कासव नावाची रांगोळी

Submitted by सिम्बा on 6 October, 2017 - 09:38

कालच कासव हा सुंदर चित्रपट पाहायला मिळाला, हि संधी मिळून दिल्या बद्दल मायबोली प्रशासनाचे आभार. आधीच या चित्रपटावर सई, सई केसकर आणी अगो यांनी इतके छान लिहिले आहे कि मी चित्रपटाच्या आशयाबद्दल काही लिहिणे म्हणजे त्याला तीट लावण्यासारखे वाटेल.
चित्रपट पहिल्या पासून ,कालिदासाने म्हंटल्या प्रमाणे,
रम्याणि वीक्ष्य मधुरांश्च निशम्य शब्दान्‌-
पर्युत्सुको भवति यत्सुखितोsपि जंतु:।
अशी अवस्था झाली आहे, घरी कोणी हा चित्रपट अजून पहिला नाहीये. आलेल्या अस्वस्थतेला कोणाशीतरी शेअर करण्यासाठी इकडे लिहितोय
हे एकसंध लिखाण नाही, मला अपील झालेल्या, भिडलेल्या क्षणांचे ठिपके आहेत, हे ठिपके जोडून माझ्या मनात उमटलेले कासव रेखाटायचा प्रयत्न करतोय. मी समीक्षक नाही, मला चित्रपटाच्या दृश्य भाषेची जाण नाही, अवतार वाचनाने जे काही कंडिशनिंग झालेले आहे त्याने झालेली ही पूर्णपणे वैयक्तिक अनुभूती आहे, दिग्दर्शकाला हेच सांगायचे होते असा दावा नाही,नंतर पाहणाऱ्या माणसाला तो त्याचं पद्धतीने अपील व्हावा असा हट्ट नाही. Happy

१) सुरवातीला काही मिनिटे पडद्यावर एक चित्रमालिका सरकत राहते आणी कानावर पार्श्वसंगीत पडत राहते, पण तो मेळ इतका छान जुळून आला आहे कि एकही शब्द उच्चारला न जाता आलोक ची तगमग, जानकीची अस्वथता आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचते.

२) जानकी कॉफी पीत रेल्वे बघत असताना बाजूचे टेरेस flats तिचे आर्थिक स्टेट्स सांगतात.

३) आलोक च्या हातात ब्लेड पाहून मला कुंडलकरांच्या एका लेखाची आठवण झाली. ती घटना घडली तेव्हा तिकडे सुमित्रा आणी सुनीलच असणे आणि इकडे आलोकची आत्महत्या हा दुवा कुठेतरी अंतर्मनात जुळला

४) आलोक ला घेऊन गाडी गावात शिरताना गावाचा एक ड्रोन शॉट आहे. इतके सुंदर दिसणारे कोकण आपल्यालाच का दिसत नाही असा विचार नक्की मनात येतो.

५) पूर्ण चित्रपट जिथे घडतो ते घर तर एकदम खास, पूर्ण जांभ्या दगडात बांधलेले, रिच तरी ते अप्राप्य बंगला वाटत नाही , आगत्यशील वाटते. अगदी जानकी सारखे, सुंदर तरी लाघवी
भरपूर दारे,खिडक्या , तरीही माडीवर, बेडरूम मध्ये गूढ अंधार जपणारे.
घरातून अथांग समुद्राकडे जायला एकापेक्षा जास्त वाटा,
घर बघितल्यावर “मन अंधाराची गुंफा, मन तेजाचे राउळ” ओळी कुठेतरी क्रॉसलिंक झाल्या
बंगल्यातल्या वस्तू फर्निचर, चोखंदळपणे निवडलेल्या दिसतात.
त्यामुळे जानकीचे स्टेट्स, जीवनशैली चा एक एकसंध परिणाम आपल्यावर होतो.

६) पुढच्या एका दृश्यात आलोकला घरात घेऊन जाताना किनार्यावर बांधलेल्या होडीचे नाव फ्रेम मध्ये ठळकपणे दिसते “शकुंतला” मेनकेने टाकून दिलेली,पण कण्वमुनींनि सांभाळलेली कन्या, आलोकच्या सध्याच्या स्थितीसाठी इतके समर्पक रूपक नसेल.

७) आलोकचा नैराश्याने ग्रासेलेला तरुण मुलगा पडलेले खांदे, विझलेली, शून्यात लागलेली नजर, थोडेसे ओक्वर्ड चालणे, गडद रंगांचे शर्टस यातून खूप क्न्व्हीन्सिंगली उभा राहतो.

८) इरावातीचा कपडेपट सुद्धा आवडला, parallel पालाझो,वर लांब कुर्ता, स्कार्फ म्हणाल तर स्टायलिश आणि सुटसुटीत, म्हणाल तर पूर्ण अंग झाकणारा भारतीय पोशाख, अमेरिकेत राहणारी प्रौढ स्त्री, छोट्या गावात फिरताना,फिल्ड वर्क करताना जसे कपडे निवडेल अगदी तसेच ते वाटतात, म्हणून ते पात्र जास्त अस्सल वाटते
मात्र कपड्यांचे रंग ती नुकतीच डिप्रेशन मधून बाहेर येतेय हे दर्शवणारे dull,

९) पुढे आलोक समुद्रकिनार्यावर जातो तेव्हा मागे फिरणारी पवनचक्कीची पाती त्याच्या मनात फिरणारी विचार आवर्तने दाखवतात कदाचित

१०) जानकी आणि यदु हि एकाच ठिकाणी जायला असणारे २ रस्ते वाटतात, दोघानाही आलोक ची काळजी आहे मात्र जानकी त्यातून गेली आहे त्यामुळे तिला त्या प्रवासातील खाचखळगे आणि वळणे ठाऊक आहेत, यदु मात्र जगातले ९०% प्रोब्लेम २ ठेऊन दिल्या कि सुटतात या मताचा. समाजातील सुखासुखी नैराश्य यायला झालय काय मताचे प्रतिनिधित्व करणारा.
इकडे परत एकदा सई केसकरच्या लेखाची आठवण येणे अपरिहार्य होते.

११) जगाचे टक्केटोणपे खून सीझन्ड झालेले दत्ताभाऊ हि अजून एक व्यक्तिरेखा. डॉ आगाशे माझ्या आवडत्या चरित्र अभिनेत्यांपैकी एक, त्यांचे १ २ संवाद घशात आवंढा आणतात.
विशेष: जानकी बरोबरचा आजकाल vs पूर्वी वाला संवाद.
त्यांच्या तोंडी गीताई मधला एक श्लोक आहे, घराच्या आजोबांनी झोपल्यावर बसून गुणगुणावा इतका तो गोड वाटतो. पूर्ण गीताई त्यांचा आवाजात वगैरे एखादे प्रोजेक्ट त्यांनी पुढे मागे करावे असे वाटते.

१२) आपले गुपित जानकीला कळले कि काय या भावनेने उसळलेला आलोक ,नियमित औषध उपचार आणि मिळणारी स्पेस यामुळे परतीच्या मार्गावर लागलेला आलोक परत परत इम्प्रेस करतो.

१३) मला दोन्ही गाण्यांचे शब्द इकडे लिहायला आवडतील पण त्याला थोडा वेळ लागेल ते मी प्रतिसादात टाकतो

१४) इरावातीचा वावर संपूर्ण चित्रपटात एक आश्वासक,anchoring व्यक्तिमत्व म्हणून आहे, इतका कि इरावती घरी आहे, म्हणजे हा पाहुणा सेफ आहे म्हणून आपण सुद्धा सैलावतो. म्हणूनच जेव्हा शेवटचा twist येतो तेव्हा, पडद्यावर अथांग समुद्रात असणारी एकच होडी सेकंदभर दिसते. आश्वासक किनार्यावरून खुल्या समुद्रात अचानक लोटल्यावर काय वाटत असेल ते आपल्याला चांगलेच कळते.

डोक्यात खूप प्रसंगांचे कोलाज झालेय आत्ता इकडेच थांबतो. थोड्या वेळाने परत लिहीन

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप आवडली रांगोळी
सहावा ठिपका अतिसूक्ष्म निरीक्षण शक्तीचा निदर्शक

रांगोळी आवडली.

पण जानकी चं उच्चभ्रू जीवन अपील झालं ते कशामुळे किंवा का ते कळत नाही. म्हणजे ह्यामुळे कथेला कसा हातभार लागतो ते कळत नाही.

उच्चभ्रू जीवन अपील झाले असे नाही,
पण ते पात्र आर्थिक दृष्ट्या सुस्थितीत आहे,
आपल्याला पटलेल्या गोष्टी (जसे कासव संवर्धन साठी पदरमोड करून काम करणे) आवडत्या गोष्टींवर(भांडी, असा पॉश बंगला भाड्याने घेणे) पैसे खर्च करायला कचरत नाही.
या गुणांमुळे काही गोष्टी सोप्या झाल्या आहेत, विशेषत: शेवटच्या भागामध्ये,
आणि ते पात्र आर्थिक दृष्ट्या ओढग्रस्तीचे दाखवले असते तर ते वागले तसे नक्कीच वागले नसते.

मस्तच.
पिक्चर चा अजून ट्रेलर पण पाहिला नाही.खूप उत्स्उकता निर्माण झालीय.

परत वाचलं परत आवडलं
अजूनही लिहिणार होतास त्याचे काय झाले वाट बघतोय विशेषतः गाण्याचे बोल

(लेखातल्या लिंकांकडे आता लक्ष गेलंय , दोन्ही लेख वाचले नव्हते, धन्यवाद त्याबद्दलही )

सिम्बा चांगलं लिहिलंयस की. स्वतंत्र आणि ठळक ठिपकेच रांगोळी सुंदर बनवतात.
मला लिखाण आवडले. अजून लिही.

सुमित्रा भावे आणि सुनिल सुक थनकर. अगदि निवडक...मोजकं...पण छान काम दाखव तात पडद्यावर....तो कमालिचा परि णाम साध्ला जातो. कासव नक्किच बघायला हवा...!

क्या बात है!
काही ठिपके नजरेतून निसटलेयत. पुन्हा बघणार आहेच, तेव्हा नक्की सापडतील आता Happy

राहिलेलं लिही पुढे, मीसुद्धा वाट बघतेय. गाण्यांचे शब्दही. 'अपनेही रंग में' तर आधी लिही.

आज कासव चे गाणे यु ट्यूब वर पाहताना अनपेक्षितपणे दिग्दर्शनातील एक गोष्ट समोर आली.
इरावती त्याची डायरी तपासत असते तेव्हा तिला रोहित वेमुला च्या बातमीचे एक कात्रण मिळते, ते उलगडल्यावर एक क्षणासाठी त्याच्या सुसाईड नोट मधले " none responsible for my death" वाक्य बोल्ड ठश्यात दिसते.

नैराश्य आलेला माणूस स्वतःच स्वतः तल्या चैतन्याची हत्या करत असतो , असे काहीसे सुचवल्यासारखे वाटले.