फक्त इंग्रजीने भागेल..? भविष्यवेध २०३०.

Submitted by नानाकळा on 28 April, 2017 - 04:22

विशेष सूचना: हा लेख 'माझे बरोबर का तुझे बरोबर' ह्या वादासाठी नसून सगळ्या बाजूने विचार करून एखाद्या किंवा अनेक पर्यायांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न समजूया. हा जुना मिपावरचा लेख आहे. थोडा बदलून इथे प्रकाशित करत आहे.

मराठी माध्यम की इंग्रजी माध्यम ह्या विषयाच्या अनुषंगाने होणार्‍या चर्चांमध्ये प्रामुख्याने खालील दोन मुद्दे असतात.:

१. इंग्रजी समर्थकांचे सगळे मुद्दे इंग्रजी ही व्यवहार-भाषा, संपर्कभाषा, ज्ञानभाषा आहे म्हणून तीच शालेय शिक्षणाचे माध्यम असली पाहिजे यावर बेतलेले आहेत.

२. मातृभाषा समर्थकांचे सगळे मुद्दे प्रथम संपर्काची, थेट सामाजिक व्यवहाराची, आजूबाजूच्या वातावरणातली मुख्य भाषा म्हणून मातृभाषा ही प्राथमिक, माध्यमिक शालेय शिक्षणाचे माध्यम असावे यावर बेतलेले आहे.

इथे खरा गोंधळ होत आहे म्हणून दोन्ही पक्ष परस्पर संबंध नसलेल्या दोन वेगवेगळ्या बाजूंनी वाद करत आहेत असं वाटतं.

इंग्रजीचे जागतिक महत्त्व कुणीही नाकारू शकत नाही. शालेय शिक्षणात इंग्रजी अजिबातच नसावी असं कुणीही म्हटलेलं नाहीये. उलट अव्वल दर्जाची इंग्रजी भाषा बोलायला लिहायला शिकवणारे अव्वल दर्जाचे शिक्षक प्रत्येक शाळेत असलेच पाहिजेत असं माझं मत आहे. मुद्दा जर फक्त इंग्रजीवरच्या प्रभुत्वाचा आहे तर ते प्रभुत्व मिळवण्यासाठी शालेय अभ्यासक्रमातल्या सगळ्याच विषयांवर इंग्रजीची सक्तीची गरज नाही. आज मेट्रो शहरे सोडली तर निम-शहरी व ग्रामीण भागात इंग्रजीची दहशतवजा भीती आहे. मुले आपल्याला इंग्रजी जमणारच नाही कारण ती हुशार, श्रीमंत लोकांची भाषा आहे म्हणून दडपून जातात. त्यांना शिकवणारे शिक्षकही यथातथा याच अवस्थेतून शिकलेले. अशा परिस्थितीत लेवल-प्लेईंग फिल्ड होत नाही याला माझा आक्षेप आहे. माझ्या मते सहजतेने शिकवली तर जगातली कुठलीच भाषा अवघड नाही. जगात इंग्रजी संपर्कभाषा असेल. पण भारतात हुशारी, श्रीमंती, सुशिक्षीतपणाचे, उच्चभ्रूपणाचे मानक म्हणून इंग्रजीकडे पाहिले जाते. आपल्या इंग्रजी येत नाही हे जर्मनांना कमीपणाचे निश्चितच वाटत नसेल. जे इथे कित्येक भारतीयांना कायम वाटत असते आणि इंग्रजी येणारे त्याची त्यांना जाणीव करून देत असतात. जर्मनांसाठी ते व्यवसायवृद्धीसाठी लागणार्‍या दहा वस्तूंपैकी एक असेल, तर भारतीयांना ते नसेल तर आपल्यात काहीच क्षमता नाही इतकं भयंकर वाटायला लावणारं असतं. इंग्रजीकडे पाहण्याचा हा जगाचा आणि भारतीयांचा मूलभूत फरक मी अनुभवलाय. देशोदेशी प्रत्यक्ष वावरणार्‍यांनी सुद्धा अनुभवला असेल.

एक जुना विनोद ही परिस्थिती कशी विशद करतो बघा: संता आपल्या भावाकडे लंडनमधे काही दिवस राहून परत येतो. बंता त्याला विचारतो, क्या खास है बे उधर? तर संता म्हणतो, अबे पूछ मत, उधर तो छोटासा बच्चा भी फर्राटेसे अंग्रेजी बोलता है.

हे इंग्रजीचं वेड आलं तरी कुठून..?

माझ्या निरिक्षणात आपली मुलं इंग्रजी शाळेत जातात म्हणूनच त्यांचे भविष्य उज्ज्वल असेल असा भाबडा विश्वास बाळगणारे पालक आहेत, आपली मुलं इंग्रजी शाळेत जातात म्हणून आपण पुढारलेले, उच्च्भ्रू आहोत असे मिरवणारे पालक आहेत. इंग्रजी शाळेत जाणार्‍या मुलांना व पालकांना तो मान/स्टेट्स्/प्रतिष्ठा हवी आहे. मातृभाषेचा आग्रह धरणार्‍यांवर बाण्याचे बिनबुडाचे आरोप करणारे इंग्रजी-वेड्या पालकांच्या वेगळ्याच प्रकारच्या बाण्याचा अवलंब करणार्‍या मानसिकतेकडे अगदी सोयिस्कर दुर्लक्ष करत आहेत.

आजचे पालक शिक्षणाच्या (परम-आवश्यक अशा) दर्जापेक्षा फक्त (तुलनेने कमी महत्त्वाच्या) भाषा माध्यमावरच जोर देतायत. हे माझे निरिक्षण आहे. ते असं करण्यामागे मागच्या १५-२० वर्षात घडलेले आर्थिक-सामाजिक बदल आहेतच. इंग्रजी बोलणार्‍यांना चांगल्या संधी मिळतात हे त्यांनी बघितले म्हणून त्यांचा असा ग्रह झाला आहे की इंग्रजीतून शिक्षण घेतल्याने चांगल्या आर्थिक संधी मिळतात. प्रत्यक्षात त्या काळातल्या मोजक्याच असलेल्या इंग्रजी शाळांचा दर्जा इतर सरकारी व मराठी शाळांच्या मानाने फार चांगला होता. शक्यतो ह्या शाळा मिशनरीज संचालित व भरपूर फीया घेणार्‍या होत्या. त्यात शिकणारे श्रीमंत, उच्चपदस्थ यांची मुले होती. या वर्गात सुबत्तेमुळे आलेला एक आत्मविश्वास जन्मत:च असतो. वरच्या वर्तुळात असलेल्याने उत्तम संधींची जास्त माहितीही असते. त्यायोगे कुठले शिक्षण घ्यावे याचीही तयारी चांगली असते. त्यातून चांगले शिक्षक, चांगल्या शैक्षणिक दर्जाचा होणारा संस्कार. हे सर्व दिमतीस असलेली मुले यशस्वी होतांना पाहून सामान्य पालकांच्या महत्त्वाकांक्षेला मात्र एकच कारण दिसले ते हे की 'इंग्रजी शाळेत शिकले की यश मिळते'. कारण फक्त 'इंग्रजी माध्यमच' त्यांच्या आवाक्यात होते. याला थोडी फुंकर घालून इंग्रजी शाळावाल्यांनी आपले मार्केटींग केले. त्याला आजचे पालक आंधळेपणाने भुलतायत.

याचं छोटेखानी उदाहरण मी अकरावी सायन्सला असतांना बघितलंय. माझ्या वर्गात महाराष्ट्रातून प्रथम आलेला मुलगा होता. अकोला जिल्ह्यातले सगळे मेरिटचे विद्यार्थी याच कॉलेजला असतात. माझ्या वर्गातली निम्मी जनता मेरीटवाली होती. ह्या मेरिटवाल्यांमधे बहुसंख्य मुलं कॉन्व्हेंटवाली होती. हे सगळं सांगण्याचं कारण वर्गात अ‍ॅवरेज मुलं अजिबात नव्हती. पण एक फरक होता. कॉन्वेंटवाल्या मुलांचा आत्मविश्वास, स्वत:ला प्रेझेंट करण्याची, छाप पाडण्याची हातोटी विलक्षण होती. सेमी-इंग्लीश, साध्या शाळेतून आलेली मुले त्यांच्या पुढ्यात दडपून जायची. आणि याचे कारण या मुलांना दुर्दैवाने त्यांचे फाडफाड इंग्लीश वाटत असे.

आज ५ ते १० वयोगटातली मुले जेव्हा शिकल्यावर बाहेर पडतील तेव्हा आपल्यासारखीच योग्यता असलेली लाखो मुले बघतील. तेव्हा जी स्थिती १०-१५ वर्षाआधी लाखो मराठी मुलांची होती तीच या इंग्रजी शिकलेल्या मुलांची असेल. कारण हजारोंकडे जेव्हा एकसारखं स्किल असतं तेव्हा त्या स्किलला तेवढं आर्थिक महत्त्व राहत नाही. लक्षात घ्या हा सगळा काथ्याकूट मी आता पद्व्युत्तर शिक्षण घेत असलेल्या मुलांबाबत घातलेला नाहिये. त्यांच्याबद्दल आता काही बोलून उपयोगच नाही. खरा प्रश्न येणार्‍या पिढीचा आहे. ती फाड फाड इंग्रजी बोलू शकणारी पण इतर काही स्किल्स नसलेली मुले मॉलच्या फरशाच पुसतील. रिक्षा चालवतील, धुणीभांडी करतील. तेव्हा हा भ्रमाचा भोपळा फुटेल.

हेच होत आलंय. पन्नास-साठ वर्षांपुर्वी पाचवी पास माणसाला हमखास नोकरी लागत असे. त्यानंतर इंजिनीअर-डॉक्टर्सचे प्रस्थ वाढले. त्यानंतर नुसत्या बी ए/बी एससी/बी कॉमचे पीक आले. पदवीचे अवमुल्यन झाले. आज इंजिनीअर-डॉक्टर्सचे अवमुल्यन झाले आहे. आज इतके इंजिनीअर झालेत की काही विशेष स्किल्स असल्याशिवाय तुमच्या नुसत्या इंजिनीअरींगला कुत्रं विचारत नाही. आज नुसतं एमबीबीएस करून पुर्वीच्या एमबीबीएस डॉक्टरांसारखे वैभव-स्थैर्य कमावता येत नाही. आयटीची सुद्धा वेगळी परिस्थिती आहे असं नाही. बी.एससी वैगेरे करून चपराशाची नोकरी करणारे मागच्या पिढीत बरेच पाहिलेत. सॅचुरेशन, गर्दी होण्याआधी जे हजर असतात तेच यशस्वी होतात. दुर्दैवाने सामान्य लोकांच्या डोक्यात हे कधीच शिरणार नाही. ते नेहमी दुसरे काय करून यशस्वी झाले त्याची कॉपी करण्याचा सोपा पण अयशस्वी मार्ग पत्करतात.

आजचे श्रीमंत, उच्चपदस्थ उद्या परत तेच चक्र पुन्हा फिरवतील. वरच्या जागांवर त्यांचीच मुले परत असतील. परत सामान्य लोक उच्चवर्गाने काय केले हे बघून आपल्या जे जमते तेवढ्याचे फॅड घेऊन धावत राहतील.

काही लोक म्हणतात की ठीक आहे ना, फॅड असले म्हणून काय झाले. पैसा व सन्मान मिळतोय ना? पण खरंच किती लोकांना हा फायदा मिळतोय? आज भारतात सुशिक्षित तरुणांपैकी फक्त ३४% तरुण नोकरी करण्यायोग्य आहेत. नोकरी देणार्‍या कंपन्यांना या नोकरीयोग्य नसलेल्या मुलांवर प्रशिक्षणाचा प्रचंड खर्च करावा लागतो ज्याचा या मुलांच्या किमान पहिल्या ३ वर्षाच्या पगाराच्या आकड्यावर परिणाम होतो.

कंपन्यांना आज किंवा उद्याही लागणार असलेले काही स्किल्स असे आहेत.
१. विशिष्ट उद्योगक्षेत्रात लागणारे मूलभूत व्यावसायिक कौशल्य
२. तंत्रज्ञानाचे अद्ययावत ज्ञान.
३. संवाद कौशल्य (संवाद कौशल्य म्हणजे 'स्टेजडेअरिंग, इंग्रजीत बोलता येणे' असा गैरसमज)
४. निवडलेल्या क्षेत्रासाठी उपजत कल

आजची शिक्षणपद्धती फक्त नोकरदार तयार करणारी आहे. सांगितलेले काम सांगितलेल्या पद्धतीत करायचे. त्यात काही अडचण आल्यास मार्ग शोधण्यासाठी डोके चालवणार्‍यास प्रमोशन, भत्ते, बक्षीसं मिळतात. या शिक्षणाने व प्रवृत्तीने घातलेला दुसरा घोळ म्हणजे पारंपरिक रोजगार, व्यवसाय यात काही फायदा नाही असा चुकीचा केलेला प्रचार. कारण या व्यवसाय्/क्षेत्रांबद्दल प्रेम वाटावं असं या पद्धतीत काहीच नाही. किंवा हे शिकून पारंपारिक व्यवसायात पडायची मुलांना लाज वाटते. इतकं शिकून का गल्ल्यावर बसाचं का? किंवा इतकं शिकलो ते का नांगर हाकलायला का? असे वाक्य कानी पडू लागली. म्हणजेच दुकानदारी करणे, शेती करणे हे नोकरी करण्यापेक्षा हलक्या दर्जाची कामे आहेत हे बिंबवण्याचे भयंकर पाप या व्यवस्थेने केले. ज्यांना हे घोकंपट्टी शिक्षण जमतं ते फार हुशार आणि इतर लोक ढं असं काहीसं समिकरण मांडल्या गेलं. याचं कारण इंग्रज साहेब. तो आपला कायम कचेरीत बसून हुकूम चालवणार. त्याला कुणी कधी नांगर धरलेला पाहिला नाही का गल्ल्यावर बसलेला पाहिला नाही. मग त्यालाच आपला रोल मॉडेल बनवायला सामान्य लोकांनी सुरुवात केली. ती आजतागायत सुरू आहे.

माझा विरोध आहे तो आपल्या समाजाबद्दल, राहणीमानाबद्दल, उद्योगधंद्यांबद्दल अलिप्तता निर्माण केल्यामुळे झालेल्या नुकसानाला आहे. आज आपण मुलांना मिळणार्‍या पॅकेजच्या बातम्या पहिल्या पानावर पाहतो. त्या मुलाला वर्षभर कष्ट करून जेवढे लाख मिळतील तेवढे लाख त्याच्यापेक्षा एक चतुर्थांश काम करून मिळवणारे हजारो शेतकरी आज महाराष्ट्रात आहेत. त्यांच्या बातम्या येत नाहीत. येतात त्या आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांच्या. कारण बातम्या देणारेही याच व्यवस्थेतून शिकलेत. यशस्वी शेतकर्‍यांच्या बातम्या तुम्हाला फक्त अ‍ॅग्रोवन मध्येच दिसतील.

माझ्या ओळखीत एक गृहस्थ आहेत. गुलाबाच्या फुलांची शेती करतात, वर्षाचे ३५६ दिवस. रोजचे उत्पन्न एक लाख रुपये. निव्वळ. आणि असे बरेच आहेत.

येणार्‍या काळात असेच वेगवेगळे व्यवसाय करणार्‍यांचीच चलती असेल. त्याची चाहूल आजच लागते आहे. आजचे श्रीमंत, उच्चपदस्थ त्यासाठी मुलांना तयार करतायत. आणि आजचा सामान्य पालक ओसरुन जाणार्‍या लाटेसाठी मुलांना तयार करतोय. हेच कायम होत आले आहे म्हणून बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाते आहे.

आजपासून १५ वर्षांनी आपल्या मुलांसाठी काय वाढून ठेवलेलं असेल? त्याला तेव्हा तोंड देण्याची तयारी करण्याचा वेळ व यशस्वी होण्याची मानसिकता त्याच्याकडे असेल काय? जसं आज काही लोक 'अकरावी आम्हाला इंग्रजीशी कसे झगडावे लागले, त्यात कसा वेळ गेला' असं सांगतायत, तेव्हा असं 'वेळ घालवणारं' काही असेल काय? किंवा भविष्यातल्या कोणत्याही परिस्थितीत मुलांना तोंड देता यावे म्हणून काही विशेष तयारी आजपासूनच करता येईल काय याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. की फक्त इंग्रजी आलं की झालं म्हणून ते यशस्वी होतील काय? याचा सगळा विचार आताच करणे आवश्यक आहे.

त्यामुळे इंग्रजी माध्यमाऐवजी शालेय शिक्षणाच्या दर्जाला महत्त्व दिले तर बरे होईल. त्यातून ते मातृभाषेत असेल तर जास्तीत जास्त मुले मुख्य प्रवाहात येऊन कसल्याही न्यूनगंडाशिवाय स्वत:च्या, देशाच्या प्रगतीत हातभार लावतील.

शिक्षणात भाषेशिवाय इतर अनेक बाबीही महत्वाच्या आहेत. इंग्रजीतुन शिक्षण असो अथवा मराठीतुन, शिक्षक, विद्यार्थ्याची वृत्ती, घरातले वातावरण, बुद्ध्यांक, अभ्यास करण्याची तयारी, अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती हे इतर मुद्देही तेवढेच महत्वाचे आहेत. विद्यार्थ्यांना बोली भाषेतुन शिकवले तर ते विशेष लक्ष देऊन शिकतील, सगळे सोपे वाटेल असे काहीही नाही आणि एखाद्याला खरेच इंग्रजीतुन झेपत नसेल तर त्याला जबरदस्ती ते करायला लावणे हेही योग्य नाही.

ज्या विद्यार्थ्याला बोलीभाषेतून समजणार नाही त्याला इंग्रजीतून तर समजण्याचा प्रश्नच येत नाही असे वाटतं.

आपले सरकारी शैक्षणिक धोरण बदलेल न बदलेल पण आज ज्यांना पाच ते आठ वर्ष वयाची मुलं आहेत त्या पालकांनी तरी याचा थोडा गंभीरपणे विचार करावा व जाणकारांनी आपली मतं अवश्य द्यावी.

माझी निरिक्षणे, निष्कर्ष व अनुमान कुठेही चुकत असतील तर अवश्य सांगा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

इंग्रजी हुशार जगज्जेत्या इंग्रजांची भाषा आहे.ती नीट यायची असेल तर तुम्ही हुशार असलेच पाहीजेत.फक्त कॉन्व्हेंट मधे शिकुन कुणाला इंग्रजी येत नाही.

छान लेख.
तूम्ही म्हणताय त्या गुलाबाच्या शेतकर्‍याचे उदाहरण बघा. अश्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या
लोकांना अजिबात प्रसिद्धी मिळत नाही, त्यामूळे ते आदर्श तरुण पिढीसमोर येतच नाहीत.

शेतकरी, म्हणजे दीनवाणा, फाटक्या कपड्यातला अशीच प्रतिमा समोर असते.

हा थेट नसला तरी एक मुद्दा आहे, तो म्हणजे वाढत्या लोक्संख्येचा. हा मुद्दा आता
कुठल्याच राजकिय पक्ष्याच्या अजेंडावर नाही. शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या
संधी मर्यादीत आहेत. त्यामूळे निवड होताना ( किंवा नाकारताना ) इंग्रजीचे ज्ञान
वगैरे अनावश्यक कौशल्यांना जास्त महत्व दिले जाते.
या दोन क्षेत्रातच नव्हे पर वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा या सर्वच बाबींवर याचा
ताण पडतोय... पण आधी लिहिल्याप्रमाणे हा मुद्दा, इथे तसा गैरलागू आहे.

बाजारात मराठी , इंग्रजी , इतर सर्व माध्यमे उपलब्ध आहेत. सरकारी , खाजगी सर्व प्रकारच्या शाळा उपलब्ध आहेत.

असे असताना मराठी भाषेत मुले शिकत नाहीत याचे खापर मोघल मेकॉले काँग्रेस व मिशनरी यांच्या डोस्क्यावर का फोडले जाते , हे समजत नाही.

अतिशय उत्तम लेख.

पुण्यात वेगळ्या पद्धतीनं चालवल्या जाणाऱ्या मराठी शाळा आहेत.
शाळेत रचनावादी पद्धतीनं शिक्षण देतात. त्यांचे शिक्षकांसाठीचे ट्रेनिंग मी मध्यंतरी केले तर सध्याच्या पारंपरिक इंग्रजी शाळेत इतर पालक पोरांना का बरे घालत असतील असा प्रश्न पडला. प्रत्येक गोष्टी मधे मुलांना आकर्षक - चॅलेंजिंग - एंगेजिंग - कुतुहल निर्माण करणारे पण शारिरीक व मानसिक पक्वतेनुसार शिक्षणाचे वातावरण कसे तयार करायचे ह्याचा विचार होता. ह्यात भाषा - गणित शास्त्र आणि इतर विषयहही आले.
प्रत्येक वर्गात फक्त बारा मुले जास्तीत जास्त.
गणित भाष जीवन शिक्षणाच्या वगैरे च्या तासात इतकी रमताना आणि आनंदी असलेली मुले पाहिली ट्रेनिंग दरम्यान!
उदाहरण द्यारचे तर ५ वर्षाचं मुल होई पर्यंत अक्षरं लिहायला लावायची नाहीत. तर त्या काळात त्यांचे मोटर स्किल्स त्या दृष्टीने कसे तयार होतील ह्याची तयारी फक्त.
फी देखील पुण्याच्या मानाने अत्यंत वाजवी.
पालक अशा शाळांचा विचार करायला का घाबरत असतील असा प्रश्न पडला.
ट्रेनिंग दरम्यान येणारी मुलं अत्यंत एंजोय करायची आणि ट्रेनिंग अटेंड करणारे देखील.
रचनावादी पद्धत मनपा च्या २२ शाळांमध्ये राबवली जातीये ह्याचा अतिशय आनंद वाटला.

छान लेख. आवडला.

सकाळ मधे संदीप वासलेकरांचे लेख येतात त्याची आठवण झाली.

ग्राममंगल लर्निंग होम आणि आनंदक्षण ह्या दोन शाळा आहेत पुण्यात ज्या वर लिहिलेल्या पद्धतींने काम करतात. ऱमेश पानसे सर - अनुताई वाघ - ताराबाई मोडक आणि गिजूभाई ह्या सगळ्यांच्या कामाचा परिपाक म्हणू शकतो.
ह्या शिवाय जिद्न्यासा म्हणून आहे - पण तिचा pattern अजून वेगळा आहे. Lab based types आहे.
स्वधा आणि स्वारगेट मधली अजून एक शाळा (नाव आठवत नाही) waldord च्या philosophy वर बेस्ड - पण ह्या इंग्रजी माध्यमाच्या आहेत.

मस्त आहे लेख. प्रत्येक वाक्याला अगदी अगदी झाले

कॉन्वेंटवाल्या मुलांचा आत्मविश्वास, स्वत:ला प्रेझेंट करण्याची, छाप पाडण्याची हातोटी विलक्षण होती. >> ह्याला प्रचंड अनुमोदन. दुर्दैवाने मराठी शाळा हा आत्मविश्वास द्यायला कमी पडतात. हुशारीप्रमाणे तुकड्या पाडण्याच्या पद्धतीमुळे "अ" तुकडीतील विद्यार्थी सोडले तर बाकीच्यांचा आत्मविश्वास अजूनच खालावतो.

मी कितीतरी वेळा कॉन्वेंटवाल्या मुलांना चुकीचे इंग्रजी अगदी आत्मविश्वासाने बोलताना पाहिले आहे. तेच मराठी माध्यमाचे विद्यार्थी बरोबर बोलत असूनसुद्धा पुरेशा आत्मविश्वासाने बोलत नाहीत. त्यांना सतत आपल्याला हसतील अशी भिती वाटते (जी पुष्कळ वेळा रास्तही असते).

इंग्रजीला पर्याय नाही. चांगले इंग्रजी ज्ञानाची व आत्मविश्वासाची नवी दालने उघडते. मी स्वतः दहावी पर्यंत मराठीत शिकून मग इंग्रजी चांगले डेव्हलप करून त्या जोरावर लेखन करून एक क्वालिटी कॉपिरायटर अशी स्वतःची ओळख बनवू शकले. इंग्रजी भा षा शत्रू नाही. पण ती सखोल व चांगल्या व्याकरणासहित शिकली पाहिजे. जागतिक स्पर्धेत टिकायचे असेल तर उत्तम इंग्रजीला पर्याय नाही.

मराठी वरचे माझे प्रेम अबाधित आहे. शंका नसावी.

नानाकळा, लेख आवडला.
नानबा, रचनात्मक शिक्षण- ट्रेनिंग याबद्दल वेळ काढून एक सविस्तर लेख लिही ना प्लीज!

नानाकळा, एक नंबर लेख आहे !
याची लिंक गरजूंना फॉर्वर्ड करेन..

नानबा, स्वाती म्हणतात ते मनावर घेऊन तुम्हीही लिहा त्या विषयावर. ईंटरेस्टींग वाटतेय.

नानाकळा,
छोट्या गावात आणि सगळ्या महाराष्ट्रात काय असतं/ असलं पाहिजे हे मला माहित नाही. पण मायबोलीवरचा सुशिक्षित वाचकवर्गासाठी 'शिकण्याचे माध्यम' हा फार महत्त्वाचा मुद्दा असूच नये असं मला वाटतं. इथल्या लोकांना मराठी आणि इंग्रजी व्यवस्थित समजतं. त्यामुळे मातृभाषा आणि शिकण्याची भाषा वेगळी, घरी कुणाला इंग्रजी येत नाही असलं असण्याची शक्यता जवळपास शून्य असेल. मराठी ही येतंच असेल. त्यामुळे शिकण्याचे माध्यम बदलल्याने इथल्या लोकांच्या मुलांवर फार मोठा परिणाम होणार नाही असं मला वाटतं.

मुलांना काय शिकवायचं त्यादृष्टीने तुम्ही शेवटी लिहिलेलं सगळ्यात महत्त्वाचं वाटलं मला. भाषा हे बेसिक स्कील आहे, आणि लहान मुलं भाषा भराभर शिकतात, त्यामुळे आजूबाजूची लोकं त्यांच्याशी मराठीत बोलणार असतील तर तुम्ही त्यांच्याशी इंग्रजी, फ्रेंच ज्या काही भाषा तुम्हाला येत असतील त्यात अवश्य बोला. (केस बाय केस बेसिसवर हे चेंज होईल अर्थात). वर नानबा यांच्या प्रतिक्रियेतही तोच मुद्दा आलाय.
स्किल्स आणि विचार करायला शिकवा. आपण मातृभाषेत विचार करतो इत्यादी जवळपास थोतांड आहे. विचार करणं महत्त्वाचं.

भविष्यवेध २०३० लिहिलंय म्हणून: सध्या माणसाने करण्याचे जॉब जसे मालाची वाहतूक करणारे ट्रक चालवणे, मेडिकल आणि एकूणच रिसर्च, प्रोडक्शन लाईन इ. ठिकाणी माणसापेक्षा यंत्र उत्तम करते/ बरंच काम स्वयंचलित होणं शक्य आणि फायदेशीर आहे. म्हणून पुढील १०-१५ वर्षात ३० ते ४०% जॉब स्वयंचलित झाल्याने कमी होतील असं म्हणतात. त्यामुळे प्रत्येक माणसाला एक ठराविक रक्कम (१००० डॉलर पर मंथ) काहीही काम न करता दिली जावी यावर जगात चर्चा चालू आहे.
चाईल्ड केअर, नर्सिंग, एल्डरली केअर, कलनरी इत्यादी हॉट मार्केट होतील तेव्हा त्यात शिक्षण घ्यावे अशी चर्चा ऐकली.

पण मायबोलीवरचा सुशिक्षित वाचकवर्गासाठी 'शिकण्याचे माध्यम' हा फार महत्त्वाचा मुद्दा असूच नये असं मला वाटतं
>> अस का वाटत? अस वाटण्याची कारणं कोणती?

आपण मातृभाषेत विचार करतो इत्यादी जवळपास थोतांड आहे. विचार करणं महत्त्वाचं
>> याच्या पुष्ट्यर्थ काही पुरावे / संदर्भ / शोध निबंध ?

भविष्यातील रोबोट्स, काही जॉब जाने या शेवटच्या पॅरा
>>
याचा धाग्याच्या विषयाशी (शिक्षणाचे माध्यम) काही संबंध?

धन्यवाद.

अमितव - शिक्षण मातृभाषेतून व्हावं असं पियाजे आणि जगभरातले अनेक शिक्षणतद्न्य हिरीरीने मांडताना दिसतात. ह्यात मी परदेशातील भारतीय मुलांना धरणार नाही - पण भारतात रहाणाऱ्या भारतीय मुलांना बेसिक शिकण्यासाठी मातृभाषा का नको? ह्यातून हळूहळू सांस्कृतिक तुटलेपण देखील येतं. तो दुय्यम मुद्दा मानला तरी मातृभाषेतून शिक्षणात असलेली सहजता हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मातृभाषेतून येणाऱ्या सामाजिक - नैसर्गिक रेफरन्स चाही फरक पडतो.
उदा: रेन रेन गो अवे हे इंग्लंड मधे / टेंपरेट रिजन मधे / सतत ढगाळ वातावरण असताना तयार झालेलं बालगीत आणि ये रे ये रे पावसा हे महाराष्ट्रातल्या हवामानात. हे सगळं गरज नसताना का बदलावं? हे अत्यंत साधं उदाहरण आहे. ह्यातून येणाऱ्या सामान्य द्न्यानाला आपण मुकत नाही का? मुलांना
"जॅक ॲंड जिल" म्हणताना येणारी मजा आणि " माउताई माउताई माझ्याशी खेळायला येशील का ग येशील का" हे बालगीत म्हणताना येणारी मजा ह्यातला फरक डोळ्यांना सहज दिसतो. कारण सहजता. ५ वी च्या वर्गाला निवडणूक हा विषय शिकवताना इंग्लिश मधे त्यांना ते समजणं किती जड जातं हे ही पाहिलय. ही घटना २०१४ मधे निवडणूका चालू असताना ची आहे. कारण आजूबाजूच्या घटना मराठीतून घडताहेत. परक्या भाषेत सहजता नाही. आई वडीलांना इंग्लिश आले तरी रोजचे संभाषण - आजूबाजूला बोलली जाणारी भाषा हे मुद्देही महत्त्वाचे.
शास्त्रासारख्या विषयात तयार केलेले क्लिष्ट मराठी शब्द वापरतात तिथे हे लोजिक कदाचित चालणार नाही. मग तिथे इंग्लिश चालेल.
आणि मल्टिलिंग्वल असणे महत्त्वाचे आहे - पण ते संभाषणाद्वारे व्हावे. म्हणजे मुख्य शिक्षण मातृभाषेत व्हावे आणि इतर भाषा सहजतेने वापरता याव्यात.
ज्या पालकांना इंग्लिश येते त्यांनी दिवसातला एक तास घरी/ बाहेर एंग्लिश संभाषण करून हे साधता येओओ शकते. आम्ही हे करतो आणि माझी ४ वर्षाची मुलगी इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करते - तिला रेफरन्स ने समजते व्यवस्थित. मराठी आणि मराठी शब्दकोष चांगला आहे.
पन हे सहजतेने घडायला हवे

नानबा, सहमत!
आमच्या घरात मावस-मामे भावंडात निम्मी मंडळी मराठी माध्यमात तर निम्मी मंडळी इंग्रजी माध्यमात शिकली. यातील इंग्रजी माध्यमवाल्या मुलांचे घरात आजूबाजूला मराठी वातावरणात जगणे, अभ्यास इंग्रजीत घोकून पाठ करणे वगैरे जवळून बघितले आहे. मी कॉलेजला असताना यातील काहींचा अभ्यासही नियमित घेत असे. लहानपणी ज्या गोष्टी मराठी माध्यमात सहजपणे समजून उमजून स्वतःच्या पद्धतीने मी सहज मांडू शकत होते त्याच गोष्टी इंग्रजी माध्यमात तिनदा लिहून घोकून पाठ करण्याचे ओझे या मुलांवर असे. साधी ससा कासवाची गोष्ट देखील पाठ करुन अडखळत, आठवत त्यातला सगळा आनंद घालवून मूल सांगणार. जशी मोठी झाली तशी हळू हळू परीस्थिती बदलली पण तरी ५वी पर्यंतचे या मुलांचे शिक्षण हे विनाकारण घोकंपट्टीचे होते. ही परीस्थिती पुणे-ठाणे वगैरे शहरात रहाणार्‍या मुलांची.
शिक्षणाचे माध्यम मातृभाषा, जोडीला गणित-सायन्स मधील इंग्रजी शब्दांसाठी ओढून ताणून भारतीय पर्यायी शब्द नको- जिथे सहज भारतीय शब्द उपलब्ध आहे तिथे तो शब्द जरूर वापरावा आणि कंसात माहितीसाठी इंग्रजी शब्दही लिहावा आणि जोडीला इमर्शन पद्धतीने इंग्रजी असे केले तर बर्‍याच मुलांना सोईचे जाईल. ज्यांना इंग्रजी माध्यम सोईचे जाईल त्यांना तो पर्याय जरूर असावा पण केवळ संभाषणात्मक इंग्रजीचा बाऊ करुन त्याला पर्याय म्हणून इंग्रजी माध्यम निवडणे हे सर्वसामान्य मुलांवर विनाकरण अतिरिक्त ताण आणते शिवाय त्या त्या भागातील संस्कृती, पर्यावरण वगैरे बाबी समजून घेणे हे देखील सहजतेने होत नाही.

अमितव,
परदेशातही भारतीय मूल जे जन्मल्यापासून डेकेअरला जाते त्याच्या कानावर सतत पडणारी इंग्रजी भाषा आणि जे मूल दिवसभर घरी आई/बाबा/आजी वगैरे सोबत असते आणि सातत्याने मातृभाषेत संवाद होतो त्याच्या बाबत फरक दिसून येतो. इंगंजी न येणार्‍या आजीसोबत रहाणारी आणि सातत्याने गुजराथी भाषा कानावर पडणारी मुलं, डेकेअर न परवडणारी शिफ्ट मधे काम करणार्‍या लॅटिनो मंडळींची मुले, इंग्रजीचा गंध नसलेल्या जपानी आईबरोबर दिवस घालवणारी जपानी एक्झिक्युटिव्जची मुलं ही इथेही सुरवातीला इएसएल मधे जातात. केजी ते अगदी३री पर्यंत हे इंग्रजीशी झगडणे चालते. . आमच्या गावात दिवसभर घरी रहाणार्‍या माझ्या लेकाच्या बाबतीत इएसएलची गरज नाही/फाईल नाही हे अपवाद म्हणून बघितले गेले.

वाचकमित्रहो, दिलेल्या सर्व प्रतिक्रियांबद्दल खूप आभारी आहे. धन्यवाद!

-----------
सदर लेख मायबोलीकरांना उद्देशून नाही. जनरल भारतीय पब्लिकला उद्देशून, त्यांच्या समस्यांबद्दल आहे. मायबोलीवर फक्त मायबोलीकरांसाठी त्यांच्या उपयोगाचे खास लिहायचे असते असे काही असेल तर मला माहित नाही. मार्गदर्शन मिळाल्यास नक्की प्रयत्न करेन. Wink

नक्कीच. एकच एक असे उत्तर या विषयाला नसल्याने विरोधी मतांचा आदर आहे. आपण इथे मांडल्यास माझ्या मतांमधले लुपहोल्स दिसायला मदत होईल. धन्यवाद!

नानबा धन्यवाद

प्रतिसादातही काही ईण्टरेस्टींग पॉईंट आलेत. बालगीतातील मजा. स्टोरीटेलिंगमध्ये सहजता नसणे, एकंदरीत घोकंपट्टी वगैरे..

https://www.maayboli.com/node/64616
मराठी माध्यमातल्या शाळांचा दर्जा किती घसरलाय ?
Submitted by विचारजंत on 28 November, 2017 - 22:44

विचारजंत यांच्या लेखातल्या आशयाच्या अनुषंगाने माझा हा लेख काही गोष्टींवर प्रकाश पाडू शकेल असे वाटते म्हणुन वर काढत आहे.

बरं झालं वर काढला,
माझा वाचायचा राहिला होता.

लेख आवडला आणि पटला.

शक्यतो ह्या शाळा मिशनरीज संचालित व भरपूर फीया घेणार्‍या होत्या. त्यात शिकणारे श्रीमंत, उच्चपदस्थ यांची मुले होती. या वर्गात सुबत्तेमुळे आलेला एक आत्मविश्वास जन्मत:च असतो. वरच्या वर्तुळात असलेल्याने उत्तम संधींची जास्त माहितीही असते.
हे वाचताना जो जिता वोह सिकंदर आठवला. Happy

Pages