'आई, मी गे आहे' - श्री. अभिजीत देशपांडे

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

यावर्षीच्या जानेवारी महिन्याच्या 'माहेर' मासिकात श्री. अभिजीत देशपांडे यांनी लिहिलेला हा लेख -

जरा भीतभीतच मी बुधवार पेठेत उतरलो. एकतर मुळातच हा भाग बदनाम. त्यात मी समाजमान्य नसलेली गोष्ट जाहीर करायला निघालो होतो. लहानपण पुण्यात गेलं असलं, तरी आईवडिलांनी कधी या गल्ल्यांमध्ये फिरकू दिलं नव्हतं. काॅलेजमध्ये या भागाबद्दल विशेष कुतूहल होतं. पण कुणी पाहील म्हणून इथून जाण्याचंही टाळायचो. गूगल मॅप्सवर पत्ता काही धड सापडेना. अखेर हिंमत एकवटली आणि एका दुकानदाराला पत्ता विचारला. त्याने सांगितलेल्या वाटेवर जाऊ लागलो. भडक कपडे घातलेल्या काही स्त्रिया आणि तृतीयपंथीय माझ्याकडेच बघत आहेत, या कल्पनेनं मला घाम फुटला होता. वर सूर्य तळपत होताच. अखेर मी 'समपथिक'च्या आॅफिसला पोहोचलो आणि लिफ्टची वाट न पाहता जिन्यानं चौथ्या मजल्यावर पोहोचलो.

एक तृतीयपंथीयानं माझं स्वागत केलं. माझ्यासाठी हे नवीनच होतं! हिजडे आतापर्यंत भेटले होते ते ट्रॅफिक सिग्नलवर किंवा रेल्वेमध्ये. पैसे नाही दिले की शिव्याशाप देणारे. आतापर्यंत त्यांच्याविषयी दोनच भावना होत्या - किळस आणि भीती! इथे मात्र स्वागत करणारी व्यक्ती या दोन्ही शब्दांपासून अनेक मैल दूर होती. व्यवस्थित साडी नेसलेली, चापूनचोपून केस बांधलेली आणि व्यवस्थित मराठी बोलणारी. "तुम्हांला कुणाला भेटायचंय?" तिनं विचारलं. "बिंदुमाधव खिरेंना," मी घाम पुसत म्हटलं. तिनं प्रेमानं आत बोलवलं. आत अनेक तृतीयपंथीय होते. ते सगळे माझ्याकडे बघू लागले. मला एकदम संकोच वाटला. मी एका कोपऱ्यात बसलो. प्रत्येकाचं काही न काही काम सुरू होतं. मी चोरून पाहिल्यावर लक्षात आलं की, काही तरुण मुलंही होती. तेवढ्यात माझं स्वागत करणाऱ्या व्यक्तीनं विचारलं, "चहा घ्याल?" मी "हो" म्हटलं. तिथेच एक छोटं स्वयंपाकघर होतं. एकानं बाहेरून दूध आणलं, तोवर दुसऱ्यानं आधण ठेवलं, तिसऱ्यानं चहा गाळून सगळ्यांना दिला. एका कुटुंबाप्रमाणे सगळे वागत होते. तेवढ्यात कुटुंबप्रमुख तिथे आले.

फोनवर बोलताना अत्यंत कोरडे वाटणारे बिंदुमाधव खिरे त्यांच्या संस्थेत मात्र एकदम वेगळे जाणवले. हा माणूस हसूही शकतो, हे पाहून बरं वाटलं! गप्पा मारत चहा झाला. मग आम्ही दोघं शेजारीच असलेल्या काऊन्सिलिंग रूममध्ये गेलो.
त्यांनी थेट विषयाला हात घातला, "तुला आईला तुझ्या लैंगिकतेबद्दल सांगायचं आहे तर."
मी होकारार्थी मान डोलावली.
"कमिंग आऊटपूर्वी पूर्ण विचार केला आहेस ना?" त्यांनी स्पष्टपणे विचारलं.
मी 'हो' म्हणून सांगितलं.
"तुला आईला का सांगायचं आहे? आणि आत्ताच का?" त्यांनी पुढचा प्रश्न केला.
मी पूर्ण विचार करून निर्णय घेतला होता, त्यामुळे माझी उत्तरं तयार होती. "कारण आता मला दोन आयुष्यं जगण्याचा कंटाळा आलाय. रोज रोज आईशी खोटं बोलवत नाही आता. मी २८ वर्षांचा आहे. बंगलोरमध्ये चांगली नोकरी आहे. रोज स्थळं येत आहेत. ताईचं लग्न होऊन ४ वर्षं लोटली. तिला आता मुलगाही आहे. सगळे माझ्या लग्नाचा विषय काढतात. आईकडे अनेक पत्रिका येऊन पडतात. पप्पा लहानपणीच वारल्यामुळे तिनं आजवर वडिलांच्याही जबाबदाऱ्या पार पाडल्या. ताईचं लग्न लावून दिलं. आता तिला वाटतंय की माझं लग्न झालं म्हणजे ती कर्तव्यातून मोकळी होईल. रोज फोन करते तेव्हा फक्त लग्नाचाच विषय काढते. कुणी पाहून ठेवलीये का विचारते. तिला शेजारपाजारचे आणि नातेवाईक भंडावून सोडतात. परवाच तिला शेजारच्या पाटणकर काकू विचारत होत्या की काही प्राॅब्लेम तर नाही ना! त्यामुळे ती खूपच अस्वस्थ होती. मग मी ठरवलं की आता तिला खरं काय ते सांगायचं."

"पण ती ते पचवू शकेल का?" बिंदूंनी विचारलं.
"हो. हो. ती धोरणी बाई आहे. तिनं एकटीनं आम्हा दोघांना लहानाचं मोठं केलंय. तसं तिचं माहेर अमरावतीसारख्या छोट्या शहरातलं, पण पुण्यात हयात गेलीये. नाही म्हटलं तरी पेपरातून वगैर काही ना काही वाचलं असेलच की. हल्ली एवढी इंटरकास्ट लग्नं होतात, लिव्ह-इन रिलेशनशिप्स असतात. हे सगळं तिच्या आवतीभोवती होतंय. तिचा या गोष्टींना फारसा विरोध कधी जाणवला नाही. तशी ती बऱ्यापैकी लिबरल असावी. पूर्वी ती म्हणायची ब्राम्हण मुलीशीच लग्न कर. नंतर म्हणू लागली की मुलगी हिंदू असलेली बरी. आता ती इथपर्यंत आलीये. अजून दोन पावलं पुढे टाकावी लागतील तिला."

"तू गे आहेस हे आतापर्यंत कुणाला सांगितलं आहेस का?" मला कमिंग आऊटचा अनुभव आहे का, याचा अंदाज घेण्यासाठी त्यांनी हा प्रश्न विचारला असावा.
"हो. माझ्या सर्व जवळच्या मित्रमैत्रिणींना सांगून झालंय. एखादा अपवाद वगळता सगळ्यांनी आगदी मनापासून स्वीकारलंय. कुणाच्याही वागण्यात काहीही बदल झाला नाही, हे विशेष. पहिल्यांदा जेव्हा मित्राला सांगितलं तेव्हा खूप हिंमत एकवटावी लागली. दोनतीनदा सांगायचं ठरवून रद्द केलं. मग मनाचा हिय्या करून सांगितलं. मला भीती होती की तो कसा रिअॅक्ट करेल. मला सोडून तर देणार नाही ना, गावभर बोभाटा तर करणार नाही ना, असे अनेक किंतु-परंतु होते. स्वतःच्या लैंगिकतेबद्दल पहिल्यांदा सांगत असताना मला अक्षरशः सगळे कपडे काढून ठेवत असल्यासारखं वाटत होतं. विनाकारण खूप शरम वाटत होती. त्याला सांगितल्यानंतर जेव्हा माझ्या जवळच्या मैत्रिणीला सांगितलं, तेव्हा तर कुठे तोंड लपवू असं झालं होतं. मित्रांपेक्षा मैत्रिणींना सांगणं जास्त कठीण आहे, हे जाणवलं. पण आता भीती आणि लाज दोन्ही कमी झालंय. आता माझ्या सगळ्या जवळच्या लोकांना माहिती आहे."
"म्हणजे बहिणीलाही सांगितलं आहेस?"
"नाही. जवळच्यांपैकी फक्त ती आणि आईच राहिल्या आहेत."
"मग तू आधी बहिणीला सांगावंस. कारण आई आधी बहिणीलाच सांगणार."

त्यानंतर बिंदुमाधव खिरेंनी जे काही केलं ते अफलातून होतं! माझं कमिंग आऊट यशस्वी होण्यासाठी त्यांनी त्रिसूत्री उपाय काढला. पहिलं सूत्र म्हणजे त्यांनी माझी आई बनून 'माॅक कमिंग आऊट सेशन' केलं! होय, बिंदू माझी आई झाले! त्यांनी मला अनेक अडचणीचे प्रश्न विचारले. मी सुचतील तशी उत्तरं दिली. मग मी दिलेली उत्तरं कशी अधिक प्रभावी पद्धतीने द्यायची, ते त्यांनी सांगितलं. यामुळे माझा आत्मविश्वास वाढला.

दुसरं सूत्र म्हणजे त्यांनी मला तीन पुस्तकं दिली. एक पुस्तक FAQs म्हणजे वारंवार विचारल्या जाणाऱ्या मूलभूत प्रश्नांबद्दलचं होतं. उदाहरणार्थ, समलिंगी संबंध नेमके कसे असतात? हे नैसर्गिक आहे की वातावरणावर अवलंबून असतं? वगैरे वगैरे. दुसरं पुस्तक समलिंगी मुलामुलींनी लिहिलेल्या अनुभवांचं होतं. तिसरं पुस्तक समलिंगी मुलामुलींच्या पालकांनी लिहिलेलं होतं. तिन्ही पुस्तकं मला पुढच्या दोन दिवसांत खूप महत्त्वाची ठरणार होती.

तिसरं सूत्र म्हणजे त्यांनी माझ्या घराच्या आजूबाजूच्या गे-फ्रेंडली मनोविकारतज्ज्ञ डाॅक्टरांचे नाव, नंबर, पत्ते दिले. दोन जणांशी ते स्वतः बोलले आणि अमूक तारखेला इतक्या वाजता तुम्हाला मदतीसाठी फोन येऊ शकतो किंवा अचानक तुमची अॅपाइंटमेंट घ्यावी लागू शकते, असा अंदाज दिला. "एकदा कमिंग आउटचा बाण धनुष्यातून सुटला की डाॅक्टरांच्या अपाॅइंटमेंटसाठी वाट पाहणं जड जातं", म्हणत त्यांनी आधीच तजवीस करून ठेवली. आश्चर्य म्हणजे समलैंगिकता हा अजिबात मानसिक आजार नाहीये, ते नैसर्गिक आहे, हे अनेक डाॅक्टरांनाही ठाऊक नसतं! भारतात डाॅक्टरांना याबद्दल काही शिकवलंच जात नाही! त्यामुळे गे-फ्रेंडली डाॅक्टर माहीत असणं गरजेचं. त्याच बरोबर बिंदूंनी आणखी एक गोष्ट केली. त्यांनी माझ्या घराच्या जवळपासच्या दोघा-तिघा गे मुलांच्या पालकांना माझ्या कमिंग आऊटच्या तारीख आणि वेळ यांची कल्पना देऊन ठेवली. पालकांना पालक अधिक चांगल्या पद्धतीने समजवू शकतात, असा त्यांचा अनुभव होता.

बिंदूंच्या त्रिसूत्रीने सज्ज झाल्यानंतर मी थेट कोथरुडात ताईच्या घरी गेलो. ती नुकतीच आॅफिसातून थकूनभागून घरी परतली होती. पण या कशाचाही विचार न करता मी तिला म्हटलं, "तुझ्याशी जरा महत्त्वाचं बोलायचंय. आपण बाहेर जाऊया का?" मी अचानक असा पुण्याला आलो, आल्यानंतर आधी कुणाला तरी भेटून आलो. आता बोलण्यासाठी घराबाहेर यायला सांगतोय, यांवरून तिला परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं. ती तशी समजूतदार आहे. लहानपणी खूप भांडायची. मारामारीही करायची. पण अलीकडे ती शांत आणि समंजस झालीये. लग्नानंतर तर अचानक पोक्त माणसासारखी वागू लागलीये.

सूर्यास्ताला थोडा वेळ बाकी असेल, तेव्हा आम्ही तिच्या घराजवळच्या बागेत पोहोचलो. काही मुलं खेळत होती. बरेच सीनियर सिटिझन्स फेऱ्या मारत होते. "काही सीरियस आहे का?" ताईने काळजीच्या स्वरात विचारलं. मी बहुधा कोणत्या तरी भलत्या जातीच्या मुलीच्या प्रेमात वगैरे पडलो असेन, अशी शंका तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. कारण माझ्या आयुष्यात समस्या तेवढी एकच उरली आहे, असं सगळ्यांना वाटत होतं! लग्नाचा विचार आल्याने डोक्यात तिडीक गेली! मी २८ वर्षांचा आहे, मान्य आहे, पण लग्नाबद्दल बोलल्याशिवाय एक दिवसही जगू देणार नाही का लोक? फार आढेवेढ न घेता मी तिला सरळ सांगितलं, "ताई, मी गे आहे. मला मुलं आवडतात." एकदम शांतता पसरली. दूरवर खेळणाऱ्या मुलांचे आवाज स्पष्टपणे ऐकू येऊ लागले. मी सांगायला घाई केली की काय, असं वाटू लागलं. आता ही काय प्रतिक्रिया देते, याचा मला अंदाज येईना. ती रडेल की मला नाकारेल की हिला मुळात हा प्रकार तरी नीट माहिती आहे की नाही की काय की काय. प्रत्येक्ष क्षण खूप मोठा वाटू लागला. "ठीक आहे," असं म्हणत तिने अस्वस्थ शांततेचा भंग केला. माझ्या पाठीवर हात ठेवला. माझ्या जिवात जीव आला. माझ्याहून फक्त तीन वर्षांनी मोठी असलेली शिल्पाताई इतक्या पटकन हे सगळं स्वीकारेल, अशी मला अजिबातच अपेक्षा नव्हती!

मला स्वतःलाच स्वतःची लैंगिकता स्वीकारायला सात-आठ वर्षं लागली होती. मला मुलं आवडतात, हे मला नववी-दहावीत कळू लागलं होतं. मला देखण्या मुलांकडे पाहायला आवडायचं. पण हे नेमकं काय आहे, हे ठाऊक नव्हतं. मुलांवर मी प्रेम करू शकतो, त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवू शकतो, लग्न करू शकतो, हे सगळं वेगळं पण नाॅर्मल आहे, हे सगळं कळायला बराच उशीर झाला. मला मुलं आवडतात हे कळत असताना पण माझं लग्न मुलीशीच होईल, असं मला शाळेत वाटायचं. कारण लग्न मुलीशीच होतं, असं मी लहानपणापासून पाहत आलो होतो. माझ्या समाजाने मला गे रिलेशनशिपचं एकही उदाहरण तोवर दाखवलंच नव्हतं! किंबहुना असं काही असतं, हे गावीही नव्हतं! आपली बायको कशी असेल, तिचे लांब केस असतील, मी तिला गजरा आणेन, ती स्वयंपाक कसा करेल, आईची सेवा करेल वगैरे साचे मनात तयार होते. आपल्या अवतीभोवतीच्या गोष्टी पाहून इतरांप्रमाणे मीही अशीच स्वप्नं सहाजिकपणे रंगवली होती. पण बायकोवर प्रेम करावं लागतं, तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवावे लागतात, त्यासाठी मुळात मुलींबद्दल आकर्षण लागतं, याचा विचार मी केलाच नव्हता! त्यामुळे हळुहळू जसं मला समलैंगिकतेबद्दल कळू लागलं, तसा मी 'तो मी नव्हेच' भूमिकेत जाऊ लागलो. कारण मी गे आहे, असं स्वीकारलं, तर मानतली बायको, लग्न, मुलं, कुटुंब, सुखी संसार, सणवार, वगैरे सगळी स्वप्नं एका फटक्यात पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळणार होती! मला मुलं आवडतात, मला त्यांच्याबद्दल मानसिक आणि शारीरिक आकर्षण वाटतं, पण मी गे नाही, अशा विचित्र 'डिनायल' (अस्वीकार) अवस्थेत मी अनेक वर्षं होतो. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्या काॅलेजच्या काळात माझा हा गुंता सोडवायला कुणीच नव्हतं. याबद्दल मी कुणाशी बोलत नव्हतो. भीतीपोटी कोणत्या 'समपथिक' किंवा 'हमसफर' यांसारख्या संस्थेत जाण्याचा प्रश्नच नव्हता. अखेर माझी सारी बिनबुडाची स्वप्नं मोडून मी स्वतःची लैंगिकता स्वीकारली, तोवर मी पंचविशी गाठली होती. बंगलोरसारख्या पुढारलेल्या शहरात राहिल्यामुळे हे शक्य झालं. नाहीतर कदाचित एव्हाना माझ्या गोंधळलेल्या अवस्थेत माझं लग्नंही लावून दिलं गेलं असतं! मी गे असल्याचं स्वीकारल्यानंतर मला मोकळं वाटलं, पण तोपर्यंतचा प्रवास फार वेदनेचा होता. अजाणत्या वयापासून स्वतः एकएक वीट जोडून उभा केलेला स्वप्नांचा बंगला स्वतःच्या हाताने जमीनदोस्त करणं कठीण असतं.

मला जे स्वीकारायला इतकी वर्षं लागली, ते शिल्पाताईनं एका मिनिटात कसं पचवलं? तिला आधीपासून कल्पना होती का? छे! तिनं माझ्यासाठी स्वप्न रंगवली नव्हती का? खरंतर माझ्यासाठी तिनंच सगळ्यांत जास्त स्वप्नं पाहिली होती. माझ्या दहावी-बारावीपासून पोस्ट ग्रॅज्युएशनचे आॅनलाइन फाॅर्म भरेपर्यंत तिनं किती कष्ट घेतले, हे मी विसरू शकत नाही. माझ्या लग्नाबद्दलही 'शिल्पा वन्सं'चं बरंच स्वप्नरंजन करून झालं होतं. मग तिला धक्का कसा बसला नाही? मला वाटतं की तिला चांगलाच धक्का बसला असावा. पण तिनं तो दाखवला नाही. मी लग्नाबद्दल कधीच काहीच बोलत नाही, हे तिच्या निरीक्षणातून सुटलं नसेल. त्यामुळे तिच्या मनाची थोडीफार तरी तयारी असेलच. ती पुण्यासारख्या मेट्रो शहरात साॅफ्टवेअर इंजिनीयर आहे, त्यामुळे तिनं कदाचित गे मुलं पाहिलीही असतील. कुणी तिच्या ओळखीचाही असेल. गे आहे, म्हणजे आयुष्य खड्ड्यात जात नाही, हे कदाचित तिनं पाहिलं असेल. कदाचित ती अधिक समजूतदार झाली असल्यामुळे मला समजून घेऊ शकत असेल. तिच्या मनात त्यावेळी नेमकं काय सुरू होतं हे आजवर तिनं मला सांगितलं नाही. मी तिला विचारलं नाही. माझ्या सख्ख्या बहिणीनं मला कोणतेही आढेवेढे न घेता, कोणतेही प्रश्न-उपप्रश्न न विचारता, आहे तसं स्वीकारलं, याहून मोठा आनंद नव्हता. माझ्या मनावरचा एक मोठ्ठा दगड बाजूला झाल्यासारखं वाटत होतं. मग आम्ही उठलो आणि सूर्यास्तापर्यंत फिरत फिरत बोलत होतो. तिनं विचारलं नसलं, तरी तिच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह मला दिसत होतं. काही गोष्टी मी स्वतःहून सांगितल्या. शेवटी ती म्हणाली, "अभिजित, तू अजिबात काळजी करू नकोस. मी तुझ्यासोबत आहे. पण आईला सांगणार आहेस का?" मी म्हटलं, "उद्या सांगावं असं म्हणतोय. मला अजून तीन दिवस सुटी आहे. उद्या सांगितलं तर मी दोन दिवस तिच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तिच्या जवळ असेन."
"अरे पण उद्या मला महत्त्वाच्या मीटिंग्ज आहेत. आमचे आयर्लंडहून क्लाएंट्स येणार आहेत," ती म्हणाली.
"तू उद्या असतीस तर बरं झालं असतं. उद्या कोणत्याही परिस्थितीत मला आईला सांगावंच लागेल. ही संधी गेली तर पुन्हा काही महिने वाट पाहावी लागेल."
"मग तू एक काम कर.. आईला माझ्याकडे घेऊन ये, मी लवकर घरी येईन," तिनं मधला मार्ग काढायचा प्रयत्न केला. मी स्पष्ट नकार दिला. कारण बिंदुमाधव म्हणाले होते की आईला ती ज्या घरात राहते, जिथे ती सगळ्यांत जास्त कंफर्टेबल असेल, तिथेच सांगा. आम्ही निघालो.
मी घरी पोहचेपर्यंत ताईचा मेसेज आला, "मी उद्याच्या सर्व मीटिंग्ज कॅन्सल केल्या आहेत. सकाळी ८ पर्यंत घरी येते."

दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली. आईचं टेन्शन येण्याची ही आयुष्यातली पहिलीच वेळ असावी. आई ही सदैव गृहित धरलेली व्यक्ती. ती सगळे टेन्शन्स स्वतःच्या डोक्यावर घेत असते. आज मात्र ती कशी वागणार या विचारानं मी अस्वस्थ होतो. बेल वाजली. एवढ्या सकाळी ताईला बघून आईला आश्चर्य वाटलं. "अगं काही नाही, अभिजित आलाय ना.. म्हणून आज सरळ सुट्टी टाकून आले. एरव्ही आपल्या तिघांना एकत्र वेळ कुठे मिळतो गं हल्ली." आईला तो सुखद धक्का होता. कारण खरंच आम्ही तिघं एकत्र क्वचितच येतो हल्ली. आईनं व्हाॅलेंटरी रिटायरमेंट घेतली असली, तरी आता मला आणि शिल्पाताईला वेळ नसतो. दोन्ही मुलं घरी आल्यामुळे झालेला आईचा आनंद फार वेळ राहणार नाहीये, या कल्पनेनं माझ्या काळजात चर्र झालं. तिनं माझ्यासाठी, माझ्या संसारासाठी पाहिलेली सगळी स्वप्नं पुढच्या काही तासात पुरती कोलमडणार होती. कितीही शिकलीसवरलेली म्हटली तरी शेवटी आईच ती. पती गेल्यानंतर दोन्ही मुलांसाठी राबराब राबली. आता कुठे सुखाचे दिवस येणार, असं तिला वाटत असतानाच मी तिची सगळी सुखस्वप्नं हिरावून घेणार होतो. पण माझ्या मनात अपराधीपणाची भावना अजिबात नव्हती. मी गे असल्याचं मला अजिबात शल्य नव्हतं. तिला दुःख होईल, याचं वाईट वाटत होतं. तिनं मला जसा जन्म दिला आहे, तसा मी आहे. आणि जसा मी आहे, तसा तिला सांगणं माझं कर्तव्य होतं. ते जाणून घेणं तिचा अधिकारही आहे. खरं तर हे पप्पांनाही माहीत असायला हवं होतं. पण मला काही कळायच्या आतच ते गेले.

दोन्ही मुलं आज घरी म्हणजे आजचा दिवस आईसाठी सणाहून कमी नव्हता. ती ताबडतोब स्वयंपाकघरात शिरली. थोड्या वेळात आतून साजूक तुपावर भाजल्या जाणाऱ्या रव्याचा खमंग दरवळ पसरला. शिरा करत असावी. आम्ही दोघं हाॅलमध्ये बसलो होतो. ताई म्हणाली दुपारी सांगू. मी म्हटलं नाही. आत्ताच सांगायला हवं. मी आईला हाक मारली. आई आली. "आई, मला तुझ्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे," मी म्हटलं. आमच्या दोघांच्या चेहऱ्यांकडे पाहून तिला लक्षात आलं असावं की मामला गंभीर आहे. "आलेच गॅस बंद करून." ती समोर येऊन बसली.

सुरुवात शिल्पाताईनं केली. "आई, जगात अनेक प्रकारचे लोक असतात. काही आपल्यासारखे असतात. काही वेगळे असतात. काही समाजाला मान्य असतात. काही नसतात. आपला अभिजित खूप चांगला मुलगा आहे. पण चांगुलपणाच्या समाजाच्या व्याख्या वेगळ्या असतात ना..." ताईची गाडी भलत्याच ट्रॅकवर जातेय, हे मला कळलं. तिच्या गोलगोल सांगण्यामुळे आई माझ्याकडे संशयानं पाहू लागली. शिल्पा नेमकं काय सांगतेय, हे तिला कळेना. शेवटी पाच मिनिटांनंतर मी ताईला थांबवलं. माझ्या हृदयात धडधड होत होतं. तरीही हिंमत करून आईला स्पष्ट सांगितलं, "आई, मी गे आहे. म्हणजे मला मुलं आवडतात. मला मुलींमध्ये रस नाही." आई माझ्याकडे पापणी न लवता पाहत होती. मी बोलायचा थांबलो तरी तसंच बघत होती. मी घाम पुसला. एकच शांतता पसरली होती. काय बोलावं कुणालाही सुचेना. आईला अॅटॅक वगैरे तर येणार नाही, असा थरकाप उडवणारा विचार मनात चमकून गेला! पण तसं काही झालं नाही. जणू काही झालंच नाही अशा आवेशात आई उठली. "रवा भाजून ठेवलाय ना. तो गार होतोय. आलेच मी शिरा घेऊन." आईला एकतर मी काय बोललोय ते नीट कळलं नसावं किंवा तिनं ते मनोमन नाकारलं असावं. किंवा तिला एकट्यात जायचं असेल. पण मी तिला थांबवलं. "मी काय सांगतोय ते जास्त महत्त्वाचं आहे, आई. शिरा नंतर करता येईल." एकूणच अवघडलेली परिस्थिती पाहून ताईनं पुन्हा सूत्रं हातात घेतली. "आई, गे असणं नैसर्गिक आहे. जसं कुणाला मुलगा होतो, कुणाला मुलगी होते, तसंच काहींना स्ट्रेट मुलं होतात आणि काही गे. आईच्या गर्भातच मुलाचं लिंग आणि लैंगिकताही ठरत असते." ताईनं रात्रीतून बराच गूगलवरून अभ्यास केलेला जाणवत होता.

आईला मात्र एव्हाना काय चाललंय ते हळूहळू कळू लागलं होतं. तिच्या मनात प्रश्न दाटू लागले होते. "गर्भात ठरतं? म्हणजे माझ्यात किंवा ह्यांच्यातच काही दोष होता का?"
"अगं आई, दोष काही नाही यात. हे एकदम नाॅर्मल आहे. समाजात साधारण दीड-दोन टक्के मुलं-मुली गे किंवा लेस्बियन असतातच. फक्त त्याबद्दल आपल्याकडे कुणी बोलत नाही, म्हणून कळत नाही. अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशात तर आता गे मुलांची एकमेकांशी आणि लेस्बियन मुलींची एकमेकींशी कायद्याने लग्नंही होतात." गे लग्न वगैरे अकल्पनीय गोष्टी ऐकण्याच्या मनस्थितीत आई नव्हती.
"म्हणजे तुला मुली कधीच आवडल्या नाहीत? तुला तर किती मैत्रिणी होत्या शाळेत आणि काॅलेजात. तू तर त्यांच्याशी फोनवर तासन् तास गप्पा मारायचास," आई अजूनही स्वीकारायला तयार नव्हती.
"आई, त्या माझ्या फक्त मैत्रिणी होत्या."
आईला मुळात समलैंगिकतेबद्दल फारसं काही माहीत नाहीये, हे तिच्या चेहऱ्याकडे आणि प्रश्नांकडे पाहून कळत होतं. मी ताबडतोब बिंदुमाधव खिरेंची तिन्ही पुस्तकं तिच्या हातावर ठेवली. तिने ती उघडूनही पाहिली नाहीत.

आईनं मोर्चा शिल्पाताईकडे वळवला. "शिल्पा, तुला हे सगळं माहीत होतं तर?" आईनं कोरड्या स्वरात विचारलं. सगळं खरं सांगायचं, असं आम्ही ठरवलं होतं. शिल्पाताईनं काल संध्याकाळी कळल्याचं सांगितलं. "आई, काल यानं सांगितल्यानंतर मी स्वप्नाशी बोलले. ती गायनॅकोलाॅजिस्ट असली तरी तिला यातलं माहीत होतं. ती म्हणाली गे असणं एकदम नाॅर्मल आहे. मग मी इंटरनेटवरही बरंच वाचन केलं रात्री बसून. आई, हे सगळं एकदम कळल्यामुळे धक्का बसतो, पण हे आपल्याला स्वीकारावंच लागणार आहे."
आईच्या मनात अनेक भावना एकत्र दाटत असाव्यात. आपण याला 'असा' जन्म दिल्याची अपराधीपणाची भावना, हे योग्य किंवा नैतिक आहे की नाही याबद्दल शंका, याचं आता पुढे काय होणार, ही काळजी. नुसतं खरचटलं तरी आपल्याकडे धावत येणाऱ्या आपल्या मुलानं एवढी मोठी गोष्ट इतकी वर्षं आपल्यापासून लपवून ठेवल्याची खंतही तिला वाटत होती. "हे तू तेव्हाच का नाही सांगितलंस मला?" आता तिचा स्वर कापरा होऊ लागला होता. "आई, अगं मलाच माहीत नव्हतं माझ्या मनात काय चाललंय ते. मीच गोंधळलो होतो. मी गे आहे, असं मलाच माझं स्पष्ट व्हायला अनेक वर्षं लागली. मी बंगलोरमध्ये गेल्यावर तिथल्या मोकळ्या वातावरणात मला माझी ओळख पटली. इथे असेपर्यंत मी नुसतात चाचपडत होतो. तिथे आॅफिसात गे मुलं आहेत. त्यांना त्यांच्या घरच्यांनीच नाही, तर आॅफिसमधल्या लोकांनी पण आहे तसं स्वीकारलं आहे. आमच्या आॅफिसात गे मुलांसाठी विशेष पाॅलिसी पण आहे."

आईला पहिल्याच वेळेत फार सांगून गोंधळून टाकायचं नव्हतं. तसंच तिच्या चेहऱ्यावरचा ताण आता स्पष्ट दिसू लागला होता. शिल्पाताई उठली. म्हणाली मी शिरा करते. आता जेवायलाच बसू थोड्या वेळात. मी पण फोन आल्याचं नाटक करून बाजूच्या खोलीत गेलो. ताई आईला स्वयंपाकघरात घेऊन गेली. आई तशी ठीक होती. गोंधळलेली होती. पण उद्ध्वस्त वगैरे अजिबात नव्हती. मी बिंदुमाधव खिरेंना फोन केला. मोहीम फत्ते म्हणून सांगितलं. ते शांतपणे म्हणाले, "आता तर सुरुवात आहे. पुढचं किमान एक वर्ष बघ काय होतं. पालक कितीही शिकलासवरला आणि समजूतदार असला, तरी त्याला पूर्णपणे स्वीकारायला एक वर्ष लागतंच. तुझी खरी परीक्षा तर आता सुरू झाली आहे!"

बिंदुमाधवांचे शब्द खरे ठरले. जेवणं झाली. आई आम्हाला गरमागरम पदार्थ वाढण्यात व्यग्र होती. ताईनंही सोहमच्या गमती सांगून मूड हलकाफुलका ठेवला. जेवण झाल्यानंतर मी वामकुक्षीसाठी लवंडलो. थोड्याच वेळात मला स्वयंपाकघरातून हुंदक्यांचा आवाज आला. मी आत गेलो. आई ओट्याजवळ खाली बसून रडत होती. मी तिच्या जवळ गेलो. मला पाहून तिने पदरानं डोळे पुसले. ती स्वतःलाच दूषणं देत होती. "माझ्यातच काहीतरी दोष असेल, म्हणून तू असा जन्माला आलास. यावर काहीतरी उपाय असेलच की? का तुला आयुष्यभर असंच एकट्यानं जगावं लागणार?" आईनं पुन्हा डोळ्यांना पदर लावला. आईची ही अवस्था मला पाहवत नव्हती. मलाही रडू येत होतं. पण मी मोठ्या मुश्किलीनं अश्रू आवरले. मीही रडलो असतो, तर तिनं कुणाकडे पाहायचं? हे सगळे प्रश्न येणार याची बिंदूंनी कल्पना दिली होती. चिडायचं नाही, वैतागायचं नाही, परत परत विचारलं तरी शांतपणे उत्तरं द्यायची, असं त्यांनी सांगितलं होतं. मी तेच केलं. तिच्या एकएक प्रश्नाचं शांतपणे निरसन करण्याचा प्रयत्न केला. "आई, दोषाचा प्रश्नच कुठे? मी अजिबात सदोष नाही. मी एकदम नाॅर्मल आहे. मला कुठलाही आजार नाही. त्यामुळे उपायाचाही प्रश्न नाही. तुला हवं असेल तर आपण डाॅ. पाटलांकडे जाऊ शकतो. जायचं का आत्ता?" ती नको म्हणाली. "मला याबद्दल कुणाशीही बोलायचं नाही." आमचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून तिनं उठून स्वयंपाकघराची खिडकीही बंद केली.

दुसऱ्या दिवशी मी घरात राहायचं टाळलं. कारण मला पाहून तिला रडू येतं, असं माझ्या लक्षात आलं. संध्याकाळभर तिच्याशी बोलून तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊन झाली होती. मीही थकलो होतो. मी मित्रांना भेटायला सकाळी निघालो. शिल्पाताई रात्रीच तिच्या घरी गेली होती. त्यामुळे आज ती दिवसभर घरात एकटी असणार होती. मी दुपारी जेवायला नसेन, असं सांगून मी सकाळी निघालो. मी कुठे चाललोय ते आईनं विचारलं नाही. मित्रांना भेटून मला रिलॅक्स्ड वाटलं. पण आई घरी ठीक असेल की नाही, याची हुरहूर होतीच. म्हणून तिला मध्येच दोनतीन वेळा फोन केले. ती नाॅर्मल होती. संध्याकाळी मी परतलो तेव्हा आईनं मला धक्का दिला. काल ज्या तीन पुस्तकांकडे तिने ढुंकूनही पाहिलं नाही, ती तिन्ही पुस्तकं तिनं दिवसभरात अधाशासारखी वाचून काढली होती! तिच्या बऱ्याच शंकाचं निरसन झालं होतं. समलैंगिकता नैसर्गिक आहे, हे तिला पटलं होतं. त्यामुळे 'डाॅक्टरकडे चल' वगैरे गोष्टींचा प्रश्नच नव्हता. थोडक्यात, तिला कळलं होतं, वळायला वेळ लागणार होता. धक्क्यातून ती सावरली होती. प्रश्नांची उत्तरं मिळाली होती. आता उरल्या होत्या त्या फक्त भावना - काळजी, दुःख आणि भीती. मुलाच्या भविष्याची काळजी, स्वप्नभंगाचं दुःख आणि समाजाची भीती. पण आता आई बऱ्यापैकी ऐकण्याच्या आणि समजण्याच्या स्थितीपर्यंत आल्याचं जाणवलं. मला मुलं कधीपासून आवडतात, असं तिनं विचारलं. मी कुठलाही आडपडदा न ठेवता सारं काही सांगितलं. शाळेत मला मुलांकडे पाहणं आवडू लागल्यापासून ते बंगलोरमध्ये झालेल्या साक्षात्काराबद्दल. माझा सविस्तर मोनोलाॅग तिने शांतपणे ऐकला. मग मी आईला घट्ट मिठी मारली. आई म्हणाली, "चल बाळा, तुला भूक लागली असेल. तुझं पान वाढते. हातपाय धू." मला आता खूपच हलकं हलकं वाटत होतं. इतकं हलकं आयुष्यात कधी वाटलं नव्हतं. मी गे आहे, हे कुणाला कळलं, तर शेवटची भीती नेहमी हीच होती की त्यानं आईला सांगितलं तर काय होईल? आता ती भीती पळून गेली होती. माझ्या आईनं मला स्वीकारलं होतं!

निरोप घेताना अर्थातच आई पुन्हा रडली. यावेळी तर ओक्साबोक्शी रडली. मलाही अश्रू आवरले नाहीत. मी बंगलोरला पोहोचल्यावर आईचा खरा त्रास सुरू झाला. एकट्या घरात ती विचार करत बसायची. तिच्या मृत्यूनंतर माझी काळजी कोण घेईल, हा एकमेव विचार आता तिला भेडसावत होता. मला बाॅयफ्रेंड आहे, हे सांगण्याची वेळ आता आली होती. पुढे ती बंगलोरला आली, तेव्हा त्यांची भेट झाली. आईनं त्याला मुलासारखंच मानलं. अगदी फ्रेंच सिनेमात शोभावी, एवढी माझी आई लिबरल झाली आहे! अमरावतीत शिकलेली आणि ग्रामीण भागात नोकरी केलेली माझी आई मला नवनवीन धक्के देत होती. पहिल्यांदा आली, तेव्हा तिच्या आणि माझ्या बाॅयफ्रेंडच्या तासनतास गप्पा चालायच्या! एकदा तर त्याला सुटी होती त्या दिवशी दोघांनी मिळून माझ्यासाठी माझ्या आवडीचा स्वयंपाक केला!

आईचे वर्षभरात लॅप्सेसही झाले. म्हणजे एखाद्या दिवशी ती पुन्हा दुःखाच्या खाईत जायची आणि फोनवर रडायची. सुरुवातीला मी तिला शांतपणे उत्तरं दिली. नंतर मात्र मी स्पष्टपणे बोलू लागलो. "आई, तू स्वतःला जेव्हा दोषी म्हणतेस, तेव्हा मी सदोष आहे, असं गृहीत धरतेस. मला जर तू पुन्हा असं म्हटलं, तर मी फोन ठेवून देईन." माझ्या स्पष्ट बोलण्याचा फायदा झाला. आता ती पूर्णपणे शांत आहे. आनंदी आहे आणि माझ्या भविष्याबद्दल आश्वस्त आहे. आपले आईवडील हे आपल्यापेक्षा जास्त परिपक्व आणि समजूतदार असतात, याचा आपल्याला विसर पडतो आणि आपण त्यांच्यापासून गोष्टी लपवतो. त्यांना खरं काय ते सांगितलं, तर ते नक्की स्वीकारतात. काही जण बुद्धीनं स्वीकारतील, काही पटलं नाही तरी प्रेमापोटी स्वीकारतील. रोज खोटं बोलण्यापेक्षा एकदा हिंमत करून खरं सांगितलं की आयुष्य सोपं होतं.

***

श्री. अभिजीत देशपांडे यांचा ईमेल-पत्ता - adamindia@gmail.com

***

पूर्वप्रसिद्धी - 'माहेर' (जानेवारी - २०१६)

***

हा लेख मायबोली.कॉमवर प्रकाशित करण्यास अनुमती दिल्याबद्दल श्री. अभिजीत देशपांडे व श्रीमती सुजाता देशमुख (मेनका प्रकाशन) यांचे मनःपूर्वक आभार.

***
विषय: 
प्रकार: 

'सैराट' धाग्यावरच्या आणि ह्या धाग्यावरच्या प्रतिक्रिया ह्यात बराच फरक दिसतोय, हाच जर मंजुळेचा सिनेमा असता तर?
कित्येक लोक्स त्यांच्या प्रतिक्रिया बदलतिल. Wink

अप्रतिम लेख. मायबोलीवर दिल्याबद्दल धन्यवाद.
I dont know, its just me may be - पण मला ते नावातलं ' श्री' डिस्टर्ब करतंय. ते स्पेसीफीकली सर्कॅझम म्हणून लिहिलं आहे, की लेखकाची नाव लिहायची तशी पद्धत , की केवळ एक नॉर्म मला कल्पना नाही याबद्दल. कोणतीही पॉसीबीलीटी असू शकते.
पण लेखाचा जो विषय आहे, त्यात जी gender based social structure च्या पलीकडे जाऊन स्वतःला 'स्वतः असणं' accept करणं, अश्या व्यक्तीचं 'व्यक्ती' असणं समाजानं स्वीकारणं हाबद्दल जे मॅच्यूअर्ड विचार लिहिले आहेत. त्या बॅकग्राऊंडवर नावाच्या मागे 'श्री' लिहायची खरंच गरज आहे का? की ते मुद्दामून काही विचार व्यक्त करायला लिहिलंय? असा प्रश्न येतोय माझ्या मनात आणि तो अस्वस्थ करणारा विचार आहे.

Rar,
Gender identity and homosexuality are not the same. A person might identify them-self as 'male' and 'homosexual'. Transgender people can be gay, lesbian, bisexual or straight. I feel that you assume that every homosexual renounces his / her gender identity, which is not correct. 'Shree' is a common honorific like Mister or Doctor. And it should be used without any preconceived notions about the person's sexuality. If a person identifies himself as 'male', then he should be addressed by the proper honorific even if he is homosexual.

Also, the article does not speak anything about gender fluidity. Nor it comments about a 'social structure without gender'.

एखादा मुलगा वा मुलगी हे समलिंगी आहेत हे तर त्यांच्या वागण्याबोलण्यातून खूपदा कळतं. ते असं स्पष्टपणे सांगाव लागत नाही.>> असं काहीही नसतं.

माझ्या सोबत एक मुलगा काम कराय्चा, वागणं, बोलणं अगदी मुलीसारखं होतं पण तो काही गे नव्हता, आता लग्न होऊन मुलंही आहेत त्याला आणि बायकोसोबत खुप नॉर्मल आयुष्य जगतोय आणि माझ्या मुलीच्या मैत्रिणीची आई आणि तिची पार्ट्नर बघून बोलून गे वाटत नाहीत.

Gender identity and homosexuality are not necessarily the same. > येस. मान्य.
Also, I am not assuming anything about anyone for sure. Its a complex issue and I certainly understand its complexity as well as consequences of the complexity.
कदाचित माझा मुद्दा मला नीट मांडता आला नसावा. मला असं म्हणायचंय की आपल्या समाजात 'श्री','श्रीमती' ' सौ' ' मिस' मिसेस' ह्या सगळ्याचे स्पेसीफीक अर्थ आणि आयडेंटीटी आजही आहे रादर ती ग्रूहीत धरली जाते अनेकदा. शिवाय ह्या सगळ्या बिरुदांबरोबर एक प्रकारचं डीस्क्रीमेनेशन देखील आहे समाजात. नुसतं मिस्टर किंवा डॉक्टर लिहिण्याइतकं साधं सरळ सोपं नाहीये ते. These words have their own nuances.
मग 'एकदा मी गे आहे' असं म्हणून रूढार्थाने, लौकीक समाजात जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारता तेव्हा परत समाजातले हे पुरुषरूपी, स्रीरूपी, मॅरीडस्त्रीरूपी, विधवा स्त्री रूपी इंडीकेटर्स कशाला लावायचे नावापुढे? असा मला प्रश्न पडला.

आता थोडं यापुढे जाऊनही लिहिते. अशीच डिस्टर्ब मी अजूनही ' blue is the warmest color' पाहूनही झाले.
एकदा दोने मुली रीलेशनमधे आहेत, किंवा लेस्बीयन आहेत हे मान्य केल्यावर, त्या दोघी एकत्र असताना परत एकदा ' त्यातली फीमेल - बीटा फीमेल - ही घरातली कामं करण्यात इंटरेस्ट असणारी' आणि ' अल्फा मेल - बाहेरच्या गोष्टी, सपोर्ट, स्ट्राँग' ह्या रूपात. माझ्या काही गे, लेस्बियन मित्रमंडळींनाही मी याबाबत विचारत असते.
एकदा लौकीकार्थाने रूढ ' स्त्री - पुरुष' ह्या संकल्पनांच्या बाहेर पडल्यावर देखील, परत त्या नात्यात 'एक स्त्री - एक पुरुष, त्यातली स्त्री जास्त हळवी, घरातल्या कामात रस तर पुरुष जास्त डॉमीनेटींग' - हा लौकीक स्री-पुरुष फरक हा होत असावा? ह्याबद्दल मला खरंच प्रश्न पडतात आणी ते पडत राहतील.

ह्या आत्ताच्या लेखातही वाचून मला शंका नाही आल्या कोणत्या. ना प्रामाणिकपणाबद्दल, त्याच्या कंटेट बद्दल काही शंका वाटल्या. पण नक्कीच मी वर जो 'श्री' लिहिण्याबद्दल विचार आला हे लिहिलं - तो विचार मात्र सतावतोय. आणि ह्याबद्दल मी अजूनही काही लोकांशी बोलीनही.
शिवाय मी हा प्रश्न विचारून काही ऑफेन्सेव्ह, किंवा लेखाला समजून न घेणारं विधान केलंय असंही मला वाटत नाही. मला खरंच क्यूरीअ‍ॅसीटी वाटली. आणि एकीकडे आता हे लिहिताना मला हे ही वाटतंय की असे प्रश्न पडणं, आणी त्यांचा शोध घेणं, त्यावर बोलणं आवश्यकच आहे. कारण कदाचित त्यातूनच आपण ह्या issue ला, ह्या लोकांच्या विचारांना, मानसिकतेला समजून घेऊ शकू.

<मग 'एकदा मी गे आहे' असं म्हणून रूढार्थाने, लौकीक समाजात जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारता तेव्हा परत समाजातले हे पुरुषरूपी, स्रीरूपी, मॅरीडस्त्रीरूपी, विधवा स्त्री रूपी इंडीकेटर्स कशाला लावायचे नावापुढे? असा मला प्रश्न पडला.>

Again, gender and sexuality are different. The author is talking about his sexuality, not his gender.

I do not think there is any discrimination associated with the honorific 'shree'. Yes, 'sau' and 'shreemati' convey a sense of discrimination. But 'shree' simple indicates that the person is male.
One can stop using these honorifics altogether, but not because of sexuality. The reason, probably, would be to end gender-discrimination associated with these honorifics.

लौकीक समाजात जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारता तेव्हा परत समाजातले हे पुरुषरूपी, स्रीरूपी, मॅरीडस्त्रीरूपी, विधवा स्त्री रूपी इंडीकेटर्स कशाला लावायचे नावापुढे? असा मला प्रश्न पडला. >>
इथे हिअर कम Mr & Mr , किंवा mrs and mrs अशा थीमचे वेडिंग इन्व्हिटेशन्स, कार्ड्स, केक टॉपर्स, आणी सर्व प्रकारचे वेडिंग एफिमेरा सर्रास मिळतात . त्यामुळे इथल्या गे अन लेस्बियन्स मधे मला तरी सिंगल / मॅरिड स्टॅट्स किंवा जेंडर दिसू नये असा प्रयत्न आढळत नाही.
स्वतःला गे म्हणून स्वीकारणे म्हणजे पुरुषरूपी, स्रीरूपी, इंडीकेटर्स किंवा मॅरिटल स्टॅटस नाकारणे या पेक्षा वेगळे आहे .

मेधा, चिन्मय... आत्ताच ५ मिनीटापूर्वी मी माझ्या एका टेक बरोबर, जो गे आहे, हे डिस्कस केलं. तो आणि त्याचे अनेक गे मित्र, स्वतःला 'मिस्टर' म्हणून घेत नाहीत. They object it rather oppose this notion. रादर मी हा प्रश्न विचारला, कारण एका इन्व्हीटेशनवर माझ्या एका गे मित्रानं 'मिस्टर' ह्या शब्दावर आक्षेप घेऊन ते बदलायला लावलं होतं.

rar,

<एकदा लौकीकार्थाने रूढ ' स्त्री - पुरुष' ह्या संकल्पनांच्या बाहेर पडल्यावर देखील> I think this is an assumption you are making.
If someone doesn't like being addressed as Mister or Mrs., then that's a personal choice. I googled and came across no such etiquette. I would definitely ask a transgender about the preferred honorific. But at the same time I would not stop using the male honorific because the person is gay (unless he objects), while using the same honorific for heterosexual males.

गे म्हणजे फक्त व्यक्तीला सेक्शुअली कोण आवडतो इतकं आणि इतकचं आहे, लैकिकार्थाने स्त्री, पुरुष या संकल्पनातून बाहेर पडणे नाही.
पुरुष आवडतो म्हणजे ती व्यक्ती काही रूल ब्रेक करून लार्जर द्यान लाईफ होते असं नाही.

Its not me Chinmay, our society has. and not just assumed it, but most part of our society still runs or functions on these assumptions. म्हणूनच मी लौकीकार्थानं हा शब्द वापरतीये परत परत.

रार,

तुमच्या 'संपादीत' पोस्टमधून एक अधिक क्लिष्ट मुद्दा सरफेसवर आला असे वाटते. समलिंगींमध्येही एक काहीसा पुरुषांप्रमाणे व एक काहीसा स्त्रीप्रमाणे असे 'बिहेव्हियर' दिसत असेल तर तसे का, असे काहीतरी मला त्यातून समजले. (हे माझे समजणेच चूक असेल तर पुढील प्रतिसाद दखलपात्र समजला जाऊ नये). जे समजले ते योग्य असेल तर ते लेस्बियन्ससंदर्भात अधिक लागू होते आणि 'गे' संदर्भात 'नाही लागू होत' असे मला वाटते. (ह्याचे कारण दोन स्त्रियांमध्ये कोणतीही स्त्री पुरुषाची भूमिका 'त्या क्षणी' कशी निभावणार, हे वाटते. हे पुरुषांमध्ये होणार नाही, असेही वाटते). साईनफिल्ड्समध्ये ह्यावर एक विनोदही होता, दोन स्त्रिया आळीपाळीने 'मेल पार्ट' प्ले करतात का असा प्रश्न विचारून हशा मिळवलेला होता. हे अगदीच अवांतर!

मुळात, समलिंगी संबंध ठेवतानाही फॅन्टसी जर भिन्नलिंगी संबंध अशीच असेल तर त्याला काय म्हणावे? तसे नसणारच आणि नसेलच असे मान्य केल्यानंतर तुम्ही वर नोंदवलेला बीटा आणि अल्फाचा मुद्दा सलत राहतो.

Rar,
I would have agreed with you had you made a point about not using ANY honorific which smacks of discrimination of any kind. Why use 'sau' or 'shreemati'? Why use 'shree' for heterosexual males? Isn't not using the male honorific for people who are gay but male another kind of discrimination?

>> If someone doesn't like being addressed as Mister or Mrs., then that's a personal choice

>> Isn't not using the male honorific for people who are gay but male another kind of discrimination?

चिनूक्स, +१

सहमत.

बाकी श्री. व तत्सम संबोधनांबाबत चिनूक्स ह्यांच्या मतांशी सहमत आहे.

Exactly thats my point. Why use ANY honorific word?
इथे लेखात 'श्री' होता, म्हणून स्पेसीफीकली मी तो शब्द वापरला. म्हणूनच मी लिहिलं क्लीयरली आधी, की ' सर्कॅझम म्हणून, काही मुद्दा मांडायला की नॉर्म म्हणून?' का 'श्री' लिहिलाय याबद्दल मला कल्पना नाही, पण उत्सुकता मात्र आहे.
इथे कॉर्पोरेट्स मधे 'नावामागे काहीही लिहू नका' अशी नोशन आहे. कारण यू नेव्हर नो, कोण कशाला आक्षेप घेईल, आणि कोणाला काय डीस्क्रीमेनेटींग वाटेल,

बेफी, फक्त लेस्बीयन मधे नाही तर गे लोकांत पण 'अल्फा मेल, बीटा फीमेल' चं प्रमाण खूप जास्त आहे. हे आणी असे अनेक मुद्दे परत परत वर येत राहणार आणि सलतही राहणार.
शिवाय आत्ता आपण जे लोक पाहतो, किंवा ज्यांच्याबद्दल वाचतोय लेख लिहितोय, ते समाजाच्या कोणत्या अर्थीक, सामाजिक, शैक्षणिक स्तरातले आहेत हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा मुद्द्दा आहे. आजही समाजाच्या अनेक स्तरात ' मी गे आहे' हे स्वतः स्वीकारणं आणि त्यापुढे जाऊन सांगणं अजिबातच सोपं नाहीये.
पण या विषयावर निदान ओपनली लिहिलं, वाचलं, बोललं जातंय हे ही काही कमी नाही.... आशेला वाव आहे.

Not using ANY honorific could be insulting for some. There are some gender neutral honorifics in use, but again, their usage without permission is not advised. So the discussion about using honorifics should not involve sexuality at all. Why link the usage of honorifics to sexuality? All this while the discussion was about the use of honorifics and sexuality / gender identity.

I use honorifics WITHOUT any discrimination towards sexuality. The usage indicates whether the person is male or female. I admit that such usage comes out of habit and the necessity to show respect. I would rather not comment about the sexuality or assume anything about the gender identity by not using the honorific. Happy

>>>बेफी, फक्त लेस्बीयन मधे नाही तर गे लोकांत पण 'अल्फा मेल, बीटा फीमेल' चं प्रमाण खूप जास्त आहे.<<<

हीच शंका विचारायची आहे रार!

दोन समलिंगी एकमेकांसोबत राह्त असताना जर:

१. स्वतःला मूळ लिंगाचे व दुसर्‍याला भिन्न लिंगाचे समजत असतील आणि आनंद मिळवत असतील

किंवा

२. स्वतःला भिन्न लिंगाचे आणि दुसर्‍याला स्वतःच्या मूळ लिंगाचे समजत असतील

तर त्या संबंधांचा अर्थ हा होईल ना की त्यांचे स्वारस्य मुळात भिन्नलिंगी संबंधांमध्ये आहे मात्र प्रत्यक्षात भिन्नलिंगी व्यक्ती त्यांना (कोणत्यातरी कारणास्तव) नकोशी वाटते आणि समलिंगी व्यक्ती (भिन्नलिंगी म्हणून किंवा आपण स्वतःच भिन्नलिंगीसारखे वागू असे ठरवून) हवीशी वाटते?

मग हे समलैंगिकत्त्व कुठे झाले? हे डेव्हिएशन झाले.

पुरुषाला पुरुष हा पुरुष म्हणूनच आवडतो की स्त्री म्हणून की 'आपण स्त्रीसारखे वागू' असे ठरवल्यामुळे आवडतो हे एकुणातच कुठे क्लीअर होते?

(असेच स्त्रियांबाबतही)

>> Why use ANY honorific word?

त्यांनां "श्री" म्हणवून घेणं अपेक्षीत आणि प्रिफर्ड असू शकतं.

एक पुढचा किंवा कम्प्लिटली वेगळा मुद्दा म्हणून नावा आधी श्री, सौ, श्रीमती इत्यादी उपाध्या असाव्यात की नाही ही वेगळी चर्चा असेल?

सहज चिन्मयच्या लेखनाची यादी चाळली. प्रत्येक लेखाच्या लेखकाच्या नावाआधी 'श्री' आणि लेखिकेच्या नावाआधी 'श्रीमती' लिहिलेलं आहे. शिवाय लेखाच्या तळटिपेत 'श्रीमती' सुजाता देशमुख असा उल्लेखही आहे. त्यामुळे त्या 'श्री'चा विषयाशी संबंध असेल असं वाटत नाही. ती एक नेहमीची पद्धत वाटली.

लेख चांगला आहे. इथे दिल्याबद्दल धन्यवाद !!

Sashal,
<एक पुढचा किंवा कम्प्लिटली वेगळा मुद्दा म्हणून नावा आधी श्री, सौ, श्रीमती इत्यादी उपाध्या असाव्यात की नाही ही वेगळी चर्चा असेल?>
Exactly.

Parag,
Yes. As I said, the usage comes out of habit and it has nothing to do with the sexuality.

Also, I believe that honorifics should say nothing about the sexuality.

ओह ! म्हणजे हे 'श्री' हे चिन्मयची सवय किंवा नॉर्म म्हणून लिहिले आहे का?
मला वाटले मूळ लेखात ' खुद्द' लेखकाने तसे स्पेसीफीकली लिहिले आहे.

विषयच संपला. उत्तर मिळाले - श्री का लिहिले असावे याचे.
सॉरी फॉर ऑल द प्रश्न,पोस्टस आणि ट्रबल इफ एनी. Happy

Rar,
What's wrong if Abhijit addresses himself as Mister?
Why do you feel that homosexuals should get rid of honorifics?

Its not about being wrong or right. I am just curious about the thought process behind it.
I was just curious to know if the author wants to make any statement. If yes, whats the thought process behind that. and this question specifically wrt 'being gay' because I have witnessed few cases of people getting offended after writing/calling "Mr."

प्रश्न विचारणं, प्रश्न पडणं म्हणजे दरवेळी oppose करणं असंच होत नाही. समजून घेणं हा देखील प्रश्न विचारण्यामागचा हेतू असू शकतो की.

But why only Abhijit? Why not about others? Use of honorifics should be a matter of choice. Not sexuality.

गे आणि लेस्बियन लोकांनी स्वतःला श्री किंवा श्रीमती म्हणून घ्यावं हा त्यांचा निर्णय्/पर्सनल चॉईस म्हणून सोडून दिलं तर? तेच बरोबर नाही का? गे पुरुष बाहेरून दिसायला इतर पुरुषांसारखेच दिसणार आणि त्यांचं सेक्शुअल ओरिएंटेशन जगजाहिर नसणार तेव्हा आपण कशाला इथे बसून त्यांच्या नावापुढे हे असं का आणि तसं का हे कशाकरता डिस्कस करा?

रार, चिन्मय, सशल, बेफी, पराग, चांगले मुद्दे आणि बरेच दिवसांनी हेल्दी चर्चा. Happy
चिन्मय लेख इथे दिल्याबद्दल आभार!

Pages