'आई, मी गे आहे' - श्री. अभिजीत देशपांडे

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

यावर्षीच्या जानेवारी महिन्याच्या 'माहेर' मासिकात श्री. अभिजीत देशपांडे यांनी लिहिलेला हा लेख -

जरा भीतभीतच मी बुधवार पेठेत उतरलो. एकतर मुळातच हा भाग बदनाम. त्यात मी समाजमान्य नसलेली गोष्ट जाहीर करायला निघालो होतो. लहानपण पुण्यात गेलं असलं, तरी आईवडिलांनी कधी या गल्ल्यांमध्ये फिरकू दिलं नव्हतं. काॅलेजमध्ये या भागाबद्दल विशेष कुतूहल होतं. पण कुणी पाहील म्हणून इथून जाण्याचंही टाळायचो. गूगल मॅप्सवर पत्ता काही धड सापडेना. अखेर हिंमत एकवटली आणि एका दुकानदाराला पत्ता विचारला. त्याने सांगितलेल्या वाटेवर जाऊ लागलो. भडक कपडे घातलेल्या काही स्त्रिया आणि तृतीयपंथीय माझ्याकडेच बघत आहेत, या कल्पनेनं मला घाम फुटला होता. वर सूर्य तळपत होताच. अखेर मी 'समपथिक'च्या आॅफिसला पोहोचलो आणि लिफ्टची वाट न पाहता जिन्यानं चौथ्या मजल्यावर पोहोचलो.

एक तृतीयपंथीयानं माझं स्वागत केलं. माझ्यासाठी हे नवीनच होतं! हिजडे आतापर्यंत भेटले होते ते ट्रॅफिक सिग्नलवर किंवा रेल्वेमध्ये. पैसे नाही दिले की शिव्याशाप देणारे. आतापर्यंत त्यांच्याविषयी दोनच भावना होत्या - किळस आणि भीती! इथे मात्र स्वागत करणारी व्यक्ती या दोन्ही शब्दांपासून अनेक मैल दूर होती. व्यवस्थित साडी नेसलेली, चापूनचोपून केस बांधलेली आणि व्यवस्थित मराठी बोलणारी. "तुम्हांला कुणाला भेटायचंय?" तिनं विचारलं. "बिंदुमाधव खिरेंना," मी घाम पुसत म्हटलं. तिनं प्रेमानं आत बोलवलं. आत अनेक तृतीयपंथीय होते. ते सगळे माझ्याकडे बघू लागले. मला एकदम संकोच वाटला. मी एका कोपऱ्यात बसलो. प्रत्येकाचं काही न काही काम सुरू होतं. मी चोरून पाहिल्यावर लक्षात आलं की, काही तरुण मुलंही होती. तेवढ्यात माझं स्वागत करणाऱ्या व्यक्तीनं विचारलं, "चहा घ्याल?" मी "हो" म्हटलं. तिथेच एक छोटं स्वयंपाकघर होतं. एकानं बाहेरून दूध आणलं, तोवर दुसऱ्यानं आधण ठेवलं, तिसऱ्यानं चहा गाळून सगळ्यांना दिला. एका कुटुंबाप्रमाणे सगळे वागत होते. तेवढ्यात कुटुंबप्रमुख तिथे आले.

फोनवर बोलताना अत्यंत कोरडे वाटणारे बिंदुमाधव खिरे त्यांच्या संस्थेत मात्र एकदम वेगळे जाणवले. हा माणूस हसूही शकतो, हे पाहून बरं वाटलं! गप्पा मारत चहा झाला. मग आम्ही दोघं शेजारीच असलेल्या काऊन्सिलिंग रूममध्ये गेलो.
त्यांनी थेट विषयाला हात घातला, "तुला आईला तुझ्या लैंगिकतेबद्दल सांगायचं आहे तर."
मी होकारार्थी मान डोलावली.
"कमिंग आऊटपूर्वी पूर्ण विचार केला आहेस ना?" त्यांनी स्पष्टपणे विचारलं.
मी 'हो' म्हणून सांगितलं.
"तुला आईला का सांगायचं आहे? आणि आत्ताच का?" त्यांनी पुढचा प्रश्न केला.
मी पूर्ण विचार करून निर्णय घेतला होता, त्यामुळे माझी उत्तरं तयार होती. "कारण आता मला दोन आयुष्यं जगण्याचा कंटाळा आलाय. रोज रोज आईशी खोटं बोलवत नाही आता. मी २८ वर्षांचा आहे. बंगलोरमध्ये चांगली नोकरी आहे. रोज स्थळं येत आहेत. ताईचं लग्न होऊन ४ वर्षं लोटली. तिला आता मुलगाही आहे. सगळे माझ्या लग्नाचा विषय काढतात. आईकडे अनेक पत्रिका येऊन पडतात. पप्पा लहानपणीच वारल्यामुळे तिनं आजवर वडिलांच्याही जबाबदाऱ्या पार पाडल्या. ताईचं लग्न लावून दिलं. आता तिला वाटतंय की माझं लग्न झालं म्हणजे ती कर्तव्यातून मोकळी होईल. रोज फोन करते तेव्हा फक्त लग्नाचाच विषय काढते. कुणी पाहून ठेवलीये का विचारते. तिला शेजारपाजारचे आणि नातेवाईक भंडावून सोडतात. परवाच तिला शेजारच्या पाटणकर काकू विचारत होत्या की काही प्राॅब्लेम तर नाही ना! त्यामुळे ती खूपच अस्वस्थ होती. मग मी ठरवलं की आता तिला खरं काय ते सांगायचं."

"पण ती ते पचवू शकेल का?" बिंदूंनी विचारलं.
"हो. हो. ती धोरणी बाई आहे. तिनं एकटीनं आम्हा दोघांना लहानाचं मोठं केलंय. तसं तिचं माहेर अमरावतीसारख्या छोट्या शहरातलं, पण पुण्यात हयात गेलीये. नाही म्हटलं तरी पेपरातून वगैर काही ना काही वाचलं असेलच की. हल्ली एवढी इंटरकास्ट लग्नं होतात, लिव्ह-इन रिलेशनशिप्स असतात. हे सगळं तिच्या आवतीभोवती होतंय. तिचा या गोष्टींना फारसा विरोध कधी जाणवला नाही. तशी ती बऱ्यापैकी लिबरल असावी. पूर्वी ती म्हणायची ब्राम्हण मुलीशीच लग्न कर. नंतर म्हणू लागली की मुलगी हिंदू असलेली बरी. आता ती इथपर्यंत आलीये. अजून दोन पावलं पुढे टाकावी लागतील तिला."

"तू गे आहेस हे आतापर्यंत कुणाला सांगितलं आहेस का?" मला कमिंग आऊटचा अनुभव आहे का, याचा अंदाज घेण्यासाठी त्यांनी हा प्रश्न विचारला असावा.
"हो. माझ्या सर्व जवळच्या मित्रमैत्रिणींना सांगून झालंय. एखादा अपवाद वगळता सगळ्यांनी आगदी मनापासून स्वीकारलंय. कुणाच्याही वागण्यात काहीही बदल झाला नाही, हे विशेष. पहिल्यांदा जेव्हा मित्राला सांगितलं तेव्हा खूप हिंमत एकवटावी लागली. दोनतीनदा सांगायचं ठरवून रद्द केलं. मग मनाचा हिय्या करून सांगितलं. मला भीती होती की तो कसा रिअॅक्ट करेल. मला सोडून तर देणार नाही ना, गावभर बोभाटा तर करणार नाही ना, असे अनेक किंतु-परंतु होते. स्वतःच्या लैंगिकतेबद्दल पहिल्यांदा सांगत असताना मला अक्षरशः सगळे कपडे काढून ठेवत असल्यासारखं वाटत होतं. विनाकारण खूप शरम वाटत होती. त्याला सांगितल्यानंतर जेव्हा माझ्या जवळच्या मैत्रिणीला सांगितलं, तेव्हा तर कुठे तोंड लपवू असं झालं होतं. मित्रांपेक्षा मैत्रिणींना सांगणं जास्त कठीण आहे, हे जाणवलं. पण आता भीती आणि लाज दोन्ही कमी झालंय. आता माझ्या सगळ्या जवळच्या लोकांना माहिती आहे."
"म्हणजे बहिणीलाही सांगितलं आहेस?"
"नाही. जवळच्यांपैकी फक्त ती आणि आईच राहिल्या आहेत."
"मग तू आधी बहिणीला सांगावंस. कारण आई आधी बहिणीलाच सांगणार."

त्यानंतर बिंदुमाधव खिरेंनी जे काही केलं ते अफलातून होतं! माझं कमिंग आऊट यशस्वी होण्यासाठी त्यांनी त्रिसूत्री उपाय काढला. पहिलं सूत्र म्हणजे त्यांनी माझी आई बनून 'माॅक कमिंग आऊट सेशन' केलं! होय, बिंदू माझी आई झाले! त्यांनी मला अनेक अडचणीचे प्रश्न विचारले. मी सुचतील तशी उत्तरं दिली. मग मी दिलेली उत्तरं कशी अधिक प्रभावी पद्धतीने द्यायची, ते त्यांनी सांगितलं. यामुळे माझा आत्मविश्वास वाढला.

दुसरं सूत्र म्हणजे त्यांनी मला तीन पुस्तकं दिली. एक पुस्तक FAQs म्हणजे वारंवार विचारल्या जाणाऱ्या मूलभूत प्रश्नांबद्दलचं होतं. उदाहरणार्थ, समलिंगी संबंध नेमके कसे असतात? हे नैसर्गिक आहे की वातावरणावर अवलंबून असतं? वगैरे वगैरे. दुसरं पुस्तक समलिंगी मुलामुलींनी लिहिलेल्या अनुभवांचं होतं. तिसरं पुस्तक समलिंगी मुलामुलींच्या पालकांनी लिहिलेलं होतं. तिन्ही पुस्तकं मला पुढच्या दोन दिवसांत खूप महत्त्वाची ठरणार होती.

तिसरं सूत्र म्हणजे त्यांनी माझ्या घराच्या आजूबाजूच्या गे-फ्रेंडली मनोविकारतज्ज्ञ डाॅक्टरांचे नाव, नंबर, पत्ते दिले. दोन जणांशी ते स्वतः बोलले आणि अमूक तारखेला इतक्या वाजता तुम्हाला मदतीसाठी फोन येऊ शकतो किंवा अचानक तुमची अॅपाइंटमेंट घ्यावी लागू शकते, असा अंदाज दिला. "एकदा कमिंग आउटचा बाण धनुष्यातून सुटला की डाॅक्टरांच्या अपाॅइंटमेंटसाठी वाट पाहणं जड जातं", म्हणत त्यांनी आधीच तजवीस करून ठेवली. आश्चर्य म्हणजे समलैंगिकता हा अजिबात मानसिक आजार नाहीये, ते नैसर्गिक आहे, हे अनेक डाॅक्टरांनाही ठाऊक नसतं! भारतात डाॅक्टरांना याबद्दल काही शिकवलंच जात नाही! त्यामुळे गे-फ्रेंडली डाॅक्टर माहीत असणं गरजेचं. त्याच बरोबर बिंदूंनी आणखी एक गोष्ट केली. त्यांनी माझ्या घराच्या जवळपासच्या दोघा-तिघा गे मुलांच्या पालकांना माझ्या कमिंग आऊटच्या तारीख आणि वेळ यांची कल्पना देऊन ठेवली. पालकांना पालक अधिक चांगल्या पद्धतीने समजवू शकतात, असा त्यांचा अनुभव होता.

बिंदूंच्या त्रिसूत्रीने सज्ज झाल्यानंतर मी थेट कोथरुडात ताईच्या घरी गेलो. ती नुकतीच आॅफिसातून थकूनभागून घरी परतली होती. पण या कशाचाही विचार न करता मी तिला म्हटलं, "तुझ्याशी जरा महत्त्वाचं बोलायचंय. आपण बाहेर जाऊया का?" मी अचानक असा पुण्याला आलो, आल्यानंतर आधी कुणाला तरी भेटून आलो. आता बोलण्यासाठी घराबाहेर यायला सांगतोय, यांवरून तिला परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं. ती तशी समजूतदार आहे. लहानपणी खूप भांडायची. मारामारीही करायची. पण अलीकडे ती शांत आणि समंजस झालीये. लग्नानंतर तर अचानक पोक्त माणसासारखी वागू लागलीये.

सूर्यास्ताला थोडा वेळ बाकी असेल, तेव्हा आम्ही तिच्या घराजवळच्या बागेत पोहोचलो. काही मुलं खेळत होती. बरेच सीनियर सिटिझन्स फेऱ्या मारत होते. "काही सीरियस आहे का?" ताईने काळजीच्या स्वरात विचारलं. मी बहुधा कोणत्या तरी भलत्या जातीच्या मुलीच्या प्रेमात वगैरे पडलो असेन, अशी शंका तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. कारण माझ्या आयुष्यात समस्या तेवढी एकच उरली आहे, असं सगळ्यांना वाटत होतं! लग्नाचा विचार आल्याने डोक्यात तिडीक गेली! मी २८ वर्षांचा आहे, मान्य आहे, पण लग्नाबद्दल बोलल्याशिवाय एक दिवसही जगू देणार नाही का लोक? फार आढेवेढ न घेता मी तिला सरळ सांगितलं, "ताई, मी गे आहे. मला मुलं आवडतात." एकदम शांतता पसरली. दूरवर खेळणाऱ्या मुलांचे आवाज स्पष्टपणे ऐकू येऊ लागले. मी सांगायला घाई केली की काय, असं वाटू लागलं. आता ही काय प्रतिक्रिया देते, याचा मला अंदाज येईना. ती रडेल की मला नाकारेल की हिला मुळात हा प्रकार तरी नीट माहिती आहे की नाही की काय की काय. प्रत्येक्ष क्षण खूप मोठा वाटू लागला. "ठीक आहे," असं म्हणत तिने अस्वस्थ शांततेचा भंग केला. माझ्या पाठीवर हात ठेवला. माझ्या जिवात जीव आला. माझ्याहून फक्त तीन वर्षांनी मोठी असलेली शिल्पाताई इतक्या पटकन हे सगळं स्वीकारेल, अशी मला अजिबातच अपेक्षा नव्हती!

मला स्वतःलाच स्वतःची लैंगिकता स्वीकारायला सात-आठ वर्षं लागली होती. मला मुलं आवडतात, हे मला नववी-दहावीत कळू लागलं होतं. मला देखण्या मुलांकडे पाहायला आवडायचं. पण हे नेमकं काय आहे, हे ठाऊक नव्हतं. मुलांवर मी प्रेम करू शकतो, त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवू शकतो, लग्न करू शकतो, हे सगळं वेगळं पण नाॅर्मल आहे, हे सगळं कळायला बराच उशीर झाला. मला मुलं आवडतात हे कळत असताना पण माझं लग्न मुलीशीच होईल, असं मला शाळेत वाटायचं. कारण लग्न मुलीशीच होतं, असं मी लहानपणापासून पाहत आलो होतो. माझ्या समाजाने मला गे रिलेशनशिपचं एकही उदाहरण तोवर दाखवलंच नव्हतं! किंबहुना असं काही असतं, हे गावीही नव्हतं! आपली बायको कशी असेल, तिचे लांब केस असतील, मी तिला गजरा आणेन, ती स्वयंपाक कसा करेल, आईची सेवा करेल वगैरे साचे मनात तयार होते. आपल्या अवतीभोवतीच्या गोष्टी पाहून इतरांप्रमाणे मीही अशीच स्वप्नं सहाजिकपणे रंगवली होती. पण बायकोवर प्रेम करावं लागतं, तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवावे लागतात, त्यासाठी मुळात मुलींबद्दल आकर्षण लागतं, याचा विचार मी केलाच नव्हता! त्यामुळे हळुहळू जसं मला समलैंगिकतेबद्दल कळू लागलं, तसा मी 'तो मी नव्हेच' भूमिकेत जाऊ लागलो. कारण मी गे आहे, असं स्वीकारलं, तर मानतली बायको, लग्न, मुलं, कुटुंब, सुखी संसार, सणवार, वगैरे सगळी स्वप्नं एका फटक्यात पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळणार होती! मला मुलं आवडतात, मला त्यांच्याबद्दल मानसिक आणि शारीरिक आकर्षण वाटतं, पण मी गे नाही, अशा विचित्र 'डिनायल' (अस्वीकार) अवस्थेत मी अनेक वर्षं होतो. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्या काॅलेजच्या काळात माझा हा गुंता सोडवायला कुणीच नव्हतं. याबद्दल मी कुणाशी बोलत नव्हतो. भीतीपोटी कोणत्या 'समपथिक' किंवा 'हमसफर' यांसारख्या संस्थेत जाण्याचा प्रश्नच नव्हता. अखेर माझी सारी बिनबुडाची स्वप्नं मोडून मी स्वतःची लैंगिकता स्वीकारली, तोवर मी पंचविशी गाठली होती. बंगलोरसारख्या पुढारलेल्या शहरात राहिल्यामुळे हे शक्य झालं. नाहीतर कदाचित एव्हाना माझ्या गोंधळलेल्या अवस्थेत माझं लग्नंही लावून दिलं गेलं असतं! मी गे असल्याचं स्वीकारल्यानंतर मला मोकळं वाटलं, पण तोपर्यंतचा प्रवास फार वेदनेचा होता. अजाणत्या वयापासून स्वतः एकएक वीट जोडून उभा केलेला स्वप्नांचा बंगला स्वतःच्या हाताने जमीनदोस्त करणं कठीण असतं.

मला जे स्वीकारायला इतकी वर्षं लागली, ते शिल्पाताईनं एका मिनिटात कसं पचवलं? तिला आधीपासून कल्पना होती का? छे! तिनं माझ्यासाठी स्वप्न रंगवली नव्हती का? खरंतर माझ्यासाठी तिनंच सगळ्यांत जास्त स्वप्नं पाहिली होती. माझ्या दहावी-बारावीपासून पोस्ट ग्रॅज्युएशनचे आॅनलाइन फाॅर्म भरेपर्यंत तिनं किती कष्ट घेतले, हे मी विसरू शकत नाही. माझ्या लग्नाबद्दलही 'शिल्पा वन्सं'चं बरंच स्वप्नरंजन करून झालं होतं. मग तिला धक्का कसा बसला नाही? मला वाटतं की तिला चांगलाच धक्का बसला असावा. पण तिनं तो दाखवला नाही. मी लग्नाबद्दल कधीच काहीच बोलत नाही, हे तिच्या निरीक्षणातून सुटलं नसेल. त्यामुळे तिच्या मनाची थोडीफार तरी तयारी असेलच. ती पुण्यासारख्या मेट्रो शहरात साॅफ्टवेअर इंजिनीयर आहे, त्यामुळे तिनं कदाचित गे मुलं पाहिलीही असतील. कुणी तिच्या ओळखीचाही असेल. गे आहे, म्हणजे आयुष्य खड्ड्यात जात नाही, हे कदाचित तिनं पाहिलं असेल. कदाचित ती अधिक समजूतदार झाली असल्यामुळे मला समजून घेऊ शकत असेल. तिच्या मनात त्यावेळी नेमकं काय सुरू होतं हे आजवर तिनं मला सांगितलं नाही. मी तिला विचारलं नाही. माझ्या सख्ख्या बहिणीनं मला कोणतेही आढेवेढे न घेता, कोणतेही प्रश्न-उपप्रश्न न विचारता, आहे तसं स्वीकारलं, याहून मोठा आनंद नव्हता. माझ्या मनावरचा एक मोठ्ठा दगड बाजूला झाल्यासारखं वाटत होतं. मग आम्ही उठलो आणि सूर्यास्तापर्यंत फिरत फिरत बोलत होतो. तिनं विचारलं नसलं, तरी तिच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह मला दिसत होतं. काही गोष्टी मी स्वतःहून सांगितल्या. शेवटी ती म्हणाली, "अभिजित, तू अजिबात काळजी करू नकोस. मी तुझ्यासोबत आहे. पण आईला सांगणार आहेस का?" मी म्हटलं, "उद्या सांगावं असं म्हणतोय. मला अजून तीन दिवस सुटी आहे. उद्या सांगितलं तर मी दोन दिवस तिच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तिच्या जवळ असेन."
"अरे पण उद्या मला महत्त्वाच्या मीटिंग्ज आहेत. आमचे आयर्लंडहून क्लाएंट्स येणार आहेत," ती म्हणाली.
"तू उद्या असतीस तर बरं झालं असतं. उद्या कोणत्याही परिस्थितीत मला आईला सांगावंच लागेल. ही संधी गेली तर पुन्हा काही महिने वाट पाहावी लागेल."
"मग तू एक काम कर.. आईला माझ्याकडे घेऊन ये, मी लवकर घरी येईन," तिनं मधला मार्ग काढायचा प्रयत्न केला. मी स्पष्ट नकार दिला. कारण बिंदुमाधव म्हणाले होते की आईला ती ज्या घरात राहते, जिथे ती सगळ्यांत जास्त कंफर्टेबल असेल, तिथेच सांगा. आम्ही निघालो.
मी घरी पोहचेपर्यंत ताईचा मेसेज आला, "मी उद्याच्या सर्व मीटिंग्ज कॅन्सल केल्या आहेत. सकाळी ८ पर्यंत घरी येते."

दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली. आईचं टेन्शन येण्याची ही आयुष्यातली पहिलीच वेळ असावी. आई ही सदैव गृहित धरलेली व्यक्ती. ती सगळे टेन्शन्स स्वतःच्या डोक्यावर घेत असते. आज मात्र ती कशी वागणार या विचारानं मी अस्वस्थ होतो. बेल वाजली. एवढ्या सकाळी ताईला बघून आईला आश्चर्य वाटलं. "अगं काही नाही, अभिजित आलाय ना.. म्हणून आज सरळ सुट्टी टाकून आले. एरव्ही आपल्या तिघांना एकत्र वेळ कुठे मिळतो गं हल्ली." आईला तो सुखद धक्का होता. कारण खरंच आम्ही तिघं एकत्र क्वचितच येतो हल्ली. आईनं व्हाॅलेंटरी रिटायरमेंट घेतली असली, तरी आता मला आणि शिल्पाताईला वेळ नसतो. दोन्ही मुलं घरी आल्यामुळे झालेला आईचा आनंद फार वेळ राहणार नाहीये, या कल्पनेनं माझ्या काळजात चर्र झालं. तिनं माझ्यासाठी, माझ्या संसारासाठी पाहिलेली सगळी स्वप्नं पुढच्या काही तासात पुरती कोलमडणार होती. कितीही शिकलीसवरलेली म्हटली तरी शेवटी आईच ती. पती गेल्यानंतर दोन्ही मुलांसाठी राबराब राबली. आता कुठे सुखाचे दिवस येणार, असं तिला वाटत असतानाच मी तिची सगळी सुखस्वप्नं हिरावून घेणार होतो. पण माझ्या मनात अपराधीपणाची भावना अजिबात नव्हती. मी गे असल्याचं मला अजिबात शल्य नव्हतं. तिला दुःख होईल, याचं वाईट वाटत होतं. तिनं मला जसा जन्म दिला आहे, तसा मी आहे. आणि जसा मी आहे, तसा तिला सांगणं माझं कर्तव्य होतं. ते जाणून घेणं तिचा अधिकारही आहे. खरं तर हे पप्पांनाही माहीत असायला हवं होतं. पण मला काही कळायच्या आतच ते गेले.

दोन्ही मुलं आज घरी म्हणजे आजचा दिवस आईसाठी सणाहून कमी नव्हता. ती ताबडतोब स्वयंपाकघरात शिरली. थोड्या वेळात आतून साजूक तुपावर भाजल्या जाणाऱ्या रव्याचा खमंग दरवळ पसरला. शिरा करत असावी. आम्ही दोघं हाॅलमध्ये बसलो होतो. ताई म्हणाली दुपारी सांगू. मी म्हटलं नाही. आत्ताच सांगायला हवं. मी आईला हाक मारली. आई आली. "आई, मला तुझ्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे," मी म्हटलं. आमच्या दोघांच्या चेहऱ्यांकडे पाहून तिला लक्षात आलं असावं की मामला गंभीर आहे. "आलेच गॅस बंद करून." ती समोर येऊन बसली.

सुरुवात शिल्पाताईनं केली. "आई, जगात अनेक प्रकारचे लोक असतात. काही आपल्यासारखे असतात. काही वेगळे असतात. काही समाजाला मान्य असतात. काही नसतात. आपला अभिजित खूप चांगला मुलगा आहे. पण चांगुलपणाच्या समाजाच्या व्याख्या वेगळ्या असतात ना..." ताईची गाडी भलत्याच ट्रॅकवर जातेय, हे मला कळलं. तिच्या गोलगोल सांगण्यामुळे आई माझ्याकडे संशयानं पाहू लागली. शिल्पा नेमकं काय सांगतेय, हे तिला कळेना. शेवटी पाच मिनिटांनंतर मी ताईला थांबवलं. माझ्या हृदयात धडधड होत होतं. तरीही हिंमत करून आईला स्पष्ट सांगितलं, "आई, मी गे आहे. म्हणजे मला मुलं आवडतात. मला मुलींमध्ये रस नाही." आई माझ्याकडे पापणी न लवता पाहत होती. मी बोलायचा थांबलो तरी तसंच बघत होती. मी घाम पुसला. एकच शांतता पसरली होती. काय बोलावं कुणालाही सुचेना. आईला अॅटॅक वगैरे तर येणार नाही, असा थरकाप उडवणारा विचार मनात चमकून गेला! पण तसं काही झालं नाही. जणू काही झालंच नाही अशा आवेशात आई उठली. "रवा भाजून ठेवलाय ना. तो गार होतोय. आलेच मी शिरा घेऊन." आईला एकतर मी काय बोललोय ते नीट कळलं नसावं किंवा तिनं ते मनोमन नाकारलं असावं. किंवा तिला एकट्यात जायचं असेल. पण मी तिला थांबवलं. "मी काय सांगतोय ते जास्त महत्त्वाचं आहे, आई. शिरा नंतर करता येईल." एकूणच अवघडलेली परिस्थिती पाहून ताईनं पुन्हा सूत्रं हातात घेतली. "आई, गे असणं नैसर्गिक आहे. जसं कुणाला मुलगा होतो, कुणाला मुलगी होते, तसंच काहींना स्ट्रेट मुलं होतात आणि काही गे. आईच्या गर्भातच मुलाचं लिंग आणि लैंगिकताही ठरत असते." ताईनं रात्रीतून बराच गूगलवरून अभ्यास केलेला जाणवत होता.

आईला मात्र एव्हाना काय चाललंय ते हळूहळू कळू लागलं होतं. तिच्या मनात प्रश्न दाटू लागले होते. "गर्भात ठरतं? म्हणजे माझ्यात किंवा ह्यांच्यातच काही दोष होता का?"
"अगं आई, दोष काही नाही यात. हे एकदम नाॅर्मल आहे. समाजात साधारण दीड-दोन टक्के मुलं-मुली गे किंवा लेस्बियन असतातच. फक्त त्याबद्दल आपल्याकडे कुणी बोलत नाही, म्हणून कळत नाही. अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशात तर आता गे मुलांची एकमेकांशी आणि लेस्बियन मुलींची एकमेकींशी कायद्याने लग्नंही होतात." गे लग्न वगैरे अकल्पनीय गोष्टी ऐकण्याच्या मनस्थितीत आई नव्हती.
"म्हणजे तुला मुली कधीच आवडल्या नाहीत? तुला तर किती मैत्रिणी होत्या शाळेत आणि काॅलेजात. तू तर त्यांच्याशी फोनवर तासन् तास गप्पा मारायचास," आई अजूनही स्वीकारायला तयार नव्हती.
"आई, त्या माझ्या फक्त मैत्रिणी होत्या."
आईला मुळात समलैंगिकतेबद्दल फारसं काही माहीत नाहीये, हे तिच्या चेहऱ्याकडे आणि प्रश्नांकडे पाहून कळत होतं. मी ताबडतोब बिंदुमाधव खिरेंची तिन्ही पुस्तकं तिच्या हातावर ठेवली. तिने ती उघडूनही पाहिली नाहीत.

आईनं मोर्चा शिल्पाताईकडे वळवला. "शिल्पा, तुला हे सगळं माहीत होतं तर?" आईनं कोरड्या स्वरात विचारलं. सगळं खरं सांगायचं, असं आम्ही ठरवलं होतं. शिल्पाताईनं काल संध्याकाळी कळल्याचं सांगितलं. "आई, काल यानं सांगितल्यानंतर मी स्वप्नाशी बोलले. ती गायनॅकोलाॅजिस्ट असली तरी तिला यातलं माहीत होतं. ती म्हणाली गे असणं एकदम नाॅर्मल आहे. मग मी इंटरनेटवरही बरंच वाचन केलं रात्री बसून. आई, हे सगळं एकदम कळल्यामुळे धक्का बसतो, पण हे आपल्याला स्वीकारावंच लागणार आहे."
आईच्या मनात अनेक भावना एकत्र दाटत असाव्यात. आपण याला 'असा' जन्म दिल्याची अपराधीपणाची भावना, हे योग्य किंवा नैतिक आहे की नाही याबद्दल शंका, याचं आता पुढे काय होणार, ही काळजी. नुसतं खरचटलं तरी आपल्याकडे धावत येणाऱ्या आपल्या मुलानं एवढी मोठी गोष्ट इतकी वर्षं आपल्यापासून लपवून ठेवल्याची खंतही तिला वाटत होती. "हे तू तेव्हाच का नाही सांगितलंस मला?" आता तिचा स्वर कापरा होऊ लागला होता. "आई, अगं मलाच माहीत नव्हतं माझ्या मनात काय चाललंय ते. मीच गोंधळलो होतो. मी गे आहे, असं मलाच माझं स्पष्ट व्हायला अनेक वर्षं लागली. मी बंगलोरमध्ये गेल्यावर तिथल्या मोकळ्या वातावरणात मला माझी ओळख पटली. इथे असेपर्यंत मी नुसतात चाचपडत होतो. तिथे आॅफिसात गे मुलं आहेत. त्यांना त्यांच्या घरच्यांनीच नाही, तर आॅफिसमधल्या लोकांनी पण आहे तसं स्वीकारलं आहे. आमच्या आॅफिसात गे मुलांसाठी विशेष पाॅलिसी पण आहे."

आईला पहिल्याच वेळेत फार सांगून गोंधळून टाकायचं नव्हतं. तसंच तिच्या चेहऱ्यावरचा ताण आता स्पष्ट दिसू लागला होता. शिल्पाताई उठली. म्हणाली मी शिरा करते. आता जेवायलाच बसू थोड्या वेळात. मी पण फोन आल्याचं नाटक करून बाजूच्या खोलीत गेलो. ताई आईला स्वयंपाकघरात घेऊन गेली. आई तशी ठीक होती. गोंधळलेली होती. पण उद्ध्वस्त वगैरे अजिबात नव्हती. मी बिंदुमाधव खिरेंना फोन केला. मोहीम फत्ते म्हणून सांगितलं. ते शांतपणे म्हणाले, "आता तर सुरुवात आहे. पुढचं किमान एक वर्ष बघ काय होतं. पालक कितीही शिकलासवरला आणि समजूतदार असला, तरी त्याला पूर्णपणे स्वीकारायला एक वर्ष लागतंच. तुझी खरी परीक्षा तर आता सुरू झाली आहे!"

बिंदुमाधवांचे शब्द खरे ठरले. जेवणं झाली. आई आम्हाला गरमागरम पदार्थ वाढण्यात व्यग्र होती. ताईनंही सोहमच्या गमती सांगून मूड हलकाफुलका ठेवला. जेवण झाल्यानंतर मी वामकुक्षीसाठी लवंडलो. थोड्याच वेळात मला स्वयंपाकघरातून हुंदक्यांचा आवाज आला. मी आत गेलो. आई ओट्याजवळ खाली बसून रडत होती. मी तिच्या जवळ गेलो. मला पाहून तिने पदरानं डोळे पुसले. ती स्वतःलाच दूषणं देत होती. "माझ्यातच काहीतरी दोष असेल, म्हणून तू असा जन्माला आलास. यावर काहीतरी उपाय असेलच की? का तुला आयुष्यभर असंच एकट्यानं जगावं लागणार?" आईनं पुन्हा डोळ्यांना पदर लावला. आईची ही अवस्था मला पाहवत नव्हती. मलाही रडू येत होतं. पण मी मोठ्या मुश्किलीनं अश्रू आवरले. मीही रडलो असतो, तर तिनं कुणाकडे पाहायचं? हे सगळे प्रश्न येणार याची बिंदूंनी कल्पना दिली होती. चिडायचं नाही, वैतागायचं नाही, परत परत विचारलं तरी शांतपणे उत्तरं द्यायची, असं त्यांनी सांगितलं होतं. मी तेच केलं. तिच्या एकएक प्रश्नाचं शांतपणे निरसन करण्याचा प्रयत्न केला. "आई, दोषाचा प्रश्नच कुठे? मी अजिबात सदोष नाही. मी एकदम नाॅर्मल आहे. मला कुठलाही आजार नाही. त्यामुळे उपायाचाही प्रश्न नाही. तुला हवं असेल तर आपण डाॅ. पाटलांकडे जाऊ शकतो. जायचं का आत्ता?" ती नको म्हणाली. "मला याबद्दल कुणाशीही बोलायचं नाही." आमचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून तिनं उठून स्वयंपाकघराची खिडकीही बंद केली.

दुसऱ्या दिवशी मी घरात राहायचं टाळलं. कारण मला पाहून तिला रडू येतं, असं माझ्या लक्षात आलं. संध्याकाळभर तिच्याशी बोलून तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊन झाली होती. मीही थकलो होतो. मी मित्रांना भेटायला सकाळी निघालो. शिल्पाताई रात्रीच तिच्या घरी गेली होती. त्यामुळे आज ती दिवसभर घरात एकटी असणार होती. मी दुपारी जेवायला नसेन, असं सांगून मी सकाळी निघालो. मी कुठे चाललोय ते आईनं विचारलं नाही. मित्रांना भेटून मला रिलॅक्स्ड वाटलं. पण आई घरी ठीक असेल की नाही, याची हुरहूर होतीच. म्हणून तिला मध्येच दोनतीन वेळा फोन केले. ती नाॅर्मल होती. संध्याकाळी मी परतलो तेव्हा आईनं मला धक्का दिला. काल ज्या तीन पुस्तकांकडे तिने ढुंकूनही पाहिलं नाही, ती तिन्ही पुस्तकं तिनं दिवसभरात अधाशासारखी वाचून काढली होती! तिच्या बऱ्याच शंकाचं निरसन झालं होतं. समलैंगिकता नैसर्गिक आहे, हे तिला पटलं होतं. त्यामुळे 'डाॅक्टरकडे चल' वगैरे गोष्टींचा प्रश्नच नव्हता. थोडक्यात, तिला कळलं होतं, वळायला वेळ लागणार होता. धक्क्यातून ती सावरली होती. प्रश्नांची उत्तरं मिळाली होती. आता उरल्या होत्या त्या फक्त भावना - काळजी, दुःख आणि भीती. मुलाच्या भविष्याची काळजी, स्वप्नभंगाचं दुःख आणि समाजाची भीती. पण आता आई बऱ्यापैकी ऐकण्याच्या आणि समजण्याच्या स्थितीपर्यंत आल्याचं जाणवलं. मला मुलं कधीपासून आवडतात, असं तिनं विचारलं. मी कुठलाही आडपडदा न ठेवता सारं काही सांगितलं. शाळेत मला मुलांकडे पाहणं आवडू लागल्यापासून ते बंगलोरमध्ये झालेल्या साक्षात्काराबद्दल. माझा सविस्तर मोनोलाॅग तिने शांतपणे ऐकला. मग मी आईला घट्ट मिठी मारली. आई म्हणाली, "चल बाळा, तुला भूक लागली असेल. तुझं पान वाढते. हातपाय धू." मला आता खूपच हलकं हलकं वाटत होतं. इतकं हलकं आयुष्यात कधी वाटलं नव्हतं. मी गे आहे, हे कुणाला कळलं, तर शेवटची भीती नेहमी हीच होती की त्यानं आईला सांगितलं तर काय होईल? आता ती भीती पळून गेली होती. माझ्या आईनं मला स्वीकारलं होतं!

निरोप घेताना अर्थातच आई पुन्हा रडली. यावेळी तर ओक्साबोक्शी रडली. मलाही अश्रू आवरले नाहीत. मी बंगलोरला पोहोचल्यावर आईचा खरा त्रास सुरू झाला. एकट्या घरात ती विचार करत बसायची. तिच्या मृत्यूनंतर माझी काळजी कोण घेईल, हा एकमेव विचार आता तिला भेडसावत होता. मला बाॅयफ्रेंड आहे, हे सांगण्याची वेळ आता आली होती. पुढे ती बंगलोरला आली, तेव्हा त्यांची भेट झाली. आईनं त्याला मुलासारखंच मानलं. अगदी फ्रेंच सिनेमात शोभावी, एवढी माझी आई लिबरल झाली आहे! अमरावतीत शिकलेली आणि ग्रामीण भागात नोकरी केलेली माझी आई मला नवनवीन धक्के देत होती. पहिल्यांदा आली, तेव्हा तिच्या आणि माझ्या बाॅयफ्रेंडच्या तासनतास गप्पा चालायच्या! एकदा तर त्याला सुटी होती त्या दिवशी दोघांनी मिळून माझ्यासाठी माझ्या आवडीचा स्वयंपाक केला!

आईचे वर्षभरात लॅप्सेसही झाले. म्हणजे एखाद्या दिवशी ती पुन्हा दुःखाच्या खाईत जायची आणि फोनवर रडायची. सुरुवातीला मी तिला शांतपणे उत्तरं दिली. नंतर मात्र मी स्पष्टपणे बोलू लागलो. "आई, तू स्वतःला जेव्हा दोषी म्हणतेस, तेव्हा मी सदोष आहे, असं गृहीत धरतेस. मला जर तू पुन्हा असं म्हटलं, तर मी फोन ठेवून देईन." माझ्या स्पष्ट बोलण्याचा फायदा झाला. आता ती पूर्णपणे शांत आहे. आनंदी आहे आणि माझ्या भविष्याबद्दल आश्वस्त आहे. आपले आईवडील हे आपल्यापेक्षा जास्त परिपक्व आणि समजूतदार असतात, याचा आपल्याला विसर पडतो आणि आपण त्यांच्यापासून गोष्टी लपवतो. त्यांना खरं काय ते सांगितलं, तर ते नक्की स्वीकारतात. काही जण बुद्धीनं स्वीकारतील, काही पटलं नाही तरी प्रेमापोटी स्वीकारतील. रोज खोटं बोलण्यापेक्षा एकदा हिंमत करून खरं सांगितलं की आयुष्य सोपं होतं.

***

श्री. अभिजीत देशपांडे यांचा ईमेल-पत्ता - adamindia@gmail.com

***

पूर्वप्रसिद्धी - 'माहेर' (जानेवारी - २०१६)

***

हा लेख मायबोली.कॉमवर प्रकाशित करण्यास अनुमती दिल्याबद्दल श्री. अभिजीत देशपांडे व श्रीमती सुजाता देशमुख (मेनका प्रकाशन) यांचे मनःपूर्वक आभार.

***
विषय: 
प्रकार: 

अतिशय सुंदर, हार्टवॉर्मिंग लेख!

>>आश्चर्य म्हणजे समलैंगिकता हा अजिबात मानसिक आजार नाहीये, ते नैसर्गिक आहे, हे अनेक डाॅक्टरांनाही ठाऊक नसतं!
...आणि अनेकदा ठाऊक करूनही घ्यायचं नसतं हे दुर्दैवी आहे.

LGBTQ व्यक्तींच्या सेक्श्युल ओरिएंटेशनचा किंवा जेंडर आयडेंटिटीचा 'स्वीकार करावा लागतो' ही परिस्थितीच त्रासदायक आहे. ह्या विषयाबद्दलच्या वेगळेपणाची जाणीव संपेल तो सुदिन!

वाचनीय लेख! लेख येथे दिल्याबद्दल श्री चिनूक्स ह्यांचे आभार! लेख वाचताना जी गोष्ट सर्वात महत्त्वाची असल्याचे जाणवले ती म्हणजे बिंदू ह्यांनी ह्या विषयाशी निगडीत मानसिकतांचा संपूर्ण अभ्यास करून आधीच काही उपाययोजना करणे व नियोजन करून ठेवणे! तेवढी वेळ आली नसली तरी त्यांनी 'मन' ह्या बाबीला दिलेले रास्त महत्त्व फार आवडले.

समवयीन बहिणीने फॅक्ट स्वीकारणे आश्चर्यकारक वाटले नाही. तशीही बहुधा, स्त्रियांमध्ये वस्तूस्थिती स्वीकारण्याची क्षमता अधिक असावी. आई ही आईच्या हृदयाची व आधीच्या पिढीतील असल्यामुळे तिला थोडा अवधी लागणे अपेक्षित होते.

तरीसुद्धा, जगामध्ये हजारो ज्वलंत प्रश्न अनुत्तरीत आहेत. अल्पसंख्यांक म्हणून लेस्बियन व गे ह्यांना भारतासारख्या देशात भेडसावणार्‍या समस्यांना दुय्यम प्राधान्य मिळावे असे म्हणायचे नाही. पण चिनूक्स ह्यांनी येथे मायबोलीवर दिलेला हा ह्या प्रकारचा दुसरा लेख आहे. जरासे हॅमरिंगसारखे वाटले. अर्थात, मला काय वाटावे हा माझा प्रश्न!

-'बेफिकीर'!

लेख आवडला. अभिजित , त्याच्या ताईच व आईच कौतुक वाटलं. इतकी महत्वाची चर्चा आदळाआपट न करता समंजसपणे केली गेली हे विशेष महत्वाचं . ह्यात श्री बिंदूमाधव खरेंचाही वाटा आहे. ह्या विषयावर अधिकाधिक चर्चा होऊन गैरसमज दूर होऊन समाजाने ह्या नात्यांकडे निकोप दृष्टीने पाहावं ही इच्छा ..

अभिजित देशपांडेना भावी आयुष्याकरता शुभेच्छा

आश्चर्य म्हणजे समलैंगिकता हा अजिबात मानसिक आजार नाहीये, ते नैसर्गिक आहे, हे अनेक डाॅक्टरांनाही ठाऊक नसतं! भारतात डाॅक्टरांना याबद्दल काही शिकवलंच जात नाही! >>

तीव्र आणि जोरदार आक्षेप.
डॉक्टरांना दुसर्‍या आणि तिसर्‍या वर्षाच्या मेडिकल अभ्यासक्रमात हे शिकवलं जातं.
मला शिकूनही आता १५ वर्षे होऊन गेली.

हां, आता एखाद्या डॉक्टरची वैयक्तिक मते वेगळी असू शकतात.
त्यामुळे तो /ती गे फ्रेंडली नसू शकते, हे मान्य आहे.

पण शिकवले जात नाही असे मुळीच नाही.

साती,
समलैंगिकता नैसर्गिक आहे, तो मानसिक आजार नाही, हे भारतीय डॉक्टरांना कॉलेजात शिकवलं जातं? आणि पंधरा वर्षांपूर्वी हे शिकवलं जायचं?

http://blogs.bmj.com/bmj/2015/06/24/tushar-garg-indias-medical-curricula...

ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये या विषयावर अजूनही एकदोन लेख वाचलेले स्मरतात.

http://www.issuesinmedicalethics.org/index.php/ijme/article/view/915/2148

http://m.dailyhunt.in/news/india/english/youth-ki-awaaz-epaper-youthki/6...

DSM-IIIमधून समलैंगिकतेला वगळलं त्याला जेमतेम २५ वर्षं होत आहेत.

अर्थात कॉलेजात असं शिकवत असतील तर उत्तमच आहे. म्हणजे समुपदेशन करून समलैंगिकता बरी करण्याचे
दावे करणार्‍या डॉक्टरांच्या संख्येला आळा बसेल. Happy

लेख अतिशय आवडला. जगामध्ये अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत हे खरे आहे पण म्हणून एखाद्या प्रश्नावर लिहूच नये असे नाही. आपल्याला या विषयापेक्षा दुष्काळ जास्त महत्त्वाचा वाटेल. पण इतके मोठे ओझे घेऊन वावरणार्‍या गे लोकांना हा प्रश्न जात महत्त्वाचा वाटेल.
या विषयावर एक समाज म्हणून आपल्याला इतका मोठा प्रवास करायचा बाकी आहे की असे तथाकथित हँमरिंग वारंवार झाले तरी हरकत नाही. मुलगा डावखुरा असणे आणी मुलगा गे असणे हे आईच्या डोळ्यात एकाच पातळीवर येत नाही तोवर प्रबोधन जरूरीचे आहे.

सुंदर लेख !
ह्या विषयावर मायबोलीवर जे जे लेख प्रसिद्ध होत आहेत त्यातला 'मॅटर ऑफ फॅक्ट' आणि विवेकी सूर आवडतोय.

LGBTQ व्यक्तींच्या सेक्श्युल ओरिएंटेशनचा किंवा जेंडर आयडेंटिटीचा 'स्वीकार करावा लागतो' ही परिस्थितीच त्रासदायक आहे. ह्या विषयाबद्दलच्या वेगळेपणाची जाणीव संपेल तो सुदिन! >>> + १००

सुरेख लेख आहे. आई-वडिलांनां, आजूबाजूच्या आप्त-स्वकीयांनां वाचायला द्यावा असा.

इथे दिल्याबद्दल धन्यवाद! Happy

या विषयावर एक समाज म्हणून आपल्याला इतका मोठा प्रवास करायचा बाकी आहे की असे तथाकथित हँमरिंग वारंवार झाले तरी हरकत नाही. मुलगा डावखुरा असणे आणी मुलगा गे असणे हे आईच्या डोळ्यात एकाच पातळीवर येत नाही तोवर प्रबोधन जरूरीचे आहे.>>>> +१
लेख इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

सुंदर लेख! वाचायला सुरवात केली तर उत्सुकतेपोटी एका दमात वाचला गेला. जस्ट ग्रेट! हे असे लेख येऊन बर्याच लोकांनी ते वाचणे फार फार गरजेचे आहे!
अमेरिकेसारख्या पुढारेलेल्या देशात जिथे गे राईट्सबाबत खुप प्रगती झालीये आणि गे व्यक्तींना त्यांचं स्वतःच गे असणं निर्भिडपणे स्वीकरायाला त्यांच्या अवतीभोवतीचं वातावराण बर्‍यापैकी पोषक झालेलं असतानाही पुष्कळ मानसिक ताणातून जावं लागतं. आपल्या इथे भारतात तर आजिबातच जागरुकता नाही ह्या विषयावर आणि त्यामुळे तर खुप म्हणजे खुपच अवघड जात असणार.
खिरेंसारख्या लोकांचे आभार मानावे तितके कमी आहेत. I'd say, he is pretty much saving lives because the kind of frustration you might go through could drive you insane!

अभिजित देशपांडेंच्या आईंनी मी तर म्हणेन खुपच (खरी) मचुअरिटी दाखवली आहे कारण समलिंगी संबंधाबाबत फारशी काहीच माहिती नसताना, तिथून थेट आपला मुलगा समलिंगी आहे हा एक सेकंदात शुन्य ते २५० माईल्स पर आवरचा बदल (मानसिक रित्या) त्यांनी खुपच व्यवस्थितरित्या पचवला. इतर मुलं मुली इतके नशीबवान ठरतील की नाही ह्यात मला शंका आहे.

कुठल्याही आई बापाच्या आपल्या मुलावरच्या प्रेमाची ही खरी परिक्षा आहे. समाजमान्य किंवा समाजात रुढ असलेल्या कल्पना, रिती ह्यांच्याशी (सध्यातरी) ताळमेळ नसलेली अशी ही गोष्ट जेव्हा मुलं त्यांच्या समोर आणून उभी करतात तेव्हा अज्ञान, समाजाचं प्रेशर किंवा त्याच समाजानी निर्माण केलेल्या आपल्या समजूतीतून येणारं प्रेशर, भिती, लाज ह्या सगळ्यावर मात करुन ते ही गोष्ट कशी स्वीकरतात ह्यात खरी त्यांच्या प्रेमाची कसोटी आहे.

आपलं मूल societal norms (सॉरी मराठी शब्द सुचेना नेमका) च्या बाऊंड्रीज मध्ये बसत असेल तरच ते आपल्या प्रेमाच्या लायक आहे ह्या अत्यंत भितीदायक आणि आपल्या मुलांना उध्वस्थ करु शकणार्या विचारसरणीला आता (खरंतर केव्हाच) सुरुंग लावायाची गरज आहे. मग ते समलिंगी संबंध असो, आंतरजातीय लग्न असो.

लेख इथे दिल्याबद्दल चिनुक्स तुझे विशेष आभार! Happy

विकु+१
बेफी ! सैराट वर आधिच ५-७ लेख असताना तुम्ही तुमच घोड आण्लच कि, कुरु तर रोज बादलिभर धागे ओततो , आणि इथे क्सा ने फक्त दोन लेख दिले तर हॅमरिन्ग? तुम्हाला हा प्र्शन महत्वाचा वाटत नसला तरी बाकी कुणासाठि तो जिवनातील सगळ्यात महत्वाचा प्र्श्न असु शकतो. कमॉन ! मायबोली च्या हॅमरिन्गने काहि चेन्जेस झाले असते काही काही आयडी आत्मपरिक्षण करुन मोकळे झाले असते.( शेवट्ची ओळ तुमच्यासाठी नाहिये क्रु.गै.नसावा)

वाढत्या वयाच्या मुलाची मानसिकता ओळखण्यासाठी, जाणण्यासाठी आणि मानण्यासाठी अत्यंत उपयुक्त लिखाण.
चिनूक्स यांचे मनापासून आभार.

Pages