सरतेशेवटी (भाग एक)

Submitted by चैतन्य रासकर on 21 December, 2016 - 09:43

"याने परत शेवट बदलला" डॉक्टर रिक्तम म्हणाले.

"तुम्ही जो शेवट सांगितला होता तोच लिहिला आहे" संजय घाबरत म्हणाला.

"मी म्हटलो होतो की.." डॉक्टर रिक्तम काही म्हणणार तेवढयात, संपादकाने विचारले "एक मिनिट..काय स्टोरी आहे?"

थोडा वेळ कोणी काहीच बोलले नाही, डॉक्टर रिक्तम, संजयकडे रागाने बघत होते, संजय डॉक्टरांची नजर चुकवत होता, तिघेजण डॉक्टर रिक्तमांच्या घरातल्या, दिवाणखान्यात बसले होते, डॉक्टर सोफ्यावर, त्यांच्या समोर संजय आणि संपादक बसले होते, संध्याकाळची वेळ होती.

संजय संपादकाकडे बघत कथा सांगू लागला.
"गिरीश नावाचा होतकरू तरुण, त्याला आयुष्याचा कंटाळा आला आहे, त्यामुळे तो जीव द्यायला, आय मिन आत्महत्या करायला समुद्र किनारी जातो..."

"आणि तू काय लिहिल आहेस?" डॉक्टर संजयकडे बघत गर्जले.

"तुम्ही जे म्हणालात तेच लिहिल आहे" संजय घाबरत म्हणाला.

डॉक्टर रिक्तम प्रसिद्ध लेखक होते, बरीच वर्षे त्यांनी कथा, कादंबरी, नाटक, काही चित्रपटांसाठी लेखन केले होत, त्यांचा चाहता वर्ग मोठा होता. "अगम्य" नावाच्या मासिकासाठी ते नेहमी कथा लिहित असत, पण वयोमानामुळे, त्यांचे हात थरथरत असत, हातात लेखणी पकडणे अवघड जात असे, त्यांना टाइप करणे जमत नसे, त्यामुळे ते त्यांच्या पुतण्याला म्हणजे संजयला बोलावून घेत असत, डॉक्टर रिक्तम सांगत असत, संजय लिहून घेत असे, नंतर कथा टाइप करून "अगम्य" च्या संपादकाकडे पाठवत असे.

वाचकांची तक्रार होती की, गेल्या तीन-चार कथा, म्हणाव्या तश्या चांगल्या झाल्या नव्हत्या, हे डॉक्टर रिक्तमांच्या कानावर गेलं होत, त्यांनी त्यांच्या प्रकाशित झालेल्या कथा परत वाचल्या आणि ते हबकलेच! प्रकाशित झालेल्या कथेचा शेवट काहीतरी भलताच होता!

डॉक्टरांना असे वाटत होते की कथेचा शेवट कोणीतरी बदलत आहे, एक तर संपादक नाहीतर संजय, पण डॉक्टरांचा संशय संजयवर जास्त होता.

डॉक्टरांना मुल-बाळ नव्हते, पुतण्या असला तरी, संजय त्यांचा मानसपुत्र होता, संजय त्यांच्या बरोबर राहायचा, संजयवर लहानपणा पासून डॉक्टरांचा बराच प्रभाव होता, तो असे काही करेल याची शक्यता कमीच होती, पण शक्यता नाकारता येत नव्हती, संजय सुद्धा डॉक्टरांसारखा प्रसिद्ध लेखक होण्याचा प्रयत्न करत होता, त्याला यश मिळत नव्हते, त्यामुळे तो बराच वेळा निराश असायचा, त्याची निराशा त्याच्या चेहऱ्यावर दिसायची, अंगकाठी किडकिडीत होती, पाठीचा कणा झुकलेला, दाढी वाढलेली, केस पिंजारलेले, डोळे खोल गेलेले, गालफड बसलेली, त्याला खूप वेळ उभा राहणं शक्य नसायचे, इतका अशक्त होता, विशीतला असला तरी, तिशीतला वाटायचा.

कथा कशी लिहावी, वाक्यरचना कशी करावी, काय वाचावे, काय वाचू नये, अशा सर्व बारीक सारीक गोष्टी तो डॉक्टरांकडून शिकला होता.

पण गोम ही होती की, डॉक्टर रिक्तमांची स्मृती क्षीण झाली होती, त्यांच्या लक्षात राहत नसे, त्यांना काल भेटलेला व्यक्ती आज आठवत नसे, त्यामुळे डॉक्टर रिक्तमांनी कथेचा कुठला शेवट ठरवला आहे हे कळणे अवघड होते, एखादा शेवट ठरवून ते सहज विसरू शकत होते.

संजयच्या मते, डॉक्टर कथेचा शेवट स्वतः बदलत असत, पण नंतर विसरून जात असत.

डॉक्टरांना पत्नी वारल्यानंतर एकाकी वाटत होते, घरात बसल्यावर त्यांना जास्तच एकाकी वाटायचं, त्यामुळे ते मधून कधीतरी समुद्र किनारी फिरायला जात असत, डॉक्टर रिक्तामांचे घर समुद्र किनाऱ्यालगत होत. डॉक्टरांची पत्नी त्यांच्या लेखनात मदत करत असे, लेखनामध्ये बदल सुचवत असे, डॉक्टर रिक्तमांच्या यशामागे तिचा सहभाग सर्वात मोठा होता, त्यामुळे पत्नीचे निधन झाल्यावर, डॉक्टरांच्या लेखनाला उतरती कळा लागली, आता म्हणावे तसे त्यांना पहिल्या सारखे लिहिता येत नसे, याची खंत त्यांच्या मनात कुठतरी दबून बसली होती, "अगम्य" मासिकामधल्या शेवटच्या तीन-चार कथेला वाचकांनी बरीच नाव ठेवली, "रिक्तम नावाचे वादळ शांत झाले" अशा नावाचा लेख सुद्धा एका वर्तमानपत्रात छापून आला होता.

हे सगळे, या वयात डॉक्टरांना झेपण्यासारखे नव्हते, शरीर थकले होते, हात थरथर कापत होते, हातात पुस्तक पकडून वाचणे अवघड झाले होते, मेंदू नवीन स्मृती तयार करत नव्हता, अशातच अशी टीका त्यांना जिव्हारी लागत होती, त्यांना या सगळ्याचा राग यायचा आणि मग हा राग कधीतरी संजयवर फुटायचा.

आज डॉक्टर रिक्तम यांनी फोन करून "अगम्य" च्या संपादकाला बोलावून घेतले, त्यांना शोधून काढायचं होत की त्यांच्या कथेचा शेवट कोण बदलतय, आज काय तो सोक्ष मोक्ष लावायचा होता.

"डॉक्टर, तुमचा शेवट काय होता?" संपादक डॉक्टरांकडे बघत म्हणाले.

"माझ्यामते, गिरीश जीव द्यायला समुद्राकडे जातो, त्याला पोहता येत नसते, पाऊस पडतोय, रात्रीची, भरतीची वेळ असते, तो समुद्रात जातो, पाणी कमरेपर्यंत आलेले आहे, तेवढ्यात पाठीमागून त्याला कोणीतरी हाक मारतो" डॉक्टर तंद्रीत असल्यासारखे म्हणाले.

"कोण?" संपादक कथेत गुंतत जात होता.

"तो मागे वळून बघतो तर कोणीच नसते, तो माघारी येतो, समुद्रकिनाऱ्यावर बसतो, थोड्या वेळाने त्याला दिसते की अजून कोणीतरी समुद्राकडे जात आहे" डॉक्टर एवढे बोलून थांबले.

"मग?" संपादकाने विचारले.

"गिरीशला जाणवते की तो माणूस समुद्रात जाऊन जीव देणार आहे, तो उठतो, पळतो, धावत जातो, त्या माणसाला आत्महत्या करण्यापासून वाचवतो"

"म्हणजे?" संपादकाने परत विचारले.

"म्हणजे, तो एका माणसाचा जीव वाचवतो, त्याला कळते की आयुष्य दुसऱ्यांना मदत करून जगता येऊ शकत, त्याला आयुष्याचा अर्थ कळतो, तो आत्महत्येचा विचार सोडून देतो" डॉक्टर घराच्या छताकडे बघत म्हणाले.
"छान आहे" संपादक म्हणाले, पण त्यांना कथेत एवढा दम वाटत नव्हता, पण एवढ्या मोठ्या लेखकाला कसे सांगावे यामुळे ते काही म्हणाले नाहीत.

"हा नवीन शेवट आहे, आधीचा शेवट असा नव्हता" संजय खालच्या स्वरात, जमिनीकडे बघत म्हणाला.

संपादकाने त्याच्याकडे एकटक बघितले, त्यांना माहित होते, काहीतरी गडबड आहे.

"आधीच्या शेवटात, त्यामध्ये...तो...मरतो" संजय चाचपडत म्हणाला.

"काय?" संपादक आणि डॉक्टर एका सुरात ओरडले.

"मरतो? शेवटी मरतो? आत्महत्या करतो? अरे का?" संपादक श्वास न घेता, भराभरा बोलले.

"हा शेवट धक्कादायक होऊ..." संजय अजूनही जमिनीकडे बघत होता "शेवट असा होता की, तो मरतो आणि एका अशा ठिकाणी जातो, जिथे त्याची मुलाखत घेतली जाते" संजय म्हणतो.

"मुलाखत? मेल्यानंतर? का?" संपादकाने विचारले, संपादकाची हसावे की रडावे अशी परिस्थिती झाली होती.

"त्या मुलाखतीनंतर ठरणार की गिरीश पुढे कुठे जाणार, स्वर्गात, नरकात का पुनर्जन्म घेणार" संजय त्याचा मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न करत होता.

"ओके, या कथेचे तीन ते चार भाग होऊ शकतात?" संपादकाने संजयला विचारले.

"हो नक्कीच" संजयचा विश्वास वाढला होता.

"माझ्या डोक्यात अजून एक शेवट आहे" डॉक्टर अगदी अलगद म्हणाले.

संजय आणि संपादकाने डॉक्टर रिक्तमांकडे बघितले.
"गिरीश समुद्रात जातो, त्याच्या गळ्यापर्यंत पाणी आले आहे, पण तेवढयात एक मुलगी धावत येऊन त्याचा जीव वाचवते, मग दोघ प्रेमात पडतात" डॉक्टर मिश्किल हसत म्हणाले.
"लव्ह स्टोरी फार कॉमन झालीय, मला वाटते..." संपादक म्हणाले.
"या कथेचे सुद्धा तीन ते चार भाग होऊ शकतात" डॉक्टरांनी उत्तर दिले.

संपादकाने फक्त मान डोलावली, पण त्यांना काय बोलावे हे कळेना, त्यांना झोप येत होती, पण आता डुलकी घेऊन चालणार नव्हते, काहीतरी करून या कथेचा शेवट ठरवायचा होता.

डॉक्टर गिरीशमध्ये कुठेतरी स्वतः ला बघत होते, गिरीश कथेचा नायक तर होताच, पण गिरीश एक प्रकारे त्यांचे प्रतिबिंब होता, डॉक्टर आशावादी होते, गिरीशला मारून वाचकांना धक्का देता आला असता, पण तो इतका परिणामकारक झाला नसता, त्यांना गिरीशला मारायचे नव्हते, जिवंत ठेवायचे होते, त्यांच्या लेखणीसाठी आणि लेखणीप्रमाणे.

संजयला काही करून, कथेच्या शेवटी गिरीशला मारायचे होते, तो मेल्यावर पुढे काय होऊ शकते याचा ही विचार त्याने करून ठेवला होता, गंमत म्हणजे, तो स्वतःला गिरीश समजत होता, गिरीशने मरावे, या आयुष्यातून मोकळे व्हावे, असे त्याला अगदी मनापासून वाटत होते.

डॉक्टरांना काही करून त्यांच्या कथेच्या नायकाला वाचवायचे होते आणि संजयला त्याला मारायचे होते, विरोधाभास होता, संपादकाला यातील एकाचा पक्ष निवडायचा होता, दोंघाकडे कथेसाठी बरेच चांगले 'शेवट' होते, पण मुळात एका कथेला एकच शेवट असतो, त्यामुळे संपादक कोड्यात पडले होते.

खूप चर्चा झाल्यानंतर तिघांनी खालील शेवट ठरवले. संजयने ते एका कागदावर लिहून काढले.

१. गिरीशचा आतला आवाज जागा होईल आणि तो आत्महत्येचा विचार सोडून देईल

२. त्या समुद्रकिनारी, गिरीश एकाला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करेल आणि गिरीश स्वतः आत्महत्येचा विचार सोडून देईल

३. एक मुलगी धावत येऊन त्याला वाचवेल, नंतर हे दोघ एकमेकांच्या प्रेमात पडतील (सहा ते सात भाग)

५. तो मरेल, स्वर्गात, नरकात किंवा पुर्नजन्म घेण्यासाठी त्याची एक मुलाखत होईल (तीन ते चार भाग)

६. गिरीश मरेल, पण सर्वांना गिरीशचा खून झाला आहे असे वाटेल, खुनाचा आळ त्याच्या लहान भावावर येईल, गिरीशच्या भुतावर जबाबदारी असेल, की त्याच्या भावाला यातून कसे वाचवावे (दोन भाग)

पण कुठला ही शेवट मनासारखा, धक्कादायक वाटत नव्हता, तिघेही आता काही बोलत नव्हते, एकमेकांकडे बघत नव्हते, संध्याकाळ होती, अंधार पडला होता, हलकेच पाऊस सुरु झाला, संपादकाने घडाळ्याकडे बघितले ते काही बोलणार तेवढ्यात..

एक तरुण खोलीचे दार उघडून आत आला, त्याच्या समोर डॉक्टर रिक्तम बसले होते, तरुणाने हसून त्यांना हाय म्हटले.
डॉक्टर त्या तरुणाकडे बघत होते, ते काही बोलले नाही, त्या तरुणाला काय बोलावे ते कळेना.

"दरवाजा उघडा होता म्हणून आत आलो, डोअरबेल वाजवली होती....." तो बोलायला सुरुवात करणार तेवढ्यात,
डॉक्टर त्याच्यावर खेकसले "कोण तुम्ही?"

"सर, मी गिरीश"

तो तरुण म्हणाला, यावर कोणी काहीच बोलले नाही, सगळेजण स्तब्ध झाले, शांतता पसरली, सगळेजण त्या तरुणाकडे रोखून बघू लागले, बाहेर पाऊस वाढतच होता.

क्रमशः

सरतेशेवटी (भाग दोन): http://www.maayboli.com/node/61187

-चैतन्य रासकर
chaitanyaras@gmail.com

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@पद्म, @स्वप्नाली, @जाई. @मामी @अनघा.

धन्यवाद Happy पुढचा भाग लवकरच अपलोड करण्याचा प्रयत्न करेन.