फक्त इंग्रजीने भागेल..? भविष्यवेध २०३०.

Submitted by नानाकळा on 28 April, 2017 - 04:22

विशेष सूचना: हा लेख 'माझे बरोबर का तुझे बरोबर' ह्या वादासाठी नसून सगळ्या बाजूने विचार करून एखाद्या किंवा अनेक पर्यायांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न समजूया. हा जुना मिपावरचा लेख आहे. थोडा बदलून इथे प्रकाशित करत आहे.

मराठी माध्यम की इंग्रजी माध्यम ह्या विषयाच्या अनुषंगाने होणार्‍या चर्चांमध्ये प्रामुख्याने खालील दोन मुद्दे असतात.:

१. इंग्रजी समर्थकांचे सगळे मुद्दे इंग्रजी ही व्यवहार-भाषा, संपर्कभाषा, ज्ञानभाषा आहे म्हणून तीच शालेय शिक्षणाचे माध्यम असली पाहिजे यावर बेतलेले आहेत.

२. मातृभाषा समर्थकांचे सगळे मुद्दे प्रथम संपर्काची, थेट सामाजिक व्यवहाराची, आजूबाजूच्या वातावरणातली मुख्य भाषा म्हणून मातृभाषा ही प्राथमिक, माध्यमिक शालेय शिक्षणाचे माध्यम असावे यावर बेतलेले आहे.

इथे खरा गोंधळ होत आहे म्हणून दोन्ही पक्ष परस्पर संबंध नसलेल्या दोन वेगवेगळ्या बाजूंनी वाद करत आहेत असं वाटतं.

इंग्रजीचे जागतिक महत्त्व कुणीही नाकारू शकत नाही. शालेय शिक्षणात इंग्रजी अजिबातच नसावी असं कुणीही म्हटलेलं नाहीये. उलट अव्वल दर्जाची इंग्रजी भाषा बोलायला लिहायला शिकवणारे अव्वल दर्जाचे शिक्षक प्रत्येक शाळेत असलेच पाहिजेत असं माझं मत आहे. मुद्दा जर फक्त इंग्रजीवरच्या प्रभुत्वाचा आहे तर ते प्रभुत्व मिळवण्यासाठी शालेय अभ्यासक्रमातल्या सगळ्याच विषयांवर इंग्रजीची सक्तीची गरज नाही. आज मेट्रो शहरे सोडली तर निम-शहरी व ग्रामीण भागात इंग्रजीची दहशतवजा भीती आहे. मुले आपल्याला इंग्रजी जमणारच नाही कारण ती हुशार, श्रीमंत लोकांची भाषा आहे म्हणून दडपून जातात. त्यांना शिकवणारे शिक्षकही यथातथा याच अवस्थेतून शिकलेले. अशा परिस्थितीत लेवल-प्लेईंग फिल्ड होत नाही याला माझा आक्षेप आहे. माझ्या मते सहजतेने शिकवली तर जगातली कुठलीच भाषा अवघड नाही. जगात इंग्रजी संपर्कभाषा असेल. पण भारतात हुशारी, श्रीमंती, सुशिक्षीतपणाचे, उच्चभ्रूपणाचे मानक म्हणून इंग्रजीकडे पाहिले जाते. आपल्या इंग्रजी येत नाही हे जर्मनांना कमीपणाचे निश्चितच वाटत नसेल. जे इथे कित्येक भारतीयांना कायम वाटत असते आणि इंग्रजी येणारे त्याची त्यांना जाणीव करून देत असतात. जर्मनांसाठी ते व्यवसायवृद्धीसाठी लागणार्‍या दहा वस्तूंपैकी एक असेल, तर भारतीयांना ते नसेल तर आपल्यात काहीच क्षमता नाही इतकं भयंकर वाटायला लावणारं असतं. इंग्रजीकडे पाहण्याचा हा जगाचा आणि भारतीयांचा मूलभूत फरक मी अनुभवलाय. देशोदेशी प्रत्यक्ष वावरणार्‍यांनी सुद्धा अनुभवला असेल.

एक जुना विनोद ही परिस्थिती कशी विशद करतो बघा: संता आपल्या भावाकडे लंडनमधे काही दिवस राहून परत येतो. बंता त्याला विचारतो, क्या खास है बे उधर? तर संता म्हणतो, अबे पूछ मत, उधर तो छोटासा बच्चा भी फर्राटेसे अंग्रेजी बोलता है.

हे इंग्रजीचं वेड आलं तरी कुठून..?

माझ्या निरिक्षणात आपली मुलं इंग्रजी शाळेत जातात म्हणूनच त्यांचे भविष्य उज्ज्वल असेल असा भाबडा विश्वास बाळगणारे पालक आहेत, आपली मुलं इंग्रजी शाळेत जातात म्हणून आपण पुढारलेले, उच्च्भ्रू आहोत असे मिरवणारे पालक आहेत. इंग्रजी शाळेत जाणार्‍या मुलांना व पालकांना तो मान/स्टेट्स्/प्रतिष्ठा हवी आहे. मातृभाषेचा आग्रह धरणार्‍यांवर बाण्याचे बिनबुडाचे आरोप करणारे इंग्रजी-वेड्या पालकांच्या वेगळ्याच प्रकारच्या बाण्याचा अवलंब करणार्‍या मानसिकतेकडे अगदी सोयिस्कर दुर्लक्ष करत आहेत.

आजचे पालक शिक्षणाच्या (परम-आवश्यक अशा) दर्जापेक्षा फक्त (तुलनेने कमी महत्त्वाच्या) भाषा माध्यमावरच जोर देतायत. हे माझे निरिक्षण आहे. ते असं करण्यामागे मागच्या १५-२० वर्षात घडलेले आर्थिक-सामाजिक बदल आहेतच. इंग्रजी बोलणार्‍यांना चांगल्या संधी मिळतात हे त्यांनी बघितले म्हणून त्यांचा असा ग्रह झाला आहे की इंग्रजीतून शिक्षण घेतल्याने चांगल्या आर्थिक संधी मिळतात. प्रत्यक्षात त्या काळातल्या मोजक्याच असलेल्या इंग्रजी शाळांचा दर्जा इतर सरकारी व मराठी शाळांच्या मानाने फार चांगला होता. शक्यतो ह्या शाळा मिशनरीज संचालित व भरपूर फीया घेणार्‍या होत्या. त्यात शिकणारे श्रीमंत, उच्चपदस्थ यांची मुले होती. या वर्गात सुबत्तेमुळे आलेला एक आत्मविश्वास जन्मत:च असतो. वरच्या वर्तुळात असलेल्याने उत्तम संधींची जास्त माहितीही असते. त्यायोगे कुठले शिक्षण घ्यावे याचीही तयारी चांगली असते. त्यातून चांगले शिक्षक, चांगल्या शैक्षणिक दर्जाचा होणारा संस्कार. हे सर्व दिमतीस असलेली मुले यशस्वी होतांना पाहून सामान्य पालकांच्या महत्त्वाकांक्षेला मात्र एकच कारण दिसले ते हे की 'इंग्रजी शाळेत शिकले की यश मिळते'. कारण फक्त 'इंग्रजी माध्यमच' त्यांच्या आवाक्यात होते. याला थोडी फुंकर घालून इंग्रजी शाळावाल्यांनी आपले मार्केटींग केले. त्याला आजचे पालक आंधळेपणाने भुलतायत.

याचं छोटेखानी उदाहरण मी अकरावी सायन्सला असतांना बघितलंय. माझ्या वर्गात महाराष्ट्रातून प्रथम आलेला मुलगा होता. अकोला जिल्ह्यातले सगळे मेरिटचे विद्यार्थी याच कॉलेजला असतात. माझ्या वर्गातली निम्मी जनता मेरीटवाली होती. ह्या मेरिटवाल्यांमधे बहुसंख्य मुलं कॉन्व्हेंटवाली होती. हे सगळं सांगण्याचं कारण वर्गात अ‍ॅवरेज मुलं अजिबात नव्हती. पण एक फरक होता. कॉन्वेंटवाल्या मुलांचा आत्मविश्वास, स्वत:ला प्रेझेंट करण्याची, छाप पाडण्याची हातोटी विलक्षण होती. सेमी-इंग्लीश, साध्या शाळेतून आलेली मुले त्यांच्या पुढ्यात दडपून जायची. आणि याचे कारण या मुलांना दुर्दैवाने त्यांचे फाडफाड इंग्लीश वाटत असे.

आज ५ ते १० वयोगटातली मुले जेव्हा शिकल्यावर बाहेर पडतील तेव्हा आपल्यासारखीच योग्यता असलेली लाखो मुले बघतील. तेव्हा जी स्थिती १०-१५ वर्षाआधी लाखो मराठी मुलांची होती तीच या इंग्रजी शिकलेल्या मुलांची असेल. कारण हजारोंकडे जेव्हा एकसारखं स्किल असतं तेव्हा त्या स्किलला तेवढं आर्थिक महत्त्व राहत नाही. लक्षात घ्या हा सगळा काथ्याकूट मी आता पद्व्युत्तर शिक्षण घेत असलेल्या मुलांबाबत घातलेला नाहिये. त्यांच्याबद्दल आता काही बोलून उपयोगच नाही. खरा प्रश्न येणार्‍या पिढीचा आहे. ती फाड फाड इंग्रजी बोलू शकणारी पण इतर काही स्किल्स नसलेली मुले मॉलच्या फरशाच पुसतील. रिक्षा चालवतील, धुणीभांडी करतील. तेव्हा हा भ्रमाचा भोपळा फुटेल.

हेच होत आलंय. पन्नास-साठ वर्षांपुर्वी पाचवी पास माणसाला हमखास नोकरी लागत असे. त्यानंतर इंजिनीअर-डॉक्टर्सचे प्रस्थ वाढले. त्यानंतर नुसत्या बी ए/बी एससी/बी कॉमचे पीक आले. पदवीचे अवमुल्यन झाले. आज इंजिनीअर-डॉक्टर्सचे अवमुल्यन झाले आहे. आज इतके इंजिनीअर झालेत की काही विशेष स्किल्स असल्याशिवाय तुमच्या नुसत्या इंजिनीअरींगला कुत्रं विचारत नाही. आज नुसतं एमबीबीएस करून पुर्वीच्या एमबीबीएस डॉक्टरांसारखे वैभव-स्थैर्य कमावता येत नाही. आयटीची सुद्धा वेगळी परिस्थिती आहे असं नाही. बी.एससी वैगेरे करून चपराशाची नोकरी करणारे मागच्या पिढीत बरेच पाहिलेत. सॅचुरेशन, गर्दी होण्याआधी जे हजर असतात तेच यशस्वी होतात. दुर्दैवाने सामान्य लोकांच्या डोक्यात हे कधीच शिरणार नाही. ते नेहमी दुसरे काय करून यशस्वी झाले त्याची कॉपी करण्याचा सोपा पण अयशस्वी मार्ग पत्करतात.

आजचे श्रीमंत, उच्चपदस्थ उद्या परत तेच चक्र पुन्हा फिरवतील. वरच्या जागांवर त्यांचीच मुले परत असतील. परत सामान्य लोक उच्चवर्गाने काय केले हे बघून आपल्या जे जमते तेवढ्याचे फॅड घेऊन धावत राहतील.

काही लोक म्हणतात की ठीक आहे ना, फॅड असले म्हणून काय झाले. पैसा व सन्मान मिळतोय ना? पण खरंच किती लोकांना हा फायदा मिळतोय? आज भारतात सुशिक्षित तरुणांपैकी फक्त ३४% तरुण नोकरी करण्यायोग्य आहेत. नोकरी देणार्‍या कंपन्यांना या नोकरीयोग्य नसलेल्या मुलांवर प्रशिक्षणाचा प्रचंड खर्च करावा लागतो ज्याचा या मुलांच्या किमान पहिल्या ३ वर्षाच्या पगाराच्या आकड्यावर परिणाम होतो.

कंपन्यांना आज किंवा उद्याही लागणार असलेले काही स्किल्स असे आहेत.
१. विशिष्ट उद्योगक्षेत्रात लागणारे मूलभूत व्यावसायिक कौशल्य
२. तंत्रज्ञानाचे अद्ययावत ज्ञान.
३. संवाद कौशल्य (संवाद कौशल्य म्हणजे 'स्टेजडेअरिंग, इंग्रजीत बोलता येणे' असा गैरसमज)
४. निवडलेल्या क्षेत्रासाठी उपजत कल

आजची शिक्षणपद्धती फक्त नोकरदार तयार करणारी आहे. सांगितलेले काम सांगितलेल्या पद्धतीत करायचे. त्यात काही अडचण आल्यास मार्ग शोधण्यासाठी डोके चालवणार्‍यास प्रमोशन, भत्ते, बक्षीसं मिळतात. या शिक्षणाने व प्रवृत्तीने घातलेला दुसरा घोळ म्हणजे पारंपरिक रोजगार, व्यवसाय यात काही फायदा नाही असा चुकीचा केलेला प्रचार. कारण या व्यवसाय्/क्षेत्रांबद्दल प्रेम वाटावं असं या पद्धतीत काहीच नाही. किंवा हे शिकून पारंपारिक व्यवसायात पडायची मुलांना लाज वाटते. इतकं शिकून का गल्ल्यावर बसाचं का? किंवा इतकं शिकलो ते का नांगर हाकलायला का? असे वाक्य कानी पडू लागली. म्हणजेच दुकानदारी करणे, शेती करणे हे नोकरी करण्यापेक्षा हलक्या दर्जाची कामे आहेत हे बिंबवण्याचे भयंकर पाप या व्यवस्थेने केले. ज्यांना हे घोकंपट्टी शिक्षण जमतं ते फार हुशार आणि इतर लोक ढं असं काहीसं समिकरण मांडल्या गेलं. याचं कारण इंग्रज साहेब. तो आपला कायम कचेरीत बसून हुकूम चालवणार. त्याला कुणी कधी नांगर धरलेला पाहिला नाही का गल्ल्यावर बसलेला पाहिला नाही. मग त्यालाच आपला रोल मॉडेल बनवायला सामान्य लोकांनी सुरुवात केली. ती आजतागायत सुरू आहे.

माझा विरोध आहे तो आपल्या समाजाबद्दल, राहणीमानाबद्दल, उद्योगधंद्यांबद्दल अलिप्तता निर्माण केल्यामुळे झालेल्या नुकसानाला आहे. आज आपण मुलांना मिळणार्‍या पॅकेजच्या बातम्या पहिल्या पानावर पाहतो. त्या मुलाला वर्षभर कष्ट करून जेवढे लाख मिळतील तेवढे लाख त्याच्यापेक्षा एक चतुर्थांश काम करून मिळवणारे हजारो शेतकरी आज महाराष्ट्रात आहेत. त्यांच्या बातम्या येत नाहीत. येतात त्या आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांच्या. कारण बातम्या देणारेही याच व्यवस्थेतून शिकलेत. यशस्वी शेतकर्‍यांच्या बातम्या तुम्हाला फक्त अ‍ॅग्रोवन मध्येच दिसतील.

माझ्या ओळखीत एक गृहस्थ आहेत. गुलाबाच्या फुलांची शेती करतात, वर्षाचे ३५६ दिवस. रोजचे उत्पन्न एक लाख रुपये. निव्वळ. आणि असे बरेच आहेत.

येणार्‍या काळात असेच वेगवेगळे व्यवसाय करणार्‍यांचीच चलती असेल. त्याची चाहूल आजच लागते आहे. आजचे श्रीमंत, उच्चपदस्थ त्यासाठी मुलांना तयार करतायत. आणि आजचा सामान्य पालक ओसरुन जाणार्‍या लाटेसाठी मुलांना तयार करतोय. हेच कायम होत आले आहे म्हणून बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाते आहे.

आजपासून १५ वर्षांनी आपल्या मुलांसाठी काय वाढून ठेवलेलं असेल? त्याला तेव्हा तोंड देण्याची तयारी करण्याचा वेळ व यशस्वी होण्याची मानसिकता त्याच्याकडे असेल काय? जसं आज काही लोक 'अकरावी आम्हाला इंग्रजीशी कसे झगडावे लागले, त्यात कसा वेळ गेला' असं सांगतायत, तेव्हा असं 'वेळ घालवणारं' काही असेल काय? किंवा भविष्यातल्या कोणत्याही परिस्थितीत मुलांना तोंड देता यावे म्हणून काही विशेष तयारी आजपासूनच करता येईल काय याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. की फक्त इंग्रजी आलं की झालं म्हणून ते यशस्वी होतील काय? याचा सगळा विचार आताच करणे आवश्यक आहे.

त्यामुळे इंग्रजी माध्यमाऐवजी शालेय शिक्षणाच्या दर्जाला महत्त्व दिले तर बरे होईल. त्यातून ते मातृभाषेत असेल तर जास्तीत जास्त मुले मुख्य प्रवाहात येऊन कसल्याही न्यूनगंडाशिवाय स्वत:च्या, देशाच्या प्रगतीत हातभार लावतील.

शिक्षणात भाषेशिवाय इतर अनेक बाबीही महत्वाच्या आहेत. इंग्रजीतुन शिक्षण असो अथवा मराठीतुन, शिक्षक, विद्यार्थ्याची वृत्ती, घरातले वातावरण, बुद्ध्यांक, अभ्यास करण्याची तयारी, अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती हे इतर मुद्देही तेवढेच महत्वाचे आहेत. विद्यार्थ्यांना बोली भाषेतुन शिकवले तर ते विशेष लक्ष देऊन शिकतील, सगळे सोपे वाटेल असे काहीही नाही आणि एखाद्याला खरेच इंग्रजीतुन झेपत नसेल तर त्याला जबरदस्ती ते करायला लावणे हेही योग्य नाही.

ज्या विद्यार्थ्याला बोलीभाषेतून समजणार नाही त्याला इंग्रजीतून तर समजण्याचा प्रश्नच येत नाही असे वाटतं.

आपले सरकारी शैक्षणिक धोरण बदलेल न बदलेल पण आज ज्यांना पाच ते आठ वर्ष वयाची मुलं आहेत त्या पालकांनी तरी याचा थोडा गंभीरपणे विचार करावा व जाणकारांनी आपली मतं अवश्य द्यावी.

माझी निरिक्षणे, निष्कर्ष व अनुमान कुठेही चुकत असतील तर अवश्य सांगा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

फक्त इंग्रजीने भागेल?
उत्तर - नाही.
म्हणजे उद्योगधंदे वाढवण्यासाठी. शास्त्र, वैद्यकीय, इंजिनियरिंग, गणित वगैरे विषय यांचे ज्ञान पक्के करून घ्या. मग ते कुठल्याहि माध्यमात शिका. गरज पडली की त्या त्या भाषेतली पुस्तके वाचून भाषा वापरणे कठीण नाही - निदान भारतातल्या अनेक हुषार लोकांना. . मराठी तून १०, ११ वी पर्यंत शिकलेले अनेSक लोक सध्या अमेरिका, इंग्लंड मधे आरामात मिसळून गेले आहेत व खूप यशस्वी झाले आहेत. आत्ताच एकदम मुले ढ झाली का? त्यांनाहि अक्कल असेलच ना!

सध्या अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड हे बर्‍यापैकी श्रीमंत देश इंग्रजी वापरतात, म्हणून इंग्रजी शिकणे हे महत्वाचेच.
पण आजकाल ग्लोबलायझेशन आहे. उद्योगधंदे वाढवायला जगभर जायची गरज आहे.
अमेरिकेतले, इंग्लंडमधले लोक सुद्धा जपानी, चिनी, फ्रेंच, जर्मन इ. भाषा मुद्दाम शिकतात, नि आताशा तर अरेबिक, फारशी पण. त्याचा फायदा त्यांना परदेशात जर्नलिझम, सरकारात परराष्ट्रखात्यात नोकरी, इतर देशात दीर्घ काळ कामानिमित्त (सरकारी किंवा खाजगी) रहाणे या साठी होतो.
भारतातल्या उद्योगधंद्यांचे प्रमाण, अमेरिकेच्या मानाने सध्या फार फार कमी आहे - पण ते वाढवायचेच आहे ना? फक्त अमेरिका, इंग्लंड वर भागणार नाही - उलट लहान लहान देशात, सगळ्यांच्या आधी जाऊन धंद्याचा जम बसवला तर नक्कीच फायदा होईल.
त्यासाठी शाळांमधे इंग्रजी किंवा फ्रेंच मिडियम असायची गरज नाही, तो भ्रम आहे. आपल्या मातॄभाषेत शिका, विशेषतः शास्त्र, वैद्यकीय, इंजिनियरिंग, गणित वगैरे विषय यांचे ज्ञान पक्के करून घ्या.
भाषा शिकणे कठीण नाही, त्यासाठी अगदी खूप खोलात जायची गरज नाही,

नंद्याभौ तुमच्या प्रतिसादामुळे दोन गोष्टी आठवल्या, एक तर पटेल समूहाचे अमेरिकेत मोटेल व्यवसायात जम बसवणे, दुसरे आफ्रिकन देशांतून गेल्या शंभर वर्षाहून अधिक काळ आधीपासून भारतीय लोक उभारत असलेले विविध उद्योग, यात जैन गुजराती समूहाचे प्राबल्य अधिक आहे. इंडोनेशिया, वगैरे पूर्व देशातही भारतीयांनी व्यवसाय उभारले आहेत.

या सर्व घडामोडीत भाषेचा अडसर कितपत आला याबद्दल शोधलं पाहिजे, कारण केस टु केस भाषा वेगळ्या आणि भारतीयांना अनोळखी अशा होत्या. तेव्हा जी परदेशात किंवा परराज्यात गेलं तर इंग्रजी आलीच पाहिजे हा समज कितपत गंभीरतेने घ्यावा हेही बघितलं पाहिजे

<<<परदेशात किंवा परराज्यात गेलं तर इंग्रजी आलीच पाहिजे हा समज कितपत गंभीरतेने घ्यावा हेही बघितलं पाहिजे>>>

ज्यांचे स्वतःचे उद्योग असतील आणि ज्यांची गिर्‍हाइके फक्त भारतीय असतील, त्यांना फारसे इंग्रजी यायची गरज नाही. पण थोडे फार तरी आलेच पाहिजे. कारण भारतीय सोडून पोलीस, इतर सरकारी कामकाज, इंग्रजीतच चालते. शिवाय जिथे दुकान आहे तिथे आजूबाजूच्या समाजात स्नेहाचे संबंध ठेवायचे असतील, तर इंग्रजी थोडेफार तरी आलेच पाहिजे.

नवीन भाषा शिकणे, विशेषतः इथे इंग्रजी शिकणे फारसे कठीण नाही - जगातील सगळ्या देशातून लोक इथे येतात, अगदी निर्वासित सुद्धा - सगळे बोलू शकतात हळू हळू.

पण ज्यांना जास्त यशस्वी व्हायचे असेल, म्हणजे धंदा वाढवायचा असेल तर भाषा यायला पाहिजे.
माझ्या मते ज्यांना शास्त्र, वैद्यकीय, गणित, इंजिनियरिंग इ.विषयात पुढे शिक्षण, करीयर करायचे असेल तर आधी ते विषय पक्के समजून घ्या, मातृभाषेत शिकले तरी चालेल, कारण दुसरी भाषा पटकन शिकता येते.

सध्या आमच्या घरातील विवादित विषय आहे, मुलाला कुठल्या माध्यमातून शिकवायचे, आम्ही दोघे मराठीलाच पाठिंबा देतोय, पण काका, आत्या, साबा इंग्रजी साठीच ठाम आहेत.. नानाकळा धन्यवाद या लेखासाठी, आमचे विचारच जणू लिहून काढलेत.

क्रांतिवीर, प्रतिसादासाठी धन्यवाद.
माध्यमापेक्षा दर्जावर नक्की लक्ष द्या. मराठी असो की इंग्रजी, शाळेची जास्तीत जास्त माहिती घ्या, काय पद्धतीने शिकवतात ते बघा. दर्जा मिळत असेल तर माध्यमावर तडजोड करुही शकतो एकवेळ. मुलांसाठी शाळा निवडणे हे खरेच मोठे आव्हान आहे कारण परत परत तेच तेच करण्याची शक्ती व वेळ नसतो आणि मुलेही गडबडतात. तेव्हा आधीच नीट विचार करुन निर्णय घेतलेला बरा. लेखात सांगितल्याप्रमाणे नेमकी गरज काय हे जर नातेवाईकांना सांगता आले तर विरोध मावळतो. मराठीत मुलांना घालणे अंधारात उडी घेण्यासारखे आहे असे वाटते पण इंग्रजीत घेतलेली उडीही तशीच आहे, काहीही वेगळे नाही.

येता काळ स्किलसेटपेक्षा माइन्डसेट चा असणार आहे. पुढच्या पंधरा वर्षात जग अमुलाग्र बदलणार आहे. ती काय आव्हाने आपल्या मुलांना झेलावी लागतील हे आज कोणीच सांगू शकत नाही. तेव्हा मुलांमध्ये कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊन उपाय शोधू शकणारा माइंडसेट तयार करणे ही आताच्या काळाची गरज आहे.

चांगल्या शाळेसाठी नक्की प्रयत्न करत राहा. शुभेच्छा.!

नक्की मुद्दा काय आहे ते कळले नाही. शिक्षणाचे माध्यम काय असावे याबद्दल की शिक्षणाच्या दर्जाबद्दल?

>>> आज आपण मुलांना मिळणार्‍या पॅकेजच्या बातम्या पहिल्या पानावर पाहतो. त्या मुलाला वर्षभर कष्ट करून जेवढे लाख मिळतील तेवढे लाख त्याच्यापेक्षा एक चतुर्थांश काम करून मिळवणारे हजारो शेतकरी आज महाराष्ट्रात आहेत.<<<
>>> माझ्या ओळखीत एक गृहस्थ आहेत. गुलाबाच्या फुलांची शेती करतात, वर्षाचे ३५६ दिवस. रोजचे उत्पन्न एक लाख रुपये. निव्वळ. आणि असे बरेच आहेत. <<<
गुलाबाच्या शेतकर्‍याचे उदाहरण पण समजले नाही. नोकरी आणि धंदा याची तुलना कशाला?

>>> माझी निरिक्षणे, निष्कर्ष व अनुमान कुठेही चुकत असतील तर अवश्य सांगा. <<<
निष्कर्ष व अनुमान काय आहे ते कळले नाही. जरा स्पष्ट कराल का?

आजच्या मटात सेमी इंग्लिश माध्यमावर लेख आलाय .सेमी इंग्लिश हे इंग्रजी माध्यमाला उत्तर होऊ शकते असे वाटते

उपाशी बोका.

वरच्या लेखाची बैठक खालचे मुद्दे आहेत.

१. प्राथमिक शालेय शिक्षणाचे माध्यम मातृभाषा किंवा परिसरभाषा असावी आणि दर्जा सर्वोत्तम असावा.(युनेस्कोच्या अहवालानुसार)
२. केवळ माध्यम उपयोगाचे नाही किंवा केवळ दर्जाही उपयोगाचा नाही. (माझे निष्कर्ष व अनुमान)
३. घरात किंवा संपर्कात असणारे जी भाषा प्रामुख्याने बोलतात, बोलू शकतात त्यातून प्राथमिक शालेय शिक्षण व्हावे.(युनेस्को)
४. उच्चशिक्षणासाठी मातृभाषाच असावी अशी कोणतीही मागणी नाही. (माझे निरिक्षण)

जाई. तो लेख योग्यच आहे. त्यात खरोखर कशाची गरज आहे हे अधोरेखित केले आहे. पण बरेच लोक फाइन प्रिंट वाचत नाहीत असे दिसले आहे. 'पहिलीपासून इंग्रजी म्हणजे संपूर्ण माध्यम इंग्रजी' असं नव्हतं. पण ते तसंच समजलं गेलंय. मी जो इंग्रजी भाषा शिकवण्याचा शासकिय अभ्यासक्रम बघितला तो अतिशय सुंदर होता. त्यात आपल्या अवतीभवतीच्या गोष्टींमधून गुंफून इंग्रजी बोलायला, ऐकायला शिकवले जात असे. भाषा ही भाषेसारखी शिकायची असते. पण बहुसंख्य इंग्रजी शाळांत हे होत नाहीये असे निरिक्षण आहे. मुलांवर खूप ताण आहे. या शाळांत खर्‍याखुर्‍या शिक्षणापेक्षा इतर तामझाम, दिखाऊगिरी, अनावश्यक खर्च यावर भर दिला जात आहे. कुणाचा काही वेगळा अनुभव, निरिक्षण, अभ्यास असल्यास शेअर करा इथे.

शाळेचा दर्जा ओळखायचा असेल तर फक्त एवढे बघावे की तिथली पहिली ते पाचवीतली किती मुले खाजगी शिकवणीला जातात.

चांगला लेख आहे. त्याचबरोबर तुमच्या सगळ्या पोस्ट्स पण छान आहेत.

कॉन्वेंटवाल्या मुलांचा आत्मविश्वास, स्वत:ला प्रेझेंट करण्याची, छाप पाडण्याची हातोटी विलक्षण होती. सेमी-इंग्लीश, साध्या शाळेतून आलेली मुले त्यांच्या पुढ्यात दडपून जायची. आणि याचे कारण या मुलांना दुर्दैवाने त्यांचे फाडफाड इंग्लीश वाटत असे.>>> अगदी अगदी.

मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये खूप मोठी त्रुटी आही ती म्हणजे हुशारीप्रमाणे तुकड्या आणि तुकड्यांमध्ये केलेला पंक्तीप्रपंच. इंग्रजी माध्यमांच्या शाळा किंवा कॉन्व्हेंट्मध्ये होत नाही. किंवा आता आहे की नाही माहित नाही पण आमच्या वेळेस होते. आधी ही प्रथा बंद झाली पाहिजे.

.सेमी इंग्लिश हे इंग्रजी माध्यमाला उत्तर होऊ शकते असे वाटते >> +१

छान लेख आहे. वाचायचा राहिला होता. परराज्यात असल्यामुळे आम्हाला इंग्रजी माध्यमाला पर्यायच नाही, पण त्या पलीकडे काय करायला हवं याची चांगली कल्पना दिलीत.
नानबा, तुमचे विचार आणि अनुभवही नक्की लिहा इथे. माझ्या भाच्या पुण्यात ' अक्षरनंदन' या मराठी माध्यमाच्या शाळेत आहेत. तीही अतिशय सुंदर शाळा आहे.
मला स्वतःला अकरावी सायन्सला गेल्यावर इंग्रजी माध्यमाशी जुळवून घ्यायला वेळ गेला. तेव्हा "
कॉन्वेंटवाल्या मुलांचा आत्मविश्वास, स्वत:ला प्रेझेंट करण्याची, छाप पाडण्याची हातोटी विलक्षण होती. सेमी-इंग्लीश, साध्या शाळेतून आलेली मुले त्यांच्या पुढ्यात दडपून जायची. आणि याचे कारण या मुलांना दुर्दैवाने त्यांचे फाडफाड इंग्लीश वाटत असे" हा अनुभव मलाही आलाच.

>>>
१. प्राथमिक शालेय शिक्षणाचे माध्यम मातृभाषा किंवा परिसरभाषा असावी आणि दर्जा सर्वोत्तम असावा.(युनेस्कोच्या अहवालानुसार)
२. केवळ माध्यम उपयोगाचे नाही किंवा केवळ दर्जाही उपयोगाचा नाही. (माझे निष्कर्ष व अनुमान)
३. घरात किंवा संपर्कात असणारे जी भाषा प्रामुख्याने बोलतात, बोलू शकतात त्यातून प्राथमिक शालेय शिक्षण व्हावे.(युनेस्को)
४. उच्चशिक्षणासाठी मातृभाषाच असावी अशी कोणतीही मागणी नाही. (माझे निरिक्षण)
<<<

प्राथमिक शालेय शिक्षणाचे माध्यम परिसरभाषा असावी, हे मान्य आहे. मातृभाषा असावी या म्हणण्याला काही अर्थ आहे, असे मलातरी वाटत नाही. मराठी वडील, तामिळ आई आणि दिल्लीत राहाणार्‍या मुलाचे शिक्षणाचे माध्यम काय असावे? माझ्या मते: हिंदी किंवा इंग्रजी, जे सोईस्कर आहे ते. पण हिंदी माध्यम असले तरी इंग्रजी मात्र नक्कीच शिकावे. इंग्रजी ही काळाची गरज आहे. एकवेळ मराठी किंवा तामिळ आले नाही तरी चालेल, पण इंग्रजी आलेच पाहिजे. जे.आर.डी टाटा, केकी घर्डा यांना मराठी येत नसूनही त्यांनी चांगला धंदा केला, तुमचेपण काही अडणार नाही. धंदा करताना स्थानि़क भाषेचा नक्कीच फायदा होतो. नाक्यावरचा वाणी बघा, स्वतः मारवाडी/कच्छी येत असले तरी तुमच्याशी मराठीत बोलेल, पण का? त्याचे मराठीवर फार प्रेम आहे म्हणून नाही तर भाषा हे संवादाचे माध्यम आहे म्हणून. भाषा वापरायची याचे मुख्य कारण म्हणजे तुम्हाला काय सांगायचे आहे ते समोरच्याला कळले पाहिजे आणि त्याचे तुम्हाला. (माझे बाबा उत्तम गुजराथी बोलतात, त्यामुळे दुकानात ते मालकाशी गुजराथीत बोलले तर फायदा झालेला मी स्वतः पाहिले आहे.) पण शेवटी प्रत्येकाची मर्जी. एखादी जास्तीची भाषा शिकायची असेल तर स्पॅनिश, चायनीज (मँडॅरिन), फ्रेंच या भाषा शिकल्याने जास्त फायदा होईल.

>>> २. केवळ माध्यम उपयोगाचे नाही किंवा केवळ दर्जाही उपयोगाचा नाही. (माझे निष्कर्ष व अनुमान) <<<
मुळात दर्जा वगैरे प्रकार भंपक आहे. सोय महत्वाची आणि सगळे सोयच बघतात. आता इंटरनेटरमुळे कुणालाही काहीही शिकणे अतिशय सोपे झाले आहे. बहुतेक शिक्षक फक्त शिक्षण क्षेत्रातले असल्याने बाहेरच्या जगात काय चालले आहे, त्याची त्यांना फारशी कल्पना नसते किंवा त्यांना त्याच्याशी काही देणेघेणे नसते. चांगले शिकवायला शिक्षक उदास असतात आणि काहीतरी नवीन शिकावे असा विचार करायला विद्यार्थी उदास असतात. त्यामुळे बहुतेक सगळे पाट्या टाकायचे काम करतात. काही-काही चांगले शिक्षक असतात, नाही असे नाही, पण बहुतेक वेळा ते अपवाद म्हणूनच.

शैक्षणिक यश/ दर्जा या फक्त बोलायच्या गोष्टी. तसं जर असेल, तर मग IAS च्या परीक्षेची तयारी करणारा अभियांत्रिकी व्हायची काय गरज आहे, बी.ए. पण चालेल की? याचे कारण म्हणजे रिस्क मॅनॅजमेंट. IAS परीक्षा पास नाही झाला तर अभियांत्रिकी होऊन कुठेतरी नोकरी तरी मिळू शकेल, बी.ए. होण्यापेक्षा बरे, असा त्यामागचा विचार असतो.

शिक्षणाचा उपयोग काय? तर तुम्हाला अधिक चांगल्या संधी मिळू शकतात. तुमच्या मुलाला काय शिकायचे आहे, ते आधीच माहित आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण सगळ्याच (रादर बहुतेक) मुलांना असे माहीत नसते. चांगले कॉलेज का हवे तर त्याने तुम्हाला एक चांगला ब्रॅंड मिळतो, ज्यामुळे तुम्ही आयुष्याची सुरुवात थोड्या वरच्या पातळीवरून करू शकता.

सर्वच जण कौशल्य असूनही यशस्वी होत नाहीत. त्याला नशीबपण लागते. जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन करणारा एम.एफ.हुसेन हजारात एखादाच होतो. बाकीचे त्याच गॅलरीसमोर फुटपाथवर प्रदर्शन लावून बसलेले असतात.

म्हणून मी माझ्या भाच्याला तो दहावीत असताना सांगितले होते की तू आता ७ वर्ष नीट अभ्यास करून यश मिळवलेस तर पुढची ७० वर्ष आरामात जगशील. पण त्याऐवजी आता ७ वर्ष आराम केलास तर पुढे ७० वर्ष भोगशील. आता तुला काय करायचं आहे, ते तू ठरव. (त्याची क्षमता काय आहे, ते ओळखून तितपतच अपेक्षा ठेवणे, इतपतच पालकांनी करावे.)

माझे मत आहे की आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुम्ही स्वतःला एक प्रॉडक्ट म्हणून समजले पाहिजे, एक एम्प्लॉई म्हणून नाही. आणि स्वतःचे मार्केटिंग व्यवस्थित केले पाहिजे आणि डोळे उघडे ठेऊन अजून कुठल्या नवीन संधी येत आहेत, ते बघितले पाहिजे. आपण स्वतः यशस्वी होत नसतो, तर इतर लोक आपल्याला यशस्वी करतात.

साधारणपणे यश, पैसा, कीर्ती, self-confidence, समाजातली पत हे एकत्रीत असतात. स्वतःच्या कर्तबगारीवर/आत्मविश्वासावर पैसा मिळू शकतो आणि खूप पैसा मिळाला की आत्मविश्वासपण वाढू शकतो. मग सोपा मार्ग का घेऊ नये?

शेवटी काय, आयुष्यात आपले समाधान कशात आहे ते प्रत्येकाला स्वतःलाच शोधावे लागते. पण खिशात भरपूर पैसा असेल, तर ते काम अधिक सोपे होते. Money can buy you happiness, but happiness cannot buy you money.

मातृभाषा म्हणजे घरातले सदस्य साधारण ज्या भाषेत संवाद साधतात ती. आंतरभाषीय लग्नांची टक्केवारी द्या. मग त्याच्यावर आधारित निष्कर्ष काढता येईल.

मराठी वडील, तामिळ आई आणि दिल्लीत राहाणार्‍या मुलाचे शिक्षणाचे माध्यम असावे?

>> लेखाचा विषय हा नाही. काहीतरी अपवादात्मक बादरायण शक्यता घेऊन व्यापक व्यवस्थेसाठीच्या विचारांना सुरुंग पाडायचा असफल प्रयत्न करणे याशिवाय या उदाहरणाचा काही उपयोग नाही.

मटातल्या लेखातलेच वाक्यः "महाराष्ट्रात आज सेमी-इंग्रजीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दहावीत २.७० लाख, तर पहिलीत ४.३० लाख आहे. दहावीपर्यंतची संख्या सुमारे ३५ लाख आहे. ती या पुढच्या काळात वाढतच राहणार आहे."

ह्या पस्तीस लाखात मराठी वडील, तमिळ आई आणि दिल्लीत राहणार्‍या मुलांची टक्केवारी किती आहे? या प्रश्नाचे उत्तर द्या.

http://www.business-standard.com/article/education/maharashtra-board-ssc...

Maharashtra SSC results 2017 | जून मधली बातमी

Out of the 16,50,499 students (fresh candidates) who registered for the Maharashtra 2017 SSC exams, ....

ह्या १६.५० लाखात मराठी वडील, तमिळ आई आणि दिल्लीत राहणार्‍या मुलांची टक्केवारी किती आहे? या प्रश्नाचेही उत्तर द्या.

----------------
बाकीचे मुद्दे ब्रेक के बाद....

बाकीचे मुद्दे:

तसे तर तुमचा सर्व प्रतिसाद थोडा विस्कळित आणि मूळ मुद्दे सोडून वाटला आहे. कारण मूळ लेख कशासाठी का लिहिलाय हे कदाचित आपल्या लक्षात आले नसावे. ते तुमच्या प्रतिसादातले भाग घेऊन समजवण्याचा प्रयत्न करतो.

इंग्रजी ही काळाची गरज आहे. एकवेळ मराठी किंवा तामिळ आले नाही तरी चालेल, पण इंग्रजी आलेच पाहिजे. जे.आर.डी टाटा, ----- शिकल्याने जास्त फायदा होईल.
>> इंग्रजी यायलाच नको, अजिबात चालणारच नाही अशी कोणीही भूमिका घेतलेली नाहीये. मराठीमाध्यमसमर्थकांचा असा कोणताही अतिरेकी आणि बिनडोक आग्रह नाहीये. भारतीय माणसाला किमान तीन भाषा उत्तम यायलाच हव्या एक म्हणजे मातृभाषा, इंग्रजी आणि आणखी एक भारतीय भाषा. नीट शिकले तर किमान सहा भाषा अस्खलित बोलण्या-लिहिण्याच्या क्षमतेची बुद्धिमत्ता बहुसंख्य लोकांमध्ये असते. तेव्हा इंग्रजी नकोच हा हट्ट आहे हे डोक्यातून पहिले काढा. इंग्रजीची सक्ती प्राथमिक शिक्षणात नको ही प्रथम अपेक्षा आहे. जमलं तर युनेस्कोचा अहवाल वाचून घ्या. http://unesdoc.unesco.org/images/0016/001611/161121e.pdf

अनेक लोक हा अहवाल न वाचताच चर्चेला येतात आणि अतिशय वरवरची बाष्कळ चर्चा होते. मातृभाषेतून-परिसरभाषेतून प्राथमिक शिक्षणाची गरज यावर अभ्यासातून लिहिलेला अहवाल आहे.

मुळात दर्जा वगैरे प्रकार भंपक आहे.------ बहुतेक वेळा ते अपवाद म्हणूनच.
>> अतिशय अंदाधुंद विधाने आहेत बरं का ही. हे जर खरे असेल तर मग सगळ्या शाळांनाच कुलूप ठोकावे लागेल. इंटरनेट हा प्रत्येक बाबतीत रामबाण नसतो. इंटरनेटवर शिकून डॉक्टर झालेला तुम्हाला तुमच्या शस्त्रक्रियेसाठी चालणार आहे का? की अशा इण्टरनेट इंजिनीअर ने बनवलेल्या घरात तुम्ही राहण्याची हिम्मत कराल? तुमची विधाने इतकी लूज आहेत की त्याचा प्रतिवाद करायचे सुद्धा जीवावर येतंय. सॉरी.

शैक्षणिक यश/ दर्जा या फक्त बोलायच्या गोष्टी.-------असतो.
>> अभियांत्रिकी झालीये म्हणून हमखास नोकर्‍या मिळत नाहीयेत सर... बी.ए. होण्यातून काय होऊ शकते हेच माहित नसल्याने असले विचार बोकाळलेत. आता घर का ना घाट का अशी अवस्था झालीये पोरांची.

शिक्षणाचा उपयोग काय? तर तुम्हाला अधिक चांगल्या संधी मिळू शकतात. तुमच्या मुलाला काय शिकायचे आहे, ते आधीच माहित आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण सगळ्याच (रादर बहुतेक) मुलांना असे माहीत नसते. चांगले कॉलेज का हवे तर त्याने तुम्हाला एक चांगला ब्रॅंड मिळतो, ज्यामुळे तुम्ही आयुष्याची सुरुवात थोड्या वरच्या पातळीवरून करू शकता.
>> शिक्षणाचा उपयोग काय तर नोकरी मिळवणे? बाकी तर असोच.

सर्वच जण कौशल्य--- न बसलेले असतात.
>> परत हवेतली विधाने. जहांगीर आर्ट गॅलरीत आतपर्यंत हजारो आर्टिस्ट प्रदर्शन भरवून गेलेत. वर्षभर गॅलरीत नवेनवे कलाकार प्रदर्शन करत असतत. बर्‍यापैकी कमवतातही. जहांगीरच्या वेबसाईटवर चेक करा बघू. जहांगीर गॅलरीसमोर प्रदर्शन लावून बसलेल्यांची संख्या आत प्रदर्शन लावणार्‍यांच्या ०.०००१ टक्केसुद्धा नाहीये. अंगभूत कलेचा उपयोग करुन करोडो लोक जगात बर्‍यापैकी पैसा कमवत आहेत. सो नशिब ही एक सब्जेक्टीव टर्म आहे. आता बील गेट्स एखादाच होतो म्हणून बाकीचे आयटी इंजिनीअर मायक्रोसॉफ्टसमोर भिका मागत फिरतात असे म्हणता येईल का?

म्हणून मी माझ्या भाच्याला -------
>> तुमच्या अख्ख्या प्रतिसादात ही सात वर्ष टर्म आवडली. फक्त पुढची ७० वर्षे आरामात जगशील असला खोटा सल्ला कोणा बालकाला देऊ नका. आयुष्यभर मरमर काम करावेच लागते, कोणालाच सुटत नाही. काळ असा बदलतोय की दहा वर्षा आधी मरमर करुन शिकलेले आता रिलिवंट नसल्याने परत परत नवनवीन शिकतच राहावे लागते.

माझे मत आहे की आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुम्ही स्वतःला एक प्रॉडक्ट म्हणून समजले पाहिजे, एक एम्प्लॉई म्हणून नाही. आणि स्वतःचे मार्केटिंग व्यवस्थित केले पाहिजे आणि डोळे उघडे ठेऊन अजून कुठल्या नवीन संधी येत आहेत, ते बघितले पाहिजे. आपण स्वतः यशस्वी होत नसतो, तर इतर लोक आपल्याला यशस्वी करतात.
>> याचा प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीत असलेल्या बालकाला कसा धडा द्यायचा? कारण हा धागा शालेय शिक्षणावर आधारित आहे.

मग सोपा मार्ग का घेऊ नये?
>> कोणता सोपा मार्ग?

शेवटी काय, आयुष्यात आपले समाधान कशात आहे ते प्रत्येकाला स्वतःलाच शोधावे लागते. पण खिशात भरपूर पैसा असेल, तर ते काम अधिक सोपे होते. Money can buy you happiness, but happiness cannot buy you money.
>> फुल्ल ऑफ ट्रॅक झाले आहे... त्यामुळे असोच.

धन्यवाद. आपण माझ्या धाग्यावर प्रतिसाद देऊन संवादाची संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल अनेक आभार. Happy

>>> मूळ लेख कशासाठी का लिहिलाय हे कदाचित आपल्या लक्षात आले नसावे. <<<
हे बरोबर आहे, म्हणूनच मी आधी विचारले होते की लेखाचे मुद्दे काय आहेत. त्यावर तुम्ही जसे लिहिले, त्याच मुद्द्यांना धरून मी उत्तर दिले आहे.

>>> इंग्रजी यायलाच नको, अजिबात चालणारच नाही अशी कोणीही भूमिका घेतलेली नाहीये. <<<
धन्यवाद. याच्यावर एकमत आहे.

>>> भारतीय माणसाला किमान तीन भाषा उत्तम यायलाच हव्या एक म्हणजे मातृभाषा, इंग्रजी आणि आणखी एक भारतीय भाषा. <<<
याच्याबाबत सहमत नाही, पण काहीच हरकत नाही कुणाला ३ च का? ३० भाषा शिकायच्या असल्या तरी.

>>> इंग्रजीची सक्ती प्राथमिक शिक्षणात नको ही प्रथम अपेक्षा आहे. <<<
इंग्रजी शाळेत जा, मराठी शाळेत जा, हिंदी माध्यमात जा (माझ्या शेजारची मुले जात असत, आताचे माहीत नाही) किंवा मदरशात जा. सक्ती कुणी केली आहे?

>>> अनेक लोक हा अहवाल न वाचताच चर्चेला येतात आणि अतिशय वरवरची बाष्कळ चर्चा होते. मातृभाषेतून-परिसरभाषेतून प्राथमिक शिक्षणाची गरज यावर अभ्यासातून लिहिलेला अहवाल आहे. <<<
अच्छा, युनेस्कोचा अहवाल वाचून म्हणताय का की मातृभाषेतून शिक्षणाची गरज आहे? हा तुमचा मूळ मुद्दा आहे का? परिसरभाषेतून शिकायला काहीच हरकत नाही, हे मी मागील प्रतिसादात म्हटलेच आहे. जिथे सोईस्कर आहे, तिथे जा.

>>> इंटरनेट हा प्रत्येक बाबतीत रामबाण नसतो. <<<
शाळाच नको असे मी कुठे म्हटले आहे? इंटरनेट हे पूरक आहे. भारतात होमस्कूलिंग आहे का? माहीत नाही, पण थेट १०-१२ वी परिक्षा देता येत असे पूर्वी. तो पण ऑप्शन आहे.

>>> इण्टरनेट इंजिनीअर ने बनवलेल्या घरात तुम्ही राहण्याची हिम्मत कराल? <<<
होय. मी स्वतःच्या हाताने घर बांधले नसले तरी पण इंटरनेट बघून घरात भरपूर दुरुस्ती करतो, गाडी दुरुस्त करून त्याच गाडीने फिरलो आहे. स्वतः शिकून स्वतःचे घर बांधल्याची खूप उदाहरणे तुम्हाला सापडतील.
एक उदा: https://www.youtube.com/watch?v=hLNxiU_J5js

>>> अभियांत्रिकी झालीये म्हणून हमखास नोकर्‍या मिळत नाहीयेत <<<
मान्य आहे. पण याला शिक्षणाचे माध्यम जबाबदार कसे? तुमचा मुद्दा काय आहे?
My second recommendation, which is to get o­n the right train; that is, moving in the right direction. There's no course in business school called "Getting o­n the Right Train", but it's really important. You can be an average passenger but if you get o­n the right train, it will carry you a long way. You want to learn from experience, but you want to learn from other people's experience when you can. Managing your career is like investing - the degree of difficulty does not count. So you can save yourself money and pain by getting on the right train." - Warren Buffett

>>> चांगले कॉलेज का हवे तर त्याने तुम्हाला एक चांगला ब्रॅंड मिळतो, ज्यामुळे तुम्ही आयुष्याची सुरुवात थोड्या वरच्या पातळीवरून करू शकता. <<<
हे माझे वैयक्तिक मत आहे. तुमचे मत जुळावेच हा आग्रह नाही.

>>> अंगभूत कलेचा उपयोग करुन करोडो लोक जगात बर्‍यापैकी पैसा कमवत आहेत. सो नशिब ही एक सब्जेक्टीव टर्म आहे. <<<
It is rather surprising that many people do not appreciate importance of luck in life. पण असो, तो वेगळा विषय आहे

>>> याचा प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीत असलेल्या बालकाला कसा धडा द्यायचा? कारण हा धागा शालेय शिक्षणावर आधारित आहे. <<<
हा मूळ मुद्दा आहे तर. ओके, ज्याला जिथे आवडेल, परवडेल, सोईस्कर वाटेल त्या शाळेत जावे. मराठी किंवा इंग्रजी किंवा हिंदी माध्यमात जावे, कुणी अडवले आहे? मला इतकेच म्हणायचे आहे की इंग्रजी माध्यमात शिकल्याने फारसा तोटा नाही, जर झाला तर फायदाच आहे.

पुन्हा एकदा सांगतो, मुळात तुमचा मुद्दा काय आहे? तेच अजूनही कळले नाही.

१. इंग्रजी माध्यमात शिकण्याचे काय तोटे आहेत?
२. मराठी माध्यमात शिकण्याचे काय फायदे आहेत? (युनेस्को अहवालाबद्दल तुम्ही सांगितलेच आहे. त्याव्यतिरिक्त काही?)

युनेस्कोच्या अहवालात काय सांगितले याचे एक दहा-पंधरा ओळीत सारांश लिहित असाल तर तुमच्या दोन्ही प्रश्नांची नक्की उत्तरे देतो.

Pages