डोसे प्रकार

Submitted by आरती. on 17 April, 2015 - 04:42
masala-dosa
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. पेपर डोसा / साधा डोसा
डोसा राईस / कोणताही जाड तांदूळ - ४ वाटी
उडीद डाळ - १/२ वाटी
पोहे - १/२ वाटी
मेथी दाणे - १ टी स्पून
प्रत्येक डोश्याच्या जिन्नसमध्ये जो तांदूळ दिला आहे तोच वापरून वेगवेगळ्या चवीचे डोसे चाखा. Happy प्रत्येक प्रकारच्या डोश्याची एक वेगळी चव आहे.

मसाला डोसा ची बटाट्याची भाजी

फोडणीत उभा चिरलेला कांदा, राई, चणाडाळ, उडिद डाळ. हि. मि. कढीपत्ता, घालून डाळींचा रंग लालसर झाला की त्यात थोडी हळद घालायची त्यात २ टे. स्पून पाणी घालून थोड उकळू देऊन मग त्यात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, चवीनुसार मीठ घाला आणि ढवळून घ्या. पाणी आटत आल की त्यात ओल खोबर आणि कोथिंबीर घाला.

२. सेट डोसा / स्पंज डोसा / आंबोळ्या / पोळ्ये

डोसा राईस - २ वाटी
उकडा तांदूळ (लाल, पिवळा किंवा ईडली राईस) - २ वाटी
उडीद डाळ - १/२ वाटी
पोहे - १/२ वाटी
मेथी दाणे - १ टी स्पून
P26-05-13_06.31[1].jpgP26-05-13_06.32[1].jpg

३. दावणगिरी डोसा
उकडा तांदूळ (लाल, पिवळा किंवा ईडली राईस) - ४ वाटी
उडीद डाळ - १/२ वाटी
पोहे - १/२ वाटी
साबुदाणा - १/२ वाटी
चणा डाळ - १/४ वाटी
मेथी दाणे - १ टी स्पून

४ - थंडीतील सेट डोसा हा थोडा कडवड लागतो. Happy
डोसा राईस - २ वाटी
उकडा तांदूळ (लाल, पिवळा किंवा ईडली राईस) - २ वाटी
उडीद डाळ - १/२ वाटी
पोहे - १/२ वाटी
मेथी दाणे - १/४ वाटी
हळद - २ टी. स्पून
kadu dosa.jpg

५ - सेट डोसा (अजून एक प्रकार)
डोसा राईस - २ वाटी
उकडा तांदूळ (लाल, पिवळा किंवा ईडली राईस) - २ वाटी
उडीद डाळ - १/२ वाटी
पोहे - १/२ वाटी
मेथी दाणे - १ टि. स्पून
चणा डाळ / चटणी डाळ - १/४ वाटी
मुगाची डाळ - १/४ वाटी

६ - नाचणी डोसा
नाचणीच पीठ - ४ वाटी
उडदाची डाळ - १/४ वाटी
मेथी - १/४ टी स्पून
पोहे - १/२ वाटी

७- नीर डोसा,

जूना कोणताही तांदूळ - ४ वाटी ( नविन तांदूळाचा थोडा सांभाळून करावा लागतो पण चविष्ट होतात म्हणून ही टीप. Happy
ओल खोबर - २ टे. स्पून
साखर - १ टी. स्पून
मीठ - चवीनुसार
neer dosa.jpg

८. मूग डोसा (पेसाराट्टू)
मूग - २ वाटी
बेडगी मिरची - ४-५
काळी मिरी - ७-८
आल - १/२ इंच
मीठ - चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

१. सकाळी तांदूळ व मेथी एकत्र भिजत घाला. उडिद डाळ वेगळी भिजत घाला. साबुदाणे थोडे जास्त पाणी घालून भिजत घाला. संध्याकाळी वाटायच्या १५ मि.अगोदर पोहे भिजत घाला. चण्याची डाळ/ चटणी डाळ/ मूगाची डाळ ही तांदूळाबरोबर भिजत घाला.

२. ग्राइंडर किंवा मिक्सरमध्ये तांदूळ + मेथी दाणे + पोहे + चण्याची डाळ/ चटणी डाळ/ मूगाची डाळ / साबुदाणे एकत्र बारीक वाटून घ्या. उडदाची डाळ कमीत कमी पाणी घालून बारीक वाटून घ्या.

३. एका डब्यात मिश्रण ओतून घ्या. त्यात चवीपुरते मीठ घाला. चमच्याने मिश्रण एकाच दिशेने फेटा. १ टे. स्पून कच्चे तेल मिश्रणावर चमच्याने घाला आणि डब्याला झाकण लावून ठेवा.

४. सकाळी मिश्रण फुगून वर येईल. चमच्याने एकाच दिशेने ढवळून घ्या.

५. बीडाचा तवा तेल लावून गरम करून घ्या. चमच्याने मिश्रण तव्यावर घालून डोसे काढा.

नाचणीच्या डोश्यासाठी

सकाळी उडीद डाळ आणि मेथी वेगवेगळ भिजत घाला. संध्याकाळी दोन्ही एकत्र बारीक वाटून घ्या.
त्यात नाचणीच पीठ, चवीपुरत मीठ, थोड पाणी घालन एकाच दिशेने ढवळून पीठ आंबवायला ठेवा.
सकाळी पेपर डोसे काढा. ह्याचे सेट डोसे मला नाही आवडत. हा डोसा गरम खायला जास्त चांगला लागतो.

नीर डोसा

रात्री तांदूळ भिजत घाला. सकाळी तांदूळ, ओल खोबर, साखर घालून मिक्सरवर वाटून घ्या. एका भांड्यात हे मिश्रण काढून घ्या आणि त्यात चवीप्रमाणे मीठ आणि पाणी घाला. हे मिश्रण पातळ हव.

बिडाच्या तव्याला तेल लावून तापवून घ्या. गॅसची फ्लेम मोठीच ठेवा. मिश्रण तव्यावर ओता आणि लगेच फ्लेम स्लो करा. मंदाग्नीवर हा डोसा करतात. हव तर दुसर्‍या बाजूने एक सेंकंद भाजा. हे डोसे जाळीदार आणि पांढरे शुभ्र होतात. प्रत्येक वेळी डोसा घालताना फ्लेम मोठी हवी. घालून झाल्यावर फ्लेम स्लो करा.

मूग डाळ डोसा

मूगाची डाळ रात्री भिजत घाला. सकाळी डाळ, बेडगी मिरची, काळी मिरी, आल घालून वाटून घ्या. चवीनुसार मीठ घालून लगेच डोसे करा.

डोश्याच्या पीठाचे अजून काही प्रकार

पेपर डोशाच पीठ तव्यावर पसरवल की लगेच त्यावर थोड जिर आणी उभा बारीक चिरलेला कांदा स्प्रिकंल करा. थोड तेल घालून जिर आणि कांदा दाबून घ्या. डोसा फोल्ड करून खायला घ्या. उन्हाळ्यात हा डोसा बनवला जातो. क्रिस्पी जिर कांद्याचा डोसा यम्मी लागतो. नुसता किंवा चटणीबरोबर. Happy

सेट डोशाच पीठ तव्यावर पसरवून त्यावर कच्च अंड फोडून घालून त्यावर मीठ , काळीमिरी पूड, कोथिंबीर, हि. मि. बारीक कापून स्प्रिकंल करतात आणि दोन्ही बाजूने खरपूस भाजतात.

वाढणी/प्रमाण: 
खाल तेवढे
अधिक टिपा: 

१. डोसा राईस आणि ईडली राईस मॉलमध्ये सहज उपलब्ध आहेत. केरला स्टोअर्समध्ये फक्त ईडली राईस मिळतो.
२. पीठात कच्चे तेल घातल्यावर पुन्हा ढवळू नये.
३. पीठ आंबल्यावर त्यात पाणी घालू नये त्याने डोसे नीट होत नाहीत. जी काही कंन्सिस्टंसी पीठाची करायची असेल ती डाळ तांदूळ वाटल्यावर लगेच करावी.

मूगाचा डोसा
उपवासाला चालतो. रोजच्यासाठी बनवायचा असेल तर डोसा तव्यावर पसरवल्यावर त्यावर कांदा बारीक चिरून स्प्रिंकल करा.

क्रिस्पी पेपर डोश्यासाठी टिप्स
तवा व्यवस्थित तापवून घ्या. गॅस मिडीयम फेल्मवर ठेवा. रुमाल मीठाच्या पाण्यात किंवा साध्या पाण्यात बुडवून तापलेला तव्यावर ओला रूमालने पुसून घ्या. त्यावर चमच्याने मधोमध पीठ घालून संपूर्ण तव्यावर पसरवा. एक टिस्पून तेल / बटर / घी डोश्याच्या वरच्या बाजूला सगळीकडे लागेल अस शिंपडा आणि पसरवून घ्या

सेट डोसा, दावणगिरी डोसा बनवताना प्रत्येक वेळेस तव्याला तेल /बटर/ तूप लावून मग त्यावर पीठ घालून तुम्हाला हव्या त्या जाडीचा डोसा पसरवा.

सेट / दावणगिरी डोसे प्रवासासाठी उपयुक्त. २-३ दिवस सहज टिकतात. सॉफ्टही राहतात.
प्रवासासाठि नेताना हे डोसे थंड करून डब्यात भरायचे. त्याला अजिबात वाफ सुटायला नको तसेच पाण्याचा हात लावू नका.

माहितीचा स्रोत: 
आई आणि अम्मा
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाडा लोखंडी तवा हवाच ह्या डोशासाठी <<< बी, बीडाचाच तवा हवा वर फोटोत आहे तो.
ईडली राईस म्हणजे उकडा तांदुळ का??<<< सुखदा ८, हो उकडा तांदूळ पण थोडा वेगळा असतो. पांढरा शुभ्र आणि थोडा बुटका उ. तां. असतो आणि धन्स.

जयु, मानुषी काकू, सहेली धन्स

आरती, मस्त धागा!
मंजूडी, इथल्या इं.ग्रो. त सोना मसुरी मिळतो. मी साध्या पांढर्‍या भातासाठी/मसालेभातासाठी वापरते. डोसे करायलाही तोच वापरत होते पण तोच डोसा राइस हे माहित नव्हते. Happy

डोसा राईस म्हणजे सोनामसुरी असं मी म्हणतेय Happy
कारण बर्‍याच साइ कलिग डोसा/ उत्तप्प्यासाठी हाच तांदूळ वापरतात. आणि इडलीसाठी उकडा तांदूळ.

आरतीला नक्की काय ते विचारा.

आरती, एवढ्या प्रमाणात किती डोसे होतात ते पण लिहिणार का प्लीज. ( अर्थातच अंदाजाने. उन्नीस बीस चलेगा )

सेट दोस्याला मी नेहमीचेच प्रमाण घेते फक्त पिठ थोडे पातळ ठेवते, जेणेकरुन त्याचा तोच तव्यावर सेट होतो Happy
पिठ तव्यावर टाकल्यावर एकद फक्त उलटा डाव त्यावर टेकवला तरी दोसा मस्त गोल होतो.
१ वाटी तांदळाला, १/२ वाटी उडदाची डाळ आणि (फक्त हिवाळ्यात) १/२ चमचा मेथी दाणे.

मंजूडी, मीसुद्धा कंन्फ्यूज झाली होती म्हणून आईला विचारल. तिने सांगितल पेपर डोश्यासाठी कोणताही जाडा तांदूळ चालेल, रेशनींगवर मिळणारासुद्धा चालेल. सेट डोसा आणि दावणगिरी डोश्यासाठी उकडा तांदूळ (लाल, पिवळा किंवा ईडली राईस) हवा. इति आई. Happy वरती अपडेट करते.

सोनामसुरी (आंध्रप्रदेश) आणि डोसा राईस (कर्नाटक) ही तांदूळांची नाव आहेत. हे कच्चा तांदूळ (रॉ राईस) आहेत. न.मुं.त पटणी तांदूळ मिळतो तो आई पेपर डोश्यासाठी वापरते. आज बींच्या प्रश्नामूळे बरीच माहिती गोळा केली. धन्यवाद बी. Happy

दिनेशदा छोट्या वाटीच्या प्रमाणात अंदाजे १५ -२० सेट डोसे होतील.

अल्पना, पहिली दिल्ली -नुवार्क डायरेक्ट फ्लाइट पकडून निवार्कला उतरलीस की तडक टॅक्सी जवळच्या पटेलमध्ये घालायची तिकडे तुला बासमती पासून कोळंबा राइसपर्यंत जो पायजेल तो राइस घ्यायचा. झालंच तर एखाद्या टिपापाकरणीकडे चा बी मारायचा आणि परत संध्याकाळच्या फ्लाइटने घरी. मग कर हवे तेव्हा, हवे ते डोसे.
Light 1

सॉरी अगदीच राहावलं नाही सुरुवातीचे प्रतिसाद पाहून Wink

आरती, सगळ्या प्रकारचे दोसे एकाच ठिकाणी आणल्याबद्दल धन्यवाद. घरच्या दोसा एक्सपर्टबरोबर बोलणी सुरू केली जातील .

झालंच तर एखाद्या टिपापाकरणीकडे चा बी मारायचा आणि परत संध्याकाळच्या फ्लाइटने घरी. मग कर हवे तेव्हा, हवे ते डोसे. >> नको नको हां . जरा आधी कळव, आयामला पण आण . मस्त डोसे गटग करु ( कोकणीत 'डोसे पसरवणे' हा बाता मारणे चा युफिमिझ्म आहेच ) . मग जाताना जितकं लगेज अलाउड असेल त्यातलं अर्धं तांदळासाठी अन उरलेलं आयामच्या पुस्तकांसाठी Happy

उद्या शनिवार! म्हणजे माझा मसाला डोसा खायचा दिवस.. आणि आज हा धागा..
एक्स्ट्रा वर्क करायला ऑफिसला जाणार, आईला डब्बा बनवायचा त्रास देणार नाही, आणि मसाला डोसा खाऊन येणार .. हॉटेलातले सारे पदार्थ एक तरफ आणि मसाला डोसा एक तरफ .. त्याची पिल्लावळ म्हणजे सेट डोसा, नीर डोसा, मूंग डोसा, उतप्पा, घावणं वगैरे वगैरे सारेच आवडीचे Happy

आरती छान कलेक्शन. मी सेट डोसा करून पाहिन तुझ्या रेसीपीने.
तांदळाचा इतका विचार का करताय? इथे माझी रेसीपी आहे.
मी जो घरी असेल तो तांदुळ वापरते. कारण इथे मला सोना मसुरी किंवा बासमती शिवाय चॉईस नाही.
http://www.maayboli.com/node/24512

ए आरती
वरती मुळ पाक क्रियेत

५ - सेट डोसा
डोसा राईस - २ वाटी
उकडा तांदूळ (लाल, पिवळा किंवा ईडली राईस) - २ वाटी
उडीद डाळ - १/२ वाटी
पोहे - १/२ वाटी
मेथी दाणे - १ टि. स्पून
चणा डाळ / चटणी डाळ - १/४ वाटी
मुगाची डाळ - १/४ वाटी

आणि नंतर

सेट दोस्याला मी नेहमीचेच प्रमाण घेते फक्त पिठ थोडे पातळ ठेवते, जेणेकरुन त्याचा तोच तव्यावर सेट होतो स्मित
पिठ तव्यावर टाकल्यावर एकद फक्त उलटा डाव त्यावर टेकवला तरी दोसा मस्त गोल होतो.
१ वाटी तांदळाला, १/२ वाटी उडदाची डाळ आणि (फक्त हिवाळ्यात) १/२ चमचा मेथी दाणे.

नक्की प्रमाण घेवू

मृणाल १ , ह्या दोन्ही आरत्या वेगळ्या आहेत. एक मुळ दोसेवाली आरती. आणि दूसरी आरती जीने सफ़ेद ढोकला रेसिपी दिलीय

गावी इंद्रायणी तान्दळाचे मोदक खाऊन आले. इतके मऊ, लुसलुशीत , दुसर्या दिवशी सुद्धा तसेच मऊ.
येताना ५ किलो घेउन आले. आता तोच तांदुल वापरून दोसे करते. भिजत घालते आजच.

साधना, मी हेच लिहायला आले होते ती आरती मी नाही म्हणून. Happy
आरती, सीमा पेपर डोसाला कोणताही तांदूळ चालतो पण सेट डोसा आणि दावणगिरीला उकडाच तांदूळ वापरतात. डोशाच पीठ पातळ नसत ते चमच्याने बिडाच्या तव्यावर पसरवतात . आमच्याकडे तुरीची डाळ नाही वापरत पेपर डोसासाठी. आम्ही नॉनस्टीक किंवा लोखंडी तव्यातही नाही बनवत.

वर लिखाणात मी ज्या डोश्याच्या आणि ईडलीच्या रेसिपीज दिल्या आहेत त्या आमच्या पारंपारीक कर्नाटकी रेसिपीजच प्रमाण आहे.

पेपर डोसा, सेट डोसा, दावणगिरी डोसा, नीर डोसा ह्या प्रत्येकाची चव वेगळी असते. Happy

धन्यवाद सर्वांना.

सोना मसूरी म्हणजे घरकी मुर्गी दाल बराबर तांदूळ आहे. हैद्राबादेत कायम तोच वापरला आहे. स्टॉल वाले रेशनचा जाडा तांदूळ वापरतात दोशासाठी. मऊ उपमा करून दोसा तव्यावर असताना एक डाव त्यावर घालायचा व दोसा दोन्ही बाजोन त्यावर बंद करायचा. ( मसाला दोश्या त कशी भाजी असते तसे) म्हणजे झाला एम एल ए दोशा.

चिरंजीवी फेम स्टीम्ड दोशा पण हैद्राबादेतील चटणीज रेस्ट. मध्ये मिळतो. लो कॅलरी.

वर लिखाणात मी ज्या डोश्याच्या आणि ईडलीच्या रेसिपीज दिल्या आहेत त्या आमच्या पारंपारीक कर्नाटकी रेसिपीजच प्रमाण आहे. >> ओक्के. तसेही हे सगळे आवडते प्रकार आहेत, त्यामुळे तुझ्या कृतीने करुन बघेन नक्की.

आरती आम्ही ईडलीसाठी डाळ तांदुळ प्रमाण १-२ व दोश्याला१-४ असे घेतो. तुमच्या प्रमाणात डाळ कमी आहे तर ईडली मउ होतेका? कोरडी होत नाही ना? तसच सेट दोसा साठी पीठ दोश्याच्या पीठापेक्शा पातळ ठेवावे लागतेका? सेट दोसाहा प्रकार खुप आवडतो पण कधी केला नाही.

अगदी अगदी आशिका!
माझ्या साबा ज्या प्रमाणाने डोसा बनवतात तो डोसा थोडा गार होत आला की वातड लागतो. हॉटेलसारखा moist crispy नाही होत. Sad

आरती आम्ही ईडलीसाठी डाळ तांदुळ प्रमाण १-२ व दोश्याला१-४ असे घेतो. तुमच्या प्रमाणात डाळ कमी आहे तर ईडली मउ होतेका? कोरडी होत नाही ना? तसच सेट दोसा साठी पीठ दोश्याच्या पीठापेक्शा पातळ ठेवावे लागतेका? सेट दोसाहा प्रकार खुप आवडतो पण कधी केला नाही.

इडली राईस म्हणून जो तांदूळ मिळतो तो नक्की कोणता तांदूळ असतो? फुगीर, बुटका व पांढरा दिसतो तो. मॉल मधे पण "इडली राईस" म्हणूनच मिळतो पण वाण्याकडे नाही मिळत. अमेरिकेतही "इडली राईस" म्हणूनच मिळाला होता.

तुमच्या प्रमाणात डाळ कमी आहे तर ईडली मउ होतेका? <<<< सुभाषिणी, हो एकदम स्पाँजी होते आणि पांढरी शुभ्र. ईडली राईस शिवाय दुसर्‍या कोणत्याही तांदूळाची ईडली आम्ही नाही बनवत. प्रमाण जे वर दिल आहे तेच.

सेट दोसा साठी पीठ दोश्याच्या पीठापेक्शा पातळ ठेवावे लागतेका? नाही. सेम डोश्याच्या पीठासारख. पण तव्यावर घालतल्यावर थोड जाड पसरवतात जस वरच्या फोटोमध्ये आहे तस.

हॉटेलसारखा क्रिस्पी डोसा बनवण्यासाठी टीप्स दे ना प्लीज <<<< आशिका, सारीका वरती टीप्समध्ये अ‍ॅड करते.

धन्यवाद सर्वांना.

Pages