अ‍ॅपल रबडी

Submitted by दिनेश. on 22 June, 2015 - 05:12
Apple rubadee
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१) गोड जातीची सफरचंदे, लहान असतील तर दोन आणि मोठे असेल तर १
२) लिंबाचा रस ४/५ थेंब किंवा चिमूटभर सायट्रीक अ‍ॅसिड
३) आवडत असेल तर चिमूटभर दालचिनी पावडर ( किंवा आवडता स्वाद )
४) १ टिस्पून बारीक केलेले अगर अगर
५) एक कपभरून मिल्क पावडर
६) १ टिस्पून साखर ( अधिक आपल्या आवडीप्रमाणे, स्वीटनरही वापरता येईल.)
७) १ टिस्पून साजूक तूप

क्रमवार पाककृती: 

अ‍ॅपल रबडी च्या नेटवरच्या ज्या रेसिपीज आहेत त्यात सफरचंद तसेच, म्हणजे न शिजवता वापरले आहे. मला हि रबडी गरम खायची होती ( आमच्याकडे थंडी पडलीय म्हणून ) म्हणून मी ते थोडे शिजवून घेतले. हाताशी होतेच म्हणून अगर अगर वापरले. तसेच ताजे दूध आटवता मिल्क पावडर वापरली. त्यामूळे हा प्रकार झटपट झाला.
१) एका पातेल्यात पाव कप पाणी घेऊन त्यात लिंबाचा रस ( किंवा सायट्रीक अ‍ॅसिड ) अगर अगर ( वापरत असाल तर ) आणि दालचिनी पूड ( किंवा जो स्वाद वापरत असाल तो ) एकत्र करा.

२) सफरचंद शक्य असल्यास कोअर करा ( म्हणजे मधलाच गोलाकार भाग कापून वेगळा करा. त्यासाठी एक खास उपकरण मिळते. वरच्या फोटोत पहा. ) मग ते वरील पाण्यातच किसा. सफरचंदे करकरीत किंवा पिठूळ अश्या दोन प्रकारात मिळतात. कुठलेही वापरता येईल.

३) आता हे मिश्रण शिजत ठेवा. सतत ढवळत रहा. करकरीत सफरचंदे असतील तर मिश्रण शिजायला वेळ लागेल. पिठूळ असतील तर लगेच शिजतील. शिजवून जॅम करायचा नाही. सगळे मिश्रण छान एकजीव झाले आणि पाणी आटले कि आच बंद करा. सफरचंदाच्या गोडीवर अवलंबून साखर वापरायची आहे कि नाही ते ठरवा.
साखर वापरत असाल तर या मिश्रणातच घालून शिजवा. ( स्वीटनर अगदी शेवटी मिसळा. खुपशी स्वीटनर्स गरम करून चालत नाहीत. )

३) एका जाड बुडाच्या पातेल्यात किंवा कढईत १ टिस्पून साखर टाका आणि मंद आचेवर ठेवा. थोड्याच वेळात साखर वितळेल आणि ती सोनेरी रंगावर जाईल. आणखी थोड्याच वेळात काही भागात तपकिरी होऊ लागेल.
तसे होऊ लाहले कि त्यात अर्धा कप पाणी टाका. ( हे पाणी शक्यतो लांब हाताचा डाव वापरून टाका कारण कढईचे तपमान जास्त असल्याने पाण्याची एकदम वाफ होऊन त्याचा चटका बसू शकेल. म्हणून जरी अर्धा कप पाणी टाकायचे असले तरी ते कपाने न टाकता डावेने टाका. )

४) त्यात साजूक तूप टाका. पाण्याला छान उकळी आली कि त्यात मिल्क पावडर टाका आणि डावेने भराभर ढवळा. पाणी गरम असल्याने मिल्क पावडर चटकन मिसळने आणि मिश्रणाला आटीव दूधाचा रंग आणि स्वादही येतो.

५) आच बंद करून त्यात सफरचंदाचे मिश्रण टाका आणि गरज वाटली तर हँड मिक्सरने ब्लेंड करा.

आणि चमच्या चमच्याने आस्वाद घ्या.

वाढणी/प्रमाण: 
२ जणांना पुरेल
अधिक टिपा: 

१) सफरचंद शिजवायचे नसेल तर मिल्क पावडरचे मिश्रण थोडे थंड झाल्यावर किस मिसळा. अगर अगर वापरत असाल तर मात्र शिजवावेच लागेल.

२) या पद्धतीने केलेली रबडी थंड होताना घट्ट होत जाते.

३) आवडते इतर फळ ( सिताफळ, चिकू, आंबा, लिची ) वापरू शकाल.

४) या तंत्राने नुसती रबडीही छान होते. मिल्क पावडर मात्र चांगल्या प्रतीची हवी. मी निडो वापरलीय.

माहितीचा स्रोत: 
स्वतःची कल्पना ! ( काय राव, कधीतरी मलाबी क्रेडीट मिळूंद्या कि !!! )
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव.. मस्त!!!! सफरचंद आणी दालचिनी चं कॉम्बी. खूपच छान लागतं.. रबडी पेक्षा पाय आवडेल मला Happy

वॉव.................................. खावेशी वाटली एकदम.. पण इतकी खटपट कोण करेल? Happy तुम्ही सरळ पार्सल पाठवा बुवा....

मस्त... करावी म्हणते.. चटकन होणार्‍यापैकी दिसतेय .. फोटू क्लास.. मला वरचा सुकामेवाच जास्त अपिल करतोय Wink
नेमक्या रबडी ची पाकृ दिलीय का कोणी ?

फारच स्वादु दिसतो आहे हा प्रकार.... Happy
>>( काय राव, कधीतरी मलाबी क्रेडीट मिळूंद्या कि !!! )<< आवरा दिनेश दा.....तुमच्या सारख्या मास्टर शेफ नी असे म्हण्ट्ले तर कसे चालेल ? Wink अहो इथल्या निम्म्य्या हुन अधिक पा. कृ. चे क्रेडीट तुम्हालाच आहे हो !!!

कोण आहे रे तिकडे !!!

ह्या दिनेशदांना किडनॅप करुन पुण्यात आणा.
त्यांच्यासाठी रेन्टवर फ्लॅट मी शोधुन देइन. Lol

शेवभाजी बघुनपण गप्प बसलो होतो.
हा मात्र कहरच हा.
Happy

फोटो एकदम भारी आहे.
झरा Lol पुण्यात काही उपयोग नाही हैद्राबादमध्ये सेलिब्रेटी होतील दिनेशदा. Wink

धन्यवाद. कित्ती छान वाटलं या प्रतिक्रिया बघून.

शिजल्यावर सफरचंद असेच दिसणार ( त्यात सालपण किसलीय. ) चिमूटभर सायट्रीक अ‍ॅसिड घालायचे ते सफरचंद काळे पडू नये म्हणून. त्याचा आंबटपणा रहात नाही. पण तसेही रबडी करताना अगदी शेवटी काहि थेंब लिंबाचा रस घातला तर रवाळपणा येतो ( बहुतेक तरला दलालची रेसिपीत आहे ही युक्ती. )

पण दूध आटवण्यापेक्षा अश्या तर्‍हेने रबडी करणे फारच सोपे आहे. अगदी पाच मिनिटात होते. आणि चवीत / रंगात काहिही फरक जाणवणार नाही.

पण तसेही रबडी करताना अगदी शेवटी काहि थेंब लिंबाचा रस घातला तर रवाळपणा येतो ( बहुतेक तरला दलालची रेसिपीत आहे ही युक्ती.

रवाळपणा येतो म्हणजे रबडी थोडी फाटते. थेंब जरा जास्त झाले तर जास्त फाटेल आणि मग तेलही गेले, तुपही गेले अशी परिस्थिती ओढवायची. Happy

पण दूध आटवण्यापेक्षा अश्या तर्‍हेने रबडी करणे फारच सोपे आहे

ह्म्म्..मीही तोच विचार करतेय. तसेही दुध पावडर करताना ती दुध आटवुनच केली असणार ना. मग पावडर मिळत असताना दुध आणुन तासभर गॅस आणि वेळ करत वाचवता येईल.

ह्या दिनेशदांना किडनॅप करुन पुण्यात आणा.
त्यांच्यासाठी रेन्टवर फ्लॅट मी शोधुन देइन. हाहा

शेवभाजी बघुनपण गप्प बसलो होतो.
हा मात्र कहरच हा.
स्मित>>>:D Lol Lol

मस्त रेसीपी

हैद्राबादमध्ये सेलिब्रेटी होतील दिनेशदा>> ते सेलेब्रेटी होतीलच हो.
पण माझ्या शेजारीच रहायला येतील असं बघतोय मी. Wink

फोटुग्राफी करुन देइन मी. म्हणजे त्यांचा रेसिपी करतानाचा वेळ वाया जाणार नाही.

वाह अल्टिमेट रेसिपी...नेहमीप्रमाणेच.
नक्की करून बघिन.

दिनेश दा

रबडी केली.... अप्रतिम झाली...

मी परिस्थीती वश काही बदल केले. आमच्या जवळ्च्या दुकानात नेहेमी अगर अगर मिळते... म्हणुन विसंबुन रहिले... आणि घोळ झाला.... आयत्या वेळेला त्याने दगा दिला. भरवश्याच्या म्हशीला......

मग मी घरात होते ते बटर्स्कॉच कस्टर्ड १ टी. स्पू. पाण्यात घोळवुन घातले आणि रंगा साठी केशर सिरप घातले..... आणि काय चव आलिये महाराजा !!!!! फोटो काढला आहे, पण मोबाईल पी.सी. वर ट्रान्स्फर करण्याच्या मुड मधे नाहिये....

तुमच्या पोतडीत अजुन खुपच चीजा आहेत ..... धन्यवाद...