शाळेच्या आठवणी - ज्ञान प्रबोधिनी

Submitted by शब्दाली on 28 November, 2015 - 05:08

गणपतीत आठवणी लिहिताना शाळेच्या गणपती उत्सवाच्या आठवणी निघाल्या आणि वेगळा धागा काढुया असे बोलणे पण झाले. पण नेहमीप्रमाणे, बाकीच्या गडबडीत ते राहुनच जात होते.

काल माहेरी आवरा आवरी करताना ५ वीला प्रवेश मिळाल्याचे नलुताईंच्या स्वाक्षरीचे पत्र सापडले आणि पाठोपाठ काव्यदिंडीत इन्नाने लिहिलेली "Let My Country Awake" ही कविता वाचली आणि परत एकदा शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या. मग मात्र आज धागा काढायचाच असा निश्चय केला.

ज्ञान प्रबोधिनीबद्द्ल - शाळा / संस्था - ज्यांना काही अनुभव, आठवणी लिहायच्या आहेत, त्यांच्यासाठी हा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इयत्ता दहावी : भाग ३

आषाढी एकादशी झाली आणि मग एका रविवारी वर्षासहलीसाठी आम्ही ड्युक्स नोजला गेलो. नेहमीप्रमाणे खूप मजा धमाल केली! संध्याकाळी लोणावळा स्टेशनवर परतीची लोकल पकडण्यासाठी उभे होतो तेवढ्यात प्रिया म्हणाली, माहित्येय का आज काय आहे? आज friendship day आहे! आपला शाळेतला शेवटचा friendship day! म्हणून तिने सगळ्यांसाठी friendship bands आणले होते ते आम्ही सगळ्यांनी बांधले! हे आपलं शाळेचं शेवटचं वर्ष आहे ही भयंकर जाणीव आम्हाला सगळ्यांना त्या दिवशी झाली! दुसऱ्या दिवशी शाळेत आम्ही मोठ्या अभिमानाने ते friendship bands मिरवत होतो. पण मला वाटतं ही संकल्पना शाळेत फारशी स्वागतार्ह नव्हती. तुम्ही ते काढून टाका असं सांगितलं नव्हतं कोणी पण आम्हाला ते जाणवलंच की हे आवडलेलं नाहीये. त्या दिवशी केमिस्ट्रीच्या तासाला सविता ताईंनी विचारलं की हे हातात काय बांधलंय? मग friendship day, friendship band वगैरे गोष्टी ऐकल्यावर ताईंनी विचारलं मैत्री म्हणजे काय? आम्ही काय काय वेगवेगळी उत्तरं दिली! पण सविता ताईंनी सांगितलेली मैत्रीची व्याख्या अजूनही लक्षात आहे. तेव्हा आम्ही ionic bonds, covalent bonds शिकत होतो. ताई म्हणाल्या की मैत्री ही covalent bond सारखी असते ज्यात दोन्ही atoms आपले electrons अशाप्रकारे share करतात की कोणता electron कोणत्या अणूचा आहे हे कळत देखील नाही. अशी मैत्री हवी मग त्याला friendship band ची गरज नसते. आम्हाला हे म्हणणं बरंच पटलं आणि आम्ही ते friendship bands काढून टाकले. पण आजही असं वाटतं की आम्ही आणि शाळा दोघांचंही बरोबर होतं. शाळेला चुकीच्या प्रथांना प्रोत्साहन द्यायचं नव्हतं पण त्याचवेळी आम्हाला आमच्या शाळेच्या शेवटच्या वर्षी मैत्रीचं हे प्रतीक मिरवणं फार महत्वाचं वाटत होतं! अर्थात आज इतक्या वर्षांनी तो friendship band हरवला तरी आमची मैत्री कायम आहे and that is what really matters! (so I guess Shala was more right!)

दहावीच्या गणेशोत्सवाच्या खूप छान आठवणी आहेत. गणपतीच्या वेळी निघालेल्या धाग्यावर त्यापैकी काही गोष्टी लिहिल्या होत्या. वेळ वाचवण्यासाठी ती पोस्ट इथे पेस्ट करत्येय Happy
गणपतीचे दिवस मंतरलेले दिवस असायचे. शाळेचा गणपती म्हणजे घरचाच गणपती वाटायचा/वाटतो. दरवर्षी प्रबोधिनीत विविध प्रकारे गणेशोत्सव साजरा व्हायचा. पथकशः कार्यक्रम व्हायचे. पथक म्हणजे houses त्यामुळे पाचवी ते दहावीच्या त्या त्या पथकातील मुलींची चांगली मैत्री व्हायची. दररोज कोणत्यातरी मंडळासमोर किंवा बाहेरगावी ते कार्यक्रम व्हायचे. ते ७ दिवस अभ्यासाला सुट्टी असायची! निम्मेच तास व्हायचे, निम्म्या तासांना सराव आणि दररोज आरती! शिवाय संध्याकाळी मिरवणुकीसाठी दलावर बरची नृत्याचा सराव पण सुरु व्हायचा. साधारणतः १५ ऑगस्टला पहिली रंगीत तालीम, गणपतीच्या दिवशी दुसरी रंगीत तालीम आणि गौरी जेवणाच्या दिवशी तिसरी आणि शेवटची रंगीत तालीम असायची. आठवी ते दहावीचा बरच्यांचा गट असायचा. दहावीला आल्यावर बरच्यांच्या विविध formations ठरवणे आणि बसवणे अशा गोष्टींमध्ये रोज घरी जायला ९-९:३० वाजायचे (शाळा ५ ला सुटली तरी). एकूण ६ पथकं त्यांचे तीन तीनचे दोन गट. त्या दोन गटांमध्ये कोणता गट पुढे असणार अशी स्पर्धा असायची जे रंगीत तालीमीच्या गुणांवर ठरायचे. मग दुसऱ्या गटाने आपल्या formations चोरू नयेत म्हणून त्यांना कल्पनाशक्ती लढवून नावे आणि खुणा देणे वगैरे गोष्टी चालायच्या. आम्ही आमच्या formations ना red giant, white dwarf अशी ताऱ्यांच्या वेगवेगळ्या stages ची नावे दिली होती! त्यांच्या खुणाही मजेशीर होत्या (ह्या खुणा फार महत्वाच्या असायच्या कारण रस्त्यावर नाचताना त्या गोंधळात शिट्टीची विशिष्ट धून ऐकून, ती खुण पाहून पुढच्या आवर्तनाला सगळ्यांनी एकाच वेळी नवीन formation मध्ये जाणे हे coordination त्या खुणांमुळे शक्य व्हायचे). दहावीच्या सो कॉल्ड महत्वाच्या वर्षांतले अनेक तास आम्ही ह्या formations ठरवण्यात, पथनाट्य, पोवाडे इ. सांस्कृतिक कार्यक्रम बसवण्यात घालवत होतो आणि सुदैवाने कोणालाच त्याची काळजी वाटली नाही!

अकरावीत आल्यावर शाळेच्या मिरवणुकीत ढोल वाजवायचा हे नक्की होतं.ढोलाच्या सरावाचे दिवस मी कधीच विसरणार नाही! अशक्य मजा यायची सरावाला जी शब्दांत सांगता येणार नाही. सलग ३-४ तास कमरेला ढोल बांधून वाजवणे हा अविस्मरणीय अनुभव असतो! दिवसरात्र डोक्यात ढोलाचे ताल आणि त्याची आवर्तनं घुमत राहायची. ढोलाच्या पानांना शाई लावणे (बोण म्हणायचो त्याला बहुतेक) आणि नंतर ती पाने सुकल्यावर दोराने घट्ट (चांगला डबलटीपल ट) ढोल बांधणे हे एक आवश्यक कौशल्य होतं. दुसरं आवश्यक कौशल्य म्हणजे गाडीवरून किंवा मिळेल त्या वाहनाने (जास्तीत जास्त) ढोल इकडून तिकडे घेऊन जाणे! एका महिन्यात हात (मनगटाची मागची बाजू) दगडासारखे टणक व्हायचे. त्या वर्षी आम्ही खूप साऱ्या गणपतींसमोर बरचीचा एक गट आणि वाद्यवृंदाचा एक गट (ढोल, ताशा आणि ध्वजासकट) असे एका तासाची प्रात्यक्षिकं करायला जायचो. ही रात्री उशिरापर्यंत चालायची. त्यावर्षी आमच्या गटाने इतर मंडळाबरोबर कसबा पेठ आणि दगडूशेठ समोर प्रात्यक्षिक केलं होतं. धन्य धन्य वाटलं होतं ढोल वाजवताना त्या दोन गणपतींसमोर!

प्रत्यक्ष मिरवणूकीच्या दिवशी एक वेगळीच शक्ती अंगात संचारली आहे असं वाटायचं. मिरवणुकीत अंतर पडू लागलं की ढोलासकट रस्त्यावरून धावणे ह्या गोष्टीचा आधी सराव करायचो नाही पण ते जमून जायचं! दोन अडीच तासांनी मिरवणूक शेवटच्या स्थानी पोचल्यावर रिंगण व्हायचं. त्यावेळी गेले दोन तास आपण वाजवत होतो त्याच्या दुप्पट उत्साहाने ढोल वाजवला जायचा. आजही ढोलाचा आवाज ऐकला की भरून येतं. आयुष्यात पुन्हा एकदा तरी ढोल वाजवायचाच आहे मला!

इयत्ता दहावी : भाग ४

दहावी (NTS) आणि बहुतेक नववीत (MTS) सुद्धा आम्ही वास्तुतल्या स्पर्धा परीक्षा केंद्रात मार्गदर्शनासाठी जात होतो. प्रबोधिनीत विवेक कुलकर्णी सर आणि सविता ताई हे दोघे प्रामुख्याने MPSC आणि UPSC ह्या स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केंद्र चालवतात. ह्या केंद्रातून आजपर्यंत प्रशासकीय सेवेत महत्वाची जबाबदारी उचलणारे अनेक अधिकारी बाहेर पडले आहेत, पडत आहेत. आमचे वर्ग शनिवारी दुपारी आणि रविवारी सकाळी असायचे. दहावीच्या जोडीला हा वेगळ्या प्रकारचा फोकस असलेला अभ्यासक्रम शिकायला मजा येत होती. मला वाटतं स्पपकेमध्ये शिकलेल्या कौशल्यांचा दहावीत आणि त्यानंतरच्या सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी खूप उपयोग झाला!

आता दहावीच्या सगळ्यात खास दिवसाची आठवण. ही कल्पना नक्की कोणाच्या डोक्यात आली ते मला आता आठवत नाही. पण बहुतेक भाग्यश्री ताईंनी आम्हाला सुचवलं असावं. तर नवरात्र जवळ येत होतं. त्यावेळी संपूर्ण शाळेसाठी काय उपक्रम राबवता येईल असा प्रश्न होता. मला वाटतं आम्ही पाचवीत कि सहावीत असताना असा शारदोत्सव झाला होता. अर्थात त्यावेळी त्याचं संयोजन कोणी केलं होतं ते माहिती नाही पण भरपूर चर्चेअंती (पक्षी: गोंधळाअंती) ह्या वर्षी आपण दहावी मुलींच्या वर्गाने ती जबाबदारी घ्यावी असं ठरलं. सगळ्या गोष्टींसाठी गट करण्यात आले आणि प्रत्येक गटाला जबाबदारी देण्यात आली. मी नियोजनाच्या गटात होते. बेसिकली आमच्या वर्गाला एक अख्खा दिवस शाळा चालवायची होती. मात्र त्या दिवशी शाळेत नेहमीचे तास असणार नव्हते तर विविध स्पर्धा आणि उपक्रम असणार होते. शिक्षकांसकट सर्व ११ वर्गांना बिझी ठेवण्याची जबाबदारी आम्हा ३६ जणींची होती. मला वाटतं शारदोत्सवाच्या नियोजनासाठी भाग्यश्री ताईंनी दिलेला तास हा बहुदा पहिला ऑफ तास Happy ह्या साऱ्या नियोजनाचे, तयारीचे hilarious किस्से आहेत. आम्ही त्यावर अजून पोट धरून हसत असतो. कमाल ही आहे की मला ह्या संस्मरणीय दिवसाची तारीखच आठवत नाहीये! पण ऑक्टोबरमधला एक दिवस होता. त्या दिवशी शाळेच्या तासांच्या घंटा कधी द्यायच्या ते घंटा स्वतः देण्यापर्यंत (ह्या गोष्टीला ताराबाई फारशा तयार नव्हत्या! एवढ्याश्या पोरी तुम्ही! तुम्हाला दोरी तरी नीट ओढता येणारे का? अशी त्यांची (बऱ्यापैकी रास्त) शंका होती! त्यामुळे घंटा देताना त्या बाजूला उभ्या राहिल्या होत्या.) सगळ्या गोष्टी आम्ही करणार होतो. तो अख्खा दिवस सगळ्या वर्गांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला. आम्ही उपक्रम स्टेशनरी आणि मुलं फिरती असा format ठेवला होता. म्हणजे दर तासाला प्रत्येक वर्गाने वेगळ्या खोलीत जायचे आणि तिथल्या उपक्रमात सहभागी व्हायचे. मुलांच्या कल्पना शक्तीला आणि बुद्धीला चालना देणारे सगळे उपक्रम होते. काही स्पर्धा व्यक्तीशः तर काही गटाने. सगळ्यात शेवटच्या तासाला आम्ही अख्ख्या शाळेचा खजिना शोध ठेवला होता! त्यासाठी खूप खपून clues तयार केले होते! शिक्षकांच्या देखील स्पर्धा घेतल्या होत्या! धमाल आली होती! सगळं वेळेवर होतंय ना, कुठे काही अडचणी येत नाहीयेत ना, पळापळ, गडबड गोंधळ आणि खाजिनाशोधच्या वेळी तर नुसता कल्ला! एक नंबर मजा आली होती! आमच्या वर्गाने खूप मोठी जबाबदारी घेतली होती आणि दिवस पार पडल्यावर काहीतरी करून दाखवल्याची जाणीव. बेस्ट दिवस होता तो! आमच्या ह्या शारदोत्सवात भाग्यश्री ताईंनी आम्हाला खूप मदत केली! त्यांच्याबरोबर काम करताना मजा आली होती.

ह्या निमित्ताने प्रबोधिनीच्या बैठकांविषयी सांगता येईल. प्रबोधिनीत बहुतेक वेळेस कोणत्याही उपक्रमाच्या आधी नियोजनाच्या बैठका होतात आणि उपक्रम झाल्यावर एक शोध बोध बैठक होते आणि त्या बैठकीनंतर श्रम परिहार! ह्या पद्धतीमुळे सगळ्या उपक्रमांना एक शिस्त असते. जिचा पुढे आमच्यापैकी प्रत्येकाला आपल्या व्यावसायिक आयुष्यात उपयोग झाला आहे. ह्याच्या मागेपुढे कधीतरी शाळेचा भोंडला झाला होता. अर्थात तो दर वर्षी होत असे पण ह्या वर्षी दहावी मुली म्हणून नियोजनाची जबाबदारी आमच्यावर होती. शिवाय सगळ्यात सिनियर म्हणून आम्ही सगळ्या साडी नेसून आलो होतो (पण शाळा सुटल्यावर भोंडल्याच्या तयारीसाठी चौथा मजला ते गच्ची अशा असंख्य फेऱ्या मारताना कशाला साडी नेसलो असं काही काळ वाटलं होतं!). भोंडल्याला प्रत्येक वर्गाची एक खिरापत असायची. अर्थात ती ओळखायला अवघड असावी अशी अपेक्षा असते. एका वर्षी आमच्या वर्गाने दही बटाटा शेव पुरी खिरापत म्हणून ठरवली! And it was a BAD idea! दुपारपासून आमच्या वर्गातून चाट पदार्थांचा इतका सुवास दरवळायला लागला होता की आमच्या वर्गाची खिरापत स्वतःच ओळखा पाहू असं ओरडून सांगत होती! What were we thinking! पण त्या वर्षीची सगळ्यात पॉप्युलर खिरापत आमचीच होती Happy

इयत्ता दहावी : भाग ५

एकीकडे दहावीचा अभ्यास सुरु होता. पण दिवाळीची सुट्टी संपली आणि मग आमची खरी दहावी सुरु झाली. आता बाकीच्या उपक्रमातून लक्ष कमी करून ते अभ्यासाकडे अधिक असणं अपेक्षित होतं. मला वाटतं आमच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारीत काही परीक्षा झाल्या होत्या. त्यातल्या एक का दोन open book आणि दोन take home परीक्षा होत्या. Open book was open book आणि take home च्या वेळी आदल्या दिवशी संध्याकाळी आम्हाला प्रश्नपत्रिका मिळत असे. त्याचा अभ्यास करून दुसऱ्या दिवशी तोच पेपर लिहायचा. मला आठवतंय एका परीक्षेला पोंक्षे सर पर्यवेक्षक म्हणून होते. सर पेपर घेऊन वर्गात आले आणि म्हणाले की मला काही काम करण्यासाठी पुन्हा प्राचार्य कक्षात जावं लागेल. तर मी तुम्हाला प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका देतो, काही पुरवण्या सह्या करून ठेवतो. तुम्ही पेपर लिहा आणि वेळ संपली की उत्तरपत्रिका गोळा करून मला खाली आणून द्या. आम्ही तसं केलं. कोणाच्याही देखरेखीशिवाय सगळ्यांनी पेपर लिहिला. त्या दिवशी असं वाटलं की हीच बेस्ट पद्धत आहे परीक्षा देण्याची! स्वतःच स्वतःचा पर्यवेक्षक असलं पाहिजे. मला वाटतं की बरेचदा नियम किंवा कायद्यापेक्षा देखील विश्वास हा अधिक binding असतो कारण नियम किंवा कायदा तोडणं ह्यापेक्षा एखाद्याचा विश्वास तोडणं अधिक कठीण असतं. अर्थात मार्कांना फारसं महत्व नसल्याने परीक्षेत कॉपी करण्याची शाळेत आणि नंतरही कधी गरज वाटलीच नाही!

प्रबोधिनीतल्या प्रत्येक वर्षी शिबीर/निवासी सहल ह्यापैकी काहीतरी झालंच पाहिजे मग दहावी कशी अपवाद असणार! आमचं अतिशय संस्मरणीय असं निवासी शिबीर डिसेंबरमध्ये झालं – आमचं अभ्यास शिबीर! सकाळचे दोन तास घरी जाऊन आवरून दुपारचा डबा घेऊन शाळेत परत यायचं, आणि रात्रीचा डबा पालक शाळेत आणून देणार. उरलेला वेळ शाळेत राहून अभ्यास करायचा. आम्ही रात्री युवती विभागात झोपत होतो. सकाळी लवकर उठून उपासना, एक अभ्यास सत्र, मग घरी जायचं, दिवसभरात अभ्यास सत्र, संध्याकाळी दलावर दोन तास भरपूर खेळ, नंतर एक तास व्याख्यान, मग रात्रीचं जेवण आणि पुन्हा एक रात्रीचं अभ्यास सत्र! कधी तरी रात्री सरांबरोबर गच्चीवर जाऊन आकाश-निरीक्षण करायचं! दिवसभर मनात अभ्यासाचे विचार असायचे. शिवाय एकमेकींच्या सोबतीने छान अभ्यास व्हायचा.

आमच्या अभ्यास शिबिराच्या वेळी दर रोज संध्याकाळी खूप सुंदर व्याख्याने झाली. त्यातली तीन मला नीट आठवत आहेत. एक होतं वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक, गड-किल्ले यांचे अभ्यासक डॉ. प्र.के.घाणेकर यांचं! त्यांनी आम्हालाच विचारलं की मी कोणत्या विषयावर बोलू? तेव्हा आम्ही गड किल्ल्यांच्या विषयी असं उत्तर दिलं होतं. व्याख्यान खूप रंगलं पण मला प्रश्नोत्तराच्या वेळी त्यांनी दिलेलं उत्तर खूप लक्षात राहिलं आहे. त्यांना विचारलं होतं की तुम्ही आजपर्यंत इतके गड किल्ले सर केले आहेत. तुम्हाला सर्वात अवघड वाटणारा गड कोणता? त्यावर सर म्हणाले, उंबरठा गड! तुमच्या घराच्या दाराचा जो उंबरठा असतो ना तो ओलांडून एकदा तुम्ही बाहेर पडलात की मग काहीच अवघड नसतं! How very true! दुसरं आठवणारं व्याख्यान म्हणजे पहिले मराठी एव्हरेस्टवीर श्री सुरेंद्र चव्हाण यांचं. ते नुकतेच एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करून आले होते. त्यांचे अनुभवकथन ऐकणे खूप प्रेरणादायी होते. तिसरे व्याख्यान झाले होते भटक्या विमुक्त जातीच्या लोकांसाठी काम करणारे श्री. गिरीश प्रभुणे यांचं. त्यांच्या व्याख्यानाच्या वेळी ओळख आणि समारोपाची जबाबदारी माझ्यावर होती. मी माझ्या ओळखीमध्ये प्रभुणे सर हे भटक्या विमुक्त लोकांच्या पुनर्वसनाचे काम करतात अशा अर्थाचे वाक्य बोलले होते. सरांनी त्यांच्या व्याख्यानात त्या वाक्याचा उल्लेख करून ह्या लोकांनी कधी एका जागी वस्ती केलीच नसल्याने त्यांचे पुनर्वसन नसून हे प्रथमवसन करण्याचे काम चालू आहे असं म्हटलं. हे लक्षात ठेवून मी समारोपाच्या वेळी प्रथमवसनाचा उल्लेख केला त्याबद्दल त्यांनी माझे कौतुक केले होते हे लक्षात आहे. आमच्या अभ्यास शिबिरात आमच्या जोडीला आमच्या यु.वि. तल्या ताया पण असायच्या. त्या पण त्यांचा अभ्यास करायच्या किंवा पुस्तक वाचायच्या.

अभ्यास शिबीर म्हटलं की मला पहाटे पहाटे कॉरिडोरमध्ये फेऱ्या मारत केलेले संस्कृतचे पाठांतर आठवते. अभ्यासिकेत टेबलावर डोकं ठेवून काढलेल्या डुलक्या आठवतात! दुपारी फिजिक्स लॅबच्या मागच्या बाजूला बसून पुस्तक वाचण्यात हरवलेल्या आम्ही सगळ्या आठवतो. माझी फेवरेट जागा होती ती वाचण्यासाठी! फार भारी दिवस होते ते. आम्ही शाळेत होतो आणि अभ्यास करत होतो पण तरीही शाळेशी आमचा काही संबंध नव्हता. आमचं स्वतःचं एक वेळापत्रक होतं. शाळेच्या घंटा आमच्यासाठी नव्हत्याच! अभ्यास आजीबात बोअर वाटत नव्हता कारण त्याजोडीने दल आणि व्याख्यानं देखील होती. आणि मुख्य म्हणजे आम्ही एकट्या अभ्यास करत नव्हतो. अभ्यास शिबीर संपलं आणि दुसऱ्या दिवसापासून आमच्या प्रिलीम परीक्षा सुरु झाल्या.

इयत्ता दहावी : भाग ६

सीबीएसई बोर्डाची परीक्षा फेब्रुवारीत सुरु होते. त्यामुळे प्रिलीम नंतर जवळपास लगेच आमची अभ्यासासाठी सुट्टी सुरु झाली. पण त्या आधी एक गोष्ट बाकी होती. गेली ५ वर्ष आम्ही दर वर्षी पाहत होतो दहावीच्या मुलींना निरोप समारंभाच्या दिवशी रडताना! हा समारंभ नववीच्या मुली दहावीच्या मुलींसाठी आयोजित करत असत. आमच्या वर्गाने ठरवलं होतं की त्या दिवशी रडायचं नाही. एकतर आम्हाला माहिती होतं की आम्ही शाळेत पुन्हा पुन्हा येत राहणार आहोत. ह्या वास्तूशी नातं कायम जोडलेलं असणार आहे. मग का रडायचं? हे सगळं आम्ही पाळलं. निरोप समारंभाच्या दिवशी आम्ही कोणीच रडलो नाही. पण हे बहुदा शक्य झालं कारण आम्ही त्या आधी एकदा जोरदार रडलो होतो. एका ऑफ तासाला वर्गात नेहमीप्रमाणे गडबड गोंधळ सुरु होता. असं होतं ना बरेचदा की अशा गोंधळात एक क्षण असा येतो की अचानक सगळे एकाच वेळी शांत होतात आणि मग एक विचित्र सन्नाटा पसरतो. तर अशावेळी आमच्या वर्गाची ठरलेली ट्रिक होती. टाळ्या वाजवायच्या! तर त्या तासाला अशीच शांतता पसरली आणि मग एकदम कोणाच्या तरी लक्षात आलं की आता काही दिवसांनी आपण ऑफ तासाला अशा एकत्र बसून मजा करणार नाही! नंतर कधीच नाही. आणि मग chain reaction सुरु झाल्यासारखं आम्हा सगळ्यांना रडू आलं!

पीएल सुरु झाली. मी काही दिवस घरी तर काही दिवस अभ्यासिकेत जात असे. आम्ही बऱ्याचदा दिवस ठरवून शाळेत यायचो. त्यामुळे अभ्यासाबरोबर टीपी, गप्पा पण व्हायच्या. काही नाही तर कोपऱ्यावरच्या चंदूच्या दुकानात जाऊन चहा तर नक्की असायचा. ते आमचं अजूनही आवडीचं ठिकाण आहे. दुसऱ्या आमच्या खाण्याच्या जागा म्हणजे कोपऱ्यावरची कच्छी दाबेलीची गाडी आणि आमच्या दहावीच्या वर्षीच सुरु झालेला फेमस जीवाला खा सामोसा!

सीबीएसईची परीक्षा कमी किचकट असते. १०० मार्कांचे पाच पेपर आणि दोन पेपर्सच्यामध्ये ५ ते ७ दिवसांची सुट्टी. त्यामुळे जवळपास महिनाभर परीक्षा चालू असते! आता एवढी रेंगाळणारी परीक्षा असल्याने मला दहावीची परीक्षा म्हणून वेगळं काही लक्षातच नाहीये! त्या महिन्याभरात मी एका लग्नाला गेले, माझ्या ताईचं डोहाळेजेवण झालं! आणि त्यातच पेपरही झाले! केंद्रीय बोर्डाच्या शाळेत आमचं केंद्र होतं. मला आठवतंय आमच्या पहिल्या पेपरला आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी यु.वि.च्या काही ताया आल्या होत्या. मला वाटतं पोंक्षे सर पण आले होते.
एका महिन्याने परीक्षा संपली आणि आम्ही मज्जा करायला मोकळ्या झालो. परीक्षा संपल्यावर पहिल्यांदा काय करायचं ते आमचं खूप आधी ठरलं होतं! आम्हाला कहो ना प्यार है पाहायचा होता! मला वाटतं जानेवारीत तो रिलीज झाला आणि आता मार्चच्या शेवटी आम्ही तो पाहणार होतो! शोधलं तर (आमच्या सुदैवाने) फक्त लक्ष्मीनारायणमध्ये त्याचे शोज होते! आम्ही तिकीट काढायला गेलो तेव्हा आम्हाला सलग तिकीटं हवीत असं सांगितल्यावर त्या खिडकीवरच्या माणसाने आम्हाला पूर्ण थेटर खाली आहे कुठे पण बसा असं सांगितलं होतं Lol
आमची परीक्षा संपल्यावर पुढचे तीन दिवस आमच्या प्रज्ञा मानस तर्फे aptitude tests घेतल्या होत्या. खरं सांगायचं तर माझी त्या क्षणी कोणत्याही परीक्षा/चाचण्या देण्याची इच्छा नव्हती. ह्या परीक्षेच्या चक्रातून कधी एकदा बाहेर पडतोय असं झालं होतं मला. फार फार निरीच्छेने मी त्या चाचण्या दिल्या होत्या!

त्यानंतर लगेच रंगपंचमी होती. आमच्या वर्गाचा अत्यंत आवडता सण! आम्ही जवळपास दरवर्षी एकदा तरी पाणी पिण्याच्या नळावर पाणी-पंचमी साजरी करायचोच! म्हणजे कोणीतरी पाणी उडवायला सुरुवात करायचं की मग सगळ्या भिजून चिंब ओल्या! एका वर्षी वर्गातल्या एकीच्या घरी जाऊन दिवसभर रंग खेळलो होतो! आता तर आम्हाला नाही कोणीच म्हणणार नव्हतं! That is the best rangpanchami ever! नंतर तीन दिवस तोंडावरचा रंग गेला नव्हता माझ्या!

आम्ही परीक्षा संपल्याच्या आणि सुट्टीच्या आनंदात इतक्या मश्गुल होतो की त्यावेळी शाळा संपली अशी जाणीवच झाली नाही! यथावकाश दहावीचा निकाल लागला. आमच्यापैकी बहुतेक सगळ्या जणींना उत्तम मार्क पडले होते. मी ही खुश होते. दहावीच्या पहिल्या दिवशी माझे जे ड्रीम मार्क्स मी लिहिले होते त्यापेक्षा २ मार्क जास्तीच पडले होते मला! रूढार्थाने शाळा संपली! पण आता असं वाटतं की शाळा संपली आणि मग आम्ही खऱ्या प्रबोधिनीच्या मुली झालो. इथे मी थांबणार आहे. मी खूप प्रकारे ह्या पोस्टचा शेवट लिहून बघितला आणि डिलीट केला. कारण आत्ता लक्षात येतंय की दहावी संपली, शाळा संपली तरी प्रबोधिनीपण संपलेलेच नाही आणि ते कधी संपणारही नाहीए!

किती सुरेख लिहलयसं गं, लक्की यू! फाॅर्मिंग इयर्समधे ईतके छान संस्कार, अनुभव आणि आयुष्य समृद्ध करणारी शाळा तुम्हाला लाभली.

दहावी संपली, शाळा संपली तरी प्रबोधिनीपण संपलेलेच नाही आणि ते कधी संपणारही नाहीए!

जियो जिज्ञासा !

कातील लिहिलंयस ! ह्याचा एक वेगळा लेख का करेनास प्रतिसादांमधे राहण्यापेक्षा स्वतंत्र धाग्याचं मटेरियल आहे हे !

जिज्ञासा, खूप छान लिहिले आहेस. मी हे सगळे पुन्हापुन्हा वाचणार आहे Happy

आमची परीक्षा संपल्यावर पुढचे तीन दिवस आमच्या प्रज्ञा मानस तर्फे aptitude tests घेतल्या होत्या. >>> ह्या बद्दल थोडे आणखी लिहिता येईल का? किंवा कोणाकडे माहिती मिळेल हे सांगशिल का?

सध्या शाळेची परीस्थिती कशी आहे? म्हणजे शिक्षणचा दर्जा अजूनही तसाच आहे का? एथे कुणाची मुल आहेत का तिथे सध्या?

जिज्ञासा - फारच ओघवते लिहित आहेस आणि एकदा सुरुवात केली वाचायला की थांबताच येत नाहीये... Happy
ग्रेट, ग्रेट - असेच अजूनही अनुभव येऊदेत .....

जिज्ञासा छान लिहिलयस.
उपनयन संस्काराबद्दल लिहायच आहे.
प्रबोधिनी मुळे हे अस आहे असे ठसे आयुष्यभर सापडत रहातात. त्यातच एक उपनयन संस्कार म्हणून आधी जी व्याख्यानं झाली ती. ( तेव्हा वरवर समजलेली अन आता मुळापासून उमजणारी ) त्याबद्दल लिहिन. ( केव्हा ते मात्र विचारू नका Wink )
गेल्या रविवारी माझ्या बॅच च्या काही मैत्रीणी जमलो होतो , दिवसभरासाठी. गप्पा चर्चा वादविवाद सगळ झाल. अत्यंत विविध कार्यक्षेत्र आहेत प्रत्येकीची. इथे करियर्स हा शब्द तोकडा वाटतो. कारण प्रत्येकीनी ठसा उमटवलाय आपापल्या कामात. स्वतःचा. and that was the idea! Prabodhini was able to carve individuals! Happy

सगळ्यांचे खरंच मनापासून आभार! दहावीच्या इतक्या आठवणी होत्या की लिहिता लिहिता मला वाटायला लागलं की ह्या इतक्या मोठ्या पोस्ट्स वाचताना बोअर तर होणार नाही ना! I am glad to be in the wrong!

वेगळा लेख आत्ता तरी करावासा वाटत नाहीये. हा धागा छान आहे! आणि अजून बरंच लिहायचं आहे! शाळा संपल्यानंतर देखील आमच्या वर्गाने एकत्र खूप धमाल केली आहे!

मी नताशा, माझ्या माहितीप्रमाणे ही चाचणी सर्वांसाठी उपलब्ध आहे. तुम्ही जर प्रबोधिनीच्या स्वागत कक्षात "प्रज्ञा मानस संशोधिकेतर्फे घेतल्या जाणाऱ्या aptitude test (कल शोधन चाचणी) विषयी" चौकशी केलीत तर अधिक माहिती नक्की मिळेल.

दिपाकुल, I know a couple of girls from 2012 batch. They are as happy and attached to school as I am Happy So the school still passes the benchmark for me! But Prabodhini in general is a very demanding school (of course, in a good/different way). प्रबोधिनीतली मुलं 'नॉर्मल' कधीच नसतात! जर तुमच्या पाल्याच्या शैक्षणिक यशाला तुमच्या लेखी अधिक महत्व असेल तर प्रबोधिनी ही आजिबात योग्य शाळा नाही! प्रबोधिनीत खूप प्रयोगशील वातावरण आहे. तुमचा तुमच्या पाल्यावर आणि शाळेवर संपूर्ण विश्वास हवा आणि त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य देण्याची तयारी देखील! प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांचे पालक होणं सोपं काम नक्कीच नाहीये!

फार सुंदर व्हिडिओ आहे हा एका प्रबोधन गीताचा! जरूर पहा!
नव्या युगाचे पाईक आम्ही तारे नवक्षितिजावरचे
निज रुधिराची आण वाहुनी रूप पालटू देशाचे!

https://www.youtube.com/watch?v=ZQD0u8JO6jQ

जिज्ञासा, अप्रतिम लिहीलंयस! खूप मस्त आठवणी! प्रबोधिनीविषयी काहीच माहिती नव्हती - फारच सुंदर माहिती आणि शाळा!

रायगड, धन्यवाद Happy

वेळ मिळाला नाही म्हणून राहून जायला नको म्हणून मी इथे फक्त आम्ही/ आमच्या वर्गाने दहावीनंतर प्रबोधिनीच्या मुली म्हणून काय काय उपक्रम केले याची नोंद करून ठेवणार आहे. पुढे मग कधीतरी सविस्तर लिहायला आवडेल मला!

युवती विभागात काम : अकरावीत आमच्यापैकी बऱ्याच जणी आणि नंतर अगदी आत्ता आत्तापर्यंत काही जणी प्रबोधिनीत दल घ्यायला नियमित किंवा दरवर्षी गणपतीच्या वेळी वाद्यवृंदात होत्या.

शिबिरं/अभ्यास दौरे : आमच्या वर्गाचं हे रेकॉर्ड असणार बहुतेक! आमच्या वर्गाने बारावीच्या सुट्टीत दहावीच्या मुलींच्या तुकडीबरोबर (आमच्याहून दोन वर्ष लहान) एका महिन्याचा अरुणाचल प्रदेशचा अभ्यास दौरा केला. ह्या दौऱ्यावर मी काही वैयक्तिक अडचणींमुळे जाऊ शकले नाही ह्या गोष्टीची मला आयुष्यभर खंत राहणार आहे. त्यानंतर २००४ साली डिसेंबर मध्ये आम्ही पोंक्षे सरांबरोबर गुजराथच्या अभ्यास दौऱ्यावर गेलो होतो. आणि नंतर २००८ साली आमच्या विद्याव्रत संस्काराला दहा वर्ष पूर्ण झाली ह्या निमित्ताने आमचे सज्जनगडावर एक निवासी शिबीर आयोजित केले होते. अर्थात हे ही पोंक्षे सरांच्या मार्गदर्शनाखाली! ह्या शिवाय मी आणि माझ्या दोघी वर्ग मैत्रिणी अशा तिघींनी २००७-२००८ ह्या वर्षात इयत्ता सहावीच्या मुलामुलींचे मराठी कवितांचे तास घेतले होते. आम्ही शाळेत असताना शिकलेल्या कविता पुन्हा शाळेत जाऊन शिकवताना झालेला आनंद अवर्णनीय आहे. आमच्या वर्गातल्या एकीने तर एक वर्ष पूर्णवेळ शाळेत अध्यापन केले. ह्याशिवाय इतर अनेक निमित्तांनी (आणि निमित्ताशिवायही) अनेकदा आम्ही प्रबोधिनीत जात राहिलो, जातो आणि जात राहणार आहोत!

प्रबोधिनी सारखी शाळा हे आप्पांचं स्वप्न होतं. मी आप्पांना कधी प्रत्यक्ष पाहिलं नाही. पण आज शाळेचा विचार केला की त्यांच्या विचारांचा आदर वाटतो. प्रबोधिनी खूप वेगळी शाळा आहे पण जर मला प्रबोधिनीतली एक गोष्ट निवडायला सांगितली जी इतर शाळांमध्ये असायला हवी असं मला वाटतं तर मी ही एक गोष्ट निवडेन – शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना शाळेच्या दैनंदिन उपक्रमात सहभागी करून घेणं. शाळेतल्या मुलांना त्यांचे हक्काचे ताई दादा असणं ही एक फार सुंदर गोष्ट आहे. शाळेतले विद्यार्थी आणि शिक्षक किंवा पालक यांच्यात वयाचे जे अंतर असते त्यामुळे मुलांसाठी ते कायम एका मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहतात. शाळेतल्या मुलांना असे ताई दादा भेटले जे त्यांच्यापेक्षा थोडेसेच मोठे आहेत आणि जे त्यांच्याच शाळेत शिकले आहेत तर त्याचा खूप फायदा (= आनंद) होतो शाळेला, मुलांना आणि ताई दादांनाही! ह्यात वेळेची फारशी गुंतवणूक करावी लागत नाही. आठवड्यातून एकदा/दोनदा एक तास वेळ काढणं कॉलेजमध्ये असताना सहज शक्य असतं. किंवा एखाद्या रविवारी मुलांना सहलीला नेणं, सिनेमाला नेणं ह्या गोष्टी जराश्या नियोजनाने सहज शक्य असतात. शाळेच्या सर्वच माजी विद्यार्थ्यांनी परत यायची गरज नसते. ते शक्यही नसतं. १०० च्या वर्गातली ५ ते १० मुलं जरी येऊ शकली तरी खूप फरक पडतो. फक्त एक आहे की माजी विद्यार्थी आणि शाळेतली मुलं ह्यांची direct interaction हवी. त्यात शिक्षकांची काही प्रत्यक्ष भूमिका नसावी. शाळेची केवळ facilitator ची भूमिका असावी. पहिली ते दहावी अशी आपल्या आयुष्यातली अत्यंत महत्वाची, जडणघडणीची वर्षे आपण ज्या शाळेत घालवतो तिच्याशी आपल्या पुढील आयुष्यात जर काही ऋणानुबंध राहिला तर तो फार मोठा आनंदाचा ठेवा असतो. मला असं फार वाटतं की प्रत्येक शाळेने ह्यासाठी काहीतरी प्रयत्न करावेत!

जिज्ञासा -
<<<<< प्रबोधिनी खूप वेगळी शाळा आहे पण जर मला प्रबोधिनीतली एक गोष्ट निवडायला सांगितली जी इतर शाळांमध्ये असायला हवी असं मला वाटतं तर मी ही एक गोष्ट निवडेन – शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना शाळेच्या दैनंदिन उपक्रमात सहभागी करून घेणं. >>> हा सगळाच परिच्छेद अतिशय सुर्रेख ....

तुझे सारे लिखाण अगदी मनातून आले आहे हे अगदी जाणवतंय .... खूप छान ... Happy

काय सुंदर लिहीलयंस ग जिद्न्यासा! परत परत वाचावसं वाटतंय ....
इन्ना मैडमकडून लवकरच सविस्तर वाचायला मिळेल अशी आशा .....

प्रिय प्रबोधिनिकर मित्रहो,
नमस्कार.
ज्ञान प्रबोधिनी आणि श्री अप्पासाहेब पेंडसे यांच्याबद्दल आपण लिहिलेल्या आठवणी वाचून मन भरून आले आणि जुन्या आठवणी जागृत झाल्या. मी दहावीमध्ये असताना माझा आतेभाऊ डॉ अशोक निरफराके व प्रबोधिनीच्या पहिल्या तुकडीच विध्यार्थी हा १९६४ साली ssc मध्ये महाराष्ट्रामध्ये सव्वालाख मुलांत पहिला आला. मी माझ्या शाळेत पहिला येत असे. मी अशोकला सांगून अप्पांना भेटलो. अप्पांनी माझी गुणवत्ता चाचणी घेवून मला प्रबोधिनीच्या दुसर्या तुकडीत प्रवेश दिला. माझ्या घरी अभ्यासाला जागा नसल्यामुळे मला आप्पांनी आपल्या राहत्या घरी मुक्कामी ठेवून घेतले. सकाळी साडेपाचला उठून सहा वाजता उपासना व 'कि घेतले व्रत' अशी प्रार्थना करून दिवस सुरु होत असेतो रात्री १२ वाजतास संपत असे. स्वत अप्पा मराठी शिकवीत असत. श्री यशवंतराव लेले, अण्णासाहेब ताम्हणकर, वामनराव अभ्यंकर, भास्करराव, श्री राम मराठे, प्रभाकर धारणे सर, किशाभाऊ पटवर्धन असे अनेक मातब्बर शिक्षक लाभले. मला हिंदीमध्ये कमी गुण मिळालेले पाहून श्री अप्पांनी श्री संगोराम सरांकडे मला एकट्याला खास शिकवणी लावली होती. अप्पांच्या बरोबर बारा बटणांचl झब्बा घालून पालखीपुढे अभंग व गणपतीपुढे लेझीमही खेळलो. SSC च्या परीक्षेमध्ये पंचावान्नव्वा व फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये तिसरा क्रमांक मिळाल्यानंतर अप्पा माझ्या आई वडिलांना भेटण्यासाठी त्यांच्या स्कूटरेटवर बसून खडकमाळ आळीतील माझ्या घरी आल्याचे मला आजही आठवते. केवळ ती. अप्पान्च्यामुळेच मला राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळून वैद्यकीय शिक्षण पुरे करता आले. तीर्थस्वरूप अप्पा, माझ्या जीवनाचे शिल्पकार, आपणाला शतशः प्रणाम , आज व नेहमीच !

डॉक्टर तुम्ही प्रबोधिनीबद्द्ल अजून सविस्तर लिहिलेले वाचायला आवडेल >> +११
आणि अप्पासाहेब पेंडसेंच्या घरी रहायला होता म्हणजे आठवणींचा खजिनाच असणार तुमच्याकडे, वेळ मिळेल तेव्हा अजून नक्की लिहा

हा एकदम भाग्यवान लोकांचा धागा आहे Happy

डॉक्टरसाहेब, जसे जमेल तसे आणखी सांगा.

काल पुण्यात झालेल्या 'तोत्तोचानची पंचविशी' कार्यक्रमात चेतना गोसावी प्रबोधिनीबद्दल खुप भरभरून बोलल्या. कोणत्याही मुद्द्यावरून फिरून प्रबोधिनीवर येऊन स्थिरावत होत्या, तेव्हा तुम्हा सगळ्यांची आठवण झाली. त्यांनी खुप छान काही काही सांगितलं, पालकांना मस्तपैकी शुगरकोटेड कानपिचक्याही दिल्या. त्या म्हणाल्या, मी खुप व्रात्य, वांड, किंवा तत्सम जी काही विशेषणं वापरता येतील ती सगळी मला लागू होती. तरीही मला आणि सगळ्यांनाच तू खुप चांगली मुलगी/मुलगा आहेस, तू हे करू शकशील असं अगदी कोबायाशींसारखंच नेहमी सांगितलं गेलं. त्यांना डॉ. अशोक निरफराके शिकवत होते. तोत्तोचानच्या अनुवादाचा प्रवास, स्वतःच्या मुलाबद्दल, आत्ता चालवत असलेल्या शाळेबद्दल आणि इतर अनेक अनुषंगिक गोष्टींवर त्या बोलल्या. सगळ्या प्रश्नांना, पालकांच्या आणि मुलांच्याही शंकांना पटणारी, प्रॅक्टिकल उत्तरं दिली.

इन्नाशी बोलल्यावर, ह्या धाग्यावरचं सगळ्यांचं लेखन वाचून, कालचं चेतना गोसावींचं बोलणं ऐकल्यावर पुन्हा पुन्हा जाणवतं की प्रबोधिनीत मुलांचा वांडपणा इंटॅक्ट ठेवून त्याचवेळी तो किती उत्तमपणे चॅनेलाईज केला जातो Happy आणि प्रबोधिनीइतकंच तुमच्या पालकांनाही ह्या सगळ्याचं श्रेय आहे _/\_

डॉक्टर तुम्ही प्रबोधिनीबद्द्ल अजून सविस्तर लिहिलेले वाचायला आवडेल >> +११
आणि अप्पासाहेब पेंडसेंच्या घरी रहायला होता म्हणजे आठवणींचा खजिनाच असणार तुमच्याकडे, वेळ मिळेल तेव्हा अजून नक्की लिहा >>>>>>+१११११११११

डॉ.साहेब कृपया जरुर जरुर लिहावे ही नम्र विनंती .... Happy

Pages