लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा !

Submitted by केदार on 9 September, 2014 - 04:09

एकेक श्वास घेणे देखील नकोसे झाले होते, शरीरातील ताकद पूर्ण नाहीशी झाली होती. अजून डोल्मा पास (उंची ५६००+ मिटर्स डोल्मा हे तारा देवीचे तिबेटी नाव आहे.) यायला निदान एक किमी तरी होते. साधारण मी ५२०० मिटर्स उंची वर असेन अजून ४०० मिटर्स वर चढायचे होते ! माझे पाय पूर्ण लाकडासारखे झाले होते. एकेक पाऊल उचलायला त्रास होत होता. पण मन मात्र थांबू देत नव्हते. अजून एक किमी झाले की पुढे उतारच लागेल, चल गड्या आता चाल एक किमी, फक्त एक किमी मग उतार लागेल असे मन वारंवार सांगत होते. थांबू नकोस, चालत राहा !

मागून घोडेवाले येऊन पुण्यातील ट्रॅफिक सारखे पँ पँ करत पुढे जात होते. जाताना, आम्हा पायी चालणार्‍या "डाय" (लिटरली) "हार्ड" ( पायाच्या काठ्या झाल्या होत्या) ट्रेकर्स कडे पाहून हसत होते. माझ्या समोर एक ७० एक वर्षाचा तिबेटी म्हातारा होता. त्याला चालताना बघून माझीच मला लाज वाटली होती. तो अजूनही टकाटक पुढे जातोय अन मी आपला, हवालदिल झालोय!

Wind was blowing from the North. It was not too windy, not too cold, just perfect for the trek! I was checking on the scenes. It was cloudy. Far away on the right horizon, all of sudden one tiny thing started showing up from the clouds. It was glowing beautifully. I knew that would be Mount Kailash. And yes it was indeed!

That glimpse gave me instant power. And soon there I was, on the top, feeling exhausted but same time gaining power! How can these two co-exist? But they did! Thanks to that darshan, the pain was gone. The feeling of achievement was concurring the body and soul. All thoughts were gone and my mind became still, eyes gazing at Kaiash and my body gaining power!

डेरापूक कॅम्प पासून डोल्मावर जाईपर्यंत माझ्यासोबत चालणारा भीम पार गळून गेला. भीम हे टोपणनाव आम्ही त्याला त्याच्या भुकेमुळे आणि शरीरामुळे ठेवले होते. त्याचा स्टॅमिना अफलातून आहे, आणि तो ही आज गळाला होता !!

Dolma la उतरल्यावर आता फ्लॅट लॅन्ड वर अजून १२ किमी चालायचे होते. तिथे आमचा आजचा कॅम्प असणार होता. त्या गावाचे नाव आहे Zunzhui Pu! उतरल्यावर बॅगेतून पाणी देखील काढायची इच्छा होत नव्हती. दोघेही थोडावेळ असेच बसून होतो. मेल्यागत ! फक्त डोल्मा पास चढून उतरल्याचे समाधान मात्र होते !

डोल्मा चढ ६ किमी आणि उतार ३ ते ३ १/२ किमी आहे. एकुण अडीच तासाच्या आता डोल्मा चढून, उतरला होता. काल रात्री एका आंतरराष्ट्रीय मॅराथॉन रनरचा विक्रम कुणीतरी सांगतला. की तिने २ तासात चढणे- उतरणे केले होते. तुलनेत नॉट बॅड!

बॅग जवळ घेऊन त्यातनं दोघांनी थोडं खाल्लं. ५ मिनिटं झाल्यावर मी म्हणालो, भीमा, चल उठ आता. भीम फक्त हूं म्हणाला, की तो तसे हूं म्हणाल्या सारखे मला वाटले. ५६०० मिटर्स वर ऑक्सिजन कमी असल्यामुळे भले भले तंतरतात. आम्ही उठणार इतक्यात त्याला अ‍ॅसिडिटी कम AMS ( अ‍ॅक्युट मांऊटेन सिकनेस) मुळे उलटी झाली.

आता भीमाचे काय? हा प्रश्न मला पडला होता.एकतर आमच्या ग्रूप मधील आम्ही दोघंच सोबत होतो आत्ता आणि दोघांकडेही बसायला घोडा नसल्यामुळे ते पूर्ण अंतर पायीच कापायचे होते. बराच वेळ तसे बसून राहिलो. तिथून चालण्यासाठी उठणार इतक्यात पराग आला, तो म्हणाला, "वाटलंच तुम्ही दोघे असाल, तुझे ते जॅकेट आणि लाल बाटली पार वरनं दिसत होती."

तितक्यात आमचे आणखी एक कंपू मित्र डॉन कैलाशी, तिथे येऊन पोचले. भीम, डॉन, पराग अन मी तेथे असलेल्या टपरी मध्ये शिरलो तर तिथे आधीपासूनच दुसरे कंपू मित्र रानडे आणि सौम्या सरकार चहा पीत होते. घोड्यावरून प्रवास करून आल्यामुळे ते एकदम फ्रेश दिसत होते आणि भरीस तो चीनी मॅगीच्या स्वादाचा परिणाम ! मग काय परत ग्रूप जमल्यामुळे, थोड्या गप्पा हाणल्या आणि आम्हीही मॅगी हाणली आणि तिबेटी चहा घेतला. ते १२ किमी चालण्यास सज्ज की काय ते झालो.

आमच्या ग्रूप मधील श्याम आधीच निघून गेला होता कारण त्याने आणि मी कॅम्प वरून सुरूवात एकत्र केली होती. पण मी फोटोच्या नादात मागे पडलो.आणि तसाही श्याम पराग आणि माझ्यापेक्षा फास्ट आहे. तेथून रानडे, सौम्या अन पराग पुढे गेले. मी, भीम आणि डॉन कैलासी निघालो. खूप सारे किमी चालून झाल्यावर वाटलं की अरे १२ संपले असतील असं वाटून आम्ही जीपीएस पाहिला तर केवळ ७ किमी झाले होते.

भीम तर गोठला होताच, पण आता डॉन कैलासी देखील गळून गेले. दोघे गळालेले महारथी आणि मी एकटाच दांडी यात्रेला निघाल्या सारखा पुढे पुढे जातोय ! सारखे परत मागे वळून थांबून दोघांना, चला झालेच, उठा पटकन असे काहीसे असंबद्ध बरळत होतो. आणि त्यांना सांगताना माझे मला बजावून सांगत होतो, की आता थोडेसेच, तो टर्न, नंतर तो डोंगर, ते वळण असा विचार करत होतो.

प्यायचे पाणी थोडेसेच होते. फक्त माझ्याकडेच. मग त्यात तिघे जण पिणारे! त्यातही पाण्यासाठी पहिला प्रेफरन्स भीम होता. तेथपर्यंत दीड एक तास चालून झाले आणि ते अर्धा लिटर पाणी सुद्धा संपले , ऊन वरनं चटका देत होते, घशात कोरड पडली, एकही पाऊल उचलण्याची शक्ती नव्हती. आणखी अर्ध्या तास चालल्यानंतर एक पाण्याचे दुकान दिसले, तिथे दोन बाटल्या प्यायल्यावर आम्हा सर्वात परत थोडी धुगधूगी आली, एकमेकांकडे बघून उठलो आणि झुंजूरपूकच्या दिशेने परत निघाल सर्व शक्तीपात झाल्यावर दूर कुठेतरी कॅम्प सदृष्य काहीतरी दिसले. अजून दोन किमी तरी असावे. सौम्याला आम्ही इथे मागे टाकले. मला आश्चर्य ह्याचे वाटले की सौम्या घोड्यावर होता, आम्ही शक्ती नसलेले पायी चालतोय, तरी आम्ही पुढे, काही तरी घोळ आहे, कुठून ही शक्ती येतेय की दोन तेवढ्या बर्‍या नसलेल्या साथीदारांसोबत चालूनही घोड्याच्या स्पीडला आम्ही मॅच करत आहोत.

एक उतार लागला, तो उतार उतरल्यावर, कॅम्प ऑलमोस्ट आलाच. तिथे एक छोटा ओहोळ आहे. तिथे बसलो. आता १०० मिटर वर कॅम्प दिसत होता. दोन मिनिटे बसावे हा विचार केला. श्वास घेण्यासाठी लागणारी एनर्जी देखील आणावी लागत होती. तिथून (ओहोळापासून) उजवीकडे पाहिले आणि जोरात चिरकलो, O My God! O My God!. कैलास, कैलास !! बसल्या जागेवरूनच कैलासाचा नॉर्थ फेस मला दिसत होता आणि संपूर्ण शक्ती अंगात परत संचारत आहे की काय असा भास होत होता !

आज चरण स्पर्शला जायचे होते. कॅम्प पासून ती जागा आणखी पुढे २ एक किमी आहे. इतके चालल्यावर चरण स्पर्श आपण करायचे नाही, जाऊ दे. असे भीम आणि कैलासीने दोघेही त्या १२ किमी मध्ये म्हणाल्यामुळे चरण स्पर्शाचा विचार सोडला होता. पण आज दुसर्‍यांदा शक्ती संचार तर झाला होता, मग कॅम्प वर नुसतेच बसून राहणार का?

- माझ्या कैलास मानसरोवर ट्रेक / यात्रेतून.

कैलास नॉर्थ फेस !

कैलास चरण स्पर्शासाठी जाताना लागणारे ग्लेशियर !

कैलास - मलारिबा आणि वज्रपाणी सोबत.

पवित्रअश्या याकच्या शिंगातून कैलास मानसरोवर.

आणि यमद्वारापासून कैलास. ते छोटे मंदिर म्हणजेच यमद्वार !!

राक्षस ताल

अजून एक व्हियू

डोल्मा पास चढताना अचानक कैलास दिसतो.

मान सरोवर आणि कैलास

माझ्या पूर्ण प्रवासात मी अनेक गोष्टी पाहिल्या, अनुभवल्या, त्या सर्वच मला आता आठवणार नाहीत कदाचित, पण जे काही आठवेल, त्यामुळे तो पूर्ण प्रवास परत एकदा अनुभवल्या जाईल हे नक्की !

लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग २
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ३
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ४
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ५
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ६
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ७

Group content visibility: 
Public - accessible to all site users

संपूर्ण शक्ती अंगात परत संचारत आहे की काय असा भास होत होता ! >> हीच तर खरी त्या निसर्गाची किमया!

फोटोज मस्तच!

ड्रायविंग वेकेशनसारखी लेखमाला आहे का पुढे? नसेल तर लिहाच! हा टीजर झालेला आहेच Happy
अनया नी लिहिलिल्या लेखमालेमुळे या यात्रेला जायचं पक्कं होत जातंय...

"दोघे गळालेले महारथी आणि मी एकटाच दांडी यात्रेला निघाल्या सारखा पुढे पुढे जातोय ! सारखे परत मागे वळून थांबून दोघांना, चला झालेच, उठा पटकन असे काहीसे असंबद्ध बरळत होतो. आणि त्यांना सांगताना माझे मला बजावून सांगत होतो, की आता थोडेसेच, तो टर्न, नंतर तो डोंगर, ते वळण असा विचार करत होतो."...........अगदी मस्त वर्णन केले आहे. मी सुद्धा रोज जीम मध्ये धावताना असेच काहीतरी असंबद्ध स्वतःला सांगत असते. फोटो आणि वर्णन अगदी मस्त. पुढील भागाची नक्की वाट पाहू.

टीजर मस्त .. मान सरोवर आणि कैलास असा एकत्र पहिला फोटो फार आवडला! Happy

ह्या जागेला एक नॉन-ट्रॅडिशनल, गुढ सौंदर्य आहे ..

जावंसं तर वाटतंय पण जमेल की नाही हेही कळत नाही ..

Pages