मनसोक्त (कथा)

Submitted by चैतन्य रासकर on 7 March, 2017 - 15:40

"घरी पोहचल्यावर मेसेज कर" रेवती ताई मला म्हणाली.

मी हसून होकारार्थी मान डोलावली.

मुलांना कधी असा मेसेज करावा लागतो? का आम्ही मुलीच फक्त घरी पोहचल्यावर एकमेकींना मेसेज करतो? शेवटी आम्हा मुलींनाच एकमेकींची काळजी......

"आणि हो उद्या लवकर ये" रेवती परत म्हणाली.
मी कसे सांगू? मला उद्या इथे नाही यायचे, मला या कामाचा कंटाळा आलाय, मला काहीतरी वेगळ करायचय, हे रेवती ताईला काही सांगता आले नाही.

मी तिचा निरोप घेऊन घरी निघाले, रात्रीचे नऊ-साडे नऊ वाजले होते, रस्तावर गर्दी कमी होती, मला खूप भूक लागली होती, घरात काही खायला नव्हते, एक रेस्टॉरंट उघडे दिसले, मी लगेच तिकडे गाडी वळवली.

मी पटकन हक्का नूडल्सची ऑर्डर दिली, एक मुलगी, एकटी, एवढ्या रात्री, अशी आरामात रेस्टॉरंट मध्ये येऊन जेवण करतेय? याचे खूप आश्चर्य माझ्यासमोर बसलेल्या जोडप्याला वाटले, ते साहजिकच त्यांच्या चेहऱ्यावर दिसलं.

अजून एक कुटुंब, माझ्या समोरच्या टेबलावर बसले होत. आई, वडील आणि लहान पाच-सहा वर्षांची मुलगी, आनंदी होते, मस्त होते, मुलगी जाम हट्टी होती, बाबांनी त्या छोट्या मुलीला विचारले,

"ए सांग ना, मोठे होऊन तू काय होणार?"
आयस्क्रीम खात ती मुलगी म्हणाली, "मी मोठी..मी मोठी..झाल्यावर...बारीक होणार"

आई, बाबा दोघेही मोठ्याने हसले, आपल्या मुलीने फार मोठा विनोद केला असे त्यांना वाटले, हा कुठला विनोद? यात का हसायचं? पाच वर्षाच्या मुलीला असे का वाटत असावे की ती जाड आहे? जाड आणि बारीक यामध्ये का सौन्दर्य अडकलेलं आहे?
मला काहीतरी बोलायचं होत, त्या जोडप्याला सांगायचं होतं, पण उत्तर माहित असून ही एखादा विद्यार्थी हात वर करत नाही, माझं तसंच काहीस झालं होतं.

मी घरी आले, कंटाळा आला होता, शरीर दुखत होते तरी झोप येत नव्हती, मी तशीच बिछान्यावर पडले, टीव्ही लावला, कोणी जादूगार जादूचे प्रयोग करत होता, त्याने एका मागून एक सरस प्रयोग केले आणि मग तो नेहमीचा प्रयोग केला, त्यामध्ये एका मुलीला एका आडव्या, दंडगोल पेटीत बंद करण्यात आले, एका बाजूला तिचे डोके आणि दुसऱ्या बाजूला घोट्यापासूनचा पाय दिसत होता. जादूगाराने एक तलवार काढली आणि त्या पेटीतून मधोमध तलवार फिरवली, त्या मुलीला अगदी कापल्यासारखे भासवले, मुलगी खोटीच किंचाळली, पेटीचे दोन तुकडे झाले, डोके एका बाजूला, पाय एका बाजूला.

एका मुलीचे दोन तुकडे झाले आणि त्याला टाळ्यांचा कडकडाट झाला.

जादूगाराने परत पेटी जोडली, त्यातून मुलगी सुखरूप बाहेर आली, छानशी हसली, टाळ्यांचा आवाज अजूनच वाढला.

सगळ्या प्रेक्षकांच्या मनात कुठेतरी होते की, तलवार फिरवली गेली तरी त्या मुलीला काही होणार नाही, ती सुरक्षितच राहणार, मग हसतच बाहेर येणार.

प्रेक्षकांना हा हिंसाचार खूपच आवडला होता.

मला अजूनही झोप येत नव्हती, मला कोणाशी तरी बोलायचे होते, मी फोन घेतला, कोणाशी बोलू?
फोन मध्ये सतराशे साठ कॉन्टॅक्टस, तेवढयात मला आजोबांचा नंबर दिसला. आजोबा म्हणजे रेवती ताईचे वडील, आजोबा जाऊन बरीच वर्षे झाली होती, मी आजोबांचा नंबर अजूनही माझ्या मोबाईलमध्ये ठेवला होता, त्यांची आठवण म्हणून, माझे आजोबांनी खूप लाड केले, आजोबा नेहमी आमच्या बरोबर खेळायचे, आम्हाला बाहेर घेऊन जायचे.

आपण मुलींना घरीच "सांभाळून रहा" असे सांगतो आणि त्याचवेळी मुलांना "बाहेर खेळायला जा" असे का बरे म्हणतो?

मी चॅनेल बदलले, टुकार हिंदी मुव्ही सुरु होता, हिरोच्या मारामारीचं कौशल्य बघून, हिरॉईन त्याच्या प्रेमात पडते. वाह! का? बऱ्याच वेळा असं वाटत की, हिरोला मारा-मारी शिवाय काही येतच नाही आणि खरंच त्या हिरॉईनला हिंसाचार आवडतो?

माझी चिडचिड झाली होती, कामाचा राग अजून ही डोक्यात होता, झोप येत नव्हती, मी घरातून बाहेर पडले, बेरात्री एक मुलगी घराबाहेर पडते, मग कोणीतरी तिचा पाठलाग करत, सस्पेन्स, ड्रामा, अशा कथांचा शेवट जवळपास सारखाच असतो, ते म्हणजे मुलीचा खून होतो, असे का नाही घडत की ती मुलगीच जो पाठलाग करतोय त्याला मारते, अगदी त्याचा खून करते? असा प्लॉट ट्विस्ट का नसतो? नेहमी मुलीवर अन्याय होऊन ती का मरते?

एवढ्या रात्री एक मुलगी, एकटीच रस्तावरून जात आहे, याच फार आश्चर्य खूप लोंकाना वाटलं असत, सरळ कोणीतरी येऊन, "मॅडम, एवढ्या रात्री कुठे?" असं सहज विचारलं असतं, कोणीतरी येऊन, माझ्या ड्रेसला नाव ठेवली असती, प्रत्येकाला मुलीच्या पेहरावाबद्दल मत व्यक्त करायचं असतं, का? काय गरज आहे?

"कपडे काय घातले होते?" हा मुळात प्रश्नच नाहीये, ती एक घोषणा आहे, तुम्हीच अपराधी असलेल्याची!

आणि कधीतरी एखाद्या माणसाने दयाळूपणा दाखवलाच तर, हा माणूस आपल्याला फूस लावतोय असंच नेहमी वाटतं. मग दोष कोणाला द्यायचा? मला का त्या माणसाला?

खूप थंडी होती, भराभरा निघाले, वाटेत बाजूला आठ-दहा वर्षाची मुलगी उभी होती, माझ्याकडे एकटक बघत, मी जशी जवळ आले, तशी ती मला धावत येऊन बिलगली. मी तिथेच थांबले, तिच्या डोक्यावरून हात फिरवला, तिचे कपडे फाटले होते, केस पिंजारले होते, हिच्या बरोबर कोणी का नाहीये? मी आसपास बघितले, रस्ता सुन्न होता, मी इकडे तिकडे बघितले, तिच्याशी मी बोलण्याचा प्रयत्न केला, पण माझे बोलणे तिला कळत नव्हते, ती डोळे पुसत होती, रडत होती. मी तिला घेऊन जवळपास शोधले, पण तिला शोधत कोणी आले नाही, शेवटी मी मोबाईल मध्ये "तुझे नाव काय?" असे लिहून तिला मोबाईल दाखवला, तिला ते कळले नाही. मी मोबाईल मध्ये इंग्लिश, हिंदी, मराठी टाईप करून तिला दाखवले, तिला ते काही वाचता आले नाही. ती बिचारी मुकी होती.

आम्ही दोघी तशाच फुटपाथवर बसलो, ती माझ्या मांडीवर झोपून गेली, मी वाट बघत राहिले, कोणीतरी तिला शोधत इथे येईल पण कोणी आलेच नाही.

पहाट झाली, मी तिला घरी आणले, ती अजून झोपलीच होती, घरी आल्यावर मी लगेच झोपले, जेव्हा जाग आली तेव्हा ती मुलगी माझ्या बिछान्यापाशी, माझ्याकडे बघत उभी होती. मी परत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तिला काही उत्तर देता आले नाही, मी पटकन उठले, घरात थोडे दूध शिल्लक होते, मी तिला दूध प्यायला दिले, तिने पटकन ते संपवले. तिला फार भूक लागली होती, मी तिच्यासाठी पटकन मॅग्गी बनवली, तिने आवडीने खाल्ली.

या प्रकाराबद्दल, मी रेवती ताईला मेसेज करून सांगितले. मी चिमुरडीला घेऊन, "मनसोक्त" च्या कार्यालयात आले. "मनसोक्त" महिल्यांच्या हक्कासाठी सुरु केलेले हक्काचे एक व्यासपीठ होते. मी या संस्थेसाठी लहानपणापासून काम केले होते. मी रेवती ताईला सगळा प्रकार सांगितला, आपण पोलिसांची मदत घेऊ असे तिने सुचवले, वर्तमानपत्रात फोटो सहित जाहिरात देऊ असे ठरवले.

मी छोट्या मुलीला काही बिस्किटे दिली, माझ्याकडे बोट करून रेवती ताई त्या चिमुरडीला म्हणाल्या,

"तुझ्या बरोबर ही जी ताई आहे ना, ती मला अशीच तुझ्यासारखी भेटली होती, मला भेटली तेव्हा तुझ्या एवढीच होती, आता बघ किती मोठी झाली आहे"

रेवती ताई जे काही म्हणाल्या ते तिला कदाचित कळले नसावे, पण हातातले बिस्कीट खात, ती परत मला बिलगली.

रेवती ताईला मी अशीच रस्त्यात भेटले होते, एकटीच होते, सात-आठ वर्षाची असेल, घरापासून दूर होते, मला कधी माझे आई वडील आठवले नाहीत, मी कशी हरवले गेले हे ही मला आठवत नसे. ताईने मला मुलीसारखे वाढवले आणि त्यानंतर तिने "मनसोक्त" ची सुरवात केली, जेणेकरून माझ्यासारख्या लहानपणीच बेघर झालेल्या मुलींना एक घर मिळेल, "मनसोक्त"चा व्याप वाढला आणि सगळा कारभार रेवती ताईने मला दिला. अता "मनसोक्त" फक्त लहान मुलींसाठी राहिले नव्हते, तर प्रत्येक स्त्रीच्या हक्कासाठी लढणार एक मोठे कुटुंब बनले होते. प्रत्येक स्त्रीच्या प्रश्नासाठी एक हक्काचं, सोयीचं व्यासपीठ!

रेवती ताई मला नेहमी म्हणायच्या, "तू भेटली नसतीस तर 'मनसोक्त' कधी सुरु झाल नसतं"

मला गेले काही दिवस कामाचा कंटाळा आला होता, तोच तोच पणा जाणवत होता, आपण जे काम करतोय त्याने काही फरक पडतोय का? महिलांचे प्रश्न खरंच दूर होतं आहेत का? त्यांना उत्तर मिळत आहेत का? असं वाटतं होतं, असे सारखे वाटत असे. त्यामुळे मी कार्यालयात जाणे टाळत असे.

पण ही चिमुरडी मला भेटली आणि मी मला नव्याने भेटले, मला उमगले की आपले काम खूप मोठे आहे, त्यात कधीतरी थोडा कंटाळा येणारच, एकटं, एकाकी वाटणार. आता फक्त त्याच्याकडे दुर्लक्ष करायच.

चिमुरडीला संस्थेच्या हॉस्टेलमध्ये ठेवले आणि मी परत घरी आले, माझ्या वरचा ताण बराच कमी झाला होता, मी आज मनसोक्त झोपले.

-चैतन्य रासकर
https://www.facebook.com/chaitanya.raskar.5

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@स्नेहनिल, @ओबामा @साधना @अदिति @चैत्रगंधा @मित @राधिका @जाई. @महेन्द्र ढवाण @कावेरि @मॅगी @Abdul Hamid @सस्मित @अनघा.@-विकी- @नानबा @Mo @सुलक्षणा @सुमुक्ता

धन्यवाद Happy असा प्रतिसाद मिळेल अशी इच्छा तर होती, पण अपेक्षा केली नव्हती. तुमच्या प्रतिक्रियांमुळे लिहिण्याचे बळ मिळते आणि मनावरील मरगळ दूर होते.

@सीमा
हो, "संभ्रम-ध्वनी" नावाची कथा आहे, तुम्ही नियमित कथा वाचत आहात, त्यामुळे नियमित लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. Happy

  1. आपण मुलींना घरीच "सांभाळून रहा" असे सांगतो आणि त्याचवेळी मुलांना "बाहेर खेळायला जा" असे का बरे म्हणतो?
  2. "कपडे काय घातले होते?" हा मुळात प्रश्नच नाहीये, ती एक घोषणा आहे, तुम्हीच अपराधी असलेल्याची!

या गोष्टीतली बरीच अशी वाक्य मनाला भिडतात, सुन्न करतात, तुम्ही असच लिहीत राहा.

"कपडे काय घातले होते?" हा मुळात प्रश्नच नाहीये, ती एक घोषणा आहे, तुम्हीच अपराधी असलेल्याची!>> मलासुद्धा हे वाक्य फार आवडलं..
पुलेशु..

@टकमक टोक

तुम्ही एवढ्या मनापासून वाचत आहात, हे बघून आनंद झाला. तुम्ही सुद्धा असेच वाचत राहा Happy

@mr.pandit @पियू

धन्यवाद Happy

@टीना

हे वाक्य बऱ्याच दिवसापासून मनात घुमत होतं, तुम्ही त्याची पाठराखण केलीत त्यासाठी धन्यवाद Happy

Pages