हिरव्या मिर्च्यांची भाजी!

Submitted by maitreyee on 11 January, 2015 - 13:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी तूर डाळ, १२-१३ हिरव्या मिरच्या, १ मध्यम आकाराचा कांदा, १ टोमॅटो, १ इंच आले, १०-१२ लसूण पाकळ्या, किसलेले सुके खोबरे अर्धी वाटी, काळा मसाला + गरम मसाला दीड चमचा, वरून घालायला कोथिंबीर, लिंबू.

क्रमवार पाककृती: 

हो हिरव्या मिरच्यांची भाजी!! (सिमला मिर्ची नव्हे) नाव ऐकूनच धास्तावायला झालं का?! ही भाजी कमकुवत हृदयाच्या - आय मीन जिभेच्या अन पोटाच्या लोकांसाठी नाहीच्चे ! पट्टीचे तिखट खाणर्यांनीही भाजी खाऊन पळता भुई थोडी झाली तर नंतर थंडावा द्यायला आइस्क्रीम किंवा तत्सम काहीतरी घरात असू द्यावे Happy
इतक्यातच नणंदेकडे नाशिक ला गेले होते. तिथे ही भाजी तिने मला खाऊ घातली. माझं सासर विदर्भातलं असलं तरी ही भाजी आमच्याकडे केली जात नाही. नणंदेला ही रेसिपी तिच्या लेवा पाटील मैत्रिणीने दिली . विदर्भातल्या लेवा पाटील समाजाची ही पारंपारिक खासियत आहे म्हणे.

तर कृती अशी:
कुकर ला १ वाटी तुरीच्या डाळीमधे १२-१३ हिरव्या मिर्च्या वाटून घाला आणि डाळीबरोबर नीट शिजवून घ्या.
IMG_0019.JPG
कांदा, आले, लसूण, टोमॅटो, खोबरे हे सर्व मिक्सर वर बारीक करून हे वाटण बाजूला ठेवा.
जाड बुडाच्या कढईत सढळ हाताने तेल तापवून फोडणी करा. त्यात तयार केलेले वाटण घालून परतून घ्या. जरा तेल सुटायला लागले की त्यात काळा + गरम मसाला घालून अजून थोडे परता. लेवा पाटील लोकांचा काळा मसाला काहीतरी वेगळा असतो असे नणंद म्हणाली, पण आपला नेहमीचा १ चमचा काळा मसाला+ अर्धा चमचा गरम मसाला असे मिश्रण त्याऐवजी चालेल. दगडू तेली मसाला वापरला तरी छान लागेल.
कुकर झाला असेल तर ( वॉर्निंग- झाकण उघडताच कदाचित मिर्चीच्या वासाने फटाफट शिंका/ ठसका येऊ शकतात Happy )शिजलेले वरण नीट हलवून कढईत ओता. लागेल तसे थोडे पाणी घालून कन्सिस्टन्सी जरा पातळच, आमटीसारखी करा. ( मैत्रिणीच्या टिपनुसार हे वरून ओतायचे पाणीपण गरम केलेले असावे. थंड पाणी घातल्यास चव बिघडते म्हणे) चवीप्रमाणे मीठ घाला. २ मिनिटे उकळी येऊ द्या.
वरून कोथिंबीर घाला अन गरम गरम पोळी अथवा भाकरीबरोबर ओरपा !! सोबत कांदा, आणि तिखटपणा जरा सौम्य करायला खाताना या भाजीवर वरून लिंंबू पिळून घेतात.
>IMG_0022.JPG

ही भाताबरोबर पण चांगली लागेल पण मला भातामुळे चाव फारच डायल्यूट झाल्यासारखी वाटते.

वाढणी/प्रमाण: 
३-४ लोकांसाठी
अधिक टिपा: 

* ही भाजी कशी लागत असेल याचा कृती वाचून अंदाज येणे जरा अवघड आहे. डाळीत केली असली तरी वरण कॅटेगरी चव नसते. जरा शेव भाजी किंवा मिसळीच्या कटाच्या आस पासची चव म्हणायला हरकत नाही.
* हा वरचा फोटो काढेपर्यंत भाजी जरा घट्टच झाली आहे, याहून किंचित पातळ असू द्या.
* आधी एक चमचा चव पाहिली तर लक्षात येत नाही पण जस जसे खात जाऊ तसे चव अजून तिखट वाटू लागते !
* तिखटपणाला घाबरून मिरच्या फार कमी केल्या तर चव, स्वाद अगदीच बदलेल.. १-२ कमी करा हवे तर.त्याहून कमी वापरल्या तर वरण म्हणून खा मग, त्याला मिर्चीची भाजी नाव देऊन मूळ रेसिपीचा अपमान करू नये ! Happy
यालाच खानदेशात डाळ-गन्डोरी किंवा Dal Gandori / दाल-गंडोरी असेही म्हणतात.

माहितीचा स्रोत: 
नणंद, तिची मैत्रिण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मैत्रियी , याला "डाळ-गन्डोरी" म्हणतात, दिवाळीचे गोडाधोडाचे खावुन सुस्तावलेल्या जिभेला चाळवायला केले जाते.

खतरनाक हा शब्द सौम्य वाटेल इतक झण़झणीत तिखट असतय हे! पण, खाणारे पण पट्टिचेच असतात .
क्रुती फार टेम्टिन्ग आहे पण, हे झेपणार्‍यातल नाही.

बरे झाले ही पाककृती लिहिलीत.

मला फार वाटायचे की हिरव्या मिरच्यांची भाजी करता यायला हवी. मी खातो बरेच तिखट!

येस्स! विदर्भातल्याच मित्रांकडून फार ऐकलेय या भाजी बद्द्ल! पण त्यांनी "डाळ-गन्डोरी" वगैरे शब्द वापरल्याचे आठवत नाही. पण भर ऊन्हाळ्यात तेही शेगांव जवळच्या एका खेड्यात या भाजीची चव घेतलीय!
(त्या रात्री; भाजीमूळे नाही, पण पाणी कमी प्याल्याने, 'ऊन्हाळी' लागली होती. अन रात्र वैर्‍याची झाली!)

आपला दुरूनच साष्टांग दंडवत. करणे शक्यच नाही आणि केलं तरी घरातले कोकणे भाजीकडे पाहणारसुद्धा नाहीत. (दहा बारा मिरच्या महिन्याभरासाठी पुरतात आमच्याकडे!!!)

मस्त सोपी रेसीपी!
मिरच्यांची भाजी वर्हाडात फेमसच! मी खाल्लेल्या भाजीत, पालक+चुका+भरप्पूर हिरव्या मिरच्या+लवंगी मिरच्या+शेंगदाणे+खोबरं अशी होती. सॉर्ट ऑफ पातळभाजी टाईप पण मिरच्या म्हण्जे आग नुसती! त्यात त्या हिरव्या पाल्यामुळे अजिबात कळत नाही की भाजी जहाल तिखट असेल ते! पण 'लागते' बेष्ट! Wink

मस्त आहे रेसेपी. मी अमरावतीला असताना आमच्या मेसवाल्या वहिनींनी केली होती. पण त्यात त्यांनी डाळी एवजी शेंगदाणे घातले होते. आणि हिरव्या मिरच्या ठेचून न घेता त्या थेट फोडणीत घातल्या होता.

नक्की करुन बघेन येत्या विकांताला. तू मिरच्यांचा फोटो डकवायला हवा होता. लवंगी मिरच्या आहेत का ह्या? इथे आमच्याकडे चिली पॅडी नावाचा एक प्रकार असतो तो भन्नाट तिखटजाळ लागतो.

ही भाजी खाणार्‍यांना सा.न.!!
आपण मिरच्या वगळून मिरच्यांची भाजी करणार... दोन तीन मिरच्यांची फोडणी घालेन वरून..

भारी आहे ही भाजी ! कधी कुठे बघायला मिळाली तर पोळीचा तुकडा किंचित भाजीत बुडवून चव घेता येईल Wink

एक दोन पोपटी मिरच्या आख्ख्याच डाळीबरोबर उकडून, नंतर त्या काढून टाकून वरील पद्धतीने करुन बघेन.हलका मिरचीचा स्वाद पण तिखट नाही अशी चव आणायला. तू फोटोत दाखवली आहेस त्याहून पातळ करणार नाही पोळीशी खायची असल्यामुळे.

वाह मस्त! लगेच करुन पाहणार.

इथे जास्त कुणी तिखट खातच नाही वाटत. माझ्या रोजच्या भाजीत ९-१० लवंगी मिरच्या असतातच. पाव किलो मिरच्या आमच्याकडे ५-६ दिवसातच संपतात.

Pages