शाळेच्या आठवणी - ज्ञान प्रबोधिनी

Submitted by शब्दाली on 28 November, 2015 - 05:08

गणपतीत आठवणी लिहिताना शाळेच्या गणपती उत्सवाच्या आठवणी निघाल्या आणि वेगळा धागा काढुया असे बोलणे पण झाले. पण नेहमीप्रमाणे, बाकीच्या गडबडीत ते राहुनच जात होते.

काल माहेरी आवरा आवरी करताना ५ वीला प्रवेश मिळाल्याचे नलुताईंच्या स्वाक्षरीचे पत्र सापडले आणि पाठोपाठ काव्यदिंडीत इन्नाने लिहिलेली "Let My Country Awake" ही कविता वाचली आणि परत एकदा शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या. मग मात्र आज धागा काढायचाच असा निश्चय केला.

ज्ञान प्रबोधिनीबद्द्ल - शाळा / संस्था - ज्यांना काही अनुभव, आठवणी लिहायच्या आहेत, त्यांच्यासाठी हा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमचे खरोखर कौतुक वाट्ते, शाळेच्या इतक्या आठवणी मनात जपुन थेवल्या आहेत. खेद हा वाट्तो कि अश्या आठवणी माझ्याकडे नाहीत. नाही म्हणायला माझी शाळा नाशिक मधील नावाजलेली मराथी शाळा, पण आठवणी इतक्या कडवट आहेत कि, नाशिक गेल्यावर शाळेवरुन जाताना, गेट उघडुन आत देखील जावेसे वाटत नाही.

शाळेच्या माजी विद्यार्थीचे गटग झाले, तेव्हा, शाळा सोडुन सर्व विश्यावर बोलणे झाले.

मलाही प्रबोधिनितल्या तिन मुलींची पालक म्हणून खूप आठवणी लिहायच्या आहेत.प्रबोधीनीने मुलींच्याच नाही तर माझ्याही जडणघडणीत हातभार लावला. शब्दाली धन्यवाद असा धागा काढल्याबद्दल.

मला सोलापुर प्रबोधिनी आणि तत्सम मंडळींचा फारसा चांगला अनुभव ऐकण्यात नाही. तरीही अनुभव वाचायला मजा येत आहे.

जिज्ञासा, पायस, बॅच कोणती ते पण लिहायचे का, म्हणजे वाचताना कोणते आधीचे हे नीट कळेल.

माझी सुरुवात - ५ वी प्रवेश

पुण्यात येऊन ४-५ वर्षे झाली होती. तोपर्यंत मोठ्या आणि धाकटया बहिणीच्या शाळेचा प्रश्न सुटला होता. मी ज्या शाळेत होते ती शाळा ४ थी पर्यंतच होती त्यामुळे सहामाहीनंतर शोधाशोध सुरु झाली. आईने वर्तमानपत्रामधली प्रबोधिनी प्रवेश-परीक्षेची बातमी वाचली आणि चौकशी केली. जिज्ञासाने लिहिल्याप्रमाणे परीक्षा ४ थीच्या स्कॉलरशिपच्या अभ्यासक्रमावर आधारित होती. परंतु अस्मादिकांना आधीच्या शाळेने त्या पात्रतेचे (:फिदी:) समजले नसल्याने काहीही माहिती नव्हती.

प्रबोधिनीच्याच ग्रंथालयातुन एक आठवड्यासाठी काही पुस्तके आणली आणि अभ्यास केला आणि परीक्षा पास झाले. मुलाखतीची वेळ आणि दिवस कळला आणि त्याच दिवशी ४ थीची तोंडी परीक्षा (वार्षिक) आहे हे पण कळले. वेळ पुढे-मागे करुन दोन्ही किल्ले सर झाले आणि ४ थी निकाल लागण्याआधीच ५ वीत प्रवेश मिळाल्याचे नलुताईंचे पत्र आले.

पुढे, प्रवेश घेताना फक्त शनिवारी गणवेश घालायचा - तो पण पंजाबी ड्रेस, आठवड्यातुन ३ दिवस दल - ज्यासाठी संध्याकाळी परत दलाच्या ठिकाणी जायचे, पुस्तके वेगळी असतात आणि ती फक्त शाळेतच मिळतात अशा नवीन गोष्टी पण समजल्या, ज्या आत्तापर्यंतच्या शालेय अनुभवापेक्षा खुपच वेगळ्या होत्या. Happy

<<शाळा को-एड नाही हे माहीत नव्हतं.>>
@अगो,

याबाबत मला असे वाचलेले आठवतेय की,
महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळण्यासाठी शाळा प्रयत्न करत होती. पण सरकारचे अनुदान शाळेला नको होते. कारण त्यातून सरकारी हस्तक्षेपाला सुरवात होणार होती.

याउलट शाळेने स्विकारलेले स्वतंत्र धोरण सरकारला मान्य नव्हते. यासाठी शाळेने अनुदान स्विकारायचे मान्य केले तरच सरकार शाळेला मान्यता द्यायला तयार होती.

बरीच वर्षे हा वाद चालू होता. शाळेची पहिली बॅच ११ वी च्या परिक्षेला बसण्या अगोदर हा प्रश्न सुटणे आवश्यक होते. व सरकार या क्षणाचीच वाट पहात होते. पण....

शाळेने महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेचा नाद सोडून देऊन सीबीएस्सी बोर्डाकडून मान्यता मिळवली. महाराष्ट्र शासनाच्या अधिकार्‍यांना / राजकारण्यांना हा फार मोठा धक्का होता. कारण सीबीएस्सी बोर्डाकडून मान्यता मिळवणे ही फारच अवघड गोष्ट समजली जात असे.

शाळेशी संबंधीत असलेले याबाबत अधिक माहिती देतीलच.

शाम भागवत, तुम्ही दिलेली माहिती माझ्यासाठी नवीन आहे. धन्यवाद.
पण को एड म्हणजे को एज्युकेशन, मुले आणि मुली ह्यांनी एकत्र शिकणे असं मला वाटत होतं. त्या दृष्टीने तुम्ही दिलेल्या माहितीचा परस्परसंबंध लावता आला नाही.

शाळा को-एड का नाही याचे स्पष्टीकरण आम्ही विद्यार्थी कदाचित नाही देऊ शकणार पण हा निर्णय घेण्यामागे बराच विचार झाला आहे हे नक्की! प्रज्ञा मानस संशोधिकेत याविषयी संशोधनही झाले आहे. तिथल्या उषाताईच यामागे नक्की काय विचार आहे ते सांगू शकतील.

शाळेबद्दल बरंच ऐकून होते, पुण्यातल्या नातेवाईकांकडून. इथे वाचून नक्की काय ते कळतंय. फार सुंदर शाळा. एकेकाचे अनुभव पण छान. Happy

छे! प्रबोधिनीचा प्रवेश हुकला (कशाने ते आठवत नाही. पण कमान टाकताना पाठ मोडली होती माझी! .. असे होते का निवडप्रक्रियेत व का होते हे नक्की आठवत नाहीये) ह्याचे इतक्या वर्षांनंतर वाईट वाटते आहे! Sad किती छान लिहिता आहात सर्व! माझी ड्रीमस्कुल होती ती! पुढे प्रबोधिनीचे फ्रेंड्स मिळाल्यावर कळले.. त्यांच्यातला तो वेगळा स्पार्क दिसतोच दिसतो.

प्रबोधिनी, हा माझ्या मी आहे तशी असण्याला कारणीभूत असा भाग आहे. चौथीच्या दुसर्‍या टर्म मधे प्रवेश चाचणी द्यायला गेले तेव्हा पासून चा अजूनही न सुटलेला ॠणानुबंध.
आईबाबाना मला तिथे का पाठवावस वाटल , हे एकदा विचारल पाहिजे कारण माझी आधीची शाळा घरासमोरचा रस्ता ओलांडून समोर इतकी जवळ अन सोईची होती. चाचणी परिक्षा पण लख्ख आठवते. माझी आजी तेव्हा हॉस्पिटल मधे होती. बाबा मला प्रबोधिनीत चाचणीसाठी सोडून गेले . आजी गेली त्याच दरम्यान. अन मला शाळेत सोडलय हेच विसरून गेले सगळे धावपळीत. ह्या शाळेत आलीस तर साहित्यपरिषदेचा बस स्टॉप इथे आहे . चार नंबरची बस स्वारगेटपर्यंत आहे हे सगळ बाबांनी दाखवल होतंच . अर्थात त्याचा लगेचच उपयोग करावा लागेल अस वाटल नव्हत. वीस पैसे हाफ तिकिट होत . अन आठ आणे होते माझ्याकडे. चाचणीची सर्व मुल गेली हे पाहून मीही बहुधा कोणी येत नाहीये अस ठरवून अस्मादिन चार नंबर पकडून स्वारगेट अन नंतर चालत घरी. मला माझ्या स्वातंत्र्याची झालेली पहिली ओळख. Happy अन प्रबोधिनीशीही . नंतरही स्वातंत्र्य अन प्रबोधिनीही सांगड कधिच उसवली नाही.
आज दिवसभरात टाकीन अजून पोस्ट्स.

त्यांच्यातला तो वेगळा स्पार्क दिसतोच दिसतो. >> +१

जिज्ञासा- सुंदर पोस्टस.
इन्ना आणि शोभनाताई- आपल्या पोस्टींची वाट पहाते.

मी आईला विचारले फोन करून. त्यात कमान वगैरे प्रकरण होते. शारिरीक शिक्षण वगैरे असावे. शिवाय इंटरव्ह्यु झालेला. आईबाबा कॉमर्सचे तर मुलांचे सायन्सचा अभ्यास कसा जमेल वगैरे विचारले होते म्हणाली.
एनीवे, तिथे असते तर मजा आली असती.. काही उपक्रम गरवारेत होते. ग्राउंडवर जमून ओंकारसाधना, पाठ करून गाणी म्हणणे इत्यादी.. पण एकतर ह्युज शाळा आहे ती. शिवाय बरेच उपक्रम करून घेणारे गाडगीळ सर घाबरवणारेच होते. जिज्ञासाने लिहिलेले वाचून सहीच वाटले! मला तर आमच्या शाळेतून दिसणारा प्रबोधिनीचा तो घुमट(?)ही आवडायचा! Happy
असो.. मी उगीच काहीही लिहिण्यापेक्षा वाचह्ते आता पोस्टी..

लेकीच्या प्रवेश परिक्षेसाठी प्रबोधिनीमधे गेलो होतो त्यावेळी महेंद्रभाईंचे पालकांसाठी एक भाषण होते. त्यातला मला सगळ्यात आवडलेला एक किस्सा.

आपण नेहमी म्हणतो एखादा गुण / दोष / स्वभावाचा पैलू हा रक्तात असावा लगतो. ह्यावरुन एका विद्यार्थ्याच्या मनात आले की माणसाच्या स्वभावाचा आणि रक्त गटाचा काही संबंध असेल का? त्याने शिक्षकांना शंका ही विचारली तेव्हा त्याला स्वतःच उत्तर शोधण्यास सांगण्यात आले. वाटले तर त्याने वर्ग मित्रांची मदत घ्यावी.

त्या मुलाने वर्ग मित्रांच्या मदतीने एक Questionnaire बनवली. माणसाचा स्वभाव समजेल अश्या तर्हेचे प्रश्ण त्यात विचारले होते. सोबत रक्त गटही लिहायचा होता. Questionnaire चा पहिला मसुदा शिक्षकांना दाखवला. त्यांनी काही बदल सुचवले. ट्रायल म्हणून वर्गातल्या सगळ्याकडुन Questionnaire सोडवली. सगळे व्यवस्थित जमते आहे म्हणल्यावर इअतर वर्गातली मुले, नातेवाईक, ओळखीपळखीचे लोक अश्या सगळ्याकडुन Questionnaire भरुन घेतली.

निष्कर्श काय आला हे माहीत नाही पण शंका निरसन करण्याची, त्यात इतरांना सामाऊन घेण्याची पद्धत मला फारच आवडली.

अजुन पण काही किस्से आहेत पण ते नंतर Happy

मी प्रबोधीनीत आले तेव्हा पाचवीत पुस्तके अन सिलॅबस प्रबोधीनीत तयार केलेलं होतं.
असंख्य प्रयोग केले गेले प्रबोधिनीत शिक्षणाच्या बाबतीत. अन आम्ही सँपल. Happy
स्पोकन इंग्लीश , रिटन इंग्लिश, असे दोन इंग्रजीचे भाग होते. मी अन बहुतांश मराठी माध्यमातून आलेले होतो. एका बाजूला अल्फाबेट्स, अन एका बाजूला वयानुरुप व्होकॅब्युलरी असा दुहेरी प्रवास. लहान मुल नव्यानी भाषा शिकतं तेव्हा शब्द संपदा वाढते अन लहान वाक्य बोलत बोलत व्याकरण अंगवळणी पडत. त्याच प्रकारे देवनागरीत इंग्रजी लिहिलेली असंख्य गोष्टीची पुस्तकं वाचत बोली बाषा शिकत एका बाजूला इंग्रजी ची अल्फाबेट्स, स्पेलिंग्स करत, सहावी च्या दुसर्‍या सत्रा पर्यंत सायन्स अन गणित इंग्रजी माध्यमात सुरु झालं. हिंदी च भारती नावाच पुस्तक सातवी पर्यंत होतं. त्यानंतर सामाजिक शास्त्र ( इ भु नाशा) हिंदी माध्यमातून शिकल. हिंदी हा वेगळा विषय नव्हता मग त्यानंतर. मराठी मातॄभाषा ! आवांतर वाचनातून समॄद्ध करायची , त्यामुळे हाही विषय नव्हता. भाषा म्हणून इंग्रजी अन संस्कृत !
अर्थात प्रबोधिनीत जाउन अभ्यास पण केला , अस म्हणण्याइतकच रितसर अभ्यास करण्याच महत्व. इतर उद्योगच जास्त. ( खूप जास्त Wink )
क्रमशः

स्वातंत्र्य म्हणजे काय हे मला खर्‍या अर्थानी दहावीनंतर प्रबोधीनीतून बाहेर पडाल्यावर कळाल. तोवर प्रबोधिनी म्हणाजे , प्रशाला , संत्रीका ( संस्कॄत संस्कृती संशोधिका) , प्रज्ञामानस संशोधिका, संचालक कार्यालय, रसमयी, ग्रंथालय, फिजिक्स , केमेस्ट्री , बायो लॅब्ज ,जनरेशन ३ कॉम्प्युटर असणारी कॉम्प रूम , शेजारचा परांडेवाडा, स्वैपाकघर , उपासना मंदिर, गावभर चालणाअरे उद्योग अस सगळ होतं . कुठेही कधीही जायला परवानगी लागत नव्हती. कधीही कोणतीही शंका अली की हवी तितकी पुस्तक शोधता यायची. प्रश्न विचारता यायचे. आपापली उत्तर शोधायची कशी हे कळेपर्यंत प्रश्न विचारायची लाज वाटली नाही. ह्याच श्रेय तिथल्या त्यावेळच्या शिक्षकांना! आजही मला ह्याचा फार उपयोग होतो.

प्रज्ञा मानस संशोधिका हे माझ आवडतं ठिकाण.
पाचवीत असताना आमच्या वर्गाच्या खालच्या मजल्यावर, संशोधिकेत एका टेरेस मागे एक सरदारजी संशोधक होते ( मी आता नाव विसरले.) सरदारजी मेंदुशी निगडीत काम करतात ह्याच तेव्हा मला फार नवल वाटायच ( खुसुखुसु हसु यायच) मग एकदा मी डोकावले तिथे. त्यांनी मला एक बेस्ट तंत्र शिकवल तेव्हा . डायगोनल रिडिंग. स्पिड कंट्रोल करता येणारा एक अपारदर्शक फ्लॅप वाचायच्या पॅड वरून खाली सरकायचा. आपल्या वाचनाच्या स्पिडनुसार तो अ‍ॅडजस्ट करायचा. अन हळूहळू आपला वाचायचा स्पिड वाढवायचा. हे करताना नेमके कीवर्डस टिपत संपूर्ण वाक्य न वाचता नेमके शब्द वाचून तो स्पिड अजून वाढवायचा. अर्थात हे एक तंत्र आहे . वाचनाचा उद्देश काय ह्यावर हे तंत्र वापरायचे का नाही हे ठरवता येतच. अश्या लहान लहान इतक्या गोष्टी कळत नकळत शिकल्या तिथे , आज त्या सगळ्यांचा भरपूर उपयोग होतो.
बुद्धीमत्तेचे असंख्य पैलू असतात. अन प्रचलीत शिक्षणपद्धतीतील मुल्यमापन ह्यातील काहीच पैलूंना मोजू शकतं. अस पाचवीत सांगितल . माझ्या दृष्टीनी ह्याचा अर्थ ; परिक्षेत मार्क कमी जास्त ( कमीच नेहेमी) असल्यानी काहीच बिघडत नाही , माझ्या लखलखित पैलूचा शोध लागला नसेल अजून. Wink , असा होता . निव्वळ कंटाळा म्हणून संदर्भासहित स्पष्टीकरण लिहायच सोडून द्यायच अन निबंध सगळेच ३ लिहायचे आवडत म्हणून , हे उद्योग आठवी नववीच्या परिक्षेतही केलेत मी. ५०% ला उत्तिर्ण असा बेंच मार्क असल्यानी पेपरात नापास पण निबंध फलकावर लागायचे. आणि ह्यात काहिच गैर वाटायच नाही मला अन इतरानाही.
हे विविध ब्लॉक्स, रुल्स, शिकण्यातले , शिकवण्यातले नसल्यानी शिकणे हा आनंद होता. नेसेसरी हॅझार्ड नव्हता कधिच.

अभ्यासाशिवाय केलेल्या बर्‍याच उद्योगापैकी , सुरवात झाली स्वकष्टकमाईनी गुरुदक्षिणा देण्याची. मी जाई जुईचे गजरे करून सकाळी सारसबागेसमोर विकले होते. राख्या बनवून विकणे , राख्यांची किट्स विकणे, रसमयी नावाचा एक लघूद्योजिकांचा गट होता. सरबतं , लोणची मुरांबे , चटण्या बनवायच्या त्या. अन आम्ही विक्रीला मदत करायचो. ह्यातही गम्मत होती. पहिल्या एक दोन वेळेस कौतुकानी घेणारे शेजारी , नातेवाईक , ही दरच आठवड्याला कैतरी नविन घेउन येतेय म्हटल्यावर कंटाळाले , मग खरं शिक्षण सुरु झाल. पैसे हाताळाणे , हिशोब ठेवणे , मालाची ऑर्डर घेणे , नेउन देणे, जे विकतोय त्या वस्तूचे गुणदोष माहित करून घेउन त्याच मार्केटिंग करणे. फिडबॅक नोंदवणे, त्यानुसार बदल करवून घेणे. प्रसंगी नकार पचवणे. फार मस्त फेज होती ती माझ्या आयुष्यातली. अभ्यास तोंडीलावण्याएवढा होताच . आज व्यवसायात एखादी बाब / डिझाइन समोरच्याला पटवून देताना , ह्या लहानपणी वाढवलेल्या ईक्युचा किती तरी उपयोग होतो. ( हे आता कळतय Happy )

गुंजवणी खोर्‍यातली गावं प्रबोधिनीनी दत्तक घेतली होती. खेडशिवापुर चा वाडा त्याच केंद्र. विकासकामं करताना आधी करावा लागत ते डेटाकलेक्शन , अन त्यासाठी (अती) उत्साही कार्यकर्ते आम्ही विद्यार्थी. हे डेटा कलेक्शन , मग अ‍ॅनॅलिसीस अन त्यानंतर उपाययोजना , कार्यवाही ह्या प्रक्रियेचा, अ‍ॅनॅलिसीस पर्यंतचा भाग मी दहावीत असेतो झाला त्यानंतरचा कार्य्वाहीचा भाग अजूनही चालू आहे. अश्या २५-३० वर्षांचा रोडमॅप करून ठेवणे अन राबवणे द्रष्टेपणाचे आहे. अभिमान वाटतो मी ह्याचा भाग होते ह्याचा. गावच्या सरपंचाच्या नावे लिहिलेल पत्र घेउन दोन तिन दिवसाच्या दौर्‍यावर सहा सात जणींचा गट ह्या गावांत जायचा . तिथे महिला अन मुलांचे आरोग्य, युवकांचे गट , शेती , गुरं , साथीचे रोग, पाउस , विहिरी , पाण्याची पातळी, शाळा , शिक्षण ह्या सगळ्या बाबत गावातल्या लोकांशी बोलून मुलाखती घेणे , नोंदी करणे हे कामाच स्वरूप होतं. कधी कोणा गावकर्‍याच्या घरी , कधी देवळात , कधी खेडशिवापुरच्या वाड्यातून ये जा करून ही माहिती आम्ही मिळावली होती. आज ह्याचा विचार करूनही आश्चर्य वाटत. सातवी आठवीतल्या मुलींना अस अनोळखी गावात धाडणं पालकांनाही धाडसाच वाटल नव्हत? प्रबोधिनीतल्याच मोठ्या लोकांच एक फिरतं पथक सतत व्हिजिलंट असायच . पण फक्त एका पत्राच्या आधारे लोकाना ऐकतं अन बोलतं करण , ह्याच शिक्षण अमुल्य! अनेक अडचणी यायच्या , पोरींशी काय बोलायच असा पवित्रा घ्यायचे सरपंच. ह्यावर तोडगा काय काढावा ह्याचा खल पण आम्हीच केला अन गणपतीत कार्यक्रम सुरु झाले गावोगाव. गावात काय पटेल रुचेल त्या माध्यमातून प्रबोधन करुया ! तेव्हाची आम्हा सगळ्यां चा माईंडसेट , आणा काय ते प्रश्न, सोडवून दाखवू , आणा काय तो डोक्याला खुराक , अजून हवय ,अजून हवय असा काहीसा होता. Happy
जिथे जायचे ठरवू तेथे आम्ही जाउच जाउ! हे समुहगीत पहिल्याच वर्षी शिकल्यानी बहुतेक, एकदा ठरवल्यावर अडचणी येणारच अन त्या सोडवून पुढेही जाणारच. प्रश्न सोडवण्यासाठी सल्ला मुबलक पण उत्तर आपापलीच शोधाय्ची सवय इथेच लागली.

Pages