नॉस्टॅल्जिया ईदचा

Submitted by सई. on 25 June, 2017 - 08:46

मी मुस्लिम मोहल्ल्यात लहानाची मोठी झाले. घराभोवती पाच मशिदी होत्या. शिवाजी रोड, भाऊसिंगजी रोड, गंजी गल्ली, आझाद गल्ली, शिवाजी मार्केट, महानगरपालिका, जेल ते पार मटण मार्केट एवढ्या परिसरात पसरलेल्या. बोहरी समाजाची एक मशीद तर घराच्या अगदी समोर. त्यामुळे पहाटे पाच ते रात्री आठ, अशी नियमित अजान कानावर पडायची. तीही एकोनं. कारण सगळ्या मशिदींची बांग एकानंतर एक सुरू व्हायची. त्यापैकी काही अत्यंत अत्यंत सुरेल, ऐकताना ब्रह्मानंदी लागावी, इतक्या. रोज सकाळी शाळेत जाताना घुडणपीर दर्ग्यातनं शॉर्टकट घेत भाऊसिंगजी रस्त्याला लागायचं, मग ज्योतिबा रोडनं घाटी दरवाजातनं देवळात थेट आत शिरायचं, गाभा-यासमोर उभं राहून अंबाबाईला नमस्कार करून प्रदक्षिणा घालायची, मग पुढे महाद्वारातनं बाहेर पडून शाळेची वाट पकडायची. हा रोजचा परिपाठ. आज निव्वळ अविश्वसनीय वाटावा असा.

मोमीन, बागवान, दोडमणी, टिनवाले, कांचवाले, शेख असे सख्खे शेजारी. समोरच्या गल्लीत बाबांचे जीवलग मित्र रमजान मण्यार. रमजानकाका आणि बाबा एकदा ट्रक चालवत बेंगलोरला गेलेले वगैरे. आई भेंडे गल्ली पोस्टात जायची, तिथंही शेख म्हणून पोस्टमास्तर होते, त्यांच्या घरी सगळे डिस्टींक्शनवाले होते तेव्हा. बाकीचे काही आठवत नाहीत. मागच्या इमारतीत प्रसिद्ध गायिका गुलाबबाई कागलकर रहायच्या. दोन गल्ल्या जोडणा-या टिनवाल्यांच्या घरातनं ये जा करायचो. पकडापकडी खेळताना एकदा ते कुटुंब गोल करून अन्नाची भांडी मधे घेऊन जेवायला बसलेलं होतं. तरी आमची बाजूनं मागनं पळापळी चाललेलीच असताना मी धाडकन आमटीच्या पातेल्यातच पडले! तेव्हापासून मला घरात काय म्हणातात ते म्हणतातच. ते सांगायचं नसतंय.

टिनवाले वगळता बाकीची घरं लख्ख. रमजानकाका, पोस्टमास्तर शेखांकडंं तर चेहरे पाहून घ्यावेत इतकी नितळ फरशी आणि भांडी. गल्लीच्या टोकाशी एका घरात मायलेकी दोघीच असत, घरचे पुरूष कुठंतरी दूरदेशी असायचे. त्या तर नुसतं घरदार आणि आंगण परसूच नाही, तर परसात दोन नारळाची झाडं होती, त्यांचे बुंधेसुद्धा जितक्या उंचीपर्यंत हात पोचतील, तिथवर हातानं घासून आणि वर पाईपनं पाण्यानं धुवायच्या. रमजानकाका सुरमा आणायचे, आमच्या आजोबांना लागायचा. मग आजोबा आमच्याही डोळ्यात काडी फिरवायचे. अहाहा! शांत शांत वाटायचं. रमजान ईदला शिरखुर्म्याची किटली यायची. बकरी ईदला आठवडाभर आधी प्रत्येकाच्या परसात बक-या मुक्कामाला यायच्या. मग ते चा-यांचे भारे, लिदामुताचे विशिष्ट वास, त्यांचं दिवसागणिक वाढत जाणारं आणि शेवटच्या दिवसाला पुढची चाहूल लागलासारखं भासणारं करूण बेंबाटणं, आठवड्याभरात होणारा पुष्ट बदल. बोहरींच्या मशिदीत ईदच्या आधी आकांत सुरू व्हायचे, छाती पिटून, पिळवटलेल्या प्रार्थना करत स्त्री पुरुष निर्दोष असल्याचं कळवळून सांगत रहायचे. सकाळ संध्याकाळ करूण रुदन आणि बघवणार नाही इतका आत्मक्लेश.

प्रत्यक्ष ईदच्या दिवशी दारांबाहेर पडलेले मांडव, परसात पेटलेली चुल्हाणी, त्यावर मोठमोठ्या पातेल्यातून शिजणारे खाटखुट आणि खास त्यासाठी आलेले खानसामे, पाहुण्यांनी भरलेली घरं, पठाणी कुडते आणि क्रोशाच्या सुंदर टोप्या घातलेल्या यजमानांची लगबग, सजलेली पळणारी बागडणारी मुलंमुली, मेंदीनं हात (वडीलधारे स्त्री पुरुष केसही रंगवलेल्या) रंगलेल्या, ठेवणीतल्या झगमगीत साड्या पेहेनलेल्या आणि मोठमोठाले झुमके, जडजड खास नजाकतीचे मोठालेच दागिने घातलेल्या स्त्रियांच्या आचारी ते पाहुणे अशा येरझा-या, मोठ्यानं रंगलेल्या बागवानीतल्या गप्पा, मुलांवर चाललेली आरडाओरड, आसमंतात गच्च भरून दरवळणारे बिर्याणीचे खमंग वास असा माहौल असायचा. खूप आनंद असायचा हवेत. दिसायला आधीच छान असणारे लोकं आणखीच छान, तर बेतास बात असणारेही खुललेल्या चेह-यामुळं देखणे दिसायचे. कौसर, रुबाब, दिलशाद, उम्मेहानी, परवीन, शाहीन, बिल्लाल, सगळे धांदलीत असायचे. बोहरींच्या मशिदीत बुरख्यांचे आणि पुरुषांच्या टोप्यांचे अत्यंत सटल रंगसंगतींचे आणि कलाकुसरीचे अनेकानेक बहारदार नमुने दिसायचे. फुलांचे ताटवे फुलल्यासारखं दृश्य असायचं ते. आमच्या खालीच मारियाताई, जोहेबदादा, मुन्नीताई, नफीसाताई रहायचे, आम्ही त्यांच्याकडे एकाच भल्यामोठ्या थाळ्यात पण वेगवेगळे वाटे करून सगळे मिळून एकत्र जेवायचो. असं असूनही कधीही कुणी आम्हाला आमच्या आहाराचा भाग नसलेलं काहीही खायला घातलं नाही. आमच्या घरच्यांनाही कधी कसल्या शंका नव्हत्या. दिवाळीला आमची फराळाची ताटं सगळ्यांकडं फिरायची.

दरवेळी ईद येऊ घातली की हे सगळं ओळखीचं, स्मरणात मुरलेलं मनाच्या पृष्ठभागावर दुधावरच्या सायीसारखं तरंगायला लागतं. माझ्याइतकेच आमचे आत्याकाकालोकंही ह्या स्मरणरंजनात रेंगाळतात. ईदचं त्यामुळं मनात एक खास खास स्थान आहे. तिला निर्धास्त स्वच्छंद बालपणाचा, आनंदाच्या दिवसांचा, निखळ शेजाराचा, निर्व्याज मैत्रीचा, धर्मरहीत आपलेपणाचा, मोठ्यांमधल्या समंजस विश्वासाचा, कानांवर प्रभातवंदनइतक्याच प्रभावीपणे सुरेल संस्कार करणा-या अजानचा, गोड बागवानीचा, सौहार्दाचा, हवेतल्या घट्ट सुरक्षिततेचा असे अनंत सुगंध लगडलेले आहेत. दरसाल बिल्लाल मुल्ला ईदला न चुकता खूप अगत्यानं शिरखुर्म्याचं आमंत्रण करतात आणि मी हे सगळं पुन्हा अनुभवून घेते. सुखाचं असतं ते. ऊर्जा पुरवणारं, आयुष्य वाढवणारं. हे वातावरण भोवती असल्याचं मोल आज प्रकर्षानं जाणवतं आणि भाग्यवान वाटतं. माझ्या लेकालाही हे असं अनुभवायला मिळालं तर माझ्या खुशीला चारचाँद लागतील. कारण अगदी कुबेराइतकी ऐपत असती तरी हे बाजारातून विकत घेऊन देता यायचं नाही!

काल सगेसोयरे मिळून मुद्दाम मोमिनपु-यात इम्दादीत जाऊन असेच काही आठवणींचे क्षण पुन्हा वेचून आलो. आम्ही घासफुसवाले त्यामुळे फिरनी, तहुरा, खरबुज फालुदा, शाही तुकड्यापर्यंतच मजल मारली. पण जे सर्वाहार घेतात, त्यांनी अवश्य भेट देऊन आस्वाद घ्यावा असं ठिकाण आहे.

सर्वांना मनापासून ईद मुबारक Happy

Group content visibility: 
Use group defaults

मस्त आठवणी आहेत तुझ्या.. ईद चा धडा..वाह छान! खरंच चार चाँद लावले या लेखाला. ..अजूनही आहे का अस्तित्वात सिलेबस मधे??

मी पूर्वी सावंतवाडीत होतो तेव्हा एकही बुरका रस्त्यावर बघितला नव्हता... आता कधी तिकडून जात असलो तर १०/१२ बुरके रस्त्यावर दिसतात..>> अगदी!

नताशा, थोडंसं आश्चर्य वाटलं. अर्थात असं क्वचित होत असेल. >>> सई मी वाढले नळ स्टॉप भागात. शाळा अभिनव. सगळा अगदी टिपिकल मध्यमवर्गिय (हिंदू) एरिया. त्यामुळे मित्र-मैत्रिणी, शाळू सोबती आणि शेजारी हे सगळेच एका टिपिकल बॅकग्राउंडचे.

वर्गात एक मुलगी होती मुस्लिम पण तिच्याशी मैत्री नव्हती. त्यामुळे अशी इद कधी साजरी केलीच नाही. इदच काय इतर परधर्मिय / ब्राम्हणेतर सण समारंभपण कधी साजरे केले नाहीत Sad

आमचे (माझे आणि सईचे) बालपण ऑलमोस्ट सर्व धर्माच्या लोकांच्यात (मुस्लिम, ओतारी, शिंपी, मराठा, सोनार ई.) गेले त्यामुळे, अन्यथा आम्हाला पण हे अनुभवायला मिळालं असतं की नाही शंकाच होती.

अन्यथा आम्हाला पण हे अनुभवायला मिळालं असतं की नाही शंकाच होती.>> खरंच! परीट, सुतार पण होते.

विनय, बोहरी स्त्रिया कायम बुरख्यात असायच्या. आताही असतात म्हणा. सुन्नी स्त्रिया बाहेरगावी किंवा नातेवाईकांकडे जाताना घालायच्या असं साधारण आठवतंय.

नताशा Happy सर्वांचे आभार. वर्षू, बघायला पाहिजे सिलॅबस.

सई, फार छान लिहिलं आहेस.

माझ्याही आठवणी जाग्या झाल्या. लहानपणी आमच्या गावात आमच्या शेजारी दोन घरे सोडून तिसरे घर म्हणजे एक मोठे मुस्लिम कुटुंब होते. ते गावातले एकमेव मुस्लिम कुटुंब होते. त्यांच्याकडे जसा शिरखुर्मा असायचा तसा मी आजवर दुसरीकडे खाल्ला नाही.
कर्म्या उर्फ करीम हा आमच्या गुप्त आणि धाडसी मोहिमांमध्ये नेहमी सहभागी होणारा जिगरी वर्गमित्र होता. Proud

मुंबईत मात्र ईदीचे फारसे अप्रूफ वाटले नाही. दोन दोन मुस्लिम शेजारी होते तेंव्हाही.

आईशप्पथ सिम्बा, ईदच्या धड्यानं लेखाला चारचाँद लागले! मला होता हा धडा <<< अगदी अगदी.

करम्या= करीम Rofl

आमचे आलम्या= आलम
इसाक्या= इसाक
लत्या= लतीफ
शमस्या= शमसुद्देन
बर्‍याच्दा ए लांड्या. पण त्यानी कधी निषेध नोंदवला नाही उलट 'ओ ' दिली . आता बहुधा दंगल्;अच पेटेल Happy

बर्‍याच्दा ए.... <<<< बाप रे... आमच्याकडे हे हणामारीपर्यंत गेले होते. माझे २ वर्गमित्र मुसलमान होते अगदी ५ वी पासून. आणि त्यातल्या एकाला तर आमचे मास्तर माझा भाऊ म्हणायचे. मैत्री होती, अगदी घरी जाऊन खीर खाण्यापर्यंत होती. ११वीच्या वर्गात माझ्या एका हिंदू मित्राने माझ्या अपरोक्ष 'त्यांना' या नावाने हाक मारली. ते असे भडकून अंगावर आले, आणि म्हणाले, 'इतकी वर्षं विनयबरोबर आहोत पण त्याने कधी आम्हाला असे म्हटले नाही.. आता तू विनयचा मित्र आहेस म्हणुन सोडतोय.. नाहीतर कोथळा काढला असता... '

मस्तं लेख आणि आठवणी.
माझा बालपणीचा एकदम जवळचा दोस्त बोहरी होता. बोहरी स्रियांचे बुरखे कलरफूल असतात लाईट ग्रीन, लाईट पिंक, लाईट ग्रे वगैरे. ते मुस्लिम लोकांसारखा काळा बुरखा घालत नाहीत बहूतेक. माझ्या माहितीतले सगळे बोहरी लोक सॉलिड बिझनेस माईंडेड (हार्डवेअर, रंग, काच वगैरे त्यांचे पेटंट बिझनेस असतात) शिकलेले आणि 'जिनकी मिसाल दी जाती है' असे अतिप्रामाणिक होते/आहेत. रंगरुपानेही गोरे आणि देखणेच असतात आणि घरेही एकदम टापटीप.

आमचे शाळेच्या रिक्षावाले काका मुस्लिम होते आणि ते दरवर्षी ईदला सगळ्या मुलांना घरी न्यायला येत आणि त्यांच्या घरी शीरखुर्मा खायला घेवून जात. चंगळ असे तेव्हा. एकदा आमच्याच कॉलनीतला आमच्या रिक्षातला एक मुलगा शाळा चुकवून त्याच्या मित्राबरोबर कुठे तरी गेला होता तर ह्या काकांनी त्या मुलाच्या आईवडिलांना घेवून आख्खे शहर पालथे घातले मुलाला सापडण्यासाठी. त्याच्या वर्गातला त्या मुलाचा मित्रंही आज आला नाही कळाल्यावर जेव्हा त्या शहराच्याबाहेर राहणार्‍या मित्राच्या घरी तो मुलगा सापडला तेव्हा काकांनी वडिलांच्या हातचा मार खाण्यापासून त्याला वाचवलेच पण त्याच्यावर रागावू नका समजावून सांगा वगैरे सांगितले. पुन्हा पैसेही घेतले नाहीत रिक्षा फिरवण्याचे.
फार आठवतात ते काका, खूप सही माणूस होता.

किती सुखद आठवणी आहेत प्रत्येकाच्या. नुसतं वाचतानासुद्धा छान वाटतंय.

बोहरी स्रियांचे बुरखे कलरफूल असतात लाईट ग्रीन, लाईट पिंक, लाईट ग्रे वगैरे. ते मुस्लिम लोकांसारखा काळा बुरखा घालत नाहीत बहूतेक. माझ्या माहितीतले सगळे बोहरी लोक सॉलिड बिझनेस माईंडेड (हार्डवेअर, रंग, काच वगैरे त्यांचे पेटंट बिझनेस असतात) शिकलेले आणि 'जिनकी मिसाल दी जाती है' असे अतिप्रामाणिक होते/आहेत. रंगरुपानेही गोरे आणि देखणेच असतात आणि घरेही एकदम टापटीप.>>हो अगदी, क्लास लाईफस्टाईल.

पण त्यानी कधी निषेध नोंदवला नाही उलट 'ओ ' दिली . आता बहुधा दंगल्;अच पेटेल Happy>> केवढं निर्विष वातावरण!

सई, फारच छान लिहिले आहे.

माझ्यापण बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. मी वय 13ची होईपर्यंत आम्ही मुस्लिमबहुल भागातच राहायचो. बीफ मार्केट अगदी जवळ होते.

3 वर्ष तर आमचे घरमालकच मुस्लिम होते. एकदा त्यांच्या नातेवाईकांकडे काही समारंभाला गेलेलो तर त्यांनी आम्हाला समारंभ ठिकाणाहून दुसरीकडे वेगळ्या खोलीत नेऊन बर्फी चिवडा वगैर खायला दिला. आपल्याला दालाचा चावल का देत नाहीत विचार करत आम्ही इवलुसेे तोंड करून तो खाल्ला. नंतर कळलं कि ते आम्हाला ब्राह्मण समजत होते Lol मग कंफ्युजन दूर झाल्यावर परत दालचा चावल खाल्ले Proud

Pages