हिरव्या मिर्च्यांची भाजी!

Submitted by maitreyee on 11 January, 2015 - 13:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी तूर डाळ, १२-१३ हिरव्या मिरच्या, १ मध्यम आकाराचा कांदा, १ टोमॅटो, १ इंच आले, १०-१२ लसूण पाकळ्या, किसलेले सुके खोबरे अर्धी वाटी, काळा मसाला + गरम मसाला दीड चमचा, वरून घालायला कोथिंबीर, लिंबू.

क्रमवार पाककृती: 

हो हिरव्या मिरच्यांची भाजी!! (सिमला मिर्ची नव्हे) नाव ऐकूनच धास्तावायला झालं का?! ही भाजी कमकुवत हृदयाच्या - आय मीन जिभेच्या अन पोटाच्या लोकांसाठी नाहीच्चे ! पट्टीचे तिखट खाणर्यांनीही भाजी खाऊन पळता भुई थोडी झाली तर नंतर थंडावा द्यायला आइस्क्रीम किंवा तत्सम काहीतरी घरात असू द्यावे Happy
इतक्यातच नणंदेकडे नाशिक ला गेले होते. तिथे ही भाजी तिने मला खाऊ घातली. माझं सासर विदर्भातलं असलं तरी ही भाजी आमच्याकडे केली जात नाही. नणंदेला ही रेसिपी तिच्या लेवा पाटील मैत्रिणीने दिली . विदर्भातल्या लेवा पाटील समाजाची ही पारंपारिक खासियत आहे म्हणे.

तर कृती अशी:
कुकर ला १ वाटी तुरीच्या डाळीमधे १२-१३ हिरव्या मिर्च्या वाटून घाला आणि डाळीबरोबर नीट शिजवून घ्या.
IMG_0019.JPG
कांदा, आले, लसूण, टोमॅटो, खोबरे हे सर्व मिक्सर वर बारीक करून हे वाटण बाजूला ठेवा.
जाड बुडाच्या कढईत सढळ हाताने तेल तापवून फोडणी करा. त्यात तयार केलेले वाटण घालून परतून घ्या. जरा तेल सुटायला लागले की त्यात काळा + गरम मसाला घालून अजून थोडे परता. लेवा पाटील लोकांचा काळा मसाला काहीतरी वेगळा असतो असे नणंद म्हणाली, पण आपला नेहमीचा १ चमचा काळा मसाला+ अर्धा चमचा गरम मसाला असे मिश्रण त्याऐवजी चालेल. दगडू तेली मसाला वापरला तरी छान लागेल.
कुकर झाला असेल तर ( वॉर्निंग- झाकण उघडताच कदाचित मिर्चीच्या वासाने फटाफट शिंका/ ठसका येऊ शकतात Happy )शिजलेले वरण नीट हलवून कढईत ओता. लागेल तसे थोडे पाणी घालून कन्सिस्टन्सी जरा पातळच, आमटीसारखी करा. ( मैत्रिणीच्या टिपनुसार हे वरून ओतायचे पाणीपण गरम केलेले असावे. थंड पाणी घातल्यास चव बिघडते म्हणे) चवीप्रमाणे मीठ घाला. २ मिनिटे उकळी येऊ द्या.
वरून कोथिंबीर घाला अन गरम गरम पोळी अथवा भाकरीबरोबर ओरपा !! सोबत कांदा, आणि तिखटपणा जरा सौम्य करायला खाताना या भाजीवर वरून लिंंबू पिळून घेतात.
>IMG_0022.JPG

ही भाताबरोबर पण चांगली लागेल पण मला भातामुळे चाव फारच डायल्यूट झाल्यासारखी वाटते.

वाढणी/प्रमाण: 
३-४ लोकांसाठी
अधिक टिपा: 

* ही भाजी कशी लागत असेल याचा कृती वाचून अंदाज येणे जरा अवघड आहे. डाळीत केली असली तरी वरण कॅटेगरी चव नसते. जरा शेव भाजी किंवा मिसळीच्या कटाच्या आस पासची चव म्हणायला हरकत नाही.
* हा वरचा फोटो काढेपर्यंत भाजी जरा घट्टच झाली आहे, याहून किंचित पातळ असू द्या.
* आधी एक चमचा चव पाहिली तर लक्षात येत नाही पण जस जसे खात जाऊ तसे चव अजून तिखट वाटू लागते !
* तिखटपणाला घाबरून मिरच्या फार कमी केल्या तर चव, स्वाद अगदीच बदलेल.. १-२ कमी करा हवे तर.त्याहून कमी वापरल्या तर वरण म्हणून खा मग, त्याला मिर्चीची भाजी नाव देऊन मूळ रेसिपीचा अपमान करू नये ! Happy
यालाच खानदेशात डाळ-गन्डोरी किंवा Dal Gandori / दाल-गंडोरी असेही म्हणतात.

माहितीचा स्रोत: 
नणंद, तिची मैत्रिण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तोंपासु. एका माणसाच्या प्रमाणात करून बघणार. पाकृबद्दल धन्यवाद Happy
आशु - लेवांची ऑथेन्टिक पाकृ असेल तर टाक ना इथे/ वेगळ्या धाग्यावर.

मस्त चमचमीत तिखट अन चवदार भाजी. लहानपणी खानदेशी भागात असतांना बर्याचदा हि भाजी खाल्लीय. आणि त्यात आंबटचुका भरपूर घालायचे त्यामुळे ती तिखटजाळ नाही व्हायची. खानदेशी शेवभाजी, मिरचीची भाजी अन सोबत बाजरीच्या भाकऱ्या दर रविवारचा मेनू.

पाकृ दिल्याबद्दल धन्यवाद.

खरंच सांगायचं तर अतीतिखट नाही होत ही भाजी. नेहेमीपेक्षा बर्यापैकी तिखट होते. मात्र मिरचीचा फ्लेवर+ठसका असतोच. मी ही भाजी द्रोणातून पिणारेही पाहिलेत.
कुस्करू कुस्करू हाना! पैकी असते Biggrin

डाळ, मिरच्या (तुकडे मोडून...वाटून नाही), हिंग, थोडा कच्चा टोमॅटो,शेंगदाणे शिजवून घ्यावे. फोडणी करून त्यात कढीपत्ता, कांदा, आलं, लसूण हे लालसर परतवून घ्यावे. त्यातच खमंग भाजलेलं कोरडं खोब्रं परतावं मग त्यात पालक्/आंबट्चुका वगैरे नरम परतून घ्यावं.
आणि मग वरचं शिजवून घेतलेलं वरण ओतून गरम पाणी ओतावे, खूप कोथिंबीर टाकून भाजी उकळू द्यावी. झालं!

ह्या भाजित व्हेरिएशन्स पण येतात. वरणगावी पद्धतीत, वरच्याच कृतीत फोडणीत अ‍ॅडिशनल भाजलेले दाणे, लसूण, कोथिंबीर, भाजकी मिरची यांची थोडी चटणी घालून बाकी सर्व सेम कृती केली जाते (मग ऑफकोर्स वरणातून शेंगदाणे वगळावे लागतील आणी मिरची पण जर्रा कमी करावी लागेल अकॉर्डिंगली) , ती जबराट लागते...भात असो, नायतर भाकरी.

आम्च्याकडे मिरची आणि तुरडाळ अशी सुकी करतात. तुम्ही वापरल्या त्याच्या २ - ३ पट मिरच्या असतात. अर्थात पोपटी.

नुसती मिरची आणि थोडा शेंगदाण्याचा कुट अशीही एक करतात. यात अख्ख्या मिरचीला उभी चीर देउन ( नकलुन म्हणतात याला ) नेहमीच्या फोडणित ही मिरची आनी कुट टाकुण, पाणि शिपदुन शिजवतात. अहाहा. काय लागतात या भाज्या शिळ्या भाकरी बरोबर Happy

मस्त सोपी रेसीपी!
मिरच्यांची भाजी वर्हाडात फेमसच! मी खाल्लेल्या भाजीत, पालक+चुका+भरप्पूर हिरव्या मिरच्या+लवंगी मिरच्या+शेंगदाणे+खोबरं अशी होती. सॉर्ट ऑफ पातळभाजी टाईप पण मिरच्या म्हण्जे आग नुसती! त्यात त्या हिरव्या पाल्यामुळे अजिबात कळत नाही की भाजी जहाल तिखट असेल ते! पण 'लागते' बेष्ट!>>>> १००+++++
आमच्या कडे अशीच करतात Happy

पाकृ टीपासहित आवडली. करणे शक्य नाही. योकुने दिलेल्या रेशिपीत वांगबी घालत्यात. एका मैत्रिणीने पाठवली होती. चव घेतली व छान झाली सांगितले Happy तिने रेसिपी दिली ती इथे टाकणार होते न करता पणफोटूशिवाय रेसिपी ..बात कुछ हजम नही होती ... आंबटचिका पालक वांग्यामुळे तिखट जाळ होत नाही असे पट्टीचे तिखट खाणारे म्हणतात...

पाककृतीसाठी आभारी आहे.
१२ मिरच्या नाही टाकु शकत, पण सहा टाकुन नक्की करणार. ते वॉटर्ड डाऊन वर्जन होईल खरे, पण चालतय. Wink

जबराट रेसिपी आहे! ईवलुशी करून बघेन , लेट्स सी Happy .

ही बहुतेक पहिली रेसिपी असेल ज्यावर सगळेजण " रेसिपी करून बघणार नाही " ( अशा अर्थाच्या ) इतक्या प्रतिक्रिया लिहिताहेत Proud

" रेसिपी करून बघणार नाही " ( अशा अर्थाच्या ) इतक्या प्रतिक्रिया लिहिताहेत >> 'करून बघणार' म्हणून पण बरेच प्रतिसाद आहे पण 'करून खाउन बघणार' असं कोणिही म्हणत नाहिये Wink Light 1

'करून खाउन बघणार' असं कोणिही म्हणत नाहिये > Lol
बेस्ट म्हणजे दुसर्‍या कोणीतरी करावी अणि आपल्याला फक्त खाऊन बघता यावी.
इकडे या गटग ला , दाखवीन इंगा - आय मीन चव Happy
आशु, रेसिपी बद्दल धन्यवाद. आंबटचुका आता इथे नाही मिळणार पण त्याने लिंबासारखीच तिखटपणा कमी करायला मदत होत असावी.
बी- मिरच्या फोडणीत घालून ती चव नाही येणार. कुकर ला मिरच्या डाळीत शिजवल्याने येते ती चव/ स्वाद वेग़ळा.

यात थोडा बदल.... साध्या हिरव्या मिरच्यां ऐवजी काळ्पट हिरव्या छोट्या लवंगी मिरच्या वापरतात. जहाल तिखट भाजी होते. जेवताना लोक टॉवेल घेऊन बसतात घाम पुसायला.... हात रुमाल पुरत नाही.
ही भाजी मी खांदेशात , वर्हाडात आणि विधर्भात सगळी कडे खाल्ली आहे. पण मलकापुरला मित्राच्या घरी खाल्लेली सगळ्यात जास्त आवडली होती आणि सगळ्यात जास्त तिखटपण.
ही भाजी थंडीच्या दिवसात करतात जेणेकरुन त्रास कमी होतो.

नाशिकच्या नणंदेचा किंवा मैत्रीणीचा पत्ता देणे Wink वर्जिनल टेस्ट घेऊन येते!
भाजी इंटरेस्टिंग वाटते आहे पण इतक्या मिरच्या एकावेळी हातातून सुटनार नाहीत! ५ ते ६ मिरच्या घालून केली तर चालेल का?

मंजूडी Proud

त्यात त्या हिरव्या पाल्यामुळे अजिबात कळत नाही की भाजी जहाल तिखट असेल ते! पण 'लागते' बेष्ट! >>> हे वाचल्यावर मी 'कुठे ?' असं विचारायचा मोह टाळला मघाशी Wink

मै, पण ती तेलाचा तवंग आलेली भाजी इतकी मस्त दिसतेय ना. सध्या थंडीही भरपूर त्यामुळे करुन पाहायला हवी ( माईल्ड व्हर्जन अर्थात )

तिखट न जास्त नको असेल तर भाजी वर थोड कच्च तेल लिम्बु टाकून पण खातात. लवन्गि मिरची चवीला जास्त छान लागते.

<<झाकण उघडताच कदाचित मिर्चीच्या वासाने फटाफट शिंका/ ठसका येऊ शकतात>> Lol
खाणे आणि करणे होणारच नाही Happy

करून खाऊन बघणार. मै मिरच्या बारक्या अती तिखट वापरल्या का थोड्या जाड्या असतात त्या? मिरच्या वाटून घेतल्यावर चित्रात मिरचीचा तुकडा दिसतोय म्हणजे फोडणीत परत मिरची घालायची की काय???

रैना, शेवटी किती मिरच्या वापरल्यास ? Happy
अमित, साधारण अशा होत्या माझ्याकडच्या मिरच्या:
हा फोटो माझ्याकडच्या मिरच्यांचा नाही, www.21food.com इथून घेतलाय
mirachya.JPG

भाजीच्या चित्रात दिसतेय ती मिरची मी अशीच सजावटीला वरून टाकली होती. Happy

थुफो पाकृ आहे. फारच आवडली.

बाटलीभर पेप्टोबिस्मॉल पिऊ, पण डाळगन्डोरी खाऊ! जय महाराष्ट्र! Proud

रेसिपी पाहूनच मला अ‍ॅसिडिटी होतेय Happy
ही अशी नाही, पण लवंगी छोट्या मिरच्या, ज्या अतिजहाल तिखट असतात, त्यांची भाजी आमच्या घरी विदर्भात खास बाबा नि काकांसाठी केली जायची. मिरच्या चिरून, फोडणीला टाकून त्या शिजल्या की बेसन लावून वाफ आणली जात असे. नि मग भाकरीबरोबर खायची. मिरच्यांचा झुणका म्हटलं तरी चालेल. महाभयंकर तिखट.

बाकी रेसिपी मस्तय मैत्रेयी.

Pages