विपूतल्या पाककृती ५ : कणकेचा शिरा

Submitted by तृप्ती आवटी on 11 March, 2015 - 22:01
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

_१ वाटी रवाळ कणीक
_लिपिड प्रोफाइल बघून पाव ते अर्धी वाटी साजुक तूप
_१ वाटी फुल फॅट गरम दूध + शिपके मारून शिजवायला लागेल तसं
_वेलदोडा पावडर
_पाव वाटी खडबडीत बदाम पावडर
_अर्धी वाटी किसलेला गूळ

क्रमवार पाककृती: 

- जाड बुडाच्या कढईत कणीक आधी कोरडीच, मंद आचेवर भाजायला घ्यायची.
- टीपाप्यात चार पोस्टी टाकायच्या. सटरफटर बाफं वाचायचे. अधेमधे कणकेला ढवळत रहायचं. चांगली अर्धा तास भाजून झाली की आता थोडं थोडं तूप ओतून भाजायची.
- सगळं तूप ओतून झाल्यावर कणीक कोरडी दिसायला नको. तशी दिसली तर (लि.प्रो. नुसार) चमचाभर तूप घालायचं.
- कढत दूध थोडं थोडं ओतून कणीक फुलवायची. सगळं भस्सकन ओतलं तर एक विचित्र गोळा तयार होईल आणि त्याचा गाभा गुळाचा अनुल्लेख करेल.
- झाकण ठेवून शिजू द्यायची.
- गूळ, वेलदोडा पावडर घालून परतायचं.
- गूळ वितळून लगदा होईल. पण धीर न सोडता लगदा परतायचा, त्यात बदामपूड घालायची.
- लापशीछाप आवडत असेल तर आत्ताच खायला घ्यायचा. नाहीतर थोडा आणखी परतायचा.

photo_0.JPG

वाढणी/प्रमाण: 
इतर मेन्युसोबत गोड पदार्थ म्हणून असेल तर ३-४
अधिक टिपा: 

_सुजाता मल्टिग्रेन कणीक किंवा लाडवांसाठी जरा जाडसर कणीक मिळते ती चालेल.
_अर्धी वाटी गूळ घालून बेताचा गोड शिरा होतो. आणखी कमी गोड हवा असल्यास अर्थातच गुळाचं प्रमाण कमी करावं.
_गुळाऐवजी रॉ ब्राउन शुगर चालेल.
_वेलदोड्याच्या जोडीनं जायफळ किसून घातलं तरी चांगलं लागेल.
_पानात वाढायच्या कमीत कमी तासभर आधी तरी शिरा तयार असावा. मुरला की जास्त छान लागतो. शिर्‍यांच्या अलिखित नियमानुसार दुसर्‍या दिवशी तर फारच छान लागतो.

माहितीचा स्रोत: 
मृण्मयी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साध्या कणकेचा एका वाटीचा करून पाहिला. मला मंद गॅसएवढा धीर नाही की कणीक लवकर भाजली जाते माहित नाही पण अर्धा तास वगैरे नाही लागला. मी याआधी कणकेचा शिरा खाल्ला पण नाही आहे सो करणे वगैरे दूर त्यामुळे जरा धाकधुक होती. पण स्टेप्स लिहिल्यात तशा फॉलो केल्या की होतो मेनली ते थोडंथोडं दूध घालायची कृती ब्येस्ट आहे.

माझ्याक्डे कोस्टकोचं almond meal असल्यामुळे ते संपवण्यासाठी देखील अशा रेसिपी मस्ट आहेत. Happy फक्त मी थोडं जास्त घातलं असं वाटतं कारण गोड कमी होता. घरातल्या छोट्या मंडळींनी कमी गोडाचा झाल्यामुळे बहुतेक पांढर्ञा शिर्ञाची आठवण काढली पण आजकाल त्यांना मध्ये मध्ये तु.क.ची सवय लावतेय नाहीतर गोडाचा अतिरेक करतील.

सो पाकृ साठी विपुकरीण आणि तृप्ती यांचे आभार्स.

केला, खाल्ला आणि छान झाला.... पण १ वाटी कणकेला पाऊण वाटी सा तू आणि दीड वाटी फूल क्रीम दूध वापरुनही शिरा कोरडा का झाला? माकाचु? कणीक नेहमीची वापरली होती. दोन चमचे भाजलेला रवा घातला होता.

वत्सला, सहीच. फोटो काढला असल्यास टाक की Happy

एवढं तूप आणि दूध घातल्यावर कोरडा नको व्हायला खरं तर.

रव्यामुळे असेल असं वाटतंय मला. रवा घातला तर आधी कढत पाणी घालून शिरा फुलवावा आणि मग दूध. आणि शेवटी अगदी चमचाभर तूप कढईच्या कडेने सोडायचं शिजल्यावर. ते घातलं की आणखी परतत बसायचं नाही.
मी अजून हा करून बघितला नाही, पण रव्याच्या शिर्‍याच्या अनुभवावरून अंदाज.

मी रव्याचा करते तेव्हा नेहमी पाउण कप दुध आणी पाव कप पाणी अस घेते, पाण्यामुळे मउसर होतो शिरा. रवाही निट फुलतो.
प्रसादाचा शिरा नुसत्या दुधाचा असतो तो नेहमीच मोकळा होतो माझा.

पण १ वाटी कणकेला पाऊण वाटी सा तू आणि दीड वाटी फूल क्रीम दूध वापरुनही शिरा कोरडा का झाला? माकाचु? कणीक नेहमीची वापरली होती. दोन चमचे भाजलेला रवा घातला होता<<<< माझं पण सेम असच झालं होता Sad

सिंडे, आत्ता मऊमोकळा गरमागरम शिरा खात पोस्ट लिहितेय.
मायबोलीवरच्या बाफांचा खरंच उपयोग होतो बरं का, आपोआपच छान वेळ घेऊन, संयम ठेवून कणिक परतली जाते Wink
कनक गूळ पावडर वापरली. मला अजिबात कॉन्फिडन्स नव्हता. इतका छान झालाय त्याचे श्रेय मृणला, तुला आणि ग्राहक पेठेच्या रवाळ कणकेला जाते Happy

* फक्त दुधात माझाही शिरा नीट फुलत नाही त्यामुळे मी अर्धे दूध / अर्धे पाणी घेतले.

आज हा शिरा केला. साधीच कणीक वापरली. एक वाटी कणकेला ४ ते ५ चमचे थिजलेलं तूप लागलं.
भारी चविष्ट झालाय. Happy रेस्पीबद्द्ल धन्यवाद !

ऑलमोस्ट दोन वाट्या. मी कृतीत दिल्याप्रमाणे अगदी चार-पाच चमचे एकावेळेला असं घालत होतो. पेशन्स चं काम आहे मात्र.
नॉनस्टिक मधे केल्यास खरपुडी मिळ्णार नाही Wink मात्र झिगझिग कमी होईल, दूध आणि गूळ घालण्याच्या वेळेला पार गोळा होतो, तो पेशन्स ठेऊनच परतायला लागतो.

कोणताही शिरा हा आमचा प्रचंड वीक पॉईंट त्यामुळे हा धागा वर आला की भूक खवळते. आमचं दुडदुडबोचकं तर हा पदार्थ खाताना भान हरपून बसलेलं असतं.

आज हा शिरा पुन्हा केला. तासभर खपून आणि सढळ हाताने तूप घालून केला. अक्षरशः तोंडात घेतल्याक्षणी विरघळतोय इतका मस्त झाला आहे. शिवाय त्या सढळ तुपात थोडा वाटा तुपाच्या बेरीचाही आहे. कारण काल घरच्या लोण्याचं तूप कढवलं, त्याच भांड्यात शिर्यासाठी दूध गरम केलं. आधी बेरी गाळण्यातच वेगळी होती, पण जास्त नव्हती आणि टिपीकल वास नव्हता मग घातली दुधाबरोबर.
बोलक्या बाहुलीला शिंगं फुटल्याने साधा शिरा खायचं बंद झालं पण आज चक्क हा आवडीने खाल्ला!
सिंडी आणि मृण्मयी, दोघींनाही धन्यवाद ☺️

Pages