हिरव्या मिर्च्यांची भाजी!

Submitted by maitreyee on 11 January, 2015 - 13:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी तूर डाळ, १२-१३ हिरव्या मिरच्या, १ मध्यम आकाराचा कांदा, १ टोमॅटो, १ इंच आले, १०-१२ लसूण पाकळ्या, किसलेले सुके खोबरे अर्धी वाटी, काळा मसाला + गरम मसाला दीड चमचा, वरून घालायला कोथिंबीर, लिंबू.

क्रमवार पाककृती: 

हो हिरव्या मिरच्यांची भाजी!! (सिमला मिर्ची नव्हे) नाव ऐकूनच धास्तावायला झालं का?! ही भाजी कमकुवत हृदयाच्या - आय मीन जिभेच्या अन पोटाच्या लोकांसाठी नाहीच्चे ! पट्टीचे तिखट खाणर्यांनीही भाजी खाऊन पळता भुई थोडी झाली तर नंतर थंडावा द्यायला आइस्क्रीम किंवा तत्सम काहीतरी घरात असू द्यावे Happy
इतक्यातच नणंदेकडे नाशिक ला गेले होते. तिथे ही भाजी तिने मला खाऊ घातली. माझं सासर विदर्भातलं असलं तरी ही भाजी आमच्याकडे केली जात नाही. नणंदेला ही रेसिपी तिच्या लेवा पाटील मैत्रिणीने दिली . विदर्भातल्या लेवा पाटील समाजाची ही पारंपारिक खासियत आहे म्हणे.

तर कृती अशी:
कुकर ला १ वाटी तुरीच्या डाळीमधे १२-१३ हिरव्या मिर्च्या वाटून घाला आणि डाळीबरोबर नीट शिजवून घ्या.
IMG_0019.JPG
कांदा, आले, लसूण, टोमॅटो, खोबरे हे सर्व मिक्सर वर बारीक करून हे वाटण बाजूला ठेवा.
जाड बुडाच्या कढईत सढळ हाताने तेल तापवून फोडणी करा. त्यात तयार केलेले वाटण घालून परतून घ्या. जरा तेल सुटायला लागले की त्यात काळा + गरम मसाला घालून अजून थोडे परता. लेवा पाटील लोकांचा काळा मसाला काहीतरी वेगळा असतो असे नणंद म्हणाली, पण आपला नेहमीचा १ चमचा काळा मसाला+ अर्धा चमचा गरम मसाला असे मिश्रण त्याऐवजी चालेल. दगडू तेली मसाला वापरला तरी छान लागेल.
कुकर झाला असेल तर ( वॉर्निंग- झाकण उघडताच कदाचित मिर्चीच्या वासाने फटाफट शिंका/ ठसका येऊ शकतात Happy )शिजलेले वरण नीट हलवून कढईत ओता. लागेल तसे थोडे पाणी घालून कन्सिस्टन्सी जरा पातळच, आमटीसारखी करा. ( मैत्रिणीच्या टिपनुसार हे वरून ओतायचे पाणीपण गरम केलेले असावे. थंड पाणी घातल्यास चव बिघडते म्हणे) चवीप्रमाणे मीठ घाला. २ मिनिटे उकळी येऊ द्या.
वरून कोथिंबीर घाला अन गरम गरम पोळी अथवा भाकरीबरोबर ओरपा !! सोबत कांदा, आणि तिखटपणा जरा सौम्य करायला खाताना या भाजीवर वरून लिंंबू पिळून घेतात.
>IMG_0022.JPG

ही भाताबरोबर पण चांगली लागेल पण मला भातामुळे चाव फारच डायल्यूट झाल्यासारखी वाटते.

वाढणी/प्रमाण: 
३-४ लोकांसाठी
अधिक टिपा: 

* ही भाजी कशी लागत असेल याचा कृती वाचून अंदाज येणे जरा अवघड आहे. डाळीत केली असली तरी वरण कॅटेगरी चव नसते. जरा शेव भाजी किंवा मिसळीच्या कटाच्या आस पासची चव म्हणायला हरकत नाही.
* हा वरचा फोटो काढेपर्यंत भाजी जरा घट्टच झाली आहे, याहून किंचित पातळ असू द्या.
* आधी एक चमचा चव पाहिली तर लक्षात येत नाही पण जस जसे खात जाऊ तसे चव अजून तिखट वाटू लागते !
* तिखटपणाला घाबरून मिरच्या फार कमी केल्या तर चव, स्वाद अगदीच बदलेल.. १-२ कमी करा हवे तर.त्याहून कमी वापरल्या तर वरण म्हणून खा मग, त्याला मिर्चीची भाजी नाव देऊन मूळ रेसिपीचा अपमान करू नये ! Happy
यालाच खानदेशात डाळ-गन्डोरी किंवा Dal Gandori / दाल-गंडोरी असेही म्हणतात.

माहितीचा स्रोत: 
नणंद, तिची मैत्रिण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो छान आहे पण ...बापरे करणे अणि खाणे अशक्य !
त्या नाजुक हिरव्या मिरच्या फोटोतच किती जहाल दिसतायेत :).

इथे लोकल ग्रोसरीमध्ये त्या जरा जाड्या गच्च हिरव्या मिरच्या मिळतात त्या वापरून जरा कमी जाळ लागेल भाजी असं वाटतंय. मी मिरची का सालनसाठी त्याच वापरल्या होत्या.

तोंपासू रेसिपी. फोटोही मस्त आहे. भारीच लागत असेल.
इथे असलेल्या सर्वांची 'खायची इच्छा तर होतेय पण भीतीही वाटतेय' अशी अवस्था झाली आहे.
आता चिकनचा बटाटा आणि मैद्याचा मल्टीग्रेन आटा करणार्‍या कोणीतरी याचं कमी तिखट व्हर्जन टाका प्लीज.

कोणीतरी याचं कमी तिखट व्हर्जन टाका प्लीज>> वेदिका, याचं कमी तिखट वर्जन म्हणजे आयदर मिरच्या फोडणीला घाला किंवा वरणात ४ च मि. घाला. लसूणाचे प्रमाण वाढवा, तरीदेखिल मस्तच लागते...माझा मुलगा ५-६ वर्षांपासून खातो अशी कमी तिखट. Happy

'मुल्ला की दौड़ मस्जिद तक' (ज्यांना ह्या म्हणीचा प्रोब्लेम वाटत असेल त्यांनी 'सरड्याची धाव कुंपणापर्यन्त' असे वाचावे) या म्हणीनुसार मी ९ मिरच्या घालून ही भाजी करून बघितली. मस्त झाली होती. धन्यवाद मैत्रेयी, नाशिकची नणंद आणि तिची मैत्रीण.
अधिक टीपा: टोमॅटो नसल्याने can टोमॅटो साधारण अर्धी वाटी वापरले. दगडू तेली यांच्याकडचा सुप्रसिद्ध मसाला वापरला. तसेच अशोका brand च्या फ्रोज़न हिमी वापरल्या. खुप तिखट वाटली ही भाजी पण नवर्याला तेव्हढी तिखट वाटली नाही त्यामुळे पुढील वेळी १२ मिरच्या घालून बघणार!

खुप तिखट वाटली ही भाजी पण नवर्याला तेव्हढी तिखट वाटली नाही त्यामुळे पुढील वेळी १२ मिरच्या घालून बघणार! >>> नवर्‍याच्या सहनशक्तीचा अंत बघणार आहेस का? Lol

नाही हो! Lol आमचे स्वभाव म्हणे संत तुकाराम आणि त्यांच्या पत्नी (अवली) यांच्यासारखे आहेत. ख खो दे जा.
हेमाशेपो. Lol
मैत्रेयी, सॉरी फारच अवान्तर झाले इथे!

mount disappointment नावाचा डोंगर >> !! सही आहे!! Lol
बाकी ९ मिर्च्या घातल्यास म्हणजे यू आर अल्मोस्ट देअर की Happy

आज केली होती ही भाजी. वर दिलेल्या प्रमाणात. जबराट तिखट होते.. मी आणि नवरा आम्ही दोघांनी खाल्ली, पण रोजची भाजी खातो त्या प्रमाणात नाही खाऊ शकलो. मात्र सासरे, सासुबाई आणि आजे सासूबाई यांनी फक्त भाजीचा वास घेउन समाधान मानलं !!!
मधेच चवीत बदल म्हणून करायला छान आहे, पुढच्या वेळी ४-५ मिर्च्या कमी घालीन.

>>mount disappointment
Biggrin

बरे, मला वेगळी शंका आहे. Wink कांदा, टॉमेटो वगैरे न परतता थेट वाटायचे? खोबरे सुद्धा भाजून वगैरे नाही घ्यायचे? पाकशास्त्रात बिगरीत असल्याने बेसिक शंका विचारत आहे. बाकी काही फरक न करता भाजी / वरण करून बघण्यात येईल.

मृदुला, मला पण ती शंका होती पण नविन रेसिपी असल्याने जशी सांगितली तशी फॉलो केली मी.
कच्चे वाटण असले तरी परतून घेतले जाते अन नंतर उकळले पण जाते त्यामुळे कच्चा वास नाही येत.
बाकी असे वाटतेय की वेगवेगळ्या मिरच्यांचा तिखटपणा वेगवेगळा असतो त्यामुळे किती मिरच्या घालायच्या ते एकदा करून पाहिल्यावर लक्षात येईल. Happy

Lol वत्सला

मैत्रेयी मी शेवटी ५ मिरच्या टाकुन केली. झकास झाली फक्त तिखट नव्हती फारशी, त्याचे कारण म्हणजे इकडल्या मिरच्या तिखट नाहीत फारश्या. तेव्हा पुढल्यावेळी १२ मिरच्या वापरुन पहायला धीर आला आहे. Proud

Lol बाप्रे भयंकर तिखट दिसतय प्रकरण
मी पण नवर्‍याला घालणार खायला.माझी हिम्मतच नाही खाउन बघाय् ची.

१२-१३ हिरव्या मिर्च्या वाचुनच नाकातोंडातुन धुर निघाला, पण अनेक जणांनी करून खाल्लेली आहे त्यामुळे करून खाण्यात येईल(तरीसुध्दा मिर्च्यांच्या प्रमाणाबद्दल साशंक).

Pages