मी एक पुणे पर्यटक..

Submitted by सई. on 1 September, 2014 - 08:01

पुण्यात येऊन, स्थायिक होऊन, बरीच वर्षं झाली आता. कोल्हापुरात जितकी वर्षं राहिले त्याहीपेक्षा जास्त. म्हणजे मी आता पुणेकरच खरंतर. तरीही इतक्या वर्षांत नेहमीची ८-१० यशस्वी ठिकाणं सोडल्यास मी पुणं मुद्दाम वेळ काढून पाहिलंच नाही कधी. तो विचार मात्र होता, मनातल्या कुठल्यातरी सांदी-कोप-यात मुटकुळं करून पडून.

सध्या भारताबाहेर वास्तव्य असणारी मैत्रिण पुण्यात आल्यावर म्हणाली, एक पूर्ण दिवस सोबत घालवू या आपण. तेव्हा मग पर्यायांचा विचार करताना हा 'पुणे दर्शना'चा विचार उसळी मारून पृष्ठभागावर आला आणि आनंदाने एकमताने मंजूरही झाला. लगेच सोयीचा दिवस ठरवून बुकिंगही करून टाकलं.

खुप उत्सुकता होती या एकंदर सहलीची. काय काय दाखवतील, वेळ कसा पुरेल, कसा अनुभव असेल, दगदग होईल का.. वगैरे उगीचच वायफळ शंकाही होत्या. सहलीहून परतताना ह्याच शंकेचा फोलपणा जाणवून हसू आलं खुप.

पूर्ण दिवसभराची, अत्यंत उत्तम सहल आहे ही. स्थळांनुसार मार्गांचे आणि वेळेचे योग्य नियोजन, स्थलदर्शनासाठी पुरेसा अवधी, वेळेचे काटेकोर पालन, प्रत्येक ठिकाणाची नियमांसकट उत्तम माहिती देणारे गाईड, उत्तम स्थितीतली, माफक सजावट केलेली स्वच्छ हवेशीर बस, गाईड आणि वाहकाचं पर्यटकांप्रती सुहास्य वदने आदबीचं वर्तन, हे सगळं खुप सुखावणारं चित्र होतं.

केसरीवाडा, सावरकर स्मारक (बाह्यदर्शन), शनिवारवाडा, लाल महाल, आगाखान पॅलेस, शिंदे छत्री, वीर योद्धे स्मारक, कात्रज प्राणी संग्रहालय, बागुल उद्यानाशेजारचं महालक्ष्मी मंदिर, सारसबाग, पु.ल. देशपांडे उद्यान, राजा केळकर संग्रहालय, चतु:शृंगी मंदिर, डॉ. आंबेडकर संग्रहालय.. ही स्थळं आम्ही पाहू शकलो. काही पार्किंगच्या अडचणीमुळे तर काही रविवारच्या सुट्टीमुळे पाहता आली नाहीत. उदा. महात्मा फुले वाडा, जोशी रेल्वे संग्रहालय, आदिवासी वस्तू संग्रहालय, श्रीमंत दगडूशेठ गणेश मंदिर, पुणे विद्यापीठ (बाह्यदर्शन) वगैरे. पाहिलेल्या स्थळांकडे नजर टाकल्यास मार्गाच्या आखणीची साधारण कल्पना येऊ शकेल. हे सगळं पाहताना, बसमधून जाता-जाताच डेक्कन जिमखाना, आप्पा बळवंत चौक, कर्वे रस्ता, बाजीराव रस्ता, चितळेंचं दुकान, विश्रामबाग वाडा, तुळशीबाग, लक्ष्मी रस्ता, सिंहगड रस्ताही आपसुकच कव्हर केले गेले, त्यांचीही महत्वाचे रस्ते, पुण्याची ओळख असलेली ठिकाणं म्हणुन विशेष माहिती देण्यात आली. मला हे खुप महत्वाचं वाटलं आणि आवडलं. या वेळापत्रकात वेळेअभावी पर्वती, खडकवासला, सिंहगड ही महत्वाची ठिकाणं समाविष्ट होऊ शकत नाहीत. पुढेमागे मुदत वाढवून एका मुक्कामाची सहल झाली तर पुण्याची ओळख अगदी परिपूर्ण होईल.

सहलीचा पहिला भाग थोडा निवांत तरीही खुप सारी स्थळं सामावलेला आहे. जेवणानंतर भेट द्यायची स्थळं मात्र जरा वेळखाऊ आणि तुलनेने किंचीत जास्त पायपीटीची आहेत. पण मार्गानुसार पाहिल्यास ते होणं क्रमप्राप्त आहे. सगळी ठिकाणं तुम्ही पाह्यलाच हवीत असं अर्थातच नाही, त्यामुळे दगदग होईल असं वाटल्यास एखादं स्थळ न बघता ती टाळता येऊ शकते. दिलेल्या अवधीत प्रत्येक स्थळ बघून होईलच असेही नाही, पण त्या स्थळाचं स्वरूप आणि महत्व समजण्याइतका तो नक्कीच पुरेसा असतो, जेणे करून आपण पुन्हा जाऊन निवांतपणे ते पाहू शकतो. एक बाब आवर्जून नमुद करावीशी वाटते की भेट दिलेली सर्वच स्थळं उत्तम देखरेख असलेली, तिकिटांची सोय असलेली, प्रभाव पाडणारी आहेत. बहुतेक सर्व ठिकाणी उत्तम स्वच्छतागृहांचीही सोय आहे.

आम्ही तिघी मैत्रिणी, त्यापैकी दोघी आपापल्या मुलांसकट, असे पाच जण होतो. आम्ही आणि मुलांनीही सर्व स्थळे पाहिली. दमणूक मुळीच झाली नाही कारण स्थळ-भेटींदरम्यान बसमधे आपल्याला आरामच मिळतो. अतिशय आल्हाददायक हवेमुळे प्रसन्न वातावरण होते. योगायोगाने आमच्यासोबत आमच्यासारखेच पुणं बघायच्या इच्छेने आलेले पुणेकर खुप होते, अख्खी मिनीबस मराठी लोकांनीच भरली होती. "पुणे दर्शन कसलं करताय, रविवार आहे तर गप घरात पडून रहा.. हेहे पुण्यात काय आहे बघण्यासारखं.. काहीही करतात लोकं.." अशा न विचारताही आगाऊपणे आलेल्या हेटाळणीयुक्त अभिप्रायांच्या पार्श्वभूमीवर तर ही बाब मला आनंदाची वाटली, की आहेत बाबा आमच्यासारखे आणखी काही वेडपट लोकं! विशेष आनंद ह्याचा झाला की दैनंदीन सेवा असूनही बसचे आगाऊ आरक्षण करावे लागते. पूर्ण पैसे भरून आरक्षण केलेले असूनही कुणी येवो अगर न येवो, बस वेळेवरच सुटते, ही आणखी एक कौतुकाची गोष्ट.

आम्ही सगळ्यांनी या सहलीचा पुरेपूर आनंद घेतला. जेवणाच्या डब्यांसोबत भरपूर खाऊही नेला होता, वाटेत खिडकीतून बाहेर बघत तो खाऊ खायला खुप मजा आली. स्थलदर्शनासाठी उतरताना ओझी बसमधेच ठेऊन सुटं, मोकळं फिरत होतो. सारसबागेजवळ जेवायला बस थांबल्यावर बाकी सगळे हॉटेलमधे जेवायला गेले तेव्हा आम्ही मात्र बागेतल्या हिरवळीवर वर्तमानपत्रे पसरून डबे उघडून मस्त पिकनिक लंच घेतलं. मुले तेवढ्याच वेळात तिथे भरपूर खेळलीही. मला व्यक्तिशः बाजीराव रोडवर, लक्ष्मी रोडवर असं बसमधून फिरताना, आपली बस इथे थांबणार नाही आणि त्यात धक्काबुक्की होणार नाही या प्रत्यक्षातल्या कल्पनेने खुपच गंमत वाटली.

मला पुणं आवडतं. मला आणि माझ्या मुलाला सार्वजनिक वाहनांनी फिरायला भयंकर आवडतं. त्यामुळे सहल आवडणार हे गृहीत होतं. पुण्यातून असं एका दिवसभरासाठी नवं, अनोळखी होऊन फिरताना मनात अनेक विचार येत होते. पुण्याबाहेरून आलेल्यांना काय काय दाखवायला हवं ते लक्षात आलं. मी त्यांना पुणं फिरवताना मुळात मी पुण्याकडे कसं पाह्यला हवं हे समजलं. प्रशासन ज्या चांगल्या गोष्टी करतंय, त्याची दखल घेऊन त्याबद्दल कौतुकाची थापही पुणेकर नागरीक या नात्याने मी द्यायला हवी, हे जाणवलं. वाहतुकीच्या कोंडीत अडकलेलं असताना दिसणारं पुणं, अव्यवस्था असणारं पुणं ओलांडून त्यापलिकडच्या पुण्याकडे बघायला मला या सहलीची अतिशय मदत झाली. कारण अशी अव्यवस्थेची बाजू ही प्रत्येक शहराला असते, ती काही एकट्या पुण्यालाच नाही. इतिहास-वर्तमानाशी एकाच वेळी घट्ट नाळ असलेली अभिमानास्पद स्थळं, २५० शाळा, १८० कॉलेजेस, ४० सिनेमागृहे, १० नाट्य्गृहे, ४० आयटी पार्क्स, अगणित बागा आणि नदी-ओढ्यांवरचे पूल, रस्त्यांचं आणि आता उड्डाणपूलांचं जाळं, हर एक वस्तूची जुनी-नवी बाजारपेठ, सणावारांची खासियत, पारंपरीक आणि आधुनिकतेचा उत्कृष्ट मिलाफ असलेलं खाद्यजीवन.. हो, इथे काहीच उणं नाही.

केवळ एक दिवस वेगळा काढल्यामुळे मला पुण्याकडे बघण्याचा असा सुंदर नजरिया मिळाला. बाहेरून आलेल्या पर्यटकालाही तोच मिळत असणार. हा दृष्टिकोन पुढे पास करणं मला आवश्यक वाटलं. पुणे दर्शनाच्या या आढाव्याचा तोच मुख्य हेतू. त्यासाठीच स्थळांचं वर्णन कटाक्षाने टाळलं, जे अतिशय मोलाचं आहे, ज्यावेळी तुम्ही पुणे सहलीला जाल, आणि मी तर सुचवेन नक्की जाच, मुलाबाळांसकट, कुटुंबिय, मित्रमंडळींसह, तेव्हा प्रत्यक्ष त्या स्थळीच गाईडकडून ऐकताना काय वाटतं ते अनुभवण्यासारखं आहे...

तुमचेही अनुभव इथे शेअर करा, ते सर्वांसाठी सोयीचं होईल.

माहिती - सहलीसाठी माणशी रु. 300/- तिकीट आहे, ज्या त्या ठिकाणची एण्ट्री फी आणि जेवण हा खर्च त्यात समाविष्ट नाही.
http://www.pmpml.org/Charges&Bookings.php
फोन नं 020-25510069

ताजा खबर - पीएमपीएमएलने पुणे दर्शनसाठी नव्या बसेस आणल्या आहेत. प्रथमदर्शनी तरी प्रसन्न दिसतायत.
https://www.google.co.in/search?q=pune+darshan+bus+photos&espv=2&biw=128...

इथे पुणे दर्शनचा साधारण सचित्र कार्यक्रम आहे. http://blog.travelyaari.com/pune/pune-darshan/

इथे दिवसभरात भेट देण्याच्या ठिकाणांचे वेळापत्रक आहे. https://www.google.co.in/imgres?imgurl=http%3A%2F%2Fwww.geodirect.in%2Fw...

मे महिन्यात पुणे मिररला पुण्याचे थीम बेस्ड दर्शन करवणार असल्याचीही बातमी होती, उदा. शैक्षणिक, सांस्कृतिक वगैरे. आत्ता ती लिंक नेमकी मिळत नाहीये. कुणाला मिळाली तर प्लीज इथे जरूर द्या.

आता शाळा सुरू झाल्यात. ही माहिती द्यायला उशीर झालाय, तरीही माहिती एकत्र असावी म्हणुन लिंक्स अ‍ॅड करून ठेवल्या आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच लिहीलयस सई. मध्यंतरी पु. ल. उद्यानात पुणे दर्शन विषयी वाचले होते. पण उत्सुकता होती या प्रकाराबद्दल. तू खुप्च छान वर्णन केलेस. आता एक सुट्टी नक्की अशी घालवता येइल.

एखादे गटग नक्की होइल बघ या धाग्यावरुन ठरवुनच Happy

शक्य झाल्यास बुकींग्ची प्रक्रीया / फोन नंबर / वेबसाईट शेअर कर.

सई, खूप सुरेख लिहिलंयस. अतिशय भावला हा लेख. बरेचदा आपलं शहरच मुद्दाम फिरून पाहिलं जात नाही हे खरंय. पुणेदर्शनाची इतकी छान सोय आहे हे वाचून आनंद झाला.

मुंबईतही रोज असंख्य मुंबई दर्शनच्या प्रायव्हेट बसेस फिरताना दिसतात.

अरे वा, छान लिहिलंय.. ( मुंबईत बच्चनदर्शन असा पण एक आयटम असतो Happy )
मला पण सगळं असं बघायचंय... दोस्त मंडळींना भेटायचे अतिमहत्वाचे काम असल्याने पुणे दर्शन होतच नाही Happy

मस्तच सई.

हा लेख लिहिलास ते बरं झालं. मी नवऱ्याला लग्न झाल्यापासून सांगतेय की पुणे दर्शन सहल करूया पण राहिलीच ती. आता हा लेख त्यालापण वाचायला देईन, बघूया शक्य झालं तर करेन.

मनोगत छान आहे. बरीच वर्ष पुण्यात असूनही ही सर्व ठिकाणं मुद्दाम पाहण्यात एक वेगळा आनंद असू शकतो हे लेखावरून लक्षात आलं. Happy

दिनेशदा आमच्याकडे नॉर्थचे पाहुणे पहिल्यांदा आले की बच्चन, शहारुक, सलमान आणि सचिन तेंडुलकर असा बेत असतो. पण आम्ही फक्त बाहेरूनच दाखवतो. दरवेळी एवढा गोतावळा घेऊन कुठे दुसर्याकडे जेवायला नाहीतर चहाला जायचं?

मस्त !
मला पुणे आवडतेपासून सुरू झालेला सेकंडलास्ट पॅरा वाचून मलाही पुणेदर्शन करावेसे वाटू लागलेय.

आणि, "सुहास्य वदने आदबीचं वर्तन.." यात काहीही आतिशयोक्ती वा विनोद नसेल तर नक्कीच Wink

अवांतर - कोणीतरी दूरचे पाहुणे येतील आणि मलाही आमच्या मुंबईदर्शनला नेतील अशी इच्छा कितीतरी दिवसांपासून पेन्डींग आहे Happy

मामी हो ना, शिवाय सूनबाईंना, गौरीला, भाईला आणि अंजलीला कुठे चांगला चहा करता येतो ?

वरच्या सईच्या यादीतल्या अनेक ठिकाणांची मी फक्त नावेच ऐकलीत !

छान लिहिलं आहेस सई Happy

आम्ही पण नक्की जाऊ ह्या सहलीला. सहलीचे डिटेल्सही दे ना प्लीज इथे ( नंबर, वेबसाईट इत्यादी )

अरे वा, सई! मस्त अनुभव पदरी पडला की! मलाही कितीतरी दिवस बदललेलं आणि नवं वसलेलं पुणं बघायची इच्छा आहे.
जुनं पुणं बरेचदा पाहिलं जातं. पण नवी उपनगरे, वसाहती यांचा फेरफटका अजूनही जमलेला नाही. अशा भागात फक्त कामानिमित्ताने किंवा कोणाची भेट घेण्यापुरते जाणे होते. हिंडणे होत नाही.

शाळेत असताना आम्हांला एका वर्षी पुणे दर्शनाची सहल होती. त्यात शनिवारवाडा, लाल महाल, राजा केळकर संग्रहालय, आगाखान पॅलेस येथील म. गांधी स्मारक, पुणे विद्यापीठ, चतु:श्रृंगी, शिंदे छत्री, महात्मा फुले संग्रहालय ही स्थळे पाहिली होती. सारसबाग, पर्वती त्या सहलीत होते की नाही ते आठवत नाही.
याच धर्तीवर पुण्यातल्या उद्यानांची सहल काही उपक्रमांतून घडवली जाते, ऐतिहासिक वास्तूंची सहल असते, विज्ञानाची आवड असलेल्यांसाठी सहली असतात. त्यांबद्दलची माहिती आता अपडेट करायला हवी. Happy

पुण्याबद्दल इतकं चांगलं कुणीतरी लिहिलेलं बघून भरून आलं >> वरदा हो ना.. Lol
नाहीतर सतत आपलं पुणेकरांच्या आदरातिथ्या(?) बद्दल, नाहीतर सानुनाशिक आणि खोचक बोलनशैलीबद्दल अथवा कंजूसपणावरच चर्चा सुरू असतात.

मस्तच की सई!
जनवाणी तर्फे कल्चर वॉ क पण असतात. जुन्या वास्तू ,देवळ, इतिहास आणि अगदी कुंभारवाड्यात , तांबट आळीतील वर्कशॉप्स सकट. तुला पुढच्या कार्यक्रमाबद्दल कळावीन.

वा.
छानच.
जरा बुकिंग कुठे करावे लागते खर्च किती वैगेरे डिटेलात द्या ना.

बाकी मला
<<, प्रत्येक ठिकाणाची नियमांसकट उत्तम माहिती देणारे गाईड, उत्तम स्थितीतली, माफक सजावट केलेली स्वच्छ हवेशीर बस, गाईड आणि वाहकाचं पर्यटकांप्रती सुहास्य वदने आदबीचं वर्तन, हे सगळं खुप सुखावणारं चित्र होतं.>>
हे वाचून सार्कॅस्टिकली आहे की काय असे वाटले होते पण उलगडा झाला.

>>>केवळ एक दिवस वेगळा काढल्यामुळे मला पुण्याकडे बघण्याचा असा सुंदर नजरिया मिळाला<<<

अहो पुणं आहेच तसं! लोक पुणेकरांना आणि पुण्याला नावं ठेवतात आणि इथेच आयुष्ये घालवतात.

एक शुद्ध पुणेकर!

-'बेफिकीर'!

सर्वांचे आभार.
मी डेक्कनवरून थेट बुकींग केलं होतं पण ऑनलाईन बुकींग आणि तपशीलांसकट माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे. फोन नं 020-25510069.. वेबसाईट उद्या देते. रु. 300/- प्रत्येकी तिकीट आहे, ज्या त्या ठिकाणची फी आणि जेवण हा खर्च त्यात समाविष्ट नाही.

वाहक आणि गाईडबद्दल लिहीलेलं अजिबातच उपरोधिक नाही. मी स्वत: बरीच वर्षं अगदी ऐन सदाशिव पेठेत राहूनही कधीच पुणेरी म्हणतात तसा अनुभव घेतला नाही. स्वभावाचे नमुने सगळीकडे असतात, तीही काही एकट्या पुण्याची मक्तेदारी नाहीच. असो.

दिनेश, पुढच्या वेळी दोस्तांना असेच भेटा Happy
मामी, थँक्स..
इन्ना, नक्की सांग गं.. Happy
वर्षा, अगो, जाऊन या..

सई मस्त लिहील्यस.

मी गेल्या वर्षी घरी आलेल्या पाहुण्यांना मुंबई दर्शन ला घेऊन गेले होते. जाण्याच्या आधी मनात येत होतं की काय आहे या मुंबईत बघण्यासारखं? पण दिवसभर मुंबई वेगळ्या नजरेने बघितली आणि माझं मुंबई बद्दलचं मत बदलून गेलं

सुन्दर लिहिल आहेस.फेसबुकवर तुझ्या मैत्रिणीनी टाकलेले फोटो पहिले होते.
स्थळ वर्णनासाठी दुसरा लेख लिही.

पुण्याबद्दल एवढे चांगले लिहिलेले पाहून खरोखर भरुन आले ...

(नाहीतर नेहेमीची रडगाणी ऐकून तसा विटलोच होतो खरं तर... )

सई - खूप सुंदर आणि कसलाही आव न आणता लिहिले आहेस हे - शतशः आभार ...

अरे वा! मस्त लिहिलंय Happy
शाळेत असताना ठाण्यातून पुण्याला जाऊन ही सहल केली होती. हे वाचून जाणवलं, की आता लेकालाही असं फिरवून आणलं पाहिजे.

चांगले लिहिले आहे.. तुमचे लिखाण नेहमीच पॉझिटिव्ह असते..चांगले वाटते वाचायला.

ड्रायव्हिंग आणि गाडी पार्क करायला लागणार नसेल तर सगळे पुणंच प्रेक्षणीय स्थळ आहे. मी वीकेंडच्या एखाद्या दिवशी काही काम नसेल तरी शहरात जातो. पीएमपीने शिवाजीनगरला (सी ओ ई पी मैदानाच्या) स्टॉपवर उतरुन जंगली महाराज रोड - संभाजी पार्कवरुन.. डेक्कन ..लकडी पुल्,..कुमठेकर रोड.. लक्ष्मी रोड, एबीसी, शनवार वाडा इ. करत परत मनपा ला येतो. पायी चालतानाही हा प्रवास मला खुप आवडतो. मी २० वर्षापुर्वी सी ओ ई पी ला असताना कॉलेजच्या हॉस्टेलपासुन "ममता"चा कचोरी/समोसा खाउन डेक्कन वरुन-लकडी पुल - अलका वरुन नव्या पेठेतल्या परमार्थ निकेतन मधे जात असे. संभाजी पार्कवरुन जाताना तिथे शेंगदाणे भाजताना येणारा जळक्या लाकडाचा वास आताही तसाच येतो. गरवारे पुलाजवंळ काही गॉगल्स्/अत्तराची दुकाने आहेत त्या जवळुन जाताना जो घमघमाट येतो तो आल्याशिवाय सिटीत आलो असे वाटतच नाही. एकदा जरुर असे भटकुन पहा.

मी काल वेबसाईट पाहिली पण त्यावर डिटेल्स नाहीत, फक्त ऑनलाईन बुकिंग होतंय.
मैत्रिण मला म्हणाली होती की सगळे डिटेल्स आहेत पण दिसत तरी नाहियेत.
http://www.pmpml.org/Charges&Bookings.php

पुणेकरांना लेख आवडल्याबद्दल विशेष आभार Happy
शशांक, माहितीपर लिहिल्यामुळे आव आणायला स्कोपच नव्हता Wink

सई....

तुम्ही कोल्हापूरच्या पण आता पुणेकर झाल्यामुळे त्या शहराविषयी आपुलकी वाटणे साहजिकच. तरीही एक "शहरफेरी करणारी पर्यटक" या नात्याने इतके सुंदर लिहिले आहे की असे वाटते ही मुलगी जणू काही प्रथमच त्या शहरात आली होती आणि तिने गाईडच्या सहकार्याने सारे शहर नजरेखाली घातले. वर्णनशैली तर अगदी चित्रमयच झाली आहे. माझ्यासारख्या वाचकाला, जो महिन्यातून एखादी फेरी टाकतो पुण्याला, वाटते की अरेच्या इतकी वर्षे आपण येतो पुण्यात पण एक शनिवारवाडा आणि पुणे विद्यापीठ सोडल्यास काय पाहिले आपण या शहरात ? आता मात्र तुमच्या लेख वाचनानंतर तीव्र जाणीव होत आहे की वरील वेबसाईटच्या आधारे आपणही एक दिवस असा काढावा आणि पुण्यनगरीचे मनसोक्त दर्शन घ्यावे.

Pages