तीव्र कोमल

Submitted by ललिता-प्रीति on 22 April, 2015 - 01:07

फक्‍त एक घर तर घ्यायचं होतं.
या ‘फक्‍त’पाशी येऊन पोहोचायला चंद्रकांत काशिनाथ फाटक ऊर्फ चंदाला गेले चार-सहा महिने फार घाम गाळावा लागला होता...
आपला फारच घाम गळतोय हे लक्षात आल्यावर त्यानं कारचा ए.सी. अजून वाढवला. ए.सी.वाढवणे या शब्दप्रयोगाचा ऐश्वर्याला राग येतो. "तो काय आवाज आहे का वाढवायला किंवा कमी करायला?" असं तिचं म्हणणं.
"मग काय म्हणायचं?"
"Drop the temperature."
"म्हणजे तेच ते ना?"
"नाही!"
हे ‘नाही’ तिच्याकडून नाही, धनश्रीकडून येतं. धनश्रीला त्याची ही ‘तेच ते’ म्हणायची सवय मुळ्ळीच आवडत नाही. ते ऐकलं, की तिच्या कपाळावर पावणेतीन आठ्या पडतात. तिकडे ऐश्वर्या ‘Gosh! Pops म्हणजे ना...’ असा चेहरा करून आपलं टेक्स्टिंग पुढे सुरू करते.
असा साध्या साध्या शब्दांचाही कीस पाडणार्‍या या बायका, घर घ्यायचं म्हटल्यावर सरसावल्या नसत्या तरच नवल होतं. किती खोल्यांचं घर घ्यायचं इथेच चर्चेला तोंड फुटलं आणि झालं की सुरू दोघींचं! तरी, धनश्रीला यावेळेस एक अतिरिक्‍त काम आहे. ऐशूनं केलेल्या एका मागणीपायी तिच्यासमोर एक पेच उभा राहिला आहे, जो तिला सोडवायचा आहे. चंदाच्या घरखरेदीतल्या पेचापेक्षाही तो अवघड आहे.

चंदानं स्वतःशीच मान हलवत उजवा हात आपल्याच मांडीवर आपटला. तो खरंतर डावखुरा आहे. पण गाडी चालवताना त्याचा उजवा हातच मोकळा असतो. कारण डावा कायम गियरवर. त्याला तशीच सवय आहे. धनश्रीला त्याची ही सवयही मुळीच पसंत नाही. पण ‘गाडी चालवण्यातलं तुला काहीही कळत नाही' असं ऐकवून तो तिला दरवेळी गप्प करतो. ती देखील निमूट ऐकून घेते त्याचं. कारण ती खरंचंच कुठलीही गाडी चालवत नाही. तिला त्या गोष्टीचा विलक्षण कंटाळा आहे. घरातली दुसरी गाडी ती वापरते, पण चालवत नाही. तिनं चंदाला कटकट करून त्यासाठी ड्रायव्हर ठेवायला लावलाय. चंदा स्वतःची गाडी मात्र कधीही ड्रायव्हरच्या ताब्यात देत नाही. स्वतःच्या गाडीवापराचा त्याला निरतिशय अभिमान आहे.
"Wots निरतिशय?" एकदा एका चायनीज हॉटेलमधे डिनर करत असताना तो हे सांगत होता, तर लगेच ऐश्वर्यानं भुवया ताणत प्रश्न केला. पॉप्स्‌ चॉपस्टिक्स्‌ऐवजी काट्या-चमच्यानं जेवतोय हे पाहिल्यावर तिनं चेहरा वेडावाकडा केला होताच. त्यात त्याचे असले जड-जड शब्द तिला नेहमीच त्रास देतात.
एकीकडे डाव्या हातात सेलफोन पकडून तिचा नेट-संचार सुरू होता, wealthy-didi या नावानं.
तो तिचा फेसबूक आय-डी आहे हे कळल्यावर चंदाच्या घशात एक नूडल जोरदार वळवळलं. "Wots wealthy-didi?" त्याच्या तोंडून निघून गेलं.
"सानिकाला एक्सरसाईझ मिळाला होता, की मराठी मुलांच्या आणि मुलींच्या नावांची मिनिंग्ज्‌ लिहून आणा म्हणून. Five each. ती मला लिफ्टमधे भेटली; ऐश्वर्याचा अर्थ विचारायला लागली."
"मग?"
"Wot मग? मी सांगितला."
"तुला माहितीय ऐश्वर्याचा अर्थ??"
"Come on, Pops!"
".........."
"माझ्या नावाचा अर्थ कळल्यापासून सानिका मला ‘ऐश्वर्याताई’च्या ऐवजी ‘वेल्दीताई’ म्हणते. Gosh, wots this ‘ताई’ and all??"
".........."
"पण मग मी माझा फेसबूक-आयडी चेंज केला - wealthy-didi! सगळ्यांनी लाईक केलं या अपडेटला."
".........."
"सानिका, Pops, वनारसेंचं शेंडेफळ," अजूनही कोराच असलेला त्याचा चेहरा पाहून तिला स्पष्टीकरण द्यावंसं वाटलं. "Where was I? Yes, निरतिशय!" असं पुढे म्हणत तिनं पुन्हा उजव्या हाताच्या अंगठ्यानं सेलफोनच्या स्क्रीनची सारवासारवी सुरू केली.
तिच्या तोंडून शेंडेफळ हा शब्द ऐकून तर त्याची काही सेकंद वाचाच बसली. मग त्याला आठवलं, की शेजारच्या वनारसेंना तेवढी एकच मुलगी आहे. तिला तिची चूक समजावून सांगावी म्हणून त्यानं तोंड उघडलं, पण ती तिच्या FB फ्रेण्डस्‌पैकी ‘सुप्पर मराठी’ येणार्‍या एकाच्या वॉलवर आपली एक शंका लिहिण्यात गर्क होती - "wots d meening of ‘niratishay’??" पण ती हे पोस्ट करे-करेपर्यंत त्या मित्राच्या नावासमोरचा ग्रीन-डॉट गायब झाला. लगेच तिनं ‘व्हॉटस्‌-अ‍ॅप’मधे जाऊन त्याच मित्राला तोच प्रश्न कॉपी-पेस्ट केला. हे करत असताना एकीकडे तिचं नूडल्स चिवडणं सुरू होतंच.
ती काहीच बोलत नाही म्हणताना चंदाला आश्चर्यच वाटलं. जड जड मराठी शब्द ऐकले, की तिचं तोंड बंद होतं अशी नेहमीप्रमाणे त्यानं स्वतःशी समजून करून घेतली आणि खूष झाला.
धनश्री किंवा ऐश्वर्या, दोघींपैकी कुणालाही गप्प करण्याची संधी त्याला तशी अगदी क्वचितच मिळते म्हणा; पण तरी, तुका म्हणे त्यातल्या त्यात.

‘तुका म्हणे त्यातल्या त्यात’चा हा जप गेले चार-सहा महिने नवीन घराच्या बाबतीतही चाललेला होता. आपल्या मागण्या - प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे - कशा पुढे रेटता येतील; सत्याग्रह, नुसताच आग्रह, हटवादीपणा, हेकेखोरपणा - योग्य पर्याय निवडा - यातलं काहीतरी करून त्या मागण्या पूर्ण करून घेण्याकडे जास्तीत जास्त वाटचाल कशी करता येईल याचीच प्रत्येकाला चिंता. मग चंदा चिडून किंवा हताश होऊन बाहेर पडायचा. मेन रोडला लागेपर्यंत वैतागून मांडीवर हात आपटायची वेळ आलेली असायची. आठ्यांनी भरून गेलेलं कपाळ एल.आय.सी.च्या सिग्नलला येईपर्यंत तसंच असायचं. घरच्यांची तोंडं आता थेट रात्री साडेआठ-नऊलाच बघायची या विचारानं ते जरासं सुरळीत झालेलं बघायला मिळायचं ते थेट लेव्हल क्रॉसिंगच्या लाल दिव्यालाच...
पण आज त्या दिव्याला ते दृष्य दिसलं नाही, कारण मुळात आज त्याच्या कपाळावर आठ्या अवतरलेल्याच नव्हत्या. मगाशी त्यानं मांडीवर हात आपटला तो आनंदात. कारण, आज अखेर घरचं मैदान मारण्यात त्याला यश आलंय.
घरी अखेरचा बाबापुता करे-करेपर्यंत त्याला निघायला उशीर झाला. त्यामुळे आता थ्रू-ट्रेनच्या मोठ्या सिग्नलला थांबणं त्याला भाग आहे. अर्थात त्याला त्याची फिकीर नाहीये. निघताना पार्किंगमधेच त्यानं त्याचे बॉस जयंत बळवंत जोशी ऊर्फ जे.बी.जें.ना तासभर उशीर होण्याबद्दलचा मेसेज पाठवून ठेवलेला आहे. तासभर उशीराचं सूतोवाच करून तो अर्धाच तास उशीर होईल हे पाहणार आहे; की जेबीजे खूष! प्रेमळ आहे म्हातारा तसा; कुटुंबवत्सल वगैरे. त्यामुळे त्या आघाडीवर त्याला चिंता नाहीये.
घरच्या आघाडीनं मात्र गेले अनेक दिवस त्याचा मेंदू पोखरला होता.
त्याच्या मनात अनेकदा एक विचार येऊन गेला होता, की बाकी काही नाही, तरी सरळ जाऊन जेबीजेंनाच विचारावं, की बुवा, तुम्ही स्वतःचं घर घेतलंत, तेव्हा घरच्या मंडळींच्या मागण्यांना कसं तोंड दिलंत? तुमचं म्हणणं त्यांच्या गळी कसं काय उतरवलंत? पण असली तद्दन ‘किटीपार्टी-क्वेरी’ त्यांच्यासमोर ठेवावी, की नाही, हे त्याला कळत नव्हतं. एकवेळ ते देखील जमवता आलं असतं, ऑफिसबाहेर कुठेतरी, किंवा टूरवर असताना प्रवासात वगैरे...
पण ती वेळ आलीच नाही.
एक दिवस ऑफिसमधून परतल्यावर रात्री तो जेवण वगैरे आटोपून अर्ध्या चड्डीत आणि उघड्या छातीवर चौकोनी उशी घेऊन रिमोटची बटणं दाबत सोफ्यावर पसरला होता. टी.व्ही.च्या मंद आवाजाबरोबरच आतल्या खोलीतल्या फोनवर बोलणार्‍या ऐश्वर्याचा अंधुक आवाजही तो नकळत ऐकत होता. तिचा प्रत्येक शब्द त्याला कळत नव्हता, पण इतकं लक्षात आलं होतं, की ती कुठल्याशा मैत्रिणीशी अजून एका तिसर्‍या मित्राबद्दल बोलत होती. त्याच्यावरून किंवा अजून कुठल्यातरी चौथ्यावरून तिला झापत होती. ‘Shut up n listen to me..' प्रकारचं काहीतरी ऐकवत होती. इकडे STAR WORLDवरच्या एका लेट-नाईट डेली-सोपचं एक दृष्य चालू होतं. एक बाई आणि एक पुरूष भांडत होते. लेट-नाईट असून!
‘बरी दिसतीये, चेहर्‍यावर रुमाल टाकून चालू शकेल,’ - मनाशी एक नोंद केली गेली. किती मोठा रुमाल लागेल, हे ठरायच्या आतच ती खेकसली, त्या पुरूषावर, "You male chauvinistic pig...!!!" लेट-नाईट असून!
तो पुरूष हतबलतेत हात उडवत म्हणाला, "There you're again... with your age old topic... men and women... Bollocks"
‘Bollocks ही शिवी असावी’’ - मनाशी अजून एक नोंद केली गेली.
आणि अचानक, त्या मनाच्या संबंधित मेंदूत मोठ्ठा प्रकाश पडला. लेट-नाईट असून! त्याच्या लक्षात आलं, की जेबीजेंना दोन्ही मुलगेच होते - म्हणजे अजूनही आहेत, गेले नाहीयेत कुठे - पण त्यांनी घर घेतलं, तेव्हा ते दोघंही कॉलेजवयीनच होते. कॉलेजवयीन ‘मुलग्यां’ना गुंडाळणं सोपं असतं; स्वानुभव! बायकोचं काय, आपण जिथे जाऊ, तिथे अखेर ती येणारच; विरोध असो वा अजून काही;
म्हणजे फरक पडतो तो...
मुलगी...असल्या...मुळे...!
तीन शब्दांना - खरं म्हणजे दोनच, त्याचे तीन झालेले - तीनवेळा चॅनलचं बटण दाबलं गेलं. f-tv, Z-TRENDZ, M-TV तिघांवर त्यादिवशीपुरती संक्रांत कोसळली.
पाणी नक्की कुठे मुरतंय, हे त्याच्या लक्षात आलं. त्या समस्येचं संपूर्ण निराकारण या जन्मी शक्य नाही हे ही कळून चुकलं. घरची आणि नव्या घराची, अशी दुहेरी आघाडी त्याला एकट्यालाच सांभाळणं भाग होतं हे उमगलं. दुधारी शस्त्रच होतं ते जणू. त्याच्या एका पात्यावर तो विरुध्द घरची मंडळी अशी फौजांची जमवाजमव झालेली आणि दुसर्‍या पात्यावर घरांच्या वाढत्या किंमतींनी रणशिंगं फुंकलेलं!

‘दुधारी शस्त्र’ हे शब्द कधीतरी ऐशूच्या तोंडावर मारले पाहिजेत जोरदार - लाल दिव्यापाशी गाडीला ब्रेक मारता मारता तो स्वतःशी म्हणाला.
त्यानं गाडी चौथ्या गिअरमधून दुसर्‍यात आणली. ते करता करता उजवीकडे पाहिलं. उजवीकडे एक ट्रक खेटून उभा होता. ‘नवला’, ‘खे ट्रान्स’ आणि ‘पोर्ट’ या अक्षरांपलिकडे काहीच दिसत नव्हतं. मग गिअर न्यूट्रलवर आणत त्यानं डावीकडे मान वळवली. डावीकडे एक कार उभी होती आणि चालवणारी एक बाईच होती. ‘हिच्या नवर्‍यानं नक्की ड्रायव्हर ठेवला असणार’ या विचारानं तो स्वतःशीच हसला. नेमकं त्याच वेळी दोन खिडक्यांच्या दोन काळ्या काचा ओलांडून त्या बाईला कळलं बहुतेक, की तो तिच्याकडेच बघतोय. तिनं डोळ्यांवरचा गॉगल केसांत सरकवून त्याच्याकडे पाहिलं. त्यानं सटकन्‌ उजवीकडे मान वळवली आणि ‘खे ट्रान्स’चं रसग्रहण पुढे सुरू केलं.
थ्रू-ट्रेनच्या भोंग्याचा आवाज जवळजवळ येत होता. पुढे सिग्नलच्या तोंडाशी आडव्या पाडलेल्या लोखंडी खांबाखालून सायकलवाले अजूनही घुसून जात होते. त्याला वाटलं, किती तो आत्मविश्वास गाडी यायच्या आत रूळ ओलांडून पार जाऊ याचा; गाडी दिसतेय, तर थांबावं ना गपगुमान; दहा-पाच मिनिटांनी काय फरक पडतो? अर्थात, तासाभराची सूट मागून घेतलेल्यांसाठी - आणि त्यातला अर्धा तास अगदी सहज वाचवू शकणार्‍यांसाठी - दहा मिनिटं काहीच नाहीत. त्यांना हे कसं कळणार, की त्या पुढच्या लोकांना तेवढा वेळ वाचवणं गरजेचं वाटतं; त्या बदल्यात जीव धोक्यात घालावा लागला, तरी त्याला त्यांची तयारी असते.
जसं, रो-हाऊस की नुसता फ्लॅट - दीड कोटीचा फ्लॅट आणि नुसता?? त्याच्या पोटात नव्यानं खड्डा पडला - या वादात त्यानं फ्लॅटची बाजू घेऊन, पुढे-मागे बाग, गच्ची आणि दोन जास्तीच्या खोल्या यांचे पैसे वाचवण्याच्या बदल्यात स्वतःची मनःशांती धोक्यात घातली होती. वास्तविक, दीड कोटीचा फ्लॅटच काय, रो-हाऊस घेणंही त्याला अशक्यप्राय मुळीच नाहीये; रो-हाऊस घेतलं, तर आर्थिकदृष्ट्या थोडी ओढाताण करावी लागेल, इतकंच. पण त्यामुळे ‘फ्लॅटमधे भागत असेल, तर का नको?’ असं त्याचं म्हणणं. पण "दहापाच मिनिटांनी काय फरक पडतो?" या चालीवर, "फ्लॅटऐवजी रो-हाऊस घेतलं, तर काय फरक पडतो? उलट आपल्या सर्वांच्याच नीडस्‌ त्यात फुलफिल होतायत" हा युक्‍तिवाद आला तो दुसर्‍या तिसर्‍या कुणाकडून नाही, तर थेट वैभवकडून.
घरच्या द्वि-सदस्यीय महिलामंडळाच्या निम्मीही बडबड न करणार्‍या चिरंजीवांनी ऐन मोक्याच्या क्षणी तोंड उघडलं आणि चंदासाठी नवीन घराच्या खरेदीआघाडीवर पहिला अडथळा उभा केला. महिलावर्गानं ही रो-हाऊसची कल्पना भलतीच उचलून धरली की! तेवढ्यावरूनच चंदाला आपल्या पुढे काय वाढून ठेवलंय याची कल्पना यायला हवी होती. पण नाही आली. त्या रूळ ओलांडणार्‍यांच्या डोक्यात शिरत होतं का, की जरा काही गडबड झाली, तर आपल्यावर प्राण गमवायची पाळी येऊ शकते म्हणून? तसंच! नाही लक्षात आलं ते त्याच्या. मग भोगा आपल्या कर्माच्या पावणेतीन-इण्टू-टू-रेज्ड-टू-एन्‌ आठ्या!
ट्रेन धडधडत पुढ्यातून जायला लागली. त्यानं डबे मोजायला सुरूवात केली. आजतागायत अगणितवेळा अगणित गाड्यांचे डबे मोजलेले; पण पटकन कुणी विचारलं असतं, की थ्रू-ट्रेन्स्‌ना किती डबे असतात म्हणून, तर त्याला ते सांगता आलं नसतं. जसं, लग्नाला इतकी वर्षं झाल्यावरही, नव्या घराचा विषय निघाल्यावर धनश्री आपली नक्की कुठली मागणी पुढे करेल हे त्याला सांगता आलं नव्हतं. नव्हे, त्यानं तसला काही अंदाजही बांधलेला नव्हता. पण धनश्रीचा बॉम्ब नंतर येऊन पडला; आधी शत्रूपक्षाचे सरदार वैभव यांनी आपली व्यूहरचना सादर केली आणि वर एक पी.जे.ही टाकला, की म्हणे ‘आपण ‘फाटक्स्‌’ आहोत, म्हणजे आता त्या फाटकाच्या आत फक्‍त एक बंगला पाहिजे; बंगला नाही तर नाही, किमान रो-हाऊस तरी हवंच, आपल्या सर्वांच्याच नीडस्‌ त्यात फुलफिल होतायत.’
पुढची रिक्षा जराशी पुढे सरकली, पुन्हा थांबली.
"फाटक्स्‌, म्हणे, फाटक्स्‌," असं स्वतःशीच म्हणत चंदानं पहिला गियर टाकला आणि कणभर पुढे सरकून पुन्हा न्यूट्रलला आणला. हिरवा दिवा लागायच्या बेतात आल्यावर थांबून राहिलेल्या वाहनांच्या गठ्ठ्यात अचानक अशी जागा कुठून निर्माण होते हे एक कोडंच असतं. तोपर्यंत सगळे जागच्या जागी निमूट उभे असतात; पण निघण्याची घटिका जसजशी जवळ येते, तसतसं सर्वांना जाणवतं, की जी काही इंच इंच जागा मिळते, तिचा फायदा करून घेण्यातच कल्याण आहे. घरच्यांनीही हेच केलं. कंपनीचं घर सोडून स्वतःचं घर घेण्याचा त्याचा निर्णय पक्का झालाय याची खात्री पटताच, मंडळींनी इंच इंच लढवायला सुरूवात केली आणि त्याला गरजा पूर्ण करण्याचं गोंडस नाव दिलं.

वैभवनं त्याच्या ‘नीडस्‌’चे पत्ते अजून खुले केलेले नाहीत; ते तो करणारही नाही. पण धनश्री आणि ऐश्वर्या मात्र ही संधी दवडणं शक्यच नव्हतं. ‘किमान एकतरी जास्तीची स्वतंत्र खोली’ या एका कारणास्तव त्यांनी फ्लॅटऐवजी रो-हाऊसच्या पारड्यात घसघशीत मतदान केलं होतं. चंदाला अजूनही पूर्णपणे कळलेलंच नाहीय, की ‘त्या’ एका कारणासाठी महिलावर्गाला एक जास्तीची स्वतंत्र खोली कशाला हवीय? ही काय मागणी झाली?? तो पुन्हा उसळला; विशेषतः ऐश्वर्यावर. कारण त्यानं ओळखलंय, की तीच धनश्रीची बोलविती धनीण असणार, नाहीतर धनश्रीच्या डोक्यात ‘असलं’ काही येणं जरा कठीणच.
"रो-हाऊसच हवं, म्हणे! ते काय खेळणं आहे? हे नको, ते हवं असा हट्ट करायला?" स्वतःशी पुटपुटत त्यानं तिरीमिरीत पुन्हा पहिला गिअर टाकला. उजव्या हातानं जोरजोरात हॉर्न वाजवला. "बापाकडे पैसा आहे, म्हणून काहीही मागण्या करायच्या म्हणजे काय?" हा विचार आला मात्र, त्यानं स्वतःशीच जीभ चावली; गिअर पुन्हा एकदा न्यूट्रलला आणला. इतके दिवस मुलांसमोर तो "रो-हाऊस घेण्याइतका पैसा नाही" हेच तर कारण वापरत होता. मुलांनी या कारणाला भीक घातली नव्हती तो भाग निराळा.
एका क्षणी तर, झक मारली आणि मुलांना त्यांची पसंती विचारली, असं होऊन गेलं होतं त्याला.

----------

सोसायटीच्या गेटमधून आत शिरतानाच वैभवला पार्किंगमधल्या गाडीच्या दिशेला निघालेला पाठमोरा चंदा दिसला होता. आता बापू आपल्याला पाहून थांबणार, कॉलेज, अभ्यास यावरून काहीतरी लेक्चर देणार, नाहीतर वाढलेल्या केसांवरून किंवा कानातल्या हेडफोन्स्‌वरून तरी नक्कीच, हे त्याच्या लक्षात आलं. त्यानं कानातल्या वायर्स्‌ पटकन ओढल्या.
तुका म्हणे त्यातल्या त्यात!
त्याला याचसाठी फ्लॅटरूपातलं नवीन घर नकोय. ‘दाखवायला प्रत्येक सोसायटीला अगदी मारे दोन-दोन गेटस्‌ असतात, एक या कोपर्‍यात, एक त्या कोपर्‍यात, पण आपण वापरतो त्यातलं एकच, आपल्या विंगच्या बाजूचंच; मग आई, नाहीतर बापू, हमखास या दार-खिंडीत गाठतातच; घरी कसं, त्यांच्या मूडचा अंदाज आला, की खोलीचं दार लावून घेता येतं, मग बाहेर काय करायचं ते करा; इथे काय करणार?’ - हे सगळं मनातल्या मनात, विद्रोहाच्या अप्रकट हुंकाराची छटा वगैरे; उघडपणे मात्र एकच पालूपद, "आपल्या सर्वांच्याच नीडस्‌ फुलफिल होतायत." त्याच्या क्लास-कॉलेजच्या वेळाही अशा आहेत, की एक धनश्री तरी, नाहीतर चंदा तरी, हटकून त्याला भेटतातच. मग थांबून त्यांच्याशी काही ना काही बोलणं आलंच. त्यामुळे त्याच्या मनानं सध्या एवढंच घेतलंय, की रो-हाऊसच आपल्याला सोयीचं आहे; का? कारण, त्याला दोन गेटस्‌ असतात आणि ती फक्त आपली असतात. धनश्री त्याला ‘गेटं’ म्हणते म्हणून त्याला अगदी राग येतो तिचा. बरं, ऐशसारखं आणि ऐशइतकं आई-बापूच्या असल्या वागण्या-बोलण्याकडे त्याला दुर्लक्षही करता येत नाही. ऐश दुर्लक्ष करतेच आणि त्याचबरोबर बापूसोबत इतकं एन्जॉयही करू शकते याचं त्याला फार म्हणजे फार नवल वाटतं.
"नाहीतर आम्ही," वायर्स्‌चा गुंतावळा कार्गोच्या खिशात कोंबत तो स्वतःशीच पुटपुटला, "पिताश्री तर out of question; आणि मातोश्रीसोबत एन्जॉय?? GGM!"
त्यानं आपल्या फोनमधे चंदा आणि धनश्रीचे नंबर्स्‌ ‘पिताश्री’ आणि ‘मातोश्री’ या नावांनीच सेव्ह केलेले आहेत. यालाही विद्रोहाच्या अप्रकट हुंकाराची छटा वगैरे म्हटलं तरी चालेल!
चंदा गाडी रिव्हर्स घेत होता.
आपल्या बापूच्या ड्रायव्हिंगवर मात्र वैभव अगदी खूष असतो. ही गाडी घेतली, तेव्हा त्यानं आपल्या मोबाईलवर नवीन गाडीसोबत चंदाचा फोटो काढला, फेसबूकवर अपलोड केला आणि खाली कॅप्शन लिहिली - "The best driver of the world!" ते वाचून तरी बापू मूडात येईल - धनश्रीचं ऐकून ऐकून त्याच्याही तोंडात कधी कधी ‘मूडात’, ‘पार्कात’ असे शब्द येतात - आपल्याला गाडी चालवायची परवानगी देईल अशी त्याला अंधूक आशा वाटली होती. पण ते काही झालं नाही. चंदा या गाडीला कुणालाही हातच लावू देत नाही तर काय!
घाईघाईनं खिशात कोंबलेल्या वायर्स्‌ खिशातून हात बाहेर काढताना बोटात अडकून पुन्हा बाहेर लोंबायला लागल्या. त्या पुन्हा नीट गुंडाळण्याच्या नादात, चंदा यायच्या आत लिफ्टच्या दिशेला सटकण्याचा वैभवचा प्लॅन बोंबलला. पण आज काहीतरी निराळंच घडलं! मैदान मारल्याच्या आनंदात चंदाचं आज आसपास लक्षच नव्हतं. तो वैभवकडे न पाहताच सोसायटीमधून बाहेर पडला.
लांब जाणार्‍या गाडीकडे पाहत वैभवनं लिफ्टचं बटण दाबलं. लिफ्ट खाली येईपर्यंतच्या वेळात vaiby gates या आय-डीनं आपलं फेसबूक-स्टेटस अपडेट केलं - "wot d hell !! baba dint stop only, dint even notice me. ggm! :O"
लिफ्टमधे शिरता शिरता त्याची नजर आपसूकच पार्किंगमधल्या त्यांच्या दुसर्‍या गाडीकडे वळली. ही धनश्रीची गाडी त्याला आवडत नाही. ती चालवणं म्हणजे त्याला ‘बिलो स्टेटस’ वाटतं.
फ्लॅट नको, रो-हाऊस हवं म्हटल्यावर, ही ‘बिलो स्टेटस’ची शंका येऊनच चंदानं त्याला त्याचं कारण विचारलं होतं. तो काय कारण सांगणार? कप्पाळ! ‘कप्पाळ’ हा शब्द त्याच्या आजीचा, धनश्रीचा नाही; त्यामुळे लहानपणापासूनच त्याला तो खूप आवडतो.
त्यानं काही दिवस रो-हाऊसची री बर्‍यापैकी ओढून धरली होती, कारणाचा उच्चारही न करता. पण बापू आपलं ऐकणार नाही हे त्याला माहिती होतं.
vaiby gatesच्या नव्या स्टेटसला चार ‘Likes’ आले.
बापूनं मुळात आपला चॉईस विचारलाच कसा या विचारानंच खरं म्हणजे त्याला बुचकळ्यात पडायला झालं होतं.

----------

सकाळी जाग आल्या-आल्या मोबाईल डोळ्यासमोर धरला, की बहुतेकवेळेला काही नवीन एस.एम.एस. आलेले असतात, जे आदल्या रात्रीच्या मेसेजिंगचे उरलेसुरले अवशेष म्हणता येतील. आज ऐश्वर्याला त्या जागी तीन मिस्ड्‌-कॉल्स्‌ दिसले. पहिला रात्री साडेबाराला आलेला होता, मिहिकाचा. तिला तो अपेक्षित होताच. उरलेले दोन्ही के-राजचे होते; एक सकाळी साडेसात वाजता आणि एक नंतर लगेच सात वाजून चाळीस मिनिटांनी आलेला.
तोंड धुवून, चहा पिऊन ती बाल्कनीत गेली आणि तिनं आधी मिहिकाला फोन लावला. ‘हॅलो’ म्हणताच पलिकडून मिहिकाचं तोंड सुरू झालं. तिचा बोलण्याचा सूर ‘गोष्टी सांगेन युक्तीच्या चार’ असा होता आणि विषय, कालचाच, फेसबूकवरच्या बाईक प्रकरणाचा.
त्यांचा एक नेट-फ्रेण्ड आहे, प्रतिक सरकार नावाचा. आदल्याच दिवशी त्याच्या वडिलांनी त्याला नवीन बाईक घेऊन दिली होती. त्यानं बाईकचे फोटो फेसबूकवर टाकले आणि पहिल्याच फोटोला कॅप्शन लिहिली - "Its a guy thing !!!!!"
ते वाचताच, ऐश्वर्यानं तिथल्या तिथेच त्याच्याशी वाद घालायला सुरूवात केली:

wealthy-didi guy thng?? my futt!

prats_shorkar kya hua? :O

wealthy-didi U cant stamp any thing like dat

prats_shorkar :O wht r u tokin abt??

wealthy-didi y do u col dat damn bike of urs a guy thing??

prats_shorkar c'mon... its just a caption

wealthy-didi no, u did dat deliberately. wot d u think? ladkiya woh bike chala nahi sakti???

prats_shorkar wht d hell! maine aisa kab kaha?

k-raj chill guys! Hey, Prats, cooool bike, congo mann Happy

राजेश्वर कपूरनं थोडी मध्यस्थी करण्याचा प्रयत्‍न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. वाद पुढे वाढतच गेला. मिहिकानं रात्री उशीरा हे सगळं वाचून लगेच ऐश्वर्याला फोन लावला होता. कारण तिला दिसलं होतं, की तिच्या आणि ऐशच्या mutual friendsमधून एक नाव कमी झालं होतं.

आताही, ऐश्वर्या काहीही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हती; तावातावानं मिहिकाला आपली बाजू ऐकवत होती. हे ‘तावातावानं’ म्हणजेही मोठं गंमतीशीर असतं, बरं का. बोलण्याचा आवाज अगदी हळू, शेजारी उभ्या असणार्‍यालाही नीट कळू नये असा; बोलतानाचे हातवारेही अगदी माफक. पण हॉलमधे सोफ्यावर बसून पेपर वाचण्याचं नाटक करत असलेल्या धनश्रीला बरोबर समजलं, की काहीतरी घडलं आहे, ज्यामुळे कन्यारत्‍नाच्या डोक्याला शॉट लागलेला आहे.
म्हणायचं नाही, पण सकाळी सकाळी तिच्या स्वतःच्या डोक्यालाही शॉट लागलेला आहेच. कारण नेहमीप्रमाणे तिला दोन्ही मुलांच्या कोंडीत ढकलून चंदा निघून गेलाय. तिला आता प्रश्नच पडलाय, की त्यानं घेतलेला निर्णय मुलांच्या गळी कसा उतरवायचा; विशेषत: ऐश्वर्याच्या. वैभव न बोलून शहाणा आहे. ऐश्वर्याचं मात्र तसं नाहीये. अतिशय हट्टी, हेकेखोर स्वभावाची आहे ती. अगदी फाटकांची माहेरवाशीण शोभेलशी. धनश्रीच्या डोळ्यांसमोर ऐश्वर्याच्या आधीच्या पिढीतल्या दोन माहेरवाशिण्या ऊर्फ चंदाच्या दोन्ही बहिणी - आणि हातासरशी, वरिष्ठ सासुरवाशीण ऊर्फ चंदाची आई - इतक्या सगळ्या एकदम झळकून गेल्या. ‘माहेरवाशिण्या’ हे ऐश्वर्यानंच केलेलं अनेकवचन आहे. धनश्रीला नाक मुरडावंसं वाटलं; माहेरवाशिण्या या शब्दाला नाही, तर डोळ्यांसमोर झळकलेल्या त्या तीन व्यक्‍तिविशेषांना. पण तिनं तो विचार सोडून दिला. किती वर्षं नाकं मुरडणार? नाक मुरडण्याजोगं जे काही होतं, ते मागे टाके-टाकेपर्यंत तिच्यासमोर मुलांची ताज्या दमाची खिंड उभी ठाकली. त्यांच्या एखाद्या बाबीची वासलात लावावी, तोपर्यंत नवीन काहीतरी हजर असतंच. मुलंही दरवेळी अगदी निकरानं लढतात याचं तिला खरं म्हणजे आश्चर्य, आणि किंचित कौतुकही वाटतं. आता काय, तर नव्या घराचं नवीन मैदान हजर आहे.
पण यावेळी एका गोष्टीसाठी ऐशूचं तिला खरंच, मनापासून कौतुक वाटतंय. नवीन घरासंबंधात ऐशूनं तिच्यामार्फत चंदासमोर जो एक मुद्दा मांडलाय, तो जन्मात तिच्या डोक्यातही आला नसता. पहिल्याप्रथम ऐकल्यावर चंदाप्रमाणेच तिनंही तो हसण्यावारीच नेला होता. तिला मुळात ऐशूच्या ‘गर्ली थिंग्ज्‌’ या शब्दांचंच हसू आलं होतं. पण नंतर काही दिवस तिच्या डोक्यात तो विचार सुरू राहिला. एक दिवस नकळत अजून एका वस्तूनं त्या विचारांचं बोट धरलं आणि तिला अधिकच ग्रासून टाकलं. गेली आठ-दहा वर्षं बेडरूमच्या लॉफ्टवरच्या एका कोपर्‍यात एका जुन्या हिरव्या साडीत बांधून ठेवलेली ती वस्तू, तिला आठवली, तशी ती अधिकाधिक अस्वस्थ व्हायला लागली. आठवली म्हणायला मुळात ती त्या वस्तूला विसरली होती, हे तिला डाचलं. फार म्हणजे फार डाचलं. पाप होतं ते. पण ऐशूच्या ‘त्या’ मागणीमुळे त्याचं प्रायश्चित्तही अचानक तिला समोर दिसायला लागलं आणि अखेर ऐशूचीच बाजू घेण्याचा तिचा निर्धार अगदी पक्का झाला.
ऐशूचं बरोबर होतं. दोघींसाठी एक जास्तीची आणि स्वतंत्र खोली हवीच. खरंतर, दोघींना दोन जास्तीच्या स्वतंत्र खोल्या हव्यात. रो-हाऊसमधे हे बरोबर जमलं असतं. पण चंदा "रो-हाऊस नाही" यावर एकदम ठाम होता. तरीही, तिनं आपला निर्धार कायम ठेवला होता. पण आज अखेर तिचा बुरूज, थोडा का होईना, ढासळवण्यात चंदा यशस्वी झालाच. ‘थ्री-अ‍ॅण्ड-हाफ-बीएचके’च्या सौद्याला तिला मंजुरी द्यावीच लागली. ‘गाठीशी असलेला सगळा पैसा रो-हाऊसवर खर्च करायला नको’ हे चंदाचं संसारी मत पटतंय तिला, नाही असं नाही. पण मुलांना ते कसं पटवून देणार? मुळात "रो-हाऊससाठी पैसा नाही" हे पटणार आहे का मुलांना?
"काढा समजूत; लढा, किती लढताय ते," ती स्वतःशीच म्हणाली.
जोरात बेल वाजली. "लढा" असं म्हणायचा अवकाश, की बिगुल वाजलाच. बेल वाजवणारा वैभव आहे. खरं म्हणजे, चौघांकडेही घराची एक एक किल्ली असते. पण घरी कुणीतरी आहे हे माहिती असलं, की वैभव अगदी हमखास बेल वाजवतो. ऐश्वर्या एकटी घरात असेल, तर आय-होलमधून पाहते आणि बाहेर वैभव उभा दिसला, की दार न उघडता शांतपणे आत निघून जाते. धनश्रीला हे आजतागायत जमलेलं नाही. तिनं उठून दार उघडलं. वैभव आत आला. दोघांनी एकमेकांच्या चेहर्‍यांकडे पाहिलं. बापूनं केलेल्या दुर्लक्षामागच्या कारणाची त्याला अजूनही उकल झालेली नाही. नेहमी त्याचा चेहरा अगदी सहज वाचू शकणार्‍या तिला ते ओळखता आलेलं नाही. त्यालाही आईच्या डोक्यात आत्ता नक्की काय चाललंय याचा थांगपत्ता लागलेला नाही.
"आज संध्याकाळी घरी थांब. आपल्याला फ्लॅट बघायला जायचंय. बाबा सांगून गेलाय," ती म्हणाली.
उत्तरादाखल बूट उतरवले गेले, मोजे वॉशिंग-मशीनमधे भिरकावले गेले, हात न धुताच फ्रिजमधली बाटली तोंडाला लावली गेली आणि बघता बघता या तीनही कृतींचा कर्ता काहीही न बोलता दुसर्‍या आंघोळीसाठी बाथरूममधे गडप झाला.
तिला तशीही त्याच्याकडून उत्तराची अपेक्षा नव्हतीच. तिचं लक्ष लागून राहिलंय बाल्कनीकडे. तिला माहितीय, की ऐश्वर्याचा एक कान फोनला असला, तरी दुसरा कायम घरातल्या संभाषणाकडे असतो. म्हणूनच तिनं ‘लेकी बोले’च्या गनिमी काव्यानं विषयाला तोंड फोडलंय. मगाशी आठवलेल्या तीन व्यक्‍तीविशेषांच्या संगतीत राहून ती या प्रकारात अगदी पटाईत झालेली आहे. त्या माहेरवाशिण्या नाहीत तर नाहीत, पण बाल्कनीत उभ्या असलेल्या पुढच्या पिढीतल्या या माहेरवाशिणीवर त्याचा प्रयोग करायला तिची काहीही हरकत नाहीये.
दरम्यान ऐश्वर्यानं आपला फोन आवरता घेतला. "काय सांगून गेलाय Pops?" आत येत तिनं विचारलं.
मनातल्या मनात म्हटलेल्या "हर हर महादेव"चा सूर आख्ख्या घरभर घुमत असल्याचा धनश्रीला भास झाला.

----------

दोन महिन्यांनंतर...

ऐश्वर्यानं नव्या घरातल्या आपल्या खोलीच्या अंतर्गत सजावटीचे यथेच्छ फोटो काढून दोन दिवसांपूर्वीच फेसबूकवर टाकले आहेत. त्यावर तिच्या फ्रेण्डस्‌चे ढीगभर ‘Likes’ आणि पोतंभर ‘congo, coool’ अशा कमेण्टस्‌ याआधीच आलेल्या आहेत. काल रात्रीनंतर त्यात अजून काही कमेण्टस्‌ची भर पडली असलीच - पडली असणारच म्हणा, तिचं फेसबूक फ्रेण्डसर्कल भरपूर मोठं आहे - तरी त्या कमेण्टस्‌ तिनं अजून वाचलेल्या नाहीत. कारण काल रात्रीनंतर तिनं फेसबूक पाहिलेलं नाही. हे नवलच आहे. फेसबूकपासून तब्बल बारा-पंधरा तास ती दूर राहिलीय असं सहसा घडत नाही; गेली चार वर्षं तिचा वेब-एनेबल्ड फोन आल्यापासून तर एकदाही हे घडलेलं नाही. पण आज ते घडलं, त्याला कारण नव्या घरातली साडेतिनावी खोली!
काही वस्तू तिला तिच्या खोलीतून साडेतिनाव्या खोलीत न्यायच्या आहेत.
उदाहरणार्थ, तिची एक जुनी लाडकी जीन्स्‌, दहावीत असताना तिनं एकटीनं जाऊन केलेली पहिली खरेदी. ती घातली, की तिला एकदम "कॉन्फिडण्ट वाटायचं, something different!" त्या खरेदीनंतर सहाएक महिन्यांनी आलेला तिच्या वर्गातल्या एका मुलाचा वाढदिवस; त्याबद्दल त्यानं हॉटेलमधे सर्वांना दिलेली पार्टी; सर्वांमधली ती पण एक; तिनं आपली ही आवडती जीन्स आणि एक नवीन घेतलेला टॉप इस्त्री करून ठेवला. तिचे पिरियडस्‌ चालू होते, म्हणून तिनं जीन्स घालून मित्राच्या पार्टीला जाऊ नये असं धनश्रीचं म्हणणं होतं. तिच्या म्हणण्यानुसार, "हे कारणच मुळात ridiculous होतं". त्यावरून धनश्रीशी तिनं घातलेला वितंडवाद. शेवटी ती जीन्स्‌ घालूनच ती त्या पार्टीला गेली. आता ती पुरती विटली होती, खाली पायापाशी फाटली होती. आणि तशी आता बसतही नव्हतीच. पण ती आजही तिच्या कपाटात होती. तिनं जीन्स्‌ची घडी ठेवलेली प्लॅस्टिकची पिशवी बाहेर काढली. "Temptations" दुकानाचं नाव, जिथून ती खरेदी केली होती. पिशवी तिथलीच होती. पिशवीवर दुकानाचं नाव, खाली पत्ता - आता त्या ठिकाणी एक हॉटेल झालेलं होतं, त्याच नावाचं - दुकानाचा सात आकडी जुना फोन नंबर. पिशवी उघडून आत नुसती टाकलेली एक नजर; पुन्हा पिशवीची घातली गेलेली घडी.
किंवा उदाहरणार्थ, कपाटाच्या कोपर्‍यात या पिशवीखालचीच अजून एक पिशवी. त्यातलं एक पुस्तक - Avantage Adolescence! फ्रेंच शीर्षक. इंग्लिश पुस्तक. नववीत असताना क्लासच्या यायच्या-जायच्या रस्त्यावर एके ठिकाणी फुटपाथवर दिसलेलं. तिनं आपल्या पॉकेटमनीतले पैसे घालून दोन-तीन दिवसांनी गुपचूप खरेदी केलेलं. तिच्या मैत्रिणींच्यात ते नंतर भरपूर फिरलं. तिला वाटतंय, की मॉमला या पुस्तकाबद्दल आपण आजतागायत कळू दिलेलं नाही. पण यावर तिचा स्वतःचाच विश्वास नाहीये, कारण ‘आईपासून काहीही लपून राहत नाही’ या धनश्रीच्या पूर्वापार चालत आलेल्या पालूपदाशी हे पूर्णतः विसंगत आहे. मग तिला जाणवलं, की आपल्याला या पुस्तकाबद्दल काहीही माहिती नाही असं मॉम आपल्याला केवळ दाखवत असणार...पिशवीतून नकळत बाहेर काढलं गेलेलं पुस्तक तिनं दोन्ही हातांत धरून कपाळावर आपटलं, एकदा जोरात, नंतर सावकाश. ते तसंच कपाळाशी ठेवून ती काही सेकंद डोळे मिटून नुसती असून राहिली. पुस्तक पुन्हा पिशवीत गेलं. पिशवीची घडी घातली गेली.

सामान लावण्याचं काम उरकत आलंय. या खोलीतून त्या खोलीत अनेकदा करून झालंय तिचं. दोन्ही खोल्यांची दारं काटकोनात आहेत. त्यामुळे तसं सोपं आहे ते. पण अशा शेजार-शेजारच्या दीड खोल्या ताब्यात मिळणं हे मात्र फार कठीण गेलं तिच्यासाठी. कठीण आणि वेळखाऊ सुध्दा. तब्बल सात वर्षं लागली तिला आपला निश्चय पूर्णत्त्वाला न्यायला.
‘व्हॉटस्‌-अ‍ॅप’वर मिहिकाचा मेसेज आला. तिला ‘brb' असं तात्पुरतं उत्तर देऊन, ती साडेतिनाव्या खोलीत शिरली. त्या खोलीत अंतर्गत सजावटीचं कुठलंही काम केलं गेलेलं नाही. जुन्या डायनिंग टेबल सेटमधल्या दोन खुर्च्या आणि एक जुनं छोटं कपाट - ती त्याला half cupboard म्हणते - इतकंच फर्निचर आहे तिथं, बस्स; आणि एक कपडे वाळत घालायचा जुना स्टॅण्डही आहे. स्टॅण्डवरच्या ‘गर्ली थिंग्ज्‌’वर आजकाल ती टॉवेल टाकत नाही.
सात वर्षांपूर्वी, म्हणजे आठवीत असताना तिनं वाळत घातलेल्या अंतर्वस्त्रांवर टॉवेल टाकण्याच्या घरातल्या पध्दतीबद्दल प्रथम तीव्र आक्षेप नोंदवला होता; ती पध्दत सुरूवातीपासूनच तिला अगदी नापसंत होती. तिच्या आक्षेपावर तिची आजी आणि धनश्री, दोघींनीही तिच्याकडे असे काही डोळे वटारून पाहिलं होतं, की बस्स. त्यांच्या नजरांनी तिला काहीतरी निराळीच जाणीव करून दिली होती. "फक्‍त माझ्यावरच का ही जबरदस्ती? वैभवला सुध्दा सांगा," या तिच्या प्रतिवादाकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आलेलं होतं. तिथंच तिचा निश्चय पक्का झालेला होता, की एक ना एक दिवस ही टॉवेल-पध्दत मोडीत काढायचीच. ही साडेतिनावी खोली म्हणजे त्याचाच परिपाक आहे. ‘परिपाक’ या शब्दाचा खराखुरा अर्थ काय आहे हे तिला नक्की ठाऊक नाही. पण तिनं स्वतःशीच ठरवून टाकलेलं आहे, की अशी एखादी खोली जेव्हा केव्हा आपल्याला मिळेल, तेव्हा आपल्याला मनात जे वाटेल त्यालाच ‘परिपाक’ असं म्हणत असणार.

Half cupboardमधला ‘स्टोअर-रूम’ असं लिहिलेला एक लंबुळका, आयताकृती कागद तिनं बाहेर काढला आणि त्या खोलीच्या दारावर बाहेरून चिकटवला. नवीन घर आणि इण्टिरियर पहायला संध्याकाळी चंदाच्या ऑफिसमधली काही माणसं येणार आहेत. त्यापूर्वी तात्पुरत्या स्वरूपात का होईना, पण हे एक काम केलं गेलंच पाहिजे असं चंदानं, आणि पर्यायानं धनश्रीनं, तिला ठणकावलेलं आहे.
आता उरलं शेवटचं एक छोटंसं काम, मॉमची एक विनंती, जी धुडकावणं तिला शक्य नाही. कारण मॉमनं पाठिंबा दिला नसता, तर आज ही साडेतिनावी खोली आपल्याला मिळाली नसती हे ती मनोमन ओळखून आहे.
ती साडेतिनाव्या खोलीतून बाहेर आली आणि धनश्री-चंदाच्या बेडरूममधे शिरली. आत शिरून इकडे-तिकडे जरा पाहिल्यावर कम्प्युटर-युनिटच्या खाली, मागे कोपर्‍यात, तिला ते बोचकं दिसलं, हिरव्या रंगाच्या साडीत बांधून ठेवलेलं.
तिनं खाली वाकून ते ओढलं. जड लागलं चांगलंच. "हे बोचकं आहे?" तिनं हातानं ते चाचपलं. तिच्या भुवया उचलल्या गेल्या. तिनं आतुरतेनं साडीची गाठ सोडली आणि आतली वस्तू पाहून ती हरखूनच गेली. हातांची दहाही बोटं तोंडापाशी नेत ती नुसती समोर पाहत राहिली.
तिनं न राहवून त्या हार्मोनियमच्या काळ्या-पांढर्‍या पट्ट्यांवरून हात फिरवला, भात्याची पिन काढली, पुढचे चार नॉब्ज्‌ ओढले - काय बरं म्हणतात या नॉब्ज्‌ना? विसरले. मॉमला विचारायला पाहिजे - उजव्या हातानं भाता मध्यातच कसातरी पकडून अर्धवट हलवला आणि डाव्या हाताच्या ताणलेल्या तर्जनीनं एक काळी पट्टी हलकेच दाबली. धूळ बसली होती सगळ्यावर. तरीही एक अस्पष्ट सूर उमटला. मग तिनं अंगठ्यानं शेजारची पांढरी पट्टी दाबली. अजून एक सूर उमटला; मग तिच्या शेजारची अजून एक पांढरी पट्टी, "शेजार-शेजारी असला, तरी किंचित निराळा असतो तो, नीट ऐक," धनश्रीचा जुना कुठलातरी सूर तिच्या कानात घुमला. पुन्हा अजून एक काळी पट्टी, मग तिच्या शेजारची पांढरी, मग काळी आणि पांढरी एकत्र, पाच-सहा निरनिराळे सूर, एका मागोमाग एक उमटले. काही स्वतंत्र, काही मिसळलेले. मधेच एखाद्या पट्टीची निःशब्द पोकळी. तिनं वरची कोरीव काम केलेली आडवी लाकडी पट्टी उचलली. तिथं अधूनमधून घालाव्या लागणार्‍या कागदाच्या इवलाल्या जाडजूड घड्या. मॉमला त्या घड्या करून द्यायला ती मदत करायची. त्यासाठी शाळेच्या वहीची कोरी पानं टराटरा फाडायची. त्यावरून मॉमचं बोलणं खायची...
पटकन काहीतरी जाणवून तिनं मागे वळून दाराकडे पाहिलं. घरात शांतता होती. तिनं घाईघाईत भाता बंद केला, चारही नॉब्ज्‌ आत ढकलले. ढकलताना ते अडकले, तिला जोर लावावा लागला. बोचक्याची गाठ तिनं पुन्हा बांधून टाकली, ते उचलून साडेतिनाव्या खोलीत आणून ठेवलं आणि खोलीचं दार ओढून घेतलं.
परत आपल्या खोलीत येऊन मिहिकाचा मेसेज पुन्हा वाचला.
‘u comin 4 Pratik's prty 2nite?'
तिनं उत्तर लिहिलं - ‘cant se, wil talk 2 Mom n let u no by 6 pm'

<समाप्त>

--------------------

'मिळून सार्‍याजणी'च्या जानेवारी-२०१४च्या अंकात प्रकाशित झालेली कथा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे कथा Happy छोट्या छोट्या घटनांमधून (घटना अश्या नाहीतच...रुटीनमधलंच काहीतरी) पात्रांच्या मनातील त्या त्या वेळच्या विचारांची ट्रान्झिशन्स खूप छान दाखवली आहेस. शेवटच्या हार्मोनियमच्या पॅरामध्ये आणि मेसेजच्या उत्तरात तर जास्तच.

ललिता-प्रीति....

आधुनिक जगाला व्यापून टाकलेल्या मोबाईल युगाने घरात असा काही प्रवेश केला आहे की आजुबाजूला प्रत्यक्ष रक्ताची नाती असतानासुद्धा कथेतील पात्रांना ओढ आहे ती congo...c'mom...brb.... gtg...च्या धुमाकळीवर....

...आणि अशा वातावरणात बुडून गेलेल्या मुलीला ज्यावेळी तो बोचक्यात बांधलेला हार्मोनियम दिसतो...दिसत्ये तिच्या शेजारची पांढरी, मग काळी आणि पांढरी एकत्र, पाच-सहा निरनिराळे सूर, एका मागोमाग एक उमटतात. काही स्वतंत्र, काही मिसळलेले. मधेच एखाद्या पट्टीची निःशब्द पोकळी....आता तिला जाणीव होत आहे की इथेच काहीतरी आपुलकीचे आहेच आहे.....

उत्तर देते मैत्रिणीला..... cant se.... हे विलक्षण सुंदर उतरले आहे....या दीर्घ कथेचे सार तिथे आहे. शेवटच्या त्या एका इंग्रजी वाक्याने सारे काही प्रसन्न करून टाकले.

मस्त ! आवडली . शेवटचा para मस्त जमलाय .

<<<< छोट्या छोट्या घटनांमधून (घटना अश्या नाहीतच...रुटीनमधलंच काहीतरी) पात्रांच्या मनातील त्या त्या वेळच्या विचारांची ट्रान्झिशन्स खूप छान दाखवली आहेस.>>>>+100

मस्त

कथाबीज खूप आवडलं. धनश्री त्या बोचक्याविषयी विचार करते तेव्हा त्यात काय असेल याचा अंदाज आला आणि शीर्षकाचा पण उलगडा झाला मात्र मुलीनं वेगळ्या खोलीची मागणी ज्या कारणासाठी केली तो 'सर्प्राइज एलेमेंट' होता.

ऐश्वर्या टिपिकल टीनएजर वाटते पण नंतर आलेला दहावीतली न बसणारी जीन्स उल्लेख आणि आठवी यत्तेबद्दलचे उल्लेख वाचून ती विशीतली तरी असावी असा माझा हिशेब. त्यामानाने तिचं बोलणं-वागणं विसंगत किंवा अमॅचुअर वाटलं.

थर्ड पर्सन नरेशन आणि बारीकसारीक तपशील ही तुझी शैली, यात कथेतपण दिसली. थोडे वेगळे प्रयोग केलेले वाचायला आवडतील Happy

रच्याकने, धनश्री, वैभव, ऐश्वर्या एवढी संपन्न नावं असलेल्यांचं आडनाव फाटक Wink

सिंडरेलाच्या जवळजवळ पूर्ण पोस्टला +१

पण ऐश्वर्या ११-१२ वीतली वाटली ..

>> पावणेतीन-इण्टू-टू-रेज्ड-टू-एन्‌ आठ्या!

>> साडेतीनावी खोली

हे वाक्यप्रयोग थोडे मिस्फिट वाटले ..

कथा समकालीन वास्तव मांडणारी ..छानच जमून आलीय.
लेखिकेला नव्या जनरेशनची नस त्यांची जीवनशैली जशीच्या तशी गवसलीय

अफाट जमलीये कथा, ललिता.
तीव्र-कोमल... फार फार आवडली.
साडेतीनावी खोली.. हिरवं बोचकं... सांडलेल्या सूरांनी कुठेतरी जोडलेली तार कशी सुरेख उतरलीये शेवटच्या परिच्छेदात.
जियो... जियो, लले.

कथा खूप आवडली. विषेश म्हणजे ते शॉर्ट्फॉर्म इंग्लिश.
मला बी आर बी म्हणजे काय ते कळायला बराच वेळ लागला होता. अजूनही कितीही घाई असली तरी स्पेलिंगचे शॉर्ट्कट टाळते व्हॉट्सअ‍ॅप वर किंवा एस एम एस वर. वाय ओ यु चा नुसता यु मात्र बरेचदा होतो.

सु प र्ब !!!

आदित्यची शिकवणी लावली होतीस की काय अशी शंका यावी इतकी अचूक पकडली आहेस नविन पिढीची भाषा. शेवट तर अफलातून!

शिर्षक एकदम apt आहे.

अशा कथेला प्रतिसाद देता येणे ह्यात मायबोलीच्या सदस्य असण्याची सार्थकता आहे! Made my day!
खूप दिवसांनी इतकी सुरेख कथा वाचली आहे! धमाल आली वाचायला..पुन्हा वाचली की अजून गमती सापडतील हे नक्की!

छान रंगली आ हे कथा. टीन एजर्स आणि त्यांचे आईवडील यांच्यात कायम चाललेली द्वंद्व पटतात आणि त्यामुळे जास्तच प्रभावी होतात.

खूप आवडली.... बर्‍याच दिवसांनी इतकी मोठी कथा वाचायला घेतली आणि वाचून संपवली.... सलग वाचण्यात मजा आहे...

सध्याच्या पीढीची अचूक नस सापडली आहे...
>>> +१

Pages