'ट्रम्पणे' म्हणजे काय रे भाऊ? ओह, यू डोन्ट वॉन्ट टू नो!

Submitted by राफा on 6 November, 2016 - 11:26

आधुनिक शब्दकोशातून:

ट्र्म्पणे!

क्रियापद.

अर्थ:

१. बोलताना आय (I) व माय (My) ह्याच्याशिवाय दुसरे काही न बोलणे.

२. दुस-याविषयी बोललेच तर त्याची किंवा तिची आयमाय काढतच बोलणे.

३. सार्वजनिक नळावरील भांडणात एखाद्याने ‘ठेव तर कळशी पुढे… मग तुझं काय करीन सांगता येणार नाही!’ असे म्हणावे, त्याच चालीवर जागतिक दहशतवादाशी लढायला अत्यंत संदिग्ध व दिशाहीन बोलणे. वैतागून कुणी विचारलेच ‘म्हणजे नक्की काय कराल?’ तर ‘ओह, यू डोन्ट वॉन्ट टू नो!’ असे लाडीक उत्तर देणे.
(अर्थछटा: मूलतत्ववाद्यांशी लढायला स्वत: ‘मूल’तत्ववादी होऊन पोरकट उपाय सुचवणे)

४. विविध प्रकारच्या पिस्तुलांपासून ते स्वयंचलित रायफलीपर्यंत सर्व मोक्षप्राप्तीच्या साधनांचे मुक्तहस्ताने वाटप करण्याचे मनसुबे जाहीर करून, अद्याप डोकं ताळ्यावर असलेल्या सुजाण नागरिकांची काळीजे त्या रायफलीपेक्षा वेगाने धडधडवणे.
(वाचा: गावठी 'कट्टा' व शहरी 'घोडा' - लेखक: टी. डोनाल्ड)

५. काहीही संबंध नसलेल्या क्षेत्रात लुडबूड करणे व तरीही सर्वज्ञ असल्याचे भासवणे.
उदा. वडीलोपार्जित खानावळीचा धंदा असलेल्या गणूशेटने कधी पत्र्याचा डबाही वाजवला नसताना एकदम आपल्या स्वतंत्र तबलावादनाचा कार्यक्रम जाहीर केला आणि कुठला ताल पेश करणार विचारल्यावर गणूशेट ट्रम्पला: ‘ओह, यू डोन्ट वॉन्ट टू नो!’

६. लगट करणे
उदा. ‘तू सुंदर बाई आहेस आणि मी सेलेब्रिटी आहे त्यामुळे मी तुला काहीही करू शकतो’ असे म्हणून एक हिंदी पिक्चरचा नवोदित अभिनेता भर रस्त्यात एकीशी ट्रम्पू लागला. पूर्वीच्या एका सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या खटल्यास प्रमाण मानून ह्या खटल्याची कारवाईही तात्काळ दहा वर्षांनी व अत्यंत कडक अश्या कायद्याचा आधार घेऊन नि:पक्षपातीपणे झाली. पूर्वीच्या निकालाचेच ‘टेम्प्लेट’ डोळ्यासमोर ठेवून, ट्रम्पण्याच्या ह्या अक्षम्य गुन्ह्याबद्दल ह्याही वेळी एक काळवीट, एक पोलीस व पदपथावरील काही गरीब लोक ह्यांना देहांताची सजा केली गेली. आता कायद्याची जबरदस्त जरब बसून तो अभिनेता त्या दुस-या सुप्रसिद्ध अभिनेत्याप्रमाणेच पुन्हा ट्र्म्पायला मोकळा झाला आहे.
(वाचा: 'पोरगा का पनवती?' - लेखक: के. सलीम)

७. कायद्यात पळवाटा शोधून, कर बुडवून, त्याचा जाहीर अभिमान बाळगून वर राष्ट्रीय कर्ज वाढले म्हणून गळा काढणे. थोडक्यात स्वत:चे काम नीट न करता दुस-याने केलेल्या कामाची हेटाई करणे.
(पहा: ‘पुरावा द्या’ फेम माननीय मफलर मुख्यमंत्री ह्यांची विधाने)

८. दुस-याच्या खर्चाने स्वत:च्या कुंपणाची भिंत बांधायच्या वल्गना करणे
(पहा: हवेत मनोरे बांधणे किंवा ‘आम्हीही सर्जिकल स्ट्राईक केले की’ असे म्हणणे)

९. एखाद्याची जात, धर्म झालंच तर वर्ण काढणे, पण देशही काढणे.
(वाचा: ‘मेक्सिकन म्हणजेच गुन्हेगार’ - लेखक: टी. डोनाल्ड)

१०. अत्यंत बिनडोक व अत्यंत स्वार्थी अश्या दोन प्रकारच्या लोकांच्या पाठिंब्यावर सत्तेची हाव धरणे व बघणा-यास ‘ह्याला हसावे का घाबरावे’ अशा संभ्रमात पाडणे
(पहा: यत्ता दुसरीतील पप्पूचा निबंध : ‘मी पंतप्रधान झालो तर..’.)

११. आधीच बदनाम असलेल्या क्षेत्रात, शेतात बैल घुसावा तसे बळजबरीने घुसून, आपल्या अश्लाघ्य व अवली आचरणाने ‘ह्याच्यापेक्षा ते परवडले’ असे वाटावयास लावणे.

१२. गंभीर समस्येवर ‘रोग परवडला पण औषध नको’ असे अघोरी उपाय सुचवणे.
उदा. त्या ठिकाणी, फुले आंबेडकरांच्या राज्यातला एक अत्यंत सुसंस्कृत व विनयशील नेता, दुष्काळाने हवालदिल झालेल्या जनतेला उत्तर देताना त्या ठिकाणी ट्रम्पला: ‘आता मी काय धरणात... ’. हे पहिल्या धारेचे विधानामृत ऐकून अर्धमेल्या झालेल्या जनतेने त्या सुसंस्कृत व विनयशील नेत्याला विचारलं ‘कसं सुचतं हो तुम्हाला? काकांनी सुचवलं तसं वाचन वाढवलेलं दिसतयं. काय… वाचताय काय सध्या?’ तेव्हा तो अत्यंत सुसंस्कृत व विनयशील नेता पुन्हा त्या ठिकाणी ट्रम्पला : ‘ओह, यू डोन्ट वॉन्ट टू नो!’

- राफा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mast.

खी: खी: खी:, जबरदस्त!

ताजमहालाला या दोन विटा:

१३. खोटारडेपणा + माजोरडेपणा + संवेदनाशून्यता:

- आधी न्यू जर्सीत हजारो मुस्लिमांनी ९/११च्या दिवशी जल्लोष केला, अशी टीव्हीवर बातमी होतं; असं खोटं विधान करणे.
- एका पत्रकाराने हा खोटारडेपणा उघडकीला आणल्यावर त्याच्या शारीरिक व्यंगाची हीन... आपलं ट्रम्प पातळीवर जाऊन खिल्ली उडवणे

via GIPHY

१४. खोटारडेपणा + माजोरडेपणा + रेसिझमः

- आपल्या भाषणात व्यत्यय आणणार्‍या ट्रम्पसमर्थकाच्या हक्कांचे समर्थन करणार्‍या ओबामानेच उलट त्या समर्थकावर आगपाखड केली असा कांगावा करणे. (http://www.vox.com/2016/11/5/13533468/trump-obama-protester)
- आपल्या एका कृष्णवर्णीय समर्थकाला 'थग' असे संबोधून हाकलणे.
- निदर्शकांविरुद्ध हिंसाचाराला चिथावणी देणे इ. इ.

बाकी ही यादी सहस्रनामांएवढी मोठी होऊ शकेल, पण तूर्तास एवढे पुरे! Wink

:D:

माझ्या शुभेच्छा सार्थ ठरविल्याबद्दल तमाम अमेरिकनांचे अभिनंदन!
नाऊ यू नो!

आम्ही तर बिन देअर, डन दॅट बाबा!
Happy

(डोळा मारायला भिती वाटते. अमेरिकन बायका धावत येतील!)

आता कळेल अमेरिकन जनतेला मायावती आणि मुलायम दोघांपैकी एकाला मत द्यायचे असेल तर युपी वाल्यांची काय अवस्था होते ते!

{{{ (डोळा मारायला भिती वाटते. अमेरिकन बायका धावत येतील!) }}}

डोळा मारायचं तर तुम्ही मागेच बंद केलं होतंत ना? (म्हणजे तसा मळका मोजा पुन्हा दाखविण्याच्या निमित्ताने मला अजुन एकदा मारला होतात ते सोडलं तर..)

Pages