एपिक चॅनेल

Submitted by स्वप्ना_राज on 22 January, 2015 - 09:50

"एकांत" ह्या एपिक चॅनेल वर दर गुरुवारी रात्री १०:३० वाजता (रिपिट टेलिकास्ट - शुक्रवार रात्रौ ८:३०) लागणार्‍या कार्यक्रमामध्ये भारतातल्या एके काळच्या गजबजलेल्या पण आता ओसाड झालेल्या जागांबद्दल माहिती देतात. हा कार्यक्रम बहुतेक नोव्हेंबर २०१४ पासून सुरु झाला असावा कारण हे चॅनेलच मुळी तेव्हा सुरु झालं. माझे सुरुवातीचे काही भाग चुकले असावेत. राजस्थानमधलं भानगढ, त्रिपुरातलं उनाकोटी आणि गुजरातमधलं लखपत ह्यावरील भाग मी पाहिले. आणि त्यावरची माहिती 'संथ चालती ह्या मालिका' इथे पोस्ट केली. ती कायमस्वरुपी साठवून ठेवावी अशी सूचना झाली म्हणून हा धागा काढला.

हे चॅनेल इथे उपलब्ध आहे - https://docs.google.com/spreadsheets/d/19tI8WWcHdygXnFWpwtOwRrco61eS-1GhemitlPpLVWo/pubhtml?gid=0&single=true

कार्यक्रमांचं वेळापत्रक - http://www.epicchannel.com/schedule

ह्या बीबीवर पुढील एपिसोडस ची माहिती आहे:

एकांतः
१. लखपत, २. उनाकोटी ३. कित्तूर किल्ला ४. न्यारमा ५. अंदमान सेल्युलर जेल ६. विलासगढ ७. हळेबिडू
८. शेखावतीमधलं रामगढ ९. काश्मीरमधलं मार्तंड मंदिर १०. शिवसागर - अहोम साम्राज्याची राजधानी ११..गुजरातचं चंपानेर १२. श्रीनगरच्या हरीपर्बत वरचा किल्ला १३. लडाखचा 'चिकटन' किल्ला
१४. अंदमान निकोबारचं रॉस आयर्लंड १५. जंजिरा किल्ला १६. लखनौ रेसिडेन्सी १७. विष्णुपुर १८. विजयदुर्ग
१९. बटेश्वर २०. हंपी २१. कुलधरा २२. कुंभालगढ २३. असिरगड २४. बिजापूर २५. कांगडा फोर्ट (हिमाचल प्रदेश)
२६. जागेश्वर २७. रामनगर २८. लेह पेलेस २९. किल्ला मुबारक ३०. मेहरोली आर्किओलॉजिकल पार्क
३१. तलक्कड, मालंगी आणि वोडीयार राजे

देवलोक - सीझन १:
१. रंग २. जीवजंतू ३. स्वर्ग नरक ४. शक्ती ५. गणपतीबाप्पा ६. देवदेवतांची शस्त्रं ७. देवतांची वाहनं ८. गंगा ९.तीर्थ १०.युग ११. देवांचं अन्न १२. सृष्टीची रचना १३. दिशा १४. देवी-देवतांचे विवाह १५. देवी-देवतांचे रूप बदलणं
१६. विष्णूचे अवतार, १७. ग्रह-नक्षत्र १८. पुराण, वेद ह्यातील वनस्पती १९. पूजा आणि विधी

देवलोक चा सीझन २ सुरु होणार आहे. त्याचा वेगळा धागा काढून इथे लिंक देईन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जसंच्या तसं लिहिलं आहे.किल्ला खरंच ओसाड पडलेला दिसतो आहे.पुढच्या आठवड्यातल्या दौलताबादची आतुरतेने वाट पाहाणे आले.

यावेळची ती डिटेक्टिवची (रविंद्रनाथ) कहाणी पाहिली. ती त्याला मदत करणारी पोलीस शिपाई बाई फार आवडली मला.

अगदी शेवटचा तुरुंगातून एक कैदी बाहेर पडतो त्याचा संदर्भ नाही कळला. मी काही मिस केलं का?

ललिता, तो कैदी म्हणजे काबुलीवाला. एक कथा संपताना त्यातूनच पुढची कथा सुरू होते.

रविन्द्रनाथ टागोर की कहानियॉ नक्की कधी असतात.
अतिथी बघत होते पण १ च भाग दिसला. का ती कथा १ च भागाची होती.
बर्याचदा रिपीट असते पण नक्की कळत नाही कथा कोणती चालू आहे ते

मी जावेद अख्तर ह्यांचा कार्यक्रम थोडा वेळ पाहिला.

>> मीपण. गब्बर वाला. खुप म्हणजे खुपच बोर झाले.

ओह!
सोमवारची कथा मी बुधवारी रिपीटला पाहिली. काबुलीवाला मंगळवारी रात्री दाखवली असणार. ती रिपीट कधी पहायला मिळते?

एकांत - बिजापूर (६ ऑगस्ट, २०१५)

हैदराबादपासून ४०० किमी वर असलेलं बिजापूर. ह्याला दख्खनचे फ्लोरेंस म्हणत. ह्याच्या इतिहासाची सुरूवात ११-१२ व्या शतकातली. तेव्हा ह्याचं नाव 'विजयापुरम'. पुढे १३४७ मध्ये बहामनी हुकुमत आली आणि 'विजयापुरम' चं झालं 'बिजापूर'. कारण फारसी मध्ये 'व' चा 'ब' होतो.

इथला पहिला आदिलशहा म्हणजे युसुफ आदिलशहा (१४८९-१५१४) मूळचा इराणच्या ऑटोमन साम्राज्याशी संबंधित. त्या साम्राज्यात एक विचित्र पध्दत होती. मोठ्या मुलाला गादीवर बसवण्याच्या आधी धाकट्याला मारायचं (कदाचित पुढे बंड होऊ नये म्हणून असेल). पण आईची माया अशी की तिने मुलाला वाचवायला त्याला इराणमधून थेट भारतात पाठवलं ते 'बिजापूर' मध्ये. इथे तो बहामनी साम्राज्यातल्या एका सरदाराच्या निगराणीत वाढला आणि पुढे पहिला आदिलशहा झाला.

हा वारला तेव्हा त्याचा मुलगा इस्माईल आदिलशाह लहान होता. त्याचा फायदा घेऊन त्याच्या प्रधानमंत्र्याने बंड करून सत्ता काबीज करायचा प्रयत्न केला. पण युसुफ आदिलशहाची बायको पंजी खातून (जी मूळची मराठी होती) ती पक्की खंबीर होती. तिने तो प्रयत्न हाणून पाडला. पुढे ह्या प्रधानमंत्र्याच्या मुलानेही उठाव केला तेव्हा पंजी खातूनने पुरुषी वेश परिधान करून लढाई केली आणि त्याला हरवलं. अश्या तऱ्हेने इस्माईल आदिलशाह गादीवर आला.

ह्याचा मुलगा मल्लू आदिलशाह मात्र कमजोर आणि प्रजेवर जुलूम करणारा निघाला. शेवटी त्याच्या कुटुंबातील लोकांनीच बंड करून त्याला सत्तेवरून खाली खेचला. त्याचा भाऊ इब्राहीम आदिलशाह आणि त्याचा मुलगा अली आदिलशाह हे चौथे आणि पाचवे आदिलशाह झाले. अली आदिलशाहने गगन महाल बांधला. ह्याला ३ कमानी होत्या. पैकी मधली सर्वात मोठी होती. आता ह्याचे नुसते अवशेष शिल्लक आहेत.

१५६५ मध्ये हंपीचे साम्राज्य संपवण्यात बिजापूरचा मोठा सहभाग होता. ह्यात बिजापूरचा बराच फायदा झाला कारण त्यांच्या राज्याच्या सीमा विस्तारल्या. १५८० मध्ये अली आदिलशाह वारला. त्याला वारस नव्हता. त्यामुळे गादीसाठी बंड झालं. इब्राहीम आदिलशाह (हा अली आदिलशाह चा नक्की कोण होता ते मला कळलं नाही) ची आई चांद बीबी (ही अहमदनगरची राजकन्या होती) हिने ते बंड मोडलं आणि त्याला सुलतान केलं. ह्याच्या राजवटीचा काल बिजापूरसाठी सुवर्णयुग मानतात. तो उदारमतवादी होता. किताब-ई-नौरस ह्या त्याच्या पुस्तकातली गीतं हिंदू वाद्यांवर बेतली आहेत. ह्याच्या काळात बिजापूर आणि मोघल सत्ता ह्यांचे चांगले संबंध प्रस्थापित झाले. अकबरचा मुलगा दानियाल ह्याला इब्राहीम आदिलशाहने आपली मुलगी दिली होती. ह्याच्या राजवटीत अनेक कारागीर बिजापूरमध्ये स्थायिक झाले. बिजापूरला लोक 'दख्खनका आग्रा' म्हणू लागले. ह्या आग्र्यातला ताजमहाल म्हणजे इब्राहीम आदिलशाह ने बांधलेला 'इब्राहीम रौझा'. रौझा' म्हणजे मकबरा. ह्याच्या एका बाजूला मशीद आहे.

इब्राहीम आदिलशाह नंतर ७ वा आदिलशाह झाला त्याचा मुलगा मुहम्मद आदिलशाह. ह्याला मुघलांनी 'शहा' हा किताब दिला होता. सुप्रसिद्ध गोलगुंबज ही इमारत ह्यानेच बांधली. हा जगातला सगळ्यात मोठा घुमत आहे. ह्याच्या बांधकामात जी तंत्रं वापरली गेली ती भारतात अन्यत्र कुठेही आढळून येत नाहीत. हा घुमत ८ कमानींवर तोलला आहे. ही इमारत त्याने आपला मकबरा म्हणून बांधली होती. घुमटाच्या मधोमध त्याची कबर आहे.

बिजापूरपासून काही अंतरावर एक जागा आहे 'साठ कबर' नावाची. त्याबद्दल एक विचित्र कथा आहे. ८ वा आदिलशाह अली आदिलशाह ह्याचा सरदार अफझलखान. ह्याला मोहिमेवर जाताना ज्योतिषांचा सल्ला घ्यायची सवय होती. असाच सल्ला त्याने शिवाजीमहाराजांना प्रतापगडावर भेटायला जायच्या आधी घेतला. तेव्हा ज्योतिषांनी त्यालां 'तू ह्या मोहिमेवरून परत येणार नाहीस' असं सांगितलं म्हणे. तेव्हा त्याने आपल्या बायका आणि इतर जनान्याला ह्या भागात बोलावलं असं म्हणतात. इथे असलेल्या विहिरीला तेव्हा पाणी होतं. त्याने आपल्या सगळ्या जनान्याला विहिरीत ढकलून मारलं म्हणे. त्यातल्या दोघींना आधीच सुगावा लागला आणि त्यांनी पळायचा प्रयत्न केला. एक पळून जाण्यात यशस्वी झाली पण दुसरी पकडली गेली. एकूण ६३ बायका होत्या म्हणतात. तरी ६३ - २ = ६१. एकीचा हिशोब निदान मला तरी लागला नाही. असो.

औरंगजेबाने बिजापूर जिंकायला अनेक वेळा सैन्य पाठवलं पण ते अपयशी ठरलं तेव्हा १६२५ मध्ये तो स्वत: आला. त्यावेळी ८ वा आदिलशाह अली आदिलशाह वारला होता आणि गादीवर असलेला सिकंदर आदिलशाह (हा ४ वर्षांचा असताना गादीवर आला होता) अजून वयाने लहान होता. लहान असला तरी त्याने मोघलाना झुंज दिली. पण शेवटी तो पराभूत झाला. पायात चांदीच्या साखळ्या घालून त्याला औरंगजेबासमोर आणण्यात आलं तेव्हा त्याने ३ वेळा सलाम केला आणि मग त्याला कैदेत टाकण्यात आलं.

ह्या साम्राज्याची कहाणी सांगत अली आदिलशाहचा अपूर्ण रौझा - ज्याला स्थानिक लोक बारा कमान किंवा अलीका रौझा म्हणून ओळखतात - आजही उभा आहे.

मागच्या आठवड्यातला एपिसोड बघता आला नाही Sad पुढचा एपिसोड इंदूरपासून ८० किमी वर असलेल्या बुरहानपूर वर आहे.

इथला गगनमहाल आणि बारा कमान आम्ही पाहिले नव्हते.
खालील गोष्टी दाखवल्या नाहीत म्हणून रुखरुख लागली.
गोलघुमटातला प्रतिध्वनी {ऐकवणे },
मुल्क ए मेदान तोफ,
उपली बुरुज,
इब्राहिम रौजातली दगडी जाळी.

कांगडा फोर्ट, हिमाचल प्रदेश (एकान्त, १९ ऑगस्ट)

सिमल्यापासून सुमारे २३० किमी दूर असलेला हा किल्ला कदाचित भारतातला सर्वात पुरातन किल्ला असावा. असं म्हणतात की हा महाभारत काळात बनवला गेला होता. मांझी आणि बाणगंगा नद्याच्या संगमासमोर असलेल्या एका पहाडावर उभा आहे. ह्या किल्ल्याच्या आत आणि आजूबाजूला एक नगर होतं. म्हणून ह्याला नगरकोट ही म्हणत. कोट ह्या शब्दाचा अर्थ किल्ला. किल्ल्याच्या आत रहानार्यां लोकांना 'कोटइच' असं म्हणत. ह्याचाच अपभ्रंश पुढे कटोच असा झाला आणि इथल्या राजवंशाचं हेच नाव झालं. सुशर्मन चंद (हा कौरवांच्या बाजूने कुरुक्षेत्रावर लढला असं म्हणतात) नावाच्या राजाच्या मुलाने ह्या किल्ल्याची बांधणी केली. 'सिकंदरने पोरस से की थी लढाई' मधला पोरस हा ह्याच कटोच घराण्यातला असा एक मतप्रवाह आहे. 'पोरस' हा सिकंदरने त्याला युध्दानंतर दिलेला किताब आहे म्हणे. अर्थात ह्याला काही ऐतिहासिक पुरावा नाही.

आज हा किल्ला ४ किमी च्या परिसरात आहे. आर्यभट्टने गणित मांडून असं सिद्ध केलं होतं म्हणे की कुरुक्षेत्रावरचं युध्द सुमारे ३००० वर्षांपूर्वी झालं. कदाचित हा किल्लाही ह्यापेक्षा अधिक जुना असावा. किती वेळा ह्याची डागडुजी, दुरूस्ती झाली असेल. ह्या किल्ल्याच्या वरच्या भागात सात मजली उंच राजमहाल होता. आज फक्त काही भिंती शिल्लक आहेत.

एका पौराणिक कथेनुसार शिवाने जालंधर नावाच्या राक्षसाला ह्या ठिकाणी जमिनीत गाडलं. हा किल्ला त्याच्या कानावर बांधला म्हणून त्यांचं नाव 'कांगडा' पडलं. त्याची भौगोलिक स्थिती पाहिली तर दोन बाजूला नद्या आणि तिसर्या बाजूला जी जमीन आहे त्याचा तुकडा कानासारखा दिसतो. हा एव्हडा महत्त्वाचा किल्ला होता की असं मानत की ह्या किल्ल्यावर ज्याची सत्ता तोच पश्चिमी हिमालयाच्या राज्यांवर हुकुमत गाजवेल.

११ व्या शतकात इथे आक्रमण झालं ते गझनीच्या महमूदचं. ह्या वेळी प्रथमच असं घडलं की एक परदेशी सेना किल्ल्याच्या दरवाज्यापर्यंत येऊन ठेपली होती. त्या वेळी कटोच राजे कुलूच्या जवळ लढाईत गुंतले होते. तेव्हा महमूदची सेना युद्ध न होता आत घुसली आणि उंट-हत्तींच्या पाठीवर मावत नव्हती एव्हढी लूट घेऊन गेली. किल्ल्याचा सर्वात जुना भाग म्हणजे दर्शनीद्वार. कदाचित इथूनच सेना आत गेली असेल. ह्यानंतर आक्रमण झालं ते फिरोजशाह तुघलक च्या सेनेचं. तेव्हा दिल्ली आणि कांगडा ह्यांच्या दरम्यान छोट्या लढाया होत असत. त्या थांबवायला कांगडाच आपल्या ताब्यात घ्यावा असं तुघलकने ठरवलं. आणि त्याने हल्ला केला. बरेच दिवस तो किल्ल्याला वेढा देऊन होता. पण आत शिरकाव करू शकला नाही. असं म्हणतात की एके दिवशी तो पहाडावर चढून कुठून हल्ला करावा ह्याचे बेत करत होता आणि तेव्हाचा कटोच राजा किल्ल्यावरून आपली टेहळणी करत होता. दोघाम्नी एकमेकांना पाहिलं. दोघांनी हाताचा इशारा केला आणि लढाई थांबली. तुघलकला किल्ला आतून पाहायची इच्छा होती. तो त्याने पाहिला आणि आक्रमण मागे घेतलं.

अकबरालाही हा किल्ला ५२ वेळा चढाई करूनही सर करता आला नाही. पण जहांगीर मात्र तो जिंकण्याची जिद्द बाळगून मोठ्या सेनेनिशी चाल करून आला. अनेक दिवसाच्या वेढ्यानंतर किल्ल्यात अन्न आणि दारुगोळा ह्यांची चणचण भासू लागली तेव्हा राजपूत सैनिकांनी किल्ल्याचे दरवाजे उघडले आणि एक मोठी लढाई झाली ज्यात खूप प्राणहानी झाली. जेव्हा किल्ला पडणार हे तिथल्या जनान्याच्या लक्षात आलं तेव्हा किल्ल्यात असलेल्या एका तलावात पायाला दगड बांधून घेऊन त्यांनी उड्या टाकल्या आणि जोहार केला. किल्ल्याच्या मागे असलेली एक सुनसान दाट जंगलाने वेढलेली पायवाट ह्या तलावाकडे जाते. जहांगीरने आपल्या विजयाची खुण म्हणून एक दरवाजा बनवून घेतला - जहांगिरी दरवाजा. त्याने एक मशीदही बांधली. त्याचा अर्धामुर्धा भाग अजून शिल्लक आहे. मुघलांची ताकद पुढे कमजोर झाली आणि कटोच वंशाच्या एका राजाने हा किल्ला परत घेतला. त्याची महत्त्वाकांक्षा इतकी वाढली की त्याने आजूबाजूची राज्य जिंकायचा सपाटा लावला. ह्याचा परिणाम असा झाला की त्या राज्यांनी एकजूट करून कांगडावर हल्ला केला आणि चार वर्षं वेढा दिला. किल्ल्यावर अन्न आणि दारुगोळा ह्यांची चणचण झाली तेव्हा राजाला वेश बदलून पळून जाणं भाग पडलं. त्याने राजा रणजित सिंहाकडे मदत मागितली. दोघांत तह झाला. आणि किल्ला रणजित सिंहाकडे गेला.

पुढे इंग्रज आले. ह्या काळातली एक प्रेमकहाणी आहे. राजा अनिरुद्ध म्हणून एक राजा आपल्या कुटुंबासह खांडवाला जाऊन राहायचा बेत करत होता. राजपरिवार नदी पार करत असताना काही लुटारूनी हल्ला केला. ह्या गडबडीत राजाची एक मुलगी पाण्यात पडली आणि लुटारूच्या हाती लागली. लॉरेन्स नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याने तिला वाचवलं. दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. राजकुमारी पुन्हा आपल्या परिवारात जाऊ शकत नव्हती. लॉरेन्सशी लग्न करून ती इंग्लंडला निघून गेली.

१८५७ च्या काळात राजा प्रतापसिंग कटोचने इथल्या लोकांना बरोबर घेऊन इंग्रजांविरुद्ध बंड केलं. तेव्हा इंग्रजांनी आपलं हेडक्वार्टर धर्मशाला इथून हलवून कांगडा किल्ल्यात आणलं. त्यामुळे निदान १८५७ पर्यंत तरी हा किल्ला सुस्थितीत होता असं म्हणायला हरकत नाही. पण ४ एप्रिल १९०५ मध्ये इथे एक भयंकर भूकंप झाला. जवळपास १ लाख इमारती पडल्या. २०००० लोक मृत्युमुखी पडले. ७.८ रिश्टर स्केलच्या ह्या भूकंपाने ह्या किल्ल्याची खूप हानी केली. भिंती आणि दरवाज्यांची थोडीफार डागडुजी केली गेली. पण किल्ला पुन्हा उभा राहू शकलाच नाही. ओसाड झाला.

अप्रातीम वाहिनी आहे. टी.व्ही.वर काही बघण्यालायक आहे तर ते बहूतेककरुन ह्याच वाहिनीवर आहे. Happy मी गेले काही महिने विविध कार्यक्रम बघतोय पण इथे त्यावर धागा सुरु आहे हे ठावूक नव्हते.

यावेळच्या एकांत मधला कांगडा किल्ला मस्त दाखवलाय.

सर्व कार्यक्रम एकापेक्षा एक सरस असे आहेतच पण ५-५ मिनिटांचे फिलर म्हणुन बनवलेले एपिक ग्राम्स पण अप्रतीम आहेत.

स्वप्ना_राज यांचे खास आभार. माहिती खूप चांगल्या पद्धतीने लिहून काढली आहे.

सेनापती...:-)

>>५-५ मिनिटांचे फिलर म्हणुन बनवलेले एपिक ग्राम्स पण अप्रतीम आहेत.

+१......लोकांचं मनोरंजन व्हावं आणि त्यांना काही माहितीही मिळावी असा विचार ह्या चॅनेलमागे दिसतो

रच्याकने लोक्स, ह्यावेळचा एकांतचा एपिसोड पहाताना नोटस काढायचा कंटाळा आला म्हणून साऊन्ड रेकॉर्ड करून घेतला पण दोन ब्रेक्सपूर्वीचं रेकॉर्डींग टीव्हीपासून काही अंतरावर केल्याने स्पष्ट ऐकायला येत नव्हतं म्हणून काही राजांची नावं मिस झाली. दुसर्या ब्रेकनंतर शहाणपण येऊन फोन टीव्हीखालीच ठेवला. Happy

उदयसिंह आणि पन्नादाईचा उल्लेख एकांतच्या एका एपिसोड मध्ये आला होता. त्याबाबत लोकसत्ता मधील 'संस्थानांची बखर' ह्या सुनीत पोतनीस ह्यांच्या सदरातील माहिती:

चितोड येथील अखेरचा आणि उदयपूर येथील सिसोदियाचा पहिला महाराणा उदयसिंह द्वितीय हा महाराणा संग्रामसिंह उर्फ राणासंगाचा मुलगा चितोड इथे जन्मला. वडिलांच्या मृत्यूनंतर चितोडच्या गादीवर आलेला त्याचा भाऊ रतनसिंह एका खुनी हल्ल्यात मारला गेला. दुसरा भाऊ विक्रमादित्य ह्याला त्याचा चुलता रणबीर याने ठार केलं. त्याने उदयसिंह ला मारायचा कट केला त्यातून पन्नादाईने त्याला वाचवलं आणि कुंभालगडाला हलवलं. ती स्वत: बुंदी इथे रहायला लागली. उदयसिंहबाबत मारेकऱ्याना कळू नये म्हणून ती परत कधीही उदयसिंहला भेटली नाही. पुढे १५४० मध्ये उदयसिंहच्या चुलत्याचा मृत्यू झाल्यावर त्याला गादीवर बसवण्यात आलं.

१५६७ मध्ये अकबराने चितोडवर हल्ला केला आणि वेढा घातला तेव्हा आपल्या कुटुंबासह निसटून उदयसिंह पिछोली ह्या आपल्या गावी आला. तेथे नवं राज्य स्थापून त्याने त्याचं नाव उदयपूर केलं. ती राजधानी करून १५६८ ते १५७२ राज्य केलं. त्याला २२ बायका आणि एकूण २५ मुलं होती.

Pages