"थोडीशी गैरसोय" नक्की किती? आणि कोणाची?

Submitted by सिम्बा on 11 November, 2016 - 12:14

तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"

हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?

आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,

- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,

- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?

- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो

मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.

अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वसामान्य लोकांचे बरेच हाल होत आहेत असे दिसते. बँक आणि एटीएम समोरच्या रांगा अजून कमी झालेल्या दिसत नाहीत. पेट्रोल पंप वरच्या रांगा बऱ्याच कमी झाल्या आहेत. मला दोन वेळा पेट्रोल पंप वर ५००ची नोट देऊन २००चं पेट्रोल टाकून सुट्टे मिळाले. दोन मित्र छोटे व्यावसायिक आहेत जे स्नॅक सेंटर चालवितात. दोघांचा धंदा जरा (२०-३०%) कमी झाला आहे.

मला स्वतःला सरकारच्या निर्णयाचा प्रचंड फायदा झाला. माझी बिजनेसला लागणारी कॅश जी ऑफिस मध्ये आहे ती भरायला सरकारने भरपूर कालावधी दिल्याने चिंता नाही. मला घराच्या बांधकामासाठी लागणारे सामान imps ने पैसे देऊन घेता आले. आज पर्यंत जे व्यापारी एक तर कॅश किंवा कार्डवर २% जास्तीचे, या शिवाय कोणताही पर्याय स्वीकारत नसत ते आता चेक, rtgs, imps ने पैसे घ्यायला तयार आहेत.
जमिनीचे आणि कमर्शियल प्रॉपर्टीचे व्यवहार भरपूर कमी झाले आहेत, नोंदणी ऑफिस ला लोड कमी आहे असे एका वकील मित्राकडून ऐकले.
माझ्या एका मित्राचा जमिनीचा व्यवहार जो आधी काही रक्कम ब्लॅकने घेऊन व्हायचा होता तो आता पूर्ण व्हाईटने होतोय. बिल्डर कडे आता व्यवहार मोडणे किंवा ४ ते ६ महिने थांबणे किंवा पूर्ण व्हाईट घेणे याशिवाय काही पर्याय राहिला नाही.

माझी व्यक्तिशः काही गैरसोय झाली नाही कारण माझे चहा, वडापाव, पाणीपुरी या व्यतिरिक्त काही वैयक्तिक रोख व्यवहार नसायचे. भाजी, फळे वगैरे आणायला जे पैसे लागतात ते घरात असल्याने अजून तरी बँक मध्ये जायची गरज पडली नाही. नेहमीचा फळवाला सर्व ओळखीच्या लोकांना उधार देतो आहे.

एकंदर माझ्या मित्रपरिवारात/ नातेवाईक मंडळी मध्ये कोणाचे अजून काही फारसे अडले नाही. मी, माझे नातेवाईक, माझे मित्र म्हणजे जग नव्हे आणि माझे अनुभव हे शहरात राहणाऱ्या, सर्व पैसे बँक मध्ये/व्हाईट मध्ये असणाऱ्या, इंटरनेट, डेबिट कार्ड वापरणाऱ्या लोकसंख्येतले आहेत याची मला जाणीव आहे.

ग्रामीण भागात अडचण जास्त असू शकते कारण तिकडे बँक, इंटरनेट अजून पूर्णपणे उपलब्ध नाही शिवाय तितकी साक्षरता नाही.

ग्रामीण भागात लोक विश्वासावर उधारीवर व्यवहार करताहेत. ग्रामीण भागातून मोदीजींना चांगला पाठिंबा आहे. एबीपी माझाची लिंक दिली आहे वर.

शहरात राहणारे तरुण, मध्यमवयीन व्यावसायिक ज्यांचे हाल होत आहेत ते स्वतः बऱ्याच प्रमाणात त्याला जवाबदार असावे असे वाटते.

हातात सॅमसंग पासून आयफोन पर्यंतचे फोन, ते सगळे वापरता येतात, त्यात व्हाट्सअप,युट्युब सर्व वापरता येतं. पण बँक मध्ये जाऊन अकाउंट उघडून त्यात पैसे भरणे, बाकीच्या लोकांना साधा चेक फाडून देणे जमत नाही ?

सगळे व्यवहार कॅश मध्ये करायचे, टॅक्स भरायचे नाही, बँक मध्ये खाती उघडायची नाही. कायदा, नियम असा काही प्रकार पाळायचा असतो, टॅक्स भरायचा असतो याची शष्प काही जाणीव नाही.

भोआकफ.

आमचा पण स्वतःचा व्यवसाय आहे. ८ तारखेपासून काहीही अडलेले नाही. सगळे सुरळीत चालू आहे. नॉर्मल बिजनेसची कॅश इन हॅन्ड असते ती फक्त ऑफिस मध्ये होती. त्यासाठी कोणताही आयकर वाला दारात येण्याची सुतराम शक्यता नाही. आम्ही अगदी निर्धास्त आहोत.

१. इतक्या दिवसांत बँकाकडे किती खोट्या नोटा जमा झाल्या?
खोटे चलन बाजारात प्रचलित झालेले आहे म्हणून घर जाळायला काढले, तर थोड्या, काही हजार नोटा आतापर्यंत सापडायला हव्या होत्या की नाही?

२. इतकी कॅश बँकेत जमा होईल. तर त्या कॅशवर ब्यांका व्याज कुठून देणारेत? की व्याजदर कमी करून व्याजावर जगणार्‍या अनेक रिटायर्ड म्हातार्‍यांचा जीव घेण्याचा प्लॅन आहे?

३. गेल्याच महिन्यात लक्षावधी डेबिट कार्डे काँप्रोमाईज झाली होती. त्यामुळे बंद करण्यात आली होती.
ज्यांची कार्डं बंद केली होती ती सुरू झालीत का परत?

कॅशलेस वाल्यांना याबद्दल काही बोलायचं नाहिये का?

शहरात राहणारे तरुण, मध्यमवयीन व्यावसायिक ज्यांचे हाल होत आहेत ते स्वतः बऱ्याच प्रमाणात त्याला जवाबदार असावे असे वाटते.
<<

ब्लेम द व्हिक्टीम.

ब्लेम द व्हिक्टीम.>>>>>

त्यांना कोणीही लिगली व्यवसाय करण्यापासून/ व्यवहार बँक मार्फत करण्यापासून अडवले नव्हते. लोकांना कॅश व्यवहार करून टॅक्स चुकवणे, आयकर न भरणे याची सवय लागली आहे. ती बंद करणे गरजेचे आहे. आता नाक दाबल्यावर तोंड उघडत आहे. मी तर सरळ कॅश नाही, माल घेऊ का नको असे विचारतो आहे. आधी घेऊ नका म्हणणारे आता कार्ड/ चेक / imps ने पैसे स्वीकारत आहेत.

आज पर्यंत कॅश सोडून काहीही न स्वीकारणाऱ्या आमच्या पेपर टाकणाऱ्याने १९० रुपयांचा चेक घेतला.

आज पर्यंत कॅश सोडून काहीही न स्वीकारणाऱ्या आमच्या पेपर टाकणाऱ्याने १९० रुपयांचा चेक घेतला.>> पुढच्या महिन्यात सांगा,काय करतोय ते.

आज पर्यंत कॅश सोडून काहीही न स्वीकारणाऱ्या आमच्या पेपर टाकणाऱ्याने १९० रुपयांचा चेक घेतला.>> पुढच्या महिन्यात सांगा,काय करतोय ते. >>> काही समजलं नाही , जरा समजाऊन सांगणार का ?

Cash transaction... Does it mean black money every time ?>>>>

नाही का ? मग काही हजारांपासून ते लाखांपर्यंत लोक कॅश पेमेंट नक्की का करतात ?
चेक घ्यायला नको का म्हणतात ? जरा सांगता का?
आणि प्लिज चहा, वडापाव, अगदीच किरकोळ विक्रेते, डॉक्टर लोकांची ओपीडी यांची उदाहरणे नका देऊ.

श्री त्यांचे म्हणणे असे आहे की सध्या कॅश नसल्याने त्याने घेतली असावी, पुढच्या महिन्यापासून परत नाटके करेल. कॅश फ्लो नियमित झाला की पहिले पाढे पंचावन्न होतील.

माझा मित्र सांगत होता, काल दोन तास रांग लाऊन बँकेतून पगारातील ₹१५००० रक्कम काढली. ₹२००० च्या सात आणि ₹१०० च्या दहा नोटा मिळाल्या. त्या सतरा नोटा हातात पकडल्यावर काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटायला लागलं. पूर्वी ₹१५००० रक्कम काढताना नोटांची जाड गड्डी हातात यायची. तेव्हा पगार झाल्याचा कोण आनंद व्हायचा. त्या गड्डया कुरवळताना सारे जग हातात आल्यासारखे वाटायचे. ह्या सतरा नोटा पँटीच्या खिशाच्या कोपऱ्यात अगदी केविलवाण्या होऊन जाऊन बसल्या.

संध्याकाळी त्यातली एक ₹२००० ची नोट बहिणीला खर्चायला दिली. पण तिला पैसे दिल्याचं समाधान काही मला मिळालं नाही. पूर्वी ह्याच दोन हजार रुपयांकरीता मी नोटांची चळत तिच्या हाती देत असे. तेव्हा माझं मन किती भरून यायचं.

छ्या:!! ह्या ₹२००० च्या नोटांनी आयुष्यातला अजून एक आनंद कमी करून टाकला.

मला सहार एअरपोर्ट वर देखील ए टी एम मधे कॅश मिळाली नाही ( दोन आहेत तिथे ) ! ओला मूळे टॅक्सी चा प्र्श्न मिटला. मला आवडणारी अत्तरं मात्र घेता आली नाही ( दादरला एका खास दुकानातून घेतो मी नेहमी )

पेटीएम च्या जाहीराती बर्‍याच बघितल्या पण ते स्टीकर असलेली रिक्षा वा दुकान दिसले नाही. आता तसे आणखी काही पर्याय निघाले आहेत ( ओला मनी, जिओ मनी वगैरे ) हा एक समांतर बँक व्यवसाय होईल असे वाटतेय. तिथे व्याज वगैरे मिळत नाही बहुतेक. पण असे अनेक पर्याय असूनही उपयोग नाही कारण तोच पर्याय वापरणारा दुकानदार पण हवा ना ? त्यापेक्षा ए टी एम प्रमाणे, कुठल्याही पर्यायातून कुठल्याही पर्यायात पैसे द्यायची सोय असावी, असे वाटते.

बँक व्यवहार अजूनही आपल्याकडे किचकटच आहेत. अजूनही पन्नास हजारपेक्षा मोठ्या रकमेचा चेक वापरून ( यापुढे शक्य होईल का ते ? ) पैसे काढताना आधी कॅश काऊंटर वर जा, मग ऑफिसरची सही घ्या, परत कॅश काऊंटर वर जा.. असे करावे लागत होते. खातेदाराची सहीच नव्हे तर फोटोही समोरच्या स्क्रीनवर दिसत असताना असे का ?

मी ज्या बँकेत जातो तिथे अनेक पेन्शनर्स येतात. त्यापैकी अनेकांना साधा साधा व्यवहार करताना बर्‍याच अडचणी
येताना दिसतात. डेबिट कार्ड कसे वापरायचे याचा सर्वाना समजेल असा व्हीडीओ कुठे बघितल्याचे आठवत नाही.
मी वर उल्लेख केलेल्या पे टीएम च्या जाहीरातीतही ती सुविधा कशी वापरायची, याची माहिती नाही. काहितरी जादू
केल्यासारखे पैसे मिळाल्याचे दाखवतात.

भारतात दूरदर्शन म्हणे लोकशिक्षणासाठी सुरु झाले होते.. १९७०/७२ मधे असे सांगत असत.

अगदी साधीशी गोष्ट.. बँकेची पे इन स्लिप असते त्यात भरावयाची सर्व माहिती, सामान्य हस्ताक्षरात लिहिल्यास मावेल एवढी जागा तरी असते का ? गेली ३०/३५ वर्षे सतत असले फॉर्म्स भरूनही याचा विचार भारतात झाल्याचे दिसत नाही.

न्यू झीलंड मधे ९ वर्षाच्या लेकिने बँकेत पैसे जमा केले.. कसे तर माझे पूर्ण नाव हे, माझे खाते या ब्रांच मधे आहे,
अकाऊंट नंबर आठवत नाही असे तोंडी सांगून, कुठलाही फॉर्म न भरता. तिचा फोटो स्क्रीनवर बघून पैसे घेतले गेले आणि तिलाच प्रिंटेड रसिट दिली.

आणि प्लिज चहा, वडापाव, अगदीच किरकोळ विक्रेते, डॉक्टर लोकांची ओपीडी यांची उदाहरणे नका देऊ

90 % transactions of common man are of this kind only

ज्यांच्याशी व्यवहार करायचा त्यांच्याकडे- छोटे-मोठे सगळेच व्यावसायीक -कंपल्सरी पक्की रिसीट देणरे मशीन आणि त्यात कार्ड्/चेक्/कॅश हे पेमेंट ऑप्शन असे केले तर पैशाचा ट्रॅकही ठेवता येइल आणि ज्यांना रोखीने व्यवहार करायचा त्यांचीही सोय होईल. आमचे गाव छोटेसे आहे. मी बर्‍याच ठिकाणी कॅश वापरते. मात्र अगदी एक डॉलरची वस्तू घेतली तरी मशीनमधून पक्की रिसीट मिळते.

>>अजूनही पन्नास हजारपेक्षा मोठ्या रकमेचा चेक वापरून ( यापुढे शक्य होईल का ते ? ) पैसे काढताना आधी कॅश काऊंटर वर जा, मग ऑफिसरची सही घ्या, परत कॅश काऊंटर वर जा.. असे करावे लागत होते.
>>
दिनेशदा, आमच्या इथल्या क्रेडीट युनियनमधे देखील $१००० वगैरे काढायचे असतील तर ऑफिसरची सही लागते.

९० टक्के? महिन्याच्या मिळकतीच्या कि दैनंदिन खर्चाच्या ?
दैनंदिन खर्चाबद्दलच बोलत असाल असे मानतो.

हेच वर्षानुवर्षे असेच चालू आहे. तेच बदलायला हवे. शक्य तितके व्यवहार बँकेमार्फत व्हायला हवेत.
फळ, भाजी, किराणा, दूध, पेपर हे सगळे मला कार्ड, चेक ने घेता यावे अगदी गल्लीच्या कोपऱ्यावर. ☺

No issues with #demonetization, my maid's son exchanged money in just 15 mins, that too when she doesn't have a son and I don't have a maid.

नोकरदार आहात की काय ?

नोकरदाराला येण्याची एकच एंट्री महिन्याची असते.

चार लिंबू , वीस रुपयाची करवंदं , पाच रुपयाचे कोल्गेट अशा छोट्या छोट्या वस्तू किरकोळीत विकणार्‍यानी रोजचे वीस चेक घेऊन रोज ब्यान्केत जायचे का?

बरं, त्याने चेक घ्यायचे सुरु केले म्हणून रस्त्यावरचे हवालदार , आमदार खासदार , बिल्डर ... लाच खातानाही चेक वापरतील की काय ?

त्याचं काय आहे, की लोकं मार्ग काढत आहेत. पण सगळा सत्यानाश झालेला आहे असे इथे म्हणावेच लागणार! नाहीतर खूप सुरेख सुरेख पोस्ट्स वाचायला मिळतात.

चार लिंबू , वीस रुपयाची करवंदं , पाच रुपयाचे कोल्गेट>>>>>>

हे तुम्ही रोज घेता का ? तसे नका करू. दूध, फळे आणि भाजी एक वेळ रोज ठीक आहेत, पण बाकी आठवड्याचे/महिन्याचे घेत जा.

Pages