मुबारक हो, उस्ताद ! - उस्ताद झाकीर हुसैन ह्यांचा ६५ वा वाढदिवस

Submitted by आशयगुणे on 8 March, 2016 - 14:02

थेट हृदयाचा ठोका होत मन तृप्त करणारा तबल्याचा ठेका आणि द्रुत लयीत जुगलबंदीचा शेवट करताना एका उन्मनी अवस्थेत मानेला वारंवार झटका दिल्याने लयीत डोलणारे डोईवरचे केस... तबलानवाज उस्ताद झाकीर हुसेन यांच्या रसिकजनांच्या मनांवर ठसलेल्या प्रतिमा...
त्याच प्रतिमेच्या प्रेमात पडून सहज उमटणारी ‘वाह उस्ताद’ ही दाद आणि या सदासतेज, हसतमुख चेहऱ्यासोबत फोटो, किमान एक सेल्फी काढून घेण्यासाठी चाललेली रसिकांची धडपड...एका पातळीपर्यंत हे सारं ठीकच...पण प्रतिमेहून प्रत्यक्षातले झाकीर हुसेन कितीतरी पटींनी श्रेष्ठ. त्यांचे भारतीय संगीताला वैश्विक परिमाण मिळवून देणारे योगदान कितीतरी अमूल्य.त्याचीच ही उकल... झाकीर हुसेन यांच्या ९ मार्च रोजी येणाऱ्या ६५व्या वाढदिवसानिमित्त...

एक जग विद्वेष-विखाराने व्यापलेलं आहे... एक जग ताला-सुरांनी भारलेलं आहे. एक जग अस्थिर आणि अस्वस्थतेनं ग्रासलेलं आहे... एक जग स्थिरचित्त आणि बंधनमुक्तीचा अवकाश लाभलेलं आहे... याच सौहार्दाने भारलेल्या, स्थिरचित्त आणि सृजनानंदात सदोदित न्हाऊन निघणाऱ्या जगात उस्ताद झाकीर हुसेन यांचा मान मोठा आहे... प्रतिमेपेक्षाही, प्रत्यक्षातले - भारतीय संगीताच्या माध्यमातून जगातील सर्व सांगीतिक प्रवाहांशी संवाद साधणारे - झाकीर हुसेन कितीतरी पटीने अधिक उत्कट आहेत... भारतीयांसाठी ते सर्वश्रेष्ठ तबलावादक असले, तरीही जगाच्या व्यासपीठावर ते एक श्रेष्ठ संगीतकार म्हणून विराजमान आहेत. जगात सारे प्रवाह एकत्र येण्याचे श्रेय जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला जरी जात असले, तरीही संगीताच्या क्षेत्रात झाकीर यांनी ही प्रक्रिया अगदी सत्तरच्या दशकापासूनच सुरू केलेली आहे.

झाकीर हुसेन यांनी एका मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे, सत्तरच्या दशकात देशातील एका भागातील कलाप्रकार हा दुसऱ्या भागात त्या कलाकारांच्या मार्फत पोहोचू लागला होता. म्हणजे, पंजाबातील ‘टप्पा’ आता उत्तर-प्रदेशात पोहोचत होता. उत्तर-प्रदेशातील ‘कजरी’, ‘चैती’, ‘झुला’ हे महाराष्ट्रात गायला सुरुवात झाली होती आणि महाराष्ट्राचा ‘अभंग’ हा उत्तरेत जाऊ लागला होता. शिवाय उत्तर हिंदुस्थानी संगीत दक्षिणेत आणि दक्षिणेतील शास्त्रीय संगीत उत्तरेत, असेदेखील प्रवास घडू लागले होते. उत्तरेतील तबलावादक ज्यांना टप्पा या गानप्रकाराबरोबरच वादनाची सवय होती, त्यांच्यातील फार कमी कलाकारांनी ठुमरी, कजरी या गानप्रकारांबरोबर साथ केली होती. तिथल्या तबलावादकांना महाराष्ट्रातील भजनी ठेका तितकासा अवगत नव्हता. देश स्वतःला ओळखू लागला होता, तो असा. या पार्श्वभूमीवर झाकीर हुसेन यांच्याकडे पाहिल्यावर जाणवते की, ते बहुधा असे एकमेव तबलावादक असावेत, ज्यांनी सर्व प्रकारच्या कलाकारांबरोबर आणि कला-प्रकारांबरोबर तबलावादन केलेले आहे. मग तो गिरीजा देवी यांचा टप्पा असो, किंवा त्यांचीच ठुमरी किंवा झुला असो; तो भीमसेनजींचा अभंग असो किंवा जसराजजी यांचे भजन. हे सारे प्रकार आत्मसात करून त्यांनी या सर्वांबरोबर वादन केले आहे. इतकेच काय, तर देशातील प्रमुख गायकांबरोबर आणि वादकांबरोबर त्यांनी तबल्याची साथ करून प्रत्येकाची शैली सांभाळत आपले अष्टपैलूत्व सिद्ध केले आहे. हे सगळं अशासाठी महत्त्वाचे आहे, कारण देशातील दुसऱ्या स्वरूपाच्या कलाप्रकारांना सर्वप्रथम आत्मसात करावे लागते, कारण प्रत्येकाबरोबर तबला वाजविण्याची पद्धत निराळी ठरते. हे सारे झाकीर यांनी साधले. म्हणून ते साऱ्या कलाकारांचे आवडतेदेखील झाले!

झाकीरभाई स्वतः तबला या वाद्याला व्यासपीठावर प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय पंडित रवि शंकर, उस्ताद अली अकबर खां आणि त्यांचे वडील उस्ताद अल्लाराखा खां यांना देतात. कारण भारतीय संगीत सर्वप्रथम देशाबाहेर या तिघांनी नेले. ते जगमान्य कलाकार झाले आणि त्यानंतर अनेक कलाकार देशात-परदेशात आपली कला सादर करू लागले. परंतु या साऱ्या प्रक्रियेत कळस जर कुणी चढवला असेल तर तो झाकीर हुसेन यांनी! वीस वर्षांचे असताना झाकीरभाई अमेरिकेला गेले. त्यांना तिथे बोलावण्यात पंडित रविशंकर यांचा फार मोठा आग्रह होता. तोपर्यंत ते देशभर दौरे करीत होतेच, परंतु अमेरिकेतला तो अनुभव त्यांच्या आयुष्याला नक्कीच मोठी कलाटणी देऊन गेला. त्या काळातील अमेरिका हा उर्वरित जगासाठी एक ‘कल्चरल मेल्टिंग पॉट’ होता. भ्रष्टाचार आणि लष्करी वर्चस्वातून आकार घेत गेलेल्या राजकीय वातावरणामुळे स्थानिक अमेरिकी लोकांमध्ये सरकार विरोधात असंतोष होता. यातूनच साहित्य-कला प्रांतात रूढी-परंपरा नाकारणारी प्रतिचळवळ म्हणजेच काऊंटर कल्चर मुव्हमेंट जन्माला आली. विशेषतः पूर्वेकडील संस्कृती, संगीत आणि अध्यात्म या सर्वांचे आकर्षण सामान्य अमेरिकी लोकांमध्ये वाढले. पं. रविशंकर, अली अकबर खां, उस्ताद अल्लाराखा खां अमेरिकेत प्रचंड लोकप्रिय होत गेलेे. याच काळात अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या झाकीर यांनी जगातील वेगवेगळ्या सांगीतिक परंपरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कलाकारांबरोबर सांगीतिक वार्तालाप केला. त्यांनी आपली थोर परंपरा, आपले संगीत सर्वश्रेष्ठ असे काहीही मनात न आणता अगदी खुल्या मनाने या साऱ्या भिन्न परंपरा आत्मसात केल्या. त्या सर्वांमध्ये तबला या वाद्याला एक मानाचे स्थान मिळत गेले.
आंतरराष्ट्रीय कलाकारांमध्ये जॉन मॅक्लॉलिन, मिकी हार्ट, हर्बी हन्कॉक, एरिक हर्लंड या आणि अशा अनेक दिग्गज कलाकारांबरोबर त्यांनी सहवादन केले. त्यातूनच त्यांना वैश्विक स्तरावर उत्तरोत्तर लोकप्रियतादेखील मिळत गेली. त्याचबरोबर भारतीय गायक-वादकांबरोबर त्यांचे जगभर दौरेही सुरू राहिले. सत्तर आणि ऐंशीची दशके अशी होती तेव्हा भारतातील संगीत तर सातासमुद्रापार जात होतेच, परंतु जागतिक पातळीवर अनेक सांगीतिक प्रवाह एकमेकांना प्रभावितही करीत होते.

झाकीर हुसेन यांनी या दोन्ही प्रकारच्या सांगीतिक प्रवाहात आपले विशिष्ट स्थान निर्माण केले होते. म्हणूनच नव्वदच्या दशकात जेव्हा जागतिकीकरण ही संकल्पना दृढ झाली, तेव्हा झाकीर हुसेन हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे संगीतकार म्हणून ध्रुवस्थान प्राप्त झालेले नाव बनले! याचाच प्रभाव म्हणून १९९६च्या अॅटलांटा ऑलिंपिकच्या उद‌्घाटन समारंभाला ज्या संगीतकारांनी संगीत दिले, त्यातील एक नाव झाकीर हुसेन हे होते.

झाकीरभाईंसारखे प्रतिभावंत तबल्यासारखे वाद्य वाजवतात, तेव्हा एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे, तबला हे एक ‘साथीचे’ वाद्य न राहता, ते त्या अनेक वाद्यांमधील एक प्रमुख वाद्य होऊन जाते. म्हणजे झाकीर हुसेन यांच्या लहानपणी तबलावादकाला दुय्यम स्थान मिळणे, इथपासून तबला हे वाद्य जागतिक व्यासपीठावर एक स्वतंत्र वाद्य म्हणून ओळख निर्माण होणे, त्याला एक स्वतःचं अस्तित्व प्राप्त होणे, ही नक्कीच एक क्रांतिकारक प्रक्रिया ठरते.

आयुष्यात इतक्या कमी वयात हे सारे साध्य करणे सोपे नाही. शिवाय काही कलाकार असेही असतात जे साध्य करू शकतात, परंतु त्यांना तेवढी प्रसिद्धी वा जनप्रियता लाभत नाही. झाकीर यांना दोन्ही मिळाले. परंतु प्रतिभा आणि लोकप्रियतेचं दान भरभरून पदरात पडूनसुद्धा वयाच्या पासष्टीत प्रवेश केलेले झाकीरभाई आजही वर्षभर अगणित ठिकाणी आपली कला सादर करत, रोज नवं काही शिकत असतात. टिपत असतात. याचाच एक भाग म्हणून मास्टर्स ऑफ पर्कशन या संकल्पनेद्वारे ते भारतातल्या लोकसंगीत वादकांना दरवर्षी आपल्या बरोबर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर घेऊन जात आहेत. अनेक गुणी ज्युनियर कलाकारांबरोबर तबल्याची साथ करून ते त्यांना प्रोत्साहन देत आहेत. या कलाकारांमध्ये राहुल शर्मा, नीलाद्री कुमार, राकेश चौरासिया यांचा प्रामुख्याने समावेश आहे. मागच्या वर्षी पुण्याला जेव्हा त्यांनी राहुल देशपांडे या युवा कलाकारासोबत नाट्यगीतांसाठी तबला वाजवला, तेव्हा तीस वर्षांपूर्वी याच ‘झाकीर’ने राहुलचे आजोबा पं. वसंतराव देशपांडे यांच्याबरोबर पुण्याला तबल्याची साथ केली होती, याची आठवण उपस्थित श्रोत्यांना झाल्यावाचून राहिली नाही...

एकूणच झाकीर हुसेन यांचे व्यक्तिमत्त्व नेमके काय शिकवते? विशुद्ध भारतीय संगीत ही निव्वळ दिशाभूल आहे. आपले जसे प्राचीन संगीत आहे तसे आफ्रिका, मध्य-आशिया, चीन इथेदेखील अगदी प्राचीन काळापासून संगीत आहे. या व्यतिरिक्त ब्ल्यूज, जाझसारखे प्रकार जगाच्या सांगीतिक नकाशावर उदयास आले आहेत. जगातील या वेगवेगळ्या संगीत पद्धती मानवी स्थलांतरांमुळे एकमेकांच्या संपर्कात येत असतात आणि त्यातून नवीन संगीताचे आविष्कार आपल्या नकळत घडत असतात. आपण आज ऐकतो तो संगीतप्रकार हा अनेक वर्षं आधी झालेल्या सांस्कृतिक प्रवाहांच्या मिलाफाचा परिणाम असतो. त्यामुळे खुल्या दिलाने सर्व संगीतप्रकारांना ‘संगीत’ म्हणून सामोरे गेलो तर आपण व्यक्तिगत पातळीवर अधिक समृद्ध होतो आणि मिळणाऱ्या आनंदामुळे अधिक श्रीमंतदेखील!

या अशा विचारांमुळेच हुसेन यांचा तबला हा जॅझ संगीत असो किंवा पाश्चात्त्य सिम्फनी; मध्य-पूर्वेतील औड हे वाद्य असो किंवा जपानी ड्रम्स, सर्वांमध्ये त्यांच्यातील एक असल्याप्रमाणे मिसळतो! कारण त्या वेळेस ते सारे कलाकार केवळ सूर, ताल आणि लय यांची वैश्विक भाषा बोलत असतात. पु. ल. देशपांडे हे त्या वेळी अग्रगण्य स्थानावर असलेल्या उस्ताद अहमदजां थिराकवा यांच्याबद्दल बोलताना म्हणाले होते की, ‘कान तृप्त करणारा तबला हा इतरांचा, पण मन तृप्त करणारा तबला हा थिरकवांचा.’ माझ्या मते, आज हे वाक्य उस्ताद झाकीर हुसेन यांना अगदी तंतोतंत लागू पडते. कारण आपल्या हृदयाच्या ठोक्यांचाही एक ठेका असतो, याची जाणीव ते आपल्या सर्वांना करून देत असतात...

‘मैं भी सीख रहा हूं’
वयाची सत्तरी पार केलेल्या व्यक्तीपासून अगदी शाळेत असलेल्या मुलापर्यंत सर्वांना झाकीर हुसेन नावाची ही वलयांकित व्यक्ती हवीहवीशी वाटते! त्यांचा कार्यक्रम झाला की, स्टेजच्या मागे अगदी वयाने वृद्ध असलेल्या व्यक्तीलादेखील त्यांचे पाय धरावेसे वाटतात. त्याचबरोबर एखाद्या शाळेतील किंवा कॉलेजमधल्या मुलाला त्यांच्याबरोबर एखादा ‘सेल्फी’ काढावासा वाटतो. परंतु त्या वयस्कर व्यक्तीच्या स्वतः पाया पडून आणि लहान मुलांच्या ‘सेल्फी’ला मान देऊन, ते सर्वांची मने राखतात. बरीच मुलं त्यांच्याकडे ‘मी पण तबला शिकतोय/ शिकतेय’ असं सांगायला येतात. परंतु जेव्हा झाकीरभाई ‘मैं भी सीख रहा हूं’ असं सांगतात, ते त्यांच्या यशाचे रहस्य अप्रत्यक्षपणे उलगडत असतात.

- आशय गुणे Happy

दैनिक दिव्य मराठी - 'रसिक' ( ६ मार्च २०१६)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झाकीरला ( हो झाकिरलाच, उगाच उस्ताद बिस्ताद म्हणणे असली फॉर्मॅलिटी मला जमत नाही.) वाढदिवसानिमीत्त अनेकोनेक हार्दिक शुभेच्छा. त्याला उत्तम आणी निरोगी दिर्घायुष्य लाभो. आणी रसिकान्वर त्याच्या कलेचे गारुड असेच बनुन राहो. पण पासष्टीचा वाटत नाही तो.

अतिशय अभ्यासपूर्ण लेख. उस्तादजींच्या कारकिर्दीचा घेतलेला आढावा, त्या कारकिर्दीची चिकित्सा अतिशय सुरेख. त्यासाठी आशयला अनेकानेक धन्यवाद.

उस्तादजींना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो ही शुभकामना.

सुरेख लेख ! आवडलाच Happy

झाकीरभाईंना वाढदिवसानिमित्त हार्दीक शुभेच्छा !

अतिशय चांगला लेख.

दोन वेळेस झाकीर ह्यांना प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला आहे त्यामुळे लेखातील अनेक गोष्टी पटल्या.

झाकीरजी ६५ वर्षांचे होत आहे हे मनाला पटतच नाही. अजुनही झाकीरजी ३५-४० ले वाटतात. तबला वाजवताना आपले केस मागे टाकत जे कला प्रदर्शन होते ते अजुनही तबल्याच्या कलेपेक्षा मोहक आहे.

मुख्य म्हणजे जुन्या जाणत्या कलाकारांच्या हाताला माईक सापडल्यावर जे घडते ते झाकीरजी घडवत नाहीत. जे काय बोलायचे ते तबल्याच्या बोलातुनच बोलतात.

झाकीरजी, आपल्याला शुभेच्छा !

सुरेख लेख.
झाकीरजी ६५ वर्षांचे होत आहे हे मनाला पटतच नाही.<<<<<+१

उस्तादांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

छान लेख.

झाकीर हुसेन कडे तबला शिकलेले अमेरिकन गोरे ग्रुहस्थ आमच्या ईथे तबला शिकवतात आणि देशी लोक त्याचाकडे शिकायला जातात. त्याचा कडुन झाकीर भाईचे काही किस्से ऐकले होते त्यावरुन ते मनाने पण खुप मोठे होते हे जाणवते.

झाकीरजी ना वाढदिवसाच्या शुभेच्छा .