मी एक पुणे पर्यटक..

Submitted by सई. on 1 September, 2014 - 08:01

पुण्यात येऊन, स्थायिक होऊन, बरीच वर्षं झाली आता. कोल्हापुरात जितकी वर्षं राहिले त्याहीपेक्षा जास्त. म्हणजे मी आता पुणेकरच खरंतर. तरीही इतक्या वर्षांत नेहमीची ८-१० यशस्वी ठिकाणं सोडल्यास मी पुणं मुद्दाम वेळ काढून पाहिलंच नाही कधी. तो विचार मात्र होता, मनातल्या कुठल्यातरी सांदी-कोप-यात मुटकुळं करून पडून.

सध्या भारताबाहेर वास्तव्य असणारी मैत्रिण पुण्यात आल्यावर म्हणाली, एक पूर्ण दिवस सोबत घालवू या आपण. तेव्हा मग पर्यायांचा विचार करताना हा 'पुणे दर्शना'चा विचार उसळी मारून पृष्ठभागावर आला आणि आनंदाने एकमताने मंजूरही झाला. लगेच सोयीचा दिवस ठरवून बुकिंगही करून टाकलं.

खुप उत्सुकता होती या एकंदर सहलीची. काय काय दाखवतील, वेळ कसा पुरेल, कसा अनुभव असेल, दगदग होईल का.. वगैरे उगीचच वायफळ शंकाही होत्या. सहलीहून परतताना ह्याच शंकेचा फोलपणा जाणवून हसू आलं खुप.

पूर्ण दिवसभराची, अत्यंत उत्तम सहल आहे ही. स्थळांनुसार मार्गांचे आणि वेळेचे योग्य नियोजन, स्थलदर्शनासाठी पुरेसा अवधी, वेळेचे काटेकोर पालन, प्रत्येक ठिकाणाची नियमांसकट उत्तम माहिती देणारे गाईड, उत्तम स्थितीतली, माफक सजावट केलेली स्वच्छ हवेशीर बस, गाईड आणि वाहकाचं पर्यटकांप्रती सुहास्य वदने आदबीचं वर्तन, हे सगळं खुप सुखावणारं चित्र होतं.

केसरीवाडा, सावरकर स्मारक (बाह्यदर्शन), शनिवारवाडा, लाल महाल, आगाखान पॅलेस, शिंदे छत्री, वीर योद्धे स्मारक, कात्रज प्राणी संग्रहालय, बागुल उद्यानाशेजारचं महालक्ष्मी मंदिर, सारसबाग, पु.ल. देशपांडे उद्यान, राजा केळकर संग्रहालय, चतु:शृंगी मंदिर, डॉ. आंबेडकर संग्रहालय.. ही स्थळं आम्ही पाहू शकलो. काही पार्किंगच्या अडचणीमुळे तर काही रविवारच्या सुट्टीमुळे पाहता आली नाहीत. उदा. महात्मा फुले वाडा, जोशी रेल्वे संग्रहालय, आदिवासी वस्तू संग्रहालय, श्रीमंत दगडूशेठ गणेश मंदिर, पुणे विद्यापीठ (बाह्यदर्शन) वगैरे. पाहिलेल्या स्थळांकडे नजर टाकल्यास मार्गाच्या आखणीची साधारण कल्पना येऊ शकेल. हे सगळं पाहताना, बसमधून जाता-जाताच डेक्कन जिमखाना, आप्पा बळवंत चौक, कर्वे रस्ता, बाजीराव रस्ता, चितळेंचं दुकान, विश्रामबाग वाडा, तुळशीबाग, लक्ष्मी रस्ता, सिंहगड रस्ताही आपसुकच कव्हर केले गेले, त्यांचीही महत्वाचे रस्ते, पुण्याची ओळख असलेली ठिकाणं म्हणुन विशेष माहिती देण्यात आली. मला हे खुप महत्वाचं वाटलं आणि आवडलं. या वेळापत्रकात वेळेअभावी पर्वती, खडकवासला, सिंहगड ही महत्वाची ठिकाणं समाविष्ट होऊ शकत नाहीत. पुढेमागे मुदत वाढवून एका मुक्कामाची सहल झाली तर पुण्याची ओळख अगदी परिपूर्ण होईल.

सहलीचा पहिला भाग थोडा निवांत तरीही खुप सारी स्थळं सामावलेला आहे. जेवणानंतर भेट द्यायची स्थळं मात्र जरा वेळखाऊ आणि तुलनेने किंचीत जास्त पायपीटीची आहेत. पण मार्गानुसार पाहिल्यास ते होणं क्रमप्राप्त आहे. सगळी ठिकाणं तुम्ही पाह्यलाच हवीत असं अर्थातच नाही, त्यामुळे दगदग होईल असं वाटल्यास एखादं स्थळ न बघता ती टाळता येऊ शकते. दिलेल्या अवधीत प्रत्येक स्थळ बघून होईलच असेही नाही, पण त्या स्थळाचं स्वरूप आणि महत्व समजण्याइतका तो नक्कीच पुरेसा असतो, जेणे करून आपण पुन्हा जाऊन निवांतपणे ते पाहू शकतो. एक बाब आवर्जून नमुद करावीशी वाटते की भेट दिलेली सर्वच स्थळं उत्तम देखरेख असलेली, तिकिटांची सोय असलेली, प्रभाव पाडणारी आहेत. बहुतेक सर्व ठिकाणी उत्तम स्वच्छतागृहांचीही सोय आहे.

आम्ही तिघी मैत्रिणी, त्यापैकी दोघी आपापल्या मुलांसकट, असे पाच जण होतो. आम्ही आणि मुलांनीही सर्व स्थळे पाहिली. दमणूक मुळीच झाली नाही कारण स्थळ-भेटींदरम्यान बसमधे आपल्याला आरामच मिळतो. अतिशय आल्हाददायक हवेमुळे प्रसन्न वातावरण होते. योगायोगाने आमच्यासोबत आमच्यासारखेच पुणं बघायच्या इच्छेने आलेले पुणेकर खुप होते, अख्खी मिनीबस मराठी लोकांनीच भरली होती. "पुणे दर्शन कसलं करताय, रविवार आहे तर गप घरात पडून रहा.. हेहे पुण्यात काय आहे बघण्यासारखं.. काहीही करतात लोकं.." अशा न विचारताही आगाऊपणे आलेल्या हेटाळणीयुक्त अभिप्रायांच्या पार्श्वभूमीवर तर ही बाब मला आनंदाची वाटली, की आहेत बाबा आमच्यासारखे आणखी काही वेडपट लोकं! विशेष आनंद ह्याचा झाला की दैनंदीन सेवा असूनही बसचे आगाऊ आरक्षण करावे लागते. पूर्ण पैसे भरून आरक्षण केलेले असूनही कुणी येवो अगर न येवो, बस वेळेवरच सुटते, ही आणखी एक कौतुकाची गोष्ट.

आम्ही सगळ्यांनी या सहलीचा पुरेपूर आनंद घेतला. जेवणाच्या डब्यांसोबत भरपूर खाऊही नेला होता, वाटेत खिडकीतून बाहेर बघत तो खाऊ खायला खुप मजा आली. स्थलदर्शनासाठी उतरताना ओझी बसमधेच ठेऊन सुटं, मोकळं फिरत होतो. सारसबागेजवळ जेवायला बस थांबल्यावर बाकी सगळे हॉटेलमधे जेवायला गेले तेव्हा आम्ही मात्र बागेतल्या हिरवळीवर वर्तमानपत्रे पसरून डबे उघडून मस्त पिकनिक लंच घेतलं. मुले तेवढ्याच वेळात तिथे भरपूर खेळलीही. मला व्यक्तिशः बाजीराव रोडवर, लक्ष्मी रोडवर असं बसमधून फिरताना, आपली बस इथे थांबणार नाही आणि त्यात धक्काबुक्की होणार नाही या प्रत्यक्षातल्या कल्पनेने खुपच गंमत वाटली.

मला पुणं आवडतं. मला आणि माझ्या मुलाला सार्वजनिक वाहनांनी फिरायला भयंकर आवडतं. त्यामुळे सहल आवडणार हे गृहीत होतं. पुण्यातून असं एका दिवसभरासाठी नवं, अनोळखी होऊन फिरताना मनात अनेक विचार येत होते. पुण्याबाहेरून आलेल्यांना काय काय दाखवायला हवं ते लक्षात आलं. मी त्यांना पुणं फिरवताना मुळात मी पुण्याकडे कसं पाह्यला हवं हे समजलं. प्रशासन ज्या चांगल्या गोष्टी करतंय, त्याची दखल घेऊन त्याबद्दल कौतुकाची थापही पुणेकर नागरीक या नात्याने मी द्यायला हवी, हे जाणवलं. वाहतुकीच्या कोंडीत अडकलेलं असताना दिसणारं पुणं, अव्यवस्था असणारं पुणं ओलांडून त्यापलिकडच्या पुण्याकडे बघायला मला या सहलीची अतिशय मदत झाली. कारण अशी अव्यवस्थेची बाजू ही प्रत्येक शहराला असते, ती काही एकट्या पुण्यालाच नाही. इतिहास-वर्तमानाशी एकाच वेळी घट्ट नाळ असलेली अभिमानास्पद स्थळं, २५० शाळा, १८० कॉलेजेस, ४० सिनेमागृहे, १० नाट्य्गृहे, ४० आयटी पार्क्स, अगणित बागा आणि नदी-ओढ्यांवरचे पूल, रस्त्यांचं आणि आता उड्डाणपूलांचं जाळं, हर एक वस्तूची जुनी-नवी बाजारपेठ, सणावारांची खासियत, पारंपरीक आणि आधुनिकतेचा उत्कृष्ट मिलाफ असलेलं खाद्यजीवन.. हो, इथे काहीच उणं नाही.

केवळ एक दिवस वेगळा काढल्यामुळे मला पुण्याकडे बघण्याचा असा सुंदर नजरिया मिळाला. बाहेरून आलेल्या पर्यटकालाही तोच मिळत असणार. हा दृष्टिकोन पुढे पास करणं मला आवश्यक वाटलं. पुणे दर्शनाच्या या आढाव्याचा तोच मुख्य हेतू. त्यासाठीच स्थळांचं वर्णन कटाक्षाने टाळलं, जे अतिशय मोलाचं आहे, ज्यावेळी तुम्ही पुणे सहलीला जाल, आणि मी तर सुचवेन नक्की जाच, मुलाबाळांसकट, कुटुंबिय, मित्रमंडळींसह, तेव्हा प्रत्यक्ष त्या स्थळीच गाईडकडून ऐकताना काय वाटतं ते अनुभवण्यासारखं आहे...

तुमचेही अनुभव इथे शेअर करा, ते सर्वांसाठी सोयीचं होईल.

माहिती - सहलीसाठी माणशी रु. 300/- तिकीट आहे, ज्या त्या ठिकाणची एण्ट्री फी आणि जेवण हा खर्च त्यात समाविष्ट नाही.
http://www.pmpml.org/Charges&Bookings.php
फोन नं 020-25510069

ताजा खबर - पीएमपीएमएलने पुणे दर्शनसाठी नव्या बसेस आणल्या आहेत. प्रथमदर्शनी तरी प्रसन्न दिसतायत.
https://www.google.co.in/search?q=pune+darshan+bus+photos&espv=2&biw=128...

इथे पुणे दर्शनचा साधारण सचित्र कार्यक्रम आहे. http://blog.travelyaari.com/pune/pune-darshan/

इथे दिवसभरात भेट देण्याच्या ठिकाणांचे वेळापत्रक आहे. https://www.google.co.in/imgres?imgurl=http%3A%2F%2Fwww.geodirect.in%2Fw...

मे महिन्यात पुणे मिररला पुण्याचे थीम बेस्ड दर्शन करवणार असल्याचीही बातमी होती, उदा. शैक्षणिक, सांस्कृतिक वगैरे. आत्ता ती लिंक नेमकी मिळत नाहीये. कुणाला मिळाली तर प्लीज इथे जरूर द्या.

आता शाळा सुरू झाल्यात. ही माहिती द्यायला उशीर झालाय, तरीही माहिती एकत्र असावी म्हणुन लिंक्स अ‍ॅड करून ठेवल्या आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवलिया आणि तिरसट>> ते त्या परिसरातल्या बहुतेक सर्व (विशेषतः मराठी) दुकानदारांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. उदा: प्रभा विश्रांतीगृह. मी फडतरे चौकापल्याडची यादी विचारात न घेतल्याने ती नावे नमूद केली नाहीत. नाहीतर बरीच लांबलचक यादी होईल. प्रभा च्या अलिकडे रमणबाग चौकात एक जेपीज म्हणून खाऊचं दुकान होतं. डोश्याचं तयार ओलं पीठ विक्रीला ठेवणं यांनी प्रथम पुण्यात सुरू केलं. मालकांनी ते दुकान कालांतराने विकले. आता मला वाटतं तिथे एक वेगळंच दुकान आहे

मलाही मुलांना घेऊन एक दिवस त्या बसने प्रवास करायचा आहे. धन्यवाद सई. Happy

रोज पुल देशपांडे उद्यानाकडुन ट्रॅफिकच्या उलट्या दिशेने येणारी पुणे दर्षनची बस पुण्याची ओळख म्हणजे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारे शहर अशीच करुन देते असे मला वाटते व खेद होतो. मोटर ड्रायव्हींग स्कुलवाले जेव्हा सिग्नल तोडताना दिसतात तेव्हाही असाच खेद होतो.

मी ज्या दिवशी जाईन त्या दिवशी अभिप्रायात हे नक्की लिहीन असे ठरवले आहे.

मस्त लेख. पुणे मस्तच आहे.

दिनेशदा आमच्याकडे नॉर्थचे पाहुणे पहिल्यांदा आले की बच्चन, शहारुक, सलमान आणि सचिन तेंडुलकर असा बेत असतो. पण आम्ही फक्त बाहेरूनच दाखवतो. दरवेळी एवढा गोतावळा घेऊन कुठे दुसर्याकडे जेवायला नाहीतर चहाला जायचं? >> मामी, या लिस्ट मधे सध्या अ‍ॅन्टिलिआ पण अ‍ॅड झाले आहे. Happy

श्री उपहार गृहातिल मिसळ आणि बटाटेवडा ह्यांना तोड नाही.
सारखी आठवण होत असते.
लहान पणी खुप खाल्ली, आता कीती खाउ शकेन सांगता येत नाही.

सर्वांना धन्यवाद.
टोचा, मी श्रीच्या मिसळीबद्दल अनेक उलटसुलट अभिप्राय ऐकलेत मात्र चाखायचा योग आजतागायत आलेला नाही!

केपी, तसं होत असेल तर त्यांना नक्कीच सांगायला हवं. आमची बस उलटी गेली नाही, तशीच पुढे राजाराम पूलावरून चतु:शृंगीच्या दिशेला गेली. नाहीतर आम्हीही हटकलं असतं.
नियम म्हणुनही आणि आखिर अपने शहर के प्रेस्टिज का भी सवाल है! जो अपने शहर से करे प्यार वाला प्रेस्टिज Happy

सुंदर लिहिलं आहेस सई. तुझा पॉझिटिव्ह अप्रोच आवडला.
राजा केळकर संग्रहालयात खूप वर्षात गेलेले नाही. परत जायला हवं आता. सकाळी दहाच्या सुमारास तिथे जवळपास रोजच पुणे दर्शनची बस मात्र बघितलेली आहे Happy त्यामुळे वक्तशीरपणाची खात्री आहे Proud

जे लोक पुण्यात शिक्षण, नोकरी, लग्न, करियर असं सगळं करूनही लोक 'तुमचं पुणं' म्हणत तुच्छतेने बोलतात त्यांना आता काहीच न बोलता या लेखाची लिंक देईन फक्त!

टोचा, मी श्रीच्या मिसळीबद्दल अनेक उलटसुलट अभिप्राय ऐकलेत मात्र चाखायचा योग आजतागायत आलेला नाही! >> सई बिनधास्त टेस्ट करा.. मस्त चव असते आणि अजिबात गुळ्माट नाही बेडेकर सारखी म्हणजे मिसळ म्हणता येईल अशीच आहे Happy टोचा म्हणतात तसे तिथला ब. वडा पण मस्त्च असतो. जंबो साईझ..

जे लोक पुण्यात शिक्षण, नोकरी, लग्न, करियर असं सगळं करूनही लोक 'तुमचं पुणं' म्हणत तुच्छतेने बोलतात त्यांना आता काहीच न बोलता या लेखाची लिंक देईन फक्त! >> अगदी अगदी पौर्णिमा.. पैका ईथे कमवायचा, शिक्षण ईथे घ्यायचे आणि पुण्याला आणि पुणेकरांना नावे ठेवायची..

गावातच कोंढाळ्करची मस्तानी पण छान असते.. स्वीट होम पासून खाली गेले की डाव्या हाताला आहे. जनता सहकारी च्या अलिकडे..

मी ही टूर शाळेत असताना केलेली आहे. वानवडी, शिंदे छत्री, आगाखान पॅलेस हे माहीत नसलेले भाग आपल्याच पुण्याचे आहेत हे कळल्यावर वेगळेच वाटले होते. पुणे प्रेम आहेच ते लेख वाचून वृद्धिंगत झाले.

माझे आवड्ते भाग, वेताळ टेकडी, कांचन गल्ली. ( इथे बारकासा बंगला असणे, फाट्कावर जुईचा वेल, पायरीवर बसून पुस्तक वाचत साबुदाणा खिचडी खाणे ही सुखस्वप्नांची परमावधि होती.) कमलानेहरू पार्क( भेळ! व तिथे एक वेलींचा मंडप आहे तिथे बसणे. भांडारकर रोड वरून चालत परत येणे, डेक्कनला व पुढे घरी. जोशी संग्रहालय बघितलेले नाही एकदा बघितले पाहिजे.

Happy Happy नक्की लंपन.

जे लोक पुण्यात शिक्षण, नोकरी, लग्न, करियर असं सगळं करूनही लोक 'तुमचं पुणं' म्हणत तुच्छतेने बोलतात>> खरंच, दुर्दैवानं हे मीही अनेकांकडून ऐकलंय आणि वादावादीही केली आहे. कृतघ्न असतात लोक. वर मान्यही करत नाहीत. पुण्याबद्दलच नाही पोटापाण्यासाठी, शिक्षणासाठी राहिलेल्या कोणत्याही गावाबद्दल ही अशी भावना असू नये.

श्री मिसळीपेक्षाही श्रीकृष्ण (तुळशीबाग), संजीवनी (टिळक रोड) यांच्या मिस्ळी तूफान असतात. रामनाथची मिसळ खूप तिखट आवडणार्‍यांनी खावी. हल्ली त्यांना तिखट मागीतली तर ते फक्त वरचे लाल तेलच देतात तर्री म्हणुन.

असो. सई मला परत उलटी येताना दिसली ती बस तर अगदी पेठी पुणेकराप्रमाणे थांबवुन दम भरायचा विचार आहे. Happy

राजा केळकरच्या बरोब्बर मागे माझे घर होते. त्या केळकरांचे घर आमच्याच गल्लीत होते. फार्फार पूर्वी जेव्हा ते महानगरपालीकेच्या ताब्यात गेले नव्हते तेव्हा आम्ही लपाछपी खेळायला व काहीच खेळायचे नसले की कुतुहल म्हणुन जाऊन यायचो. तिथले अदकित्ते, खिडक्या व पुरातन कालीन भांडी बघणे हा आमचा बालगोपालांचा छंद होता. असाच आणखी एक छंद म्हणजे भाऊ महाराज बोळात एक कल्हईवाला बसायचा. त्याला कल्हई लावताना बघणे हे स्वर्गसुख होते.

कोंढाळकरांची सुजाता मस्तानी स्वीटहोमपाशी नाहीये, निंबाळकर तालीम चौकात आहे.
मिसळ श्रीपेक्षाही तुबातल्या श्रीकृष्णची कधीही मस्त. श्रीची सा.खि चांगली असते/असायची. हो आणि फडतरे चौक, श्री मिसळ, सुजाता मस्तानी या दिशेने आणखी पुढे चालत राहिलं की टिळक रोड ओलांडून कल्पना भेळ Happy

पौर्णिमा <<जे लोक पुण्यात शिक्षण, नोकरी, लग्न, करियर असं सगळं करूनही लोक 'तुमचं पुणं' म्हणत तुच्छतेने बोलतात>> अगदी जियो! या वाक्यासाठी. इथे माबोवरही असे नमुने बघितले आहेत. अशांची खणानारळाने ओटी भरून्/शाल श्रीफळ देऊन स्वत:च्या गावी रवानगी केली पाहिजे. जा म्हणावं स्वस्थानी आणी मग बडबडा.
जिथे रहाता तिथल्या कुठल्याच शहराविषयी, गावाविषयी असं म्हणू नये.

अमा- कांचन गल्लीचं स्वप्न आवडलं. फार सुरेख परिसर आहे तो अजूनही.

कोंढाळकरांची सुजाता मस्तानी स्वीटहोमपाशी नाहीये, निंबाळकर तालीम चौकात आहे. >> आहे हो.. थोडी आतल्या बाजूला आहे. Happy एक काँप्लेक्स आहे (नाव लक्षात येत नाहिये) २-४ गारमेंटची दुकाने आहेत तिथे.

श्रीकृष्णची पण गोडसर असते सो ती नाही आवडत तितकीशी Happy

कल्पना भेळ, पुष्कर्णी भेळ, नुमविच्या मागच्या खाऊगल्लीतली प्रविण भेळ, शिवाजीनगर स्टेशनबाहेरची भेळ आहाहा!!

शिवाजीनगर स्टेशनबाहेरची भेळ आहाहा! >> हो कांदापोहे.. मस्त असते झटका भेळ .. ते आजोबा मानेला झटका देऊन भेळ करायचे एकदम तल्लीन होऊन ..

वरदा.. आर यू गेटींग कन्फ्युज्ड अबाऊट कोंढाळकर??? कोंढाळकर मस्तानी हाऊस ह्या नावानीच दुकान आहे लंपन म्हणतो आहे ते.. सुजाता मस्तानी नाही.. ते वेगळे दुकान आता तर त्यांच्या शाखापण आहेत.. पूर्वी कसे आमची कोठेही शाखा नाही असे होते ना.. ते बदलले आहेत आता...

आण्णा बेडेकरांनी पण नवीन शाखा काढली आहे एम आय टी च्या जवळ...

मिसळीच्या बाबतीत पसंद अपनी अपनी... प्रत्येकाला वेगवेगळी टेस्ट आवडते.. सध्या बेडेकरांकडची मिसळ पण झणझणीत झालीये.. अर्थात बरोबरीने वांग आणि गूळ येतातच मधे मधे.. मग त्यापेक्षा तुबामधली श्रीकृष्णची चांगली असते... पण त्यांच्याकडे तर्रीत बटाटा घालतात..

मी बटाटा वगळून खाते Wink पण बेडेकरांचं वांगं वैताग आणतं. एकदा पुण्यात आल्यावर त्या मंगला टॉकिजपासच्या गाडीवरची मिसळ खाऊन बघायची आहे.

हो, कोंढाळकर आता 'फुटून' त्यांच्या शाखा झाल्यात ते नंतर लक्षात आले. पण मी अजून वरिजिनल सुजाताचीच पंखी आहे.

खरंतर बस उभी करायला गैरसोयीचं आहे म्हणून, नाहीतर तुबा मधलं रामाचं मंदिर आणि आसपासचा पारंपरिक गोष्टींचा आणि भांड्यांचा बाजार हे पण टूरिस्ट अ‍ॅट्रॅक्शन होऊच शकतं Happy

ती झटका भेळ खाऊन अनेको वर्षं झाली. अजून आहेत का ते आजोबा?

खरंतर बस उभी करायला गैरसोयीचं आहे म्हणून, नाहीतर तुबा मधलं रामाचं मंदिर आणि आसपासचा पारंपरिक गोष्टींचा आणि भांड्यांचा बाजार हे पण टूरिस्ट अ‍ॅट्रॅक्शन होऊच शकतं>>>>

राजा केळकर संग्रहालयापाशी गाडी उभी करुन पायी घेऊन जायच लोकांन तुबा मध्ये.. फक्त वेळेवर प्रचंड बंधन घालावे लागेल...

सई. बाकीच्या शहरात अशी ट्रीप केली की जेवायच्या वेळेस काही ठराविक ठिकाणी घेऊन जातात आणि तिथे आजूबाजूला ठरलेली दुकानेही असतात.. तर ह्या पुणे दर्शन ट्रीप मध्ये कुठे घेऊन जातात??

कोंढाळकर मस्तानी हाऊस ह्या नावानीच दुकान आहे लंपन म्हणतो आहे ते.. सुजाता मस्तानी नाही. >> +१

ती झटका भेळ खाऊन अनेको वर्षं झाली. अजून आहेत का ते आजोबा? >> नाहीत बहुदा .. आता त्यांचा मुलगा असतो..दिसले नाहित बरेच दिवसात.

एकदा पुण्यात आल्यावर त्या मंगला टॉकिजपासच्या गाडीवरची मिसळ खाऊन बघायची आहे.>> वरदा एकदा दोनदा पाहिली आहे पण हिम्मत नाही झाली तर्रीचा रंग पाहून Happy हिम्सकूल म्हणतो तसे मिसळच्या बाबतीत पसंद अपनी अपनीच खरे. ती एक काटाकिर्रची पण मस्त असते कलमाडी हाऊसच्या ईथली.

सुजाता मस्तानी अगदी चिंचवडात पण आहे. पण एकदम पीठूळ मिळते तिथे. गावातच चांगली मिळते. त्यांचे जोशी वडेवाल्यासारखे नको व्हायला म्हणजे मिळवली.

खरंतर बस उभी करायला गैरसोयीचं आहे म्हणून, नाहीतर तुबा मधलं रामाचं मंदिर आणि आसपासचा पारंपरिक गोष्टींचा आणि भांड्यांचा बाजार हे पण टूरिस्ट अ‍ॅट्रॅक्शन होऊच शकतं >> हैद्राबादेत चारमिनार पाशी सोडतात व एक तासाने पिक अप करतात तसे. जामा मस्जिद दुरून बघायची व चूडी बाजार मध्ये खरेदी !! पूनाके लोगां क्या बार्गेनिंग करते बावा. हरीक चीज पचास रुपैमेच होना बोल्ते.

हिमांशू, अरे मी सगळंच सांगून टाकलं तर लोकांना ट्रीपला गेल्यावर काही मजाच येणार नाही! (वॉअ‍ॅपवरची जीभ काढलेली बाहुली Proud )

वांगं, गुळ, बटाटा.. आणि पोहे पण Lol हेही घटक मिसळीत वापरतात हे खरंच पुण्यात आल्यावरच कळलं मला Happy

अशीच एक खादाडीची पण टूर आहे पुण्यात. मागे पुणे टाईम्स की मिररला आले होते परांजपे (?) आडनावाच्या मॅन ची आहे ही टूर. फार प्रसिद्ध नाही झाली अजून.

जिथे रहाता तिथल्या कुठल्याच शहराविषयी, गावाविषयी असं म्हणू नये.>>> +१. पण मुळात त्यासाठी त्या शहराच्या अंतरंगामधेय उतरून बघावं लागतं. मद्रासला चिकार नावं ठेवल्यानंतर ही मला आलेली अक्कल आहे.

अमा, अगदी Lol बाकी तुबा आणि राममंदिर परिसर खरंच असायला पहिजे या सहलीत. बायकांची कित्ती कित्ती सोय होईल. शिवाय पुरुषांना कटकट न वाटता बशीतच बसून रहाता येईल Wink
आणि खादाडीची ही काही काही मस्ट ठिकाणं पण पाहिजेत. पुणे स्पेशल खादाडीचा काहीच विचार केलेला नाही त्या लोकांनी! आत्ता तुम्ही सगळ्यांनी लिहिल्यावर लक्षात आलं माझ्या!

जिथे रहाता तिथल्या कुठल्याच शहराविषयी, गावाविषयी असं म्हणू नये. >>> खरंय. आणि जिथे राहिलेच नाहीयेत किंवा अगदी कमी काळ राहिलेत किंवा नुसतेच जाऊन येऊन तोंडओळख आहे त्या त्या शहरांबद्दलही बोलू नये. Proud

<मागे पुणे टाईम्स की मिररला आले होते परांजपे (?) आडनावाच्या मॅन ची आहे ही टूर.>

जयेश परांजपे.

बेडेकरांची कोथरुडातली शाखा बंद झाली.

Pages