नांदतो देव हा! (उपक्रम)

Submitted by संयोजक on 19 August, 2014 - 09:18

nandato 3.jpg

गणपती बाप्पा मोरया!
आजच्या गतिमानतेत स्वतःसाठी पुरता वेळ मिळत नसताना "दुसर्‍याला मदत कोण करतो?" असे काहीसे निराशेचे सूर क्वचित मनात उमटत असतात. अशा वेळी 'एखाद्या माणसाने दुसर्‍या एखाद्या माणसासाठी' केलेल्या मदतीबद्दल काही वाचायला मिळालं तर ती निराशा निघून जाते, माणुसकीवरचा, देवावरचा विश्वास पुनरुज्जीवित होतो.
"अगदी देवासारखा धावून आला तो माणूस म्हणून आज मी जिवंत आहे" किंवा "तुझ्या रूपाने देवच आला बघ माझ्या मदतीला" अशी वाक्यं आपण ऐकली असतील. ते ऐकताना क्वचित 'एखाद्या माणसाला लगेच देव करून टाकतात लोक' असा शेराही कदाचित (मनातल्या मनात) दिला असेल. पण प्रत्यक्षात त्या व्यक्तीची भावना मात्र अजोड असते.

प्राणावरचं संकट निवारणारे डॉक्टर असोत किंवा अगदी भर वाहतुकीच्या रस्त्यावर जोराने येणार्‍या गाडीपासून आपला हात धरून आपल्याला बाजूला ओढणारा कुणी अपरिचित असो, प्रसंगानुरूप कमी-जास्त वेळासाठी त्या त्या व्यक्तीला आपण 'देवासमान' करतो, हे मात्र नक्की. देवानेच त्या व्यक्तीला 'तशी' बुद्धी दिली असेही आपण म्हणतो.
असे अनुभव थोड्या-थोडक्यांना नाही बर्‍याच जणांना येतात. पण त्याबद्दल बोललं जातंच असं मात्र नाही. एखाद्याला देवत्व देण्यानं आपण 'देवभोळेपणा' तर करत नाही ना? अशी शंकाही क्वचित आपल्या मनाला स्पर्शून जात असावी.
पण खरा देव हा राउळी वा मंदिरी नसून अशा परहितरत माणसांच्या अंतरीच असतो ही खात्री बाळगून अशा देवांबद्दल सगळ्यांना सांगायला हवं.
'तुम्हाला जर असा 'हाडामांसाचा' देव भेटला असेल' तर त्या अनुभवाबद्दल यंदाच्या गणेशोत्सवात नक्की लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

संयोजक, तुमचं खरंच कौतुक आहे. इतका कमी वेळ मिळूनही किती कल्पक उपक्रम सादर करताय.
खूप प्रतिसाद येवोत ह्या धाग्यावर Happy

संयोजक,
तुमचं खरंच कौतुक आहे. इतका कमी वेळ मिळूनही किती कल्पक उपक्रम सादर करताय.
खूप प्रतिसाद येवोत ह्या धाग्यावर >>> +१०

१ ) हि साधारण १९८१ / ८२ सालची गोष्ट आहे. मी सकाळचे कॉलेज आणि नंतर आर्टिकलशिप करत होतो.
माटुंग्याच्या पोद्दार कॉलेजमधून निघून मी हिंदू कॉलनीतून दादर स्टेशनला चालत जात असे. त्या काळात
तिथे रस्त्यावर फारशी वाहने नसत. माझ्याबरोबर माझे मिस्त्र गणेश सावंत, रमेश मेहेर, नेमिष मेहता असत.
आमच्या रोजच्या गप्पा चालत असत.
त्याच गप्पांच्या नादात आम्ही रुईया कॉलेज ते रुईया नाका यामधले वळण ओलांडत असू. माझे लक्ष नसल्याने
किमान चारपाच वेळा तरी मला भरधाव गाडीपासून, गणेशने वाचवल्याचे आठवतेय. प्रत्येक वेळेस तो माझ्यावर
रागवायचा. रस्त्याने बघून चाल वगैरे सांगायचा. त्यावर माझे ठरलेले उत्तर, " तू असतोस ना माझ्याबरोबर, मग
मी कशाला बघू ? " त्याला आवडायचे नाही ते.

पुढे आमचे मार्ग वेगळे झाले, तरी पण कॉलेजच्या आठवणीसाठी, बँकेतल्या कामासाठी मी तिथे जातच असे.
आता रहदारी वाढलीय तिथे. मी आपल्या जून्या खुणा, झाडे वगैरे शोधत असाच त्या रस्त्यावरून चालत होतो.
त्या ठिकाणी मला हमखास गणेशची आठवण येत असे. मी माझ्याच तंद्रीत...

आणि त्या वळणावर मला एका माणसाने जोरात धक्का मारला आणि फूटपाथच्या दिशेने ढकलले. कोण तो हे समजायच्या आतच वेगाने दुसरी एक गाडी मागून गेली.. मी दोन क्षण संभ्रमावस्थेतच... ती गाडी तशीच जोरात पै हॉस्पिटलकडे जाताना दिसली.
तो माणूस मात्र मला दिसलाच नाही.

२) गणेश बरोबरचेच माझे आणखी दोन अनुभव.

आम्ही दोघे तिरुपतीला गेलो होतो. माझ्या मनात अजिबात नव्हते पण तो सश्रद्ध असल्याने मी त्याला सोबत
म्हणून गेलो होतो. तिथे ते हाताला इलेक्ट्रॉनिक बँड, भुयारी मार्गातली लांबलचक रांग हे सगळे मला असह्य होत होते. मी त्याला सारखे म्हणत होतो, कि एवढे तास रांगेत वाट बघून दोन क्षण सुद्धा दर्शन होणार नाही. ( नंतर तसेच झाले खरे )

त्या रांगेत असताना, आमच्या समोर काही तामिळ मूली वाट बघत होत्या. त्यांनी अचानक गायला सुरवात केली.
साथीला कुठलेही वाद्य नव्हते. भाषाही नीट कळत नव्हती.. पण त्यांचे सूर मात्र खुपच प्रभावी होते. तिघीजणी
उभ्या उभ्या गात होत्या. एकेमेकींपासून त्यांचे सूर वेगळे असे ऐकून येत नव्हते. असा जबरदस्त संगीतानुभव,
मला क्वचितच आला आयूष्यात. आर्त गायन नव्हते ते, बहुदा त्या काही मागत नव्हत्या. तक्रार करत नव्हत्या गायनातून..केवळ भक्तीभावाने गात होत्या. त्या सूरांनी माझा वैताग कुठल्याकुठे पळून गेला.

त्यानंतर आणखी एक नवल घडले. बालाजीच्या पुजार्‍यांनी खीरीच्या प्रसादाचे भांडे आणि काही द्रोण त्या
मूलींसाठी पाठवले. त्या मूलींनी आजूबाजूला असणार्‍या सगळ्यांना चमचा चमचा तो प्रसाद वाटून टाकला.
मी मुद्दाम विचारले, तर त्यांच्यापैकी एकीने सांगितले, बालाजी आपल्यावर प्रसन्न झाला, त्याने आपल्यासाठी
हे पाठवले....

खरं तर आमचे कर्तूत्व म्हणजे त्या क्षणाला आम्ही तिथे होतो एवढेच.. आजही ते सूर आणि तो प्रसाद माझ्या
मनात घर करून आहे.

३) गणेशबरोबरच मी आणि त्याचा चालक असे सुमोने महाराष्ट्र यात्रेवर निघालो होतो. सोलापूर, तूळजापूर करत
गाणगापूरच्या रस्त्याला लागेपर्यंत चांगलाच अंधार पडला. ड्रायव्हरची चालवायची तयारी होती पण रस्ता माहीत
नव्हता.

एखादे गाव किंवा बर्‍यापैकी हॉटेल दिसले तर तिथे थांबू असे म्हणत आम्ही रस्त्याला लागलो. महाराष्ट्र सोडून
कर्नाटकात शिरलो आणि दुसराच प्रॉब्लेम आला. रस्त्यावरती लाईट नव्हते. पाट्याही नव्हत्या. मैलाचे दगडही़ कन्नड लिपीत. आकडेही कळत नव्हते. तरी अंदाजाने पुढे जात होतो.

पण रस्त्याला फाटे फुटले कि त्यातल्या त्यात रुळलेला रस्ता बघून गाडी त्या रस्त्याने नेत होतो. पण एका ठिकाणी दोन्ही फाटे सारखेच रुळलेले दिसत होते. कुठे जायचे कळत नव्हते. आजूबाजूला वस्ती नव्हती.
गाडी दिसली तर थांबवू असा विचार करत आम्ही गाडीतून खाली उतरलो.

तेवढ्यात एक भिकार्‍यासारखा दिसणारा एक माणूस झोकांड्या खात खात येताना दिसला. मी गणेशला म्हणालो, त्याने रस्ता दाखवला तरच आपण त्याला पैसे देऊ. खरं तर त्याला हिंदी कळेल कि नाही, याची पण शंका होतीच. तो आमच्या दिशेने न येता दुसर्‍याच दिशेने जायला लागला. तसे आम्हीच त्याच्या जवळ गेलो आणि विचारले.

त्याला हिंदी कळत होते, त्याने रस्ता दाखवला आणि आम्ही पैसे काढेपर्यंत तो तसाच झोकांड्या खात निघूनही
गेला... असे आणखी दोनदा झाले. ती माणसे आमच्याशी बोलली त्यावेळी खास असे वेगळे काही वाटलेही नाही.

आम्ही गाणगापूरला पोहोचलो. एका पुजार्‍याने राहण्याची सोय केली. प्रसादही दिला.. अंथरुणावर पडता पडता
मी गणेशला म्हणालो, पोहोचलो रे एकदाचे... त्यावर तो म्हणाला, अरे तो आला होता ना रस्ता दाखवायला आपल्याला ! त्याला काळजी !

खरंच ?

दिनेशदा अनुभव भारी आहेत.
तुळू लिपी नसते तेलगू असते.
गाणगापूराच्या आसपास कन्नड लिपी असणार.
ते आम्हाला अगदी जवळ आहे.

सुमारे १०/१२ वर्षांपूर्वीची गोष्ट. आमच्या सोसायटीच्या इमारतीचे मेजर रिपेअरिंग सुरू होते. कॉन्ट्रॅक्टरचे कामगार सोसायटीच्या मोकळ्या आवारात तात्पुरत्या पत्राशेड झोपड्या बांधून रहात होते. माझी पत्नी त्यावेळी सेक्रेटरी असल्याने सर्व कामगार तिला ओळखायचे.

एकदा रात्री ८/८-३० च्या सुमारास त्यांच्यातला एक सिनिअर कामगार सांगत आला की लिंगा नावाचा कामगार खूप आजारी आहे. आम्ही झोपडीत जाऊन पाहिले. लिंगा तापाने फणफणला होता, थंडीने कुडकुडत होता. मी व पत्नी ताबडतोब त्याला आमच्या फॅमिली डॉक्टरकडे घेऊन गेलो. त्याला तपासल्यावर, हवेतील इन्फेक्शनमुळे तब्येत बिघडली असावी असे डॉक्टर म्हणाले, औषधे लिहून दिली. जवळच्या केमिस्टकडून आम्ही औषधे घेऊन दिली आणि बरे वाटेपर्यंत थंडीवार्‍याचा त्रास नको म्हणून गचीच्या जिन्यातील मोकळ्या जागेत त्याला आणि त्याच्या त्या सिनिअर कामगाराला झोपण्याची व्यवस्था करून दिली.

दोन-तीन दिवसांनी लिंगा खडखडीत बरा होऊन पुन्हा कामावर रुजू झाला.

सुमारे १५/२० दिवसांनंतर संध्याकाळी ७ च्या सुमारास घराची बेल वाजली. लिंगा दारात उभा होता. काय काम आहे विचारल्यावर "डॉक्टर और दवा का पैसा" असं म्हणत त्याने १०० रु. ची नोट पुढे केली. पैसे देऊ नको,
तुझ्याकडेच ठेव हे हर तर्‍हेने सांगूनही तो मानत नव्हता. उडिया-मिश्रित मोडक्या-तोडक्या हिन्दीत "आपका पैसा है, मैं नहीं ले सकता" त्याचं हेच पालूपद. अखेरीस "मेरा जैसे दूसरे जरूरवालेको देना" असं काहीसं म्हणून त्याने पटकन घरात शिरून ती नोट टेबलावर ठेवली आणि त्याच पावली तो जवळपास धावतच जिन्यावरून उतरून गेला.

"मी उद्या त्याच्या झोपड्यात जाऊन त्याला ते पैसे देऊन टाकते" असे बायकोने म्हटल्यावर मी तिला विरोध केला. म्हणालो.......
"इतक्या दुरून (ओरिसा) पोटापाण्यासाठी आलेल्या, ज्याची दिवसाची मजुरीही १०० पेक्षा कमी आहे अशा हातावर पोट असलेल्या माणसाच्या नीतिमत्तेचा तो अपमान होईल. जे आपले नाही ते आपल्याजवळ ठेवायचे नाही, आपल्यासारखे इतरही गरजू या जगात आहेत ही लाख मोलाची सामाजिक जाणीव, ही नीती म्हणजेच त्याच्या मनात असलेला (किंवा त्यावेळी जागृत झालेला) देवाचा अंश आहे. त्याने परत केलेले पैसे हा त्याच्यातल्या देवाच्या अंशाने दिलेला प्रसाद आहे असे समजून तो योग्य मुखी पोहोचेल असे पाहू".
त्याने "मेरा जैसे दूसरे जरूरवालेको देना" म्हटल्यानुसार दुसर्‍या कोणा गरजवंताकडे सुपूर्द करू."

हो.
कानडी आणि तेलगू लिपी एकदम सारख्या वाटतात.
एक वाचता आली की दुसरी अंदाजाने येतेच.
मला दोन्ही नीट वाचता येत असल्याने इथे आंध्रा(तेलंगणा)कर्नाटकात फिरताना खूप फायदा होतो.
आमचे लोक हिंदी बोलतात तरी क्वचित , तेलंगणाच्या अंतर्भागातील लोक तेलगू सोडून काही बोलतच नाहीत.
म्ह्॑णूनच तुम्हाला इतकी चांगली मदत मिळाली हे भारी आहे.

दिल्ली ते पुणे प्रवासाचा हा किस्सा!

कॉलेजच्या दिवसांमधील गोष्ट. मी एका मुंबईच्या ग्रुपबरोबर ऋषिकेश येथे एका शिबिरासाठी गेले होते. शिबिर संपल्यावर आठ दिवस तिथेच मुक्काम करायचा व आजूबाजूचा परिसर पाहायचा असा प्लॅन होता. परंतु मला तिथे पोचून जेमतेम आठ दिवस झाल्यावर काही घरगुती कारणामुळे मुक्काम गुंडाळावा लागण्याची चिन्हे दिसू लागली. परतीच्या रेल्वे तिकिटाची चौकशी केल्यावर ऋषिकेशच्या ट्रॅव्हल एजंटने आपण काही करू शकत नाही, वेटिंग लिस्ट आहे, तसे तिकिट घ्यायचे असेल तर घ्या असे सांगितले. तेव्हा तत्कालची सुविधाही नव्हती. शेवटी मी दिल्लीला जाऊन तिकिट मिळते का हे बघायचे ठरविले.

ऋषिकेश ते दिल्ली प्रवास शिबिराला आलेल्या एका मुंबईच्या कुटुंबाबरोबर टॅक्सीतून केला. त्यांनी मला रेल्वे स्टेशनला सोडले आणि ते विमानतळाच्या दिशेने रवाना झाले. स्टेशनवर येऊन मी चौकशी केली, परंतु त्या किंवा दुसर्‍या दिवशीच्या कोणत्याच गाड्यांची तिकिटे उपलब्ध नव्हती. शेवटी त्याच दिवशी पुण्याला जाणार्‍या रेल्वेचे जनरल तिकिट घेतले. त्या गाडीने पुण्याचा, माझ्या ओळखीचा एक मोठा ग्रुप परत चालला होता. त्यांच्याबरोबर आपली प्रवासात किमान बसण्याची तरी सोय होऊन जाईल असा माझा अंदाज होता.

गाडी स्टेशनात येऊन थांबल्यावर मी तिकिट मुठीत घेऊन गाडीच्या सर्व बोग्या पालथ्या घालायला सुरुवात केली. शेवटी एका बोगीत पुणे ग्रुपमधील एक बाई दिसल्या. त्यांच्याकडे माझी कॅरी ऑल बॅग सोपवली आणि ग्रुपमधील बाकीच्या लोकांना शोधत मी पुन्हा फिरू लागले. कोणाकडे ज्यादाचे तिकिट आहे का, एक्स्ट्रॉ बर्थ आहे का, ही चौकशी करत करत माझे फिरणे चालू होते. त्या ग्रुपमधील बरेचजण अजूनही फलाटावरच होते. कारण त्यांचे सामान बरेच होते आणि कूलीने ते आत गाडीत चढवण्याची प्रतीक्षा करत ते लोक खाली थांबलेले होते. मराठी, गुजराती, मारवाडी, सिंधी भाषिक लोकांचा तो सगळा मिश्र ग्रुप होता. बरेचसे लोक ज्येष्ठ नागरिक होते. त्यांना एक्स्ट्रॉ बर्थ, ज्यादाच्या तिकिटाबद्दल विचारणा केली, पण तसे तिकिट कोणापाशीच नव्हते. शेवटी, फिरून कंटाळून मी पुन्हा माझी बॅग ज्यांच्याकडे दिली होती त्या बाईंच्यापाशी जाऊन बसले. थोड्या वेळात ग्रुपमधील त्या डब्यात रिझर्वेशन असलेले बाकीचे लोकही तिथे जवळपास येऊन बसले. आणखी दोन डब्यांमध्ये ग्रुपमधील इतर लोक विखुरले होते. माझ्या बोगीतल्या लोकांनी मला आश्वासन देण्याचा प्रयत्न केला की मोठ्या ग्रुपबरोबर असल्यामुळे टीसी इथेच बसण्यासाठी सीट अ‍ॅडजस्ट करून देईल. कदाचित रात्री बर्थही मिळू शकेल. मी 'ठीक आहे' म्हटलं. तशी मी निवांत होते. रात्रभर बसून प्रवास करायला लागला असता तरी माझी ना नव्हती.

गाडी सुरु झाली आणि थोड्या वेळाने ग्रुपमधील एक वयस्कर काका माझ्यापाशी आले. ''बेटा, अभी प्लॅटफॉर्म पे मुझे एक आदमी मिला था | उसने सुना कि हमारे ग्रुपमेंसे किसी को एक्स्ट्रा बर्थ चाहिये | उसका भाई उसके साथ आनेवाला था, वो नहीं आया | इसलिये उसके पास एक एक्स्ट्रा टिकट है | तुम्हें चाहिये क्या?'' मी मनातल्या मनात व प्रत्यक्षात टुण्णकन् उडीच मारली आणि त्या काकांना म्हटले, ''चलिए, हम तुरंत उसके यहां जाकर वो टिकट लेते है |'' ते काका आणि मी एकातून दुसर्‍या बोगीत, सामान, माणसे, लहान मुले आणि गोंगाटातून वाट काढत त्या माणसाला शोधत फिरू लागलो. मधल्या काही डब्यांमध्ये वाटेत लोकांची व सामानाची प्रचंड झुंबड होती. मला काही त्यातून वाट काढता येईना! शेवटी डब्याच्या दुसर्‍या टोकाला गेलेल्या काकांनी मला ओरडून सांगितले, ''बेटा, तुम वहीं रुको या फिर वापस चली जाव | मैं देखता हूँ आगे |''
मी घामाघूम अवस्थेत पडत्या फळाची आज्ञा घेऊन घूमजाव केले व पुन्हा आमच्या बोगीत येऊन बसले.
थोड्या वेळाने काका हातात ते तिकिट घेऊन आले. मी काकांना विचारले, ''कितना पैसा लिया?''
काका धापा टाकत म्हणाले, ''अरे, उसने तो टिकट फोकटमें दे दिया | बोला, वैसेभी ये टिकट बेकार जानेवाला था | आप रख लो, मैं पैसावैसा कुछ नहीं लूँगा |'' मला त्या न पाहिलेल्या माणसाचे आश्चर्यच वाटले पण त्याचबरोबर कन्फर्म्ड तिकिट हाती आल्यामुळे हुश्शही झाले. टीसी आला की त्याच्याशी बोलून या डब्यात बर्थ अ‍ॅडजस्ट करून घेऊ वगैरे बोलून आम्ही इतर गप्पा-टप्पा करू लागलो.

बघता बघता सायंकाळ झाली. थोड्या वेळाने जेवूयात असे बोलणे चालू असताना ते मगाचचे काका परत माझ्या सीटजवळ आले व म्हणाले, ''चलो, उस आदमीको थँक्स बोलके आते है |'' मला ही कल्पना फारच आवडली. आम्ही लगेच बोगी टू बोगी प्रवास सुरु केला. पण दोन-तीन चकरा मारल्या तरी तो माणूस आम्हांला काही सापडला नाही. काका त्याच्या डब्यातल्या इतर सहप्रवाशांकडे चौकशी करते झाले. ''हां, बैठे थे यहां, पता नहीं कहां चले गये|'' एकाने सांगितले. आम्ही त्या डब्यात त्यांची पंधरा-वीस मिनिटे वाट पाहिली. कदाचित तेही दुसर्‍या डब्यात कोणाबरोबर गप्पा मारायला गेले असतील म्हणून एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यत जितके डबे पालथे घालता येणे शक्य होते तितके डबे पालथे घातले. पण त्या माणसाचा पत्ता लागला नाही. शेवटी त्याच्या सहप्रवाशाला आमचा निरोप दिला आणि आम्ही आमच्या बोगीत परत आलो. माझ्या तिकिटावरचा बर्थ दुसर्‍या डब्यात होता. तिथे आमच्या ग्रुपमधील एकजण जाऊन झोपले आणि त्यांच्या जागी आमच्या बोगीतल्या बर्थवर मी.

एवढे करून टीसी आला तो रात्री बर्‍याच उशीरा. आणि त्याने मोठा ग्रुप म्हटल्यावर फार कसून चौकशीही केली नाही. दुसर्‍या दिवशी पुण्याला पोचल्यावर मला व त्या काकांना त्या तिकिटवाल्या माणसाची पुन्हा आठवण झाली. आम्ही बाहेरून गाडीचे सर्व डबे, प्लॅटफॉर्म परत एकदा शोधले. तो माणूस नाही तर नाहीच मिळाला शेवटपर्यंत. अखेर मी त्याचे मनोमनच आभार मानले. कोण कुठला अनोळखी माणूस, त्याने त्याच्याजवळचे वाया जाणारे ज्यादाचे तिकिट देऊन माझा दिल्ली-पुणे प्रवास किती सुखावह केला!

मी आधीही एकदा म्हणल्याप्रमाणे गणेशोत्सवाच्या अनेक रंगबेरंगी आठवणी माझ्या जवळ आहे.
यावर्षीही एक अशीच अविस्मरणीय घटना घडली आणि त्यात भर पडली.
पण असो! ते नंतर केंव्हा तरी सांगेन Happy

मी सहावीत असताना म्हणजे साधारण १३ वर्षांपुर्वीची गोष्ट! त्यावर्षी काही अचानक उद्भवलेल्या संकटांमुळे उपजिविका म्हणून त्यावर्षी आम्ही गणेशमुर्ती विकायला घेतल्या होता.
डोक्यावर कर्जाचा डोंगर. जितकी कमाई होत होती तितकी कर्ज फेडण्यातच जात होती. अशातच एक दिवशी आम्ही ज्याचे देणेकरी लागत होतो त्यापैकी एक जण घरी आला आणि आत्ताच्या आत्ता माझे ५०० रुपये परत करा म्हणायला लागला. त्याच्या सोबत २ तगडे गुंड ही होते. खुप विनवण्या केल्यावर म्हणाला, "मी उद्या सकाळी १० वाजता येतो. तेंव्हा यांनाही सोबत घेऊनच येईन. माझे पैसे मला उद्याच्या उद्या मिळायलाच हवेत. नाहीतर बघाच..!" २ वेळेचं जेवण मिळायची जिथे भ्रांत तिथे एकदम ५०० रुपये कुठुन असणार जवळ? आणि मिळणार तरी कुठुन? उपाय एकच होता जर सकाळी सकाळी काही विक्री झाली असती तरच ते शक्य होतं आणि एकंदर सगळी परिस्थीती पहाता त्याची शक्यताही काही वाटत नव्हती. त्या रात्री काळजीने कोणाच्याही डोळ्याला डोळा लागला नाही. पैसे मिळवण्याच्या सगळ्या वाटा हुडकून झाल्या पण काही सोल्युशन मिळालं नव्हतं.
दुसर्‍या दिवशी सकाळी ८ वाजता बाबा आईला म्हणाले, "मी स्टॉलवर जाऊन बसतो. बघुयात काही होतंय का". ९ वाजेपर्यंत एकही मुर्ती खपली नव्हती. आम्ही सगळेच रडवेले झालेलो असताना तिथे एकजण आला. 'मंडई' गणपती तुमच्याकडे आहे का असं विचारू लागला.बाबांनी चेक केलं तेंव्हा बरोबर एकच मुर्ती उरली होती.
कितीला आहे ही मुर्ती विचारल्यावर बाबांनी ३०० रुपये सांगितले मुर्तीची किंमत २५० होती पण लोकं घासाघिस करुन ५० रुपये कमी करतात हे पक्कं माहीत होतं. पण या माणसाने एकही शब्द न बोलता ती मुर्ती बूक केली.प्रतिष्ठापनेच्या दिवशी घेऊन जाईन म्हणून सांगितलं. आणि सोबतच डेकोरेशनच २०० रुपयेच सामानही घेतलं.
नॉर्मली लोकं मुर्ती बूक करताना अर्धी रक्कम देतात आणि मुर्ती घेऊन जाताना अर्धी रक्कम देतात. पण त्याने तिथल्या तिथे ५०० रुपये कॅश काढुन बाबांच्या हातावर ठेवली.तेंव्हा मात्र बाबांनी सांगितलं की मुर्तीची किंमत २५० आहे तेंव्हा ५० रुपये परत घेऊन जा. त्यावर तो माणुस म्हणाला की मला माहीत आहे मुर्ती २५० ला आहे ते पण आता मी ती ३०० ला बूक केलीये तेंव्हा राहू देत. तुम्ही मी येईन तेंव्हा तुमच्यातर्फे मला नैवेद्य द्या. आणि हसुन निघुन गेला. आणि आम्हाला हुश्श झालं!
तेच ५०० रुपये तसेच्या तसे १० वाजता आलेल्या आम्ही देणं लागत असलेल्या माणसाला दिले आणि आमच्यावरचं संकट टळलं म्हणुन गनरायापुढे हात जोडले.

प्रतिष्ठापनेच्या दिवशी सकाळ पासुन संध्याकाळ पर्यंत आम्ही ती मुर्ती ज्याने बूक केली होती त्याची वाट पाहीली. तो काही आलाच नाही. आजुबाजुच्या दुकानात चौअक्शी केली तेंव्हा कळालं हे नेहमीचं गिर्हाईक नव्हतं. नवं गिर्हाईक होतं. त्यानंतर सलग ४ वर्ष आम्ही ती मुर्ती घरी ठेवली होती आणि दरवर्षी जिथे आमचे स्टॉल होते तिथे जाऊन त्या माणसाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तो कोणालाही पुन्हा दिसला नाही.

१३ वर्षांपुर्वी मुर्ती बूक करुनही घ्यायला येऊ नये इतके ५०० रुपये साधे नव्हते.
सधन कुटुंबांना कदाचित शक्यही असेल पण आमचे स्टॉल ज्या एरियात होते तिथे एखादा सधन व्यक्ती सहज येऊन मुर्ती बूक करून जाणं प्रेफर करेल हे लॉजिकली पटत नाही.घरात काही घडलं असेल म्हणून जर त्याने मुर्ती नेली नसेल तर किमान अर्धे पैसे न्यायला किंवा त्याबद्दल विचारणा करायला तरी कोणीतरी आलंच असतं की....
तो माणुस कोण होता ते माहीत नाही. देव म्हणावं तर बुद्धी मानायला तयार होत नाही पण मग तो कोण होता याचं उत्तर सापडत नाही. बाकी काहीही असो पण माझा देवावरचा विश्वास दृढ होण्याच्या प्रसंगमाळेतला हा एक मोती!!!!

तारीख - २६ जुलै २००५. मुम्बईला प्रलयकाळाचा अनुभव देणारा दिवस.
नेहमीप्रमणे ऑफिसला गेले होते. दुपारनन्तर पावसाचे रौद्र रूप जाणवू लागले होते. घरी माझा १ वर्ष २ महिन्याचा मुलगा, सासूबाई आणि त्याच्या २ बहिणी, पैकी एक बेडरिडन. देवालाच काळजी म्हणून की काय पण नवर्‍याचा वीकली ऑफही त्या दिवशी होता. घर तळमजल्यावर, रो - हाउस, मागे पुढे अन्गण असे.
दुपारनन्तर पाण्याची पातळी वाढू लागली. नवर्‍याने व आईनी सर्व महत्वाची कागदपत्रे, मौल्यवान वस्तू कपाटावर ठेवण्यास सुरुवात केली. मी तर ऑफिसमध्येच अडकले होते. पाण्याची पातळी वाढतच होती. एक लहान बाळ, एक आजारी बाई व २ वृध्दा अशा सर्वाना सुरक्षित स्थळी हलवणे गरजेचे होते. त्यावेळी आमच्या भागात जवळपास सर्व घरे अशी बैठीच. एक सन्घवी म्हणून रहात , त्याचेच घर फक्त ३ मजली. पण त्यान्च्याकडे बरीच गर्दी होती. मात्र त्या बाईने स्वतःहुन आम्हाला हाका मारुन बोलावले.(फोन बन्द होते). तुमच्याकडे बाळ आहे म्हणून तुम्ही सर्व या म्हणाली. घरी स्वयपाकाला असणार्‍या मावशीनी पण स्वतःच्या घराची पर्वा न करता आईना नवर्‍याला सर्व मदत के ली. छातीपर्यन्त पाणी असताना त्यातून बेड रिडन बाईना खूर्चीत घालुन सर्वानी वर नेले. एक खोली आमच्यासाठी राखून ठेवली होती. स्वतःचा मुलगा घरी आला नव्हता तरी या सर्वान्ची काळजी घेतली. जेवू घातले. बाळासाठी दूध आणवले.

खरच त्या दिवशी जितकी माणसे मदतीला आली ती नानदतो देव हा' याचीच प्रचिती देणारी होत

सर्वांचेच अनुभव,
फील गूड देणारे .. Happy

रिया,
तुमच्या बाबतीत जो काही योगायोग वा चमत्कार (आपल्या आवडीने काहीही नाव द्या) घडले, त्यालाच देव म्हणतात. बाकी देव वगैरे असा काही नसतो. तर तुम्ही यावर विश्वास ठेऊ शकता कि तुम्हाला देव भेटला होता.

गणपती बाप्पा मोरया __/\__

दिनेशदा , उल्हास भिड़े
समर्पक अनुभव !

अरुंधती , तिकिट देण्यार्याच्या रुपाने देवच भेटला तुला Happy

आशिका , २६ जुलैचा तो दिवस कोणताही मुंबईकर विसरुच शकत नाही
फार हाल झाले होते तेव्हा सर्वाचे

Pages