला थँक्यू नोट आणि एक गिफ्ट कार्ड पाठवलेलं. तुम्ही काय देता हे महत्त्वाचं नाही काय भावनेने देता ते सगळ्यात महत्त्वाचं हे आमच्या हिंदू संस्कृतीत सांगितलं आहेच. आमच्या हिंदू संस्कृतीत जमिनीवर पाय ठेवतो तर तिला ही सॉरी म्हणायला आम्हाला शिकवलं आहे. आई/ वडील/ शिक्षक/ परमेश्वर सगळ्यांप्रती आभार आणण्याची आमची तरी पद्धत आहे.

आजची भारतीय संस्कृती काहीतरी वेगळीच दिसते आहे. असो.

Pages