'फिक्शन' - श्री. सचिन कुंडलकर

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

काही केल्या घरामध्ये ब्लेड सापडत नव्हतं. मी आधी बेसिनच्या वरचं कपाट उघडलं. मग कपड्यांचे कप्पे शोधले, स्वयंपाकघर शोधलं. घरामध्ये ब्लेड नव्हतंच. पण माझा चडफडाट झाला नाही. घरामध्ये ब्लेड नसणं स्वाभाविकच होतं, कारण धारदार पात्याचं चकाकणारं ब्लेड आपण हल्ली कशाला वापरतो? दाढी करताना सेफ्टी रेझर्स वापरतात, ज्यामुळे त्वचेला इजा पोहोचत नाही. हरकत नाही. मी चपला चढवल्या आणि लिफ्टमधून एकेक मजला पार होताना बघत खाली जायला लागलो. मी त्या दिवशी निळी शॉर्ट आणि काळा टी-शर्ट घातला होता हे मला उगीचच लक्षात आहे.

मी घरामध्ये एकटा नव्हतो. आस्ताद बाहेरच्या खोलीमध्ये झोपला होता. मुंबईत बारीक बारीक पाऊस पडत होता. घरासमोरच्या पार्ले बिस्किट फॅक्टरीमधून ग्लुकोज बिस्किटं भाजल्याचा वास रोज सकाळी वार्‍यासरशी घरात येत असे. तो वास नुकताच येऊन गेला होता. आदल्या दिवशी सुमित्रामावशी आणि सुनील माझ्याबरोबर मुंबईला आले होते. त्यांच्या कामाची वेळ गाठण्यासाठी ते नुकतेच घरामधून निघाले होते. सकाळी आम्ही एकत्र चहा प्यायला होता आणि गरम टोस्ट खाल्ले होते. ते मुंबईत माझ्यासोबत राहत असतील, तर सकाळची ही वेळ आम्ही रिच्युअलसारखी एकत्र घालवत असू. त्यांना माझी काळजी वाटत असे. त्या काळात मी गरजेपेक्षा जास्त संवेदनशील मुलगा होतो, हे आत्ता मला जे कळतं आहे, ते त्यांना तेव्हाच कळलं असावं.

ते दोघं बाहेर पडताच माझ्या मनानं ब्लेड शोधायचा निर्णय घेतला असावा. माझं डोकं शांत होतं. मी कोणत्याही गोष्टीची पूर्वतयारी केली नव्हती. उदास वाटत होतं हे खरं आहे, पण ते गेले काही महिने वाटतच होतं. गेले बरेच दिवस तर एखाद्या अंधार्‍या भुयारात शिरल्यासारखं वाटत होतं. ती वयाची आणि मनाची अशी काही अवस्था होती, ज्यात आकर्षणांच्या आकर्षणात मी जगासमोर फार गुंता करून घेतला होता. मी प्रेमात पडलो होतो आणि सध्या मी प्रेमात पडेन त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं मी एका व्यक्तीच्या प्रेमात पडलो होतो. चांगलं किंवा वाईट असं काहीच नाही. आता मी फक्त त्याला वेगळी पद्धत म्हणेन.

लिफ्टमधून उतरून पावसातून तसाच चालतचालत मी समोरच्या वाण्याच्या दुकानात आलो आणि तीन ब्लेड्‌स्‌ घेतली. जणू काही एक ब्लेड पुरणारच नव्हतं. ती घेऊन मी घराकडे जायला वळलो, तेव्हा माझ्या डोळ्यांत खळ्‌कन पाणी आलं. पण मी घराकडे चालतच राहिलो. लॅच उघडून घरात आलो. आस्ताद अजूनही हॉलमध्ये झोपला होता. मी बेडरूममध्ये गेलो आणि आतून कडी लावून घेतली. मग पलंगावर बसून छोट्या नाजूक कागदी पाकिटामधून मी धारदार नवंकोरं ब्लेड बाहेर काढलं.

डाव्या हाताचं मनगट मी डोळ्यांसमोर धरलं आणि उजव्या हातात ब्लेड धरून मी मनगटावरच्या नसेच्या जागी एक बारीक काप दिला. शरीरात गरम काहीतरी घुसल्यासारखं तिथे दुखलं, पण रक्त आलं नाही. मला खूप रक्त येणं अपेक्षित होतं. तसं काहीच न झाल्यामुळे बहुधा मला ढसाढसा रडायला यायला लागलं. मी स्वत:ला खूप, बिचारा आणि कमनशिबी वाटत होतो. माझ्या प्रेमाला प्रतिसाद मिळत नव्हता. ‘सर्व जगानं आपल्याविरुद्ध कट केला आहे, आपणच काय ते चांगले आणि बिचारे, जग दुष्ट, जिच्यावर आपण प्रेम करतो ती व्यक्ती अहंकारी आणि असंवेदनशील’, असं सगळं काही मला एकत्र वाटायला लागलं. आईची आणि बाबांची छातीत कळ यावी तशी आठवण आली. परत काही क्षण थांबून मी मन घट्ट केलं. मग मी अजिबातच थांबलो नाही. एकामागून एक सपासप असे मी डाव्या मनगटावर वार करत राहिलो. रक्त वाहायला लागलं आहे, हे मला रक्ताच्या उष्ण प्रवाहाच्या स्पर्शावरून लक्षात आलं. मी हाताकडे न बघता खिडकीबाहेर बघत मनगटावर ब्लेड मारत बसलो होतो. दात ओठांमध्ये घट्ट रुतवून ठेवले होते. माझा श्‍वास जोरजोरात चालू होता. सगळं शरीर थरथरायला लागलं होतं. रक्ताइतकाच अंगामधून घाम बाहेर पडत होता. मरणापेक्षाही जास्त भीती आता मला मनगटाकडे बघण्याची वाटत होती. मी पाहिलं, तर रक्त पद्धतशीरपणे फरशीवर वाहत होतं. पण मला जे व्हायला हवं होतं, ते होत नव्हतो. मी मरतच नव्हतो.

मी मनगटाकडे पाहिलं. जखमेचा आकार फार नव्हता, पण ती एक आडवी खोलवर जखम होती. त्वचा फाटून गेली होती. ती जखम पाहिली आणि मला तिथे आगडोंब होणार्‍या वेदनेची जाणीव झाली. मनगटातून रक्त झिरपत होतं. वाहत होतं. मग मी उजव्या हातातलं ब्लेड फेकून दिलं आणि डाव्या हाताचं मनगट त्या हातानं गच्च दाबून धरलं. रक्तस्रावाचा वेग वाढावा आणि वेळ वाचावा म्हणून. आपण डाव्या हातानं लिहितो, आपण डावरे आहोत, ही जाणीव माझ्या कमकुवत चिकट दुबळ्या मनाला तेव्हाही झाली. मनगट दाबून धरल्यावर आता जरा जास्त दाबानं रक्त झिरपू लागलं. जमिनीवर पसरू लागलं. काही वेळानं माझं रडणं अचानक थांबलं, जेव्हा जखमेची वेदना माझ्या डोक्यात वेगानं घुसली. काही क्षणानंतर मी कोरडा बीभत्स आरडाओरडा करायला लागलो. अचानक बाहेरून दरवाजा वाजवल्याचा आवाज यायला लागला. मी परत रडायला लागलो. दरवाजा जोरात वाजायला लागला, तेव्हा मला एकदम भीती वाटायला लागली. मला रक्ताची एक मोठी चिळकांडी उडून, सगळं रक्त वाहून जाऊन मी मरून जावं असं वाटत असतानाच मी मनगटाकडे पाहिलं. रक्त झिरपणं कमी होत होतं. जमिनीवर मात्र सगळीकडे काळसर चिकट रक्त पसरलं होतं. आपण आता काही मरत नाही, अशी मनाला जाणीव झाली असावी. दारावरच्या धडकाही वेगानं वाढत होत्या. आपण आता मरणारच नसू तर निदान जगाकडून दया गोळा करत फिरूया, ह्या घाणेरड्या भावनेनंच मी रक्तामधून चालत जाऊन दरवाजा उघडला. दारात उस्ताद उभा होता. तो माझ्या हाताकडे आणि खोलीतल्या रक्ताकडे पाहून जोरात ओरडला. माझं खोलीतलं ओरडणं ऐकूनच त्यानं सुमित्रामावशी आणि सुनील यांना फोन केला असावा. मी पुन्हा कोरडा रडत पलंगावर बसलेलो असताना पावसात भिजलेले ते दोघंजण धावतधावत घरात आले. मला सुमित्रामावशींनी घट्ट पोटाशी धरून ठेवलं.

मला पहिली जाणीव झाली, ती हलकेपणाची. माझं मन अतिशय मऊ आणि हलकं झालं होतं. गेले काही महिने मनावर साचलेला गंज निघून जाऊन मला लखलखीत वाटायला लागलं. ते दोघंजण मला समजावत होते. डॉक्टरांना फोन करत होते. सुनील बाथरूममधून एक बादली आणि फडकं आणून ओणवा होऊन फरशीभराचं रक्त पुसून काढत होता. मला गोळ्या दिल्या गेल्या. फार हलक्या हातानं सुनीलनं काळजीपूर्वक माझा हात बँडेज केला.

मला फार मोकळा श्‍वास घेता येऊ लागला होता. इतका हलकेपणा आणि दीर्घ आतला श्‍वास मी गेले काही महिने विसरूनच गेलो होतो. मी एकदम मऊ, आज्ञाधारक आणि समजंस झालो. त्यांनी मला दिलेलं दूध मी प्यायलो आणि माझी बॅग भरून मी त्यांनी बोलावलेल्या टॅक्सीत जाऊन बसलो. मला रडायला येत नव्हतं, की हसायला येत नव्हतं. मला माझा वेग परत मिळाला होता. श्‍वास आत घ्यायचा आणि श्‍वास बाहेर सोडायचा माझा नैसर्गिक वेग. माझ्या हातापायांना बारीक मुंग्या येत होत्या आणि मध्येच अंग गरम झाल्यासारखं वाटत होतं. माझ्या डाव्या हाताला पांढरंशुभ्र बँडेज बांधलं गेलं होतं, ज्यातून त्यात भरलेल्या मलमाचा एक विचित्र आंबट दर्प येत होता.

हळूच पांढर्‍या बँडेजवर एक लाल डाग उमटला, पण तो प्रसरण पावला नाही. गेले काही महिने माझं अख्खं मन हे एक पिकलेला फोड झालं होतं. ते मन मी फोडून पिळून टाकलं होतं. मी नुसताच थरथरणार्‍या हातापायांनी काचेबाहेरचा पाऊस पाहत पुण्याच्या दिशेनं प्रवास करत होतो. मी मध्येच वळून सुनीलच्या चेहर्‍याकडे पाहिलं, तेव्हा मला लक्षात आलं की, आपल्याला आत शांत निवांत वाटत असलं, तरी आपल्या जवळच्या माणसांना वेगळंच काही वाटू लागलं आहे. मी काही न बोलता काचेवर डोकं टेकवून डोळे मिटून बसलो. मग एकदम डोळे उघडले. आपल्या मनाचं एकवेळ ठीक आहे, पण आपल्या प्रेमाचं काय? प्रवासात मध्येच एका ठिकाणी आम्ही थांबलो असताना मी त्या व्यक्तीला फोन करून सांगितलं, ’आय ट्राइड टू कट माय रिस्ट’. त्यावर मला उत्तर मिळालं, ’ओह गॉड, यू टेक केअर मॅन!’ फोन बंद झाला. पण त्याचं मला काहीच वाटलं नाही. पुढची दोन वर्षं मी त्या व्यक्तीला भेटणार नव्हतो, पण त्या वेळी मला कशाचं काहीच वाटलं नाही. मी फोन खिशात ठेवून परत गाडीत येऊन बसलो.

विमान ज्याप्रमाणे रडाराच्या स्क्रीनवर हळूहळू पुढे सरकतं, एका बिंदूकडे जाताना दिसतं, तसं मला मी स्वत: एका बिंदूकडे सरकत जात असल्याचा अनुभव येत होता. तो बिंदू होता - पुणे शहर. आता पुढचे किती महिने आपल्याला सगळ्या लोकांचं म्हणणं ऐकत पुण्यामध्ये घरात मुकाट बसून राहावं लागेल, ह्याची तेव्हा मला कल्पना होतीही आणि नव्हतीही. पुण्यातून मी बाहेर पडून तीन वर्षं झाली होती आणि ज्या उन्मादात मी जगत होतो, त्यात मला पुणं सोडून सगळं काही हवं होतं. पण आता कसं ते शक्यच असणार नाही. कसं होणार आपलं, असला रोमँटिक विचार करत करतच मी पुण्याला येऊन पोहोचलो. पुण्याच्या दारातच काळे सर उभे होते. सोबत फणसळकर होता. आणि अर्थातच भूषण होता. प्रेम, वैद्यक आणि विज्ञान यांची मोट बांधून त्यांनी मला धोक्यातून बाहेर काढलं. रात्री माझ्या आईवडलांसमोर मला उभं करण्यात आलं. माझे आईवडील किती आधुनिक आणि समंजस आहेत, याची त्यांनी मला आयुष्यात पदोपदी जाणीव करून देऊन खजिल केलेलं आहे. माझी आई समोर आली. तिनं मला जवळ घेतलं आणि म्हणाली, ‘‘तू शांत हो. थोडे दिवस आता मुंबईच्या कामांमधून सुट्टी घे आणि इथेच या घरी राहा. चला, सगळे जेवायला बसूया. मग उद्या सकाळी गप्पा मारू.’’

या घटनेनंतर गेल्या अनेक वर्षांमध्ये मी माझ्या मनाला, त्वचेला आणि शरीराला चारचौघांप्रमाणे अनेक वेळा जपलं. जे शरीर कापून मी मरायला निघालो होतो, त्या शरीराच्या बोटाला जरा चटका लागला तरी माझ्या डोळ्यांमध्ये पाणी येतं. मी बोट तोंडात घालून चोखत बसतो. कितीतरी वेळा त्यानंतर दाराच्या फटीमध्ये बोटं सापडली, वाकून वर उभं राहताना वरच्या कपाटाचं दार लागून जवळपास कपाळमोक्ष झाला. पायातले बूट चावून बोटांना फोड आले. उष्णतेनं नाकातून रक्त वाहायला लागलं. या सगळ्या वेळी मी शरीराला जप जप जप जपलं. आपण काही वर्षांपूर्वी शांतपणे ब्लेड घेऊन फाडलेली त्वचा याच शरीराची होती, की वेगळ्या कोणत्या शरीराची, हे लक्षात येऊ नये इतका मी त्या घटनेपासून लांब झालो.

एक गोष्ट मात्र मी कुणालाही सांगू शकत नव्हतो, कारण सांगितली असती तरी कोणीही त्यावर विश्‍वास ठेवला नसता. ती म्हणजे, ज्या क्षणी माझ्या अंगातून रक्त झिरपायला लागलं, त्या क्षणी मला एकदम मोकळं वाटू लागलं. रक्त झिरपायचं थांबताच मी ब्लेड चालवायचा थांबलो होतो. मी का थांबलो होतो? मरून जाण्याचं धाडस माझ्या दुबळ्या मनामध्ये नसणार हे तर उघडच आहे. शिवाय मी ज्या व्यक्तीवर प्रेम करीत होतो, त्या व्यक्तीला मला अपराधी वाटवायचं होतं. पण सगळ्यांत महत्त्वाचं हे की, मी माझी त्वचा फाडताच असं काहीतरी घडलं होतं, ज्यानं मला मस्त, मोकळं, शांत, वाहतं, चकचकीत वाटायला लागलं. मी थांबलो असणार यामुळे - अचानक अर्ध्या जखमेवर मला मनामध्ये एक संतुलन सापडलं. मी कोरडा रडत होतो ते डोक्यावरचं ओझं हलकं झाल्याच्या आनंदात.

मी अतिशय तंद्रीत बॅग भरून परत आलो असलो, तरी बॅगेत सर्वच्या सर्व गोष्टी होत्या. कपडे, पुस्तकं आणि कामाच्या वह्या. सदाशिव पेठेतल्या घरी मी तीन वर्षांनी राहायला परत आलो होतो. तिथे जशी झोप लागते, तशी जगात दुसरीकडे कुठेच लागत नाही. आईबाबांच्या वागण्यात नेहमीच एक शांत सोफिस्टिकेशन असतं. ते त्यांनी कुठून कमावलं आहे, ते मला आजपर्यंत कळलेलं नाही. अतिशय अटीतटीच्या प्रसंगांमध्ये ते प्रथमत: आपलं संपूर्ण बोलणं ऐकून घेतात. घटनेला स्वीकारतात, पण खर्‍याच गोष्टीची बाजू घेतात. त्यांच्या स्वत:च्या मनाला होणारा त्रास आणि भीती लपवून त्यांनी मला घरामध्ये अलगद उतरवून घेतलं.

पण दोनच दिवसांत जाळीबाहेरचा पाऊस बघत घरातली मी विसरून गेलो होतो ती गौरी देशपांड्यांची जुनी ओलसर पुस्तकं वाचत बसून राहायचा मला कंटाळा आला आणि मी सकाळी आईला चहा पिताना म्हटलं, ‘‘चला, जातो मी आता परत मुंबईला. माझं बरंच काम खोळंबलं आहे.’’ आईनं तिसरा डोळा उघडला आणि तो असा काही उघडला, की मी गुपचूप परत पलंगावर जाऊन गौरीबाईंच्या मांडीवर बसून परपुरुषांविषयी सतत वाटणार्‍या प्रेमभावनेत विलीन होऊन गेलो. मला जे काही सुटं सुटं वाटत होतं, ते कळेल आणि समजेल असं कुणीही माझ्या आजूबाजूला नव्हतं. म्हणजे आजूबाजूला होतं, पण त्याचा प्रकाश माझ्यावर अजूनी पडायचा होता.

बँडेज होतंच. ते आता तितकंसं पांढरंशुभ्र राहिलं नव्हतं. दर चार दिवसांनी ड्रेसिंग करणं आवश्यक होतं. शिवाय सर्व लोकांनी माझ्याप्रमाणे खूपच हिंदी चित्रपट पाहिलेले असतात. त्यामुळे मनगटावर बँडेज म्हणजे काय, याचं उत्तर ते देऊ शकतात. म्हणून मी पूर्वी कधीही न घातलेले फुलशर्ट घालायला लागले. मी ज्या काही माणसांना गृहीत धरून चाललो होतो, त्या माणसांशी या काही दिवसांत मी नव्यानं जोडला गेलो. मिलिंद आणि उमेश हे माझे दीर्घ जुने मित्र. माझ्या मनावर माझ्या सोबतीनं बारकाईनं काम करणारा भूषण, मुंबईत ज्यांनी मला दत्तक घेतलं आहे आणि जे अजूनी मोठ्या मनानं माझ्या मोठ्या शरीराचं लालनपालन करतात, ते अमृता आणि संदेश. हे सर्वजण आणि त्याहीपेक्षा अधिक असे सर्वजण गुपचूप मीटिंगा करत होते. कुणी - कसे - कुठे - केव्हा याचे चोख आराखडे आखत होते. माझ्या पायात साखळ्या नसल्या, तरी माझ्यावर बारीक नजर होती.

माझ्या मनावर एक साय आली होती आणि मी काही न बोलता सगळं काही होऊ देत होतो आणि बघत होतो. दिवाळी संपेपर्यंत मी स्वत:ला असंच तरंगू दिलं. मी एक शॉर्ट-फिल्म बनवायला घेतली होती, ज्याचं शूटिंग पूर्ण झालं होतं, पण त्याचं संपूर्ण प्रॉडक्शन करून ती पूर्ण करणं आवश्यक होतं. शिवाय मी मुंबईत जिथे नोकरी करत होतो, तिथे मी बनवत असलेल्या डॉक्युमेंट्रीजची टेलीकास्ट डेट जवळ आली होती. मी गेली तीन-चार वर्षं धडपड करून मुंबईत बसवत आणलेली माझ्या अतिस्वतंत्र आयुष्याची घडी मला मोडायची नव्हती. त्या वेळी ‘कोबाल्ट ब्लू’ लिहून झाली होती आणि मौजेच्या शीतकपाटात पडून होती. मुंबईला माझी बाईक पावसात गंजत होती. मी तिला कव्हर न घालताच इथे आलो होतो.

शिवाय मला एकटं असणं आवश्यक वाटत होतं, जे मला वारंवार आवश्यक वाटतं. संपूर्ण एकटं. पावसाळा संपला, गौरीगणपती झाले, दिवाळी संपली आणि माझे हातपाय परत शिवशिवायला लागले. एव्हाना माझ्या डाव्या हातावरचा व्रण माझ्या शरीराचा एक भाग झाला होता. प्रेमाविषयी माझ्या सगळ्या भावना वाहून गेल्या होत्या. मी पुन्हा एकदा सगळ्याला तयार झालो होतो. मला स्वच्छ वाटत होतं.

या काळातल्या अस्वस्थतेमुळे मला लिहायची सवय लागली. मला भारंभार काही सुचायला लागलं, ज्याची कशाचीच कशाला संगती नव्हती. जे सुचत होतं, ते आतलं होतं आणि बाहेरचंही होतं. बर्‍याच गोष्टींना कथास्वरूपच नव्हतं. काही नुसत्याच चमकदार कल्पना होत्या, ज्या रात्री सुचत पण सकाळी त्यांच्यात काही दम नाही हे लक्षात येत असे. मला त्या वेळी एक पूर्ण लांबीचा चित्रपट दिग्दर्शित करण्याची जबरदस्त महत्त्वाकांक्षा होती. माझं मन त्यासाठी एक कथा शोधत होतं. त्यामुळे मनात येईल त्या कल्पनेला मी चित्रपटाकडे ढकलत बसलेला असे. लिहिण्याची माझ्या मनाला सवयही नव्हती आणि शिस्तही नव्हती.

पुण्यातल्या या वास्तव्यात मी बाईक चालवत नव्हतो. माझे दोन मित्र मिलिंद आणि मोहित आलटूनपालटून मला त्यांच्या बाईकवर चक्कर मारायला नेत. मला औषधं आणायची असत, पोस्टात पत्रं टाकायची असत, पुस्तकांच्या दुकानातही वारंवार जायचं असे. त्या दोघांच्या मागे बसून मी गावभर हिंडायचो. ते दोघंही मला काळजीतून तयार होणारे अनावश्यक प्रश्‍न विचारायचे नाहीत. मला माझं काय ते मागच्या सिटावर वाटू द्यायचे. मिलिंद मला दिवसा शहरात फिरवून सर्वत्र माझी सोबत करायचा. संध्याकाळी स्टुडिओची वेळ संपली, की मोहित यायचा आणि मला युनिव्हर्सिटी रोडला हिरव्यागार वातावरणात चक्कर मारायला न्यायचा.

तीन-चार महिन्यांपूर्वी मी जे काही केलं, त्यामुळे माझ्या मनात स्वत:विषयी अत्यंत राग आणि त्रयस्थपणा तयार झाला. मला तो माणूस स्वत:पेक्षा वेगळा वाटू लागला होता आणि त्या माणसाच्या घाबरटपणाची, लेच्यापेच्या मनाची तिडीक वाटू लागली होती. त्या माणसाच्या चारही बाजूंना फिरून मी त्याला भरपूर दगड मारले आणि चेचून टाकला. माझं मनगट कापणार्‍या त्या माणसानं कोणत्यातरी रंगीत कचकड्या भावनांच्या आहारी जाऊन माझ्या शरीराची आणि मनाची वाट लावायला घेतली होती. त्या भावनेचा प्रेम नावाच्या अनुभवाशी कोणताही संबंध नव्हता. या सर्व काळामध्ये मनात चालणार्‍या विचारांच्या गुंत्यामध्ये मागच्या सिटावर बसून वारा कापत पुढे जाताना मला, ’याला ती व्यक्ती आवडते - तिला तो आवडतो, त्यांना ती आवडते, त्याला ते सगळे आवडतात’ या माणसं एकमेकांना आवडण्याच्या उद्योगाविषयी मनामध्ये अत्यंत कंटाळा उद्भवला. मला मी स्वत: पुन्हा महत्त्वाचा वाटायला लागलो. माझं शरीर मला आवश्यक वाटू लागलं. माझ्या मनाची सोबत मला आनंद देऊ लागली.

आपण एकटे आहोत, आपल्याला कुणी सोबती नाही, कुणी असणार नाही, या टीनएजर दु:खात मी फार वर्षं पोहून बोअर झालो होतो. गेली अनेक वर्षं मी एक उदास-एकलकोंडा आणि अतिभावनाप्रधान मुलगा असणार - ज्याची निर्णयशक्ती कोणत्या पातळीची होती, हे मी नुकतंच अनुभवलेलं होतं. मला पळून जावंसं वाटायला लागलं. त्या मुलापासून आणि त्या मुलाला ओळखतात त्या सर्वांपासून.

कॅम्पमध्ये एका दुकानात मला एक विचित्र आकाराचं भलंमोठं घड्याळ मिळालं. मनगटावर घालण्याच्या घड्याळापेक्षा त्याचा आकार जरा जास्तच मोठा होता. शिवाय त्याला चार इंच रुंद काळा पट्टा होता. मी ताबडतोब ते घड्याळ विकत घेऊन डाव्या मनगटावर चढवलं आणि व्रण झाकून टाकला. मग मी इतर उद्योगांना लागलो. मुंबईला फोन सुरू केले आणि ऑफिसमधली माझी कामं मार्गी लावायला सुरुवात केली. मग फारच सावकाशपणे आजूबाजूच्या माणसांचा विश्‍वास संपादन करून दोन दिवसांत परत येण्याच्या बोलीवर मी मुंबईला जाऊन आलो. मुंबईच्या छोट्यामोठ्या अनेक मुक्कामांमध्ये मी माझी अर्धवट राहिलेली शॉर्टफिल्म करण्याच्या नेटानं मागे लागलो. ‘शुभ्र काही’ ही माझी फिल्म पूर्ण झाली.

कोणत्याही अविचारानं केलेल्या कृत्याची किंमत या ना त्या प्रकारे चुकवावी लागतेच. मी केलेल्या चुकीच्या कृत्यामुळे मी माझ्या आजूबाजूच्या व्यक्तींचा विश्‍वास गमावला होता. माझ्या आणि त्यांच्या निर्णयप्रक्रियेचा परिणाम हा झाला की, मला हातातली सर्व कामं पूर्ण करताच मुंबईचं घर सोडून पुण्याला परत यावं लागलं. मला मुंबईत एकट्याला राहू द्यायला कुणाच्याच मनाची तयारी होत नव्हती. मी आणि माझा भाऊ आता पुण्यात पटवर्धन बागेमध्ये आमच्या नव्या फ्लॅटमध्ये राहायला जाणार होतो. पुण्याला परत येणं म्हणजे परत पुन्हा पूर्वीच्या जगण्याकडे परत येणं असेल, तर ते मला नको होतं. मी तीन दिवसांच्या वर या आत्ममग्न आणि तृप्त गावात त्या काळात राहू शकत नसे. पण आता पर्याय नाही, हे माझ्या लक्षात आलं होतं आणि मी माझं पार्ल्याचं फार महत्त्वाचं घर सोडून, एका सुमो गाडीत गच्च सामान कोंबून, सगळं काही घेऊन पुण्याला राहायला परत आलो.

मला आता नाटक-सिनेमांतही आत्महत्या करणारी पात्रं आवडत नाहीत. चित्रपटात नेहमी मनगटं कापून घेण्याचे सीन असतात. युरोपिअन सिनेमात तर फार छान असतात. असा कोणता सीन आला तर मी पडद्यावरून नजर वळवून थिएटरच्या अंधारात कुठेतरी वेगळीकडेच बघत बसतो. मनगट कापणं किंवा झोपेच्या गोळ्या खाणं हे माझ्यासारख्या उथळ आणि थिल्लर मनाच्या माणसांचे आत्महत्येचे प्रयत्न आहेत. त्यानं आपण मरत नाही. मुंबईत हल्ली अनेक बायका वेगवेगळ्या उंच टॉवर्सवरून उड्या मारून जीव देतात. त्या बायका दु:खाच्या आणि सहनशीलतेच्या कोणत्या पातळीला पोहोचल्या असतील याची मला कल्पना करता येते. पण मला कुणीही कधीही स्वत:ला संपवून टाकू नये, असं नक्की वाटतं. फारच आतून. प्रेमामुळे तर अजिबातच असं करू नये. असली चिकट, लोंबत पडलेली प्रेमं करण्यापेक्षा व्यभिचार करत मोकळेपणानं गावभर फिरावं.

मुंबईचं घर आवरताना मी त्या खोलीत फार शांतपणे वावरलो. त्या पलंगावर दोन रात्री झोपलो. फरशी पूर्वीसारखीच स्वच्छ होती. बाथरूममध्ये खिडकीजवळच्या कट्ट्यावर उरलेली दोन ब्लेड्‌स्‌ होती. पुण्यात परत आल्यानंतर जवळच्या माणसांच्या नजरेमध्ये मी हे तपासून पाहत असे, की आपल्याप्रमाणे यांचीही त्या प्रसंगाविषयीची स्मृती पुसली जाते आहे का? ही माणसं सहा महिन्यांनी आपल्याकडे कोणत्या नजरेनं पाहत आहेत? हळूहळू गोष्टी पूर्ववत होत आल्या. गेले सहा महिने मी म्हणेन ते ऐकणारे माझे मित्र मला हळूहळू फाट्यावर मारायला लागले. माझे फाजील लाड करणं घरच्यांनी बंद केलं. बाईक पुण्यात परत आली आणि मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार की काय जे असतो ते बनलो. नवं घर होतं आणि ते घर अतिशय प्रशस्त आणि प्रकाशमान होतं. निलगिरी आणि कडुलिंबाच्या झाडांनी ते वेढलेलं होतं. घराला विस्तीर्ण गच्ची होती आणि त्या गच्चीवर माझी खोली होती. घर नीट लावून, रंगवून बरेच दिवस मी नुसता बसलो होतो, तेव्हा खिशातला फोन एकदम वाजला. प्रसारभारतीला आकाशवाणी केंद्रातर्फे प्रकाश नारायण संतांच्या साहित्यावर ऑडिओ बुकाच्या धर्तीची मालिका तयार करायची होती. मी पुन्हा नव्या कामाच्या प्रक्रियेत ओढला गेलो. मी जिवंत आहे याची मला फार मजा यायला लागली.

मी कधी काही लिहीन, असं मला अजिबातच वाटलं नव्हतं. मला चित्रपटदिग्दर्शक व्हायचं होतं आणि लिहिण्याच्या प्रक्रियेपासूनचा तो फारच लांबचा प्रांत आहे. मी माझी उमेदवारी त्याच क्षेत्रात केली होती. मी एक उदास टीनएनजर असताना, मुंबईत एकटा राहत असताना पहिल्यांदा स्वत:चं म्हणून काहीतरी लिहायला घेतलं. ती लघुकथा असेल, कथा की दीर्घकथा असेल याच्याशी मला काहीही देणंघेणं नव्हतं. मुंबईत माझ्या करियरचा फार धडपडीचा काळ सुरू होता. मला कामं मिळत नव्हती आणि चाचपडत होतो. दिवसच्या दिवस रिकामे जात. मुंबई शहरात आपल्याकडे करायला काहीही नाही, ही भावना फार भीतिदायक असते. त्या रिकामेपणातून मी लिहायला लागलो. हळूहळू त्या लिखाणाची लांबी मोठ्या सहजतेनं वाढत राहिली आणि मी त्यामध्ये ओढला जात राहिलो. ‘कोबाल्ट ब्लू’ ही माझी लघुकादंबरी अशा दिवसांमध्ये मी सलग लिहून काढली. त्याचं हस्तलिखित सुमित्रामावशींनी वाचलं आणि श्री. पु. भागवतांकडे पाठवायला मला सांगितलं. मी ते अतिशय संकोचानं मौजेकडे पाठवून दिलं आणि त्याबद्दल सगळं काही विसरून गेलो.

एके दिवशी अचानक लांब दाणेदार अक्षरांतलं श्री. पु. भागवतांचं पोस्टकार्ड आलं आणि मी गरगरूनच गेलो. आपण लिहिलेलं कोणी वाचून काढलं आहे याची मला कल्पना होती. त्या पोस्टकार्डामुळे मी लिहिण्याच्या प्रक्रियेत पुन्हा ओवला गेलो. नाहीतर मी ते सगळं सोडूनच देणार होतो. कारण तोपर्यंत माझा लिहिण्याचा अनुभव हा कंटाळ्याच्या आणि रिकामेपणाच्या भावनेशी जोडला गेला होता. मला तोपर्यंत दोन लेखक प्रत्यक्ष जवळून माहिती होते. महेश एलकुंचवार आणि विजय तेंडुलकर. या दोघांशी माझा स्नेह होता, त्यांच्याशी संवाद होता, पण त्यांनी लिहिलेलं मी काहीही वाचलं नव्हतं. ते दोघंही नाटककार होते आणि मला नाटकं पाहण्याचा आणि वाचण्याचा अतिशय कंटाळा होता. मला कादंबर्‍या-नाटकांपेक्षा एका चांगल्या चित्रपटाच्या पटकथेची गरज होती. पण निर्माता अधिक पाठबळ देईल असं स्क्रिप्ट मी लिहू शकत नव्हतो आणि अडकून पडलो होतो.

मुंबईहून पुण्याला आल्यानंतरच्या त्या काळात मी कुणाच्याही प्रेमात न पडता जगू शकतो ही सुवर्णजाणीव आयुष्यात पहिल्यांदा मला झाली. प्रेमात न पडण्याची तोपर्यंत मला सवयच नव्हती.

मी काय आहे, हे काहीच नीट माहीत नसण्याच्या अशा हलक्या पण तरंगत्या परिस्थितीत एके दिवशी मोहित मला म्हणाला की, मी नाटक लिहून बघावं. त्यानं ‘कोबाल्ट ब्लू’चं हस्तलिखित वाचलं होतं. तो स्वत: एका मोठ्या नाट्यसंस्थेपासून जाणीवपूर्वक वेगळा होऊन त्याला वाटत असणारं वेगळं आजचं आणि त्याचं नाटक करू बघत होता. त्याची फार त्वेषानं धडपड चालू होती. नाटक लिहिण्याचा विषय त्यानं एकदा नाही तर दोनदा काढला. माझा मोहितवर नुसताच मित्र म्हणून नाही, तर एक ताकदवान ऑडिओ-व्हिज्युअल डिझायनर म्हणून विश्‍वास आहे. केवळ तो म्हणाला म्हणून मी त्याचं म्हणणं गंभीरपणे घ्यायला सुरुवात केली.

आपण लेखक आहोत हे आपल्याला कुणी सांगावं लागतं का? इतरांच्या बाबतीत माहीत नाही, पण माझ्या बाबतीत अनेक वेळा अनेक लोकांनी मला हे सांगितलेलं आहे. त्या माणसांमुळेच मी लिहायला लागलो आहे. लेखक असणं ही माझी स्वप्रतिमा नव्हती आणि आता ती असली तरी एखाद्या सदोष आरशामध्ये उमटावी तशी ती लयदार विचित्र प्रतिमा आहे.

प्रकाश संतांच्या ‘शारदा संगीत’च्या रेकॉर्डिंगचं काम वेगात सुरू असताना मला पुन्हा एकदा पॅरिसला जाऊन यावं, असं वाटायला लागलं. मी युरोपच्या बॅकपॅकिंग टूरचे प्लॅन बनवायला लागलो. मला पॅरिस शहराची आणि त्या शहरातल्या माणसांची अशा दोन्ही आठवणी यायला लागल्या. मला युरोलाइन्स बसचा महिन्याभराचा पास काढून युरोपमध्ये भटकायचं होतं. रात्रीचा प्रवास करून दिवसा शहरं पाहायची. फ्रँकफर्टमध्ये अमितच्या घरी जाऊन राहायचं होतं. बुडापेश्त शहर पाहायचं होतं. मी बसचे स्वस्त प्लॅन्स, तारखा आणि शहरांची यादी करून प्रवासाची आखणी करायला जगाचा एक भलामोठा नकाशा आणून माझ्या गच्चीवर पसरला आणि त्यावर चार कोपर्‍यांवर दगड ठेवले. मला ज्या शहरांमध्ये जायचं होतं, त्या शहरांची अंतरं आणि दिशा पाहताना मला पुन्हा भारताच्या पश्‍चिम किनार्‍यावरचं मुंबई शहर दिसायला लागलं. जणू तिथे एखादा दिव्य ग्लो होत होता.

मी मोहितला म्हणालो की, मला काहीतरी ढोबळ कथा सुचते आहे, पण त्यातून मी नाटक तयार करू शकेन का, हे मला माहीत नाही. बहुधा नाहीच. मोहित मला शांतपणे आणि आश्‍वासकतेनं म्हणाला, "तू मोकळेपणानं, शांतपणे तुला हवं ते लिही. तू चांगलं लिहितोस. तू जे लिहिशील त्याचं मी नाटक बसवेन. आता तू थांबू मात्र नकोस. लिहायला लाग."

मी दोन-तीन दिवस काहीच केलं नाही. महेशच्या स्टुडिओत आम्ही दिवसभर ‘शारदा संगीत’च्या गाण्यांचं आणि संगीताचं रेकॉर्डिंग करत असू. रोज ते संपल्यावर मी इकडेतिकडे न उंडारता घरी येऊन बसायला लागलो. मला नाटक लिहायची भीती वाटत होती. म्हणजे लिहायची भीती वाटत नव्हती, पण ते नाटक आहे याची मला भीती वाटत होती. लिहायला बसलो, तर एकदम संवादच लिहिण्याची वेळ आली कारण त्याशिवाय दुसरं काही नसतंच नाटकात. मग मी कंटाळून कागद ठेवून दिले आणि या डब्यातला चिवडा, त्या डब्यातल्या चकल्या खात घरभर फिरत राहिलो.

आमचं रेकॉर्डिंग संपलं, की मोहित संध्याकाळी स्टुडिओत येऊन साऊंड एडिट करत बसे. पुढच्या दोन्ही संध्याकाळी त्यानं माझ्याकडे लिखाणाचा काहीही विषय काढला नाही. मला वाटलं, हा विसरला असावा. मरो ते नाटक!

आम्ही पाषाणच्या रस्त्यावरून बाईकनं चाललो होतो. नॅशनल केमिकल लॅबोरेटरीनंतर रस्ता वळला, की तिथे एक जुना वापरात नसलेला बसस्टॉप आहे. तिथे आम्ही उगाचच बसून राहिलो. मी मनगटावरचा पट्टा काढला आणि हातावरचा व्रण पाहत बसलो होतो. त्यावेळी मोहित म्हणाला, "मजा येतीये ना?’’ मी एकदम चमकून त्याच्याकडे पाहिलं आणि मला लक्षात आलं की, या माणसाला ते सगळं समजलंय. म्हणजे मनगटावर ब्लेडनं काप दिल्यावर नक्की मला काय वाटलं, ते फक्त या माणसाला समजलंय. त्या एका वाक्यानं माझा मोहितशी एक थेट धागा बांधला गेला.

मी घरी येताच झपझप वर जाऊन माझ्या गच्चीवरच्या खोलीत गेलो आणि दार लावून घेतलं. टेबलापाशी गेलो तर एकाही पेनामध्ये शाई नव्हती. पेनं लागतायत कशाला? बरेच दिवसांत काही लिहिलंच नव्हतं. मी कपाटं उघडली, बॅगा तपासल्या. कुठेही एक पेन सापडलं नाही. टोकं झिजलेल्या दोन पेन्सिली सापडल्या पण त्यांना टोकं करायला घरात ब्लेड नव्हतं.

खालच्या मजल्यावर घराच्या हॉलमध्ये फोनजवळ पाच-सहा पेनं मरून पडली होती. एक लाल रंगाचं पेन जिवंत होतं. ते पेन स्वत: रंगानं लाल होतं आणि त्यातून उमटणारी शाईसुद्धा लाल होती. ते पेन मी गच्च पकडलं आणि जिन्याची एकेक पायरी गाळत धावत गच्चीवर गेलो आणि माझ्या खोलीचं दार आतून गच्च लावून घेतलं.

***

पूर्वप्रसिद्धी - 'माहेर' (दिवाळी - २०११)

***

हा लेख मायबोली.कॉमवर प्रकाशित करण्यास अनुमती दिल्याबद्दल श्री. सचिन कुंडलकर व श्रीमती सुजाता देशमुख (मेनका प्रकाशन) यांचे मनःपूर्वक आभार.

***
विषय: 
प्रकार: 

अशक्य वेगवान लिहिलंय, कधी एकदा पूर्ण करतो असं झालेलं.
थ्रिल्ड, नो वर्डस. डोक्यात जाऊन विचार करायला वेळ लागेल, hats ऑफ टू सचिन कुंडलकर.

अरे देवा! अवघड आहे.

पहिल्या लेखातल्या प्रेम 'पचवण्या'बाबतच्या उल्लेखाचा सपशेल विपर्यास झालेला प्रतिसादांत पाहिला होता. मला वाटतं आता त्या पचवण्याचा अर्थ आणि गांभीर्य स्पष्ट होईल.

खुपच आवडलं. म्हणजे कंटेंट आणि स्टाइल, दोन्ही. विचार बदलण्याची एक प्रोसेस असते, ती अशी शब्दात लिहिणं फार कठिण आहे.
लेखातली वाक्यं सुटी काढून त्यावर काथ्याकुट होणार नाही, अशी आशा करते.

अप्रतिम.

'कोबाल्ट ब्लू' वाचून झाल्यावर मी हा लेख एकदा वाचला होता. हा वाचल्यावर मी ती कादंबरी पुन्हा वाचलेली आठवते. कुंडलकरच्या शैलीच्या मी सपशेल प्रेमात आहे. त्याचे अजून आवडलेले दोन लेख म्हणजे एक मुंबईतल्या आर्ट गॅलर्‍यांवर लिहिलेला आणि दुसरा शारिरीक नग्नतेचा बाऊ मनातून पहिल्यांदा गेला त्यासंदर्भात त्याने लिहिलेला यूरोपमधल्या स्पावरचा लेख. आता टाकतोच आहेस तर हेही दोन्ही टाक कृपया चिन्मय.

मस्त लिहिलय! एकदम ओघवती शैली आहे असं पण म्हणावसं वाटत नाही कारण तो शैली ठरवून असं काही लिहितो असं वाटतच नाही. बरीच चांगली लेखकं असतात तसा एकंदरितच तो एक चांगला निरिक्षक आहे. काही डिटेल्स वाचताना निव्वळ मजा आली.
बाकी, त्याचं मन जरा कमकुवत असताना त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून त्याची काळजी घेणारी किती माणसं आहेत हे बघून हेवा वाटला.
सुंदर लेख!

लेख फार फार आवडला. प्रांजळ आणि मनापासून खरा खरा वाटला. मग शीर्षक का असं? की हे काल्पनिक आहे?
बाकीची पात्रं तर खरी वाटतात.

सी, +१ very intense indeed! मला ब्रेक घेत घेत वाचावा लागला! इतक्या संवेदनशील माणसाच्या अवतीभवती त्याला जपणारी अनेक माणसे आहेत हे पाहून बरं वाटलं!

आवडला. पहिला काही भाग अंगावर आला.

इतक्या संवेदनशील माणसाच्या अवतीभवती त्याला जपणारी अनेक माणसे आहेत हे पाहून बरं वाटलं! >>>> +१

छान लेख...
हा लेख पहिल्यांदा आला असता आणि 'प्रकरण' नंतर तर कदाचित 'प्रकरण' या लेखावरच्या लोकांच्या प्रतिक्रिया वेगळ्या असत्या (चांगल्या/वाईट नाहि, वेगळ्या).

अरे वा, मस्त कथन आहे. प्रांजळ आहे. उगीच मोठेपणाचा आव नाही. सृजनाच्या कळा सोसाव्याच लागतात. कथानायक अल्पसा अंमल करतो (रीक्रीयेशनल ड्रग्ज घेतो), असं दिसतंय. त्याविषयी वाचायला आवडेल.

-गा.पै.

आवडला.

Pages