चटक -मटक- चटणी- चटक ...... आवळ्याची चटकदार टिकाऊ चटणी

Submitted by दीपा जोशी on 26 November, 2016 - 04:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आवळा, गुळ, मेथी, दालचिनी, मिरे आणि बडीशेप, लाल- मिर्ची पावडर, मीठ

क्रमवार पाककृती: 

चटक -मटक- चटणी- चटक ...... आवळ्याची चटकदार टिकाऊ चटणी

आवळ्याचा हंगाम म्हणजे आत्ता चालू असलेला थंडीचा मौसम! तुळशीच्या लग्नात आवळे पाहिजेच असतात. आवळ्याला ‘धात्री’( म्हणजे- आरोग्याची देवता आणि आईसारखी काळजी घेणारा) असे संबोधले जाते, तसेच आरोग्य- वृद्धी करणारा म्हणून ‘रसायन’ असेही म्हटले जाते.
रोजच खाता येणारा आवळ्याचा एक चवदार टिकाऊ प्रकार म्हणजे हमखास चांगली होणारी आवळा चटणी ! या चटणीचे आणखी एक वैशिष्ठय म्हणजे आयुर्वेदा मध्ये मानल्या गेलेल्या सहा चवीनी ती समृद्ध आहे ( गोड-गूळ , कडू,-मेथी, आंबट-आवळा, तिखट-मिरी पूड आणि मिरचीपूड, तुरट -आवळा, खारट- मीठ )! त्यातल्या मेथी, दालचिनी, मिरे आणि बडीशेप यामुळे चविष्ट तर होतेच त्याशिवाय टिकाऊ आणि अन्न -पचन करण्यास उपयुक्त आणि थंडीसाठी औषधी गुणांची होते.
चला नमनालाच घडाभर तेल ओतून झालं! (पण चटणीत अजिबात तेल नाही हं )

साहित्य - खाली मी घेते ते साहित्य दिले आहे. पण आपल्या चवीनुसार, आवडीनुसार थोडा-फार बदल करू शकता.
आवळे : अर्धा किलो
गुळ : अर्धा ते पाऊण किलो
बडीशेप: दोन टी -स्पून शीग लावून
मिरपूड : -अर्धा टी -स्पून
दालचिनी : छोटे तुकडे दोन टी स्पून
मेथी: एक टी -स्पून
लाल मिरची पूड : एक टी -स्पून
मीठ : चवीप्रमाणे


कृती-

१) आवळे धुऊन, पुसून घ्यावेत. एका स्टीलच्या जाड बुडाच्या पातेल्यात आवळे बुडतील एवढेच पाणी घालून उकडून घ्यावेत. साधारण १५ मिनिटे लागतील. आवळ्याच्या फाका (फोडी ) सुट्या होताना दिसतील.
२) गार झाल्यावर बियांपासून फोडी सुट्या करून घ्याव्यात.
३) आवळे उकडलेले पाणी वापरून स्टीलच्या पातेल्यात/ कढईत गुळ घालून पाक करायला ठेवावा.
४) बडीशेप, मेथी थोडी भाजून घ्यावी
५) मिक्सरच्या छोट्या भांड्यात भाजलेली बडीशोप, मेथी, दालचिनी (न भाजलेली ) यांची पूड करून घ्यावी.

६) आवळ्याच्या फोडी थोड्या गरम असतानाच मिक्सरमध्ये वाटून ‘पल्प’ करून घ्याव्यात. गार झाल्यावर पटकन वाटल्या जात नाहीत.
७) गुळाचा पाक होताना कढईमध्ये बुडबुडे खूप वेगाने येतात. कढई भरून बुडबुडे वर येऊ लागले, की आवळ्याचा वाटलेला गर (पल्प) टाकावा.
८) भाजलेली मेथी, भाजलेली बडीशेप, दालचिनी यांच्या पुडी, मिरी-पूड, तिखट, मीठ घालावे.
९) सतत ढवळत राहावे.
१०) ढवळताना मिश्रणाचे थेंब चट - चट असे कढई बाहेर उडू लागतात. हळू हळू मिश्रण बाहेर उडण्याचे प्रमाण कमी होते.
११) लालसर-सोनेरी रंग आला; आणि जामसारखे घट्ट होत आले, की झाली आपली चटणी.
१२) गार झाल्यावर काचेच्या अथवा चिनी मातीच्या बरणीत भरून ठेवावी.
आंबट-गोड-तिखट- आणि माफक मसाल्यांचा स्वाद असणारी चटक - मटक चटणी तैयार! चांगली खूप दिवस टिकते.
( आमच्याकडे खाऊनच लवकर संपते!)

वाढणी/प्रमाण: 
आवडीप्रमाणे-दहा जणा साठी सुद्धा.....
अधिक टिपा: 

प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त झाले तरी चटणी हमखास चांगली होते असा अनुभव आहे! आणि हो....तेल नसल्याने सगळ्यांना चालते.

माहितीचा स्रोत: 
कुठले तरी पाकक्रुतीचे पुस्तक. त्यातल्या साहित्यात थोडे बदल करुन मी नेहमी ही चटणी करते.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Yes Nidhi,
I am trying to upload photo.....
But anyhow it's not uploading.

But anyhow it's not uploading. >> १५० केबी पेक्षा जास्त आहे का? फोटो तर हवाच.. आवळा हा चटणी लोणच्यातील आवडीचा प्रकार. नुसते मीठाच्या पाण्यात मुरलेले आवळे खायलाही कसली मजा येते Happy

मस्तच.

नुसते मीठाच्या पाण्यात मुरलेले आवळे खायलाही कसली मजा येते >>> येस ऋन्मेष, माझा फेवरेट प्रकार. दरवर्षी करतेच मी.

स्वाति२,
फ़्रोजन आवळे रूम टेम्प्रेचर ला आल्यावर करता येइल. फ़क्त अगदि थोडा वेळच उकडावे. फ़ोडिन्च्या चिरा दिसेपर्यन्तच उकडा. लगदा होउ देउ नये.

धन्यवाद दीपा! काल केली चटणी. मस्त झाली. फ्रोजन आवळे असल्याने की काय तुरट चव किंचीत जास्त जाणवतेय. पण आम्हाला दोघांनाही आवडली.

फोटो आवडला. मला हे पाकृ वगैरे कळत नाही पण माझी आई माझ्या लहानपणी या फोटोसारखे करायची. एक तो मोरंबा आणि एक त्या मोरंब्यासारखेच किसलेल्या आवळ्यांचा मोरावळा. मोरंबा पुर्ण गोड तर मोरावळा थोडे आंबट गोड. दोन्ही आवडायचे. सॉस आणि जॅम कधी खाल्याचे आठवतही नाही तेव्हा.. तसेच पडून राहायचे

सर्वाना प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद.

स्वाती २,
ही पाकक्रुती स्वत: करुन पहिलीत आणि कळवलेत यासाठी आभार.

१)काही वेळा आवळे कमी आम्बट आणि जास्त तुरट असतात. त्यामुळे चटणीला तुरट चव आली असणे शक्य आहे.
२) किन्वा मीठ/गुळ कमी पड्ले असेल तरीही तुरट चव येणे शक्य आहे. परत केलित तर करतानाच चव पाहून थोडासा गुळ आणि मीठ वाढवून पहा.

आज केली चटणी. मस्त चटकदार झाली... लिंबाचा रस घातला तर तुरट कमी लागेल असं वाटतं... मी अवळ्याचा टक्कु करते त्यात लिंबाचा रस घलतेच...

Pages