विपूतल्या पाककृती ५ : कणकेचा शिरा

Submitted by तृप्ती आवटी on 11 March, 2015 - 22:01
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

_१ वाटी रवाळ कणीक
_लिपिड प्रोफाइल बघून पाव ते अर्धी वाटी साजुक तूप
_१ वाटी फुल फॅट गरम दूध + शिपके मारून शिजवायला लागेल तसं
_वेलदोडा पावडर
_पाव वाटी खडबडीत बदाम पावडर
_अर्धी वाटी किसलेला गूळ

क्रमवार पाककृती: 

- जाड बुडाच्या कढईत कणीक आधी कोरडीच, मंद आचेवर भाजायला घ्यायची.
- टीपाप्यात चार पोस्टी टाकायच्या. सटरफटर बाफं वाचायचे. अधेमधे कणकेला ढवळत रहायचं. चांगली अर्धा तास भाजून झाली की आता थोडं थोडं तूप ओतून भाजायची.
- सगळं तूप ओतून झाल्यावर कणीक कोरडी दिसायला नको. तशी दिसली तर (लि.प्रो. नुसार) चमचाभर तूप घालायचं.
- कढत दूध थोडं थोडं ओतून कणीक फुलवायची. सगळं भस्सकन ओतलं तर एक विचित्र गोळा तयार होईल आणि त्याचा गाभा गुळाचा अनुल्लेख करेल.
- झाकण ठेवून शिजू द्यायची.
- गूळ, वेलदोडा पावडर घालून परतायचं.
- गूळ वितळून लगदा होईल. पण धीर न सोडता लगदा परतायचा, त्यात बदामपूड घालायची.
- लापशीछाप आवडत असेल तर आत्ताच खायला घ्यायचा. नाहीतर थोडा आणखी परतायचा.

photo_0.JPG

वाढणी/प्रमाण: 
इतर मेन्युसोबत गोड पदार्थ म्हणून असेल तर ३-४
अधिक टिपा: 

_सुजाता मल्टिग्रेन कणीक किंवा लाडवांसाठी जरा जाडसर कणीक मिळते ती चालेल.
_अर्धी वाटी गूळ घालून बेताचा गोड शिरा होतो. आणखी कमी गोड हवा असल्यास अर्थातच गुळाचं प्रमाण कमी करावं.
_गुळाऐवजी रॉ ब्राउन शुगर चालेल.
_वेलदोड्याच्या जोडीनं जायफळ किसून घातलं तरी चांगलं लागेल.
_पानात वाढायच्या कमीत कमी तासभर आधी तरी शिरा तयार असावा. मुरला की जास्त छान लागतो. शिर्‍यांच्या अलिखित नियमानुसार दुसर्‍या दिवशी तर फारच छान लागतो.

माहितीचा स्रोत: 
मृण्मयी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'शारदाबेन'च्या हातचा इतका खाल्ला की आजतागायत त्याच नाव काढल नाही. Happy

या पद्धतीने एकदा करुन बघायला हवा.

रेसिपी आल्या दिवशी मी करुन पाहण्याचा विक्रम या रेसिपीच्या नावे झाला आहे. शिरा मस्त झालाय. कनक गूळ पाऊण वाटी घातला. सिंडी अन मृणला धन्यवाद.

सुंदर!!! करता येणार नाही कारण टीपापात पोष्टी टाकत नाही. मग कच्चाच होऊन जाईल नाहीतर गोळा... Happy

आई नेहमी भाजलेल्या गव्हाच पीठ पाठविते. लाडु करावेत म्हणुन.(लाडु पण पाठविते. पण हे मी परत करेन म्हणुन) खास दळुन आणलेल असत ते. त्याचा करून पाहिन हा शिरा.

तृप्ती आवटी बाई , फोटो जबरी आहे.

'शारदाबेन'च्या हातचा इतका खाल्ला >>> हां? मग आम्हाला होम डिलिवरी नाही आली ते? Wink

संपदा, भारी दिसतोय शिरा. असा छान केशरी रंग कशानं आला?

नताशा, लगे रहो Happy

सुनिधी, चार मैत्रिणींची विचारपूर कर की मग Happy

मस्तच!
पण तूप घालून कणीक भाजली तर नाही का चालत? जळण्याचे कमी चान्सेस.
आणि चवपण छान येते ना तूपावर खमंग भाजण्यानी.

छान दिसतोय :).
कंटाळा वाल्यांनी आसपासच्या गुरुद्वारात जाऊन खावा, बरोबर पोट्भर जेवणही फ्री !
बे एरीया वाल्यांनी फ्रिमाँट किंवा सॅन होजे गुरुद्वारामधे ट्राय करा.

पाककृती इथे दिल्याबद्दल सिंडीचे आभार!

मंजूडीनं (विपुतपाकृलिहिल्याबद्दलचकारशब्दहीनबोलताथेट) प्रतिक्रिया दिली, म्हणून तिचेही आभार! Proud

संपदा, फोटोत शिरा सही दिस्तोय.

>>पण तूप घालून कणीक भाजली तर नाही का चालत? जळण्याचे कमी चान्सेस.
राखी, जाड बुडाच्या कढईत, मंद आचेवर भाजली तर कणीक जळणार नाही. आधी कोरडी भाजून घेऊन मग तूप घातल्यावर चवीत जाणवण्याइतका फरक पडतो. शिरा जास्त खमंग लागतो.

हो सिंड्रेला. आता कोणाच्या विपुत मी काही लिहिले की समजा मी हा शिरा करायला घेतलाय. Happy ... बहुतेक उद्या नंबर लागेल याचा... यम्म!!!

मंजूडीनं (विपुतपाकृलिहिल्याबद्दलचकारशब्दहीनबोलताथेट) प्रतिक्रिया दिली,>>> हे मी 'मंजूडीनं बोथट प्रतिक्रिया दिली' असं वाचलं Proud

खरंतर या पाकृची विपू मी वाचली नव्हती, थेट पाकृच वाचली म्हणून चक्कार शब्दही काढला नाही बरं का Wink

कोणतंही पीठ (लाडूसाठीसुद्धा) भाजताना अगोदर थोडा वेळ कोरडं भाजून मग तूप घातलं तर जास्त चांगलं भाजलं जातं नि खमंग होतं. आधीच तूप घातलं की भाजायला जड जातं.

बरं आता प्रश्न! रवाळ कणीक नाहिये. इतक्यात रवाळ दळण घ्यायची शक्यता कमी आहे. तर साध्या कणकेचा करू का? जरा जास्त पेशन्सनी भाजली कणीक, तर गिच्चगोळा होणार नाही अशी आशा करावी का?

आई असाच करते! 'मन लावून' किंवा 'चित्त भाजण्यात ठेवुन' कणीक भाजल्यास हा शिरा मस्त होतो!
दोन्ही फोटो कातिल! उद्या जाड कणीक शोधण्याचे काम मागे लागले!

रं आता प्रश्न! रवाळ कणीक नाहिये. इतक्यात रवाळ दळण घ्यायची शक्यता कमी आहे. तर साध्या कणकेचा करू का? जरा जास्त पेशन्सनी भाजली कणीक, तर गिच्चगोळा होणार नाही अशी आशा करावी का?

मनस्विनीनेही कणकेच्या शी-याची पाकृ दिली होती. त्यात रवाळ कणिक नसेल तर दोन चार चमचे रवा घालुन कणिक 'रवा'ळ करण्याची सुचना होती. इच्छुकांनी करुन पाहावे.

मीही अर्थात करुन पाहिनच. कणकेचा शीरा अतिशय आवडीचा प्रकार आहे. इथले फोटो अगदीच वाईट आहेत, बघुन बघुन हालत खराब होतेय.....

(हा प्रकार तुपात थबथबवुन करुन घालणारी व्यक्ती आता दुरदेशी निघुन गेल्यावर माझ्या हातुन तितके तुप पडेल का हा प्रश्न आहेच, तरीही...)

मनःस्विनीने दिलेली कृती काढली काय तिनं? मला तरी नाही सापडली.

बदामाची पूड पण अगदी वस्त्रगाळ न करता जरा खरबरीत केली तर कणिक आणि पूड मिळून coarse मिश्रण होइल.

त्यात रवाळ कणिक नसेल तर दोन चार चमचे रवा घालुन कणिक 'रवा'ळ करण्याची सुचना होती. इच्छुकांनी करुन पाहावे.>>> हं... आला हाही विचार एकदा मनात. पण मग संपूर्ण कणकेचा असा नाही ना होणार तो शिरा. बदामपूड भरड घ्यावी असं वाटतंय.

एकूणातच शिरा म्हणजे जीव की प्राण आहे मला.. रव्याचाही. त्यामुळे 'रवा'ळही करीन. बघू कायकाय घडतंय हातून! Wink

मी नॉर्मल कणकेचाच केलाय. रवाळ कणीक मिळेपर्यंत धीर कोणाला? Wink अतिशय शांतपणे आणि भरपूर भाजल्यास कणिक अजिबात गिच्चगोळा होत नाही.

संपदा, माझ्याकडे अन्नपूर्णा/पिल्सबरी सारखा आटा आहे त्याचा करू म्हणतेस?

अनु, कर साध्या कणकेचा, हरकत नाही. सिंडीने लिहिल्याप्रमाणे दूध थोडं थोडं घालायचं, मग शिरा मस्तच होतो :).

रवाळ कणिक नसल्याने जाड रवा मिक्सरवर वाटून हा शिरा सकाळी केला होता. बदाम घातले नसूनही अतिशय छान झाला होता. पाकक्रुतीबद्दल धन्यवाद.

माझ्याकडे 'आशिर्वाद' चे कणिक आहे (गॅस सबसिडीचा फॉर्म भरल्यावर भारतगॅसने फ्री दिलयं :डोमा:) त्याच्या पोळ्या चिवट झालेल्या. शिरा चांगला होईल का?

शेवटी न रहावुन घरी असलेल्या पिल्सबरी कणकेचाच केला. मी कोब्रा असल्याने थबथबेपर्यंत तुप घालण्याचे डेअरिंग झाले नाही. पण अप्रतिम झाला होता. मोकळा, मऊ तरी ही शिजलेला. गुळामुळे रंग ही सुंदर आला होता. फोटो नाही काढला मात्र. आता लवकरच होईल पुन्हा. तेव्हा फोटो काढीन .
मी लोखंडी कढईत केला होता. त्यामुळे ही जास्त चांगली चव आली असेल का?

Pages