रव्याच्या पारीचे मोदक -उकडून आणि तळून (फोटो सहित)

Submitted by देवीका on 15 September, 2015 - 02:43
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

रव्याची पारी वापरून छान मोदक होतात. ह्याचे तळणीचे व उकडीच दोन्ही होतात.
इथे मी उकडीचे व तळणीचे कसे करावे हे लिहिणार आहे.

उकडीची पारी:
चिरोटी रवा(बारीक रवा) १ कप,
एक कप पाणी,
१ टेबलस्पून दूध,
१ चमचा तूप,
चवीला मीठ,
लागलीच तर तांदूळाची पीठी १ चमचा,

तळणीची पारी
१ कप चिरोटी रवा(बारीक रवा),
पाव कप कोमट दूध,
१ चमचा साजूक तूप,
साखर चिमटीभर,
चवीला मीठ,
लागलच तर पाणी

सारणः नेहमीसारखा खोबरं आणि गूळाचा चव करून घ्यायचा. त्याच्यात सुका मेवा हवाच असेल तर टाका.

क्रमवार पाककृती: 

उकडीचे:
१. पारीसाठी दिलेले पाणी , साखर आणि दूध एकत्रित करून पातेल्यात उकळायला ठेवावे.
२. खळाखळा उकळू लागले की आधी तूप टाकावे मग मीठ टाकावे.
३. आता रवा टाकून एक दोन मिनिटं दणदणीत वाफ काढून झाकण ठेवून गॅस बंद करून पातेलं उतरावं.
४. ४-५ मिनिटाने, हाताला पाणी आणि जरासं तूप लावून मळून घ्यावे. इथे तांदूळाची उकडीपेक्षा ज्यास्त मळावे लागेल. रवा कुठल्या कॉलीटीचा आहे व किती पाणी शोषून घेतो त्यानुसार समजा लागलीच तर एक चमचा तांदूळ पीठी घालावी किंवा गरम पाणी हबकून मारून पुन्हा मळावे. शक्यतो तांदूळ पीठी वापरू नका.
५. उकड कोरडी नसावी. मउ, पांढरीशुभ्र आणि एकजीव असावी.
६. नेहमी प्रमाणे मोदक करावे.
७. अतिशय चवीष्ट, हलके असे मोदक होतात.

तळणीचे:
पारीच्या दिलेल्या प्रमाणाने रव्यात कोमट दूध, चिमटीभर साखर व तूपाचे मोहन घालून झाकून ठेवावे. नंतर अर्धा एक तासाने थोडेसे पाणी , ते हि लागलेच तर (रवा कितपत भिजला आहे ह्या अंदाजाने) घालून खूप मळून घ्यावे, एकजीव झाले की झाकून ठेवावे ओला कपडा घालून. अर्ध्या तासाने कूटून परत ओल्या कपडाने झाकून ठेवावे. १० एक मिनिटाने पुर्‍यासारखी लाती लाटून मोदक करावे व झाकून ठेवावे. नंतर अगदी मंदाग्नीवर तळावे. तोंडात विरघळणारे मोदकाची पारी असते. मस्तच लागते.

नोटः मला पाणी घालावेच लागले नाही. एक कप बारीक रवा, पाव कप दूधात भिजतो. आणि तसेही पीठ घट्ट भिजवून मग कुटायचे आहे. मी सर्व पीठ फूड प्रोसेसर मध्येच घालते व गरगरा फिरवते. मस्त नरम होते.

रव्याची उकड
ravapari1.jpg
उकडलेले रव्याच्या पारीचे मोदक,

ravaparimodak_0.jpg

वाढणी/प्रमाण: 
बाप्पाल आवडतात तर तुम्हाला सुद्धा आवडतीलच तर मोजनेका नही.
अधिक टिपा: 

तांदूळाची पीठी लागेल तरच घाला.

रवा जुना, कुबटलेला महिनोंमहिने फ्रीजमध्ये ठेवलेला नको.:)

ज्वारीची पीठीची उकड काढूनही करू शकता.

रवा निवडून घ्यावा. काळे दगड वगैरे काढून घ्यावे. नसेलच चिरोटी रवा तर जाडा रवा वाटून घ्या. आम्ही करून नाही पहिले असे. Happy

तळणीच्या पारीचे पीठ फक्त ज्यास्तीत ज्यास्त १५- २० मिनिटेच ठेवा एकदा कुटल्यावर. नाहितर खूपच नरम होइल पारी. खूप सारे एकत्र टाकून तळू नये. मंदाग्नीवर ठेवून तळावे तरच पारी शिजते आणि पांढरे शुभ्र होतात.

माहितीचा स्रोत: 
आजी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सर्वांना.

निरा, फूड प्रोसेसर मधून केले तरी चालतील. पण खूप वेळ फिरवू नका. आणि लगेच १० मिनिटात करा.

नाहितर पारी नरम होइल. रवा फक्त भिजला पाहिजे आणि एकजीव पाहिजे.

देविका... तळणीच्या पारीसाठी भिजवतांना एक कप रव्याला एक कप पाणी आणि पाव कप दूध का? फार पातळ नाही होणार का ?

जयवी- जयश्री,
सॉरी उशीर झाला, लिहिण्याच्या नादात मिक्स झालेल्या दोन्ही क्रुती. पाणी टाकायचेच नाही आहे. ते उकडीच्या पारीसाठी होते.
आता तळणीची पारीसाठी योग्य टिप्स दिल्या आहेत.

मी सुद्धा केलेत तळणीचे, त्याचे फोटो टाकते.