शाळेच्या आठवणी - ज्ञान प्रबोधिनी

Submitted by शब्दाली on 28 November, 2015 - 05:08

गणपतीत आठवणी लिहिताना शाळेच्या गणपती उत्सवाच्या आठवणी निघाल्या आणि वेगळा धागा काढुया असे बोलणे पण झाले. पण नेहमीप्रमाणे, बाकीच्या गडबडीत ते राहुनच जात होते.

काल माहेरी आवरा आवरी करताना ५ वीला प्रवेश मिळाल्याचे नलुताईंच्या स्वाक्षरीचे पत्र सापडले आणि पाठोपाठ काव्यदिंडीत इन्नाने लिहिलेली "Let My Country Awake" ही कविता वाचली आणि परत एकदा शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या. मग मात्र आज धागा काढायचाच असा निश्चय केला.

ज्ञान प्रबोधिनीबद्द्ल - शाळा / संस्था - ज्यांना काही अनुभव, आठवणी लिहायच्या आहेत, त्यांच्यासाठी हा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यांच्या पोस्ट्स वाचायला मजा येतेय. शोभनाताईंची पालक म्हणून आलेली असल्याने जास्तच आवडली. अजून आठवणी लिहा शोभनाताई Happy

मला एकच कुतूहल वाटतेय. तत्त्वनिष्ठ शाळा असूनही फटाकेविक्रीचा पुरस्कार कसा होत होता ? खरेदी-विक्रीचाच अनुभव मुलांना द्यायचा असेल तर उत्पादनांना तोटा नाही.

जिज्ञासा तुझ्य आठ्वणी वाचताना सारख वाटत होतच मला,श्रद्धानीही हे सगळ केलय.बहुता तिकोना ट्रेकच्या वेळी तिला विचारल होत.मोठ्ठ कोण आहे? तर ती म्हणाली होती मीच नेणार सगळ्याना.परत सगळे सुखरूप येईपर्यंत मला झोप लागली नव्हती.पण सगळ्या साहस कृत्यानंतर मुलींचा फुललेला चेहरा पाहून आणि भरभरून माहिती ऐकताना खूप आनंद मिळायचा.एक क्षणही वाटल नाही कुठून या शाळेत घातलं.

किती भारी स्नेहमेळा भरलाय इथे प्रबोधिनीचा !!!!
वाचनमात्रातून बाहेर पडून लिहिल्याशिवाय राहवले नाही.

प्रज्ञा मानस ची विद्यार्थिनी, नंतर समुपदेशक आणि आता लेक तिथे शिकतेय म्हणून पालक म्हणून अनेक वर्षे प्रबोधिनीशी जोडलेली आहे. तुम्हा सगळ्यांसारखं म्हणते, आज मी माझ्यासारखी असण्यात प्रबोधिनी आहे आणि आहेच !

या धाग्याची लिंक महेन्द्रभाई आणि अनघाताईंना पाठवण्याचा मोह आवरत नाही. Happy

जिज्ञासा नितांत सुंदर लिहिते आहेस!
शोभनाताई तुम्ही तुमचे अनुभव व्हॉईस रेकॉर्ड करून ठेवा त्याचे टाईपिंग करायचे काम करायला मी तयार आहे. अजूनही काही जण हे काम करायला नक्की पुढे येतील. आपण इन्नाला देखिल लावूया टाईप करायला, नाहीतरी फार त्रोटक लिहित्ये ती Proud

हर्पेन, टाईप करायला मी पण आहे तयार.

या शाळेत गेले नाही तरी काही काही उपक्रमांच्या निमित्ताने शाळेशी संबंध आला. छान वाटते तिथे जायला. पोंक्षे सर माझ्या भावामुळे मला ओळखतात, कधीही भेटले तरी सहज सगळे संदर्भ आठवून बोलतात याचे फार कौतुक वाटते.

जिज्ञासा - फार उत्कटतेने लिहिलंय सगळं - तुझ्या प्रभावी शब्दांची एक जोरदार किमया आहे की ते सारं आमच्यापर्यंत सहज पोहोचतंय..... Happy

पुरंदरे , नुसत्या श्ब्दांतुन तुमच्या पर्यंत पोचतय ! आम्ही ज्यांनी अनुभवलय त्यांना सगळ अजून अपूर वाटतय. कधी कधी आश्चर्य वाटत, कीती काय काय केल होतं तेव्हा फक्त सहा वर्षात!

आम्ही ज्यांनी अनुभवलय त्यांना सगळ अजून अपूर वाटतय. कधी कधी आश्चर्य वाटत, कीती काय काय केल होतं तेव्हा फक्त सहा वर्षात! >>>> तुमची तरल - संवेदनशील मनं - त्यांचाही फार मोठा सहभाग नक्कीच आहे त्यात ....

खरतर प्रबोधिनी ही एक संस्था आहे. प्रशाला त्याचा एक लहानसा भाग. ह्या धाग्यावर प्रबोधिनीशी निगडीत कोणीही आठवणी लिहा खरतर. काय म्हणता ? शब्दाली तस केलं तर टायटल बदलूया .
अजून एक , पद्य हा आपल्या तिथे असण्याचा अविभाज्य भाग! तीही एकत्र करुया का इथे?

इन्ना - मी शेवटी लिहिले आहेच - ज्ञान प्रबोधिनीबद्द्ल - शाळा / संस्था - ज्यांना काही अनुभव, आठवणी लिहायच्या आहेत, त्यांच्यासाठी हा धागा. - नावात पण घालु का हे ?

पद्यांवरून आठवलं..
एका वर्षी मला मातृमंदिर च्या पद्द्यांची स्पर्धा असते त्या कार्यक्रमाची जबाबदारी दिली होती. स्पर्धा पुणे जिल्ह्यातील शाळांसाठी होती. तेच 'उधळित शत किरणा' आणि 'आव्हान हे ज्योतिंना की या' गीते शाळांना दिली होती. माझं काम होतं ३ परीक्षक्+कॅमेरामन घेऊन त्या शाळांमध्ये जाणं आणि पद्य रेकॉर्ड करून आणनं. परीक्षक म्हणून एक प्रसिद्ध संगिताचे जाणकार आणि दोन वेगळ्या शाळांमधले संगीत शिक्षक.
तेव्हा पुणे जिल्ह्यातल्या, मावळातल्या, ग्रामीण भागातल्याही अनेक शाळांनी भाग घेतला होता. रोज सकाळी निघून दिवसभरात ४-५ शाळांना भेटी देऊन रात्री परत असे जवळजवळ ७२ शाळांमध्ये फिरलो होतो आम्ही. शेवटी विवेकानंद जयंतीला निगडीला ५००० विद्यार्थ्यांनी एकत्र ती गीतं गायली होती. अविस्मरणीय होतं ते सगळं !!!

त्या शाळा बघताना अर्थातच माझं जे आपोआप प्रशिक्षण झालं, शिक्षणाचं 'दर्शन' झालं ते खूप खूप मोलाचं आहे.

निगडीला १९९९-२००० च्या दरम्यान क्रीडाकुल सुरू झालं. त्यानंतर लगेच मी तिथं काम सुरू केलं होतं. ही खेळाडुंची शाळा. १२ तास मुलं शाळेत. सकाळी संध्याकाळी मैदानावर ५ तास, ५ तास नेहमीची शाळा, २ तास जेवण विश्रांती पंचकर्म मानसप्रशिक्षण (क्रीडामानसशास्त्र). इथे क्रीडामानसतज्ञ म्हणून काम करताना ध्येयाने भारलेल्या व्यक्तिंसोबत काम करायला मिळालं. अनेक राष्ट्रीय पातळीवरच्या क्रीडास्पर्धांच्या निमित्तने खेळाडू मुलांसोबत फिरता आलं. वर्षाला किमान २० राष्ट्रीय पदकं, ३०-३५ राज्य आणि बाकी गणना नाही हे प्रत्यक्ष सहभागी होऊन अनुभवणं मी कधीच विसरू शकणार नाही.

अजून खूप काही आहे. सांगते हळुहळू...

पद्य बरीच पाठ आहेत पण टंकाळा आला आता !

स्वीकारुनी ही नमने-सुमने आशीर्वच द्यावा, नमोस्तुते गुरुदेवा |

आलो तेव्हा अनुभव होता, मायपित्यांच्या वत्सलतेचा
परंतु तुमच्या परीसस्पर्शे ज्ञानचक्षु उघडला
परंपरेचा,संस्कारांचा सहज लाभला ठेवा
नमोस्तुते गुरुदेवा |

************************************************
क्षितिज नवे
क्षितिज नवे मज सतत बोलवी, साथीला सन्मित्र हवे
आज एकटा अनघड जरी मी, मनात अंकुर हा उगवे

ही आवडीची गाणी आहेत. पूर्ण गाण्याचे शब्द आठवत नाहीत. शब्द मिळाले तर चाल आठवेल.

काही खास प्रबोधिनीचे शब्द त्यातलं पद्य. ही पद्य,प्रार्थना, भजन मुलींकडून माझ्या पर्यंतही आली. हे वीर विवेकानंद,मातृमान्दिरमे चलो प्रिय,विकसता विकसता विकसावे,हे आनंदी गाणे,ही नावे लिहिली तरी मला वाटत प्रबोधीनीत गेलेल्या सर्वाना एक स्वरात ऐकू येतील.आषाढी एकादशीला वारीबरोबर पाचवी पासून सर्व वर्ग थोड जायचे.कांदा मुळा आणि भाजी,आम्ही बिघडलो इत्यादी भजन त्यांच्या साध्या सोप्या चाली.आजही आमच्या पार्किन्सनन्स मित्र मंडळाच्या,जेष्ठ नागरिक संघाच्या सहलीत एकत्रित म्हणायला सांगायला उपयोगी येतात.याशिवाय राष्ट्रीय एकत्मातेवरची विविध भाषातील गाणी.'चलुवीन','आकाशगंगा सूर्य चंद्र तारे',संस्कृत मधील' सं गछ्य्ध्वं सं वदध्वं' ही ऋचा.इत्यदि.'सं गछ्य्ध्वं सं वदध्वं' हे तर आजही सभेच्या सुरुवतीला अनेकदा अर्थ सांगुन म्हणते.आणि सर्वाना ते आवडत.तेंव्हा आमच्याकडे सारखे लाईट जायचे.लाईट गेले कि माझे सासरे म्हणायचे म्हणा गो तुमची गाणी.मग मुलींचे बरोबर मीही म्हणायची आता लाईट गेले की शेजारच्यानाही आमची गाणी आठवतात.अशी प्रबोधिनी झिरपत विविध पातळ्यावर माझ्या पर्यंतही पोचलीय.

किती भारी स्नेहमेळा भरलाय इथे प्रबोधिनीचा !!!!
वाचनमात्रातून बाहेर पडून लिहिल्याशिवाय राहवले नाही. >> मितान +१११११

लोकसत्तामधली बातमी -
अप्पासाहेब पेंडसे जन्मशताब्दी समितीतर्फे शनिवारी परिसंवाद - http://www.loksatta.com/pune-news/appasaheb-pendse-birth-centenary-commi...

रविवारी सकाळी (२० डिसें.) अभिवादन पदयात्रा आणि शनिवारी "भारत - २०५० विश्वसत्ता" या विषयावर मुक्तांगण इंग्लिश स्कूलच्या सभागृहात परिसंवाद आयोजित केला आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, महाराष्ट्र नॉलेज फाउंडेशनचे संचालक डॉ. विवेक सावंत, गोखले इन्स्टिटय़ूटचे संचालक डॉ. राजस परचुरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण अभ्यास विभागाचे डॉ. श्रीकांत परांजपे हे सहभागी होणार असून, अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आहेत.

फायनली इथे लिहिण्याइतका निवांतपणा मिळाला!
अशोकमामा, मी नताशा, मंजूताई, हर्पेन, पुरंदरे शशांक, सगळ्यांचे मनापासून आभार! मी त्यातल्या त्यात ठळक आठवणींना उजाळा देत्येय पण इन्ना म्हणाली तसं ते अपुरं वाटतंय! अजून खूप लिहिता येईल!
इन्ना, मी अजून गेले नाहीये purposium ला. येत्या रविवारी माझ्याच वर्गातली सायली बोलणार आहे. पण मला कधीतरी जायचे आहे.
शोभना ताई, बरं झालं तुम्ही श्रद्धा ताईला आमच्याबरोबर तिकोन्याला येण्याची परवानगी दिली! आम्ही खूप धमाल केली तिच्याबरोबर Happy
मितान, मस्त आठवणी! निगडीच्या क्रीडाकुलला आम्ही एकदा गेलो होतो असं अंधुक आठवतंय. झेडपीच्या मॅचेसच्या वेळी.
अगो, फटाकेविक्री बद्दल - फटाक्यांमुळे होणारे वाईट परिणाम लक्षात आल्यानंतर ही विक्री कमी केली आहे. पण बरेचदा असे उपक्रम एका फटक्यात बंद करता येत नाहीत (for various reasons). त्याला पर्यायी उपक्रम सुरु होऊन यशस्वी झाले की मग हा उपक्रम पूर्णपणे बंद होईल. अर्थात कोणी युवक विभागाचा सध्याचा कार्यकर्ता असेल तर तो लेटेस्ट माहिती देऊ शकेल.
पद्य! माझ्याकडे प्रबोधन गीते (पुस्तक) आहे. मला वाटतं रेकॉर्ड केलेली प्रबोधन गीते आहेत online ऐकण्यासाठी. सापडली तर इथे लिंक देते. त्याशिवाय कितीतरी पद्य/कविता आहेत ती कुठेतरी लिहून ठेवली पाहिजेत!

प्रबोधिनीत यायचे समर्थ व्हावया
समर्थ मायभूमीला जगी करावया
फुल फुल गुंफुनीच माळ होतसे
थेंब थेंब झेलुनी झरा वहातसे
मोकळ्या मनी प्रेमी फुलवूनी
माळा गुंफूया, या साखळी जोडूया

जिज्ञासा, खूपच मस्त लिहिल आहे, तुझ हे प्रत्येक वर्षीच लिखाण सेव्ह करून ठेव. इन्ना, शब्दाली आणि इतर खूप छान लिहिल आहे. शोभनाताई अजून लिहा. खूप छान वाटल वाचून. तुमची शाळा खूपच मस्त आहे.

फटाकेविक्री बद्दल - फटाक्यांमुळे होणारे वाईट परिणाम लक्षात आल्यानंतर ही विक्री कमी केली आहे. >> बंद केली आहे. युवक विभाग सहविचार समितीने (मी स्वतः समितीवर नाही, पण संपर्कात आहे त्यामुळे लेटेस्ट माहिती)गेल्या वर्षी आढावा घेतला. आता पणती विक्री हा नवीन उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने हा फटाकेविक्रीला शाश्वत/लाँग टर्म पर्याय होऊ शकतो असे लक्षात आले व फटाकेविक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आता पणती विक्री हा नवीन उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने हा फटाकेविक्रीला शाश्वत/लाँग टर्म पर्याय होऊ शकतो असे लक्षात आले व फटाकेविक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. >>> हे वाचून खूप मस्त वाटले. धन्यवाद अपडेट दिल्याबद्दल Happy

आरती, धन्यवाद! हो मी माझ्या पोस्ट्स सेव्ह करते आहे एकीकडे!
पायस, मस्तच! हे माहिती नव्हते.
प्रबोधन गीते सापडली online! ही लिंक! https://archive.org/details/PrabodhanGiteByJnanaPrabodhini

इयत्ता दहावी: भाग १

आलीच की दहावी! प्रबोधिनीतली सहा वर्षे चढत्या भाजणीची वाटतात मला. त्यामुळे दहावीचं वर्ष सगळ्यात खास आणि खूप लक्षात राहिलेलं आहे. नववी आणि दहावी आम्ही एकाच वर्गात (वर्गखोली) होतो. त्यामुळे कदाचित नववी ते दहावी हे transition देखील जाणवलं नाही. आमच्या पंचनदीच्या शिबिराची एक गम्मत म्हणजे हे शिबीर झालं २६ मार्च ते ३० मार्च ह्या कालावधीत आणि आमच्या वार्षिक परीक्षा होत्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात! म्हणजे नववीच्या वार्षिक परीक्षेच्या फक्त एक आठवडा आधी आम्ही सगळा अभ्यास सोडून कोकणात शिबिराला गेलो होतो. आमच्या सुदैवाने पालकांना आणि शाळेला ह्यात आमचे “शैक्षणिक नुकसान” होण्याची भीती वाटली नाही. नाहीतर आम्ही किती मोठ्या आनंदाला मुकलो असतो.

तर शिबिरावरून परत आलो, नववीची परीक्षा दिली आणि लगेच १५ एप्रिलपासून आमचे दहावीचे वर्ग सुरु झाले. १५ एप्रिल ते १५ मे असे दहावीचे जास्तीचे तास झाले होते. मला वाटतं तेव्हा आमची अर्धा वेळ शाळा होती आणि उरलेला वेळ आम्ही शाळेत पडीक असायचो! आमच्या वेळी दहावीची पुस्तकं आणि नोट्स ह्या आधीच्या वर्गातल्या मुलींकडून वारसा हक्काने मिळायच्या. किमान आठ ते दहा वर्षे जुन्या नोट्स अशा प्रकारे पास ऑन होत असत. मी ही एक पेटी भरून पुस्तकं घेऊन आले होते! ती पाहून “अरे बाप रे दहावी!” अशी एक जाणीव नाही म्हटलं तरी झालीच! त्यामुळे ग्रंथालयाशेजारच्या अभ्यासिकेकडे आमचा मोर्चा (कधी नव्हे ते) वळू लागला.

आमच्या ह्या जास्तीच्या तासांना आम्हाला दहावीचा अभ्यास तर होताच पण त्याशिवाय अभ्यास कसा करायचा ह्याचे ही धडे मिळाले. शाळेमुळे आम्ही ज्ञानार्थी झालो होतोच पण गरज असेल तेव्हा उत्तम विद्यार्थी आणि परीक्षार्थी देखील झालो. प्रबोधिनीतर्फे दर वर्षी दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये स्वअध्ययन कौशल्य शिकवणारी शिबिरं होत असतात. ह्यातली बरीचशी कौशल्ये आम्ही नववीपर्यंत शिकलो होतो. पण त्यापुढे जाऊन उत्तम परीक्षार्थी कसे व्हावे हे दहावीमध्ये शिकलो.

पाचवी ते नववी माझ्या लेखी “पास झालो” ह्याहून अधिक मार्कांना काहीही महत्व नव्हते. पण आमच्या दहावीच्या सुरुवातीला आम्हाला पोंक्षे सरांनी एका कागदावर दहावीत किती टक्के हवे आहेत असं लिहायला सांगितलं होतं. मला आठवतंय आम्ही त्यावेळी मुलांच्या मजल्यावरच्या एका वर्गात बसलो होतो. त्या वर्गातल्या फळ्याच्यावर एक पट्टी होती त्यावर लिहिलं होतं – Not failure, but low aim is a crime! ते वाक्य पाहून मी माझे ड्रीम मार्क्स लिहिले होते! आता आमच्यापैकी प्रत्येकीकडे एक ध्येय होते. अशा प्रकारे दहावीचा बाऊ न करता आमची दहावी सुरु झाली.

सुट्टी संपली आणि नेहमीप्रमाणे शाळा सुरु झाली. शाळा सुरु झाल्यावर दहावीत आम्ही बाकी इतक्या गोष्टी केल्या की दहावी म्हणून विशेष ताण कधी घ्यायला वेळच नव्हता. आता शाळेत आम्ही सगळ्यात सिनियर ताया होतो! दहावीच्या वर्गावर अनेक जबाबदाऱ्या असायच्या. शाळा भरताना आज्ञा देणे, प्रार्थना, गीता-गीताई सांगणे, पथक प्रमुख म्हणून पथकशः उपक्रमांची जबाबदारी इत्यादी. दहावीत भाग्यश्री ताई आमच्या वर्ग शिक्षिका होत्या. म्हणजे आमच्या प्रबोधिनीच्या पहिल्या आणि शेवटच्या अशा दोन्ही महत्वाच्या वर्षी भाग्यश्री ताई आमच्या वर्गशिक्षिका होत्या! भाग्यश्री ताई खूप छान संस्कृत शिकवायच्या. त्यांच्याबद्दलची आमची आवडती तक्रार म्हणजे त्यांनी आम्हाला कधीही ऑफ तास दिला नाही!! आम्ही कितीही आरडाओरडा केला तरी आजीबात ऐकायच्या नाहीत त्या ह्या बाबतीत! पण आम्ही दहावीत त्यांच्या बरोबर आमचा शाळेतला सगळ्यात संस्मरणीय दिवस plan आणि execute केला! त्याची आठवण पुढे येईलच!

इयत्ता दहावी : भाग २

मी आधी लिहिल्याप्रमाणे प्रबोधिनीत आषाढी एकादशीला भजनांचा सुरेख कार्यक्रम असतो. त्याच्या काही आठवणी. एका वर्षी प्रत्येक वर्गाने एक एक अभंग सांगायचा होता. ह्या अभंगांच्या मध्ये धुन गायली जाते. उदा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. तर आम्हाला वाटलं की ह्या धुनीमध्ये सर्व संतांचा उल्लेख होत नाही. म्हणून मग आम्ही ह्याच चालीवर अजून एक कडवं रचलं आणि गायलं. त्यात जनाबाई, संत रामदास, संत चोखामेळा अशी सगळी नावं घातली होती! दरवर्षी पुण्यात पालखी मुक्कामाला असताना आम्ही निवडुंग्या विठोबाच्या मंदिरात वारकऱ्यांच्या सेवेसाठी जायचो. एका वर्षी पालखीच्या दर्शनाच्या रांगेला मदत करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून मी आणि काही जणी पालखीच्या अगदी जवळ उभ्या होतो. तेवढ्यात कोणीतरी मंत्री दर्शनासाठी आले. आम्ही तिथेच उभ्या असल्याने त्यांनी आमची चौकशी केली आणि आमचे कौतुक केले. एवढं करून ते थांबले नाहीत तर त्यांनी त्यांच्या गळ्यातला भलामोठा फुलांचा हार माझ्या गळ्यात घातला! तो हार माझ्या उंचीपेक्षा जास्ती लांब होता! नंतर चौकशी केली तेव्हा कळलं की ते महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री श्री. गोपीनाथ मुंडे होते!

दहावीच्या वारीच्या/आषाढी एकादशीच्या खूप छान आठवणी आहेत. आम्ही सगळ्याजणी आळंदीला प्रस्थान सोहळ्यासाठी गेलो होतो. आदल्या दिवशी संध्याकाळी संत ज्ञानेश्वरांची पालखी मंदिरातून निघते आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी वारीला सुरुवात होते. त्या दिवशी संध्याकाळी पालखी पुण्यात पोचते. आम्ही आदल्या दिवशी दुपारी आळंदीला पोचलो. तिथे एका धर्मशाळेत राहायची सोय झाली होती. आम्हाला कोणीतरी सांगितले होते की जेव्हा पालखी प्रस्थान ठेवते तेव्हा मंदिराचा कळस हलतो. अर्थात आमचा आंखो देखी वर विश्वास अधिक! त्यामुळे आमच्यापाशी एक मिशन होतं कळस हलतो का ह्याची शहानिशा करण्याचं! गावात वारकऱ्यांची भरपूर गर्दी होती. तिच्यातून वाट काढीत आम्ही मंदिराशी पोचलो. आकाश भरून आलं होतं. कधीही मुसळधार पावसाला सुरुवात होईल अशी चिन्ह होती. शिवाय इतक्या गर्दीत आम्हाला पालखीचं दर्शन होणं देखील अवघड होतं. तेवढ्यात कोणाच्या तरी ओळखीने आम्ही मंदिराजवळच्या बँकेच्या इमारतीच्या गच्चीवर जाण्याची परवानगी मिळवली (मला वाटतं कोणाची तरी आई त्या बँकेत काम करत होती). आम्ही बँकेत घुसलो आणि गच्चीवर गेलो, फक्त एक गोष्ट होती की त्या गच्चीला कठडेच नव्हते. पण वरून सगळं खूप छान दिसत होतं. आम्ही कळसावर लक्ष ठेवून होतोच. नेमकी पालखी निघणार तेवढ्यात धो धो पाऊस सुरु झाला. आम्ही तरीही भिजत कळसाकडे पाहत उभ्या होतो पण इतका पाऊस पडत होता की काही फुटांवरचं दिसत नव्हतं. त्यामुळे आम्हाला शेवटी गच्चीच्या जिन्यात जावं लागलं. कळस हलतो कि नाही हे पहायचं राहून गेलं!

त्या रात्री कुठे जेवलो ते आठवत नाही पण रात्री धर्मशाळेत परत आलो तेव्हा आमच्या पलीकडच्या खोलीत भरपूर वारकरी बायका वस्तीला होत्या. आम्हाला पाहून पहिल्यांदा त्यांना जरा आश्चर्य वाटले पण मग त्यांना काही अभंग म्हणून दाखवल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर एकदम कौतुकाचे भाव आले! रात्री बारा वाजेपर्यंत आजूबाजूला गोंधळ होता. त्यातून झोपलो तर पहाटे तीनपासून आंघोळीसाठी गडबड सुरु! सगळ्याजणी आवरून बरोबर सकाळी ७ वाजता आमच्या ठरलेल्या दिंडीपाशी हजर झालो. आज आम्ही आळंदी ते पुणे असे वारीबरोबर चालणार होतो. वारीत खूप मजा आली. दिंडीतल्या बायकांबरोबर फुगड्या खेळलो, नाचलो, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन चाललो. मस्त वाटत होतं. पण त्याआधी माझी जरा अडचण झाली. माझी एक चप्पल चालायला सुरुवात करतानाच तुटली! एका चपलेने कसं चालणार म्हणून मी काही अंतर अनवाणी चालले. पण दुपारी ऊन आल्यावर रस्ते तापायला लागले! तेव्हा मला रस्त्यावर पडलेल्या दोन पायांच्या दोन वेगवेगळ्या रंगाच्या स्लीपर्स मिळाल्या. त्या घालून मग मी उरलेलं अंतर चालले. अनवाणी चालणं, रस्त्यात पडलेल्या विजोड चपला घालून चालणं everything was fun! एक नक्की की वारीची एक धुंदी असते. तिच्यात तुम्हाला सगळ्या अडचणी क्षुल्लक वाटायला लागतात! मात्र शेवटच्या टप्प्यात आम्ही सगळ्याजणी दमलो होतो. मला आठवतंय संचेतीच्या चौकात पालखी आली आणि आम्ही कला निकेतनच्याच्या समोरच्या फुटपाथवर बसकण मारली! काही वेळ तिथे बसल्यावर पुन्हा उठून चालत प्रबोधिनीत परत आलो!

दुसऱ्या दिवशी सगळ्या शाळेत आलो पण आता पाय बोलत होते! अर्थात आदल्या दिवशी घरी जाऊन कोणीच अभ्यास करण्याचे कष्ट घेतले नव्हते! आम्हाला दहावीत गणित शिकवायला ढवळे सर होते. ते आजोबांसारखेच होते. कडक आणि प्रेमळ. त्या दिवशी त्यांच्या तासाला आम्ही कोणीच गृहपाठ करून आलो नव्हतो हे पाहून त्यांनी चौकशी केली. मग आम्ही मोठ्या उत्साहाने त्यांना आमच्या वारीचा वृत्तांत दिला! आळंदीहून पायी चालत विठोबाच्या दर्शनाला वगैरे वगैरे. त्यावर ढवळे सर आमच्या वर्गासमोर उभे राहिले, त्यांनी आपले दोन्ही हात कमरेवर ठेवले आणि म्हणाले – “Forget everything else! For now I am your Vithoba!” That is the moment etched in my memory – ढवळे सर कमरेवर हात ठेवून म्हणत आहेत I am your VITHOBA!

Pages