"तो, ती, अन् .....लाल रंग."

Submitted by बग्स बनी on 13 March, 2017 - 17:23

आज मुळी इच्छाच न्हवती त्याची, म्हणूनच जरा उशिरा उठला. खिडकीतून डोकावून पाहिलं, रंगांची उधळण, दंगा, मस्ती. उगाचच रेंगाळत, तो बराच वेळ बसल्याजागी डोळे बंद करून विचार करत होता. आयुष्यात खूपच कालवाकालव, उलटापालट झाली होती. जगणं निरस, बेचव वाटत होतं. इतक्यात दारावर मित्रांची टोळकी जमा झाली. दार वाजवलं गेलं. सगळे मित्र हाका मारू लागले. उगाचच दिसावं म्हणून त्यानं खोटं खोटं हसु आणून चेहऱ्यावरचा भाव बदलला. अन दरवाजा उघडला. मित्रांनी ओढूनच घराबाहेर काढलं. प्रथेप्रमाणे रंगानं पार बरबटवुन काढलं. आता खरा तो त्यांच्यात मिसळल्यागत दिसत होता. चेहऱ्यावर जरी तो आनंदी दिसत असला तरी आतून फार एकटा, आणि खचला होता. एकमेकांची विचारपूस झाली. रंगपंचमीच्या शुभेच्छा देऊन एकमेकांच्या गळ्यात पडले. चल...म्हणत त्याला आपल्यासोबत नेण्यासाठी विनवणी केली. तो नाही म्हणाला. त्यांनी अजून थोडा जोर दिला. तरीही तो नाही म्हणाला. बराचवेळ हे सत्र चालू होतं. थोड्यावेळाने कंटाळून काही मित्र वाटेला लागले, काही त्याला अजून मनवत होते. का नाही येत..? चल ना मज्जा करू. बऱ्याचजणांनी म्हटले. तो अजूनही ठाम होता. त्यातला एक जिगरी बाकीच्यांना म्हणाला तुम्ही व्हा पुढं मी घेऊन येतो ह्याला. अन बाकीचे निरोप घेऊन पुढे निघाले. का नाही येत...चल ना...तेवढाच चेंज...जिगरी नं विचारलं. डोळ्यातल्या ओल्या कडा लपवत म्हणाला..”इच्छाच नाही...”. जिगरीनं ओळखलं होतं, मी एक सांगितलं तर येशील...?.!!! जिगरी म्हणाला. काय..? त्यानं उत्सुकतेन विचारलं. म्हणजे बघ मी सांगतो, तुला वाटल तर ये, नाहीतर मी जातो.... “काय, सांग तरी.” जरास वैतागुनच त्यान विचारलं. सगळे मित्र मंडळी गेटच्या बाहेर त्यांची वाट बघत होते. जिगरी शांतपणे, हळुवार म्हणाला...”ती आलीय...”...कालच....!!!...आता तिथंच चाललोय, तिच्या एरियात. त्याचे डोळे मोठे झाले होते, डोळ्यात एक वेगळीच चमक होती. खर्या अर्थाने त्याचा चेहरा खुलला होता. “थांब आलोच...” चपळाईने तो आवरून चप्पल पायात अडकवून निघाला. जिगरी हि खुश झाला. इतर मंडळीहि. अजून दोघा दोस्तांना रंग लावून, एकाच्या घरी मस्त जेवणाचा बेत होता सगळ्यांचा.

ते सगळे रस्त्यावरून चालले होते. तो अख्ख्या रस्त्यात अधाश्या सारखा तिला शोधत होता. तो अन जिगरी जरा सगळ्यांच्या मागेच चालत होते. खरं तर तिच्यासाठीच तो आला होता. पण तिचा काहीच थांगपत्ता लागत न्हवता. मित्रमंडळी बरीच लांब गेली होती. तो अन जिगरी न काही बोलता रस्त्यानं निघाले होते. त्याच्या मनात बराच कल्लोळ माजला होता. त्याला चालावसच न्हवत वाटत. पण नाईलाजाने त्याला पावलं टाकावी लागत होती. जड पावलांनी, मान खाली घालून चालत होता. जिगरी मध्ये मध्ये त्याला विचारत होता. पण त्याचं त्याकडे काहीच लक्ष न्हवतं. कासवगतीने ते चालत होते. रस्त्याच्या वळणावर गेल्यावर जिगरीनं त्याला कोपरानं ढोसलल...त्याला ते दुखलं, त्यानं रागानंच त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला. जिगरीन भुवया उंचावुन समोर बघण्याचा इशारा केला. त्यानं हळूच समोर मान वळवली......

.........समोरून ती येत होती. त्याच अवसान पार गळाल. पण कसबसं सावरून तो तिच्याकडं बघत होता. त्याचा उर भरून आला होता. डोळे पाण्यानं डबडबले होते. आवंढा गिळत तो पुढे चालत होता. बरीच हिम्मत करून. ती सुद्धा त्याच्याकडं बघत होती. आता दोघे जवळ आले होते. दोघे एकमेकांच्या नजरेला नजर भिडवत समोर आले होते. तिचे हि डोळे भरले होते. दोघांना कसलंच भान न्हवत, एकमेकांच्या नजरेत नजर घालून ते बराच वेळ तसेच उभे होते. जिगरीन मध्यस्थी करून तिला रंग लावला. तसे ते भानावर आले. मग उगाचच हसून तिनं जीगरीलाही रंग लावला. धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या. तो अजून तसाच तिच्याकडं बघत होता. ती आता त्याच्याकडं बघत होती. त्याला रंग लावायला तिनं हाथ पुढे केले. तसे त्याने तिचे हाथ घट्ट पकडले. तीनं थोडाफार प्रतिकार केला. पण थोड्याच वेळात तीही शांत झाली. तिनं आधी त्याच्याकडं पाहिलं. तो अजून तसाच तिच्याकड पाहत होता. नजरेत त्याच्या बरेच प्रश्न होते. तिची नजर चोरून थोडीशी खाली झुकली, थोडीशी लाजेनं, थोडीशी गिल्टनं. इतक्यात एक आश्रुंचा थेंब तिच्या डोळ्यांतून ओघळला. अन त्याच्या पायाच्या अंगठ्यावर पडला. पुढच्या अश्रूंनी तिच्या गालाचा ताबा घेतला होता. तिनं पाणावलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडं पाहिलं. त्याचेही डोळे लाल, ओले झाले होते. बाहेर जरी दाखवत नसला तरी आतून तो खूप रडत होता. हाथ अजून तसेच हाथात होते. तिनं पुन्हा एकदा सोडवण्याचा प्रयत्न केला. खरं तर तिलादेखील हाथ सोडवून घ्यायचा न्हवता. जिगरी तिथंच उभा राहून कधी मोबाईल कधी त्यांना पाहत होता. दोघांची अवस्था फार बिकट झाली होती. दोघांच्या तोंडून एकही शब्द निघत न्हवते, पण नजर मात्र खूप काही बोलत होती. ते दोघंही एकमेकांच्या नजरेत ओक्साबोक्शी रडत होते. बराच वेळानं त्याची पकड सुटली होती. त्यानं तिचा हाथ सोडला. भारावलेल्या मनानं त्यानं खिशातून रंगाची पुडी काढली, खास तिच्यासाठी बाजूला काढलेली. त्यातला मोकळा, सुखा रंग त्यानं त्याच्या हातावर काढला. अन रंग लावायला तो पुढं सरसावला. त्यानं हाथ उंचावुन तिच्या चेहऱ्याजवळ नेले. थोडा क्षण थांबून त्यानं दोन बोटं रंगात बुडवून अलगद तिच्या गालावरून फिरवले. त्याच्या स्पर्शानं ती अंग-अंग मोहरून गेली. डोळे आणखीनच वाहू लागले. दोन्ही गालावर रंग लावून झाल्यावर, हथातला उरलेला रंग त्यान तिच्या कपाळावर लावला. रंग कपाळावर कमी पण तिच्या भांगात जास्त भरला. आता तिचा बांध सुटला होता. दोघांच्याही डोळ्यांतून आश्रुंचे पाट वाहत होते. दोघेही बोलण्याच्या स्थितीत न्हवते.......

.............भांगात रंग भरल्यावर त्यांना दोन वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला. दोघेही त्या आठवणीत पार बुडाले......दोन वर्षांपूर्वीही धुळवडीच्या दिवशीच ते असेच एकमेकांना सामोरे आले होते. नेहमी ते एकमेकांना बघायचे, कधी कधी बोलायचे. तो रोज तिची वाट बघायचा, कधी कधी ती हि. तिच्या एरियातून जाताना बऱ्याचदा तो तिच्या खिडकीत तिची वाट बघायचा. तिची एकच झलक डोळ्यात साठवायला. तिचा पाठलाग करायचा. सतत तिचा विचार. वेडा झाला होता पार, तिचीही अवस्था काही वेगळी न्हवती. अबोल प्रेम होत त्यांच्यात, फक्त व्यक्त करायचं बाकी होतं. पण कसं करणार..? तो लाजाळू...ती बुजरी. त्यात हि त्याने ठरवलं, धुळवडी दिवशी तिला रंग लावायचा अन विचारायचं. त्या दिवशीही त्यान तिला तिथच गाठलं होतं, जिथ ते सध्या उभे होते. त्याचप्रकारे रंग तिच्या भांगात त्यादिवशी हि भरला होता. आजही त्याचीच पुनरावृत्ती झाली होती. बरीच हिम्मत करून त्यान तिला विचारलं. तेव्हा हि जीगरीच त्याच्या सोबत होता. त्याचं आयुष्य हळू हळू फुलत होतं. ती त्याच्या आयुष्यात आली होती. तिचाहि होकार होता. पुढे ते खूप जवळ आले, बरेचशे अनमोल क्षण त्यांनी एकमेकांसोबत घालवले. बऱ्याच आठवणी तयार केल्या. सगळं अगदी स्वप्नवत चालू होतं. हेवे-दावे, रुसवे-फुगवे, मज्जा-मस्ती....सगळं अगदी सुरळीत चालू होतं. ते एकमेकांना ओळखू लागले होते. रोजचं भेटन, बोलणं. बरेचशे प्राॅमिसेस. तो नेहमी म्हणायचा, काहीही झालं तरी रंगपंचमीला पहिला रंग मीच लावणार, ती लाजून म्हणायची, का...? मग तो एक असाच ऐकलेला डायलॉग म्हणायचा “शेवटी रंग काय नि जीव काय, लावायचा तो तुलाच....” तिला फार गोड वाटायचं.

......पण म्हणतात ना, मिठात खडा पडावा, तसं त्यांच्या जोडीला नजर लागली होती. त्याचं ते प्रकरण तिच्या घरी कळाल होतं. तिच्या घरच्यांचा याला एकदम कडक विरोध होता. तरी हि तो वेडा तिच्यावर प्रेम करायचा अगदी जीवापाड. आणि ती हि. ती नेहमी त्याला म्हणायची, मी कधीच तुला सोडून नाही जाणार. पण नियती समोर काय टिकतं का..? त्याचं भेटणं बंद होऊ लागलं. कालांतराने बोलणं. तो पार तडफडला, कोलमडला. एक एक क्षण एकेक वर्षासारखा वाटू लागला. मासाही इतका तडफडला नसेल इतका तो तडफडला. तिलाही तिच्या घरच्यांसमोर झुकाव लागलं. ती हि त्याला टाळू लागली होती. हे त्याच्या साठी सगळं अनपेक्षित होत. एक दिवस तीनच पुढाकार घेऊन म्हटल. मला वाटतं आपण इथेच थांबावं. घरच्यांच्या विरोधात मला नाही जायचं, नशिबात असेल तर आपण पुन्हा एकत्र येऊ.....राहिला प्रश्न प्रेमाचा मी काल पण तितकंच प्रेम करत होते, आज पण करते, आणि उद्याही करत राहीन....प्लीज मला समजून घे...एक वर्षा नंतर हा दिवस येईल अस त्याला स्वप्नात पण न्हवत वाटलं. तो काहीच नाही बोलला...ठीक आहे, म्हणत दिवस ढकलू लागला. आकस्मित एका जवळच्या व्यक्तीने अर्ध्या वाटेवर सोडून जाव...त्याच्यासाठी खूप धक्कादायक होतं. जगण्याचं मूळच संपलं होतं. दोघांच्या कोमल प्रेमाला विरहाच ग्रहण लागलं होतं. काहीएक महिन्यांनी तिला तिच्या मामाकडे गावी पाठविण्यात आलं. आज ती एक वर्षांनी त्याच्यासमोर आली होती.......

.......दोघेही आठवणीतून बाहेर आले. त्याचे अश्रू त्याच्या रंगलेल्या गालांवरून वाट काढत हनुवटी वरून ओघळले होते. रंगलेल्या गालांवर अश्रूंच्या वाटेची खून स्पष्ट दिसत होती. दोघेही एकमेकांकडे अजून बघत होते. जणू नजरेतूनच बोलत होते. त्याने तिला गच्च आपल्या मिठीत सामावून घेतलं. ती त्याच्या मिठीत पडून हुंदके देऊन रडू लागली. थोड्यावेळाने दोघे हि वेगळे झाले. तिने हि त्याला अलगद रंग लावला. इच्छा नसताना जड पावलांनी ते निघू लागले. इतका वेळ थोपवून धरलेला त्याचा बांध आता फुटला होता. तो जीगरीच्या गळ्यात पडून आक्रोशानं रडू लागला...जिगरी त्यला धीर देत होता...ती हि मान खाली घालून डोळे पुसत निघून गेली. दोघांनी मागे वळून पाहिलं. एकमेकांना नजरेत साठवण्यासाठी.........एकमेकांना आठवण्याखेरीज त्यांच्याकडे काहीच उरलं न्हवतं. त्यांच्या कोवळ्या, निरागस प्रेमाला समाजाची कुंपणे पडली होती.....उरल्या होत्या त्या फक्त आठवणी....उरला होता तो फक्त, त्याच्या हाताला लागलेला, आणि तिच्या भांगेत उरलेला त्याच्या नावाचा भडक “लाल रंग...........

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उरला होता तो फक्त, त्याच्या हाताला लागलेला, आणि तिच्या भांगेत उरलेला त्याच्या नावाचा भडक “लाल रंग"...!

मस्तच.....आवडली Happy

व्वाव!
किती छान रन्गवलाय प्रसंग... अगदी डोळ्यासमोर सगळं उभं राहिलंय...
खूप सुन्दर! Happy

पहिले दोन पॅरा मस्तं. शेवटचाही छान. मध्य मात्र संजय लीला भन्साळी टाईप स्टोरी वाटली Happy

छान.