शास्त्रीय संगीताच्या श्रोत्यांची बदललेली मानसिकता

Submitted by आशयगुणे on 31 December, 2014 - 01:17

मानसशास्त्रात भावनिक आत्मजाणीव (emotional self awareness) हा एक मोठ्या प्रमाणावर विचार होणारा विषय आहे. या विषयात एखाद्या व्यक्तीमध्ये असणाऱ्या विशिष्ट भावना आणि त्यांच्यामुळे होणारे परिणाम याचा अभ्यास होतो. विशिष्ट भावनांमुळे आपल्या कार्यक्षमतेवर काही परिणाम होतो का, आपल्या एकंदर वागण्यावर काही परिणाम होतो का हेदेखील यात अभ्यासले जाते. ह्या विषयाच्या अभ्यासात असे आढळले आहे की, समोर आलेल्या परिस्थितीला एखादी व्यक्ती दोन पध्दतींनी सामोरी जाते. एक म्हणजे ती व्यक्ती अति शीघ्र पद्धतीने प्रतिक्रिया देते ज्याला शब्द आहे react करते. आणि दुसरे म्हणजे ती व्यक्ती समोर आलेली परिस्थिती समजून घेते, त्यावर विचार करते आणि मग एक संतुलित प्रतिसाद देते ज्याला शब्द आहे respond करते. पहिल्या प्रकारे सामोरे जाणारी व्यक्ती ही अस्वस्थता, संयम आणि एकाग्रता यांचा अभाव दर्शवते कारण तिथे प्राधान्य हे परिस्थिती समजून घ्यायला नसते तर लगेच एखादी प्रतिक्रिया देणे याला असते. दुसऱ्या प्रकारे सामोरे जाणारी व्यक्ती मात्र संयमाचे, संतुलित मनोवृत्तीचे आणि एकाग्रतेचे दर्शन घडविते. शिवाय तुमच्यात विचार करण्याची एक प्रक्रिया आहे (thought process) याची देखील अपेक्षा ठेवते.

गेल्या दहा-एक वर्षात आपला देश हा झपाट्याने बदलला आहे. तसा तो आधुनिक होत गेला, त्याची सुरुवात १९९१च्या आर्थिक उदारीकरणापासून झाली असं म्हणायला हरकत नाही. देशात नवीन उद्योग स्थापन झाले, रोजगार संधी उपलब्ध झाल्या आणि सर्व क्षेत्रात आणि एकूण सगळीकडे बऱ्याच संधी उपलब्ध झाल्या. परंतु गेल्या दहा-बारा वर्षात जर कोणते बदल या देशात झाले असतील तर ते म्हणजे झपाट्याने झालेले शहरीकरण आणि ह्या साऱ्या प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणावर तयार झालेला मध्य ऐहिक दालनं खुली झालेला असा हा वर्ग म्हणता येईल. साहजिकच वाढत्या शहरांमध्ये रोजगार संधीदेखील वाढल्या आणि त्यामुळे आयुष्याला एक गती आली. महाराष्ट्र हे शहर तर त्यात अग्रगण्य मानले पाहिजे. मुंबई शहराची गती तर अजून वाढली. बोरिवलीचा माणूसदेखील ऐरोलीला कामाला जाऊ लागला. परंतु या गोष्टीमुळे दिवसाच्या प्रत्येक क्षणाला कसलेसे लक्ष्य समोर ठेवण्याचा स्वभाव वाढू लागला. सकाळची आणि संध्याकाळची लोकल हे मुंबईकरांचे लक्ष्य आधीपासून होतेच. परंतु लांब असलेल्या नोकरीमुळे त्यात ट्रेनमधून उतरलो की, पुढची बस पकडणे, येताना पुन्हा ती पकडणे आणि म्हणून विशिष्ट वेळेत सारे काम आटपायचा प्रयत्न करणे ही नवीन लक्ष्ये निर्माण झाली. इतर शहरांचा अगदी असा प्रश्न नसला तरीही त्यांच्या वाढत्या विस्तारामुळे आणि सतत लोकांच्या होत असलेल्या विहारामुळे तिथल्या राहणीमानात एक गती निर्माण झाली आहे. साहजिकच लोकांचा कल प्रत्येक गोष्ट ‘लगेच’ होण्यामध्ये आहे. आणि अर्थात त्यामुळे वाढत चालली आहे अस्वस्थता! कारण आपल्या सर्वांना सतत कोणती तरी क्रिया करायची सवय झाली आहे. कारण स्वस्थ एके ठिकाणी आपण बसतोच कुठे? गेल्या काही वर्षात रस्त्यावर वाजणारे हॉर्न हे एकाएकी कसे वाढले याचे उत्तर याच मानसिकतेत आपल्याला सापडू शकेल. कारण समोरची गाडी थांबली की दोन सेकंद तिच्यामागे थांबण्याऐवजी आपल्याकडून एक क्रिया होऊन जाते. समोरचा सिग्नल बदलायला १० सेकंद जरी शिल्लक असली तरीही गाड्या पुढे पुढे सरकताना आपल्याला दिसतात. कारण आपण १० सेकंदसुध्दा एके ठिकाणी स्वस्थ थांबू शकत नाही. असेच आपल्यात झालेले बदल आपण स्वतः तपासून पाहू शकतो. हे पुरेसे नव्हते की काय म्हणून गेल्या काही वर्षात आपल्या आयुष्यात ‘सोशल मिडिया’ आणि ‘स्मार्टफोन’ ह्या दोन चमत्कारांनी प्रवेश केला आहे. ह्या गोष्टींवर मी टीका करणार नाही कारण त्यांचा मूळ हेतू हा वाईट नाही, उलट त्या उपयोगी गोष्टीच आहेत. परंतु आपल्याला जरासाही वेळ मिळाला की आपण ह्या माध्यमांचा उपयोग करू लागतो. काही काम सुरु असताना मध्येच त्यात ‘डोकावणे’ ही सवय हल्ली सर्वांना लागली आहे. शाळा-कॉलेजमधल्या तरूण मुलांना तर अगदी भरपूर प्रमाणात! हा पण वाढत्या अस्वस्थतेचा एक भाग म्हटला पाहिजे. कारण हल्ली आपल्याकडे रिकामा (रिकामटेकडा नव्हे!) वेळ उरलेलाच नाही. जे काही रिकामपण असेल ते अशा कुठल्याशा क्रियेने भरले जाते.

आणि ह्याच गोष्टीचा परिणाम हल्ली शास्त्रीय संगीताच्या मैफलीत दिसू लागला आहे.

शास्त्रीय संगीत ही एक विचार- प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी तुम्हाला वरीलपैकी दुसऱ्या प्रकारच्या लोकांची गरज आहे. किंवा जे लोक शास्त्रीय संगीत ऐकतात किंवा सादर करतात त्यांच्यात एका विशिष्ट टप्प्याला हे गुण विकसित होतील अशी अपेक्षा आपण करू शकतो. मात्र या सगळ्यावर आपल्या दैनंदिन जगण्याचा देखील प्रभाव पडू शकतो का? किंवा तसा तो पडला आहे का?

हा विषय सुरु करण्याआधी आपल्याला शास्त्रीय संगीताच्या मैफलीची एकंदर मांडणी समजून घेतली पाहिजे. शास्त्रीय मैफल ही एक बैठी क्रिया आहे. समोर कला सादर करणारा कलाकार आणि श्रोते हे दोघेही बसलेल्या अवस्थेत असतात. मैफलीची सुरुवात धीम्या गतीने होते. ही विलंबित लय तशीच ठेवून त्यात एका मागोमाग एक सूर चढवले जातात. धीम्या गतीने संथ वाहणारे सूर अर्थात आलाप. त्यानंतर आणि एका विशिष्ट बढत झाली की मग सुरांची लय वाढते आणि त्याला तान असे म्हणतात. तो पर्यंत तालाची देखील लय वाढलेली असते. शेवटी गाणे एक विशिष्ट द्रुत गती पकडते आणि मैफल समाप्त होते. एकूण काय तर ही एक प्रक्रिया असते. मैफलीत एकदम असे काहीच घडत नाही. परंतु एक उत्कृष्ट मैफल घडविण्याची जबाबदारी कलाकार आणि श्रोता ह्या दोघांवर असते. कलाकार जर ह्या प्रक्रियेत स्वतःला सामावून घेत नसेल आणि त्याला ‘पुढे’ जायची आणि द्रुत गायची/वाजवायची घाई असेल तर मैफलीचा मतितार्थ साध्य होणार नाही. याच प्रकारे जर श्रोता वर्ग ‘लगेच’ काहीतरी घडेल अशी आशा मनात घेऊन बसला आणि त्या प्रक्रियेशी एकरूप झाला नाही तर मैफलीचा हेतू कदापि साध्य होणार नाही. वरील सिध्दांताच्या अनुषंगाने विचार केला तर कलाकाराने समोर असलेल्या परिस्थितीला (रागाला, तालाला) एका प्रक्रियेद्वारे respond करणे अपेक्षित आहे, react करणे नाही. आणि हीच अपेक्षा आपण श्रोत्यांकडून कमी-अधिक प्रमाणात करायला हरकत नाही.

आपण त्या प्रक्रियेत जसजसे स्वतःला सामावून घेऊ तसतशी ती आपल्याला अधिक समजत जाते. आणि त्या वाटेवर प्रत्येक वेळेस आपल्याला काहीतरी नवीन अनुभवायला मिळते. कलकत्त्यात एकदा भीमसेन जोशींचे तीन संगीत संम्मेलनांमध्ये सलग गाणे होते. एक झाले की पुढे दुसरीकडे जायचे. या तिन्ही ठिकाणी त्यांनी राग तोडी गायला. गंमत म्हणजे बरेच लोक त्यांचे एका ठिकाणचे गाणे झाले की दुसरीकडे तोच राग ऐकायला जात होते आणि पुन्हा तिसऱ्या ठिकाणी सुद्धा! गायक आणि श्रोता प्रत्येक ठिकाणी स्वतःला त्या प्रक्रियेत सामावून घेत होते आणि आनंदाची नवीन अनुभूती त्यांना प्रत्येक ठिकाणी मिळत होती. भीमसेन जोशी आणि ते सारे श्रोते ह्यांच्या संयमाला दाद द्यायलाच हवी!

आणि इथे विषय जरी शास्त्रीय संगीताचा असला तरी दैनंदिन आयुष्यातही अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला स्वतःला एका प्रक्रियेत समाविष्ट करून घ्यायचे आमंत्रण देतात. कुंभाराचे मडके बनविणे ही एक प्रक्रिया आहे, चित्रकाराचे चित्र काढणे ही देखील आहे. एखादे पुस्तक वाचणे ही देखील एक प्रक्रियाच आहे. घाई-घाईत वाचलेले पुस्तक दुस-यांदा पुन्हा शांत चित्ताने वाचले की त्यातील बऱ्याच गोष्टी आपल्याला नव्याने समजतात! ध्यान लावून बसणे हीदेखील एक प्रक्रियाच आहे.

आणि या प्रक्रियेत आपण स्वतःला सामावून घेतलं तर काय होतं? तर त्याने आपली ‘पुढे काय होणार’ ही सतत असणारी उत्सुकता कमी होऊन आपण आहेत ते क्षण अनुभवायला शिकतो. समोर असलेला क्षण अधिक चांगला अनुभवता यावा या प्रयत्नाने आपली एकाग्रता वाढते. आपला संयम वाढतो आणि एकंदर प्रक्रिया समजून घेताना सहनशीलता वाढते. आपली ऐकून घेण्याची प्रवृत्ती सक्षम होते. अर्थात हे तेव्हा होईल जेव्हा आपण respond करू आणि react करायचे कमी करू. कोणत्याही क्षेत्रातील दिग्गजांकडे आपण पाहिले तर त्यांच्यात आपल्याला हेच गुण आढळतील.

आणि याच अनुषंगाने रोज झपाट्याने बदलणाऱ्या जीवनपद्धतीकडे पाहिले तर आपल्या सर्वांमध्ये झालेले बदल अगदी सहज लक्षात येतात. आणि ह्या बदलांमुळे मैफल ऐकायला येणा-या श्रोत्याची देहबोली बदलली आहे. त्याच्या व्यक्त होण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. साधारण दशकभरापूर्वीचा श्रोता आणि आजचा श्रोता यांच्यात बराच फरक जाणवतो.

मैफलीत बसलेला हल्लीचा श्रोता हा देहबोलीने सतत एका अस्वस्थतेने ग्रासलेला असा भासतो. प्रेक्षागारात आल्यापासून श्रोत्यांमध्ये एक प्रकारची चुळबुळ जाणवते. मैफल सुरु होईपर्यंत आणि कधी कधी सुरु झाल्यावर देखील श्रोत्यांच्या गप्पा काही थांबत नाहीत. गाणं-वाजवणं सुरु झाल्यावर देखील बरेच श्रोते एकमेकांशी बोलताना आढळतात. बऱ्याच श्रोत्यांना अधून मधून मोबाईल मध्ये डोकं घालावेच लागते. बऱ्याच श्रोत्यांचे मोबाईल वाजतात आणि काही तर तिथेच खाली वाकून बोलून देखील घेतात. हल्ली श्रोते प्रत्येक छोट्या जागेवर टाळ्या वाजवताना आढळतात आणि असे करण्याने कलेची सलगता बिघडते हे कुणाच्याच लक्षात येत नाही. याला कारण परत तेच. समोर येणारे क्षण न अनुभवता, त्या प्रक्रियेला सामोरे न जाता आपण टाळ्या वाजवून एक क्रिया करीत त्याला प्रतिसाद देत असतो. बरेच श्रोते हे भर मैफलीत खोकताना आढळतात. एकदम आजारी व्यक्ती मैफलीला आली तर असे होण्यास माझी काहीही हरकत नाही. परंतु जर बरीचशी एकाग्रता श्रोत्यांनी ठेवली तर खोकणे, शिंकणे वगेरे विसरून तो श्रोता संगीताशी तन्मय नक्कीच होऊ शकतो. परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे श्रोत्यांमधली एकाग्रता कमी होताना आढळते आहे. आणि दिवसेंदिवस ह्या गोष्टी वाढतच आहेत.

आताचे कलाकारदेखील याच समाजाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या सादरीकरणातही बदल होताना दिसतात. एके काळी सव्वा तास चालणारा ख्याल हल्ली चाळीस मिनिटांमध्ये संपतो. वीस ते पंचवीस मिनिटांची ठुमरी आता पंधरा मिनिटांमध्ये संपते. सुरुवातीचे आलाप आता स्वरांचे तेवढे स्थैर्य राखून गायले- वाजवले जात नाहीत; उलट त्यांच्यात देखील जलदता वाढली आहे. एक पिता-पुत्र वादक आपल्या देशात बरेच लोकप्रिय आहेत. परंतु वडील जसे आलापी करायचे किंवा करतात तेवढे स्थैर्य मुलाच्या वाजवण्यात आढळत नाही. त्याच्यात आढळणारी अधीरता ही तो प्रतिनिधित्व करीत असलेल्या समाजाच्या अस्वस्थततेचे प्रतीक म्हणता येईल!

भारतीय शास्त्रीय संगीत हे काळानुरूप बदलत आलेले पण तरीही आपले सैध्दांतिक अस्तित्व टिकवून ठेवलेले संगीत आहे. त्यामुळे कदाचित बदलत्या समाजाच्या पार्श्वभूमीवर हे संगीत एक वेगळे रूप घेईल. कदाचित त्याची लांबी कमी होईल, स्वरूप थोडेसे बदलेल. परंतु या घडीला श्रोत्यांमध्ये आणि बऱ्यापैकी प्रमाणात कलाकारांमध्ये आढळलेला हा बदल मात्र लक्षणीय आहे. आणि काही प्रमाणात चिंता व्यक्त करायला लावणारा देखील. कारण शेवटी हे आपल्याच समाजाचे प्रतिबिंब आहे. शिवाय शास्त्रीय संगीत ही चौकट सोडून विचार केला तर बाकी क्षेत्रांमध्ये जिथे ‘प्रक्रिया’ महत्वाची आहे तिथे देखील हेच अनुभवता येते. मग तो नाटक बघणारा श्रोता असो वा सिनेमा पाहणारा. आज परिस्थिती अशी आहे की सर्वांना अंतिम निकालाची उत्सुकता असते, तिथे पोहोचविणाऱ्या प्रक्रियेची नाही. प्राचीन चीनी विचारवंत लाओ त्झु चे हे वाक्य आपल्या साऱ्यांची स्थिती दर्शविते:

Do you have the patience to wait
till your mud settles and the water is clear?

- आशय गुणे Happy

माझे इतर लेख: http://relatingtheunrelated.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंदिनी... बेफीकिर Happy
<<बेस्ट पॉसिबल कलाविष्कार सहजगत्या घरी बसून उपलब्ध असेल तर मुद्दाम तथाकथित दुय्यम कलाकारांच्या मैफिलीत कशाला जाईल>> (असं बेफी म्हणत नाहियेत हे नोंदून Happy )
बेस्ट पॉसिबल कलाविष्कार - रशीद खान (किंवा कुणी चांगला गायक) भारतात वेगळं आणि परदेशात वेगळं (कमी मेहनतीचं... प्रतिचं) गाणार असेल.. किंवा अगदी मुंबईतच जोगेशश्वरीला वेगळं, आणि पार्ल्याला वेगळं गात असेल तर?
तर परदेशातला किंवा जोगेश्वरीचा कानसेन सीडी घ्यायची पसंत करतो... हा पुन्हा स्वानुभवच आहे.
गंमत अशीही आहे की... तथकथित 'मान्यवर' कलाकारच अशी 'निवडक' ठिकाणी 'निवडक' गाणी असलं करताना अधिक बघितलेत.
तथाकथित दुय्यम कलाकार मात्रं मनापासून गाताना आढळतात.... 'मान्यतेच्या' मळ्यात गेल्यावर त्यांचं होत असेल 'निवडक' का काय ते. हा ही स्वानुभवच. इथे परदेशात आणि भारतातल्या अनेक मैफिली ऐकल्यावरचं हे मत्तं आहे Happy

गेल्या २-४ वर्षांत मी तरी मान्यवर कलाकार आणि नॉट सो मान्यवर कलाकार ह्यांच्यात अनेकदा 'नॉट सोंची निवड केलीये मैफिल ऐकण्यासाठी. सीडि घ्यायची तर दोघांचीही घेते.... राग-बिग बघून Happy

छान लिहीले आहे. अधीर प्रवृत्तीच्या वाढीमुळे बदललेला समाज ही धोकादायक गोष्टींची नांदी आहे, पूर्वी केवळ लहान मुले/युवक हेच वयोपरत्वे "अधीर" असायचे, आता मात्र सर्व वयोगटातील लोक जीवनातील सर्वच क्षेत्रात सारख्याच पद्धतीने "अधीरता/घाई" दाखवतात.
मात्र यास बदललेल्या जीवनपद्धतीस दोष देण्यापेक्षाही, मनाची मशागत करण्यास आपणच कमी पडतो, व तसे मार्गदर्शन उपलब्ध नाही, जे आहे ते घेण्यासही कुणास वेळ नाही अशी परिस्थिती आहे.
हीच अधीरता अकाली हृदयविकार व अन्य ब्लडप्रेशरादिक विकार आणते/आणू शकते.
विषय नेमका आहे. व केवळ शास्त्रीय संगित गायन/श्रवण करण्यापूरता नाही.

हा धागा बहुधा "वहाता" झालाय असे वाटते. बांध घाला.

एखादं लहान मूल नदीकिनारी जातं तेव्हा त्याला कदाचित फ़क्तं वाहणारं पाणीच दिसेल त्याला. धाव्वत जाईल पाण्यापाशी. उडवा-उडवी... भिजवून घेईल अखंड. तिथे पाण्याचं तापमान, वेग, वारा, आजूबाजूचं वातावरण... ह्यापैकी काहीही बद्दल त्याला सुतराम घेणं-देणं नाही. मनाची कवाडं इतकी सताड उघडी आहेत की त्याला स्वत:च्या सुरक्षिततेचीही पर्वा नाही... ती काळजी पालक-बिलक नामक दुस‍या कुणाचीतरी.
पुन्हा कधी नदीकिनारी जाईल तर... पाणी नाहीच... वाळूत हुंदडणे, गोटे, शंख, शिंपले ह्यात रमेल.
गाणं हे असं कवेत घ्यायचय... किंबहुना गाण्याच्या कवेत असं शिरायचय...
राग कळायला हवा, इथे घेतलं त्याला तिहायी म्हणायचं का अजुन काही. ताल कोणता? सम चुकली का? ह्या सगळ्या चर्चेच्या गोष्टी आहेत. गाण्याला भेटताना कडकडून भेटायचं... गाण्याचे कपडे कोणते ते कशाला बघायचं म्हणते मी?

काही खास ऐकवताना ... गायकाची मुद्रा, अभिनिवेष बदलतो. तो आधी नजरेनं टिपावा. मग सुक्ष्मं सुक्षमं असं ऐकू यायला लागतं. त्याला गमक म्हणायचं की मुरकी... जाऊदे ना. हळू हळू डोळे मिटूनही सगळं आत झिरपू लागतं. एकाच गायकानं गायिलेला एकच राग वेगवेगळ्या वेळी वेगळा असल्याचं ध्यानात येऊ लागतं.
राग कळायला हवा, ताल कळायला हवा, काय चाललय ते ’कळायला हवं’ हा हट्टं बाजूला ठेवला तर एखाद्या लहानग्यासारखे आपण गाण्याचे आणि गाणं आपलं होऊन जातं.>>>>>>>>>>>>>> प्रचंड अनुमोदन!! ही अशी दाद (प्रतिक्रिया) फक्त दादच देऊ शकते!!
लेख खूप भावला! अगदी यथायोग्यच लिहिलंय....

दाद.....

"....गाण्याला भेटताना कडकडून भेटायचं... गाण्याचे कपडे कोणते ते कशाला बघायचं म्हणते मी?...."

तुझ्या ह्या एका वाक्याने श्री.आशय गुणे यांच्या लेखाचे सार्थक झाले....आमच्यासारख्या केवळ "गाणे ऐकणार्‍या" लोकांच्या नजरेने पाहिले गेल्यास.

(बाकी कित्येक दिवसांनी अशा कित्येक सदस्यांच्या अभ्यासू प्रतिक्रिया वाचण्याची संधी लाभली हे नोंदवितो. इतका सुंदर लेख आणि त्यावरील तितक्याच सुंदर प्रतिक्रिया येत असताना हा धागा वाहता का केला गेला आहे याची चुटपूट लागून राहिली आहे.)

लेख आवडला. भावना समजली आणि काही अंशी पटलीही. >> +१. instant gratification हे आजचे चलन मूल्य आहे . शास्त्रीय संगीतासारखी मेहनत करून ऐकावी लागणारी गोष्ट जरी affordable नि सहजी उपलब्ध झाली असली तरी सगळ्यांनाच झेपेल्/पचेल अशी नाही नाही त्यामूळे लेखात लिहिलेले अनुभव जास्त जाणवतात असे मला वाटले.

लेख आवडला आहे. विचार करायला लावणारा आहे.
समोर आलेल्या परिस्थितीला एखादी व्यक्ती दोन पध्दतींनी सामोरी जाते. एक म्हणजे ती व्यक्ती अति शीघ्र पद्धतीने प्रतिक्रिया देते ज्याला शब्द आहे react करते. आणि दुसरे म्हणजे ती व्यक्ती समोर आलेली परिस्थिती समजून घेते, त्यावर विचार करते आणि मग एक संतुलित प्रतिसाद देते ज्याला शब्द आहे respond करते.

react करणे वाईट आहे असे मला वाटत नाही. पण प्रत्येकदा react केलेच पाहिजे असेही नाही, हे मात्र अनुभवाने कळत गेले आहे. असे respond करणे मात्र शिकावे लागले. त्यासाठी त्या गोष्टीला वेळ द्यावाच लागतो.

फार पूर्वी म्हणजे सुमारे १९७० च्या दशकात 'सौंदर्य मीमांसा' असा विषय शिक्षणात पदवीला होता. या विषयात बहुदा भाषेच्या रसग्रहणाचा अभ्यास होत असे. मला वाटत नाही असा विषय आता कुणी शिकत असेल.
या विषयात बहुदा रस ग्रहण करताना आपोआपच अधीरतेला बांध कसा घालायचा हे ही शिकले जात असावे.

मला पूर्वी भारतीय अभिजात संगित फारसे भावत नसे. कारण हेच - पाश्चात्य संगित किंवा सिने संगित react करण्यासाठी त्वरित वाव देत असे. कुठे ही 'डोकावले' तरी चालत असे

पण एका मित्राने एकदा पं. भीमसेन जोशींचे 'घडी ये गिनत जात' ऐकवले. ते इतके सुगम होते की गाण्यात हरवून गेलो. उत्तम रित्या लावलेला तबला. पंडितजींचा आवाज, गायनातली सहजता हे मनात रुतून बसले.
आणि द्रुत असल्याने react करण्यासाठी त्वरित वाव - म्हणजे एकदम वॉव! Happy

पण खरे सांगायचे तर हे ही 'डोकावणेच' होते. काही तरी नवीन पाहण्याची अधीरता होती.
प्रकार आवडला पण समजला नाही. मग कोणता राग आहे वगैरे कशाला शोधायचे? आवडले आहे ना, ते ऐकायचे असा विचार मनात आला.
ऐकू लागलो!

मग अचानकपणे पंडित जसराज यांचे संस्कृत गायन ऐकले. या वेगवान गायनाने अगदी वेड लागले. अतिशय सुगम शास्त्रीय संस्कृत गायन! react व्हायला मिळेल असे शास्त्रीय संस्कृत गायन! यावर तर नाचायलापण मजा यायची, येते... Full bodied reaction! Proud

मग किमान तीन ताल असलेले कोणतेही अभिजात संगित ऐकू लागलो. गाडीत, घरात सदैव अभिजात गायन ऐकू लागलो. सुमारे तीन वर्षे फक्त ऐकत राहिलो. काहीच विचारायचे नाही, फक्त ऐकायचे. आवडले तर राग पाहून ठेवायचा. नाही आवडले तर वेळ द्यायचा. ऐकत रहायचे. ऐकायची गोडीच लागली. तरीही अजून द्वैत होतेच. 'ते ' गात आहेत आणि 'मी' ऐकतो आहे ही भावना होती.

गाण्यात एकरूपता आली नव्हती. मग कोणतीही मैफिल आली की ती ऐकायचीच असा नियमच झाला.
त्यातून अनेक गोष्टी सापडत गेल्या. वाटेल ते अभिजात गायन आणि वादन ऐकत राहिलो.
सिने संगीत अगदी मागेच पडले. कधी आधुनिक पाश्चात्य ऐकायचो हे तर विसरूनच गेलो!
काही काळाने विलंबित सुरावटी पण भुलवू लागल्या. त्यातली गंमत कळू लागली. react ऐवजी वेळ देऊन respond होण्यातले फरक हळू हळू जाणवत गेले. आता क्वचित प्रसंगी वर दाद म्हणतात तसे गाणे कवेत येत होते. हरकती मजा आणयला लागल्या. कधी कधी गायन आणि मी अद्वैतात जाऊ लागलो. संगीताशी तन्मय होणे समजू लागले. मालकंस आणि मारवा आवडू लागला आहे.

पण ही जाणीव व्हायला सुमारे दहा वर्षे गेली आहेत. हे विश्व प्रत्येकाला वेगवेगळया प्रकारे खुले होत जाते.
मला 'कान यायला' जेथे दहा वर्षे लागली तेथे यायला माझ्या मित्राला वर्ष ही पुरेसे ठरले होते. मी जाण्यासाठी धडपडलेल्या अनेक मैफिलींना त्याने 'उगाच गायचे म्हणून गातात राव हे लोक', आणि 'लोक कशालाही टाळ्या वाजवतात' अशा प्रतिक्रिया दिल्या होत्या!
त्या तेव्हा कळल्या नव्हत्या. पण तुमच्या लेखाच्या निमित्ताने उमगल्या असे वाटते.
प्रत्येकाची जाणीव निराळी, मग येणारी अनुभूती पण निराळीच असणार!

आता... आता खरे सांगायचे तर शास्त्रीय ऐकताना पेटी सुद्धा नकोशी वाटते कानाला. फक्त सारंगी आणि उत्तम रित्या लावलेला तबला इतकेच साथीला असलेले गायन जास्त श्राव्य होते असे माझे मत बनले आहे.

असो, मी एक शास्त्रीय संगीताची कोणतीही शिकवणी न घेतलेला सामान्य माणूस आहे. मला त्यात गतीही नाही. काय ऐकायला आवडते आणि ते react होत होतच कसे ऐकायला शिकलो हे सांगण्यासाठी ही प्रतिक्रिया.

निनाद... तुमच्या प्रत्येक वाक्याला 'अगदी अगदी' होत राहिलं. सुरेख प्रतिसाद. रिअ‍ॅक्ट आणि रिस्पॉन्ड... इतकं चपखल आहे... की 'जियो.... जियो'

... <<मला 'कान यायला' >>... हा कान येणं हीच 'समज येण्याची' सुरुवात आहे. मग करावेत आडाखे आणि ठोकताळे.. राग, ताल, घराणी वगैरेंचे. तोपर्यंत निव्वळ लहानग्याची उत्सुकता, आवेग, नागोडेपण घेऊन 'घडण्याला' सिद्धं व्हावं.

सुरेख चर्चा... खूप दिवसांनी मायबोलीवर एखादा सुरेख लेख अन त्या अनुषंगाने(च) चाललेली चर्चा झडलीये... य्ये बात!

दाद...तुमचाही प्रतिसाद अतिशय समर्पक आहे......
जे एकल्यामुळे मनाला छान वाटते ते महत्वाचे....
जीवनात काही वेळा जास्त खोलात न जाता आनंद घेता यायला हवा....

दाद...तुमचाही प्रतिसाद अतिशय समर्पक आहे......
जे एकल्यामुळे मनाला छान वाटते ते महत्वाचे....
जीवनात काही वेळा जास्त खोलात न जाता आनंद घेता यायला हवा....

त्या उथळतावाल्या सेन्सलेस धाग्यावर हजारो पोस्ट्स आहेत आणि इथे धागा वाहता आहे.
हेही एक प्रतिकच असावं लोकांच्या बदललेल्या अभिरुचीचं Uhoh

इतका सुंदर धागा विनाकारण वाहता झाला आहे. दाद यांचा सुंदर प्रतिसाद वाहुन गेला >>>>>> कुल - कूल मॅन ... Happy Wink
हा घ्या दाद यांचा प्रतिसाद..... Happy

दाद | 7 January, 2015 - 05:52
सुरेख (सुरेल) चर्चा चालू आहे.
शास्त्रीय संगीत ऐकण्याबद्दल एकच सांगू इच्छिते... आयुष्यभर शास्त्रीय संगीत ऐकूनही मला अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच राग ओळखू येतात. पण म्हणून ऐकण्यातली गंमत संपत नाही.
एखादं लहान मूल नदीकिनारी जातं तेव्हा त्याला कदाचित फ़क्तं वाहणारं पाणीच दिसेल त्याला. धाव्वत जाईल पाण्यापाशी. उडवा-उडवी... भिजवून घेईल अखंड. तिथे पाण्याचं तापमान, वेग, वारा, आजूबाजूचं वातावरण... ह्यापैकी काहीही बद्दल त्याला सुतराम घेणं-देणं नाही. मनाची कवाडं इतकी सताड उघडी आहेत की त्याला स्वत:च्या सुरक्षिततेचीही पर्वा नाही... ती काळजी पालक-बिलक नामक दुस‍या कुणाचीतरी.
पुन्हा कधी नदीकिनारी जाईल तर... पाणी नाहीच... वाळूत हुंदडणे, गोटे, शंख, शिंपले ह्यात रमेल.
गाणं हे असं कवेत घ्यायचय... किंबहुना गाण्याच्या कवेत असं शिरायचय...
राग कळायला हवा, इथे घेतलं त्याला तिहायी म्हणायचं का अजुन काही. ताल कोणता? सम चुकली का? ह्या सगळ्या चर्चेच्या गोष्टी आहेत. गाण्याला भेटताना कडकडून भेटायचं... गाण्याचे कपडे कोणते ते कशाला बघायचं म्हणते मी?

काही खास ऐकवताना ... गायकाची मुद्रा, अभिनिवेष बदलतो. तो आधी नजरेनं टिपावा. मग सुक्ष्मं सुक्षमं असं ऐकू यायला लागतं. त्याला गमक म्हणायचं की मुरकी... जाऊदे ना. हळू हळू डोळे मिटूनही सगळं आत झिरपू लागतं. एकाच गायकानं गायिलेला एकच राग वेगवेगळ्या वेळी वेगळा असल्याचं ध्यानात येऊ लागतं.
राग कळायला हवा, ताल कळायला हवा, काय चाललय ते ’कळायला हवं’ हा हट्टं बाजूला ठेवला तर एखाद्या लहानग्यासारखे आपण गाण्याचे आणि गाणं आपलं होऊन जातं.
हा स्वानुभव आहे Happy
----------------------------------------------------

पूर्वीच्या काळी यु ट्यूब , सिनेमा मोबाईल नव्हते

आज जुन्या लोकांचे सगळे फुकट उपलब्ध आहे

शास्त्रीय संगीत शिकून लोक लगेच ती व्ही शो मध्येच जातात

केवळ शास्त्रीय गाऊन पोट भरणे आता मुश्किल आहे