मी एक पुणे पर्यटक..

Submitted by सई. on 1 September, 2014 - 08:01

पुण्यात येऊन, स्थायिक होऊन, बरीच वर्षं झाली आता. कोल्हापुरात जितकी वर्षं राहिले त्याहीपेक्षा जास्त. म्हणजे मी आता पुणेकरच खरंतर. तरीही इतक्या वर्षांत नेहमीची ८-१० यशस्वी ठिकाणं सोडल्यास मी पुणं मुद्दाम वेळ काढून पाहिलंच नाही कधी. तो विचार मात्र होता, मनातल्या कुठल्यातरी सांदी-कोप-यात मुटकुळं करून पडून.

सध्या भारताबाहेर वास्तव्य असणारी मैत्रिण पुण्यात आल्यावर म्हणाली, एक पूर्ण दिवस सोबत घालवू या आपण. तेव्हा मग पर्यायांचा विचार करताना हा 'पुणे दर्शना'चा विचार उसळी मारून पृष्ठभागावर आला आणि आनंदाने एकमताने मंजूरही झाला. लगेच सोयीचा दिवस ठरवून बुकिंगही करून टाकलं.

खुप उत्सुकता होती या एकंदर सहलीची. काय काय दाखवतील, वेळ कसा पुरेल, कसा अनुभव असेल, दगदग होईल का.. वगैरे उगीचच वायफळ शंकाही होत्या. सहलीहून परतताना ह्याच शंकेचा फोलपणा जाणवून हसू आलं खुप.

पूर्ण दिवसभराची, अत्यंत उत्तम सहल आहे ही. स्थळांनुसार मार्गांचे आणि वेळेचे योग्य नियोजन, स्थलदर्शनासाठी पुरेसा अवधी, वेळेचे काटेकोर पालन, प्रत्येक ठिकाणाची नियमांसकट उत्तम माहिती देणारे गाईड, उत्तम स्थितीतली, माफक सजावट केलेली स्वच्छ हवेशीर बस, गाईड आणि वाहकाचं पर्यटकांप्रती सुहास्य वदने आदबीचं वर्तन, हे सगळं खुप सुखावणारं चित्र होतं.

केसरीवाडा, सावरकर स्मारक (बाह्यदर्शन), शनिवारवाडा, लाल महाल, आगाखान पॅलेस, शिंदे छत्री, वीर योद्धे स्मारक, कात्रज प्राणी संग्रहालय, बागुल उद्यानाशेजारचं महालक्ष्मी मंदिर, सारसबाग, पु.ल. देशपांडे उद्यान, राजा केळकर संग्रहालय, चतु:शृंगी मंदिर, डॉ. आंबेडकर संग्रहालय.. ही स्थळं आम्ही पाहू शकलो. काही पार्किंगच्या अडचणीमुळे तर काही रविवारच्या सुट्टीमुळे पाहता आली नाहीत. उदा. महात्मा फुले वाडा, जोशी रेल्वे संग्रहालय, आदिवासी वस्तू संग्रहालय, श्रीमंत दगडूशेठ गणेश मंदिर, पुणे विद्यापीठ (बाह्यदर्शन) वगैरे. पाहिलेल्या स्थळांकडे नजर टाकल्यास मार्गाच्या आखणीची साधारण कल्पना येऊ शकेल. हे सगळं पाहताना, बसमधून जाता-जाताच डेक्कन जिमखाना, आप्पा बळवंत चौक, कर्वे रस्ता, बाजीराव रस्ता, चितळेंचं दुकान, विश्रामबाग वाडा, तुळशीबाग, लक्ष्मी रस्ता, सिंहगड रस्ताही आपसुकच कव्हर केले गेले, त्यांचीही महत्वाचे रस्ते, पुण्याची ओळख असलेली ठिकाणं म्हणुन विशेष माहिती देण्यात आली. मला हे खुप महत्वाचं वाटलं आणि आवडलं. या वेळापत्रकात वेळेअभावी पर्वती, खडकवासला, सिंहगड ही महत्वाची ठिकाणं समाविष्ट होऊ शकत नाहीत. पुढेमागे मुदत वाढवून एका मुक्कामाची सहल झाली तर पुण्याची ओळख अगदी परिपूर्ण होईल.

सहलीचा पहिला भाग थोडा निवांत तरीही खुप सारी स्थळं सामावलेला आहे. जेवणानंतर भेट द्यायची स्थळं मात्र जरा वेळखाऊ आणि तुलनेने किंचीत जास्त पायपीटीची आहेत. पण मार्गानुसार पाहिल्यास ते होणं क्रमप्राप्त आहे. सगळी ठिकाणं तुम्ही पाह्यलाच हवीत असं अर्थातच नाही, त्यामुळे दगदग होईल असं वाटल्यास एखादं स्थळ न बघता ती टाळता येऊ शकते. दिलेल्या अवधीत प्रत्येक स्थळ बघून होईलच असेही नाही, पण त्या स्थळाचं स्वरूप आणि महत्व समजण्याइतका तो नक्कीच पुरेसा असतो, जेणे करून आपण पुन्हा जाऊन निवांतपणे ते पाहू शकतो. एक बाब आवर्जून नमुद करावीशी वाटते की भेट दिलेली सर्वच स्थळं उत्तम देखरेख असलेली, तिकिटांची सोय असलेली, प्रभाव पाडणारी आहेत. बहुतेक सर्व ठिकाणी उत्तम स्वच्छतागृहांचीही सोय आहे.

आम्ही तिघी मैत्रिणी, त्यापैकी दोघी आपापल्या मुलांसकट, असे पाच जण होतो. आम्ही आणि मुलांनीही सर्व स्थळे पाहिली. दमणूक मुळीच झाली नाही कारण स्थळ-भेटींदरम्यान बसमधे आपल्याला आरामच मिळतो. अतिशय आल्हाददायक हवेमुळे प्रसन्न वातावरण होते. योगायोगाने आमच्यासोबत आमच्यासारखेच पुणं बघायच्या इच्छेने आलेले पुणेकर खुप होते, अख्खी मिनीबस मराठी लोकांनीच भरली होती. "पुणे दर्शन कसलं करताय, रविवार आहे तर गप घरात पडून रहा.. हेहे पुण्यात काय आहे बघण्यासारखं.. काहीही करतात लोकं.." अशा न विचारताही आगाऊपणे आलेल्या हेटाळणीयुक्त अभिप्रायांच्या पार्श्वभूमीवर तर ही बाब मला आनंदाची वाटली, की आहेत बाबा आमच्यासारखे आणखी काही वेडपट लोकं! विशेष आनंद ह्याचा झाला की दैनंदीन सेवा असूनही बसचे आगाऊ आरक्षण करावे लागते. पूर्ण पैसे भरून आरक्षण केलेले असूनही कुणी येवो अगर न येवो, बस वेळेवरच सुटते, ही आणखी एक कौतुकाची गोष्ट.

आम्ही सगळ्यांनी या सहलीचा पुरेपूर आनंद घेतला. जेवणाच्या डब्यांसोबत भरपूर खाऊही नेला होता, वाटेत खिडकीतून बाहेर बघत तो खाऊ खायला खुप मजा आली. स्थलदर्शनासाठी उतरताना ओझी बसमधेच ठेऊन सुटं, मोकळं फिरत होतो. सारसबागेजवळ जेवायला बस थांबल्यावर बाकी सगळे हॉटेलमधे जेवायला गेले तेव्हा आम्ही मात्र बागेतल्या हिरवळीवर वर्तमानपत्रे पसरून डबे उघडून मस्त पिकनिक लंच घेतलं. मुले तेवढ्याच वेळात तिथे भरपूर खेळलीही. मला व्यक्तिशः बाजीराव रोडवर, लक्ष्मी रोडवर असं बसमधून फिरताना, आपली बस इथे थांबणार नाही आणि त्यात धक्काबुक्की होणार नाही या प्रत्यक्षातल्या कल्पनेने खुपच गंमत वाटली.

मला पुणं आवडतं. मला आणि माझ्या मुलाला सार्वजनिक वाहनांनी फिरायला भयंकर आवडतं. त्यामुळे सहल आवडणार हे गृहीत होतं. पुण्यातून असं एका दिवसभरासाठी नवं, अनोळखी होऊन फिरताना मनात अनेक विचार येत होते. पुण्याबाहेरून आलेल्यांना काय काय दाखवायला हवं ते लक्षात आलं. मी त्यांना पुणं फिरवताना मुळात मी पुण्याकडे कसं पाह्यला हवं हे समजलं. प्रशासन ज्या चांगल्या गोष्टी करतंय, त्याची दखल घेऊन त्याबद्दल कौतुकाची थापही पुणेकर नागरीक या नात्याने मी द्यायला हवी, हे जाणवलं. वाहतुकीच्या कोंडीत अडकलेलं असताना दिसणारं पुणं, अव्यवस्था असणारं पुणं ओलांडून त्यापलिकडच्या पुण्याकडे बघायला मला या सहलीची अतिशय मदत झाली. कारण अशी अव्यवस्थेची बाजू ही प्रत्येक शहराला असते, ती काही एकट्या पुण्यालाच नाही. इतिहास-वर्तमानाशी एकाच वेळी घट्ट नाळ असलेली अभिमानास्पद स्थळं, २५० शाळा, १८० कॉलेजेस, ४० सिनेमागृहे, १० नाट्य्गृहे, ४० आयटी पार्क्स, अगणित बागा आणि नदी-ओढ्यांवरचे पूल, रस्त्यांचं आणि आता उड्डाणपूलांचं जाळं, हर एक वस्तूची जुनी-नवी बाजारपेठ, सणावारांची खासियत, पारंपरीक आणि आधुनिकतेचा उत्कृष्ट मिलाफ असलेलं खाद्यजीवन.. हो, इथे काहीच उणं नाही.

केवळ एक दिवस वेगळा काढल्यामुळे मला पुण्याकडे बघण्याचा असा सुंदर नजरिया मिळाला. बाहेरून आलेल्या पर्यटकालाही तोच मिळत असणार. हा दृष्टिकोन पुढे पास करणं मला आवश्यक वाटलं. पुणे दर्शनाच्या या आढाव्याचा तोच मुख्य हेतू. त्यासाठीच स्थळांचं वर्णन कटाक्षाने टाळलं, जे अतिशय मोलाचं आहे, ज्यावेळी तुम्ही पुणे सहलीला जाल, आणि मी तर सुचवेन नक्की जाच, मुलाबाळांसकट, कुटुंबिय, मित्रमंडळींसह, तेव्हा प्रत्यक्ष त्या स्थळीच गाईडकडून ऐकताना काय वाटतं ते अनुभवण्यासारखं आहे...

तुमचेही अनुभव इथे शेअर करा, ते सर्वांसाठी सोयीचं होईल.

माहिती - सहलीसाठी माणशी रु. 300/- तिकीट आहे, ज्या त्या ठिकाणची एण्ट्री फी आणि जेवण हा खर्च त्यात समाविष्ट नाही.
http://www.pmpml.org/Charges&Bookings.php
फोन नं 020-25510069

ताजा खबर - पीएमपीएमएलने पुणे दर्शनसाठी नव्या बसेस आणल्या आहेत. प्रथमदर्शनी तरी प्रसन्न दिसतायत.
https://www.google.co.in/search?q=pune+darshan+bus+photos&espv=2&biw=128...

इथे पुणे दर्शनचा साधारण सचित्र कार्यक्रम आहे. http://blog.travelyaari.com/pune/pune-darshan/

इथे दिवसभरात भेट देण्याच्या ठिकाणांचे वेळापत्रक आहे. https://www.google.co.in/imgres?imgurl=http%3A%2F%2Fwww.geodirect.in%2Fw...

मे महिन्यात पुणे मिररला पुण्याचे थीम बेस्ड दर्शन करवणार असल्याचीही बातमी होती, उदा. शैक्षणिक, सांस्कृतिक वगैरे. आत्ता ती लिंक नेमकी मिळत नाहीये. कुणाला मिळाली तर प्लीज इथे जरूर द्या.

आता शाळा सुरू झाल्यात. ही माहिती द्यायला उशीर झालाय, तरीही माहिती एकत्र असावी म्हणुन लिंक्स अ‍ॅड करून ठेवल्या आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थँक्स मनोज Happy
प्रेक्षणीय पुण्याबद्दल अगदी सहमत. मी हे वास अनुभवलेत. माझं कॉलेज मॉडर्न आणि मी रहायला टिळक रोडला, आधी कलाप्रसादशेजारी आणि नंतर प्रतिमा सिल्क्सच्या गल्लीत. एखाद्या दिवशी सायकल न नेता रमत गमत जाताना नारायण पेठमार्गे आणि येताना असा जरा लांबचा वळसा घालून यायचो मैत्रिणी मिळून. 'ममता'च्या समोश्याची जबरदस्त आठवण करून दिलीत! अजूनही तिथून पास होताना कधीतरी थांबून खाल्ला जातो.

बाय द वे, बसमधून आप्पा बळवंत चौकाचीही मुद्दाम ओळख करून देतात, वर लिहायला विसरले मी.

मला खरंच प्रतिसादांत पुण्याच्या अशाच छान आठवणींची अपेक्षा आहे. प्रत्येकाचे आपापले गल्ली-बोळ, नाके-कोपरे, वाटेतली दुकानं आणि त्याच्या विशिष्ट पाट्या मनावर ठसलेले असतात. असे प्रतिसाद वाचायला मजा येईल.

अ‍ॅडमिन, मला ते युद्ध स्मारक लिहिलंय तिथे 'वीर योद्धे स्मारक' असा बदल करायचा आहे.. आता संपादन केलं तर प्रतिसाद जातील का?

आप्पा बळवंत चौकातली आमची (नूसत्या मवाली विद्यार्थ्यांची) शाळा दाखवतात की नाही...

मी मध्यंतरी ही ट्रीप माझ्या काही केरळी मित्रांना सांगितली होती आणि त्यांनाही ती खूप आवडली होती..

सई मस्त लिहील आहेस .खर तर मुंबईचे राहणारे आणि पुण्यात आजोबा त्यामुळे दरवर्षी मे महिन्यात सुट्टीला जाणारे .तरी आपण वेगळं अस मुंबई दर्शन किव्वा पुणे दर्शन करत नाही पण करायला पाहिजे.
आम्ही पण एक दिवस काढून असच पुणे दर्शन केल होत आणि तसच मुंबई दर्शनही . मुंबई दर्शन मध्ये सगळ्यात शेवटी " बच्चन" चा बंगला दाखवला होता ( का बर ? प्रेक्षणीय स्थळ ?) आणि जुहूला मुंबई दर्शन ची सहल संपली Happy

सई मस्त लेख...

मला पुण्यात आवडणारी ठिकाणे म्हणजे विद्यापीठ, वेताळ टेकडी, बी एम सी सी टाटा हॉल समोरचे बाकडे किंवा बी एम चा जिमखाना, ILS Law चा मागच्या साईडचा campus (लक्ष्मी बिल्डींगच्या इथला..गुरुकुल जवळचा), प्रभातरोड आणि आघारकर रोडवरच्या गल्ल्या (विशेषकरून रणजीत हाटेलची गल्ली जी बी एम च्या गेटपाशी निघते).. मालती माधव (पु ल रहात ती बिल्डींग) / ओक अ‍ॅकेडमीपासून एक गल्ली आघारकर रोडवर येते तिथे चाफा आहे (होता?) एक.. काय घमघमाट असायचा.. एकदम दाट झाडी..

विद्यापीठात तर कितीही वेळ निरर्थक भटकता येऊ शकते. टपरी कँटीन, मेन बिल्डींगचा परिसर, आयुकाचा परिसर आणि कितीतरी ठिकाणे..

जुन्या पासपोर्ट ऑफिसपासून विखे पाटील शाळा/ कलाछाया पर्यंतची गल्ली पण एक्दम मस्त आहे.. फार गर्द झाडी आणि शांत (आता असते का शांत माहित नाही). विखे पाटील शाळा हद्द संपली की पुढे म्हाडाची वसाहत आहे आणि त्यातून जरा पुढे गेले की वेताळ टेकडी.. संध्याकाळी पाचच्या सुमाराला टेकडी चढायला सुरुवात करायची . बरेचदा मोर तर दिसतातच. साडेसहा सातपर्यंत टेकडी वर भटकंती करायची, सातनंतर आस्ते आस्ते एस बी रोड आणि ऊर्वरित पुणे झगमगायला लागते.. ते नुसते बघत बसायचे.. शांतपणे Happy

खादाडीवरची/ दुकानांवरची पोस्ट नंतर टाकतो Happy

छान लेख.. मी शाळेत असताना पहिल्यांदा पुण्यात आलो होतो तेव्हा हे पुणेदर्शन केलं होतं. खूप आवडलं होतं.

मस्त सई. बर्याच दिवसापासून लेकीला घेऊन पुणे दर्शन करायचे मनात आहे. आता तुझा लेख वाचून तो बेत तडीस न्यावा म्हणते Happy

Happy Happy

लंपन, नक्की लिहा.
हिम्स्कुल, नाही दाखवली नुमवि. बस केळकर रस्त्यावरून येऊन अबचौकातून डावीकडे खाली वळते. तीच त-हा बाजीराव रस्त्यावरून तुबा चौकातून डावीकडे लक्ष्मी रस्त्यावरून वळताना. त्यामुळे शाळा दिसत नाही.

छान लिहिलंत सई. छोटेखानी प्रवास वर्णन आवडले. पिकते तिथे विकत नाही अथवा घरकी मुर्गी दाल बराबर या सवयी मुळे लोक आपल्या शहराला कमी लेखतात. या पार्श्वभुमीवर वर तुमी "आपल्या" पुणे शहराची सफर मस्त घडवलीत.

सई मस्त वेगळ्याच विषयावर आणि वेगळ्याच फ्रेश अंदाजात लिहिलंयस . आपल्याच शहरात आपण परदेशी असतो खरे. अतिपरिचयात अवज्ञा.. त्यावरचा छानसा उतारा आहे हा. पुण्यात पूर्वी अगदी नियमित फेऱ्या होत असत पण आता कमी झाल्यात खऱ्या काही ना काही कारणांनी. पुन: येणं जमेल तेव्हा असं काहीतरीही नक्की जमवेन

अप्पा बळवंत चौक - स्टेशनरीचे साहित्य, शालेय साहित्य, नवी-जुनी पुस्तके, मासिके, वेगवेगळे कोश, रद्दी यांपासून ते पत्रिका छपाई, स्क्रीन प्रिंटिंग, झेरॉक्स वगैरे सर्व गोष्टींची दुकाने इथे एकत्र गुण्यागोविंदाने नांदतात. आता मोबाईल - कॉम्प्युटर संबंधीच्या गोष्टीही इथे मिळतात. चकचकीत, अद्ययावत, वातानुकूलित दुकानांपासून जुन्या धर्तीच्या, उंच जोत्यांच्या, दगडी पायऱ्यांच्या व लाकडी फळीचे दरवाजे असलेल्या दुकानांपर्यंत सर्व प्रकार! शेजारीच सुप्रसिध्द प्रभात टॉकिज. जवळ असलेल्या नूमवि, हुजूरपागा, कन्याशाळा, नवीन मराठी व अहिल्यादेवी या शाळांतील विद्यार्थ्यांची शाळेच्या वेळेला रस्त्यावर होणारी गर्दी.
जोगेश्वरीला मंगळवार, शुक्रवारी होणारी गर्दी... गणेशोत्सव, नवरात्रात व इतर सणप्रसंगी तिथेच रंगणारे कार्यक्रम... रमणबागही तशी जवळच. तिथे रंगणारे सवाईचे कार्यक्रम....
अप्पा बळवंतचा परिसर पायी पालथा घालण्यात खरी मजा आहे. मला एकदा कसलेही काम न घेऊन जाता, रमतगमत हे करायचे आहे. (पण त्या भागात गेले की अनेक कामे आठवतातच!) मला आता तिथल्या खादाडी स्थळांचा नावे आठवत नाहीत. पण डीएसके चिंतामणीपाशी संध्याकाळी मिळणारे ब.वडे, एका ठराविक दुकानात मिळणारी लस्सी, एका दुकानातले समोसे (खास करून समोश्याबरोबरची चटणी), सा.खि. वगैरे प्रकार मस्त!

सई, चांगलं लिहिलं आहेस.

तुझ्या लेखामुळे 'पुणेदौर्‍यावर असताना एक जास्तीचा दिवस ठेऊन पुणेसहल करायची' असा विचार आता माझ्याही मनाच्या सांदीकोपर्‍यात जाऊन बसला आहे किंवा तिथे पडून असलेला विचार अधोरेखीत झाला, असं म्हणता येईल.

असं एका दिवसभरासाठी नवं, अनोळखी होऊन फिरताना मनात अनेक विचार येत होते. <<< हो, पाहुण्यांसोबत निवांतपणे मुंबई फिरताना हे अनेकदा जाणवलंय. आपलेच रोजचे शहर अगदी वेगळेच आणि हवेहवेसे वाटू लागते. (ही उपमा कैच्या कैच वाटेल पण - लहानपणी आईने तिची फार वर्षांपासून जपून ठेवलेली ठेवणीतली मऊ रेशमी साडी नेसल्यावर ती वेगळीच आणि अजूनच हवीहवीशी वाटायची तशी.)

जोशी रेल्वे संग्रहाल अजीबात चुकवू नका.. अतिशय सुरेख आहे हे संग्राहलय. या संग्रहालयाच्या वेळाबहुतेक शनिवार आणि रविवार दुपार अशाच आहेत. a must visit place..

भारतीताई, चौको आणि सगळ्यांनाच खुप धन्यवाद Happy

अकु, अगदी अगदी. मी येईन तुझ्याबरोबर Wink मी ऐन अबचौकात असलेल्या एका खोपटसदृश हाटेलात मस्त मूग भजीही खाल्ल्याचं आठवतंय, ते बघायला हवं अजून चालू आहे का. तसंच एक टिळक चौकात कॅफे रिगलच्या शेजारीही मूग भजी मिळण्याचं ठिकाण आहे. राधा-कृष्णाशी निगडीत कायतरी नाव आहे त्या बारक्या हॉटेलाचं.

गजानन, कैच्या कै नाही रे, खरंच आहे की ते.. आपल्या शहराबद्दलच्या रोजच्या धबडग्याव्यतिरिक्तच्या आठवणी या अशा निवांत वेळी फिरताना वर येतात रे.. त्यामुळे तुझी उपमा चपखलच!

श्रीयू, जोशी संग्रहालय बिल्कुल 'चुकवू नये असे काही' सदरात!

सुर्रेख लेख सई! तुझ लिखाण एक वेगळाच निखळ आनन्द देउन जात! Happy

मुद्दाम ठरवुन अस पर्यटकासारख किन्वा त्रयस्थासारख आपण कधी आपल्या शहराची भटकन्ती करत नाही. पण तु छान अवलोकन केल आहेस.

<<स्थळांनुसार मार्गांचे आणि वेळेचे योग्य नियोजन, स्थलदर्शनासाठी पुरेसा अवधी, वेळेचे काटेकोर पालन, प्रत्येक ठिकाणाची नियमांसकट उत्तम माहिती देणारे गाईड, उत्तम स्थितीतली, माफक सजावट केलेली स्वच्छ हवेशीर बस, गाईड आणि वाहकाचं पर्यटकांप्रती सुहास्य वदने आदबीचं वर्तन, हे सगळं खुप सुखावणारं चित्र होतं.<<

पुण्याबद्दल, पुण्यातल्या बसेसबद्दल आणी पुणेकरान्बद्दल इतक सुन्दर चित्रण आतापर्यन्त कुणीच केल नसेल. Happy

एकुणातच आख्ख्या बाजीराव रस्त्यावर आणि लगत खानपानाच्या चिक्कार जागा आहेतच. एकदा फक्त खाद्ययात्रा म्हणूनही सहल करायला हरकत नाही. Wink
त्यात मधे मधे विश्रामबागवाडा, राजा केळकर संग्रहालय बघावे - तेवढंच श्रमपरिहार करायला कारण मिळतं. तुबा, लक्ष्मी रोड आणि तुबा ते मंडई रस्ता ही चिरतरुण शॉपिंगची केंद्रं आहेतच जोडीला.

कुमठेकर रस्त्यावर पुष्करिणी आणि नवरंग भेळ, ठिकठिकाणचे दाबेली स्टॉल्स, लगतच्या गल्लीत श्री उपहारगृह, इ.
विश्रामबागवाड्यातही खाली महिला बचत गटांचा खाऊचा स्टॉल असतोच. समोरच्या बाजूला दवे चं दुकान उघडं असलं तर खाकरा, ठेपले. तुबा मधे श्रीकृष्ण मिसळ, कावरे कोल्ड्रिंक्स-आईस्क्रीम्स - नुसतंच चटपटीत उदरभरण करायचं असलं तर अनोखा केंद्र मधे वडा, डोसा,इ आणि आसपासच्या गाड्यांवरची शहाळी. शनिपारापाशी ते मोठ्ठं रसाचं गुर्‍हाळ, ग्रीन बेकरीतले छोटे कुरकुरीत समोसे आणि पॅटीस, त्याच्या अलिकडचे नाना प्रकारची बिस्किटे मिळतात ते दुकान, पुढे खाऊवाले पाटणकर आणि बेहेरे आंबेवाले यांच्याकडे असलेला अपरंपार विविध प्रकारचा खाऊ, नव्या विष्णूच्या चौकात बरेच वेळा एक मटकीभेळवाला असतो, शिवाय लगेच पुढे वाडेश्वरची इडलीचटणी, थालिपीठ. त्यालाच लागून साठे बिस्किटवाल्यांकडच्या खाऊची व्हरायटी (त्यांच्या पुपो आणि साध्या पोळ्याही मस्त असतात), आणि थोडं पुढे हिंदुस्थान बेकरी - त्यांचे कप केक्स आणि पॅटिस... असो ज्याच्या त्याच्या आठव्णीनुसार यातही भर पडेलच.

शनिपारापाशी ते मोठ्ठं रसाचं गुर्‍हाळ - > मुरलीधर रसवंती गृह...
विश्रामबाग वाड्याच्या समोर कांताबेन महिला उद्योग खाकर्‍यांसाठी..
राजा केळकर संग्रहालयाशेजारीच बापट उपहार गृह.. सध्या चव बिघडली आहे पण..
नव्या विष्णू चौकातच पानवाला आणि तिथेच असणारी बटाटावड्याची गाडी...

म्हणूनच बापट चं नाव नाही लिहिलं. थर्डक्लास झालंय सध्या
ब.व. ची गाडी मला गेल्या वेळेस दिसली नाहीये Uhoh

होहो, ते कांताबेन - मला चुकीचं आठवत होतं

कांताबेनचे मेथीचे ठेपले पण..
आणि वाडेश्वरची रात्री ८ नंतरची पराठा भाजी आणि आलू पराठा पण!

बाय द वे, परवा केळकरांकडून बाहेर पडताना मी मैत्रिणीला मुद्दाम बापटांकडच्या पाट्या वाचून यायला आत पाठवलेलं Wink

कांताबेनचे बाजरी वडे आणि ठेपले Happy स्वीट होम चे आमटीवजा सांबार .. ग्रीन बेकरीचे केरळी डोसे. जनसेवाचा (बंद पडले हे) गोडसर चवीचा सांजा, पुणे गेस्ट हाऊसची थाळी आणि ईतर पदार्थ.. प्रभा विश्रांतीगृहाचा ( केसरी वाड्यासमोर) ब. वडा.

स्वयंपाकघरचे पण सारे पदार्थ चांगले असतात. किती अन काय काय पदार्थ अस्तात तिथे. मालक एकदम अवलिया आणि तिरसट आहे. ते डी जी कॉपीअर्स ला लागून असल्याने बरेच्दा डी जी कडे येणारे पब्लिक स्वयंपाकघर पुढे गाडी लावते काय शिव्या देतो मालक आतून घसा ताणून Happy आणि तिथे सुकी / पातळ भाजी वजनावर मिळते Happy

सई, छान लिहिलयस गं Happy मला हसतील माझे पुण्यातले नातेवाईक मी असं जायचं ठरवलं तर पण ठरवल्याशिवाय यादी मधली सगळी ठिकाणं बघणं कठीण आहे.. बघुया कधी जमतं ते..

Pages